‘धारावाहिक कादंबरी’लेखन करण्यात एक अनोखा थ्रिल अनुभवायला मिळतो. आणि त्यातला आनंदही काही वेगळाच असतो.
ग्रंथनामा - झलक
यशवंत रांजणकर
  • यशवंत रांजणकर
  • Wed , 17 June 2020
  • ग्रंथनामा झलक यशवंत रांजणकर Yashwant Ranjankar

प्रसिद्ध कथा-कादंबरीकार, नाटककार, चरित्रकार आणि पटकथा-संवादलेखक यशवंत रांजणकर यांचं सोमवारी, १५ जून २०२० रोजी मुंबईत वयाच्या ८७व्या वर्षी निधन झालं. यशवंत रांजणकर यांची ५० हून अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, चित्रपटकथा अशा विविध स्वरूपाचं लेखन त्यांनी केलं आहे. भयकथा, गूढकथा, विज्ञान-काल्पनिका, गूढ कादंबरी, फँटसी अशा विविध साहित्य प्रकार त्यांनी आपल्या कथा-कादंबऱ्यांमध्ये हाताळले आहे. अशा स्वरूपाचं लेखन करणाऱ्या मराठी लेखकांमध्ये त्यांचं नाव पहिल्या ‘टॉप टेन’मध्ये नक्कीच येईल.

रांजणकरांनी तब्बल सात ‘धारावाहिक कादंबऱ्या’ लिहिल्या आहेत. २०१० साली प्रकाशित झालेली त्यांची ‘बैरागपाडा’ ही बहुधा शेवटची ‘धारावाहिक कादंबरी’ असावी. हा वाङ्मयप्रकार हाताळणाऱ्या मराठी कादंबरीकारांच्या पिढीचेही ते बहुधा शेवटचे प्रतिनिधी असावेत. ‘बैरागपाडा’ या कादंबरीला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी ‘धारावाहिक कादंबरी’विषयी लिहिले आहे. ते संपादित स्वरूपात….

..................................................................................................................................................................

केवळ पुस्तकासाठी किंवा नियतकालिकाच्या एकाच अंकात पूर्णपणे देण्यासाठी लिहिलेली कादंबरी आणि धारावाहिक कादंबरी या दोहोंच्या लेखनतंत्रांत मोठाच फरक आहे. पहिल्या प्रकारातली कादंबरी संपूर्ण लिहून झाल्यावरच प्रसिद्ध होत असल्यानं त्या लेखनात वारंवार बदल करता येणं, त्याचं पुनर्लेखन करता येणं, लेखन अखेरच्या टप्प्यात येत असताना आरंभीच्या प्रकरणांतील काही भाग विसंगत वा जाचक वाटल्यास तो पुढील कथा-विकसनाशी सुसंगत वा रद्द करता येणं शक्य असतं. म्हणजेच अशा लेखनावरून, ते प्रसिद्धीस पाठवेपर्यंत पुन:पुन्हा हात फिरवता येणं लेखकाला शक्य होतं.

धारावाहिक कादंबरीच्या लेखकाला मात्र या सुविधेपासून वंचित राहावं लागतं. हे लेखन क्रमश: प्रसिद्ध होत असलं तरी त्याची एकूण जातकुळी एखाद्या सदराच्या लेखनाहून पार वेगळी आहे. सदरासाठी दर आठवड्याला एक योग्य विषय मिळेपर्यंत काय ती मनाची उलघाल. त्या विषयावर एकदा लिहिलं, की नंतर त्याचा विचार करण्याची वा संदर्भ लक्षात ठेवण्याची सहसा आवश्यकता भासत नाही. परंतु धारावाहिक कादंबरीचं तसं नसतं. त्यातही रहस्य, भय, संदेह, थरार, अदभुत असे घटक असलेल्या धारावाहिक कादंबरीच्या लेखनाचं तंत्र, तसंच लेखनप्रक्रियाही वेगळीच असते.

‘बैरागपाडा’ तसंच माझ्या अन्य धारावाहिक कादंबऱ्यांची प्रकरणं नियतकालिकांतून क्रमश: प्रकाशित होत असताना मला नेहमीच वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आला आहे. त्यांच्या पत्रांतून वा प्रत्यक्ष भेटींत बहुश: एकच प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपात सातत्यानं विचारला जात असे. तो म्हणजे, अमुक-अमुक पात्राचं पुढं काय होणार आहे किंवा कादंबरीचा शेवट काय होणार आहे?

या अशा किंवा आनुषंगिक प्रश्नांची उत्तरं देणं मला अडचणीचं जाई. मी निरुत्तर होई किंवा ‘मलाच ते अजून ठाऊक नाही’ असं उत्तर देई. चाहत्याला अर्थातच ते पटत नसे. वाचकाची उत्सुकता शेवटपर्यंत ताणून धरण्यासाठी वा टिकवण्यासाठी मी मुद्दामच रहस्य गुलदस्त्यात ठेवतो आहे, असा साहजिकच त्याचा समज होई. मी खरोखरच तसं केलं असतं, तर त्यात काही गैर होतं असं कुणीही म्हणणार नाही. पण मी मात्र वस्तुस्थितीच सांगत असे. किंबहुना मीही त्या वाचकाप्रमाणेच ती उत्तरं मिळवण्यासाठी उत्सूक असे.

खरोखरच त्या-त्या कादंबरीत पुढं काय होणार; कथानकाला कसकशी कलाटणी मिळत जाणार; पात्रं आरंभी जशी वाटतात, तशीच ती पुढंही असणार आहेत काय; त्यांचा भूतकाळ वा भविष्यकाळ काय; आरंभी सकृद्दर्शनी परस्परसंबंधात नसलेल्या पात्रांचा आधी कधी संबंध आला होता काय अथवा पुढं त्यांचे रस्ते एकमेकांना छेदून जाणार आहेत काय, या सर्वच गोष्टींची कादंबरी लिहिण्यास घेण्याआधी अथवा ती अगदी मध्यावर येईपर्यंत मला स्वत:लाच पूर्वकल्पना असेच असं नसे.

कोणत्याही कादंबरीलेखनातले तपशील ते जसजसं पुढं सरकत जातं तसतसे भरले जातात, हे खरं असलं तरी त्याचा आराखडा वा स्थूल रूपरेषा लेखकाच्या मनात निश्चितच अससते. परंतु निदान मी लिहिलेल्या तरी धारावाहिक कादंबऱ्यांत तसा प्रकार केव्हाच नव्हता. मनात काही गणितं, आडाखे स्थूलमानानं ठरवलेले असले तरी कथानकाचा संपूर्ण सांगाडा दिसलेला नसे; कथाप्रवासाची दिशा निश्चित असली, प्रकरणांची संख्या वा प्रकाशनाचा नियतकालावधी या गोष्टी लेखनारंभीच निश्चित ठरलेल्या असल्या, तरी एकूण कथाप्रवासातले टप्पे किंवा मजली यांचं पूर्वनियोजन मात्र झालेलं नसे. मनाशी निश्चित झालेल्या असायच्या त्या तीनच गोष्टी. कथानक ज्यावर बेतलं आहे, तो विषय (उदा. बैरागपाडा : आपल्या आसुरी महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी अनेक वर्षांपूर्वी मृत झालेल्या विशिष्ट व्यक्तींचे आत्मे जागवू पाहणारी खल व्यक्ती), सुखान्त शेवट आणि काही प्रमुख व्यक्तिरेखा. याहून अधिक काही विचार करायला पुरेसा अवसर नसे. कारण जास्तीत जास्त पंधरा दिवसांच्या पूर्वसूचनेनं या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत.

अगदी पहिल्याच प्रकरणापासून रहस्य-गूढात्मक धारावाहिक कादंबरीनं वाचकाची पकड घ्यायलाच हवी; त्याचं कुतूहल जागृत करायलाच हवं आणि पुढंही टिकवायलाच हवं; पुढच्या आठवड्यातल्या प्रकरणाची वाट पाहण्याएवढी त्याची उत्कंठा ताणली जायलाच हवी. प्रत्येक प्रकरणासाठी हे सूत्र मनाशी पक्कं ठेवून, सुरुवातीच्या काही प्रकरणांत हेच सांभाळण्यासाठी मी ज्या काही नाट्यपूर्ण, गूढ, संदेहपूर्ण घटना वा व्यक्तिरेखा सादर करतो, त्या साऱ्यांचाच शेंडाबुडखा त्या वेळी तरी मला ठाऊक असतोच असं नाही. अगदी प्रमुख पात्रांखेरीजच्या या व्यक्तिरेखांचं पुढचं विकसन कसं असेल किंवा साधारणत: केवळ प्राथमिक नाट्य, रहस्य, उत्सुकता, उत्कंठा साधण्यासाठी निर्माण केलेल्या त्या (तेव्हा तरी उपऱ्या वा बेगडी) सनसनाटी घटनांचे धागेदोरे काय असतील, याचा मी त्या वेळी विचारच करत नाही.

अगदी ‘बैरागपाडा’मधलंच उदाहरण द्यायचं झाल्यास पहिल्याच प्रकरणात अवतीर्ण झालेल्या ‘वेडी’ या व्यक्तिरेखेचं देता येईल. ती आणली तेव्हा तिचं प्रयोजन केवळ वाचकाला एक धक्का देणं, नाट्य साधणं, पुढील भागाविषयी कुतूहल, उत्सूकता निर्माण करणं यापलीकडे काहीही नव्हतं. ‘पुढचं पुढं’ असाच काहीसा हा मामला. पण हीच व्यक्तिरेखा कथौघात महत्त्वाची ठरत निर्णायक क्षणी काव्यगत न्याय साधणारी ठरते.

पण असं असूनही मी या अशा व्यक्तिरेखा वा घटना यांवर विचार करतच नाही असं तरी कसं म्हणू? विचार होतच असला पाहिजे. पण ते माझ्या प्रकट मनाला तेवढं जाणवत नाही. कथनाच्या ओघात त्या व्यक्तिरेखा नि घटना या असा काही आकार घेत जातात की, त्या पुढं महत्त्वाच्याच नव्हे; तर कथानकाच्या अविभाज्य घटक ठरतात. परंतु सुरुवातीस मात्र त्यांच्या या पुढच्या विकासक्रमाची मला काहीच कल्पना नसते; माझे कसलेच अंदाज वा अटकळीही नसतात.

मात्र हा खेळ अत्यंत धोक्याचा असतो; अगदी अंगाशी येऊ शकणारा असतो. खेळाची सूत्रं लेखकाच्या हातातून केव्हाही निसटून जाऊ शकतात. त्याची मती कुंठित होऊन अतर्क्य, विसंवादी पळवाटा काढण्याकडे कल होऊ लागतो. आणि मग लेखनात पार गोंधळ, संभ्रम माजून ते विस्कळीत, तर्कशून्य अतएव वैरस्यजनक नि हास्यास्पदही होऊ शकतं. एक प्रकारे जिवंत नाग खेळवण्यासारखंच हे धोकादायक असतं. म्हणूनच असा खेळ खेळताना धारावाहिक कादंबरीकाराच्या मनाचा एक कोपरा सदैव सजग, दक्ष असणं अत्यावश्यक असतं.

वाचकाची उत्कंठा ताणून धरण्याकरिता वेळ मारून नेण्यापुरती गूढ, संदेह, रहस्य, भय, थरार यांची निर्मिती एक वेळ सोपी असेल; पण पुढं ते सारं नीट किनाऱ्याला लावणं हे खरं कसोटी पाहणारं असतं. त्याकरता लेखनाच्या किमान उत्तरार्धाच्या टप्प्यापासून तरी पुढचा विचार करताकरताच पूर्वार्धातील कोणते प्रश्न वा कोडी वाचकासाठी (आणि स्वत:साठीही) अनुत्तरित राहिली आहेत, याचा सतत धांडोळा घेत राहणं फार गरजेचं असतं. अशा प्रकारच्या लेखनालाही त्याचं असं एक ‘लॉजिक’ असतंच. आणि त्याला धरूनच कादंबरी संपवण्याआधी उपरिनिर्दिष्ट गोष्टींची प्रयोजनं स्पष्ट व्हावयास हवीत. त्यांचे धागेदोरे हवेत अधांतरी ठेवून चालणार नाही. तसं केल्यास कादंबरी तर बिघडतेच; पण त्याहूनही मुख्य म्हणजे ती वाचकाची फसवणूक आणि त्याच्या सुजाणतेचा अपमानही ठरते.

धारावाहिक कादंबरी-लेखन करण्यात एक अनोखा थ्रिल अनुभवायला मिळतो. आणि त्यातला आनंदही काही वेगळाच असतो. सुप्रसिद्ध जादूगार हौदिनी याला साखळदंडांनी जखडून एका लोखंडी पेटीत कुलूपबंद करून ती समुद्रात वा मोठ्या जलाशयात सोडत आणि तो मग अवघ्या काही मिनिटांतच आपली मुक्तता करून घेऊन पाण्यातून सुखरूप बाहेर येई, असं सांगतात. धारावाहिक कादंबरीकाराचं काहीसं असंच असतं. फरक एकच : जादूगाराला इतर लोक जखडून टाकत, तर इथं कादंबरीकाराला स्वत:च स्वत:च्या कोड्यांनी स्वत:लाच जखडून त्यांतून सहीसलामत बाहेर यायचं असतं. आणि विशेष हे की, ती कोडी टाकण्याच्या वेळी किंवा नंतरही काही काळ त्याला त्यांच्या उलगड्याची काहीच कल्पना नसते.

..................................................................................................................................................................

‘बैरागपाडा’ या धारावाहिक कादंबरीची झलक वाचण्यासाठी पहा -

https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=5366022948947522427&PreviewType=books

..................................................................................................................................................................

यशवंत रांजणकरांची ग्रंथसंपदा -

कथा-कादंबऱ्या - ऐश्वर्यकुंड, वृश्चिक मुद्रा, वृश्चिकसंहिता, सिकंदर शह, बैरागपाडा, कजलीचंदा, कालकन्यका, कालनिद्रा (दोन कादंबऱ्या एकत्रित), खानदान, घातचक्र, चण्डिमठ, चेतन चक्रवर्ती, जिद्द, तर्जनी, नकटीच्या लग्नाला, नो-एक्झिट, पंचरंग, पाऊण लाखाची गोष्ट, त्रिज, त्रिशूळ (तीन कादंबऱ्या एकत्रित), धाकटी सून, नंदिनी, नवलनगरी, पंचरंग, पिशाच्चवधू, भैरवगड, मर्दाची कहाणी, मुकाबला, मैफल, रत्नदीप, रवींद्रजीवन, रांजणवाडा, रात्र संमोहिनी, रुद्रतक्षक, रुद्रप्रहार, वेताळकोठी, शतानिक, शेवटचा दिस, श्वेतरेखा, सापळा, सुकन्या, सूडसंभ्रम, सौदा, ज्ञात-अज्ञात

नाटक - गर्भश्रीमंत

चरित्र - १. आल्फ्रेड हिचकॉक : द मॅन हू न्यू टू मच, २. लॉरेन्स ऑफ अरेबिया - जिवंतपणीच आख्यायिका बनलेल्या एका कलंदराचं चरित्र, ३. वॉल्ट डिस्ने - द अल्टिमेट फॅण्टसी

चित्रपटविषयक लेख - १. अ-पूर्व चित्रलेणी, २. बेस्ट ऑफ हॉलीवूड : निर्मितीकथा आणि रसास्वाद

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......