मानव कृत्रिम जीवांची निर्मिती करू लागला आहे आणि त्यातून तो उत्क्रांतीला एक नवी दिशा देईल, अशी शक्यता निर्माण झालीय.
ग्रंथनामा - झलक
माधव गाडगीळ
  • ‘उत्क्रांती : एक महानाट्य’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Tue , 02 June 2020
  • ग्रंथनामा झलक उत्क्रांती : एक महानाट्य Utkranti Ek Mahanatya माधव गाडगीळ Madhav Gadgil उत्क्रांती Evolution

ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचं ‘उत्क्रांती : एक महानाट्य’ हे पुस्तक लवकरच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला गाडगीळ यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

१.

विश्वाच्या रंगमंचावर सृष्टीच्या लीलांचे एक महानाट्य रंगले आहे. खगोलविद् सांगतात की, हे नाटक पंधरा अब्ज वर्षांपूर्वी ‘अणु-रेणुया थोटक्या’ अशा एका अतिसूक्ष्म बिंदूतून, एका महास्फोटातून सुरू झाले. तदनंतर विश्वाचा रंगमंच अथक विस्फारतोच आहे. या रंगमंचावर नवनवी तारका मंडले प्रवेश करत आहेत, नवनवे तारे चमकू लागत आहेत; त्यांच्याभोवती नवनवे ग्रह फिरू लागत आहेत, आणि त्याबरोबरच आधीची तारका मंडले विलीन होत आहेत. याच नाट्यातील एका प्रवेशात साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची उत्पत्ती झाली. कदाचित आपल्या पृथ्वीने जन्म घेण्यापूर्वी इतरत्र कोठेतरी जीवसृष्टी अस्तित्वात आली होती, परंतु आपल्याला याची काहीही जाणीव नाही. आपल्या माहितीप्रमाणे या विश्वात प्रथमच चार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर चेतनसृष्टीने पदार्पण केले. विस्कळितपणा सतत वाढत राहणे हा जडसृष्टीचा गुणधर्म आहे. जीवसृष्टीने या प्रवृत्तीवर मात केली आहे. सृष्टीच्या महानाट्यातील ही आगळीवेगळी सजीव पात्रे म्हणजे रेणूंचे अत्यंत सुसंघटित सहकार संघ आहेत. आपल्या शरीरांतून ऊर्जेचा व पदार्थांचा स्त्रोत सतत वाहवत ठेवून ते आपली नेटकी जडणघडण टिकवून ठेवतात, एवढेच नाही तर आकाराने वाढत राहतात आणि आपल्या सारख्याच सुसंघटित रचनेच्या संततीला जन्म देतात. पुनरुत्पत्तीच्या प्रक्रियेत निर्माण होणारे जीवांचे वंशज बऱ्याच अंशी पूर्वजांसारखे असतात; परंतु सगळेच हुबेहूब नकला नसतात. मधून मधून त्यांच्यात थोडेफार बदल होत राहतात; तेव्हा आनुवंशिकतेच्या जोडीला वैविध्य निर्मिती हाही जीवसृष्टीचा गुणधर्म आहे.

असे आनुवंशिक बदल परिस्थितीला अधिक प्रभावीपणे तोंड देण्याच्या दिशेने होतात की, पूर्णपणे दिशाहीन, योगायोगाने होत राहतात? उत्क्रांतीची दिशा ठरवण्यात परिस्थितीच्या आव्हानांची भूमिका अर्थातच महत्त्वाची असते. पण अशी आव्हाने पुढे ठाकली की, आपोआपच त्यांना समर्पक असे बदल उद्भवतात असे नाही. पूर्णपणे यदृच्छया, अकस्मात, अचानक झालेल्या हेतुशून्य बदलांतून, चुकांतून - म्यूटेशन्समधून - स्ट्रेप्टोमायसिन प्रतिरोध क्षमतेसारखे वेगवेगळे गुणधर्म प्रगट होत राहतात. अनेकदा, उदाहरणार्थ स्ट्रेप्टोमायसिन विरहित परिस्थितीत स्ट्रेप्टोमायसिन प्रतिरोध क्षमता, हे निष्कारण ऊर्जेचा व्यय करणारे वैगुण्य ठरते, पण हीच स्ट्रेप्टोमायसिन प्रतिरोध क्षमता, स्ट्रेप्टोमायसिनयुक्त परिस्थितीत अधिक सरस, गुणवान अवस्था ठरते. जर अशा वरचढ म्यूटेशन्समुळे तो जीव प्राप्त परिस्थितीत जास्त कार्यक्षम बनला, तो अधिक यशस्वीपणे तगू शकला अथवा त्याची पैदास वाढली, तर अशी सरस म्यूटेशन्स असलेल्या जीवांचे एकूण समुच्चयातील प्रमाण वाढत जाते आणि हळूहळू, कदाचित शेकडो पिढ्यांनंतर सारा जीवसमुच्चय अशा गुणवान् परिवर्तित जनुकांनी संपन्न होतो. उदाहरणार्थ, स्ट्रेप्टोमायसिनचा वापर सर्रास सुरू झाल्यावर स्ट्रेप्टोमायसिन प्रतिरोधक्षमता असलेले  बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात फैलावतात. हीच आहे डार्विनने उलगडा करून दाखवलेली निसर्गनिवडीची प्रक्रिया.

एवंच, पृथ्वीच्या रंगमंचावर सतत नवनव्या गुणधर्मांची सचेतन पात्रे दाखल होत राहतात. यांतील काही जीव आकाराने अधिक मोठे, रचनेने अधिक जटिल, नवनवी संसाधने वापरू शकणारे, नव्या नव्या परिसरात तगून राहण्यासाठी सक्षम असू शकतात आणि त्यांच्या प्रभावातून जीवसृष्टी सतत विस्तारत राहते. जीवसृष्टीच्या आरंभी सगळे जीव आजच्या बॅक्टेरियांसारखे काही मायक्रॉन आकारांचे होते; आजच्या शेणातून बायोगॅस निर्माण करणाऱ्या सूक्ष्म जीवांप्रमाणे परिसरात उपलब्ध असलेल्या रेणूंवर ऊर्जेचा, पदार्थांचा स्त्रोत म्हणून अवलंबून होते; त्यांचे वास्तव्य जिथे चिरांतून ज्वालारस उफाळतो, अशा खोल समुद्रातील गरम पाण्याच्या झरोक्यांच्या अंधाऱ्या परिसरापुरते मर्यादित होते. क्रमाक्रमाने आकाराने लहान, साध्या रचनेच्या जीवांच्या अस्तित्वाला काहीही बाधा न येता, त्यांच्यासोबत अधिकाधिक मोठ्या आकाराचे, जटिल रचनेचे नवे जीव अस्तित्वात येऊ लागले; तेवीस कोटी वर्षांपूर्वी ते डायनोसॉरांच्या प्रचंड आकारापर्यंत येऊन ठेपले. काहींच्यात हरितद्रव्य निर्माण होऊन ते सूर्यप्रकाशाची ऊर्जा वापरू लागले, इतर मोठ्या आकाराचे जीव लहान जीवांना गिळंकृत करत त्यांच्या शरीरातील ऊर्जा वापरू लागले, समुद्रतळावर पसरता पसरता मोकळ्या पाण्यातही तरंगू लागले, जमिनीवर पदार्पण करत ओलसर परिसरांतून अधिकाअधिक शुष्क परिसरात पसरले, पंख पसरून आकाशगामी बनले. असे विस्तारताना जीवसृष्टीच्या प्रभावातून वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण भरपूर वाढले, प्रवाळांच्या वाढीमुळे समुद्रात नवी बेटे उभी राहिली. अधिकाधिक वैविध्यपूर्ण बनताना जीवा-जीवांतील परस्परसंबंध अधिकाधिक गुंतागुंतीचे बनले. अशा परस्परसंबंधांतून परिसंस्था (Ecosystem) विणल्या गेल्या. त्यांच्यात सहा-सातपर्यंत वेगवेगळ्या पोषण पातळ्या (Trophic level) - १) सायनोबॅक्टेरिया (Cyanobacteria), २) डायनो-फ्लॅजेलेट (Dinoflagellate), ३) कोपेपॉड (Copepod), ४) युफाउसिड झिंगे (Euphauasid), ५) सील (Seal), ६) ग्रेट व्हाईट शार्क (Great white shark), ७) किलर व्हेल (Killer whale) - निर्माण झाल्या.

या साऱ्या महानाट्याचे चित्रण हे या पुस्तकाचे उद्दिष्ट आहे. अनेक सुरचित रेणूंनी बनलेले सर्व सजीव हे जडसृष्टीतील कोणत्याही वस्तूंपेक्षा जास्त ठासून माहिती भरलेले, अतिशय बोधसंपन्न आहेत, आणि उत्क्रांतीच्या ओघात सजीवांची माहिती हाताळण्याची क्षमता सातत्याने वाढत राहिलेली आहे. जीवसृष्टीच्या दृष्टीने माहितीची समर्पक व्याख्या कोल्मोगोरोव्ह या गणितज्ज्ञांनी सुचवली. त्या व्याख्येनुसार एखाद्या वस्तूतील माहितीचे प्रमाण ती वस्तू रचायला पुरेशा अशा सर्वांत छोट्या कृतिक्रमाच्या लांबीवरून मोजता येईल. जीवसृष्टीचे बोधभांडार म्हणून कामगिरी बजावणाऱ्या डीएनए रेणूंवर आधारित असे हे कृतिक्रम (Algorithm) संगणक सृष्टीतील computer programme सारखेच genetic programme, अथवा जनुकीय कार्यक्रम आहेत. जनुकीय कार्यक्रमांचे परिवर्तन, जनुकीय कार्यक्रमांचा विकास हा उत्क्रांतीचा गाभा आहे आणि या बदलांना निसर्गनिवडीतून दिशा दिली जाते.

पण उत्क्रांती केवळ जनुकांतील बदलांपुरती मर्यादित नाही. मानवाची जडण-घडण, मानवाचे चलन-वलन केवळ त्याच्या जनुकीय कार्यक्रमावर निर्भर नसते. आधीच्या पिढ्यांकडून त्याच्यापर्यंत पोचलेल्या परंपरा व ज्ञानभांडार, त्याचे आयुष्यभरातील अनुभव, त्याचे परस्परांशी संवाद, त्याने निर्माण केलेली कृत्रिम साधने, वस्तुसृष्टी त्याच्या जनुकीय कार्यक्रमाला पूरक ठरत त्याच्या जीवनाची दिशा, त्याच्या परिसराचे रंगरूप बदलत राहतात. मानवी इतिहासाच्या ओघात हे ‘सांकृतिक कार्यक्रम’ मानवाच्या जनुकीय कार्यक्रमातही बदल घडवून आणतात.

जीवसृष्टीच्या इतिहासाच्या, उत्क्रांतीच्या अभ्यासकांपुढे एक यक्षप्रश्न आहे. जीवन म्हणजे एक परस्परा करू सहाय्य, अवघे धरू सुपंथ असा सहकाराचा, सहयोगाचा प्रवास आहे; का जीवन ही एक गळेकापू यात्रा आहे? एक अथक संघर्ष आहे? आतापर्यंत बहुतेक प्रतिपादनात संघर्षाला भरमसाठ महत्त्व देण्यात आले आहे. पण जीवशास्त्राचे ज्ञान जस जसे सखोल होत चालले आहे, तस तसे स्पष्ट होत आहे की, मोठ्या प्रमाणात जीवन हा एक सहकारी उपक्रम आहे. उत्क्रांतीच्या वाटेवर जीवन सतत विस्तारत जाते, नवी नवी संसाधने वापरू लागते, वैचित्र्याने नटत राहते. या बरोबरच जीवनाची जडण-घडण, परस्पर संबंध अधिकाधिक गुंतागुंतीचे बनत जातात. याला तोंड द्यायला जीवजंतूंना अधिकाधिक जटिल माहिती हाताळायला लागते; निसर्ग निवडीतून त्या दिशेने त्यांची प्रगती होते. ही बोधक्षमता निर्माण होते संघर्षांच्या आव्हानांमुळे, पण सहयोगाच्या आधारावर.

२.

६.६ कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला आणि त्याच वेळी अवकाशातून एक प्रचंड उल्का येऊन पृथ्वीवर आदळली. तेव्हा उधळलेल्या कणा-कणांनी वातावरण काळवंडून पृथ्वीचे तापमान उतरले. या थंड हवेला डायनोसॉर तोंड देऊ शकले नाहीत, त्यांचा समूळ उच्छेद झाला. जसे डायनोसॉर लुप्त झाले, तसे पक्ष्यांनी आकाशगामी डायनोसॉरांची जागा घेतली व जमिनीवर मोठ्या आकाराचे शाकाहारी, तसेच हिंस्त्र पशू या परिभूमिका बजावायला सस्तन पशू पुढे सरसावले. थंडीबरोबरच पावसाचे प्रमाणही कमी झाले; परिणामी पानगळी वृक्षांची वने आणि माळराने फोफावली. तृणकुलांसारख्या कुलांच्या उत्क्रांतीचा वेग वाढून त्यांच्या अनेक नवीन जाती अस्तित्वात आल्या. गवताळ माळरानांचा विस्तार खूप वाढला. गवत हा शाकाहारी प्राण्यांना अतिशय अनुकूल आहार आहे. साडेपाच कोटी वर्षांपूर्वी गवतावर चरायला बकऱ्या, हरणे, नीलगाय, गवे, गायी, घोडे, उंट, गेंडे, हत्ती अशा अनेक सस्तन पशूंच्या तृणाहारी जाती भराभर अस्तित्वात आल्या. तृणाहारी पशूंची संख्या वाढली, तशी या संधीचा फायदा घेत कुत्रे, लांडगे, तरस, वाघ, सिंह अशा मांसाहारी जातीही झपाट्याने अवतरल्या. याला समांतरच सस्तन पशूंच्या इतर काही कुळींतून झाडांवर बागडणारी माकडे, आकाशात झेपावणारी वटवाघळे, पाण्यात पोहणारे देवमासे साकारले.

आदिम सस्तन पशू रात्री जमिनीवर फिरत, सपाट जगात वावरणारे आणि मुख्यत: वासावर भिस्त ठेवणारे लहान आकाराचे कीटकभक्षक होते. यांच्यातील माकडे झाडावर चढली आणि तिथल्या उंची-खोलीच्या जगात दृष्टीवर भिस्त ठेवत फळे, पाने, किडे, सरडे पक्षी अशी विविध खाद्यं खाऊ लागली. मग मानवकुळीचे पूर्वज झाडावरून पाय-उतार होऊन आफ्रिकेच्या माळरानांवर दोन पायांवर उभे राहून ३४ लाख वर्षांपूर्वी हाताने दगडांची, हाडांची, लाकडांची अवजारे, साधने हाताळू लागले. टोळी-टोळीने ते हत्तीसारख्या महाकाय पशूंची शिकार करू लागले. १६ लक्ष वर्षांपूर्वी त्यांनी आग काबूत आणली आणि वणवे लावत माळराने पसरवू लागले. आठ लक्ष वर्षांपूर्वी ते आगीवर मांस, तसेच गवताचे बी भाजू-शिजवू लागले. यातून पोषण खूप सुधारल्याने त्यांचा मेंदू भराभर वाढत जाऊन चिंपाझीच्या तिप्पट आकाराचा बनू शकला.

दोन लाख वर्षांपूर्वी आधुनिक मानवजाती आफ्रिकेत अस्तित्वात आली. रात्री शेकोटीजवळ जागत राहून त्यांच्यातील परस्पर संवाद खूप वाढला आणि एकमेकांना केलेली मदत हा त्यांच्या समाजजीवनाचा मुख्य आधार बनला. अशा संबंधात पूर्वी केलेल्या मदतीची नीट परतफेड व्हायला पाहिजे; परंतु सगळेच काही असे सच्चेपणाने वागत नाहीत. तेव्हा कोणते सच्चे आणि कोणते लुच्चे हे पारखणे महत्त्वाचे बनते. अशी पारख करण्याच्या प्रयत्नातूनच माणसाचा मेंदू आणि त्याची आधुनिक प्रभावी भाषा विकसित झाली असावी.

मानव हळूहळू केवळ साधी, दगडी, लाकडी अवजारे नाही तर धनुष्यबाण-गोफण यांसारखी आयुधेही ६४ हजार वर्षांपूर्वीपासून वापरू लागले होते. ५० हजार वर्षांपूर्वी रंगीत शिंपल्यांच्या गुंफलेल्या माळांसारखी आभूषणे आढळू लागतात. तेव्हा या सुमारास मानवाची आधुनिक सांकेतिक भाषा विकसित झाली असावी. याच सुमारास तो आफ्रिकेच्या बाहेर पडून आशिया व युरोप खंडांत पसरला आणि आणि ४५ हजार वर्षांपूर्वी थेट ऑस्ट्रेलियालाही पोहोचला.

मनुष्य सुमारे १२५ वेगवेगळे ध्वनी काढू शकतो; ध्वनींना एकामागून एक गुंफत अगणित शब्द, वाक्ये, विधाने रचू शकतो. ज्यांची नक्कल करून ती फैलावू शकतात, अशा या आचरण घटकांना कल्पिते ही संज्ञा दिली जाते. कल्पसृष्टीत निव्वळ कपोलकल्पित कथा व कलाकृती निर्माण होऊ शकतात आणि वास्तवाशी व्यवस्थित सांधा असलेले ज्ञानही विकसित होते. चाळीस हजार वर्षांपूर्वी मानव बासरी वाजवू लागला आणि शिळांवर प्राण्यांचे, शिकारीचे चित्रण करू लागला. ३४ हजार वर्षांपूर्वी हाडांवर कोरलेल्या चंद्रकोरी हा मानवाच्या पद्धतशीर ज्ञाननिर्मितीचा सर्वांत प्राचीन पुरावा आहे. नेटकेपणे पारखत वास्तवाशी अधिकाधिक व्यवस्थित सांधा जुळवत ज्ञान वृद्धिंगत राहू शकते. ज्ञानरूपी कल्पितांच्या आधारावर मानव अधिकाअधिक परिणामकारक अवजारे, साधने निर्माण करू शकतो आणि यांच्या विकासातून एक साधनसृष्टी उभी राहिली आहे. जे वाटले तरी घटत नाही, असे ज्ञान एक वैशिष्ट्यपूर्ण संसाधन आहे. या ज्ञानाच्या आणि ज्ञानाधारित साधनांच्या बळावर मानवाने सर्व सृष्टीवर कुरघोडी केली आहे.

पंधरा हजार वर्षांपूर्वीपासून सुरुवात करून मानवाने कुत्रा, डुक्कर, बैल माणसाळवले, आणि तेरा हजार वर्षांपूर्वी तो भात, गहू, कडधान्ये, जवस, ऊस, ज्वारी यांची शेती करू लागला. याबरोबर माणसाची संख्या सतत वाढत राहिली आणि बारा हजार वर्षांपूर्वी मानव समूहात भाल्यासारखी शस्त्रे वापरत लढाया जुंपू लागल्या.

नाईल-टायग्रिससारख्या नद्यांच्या खोऱ्यात अतिशय उत्पादक शेती शक्य झाल्यानंतर एक शेती करणारे कुटुंब अनेकांना पोसू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आणि अशा उत्पादनाच्या आधारावर मोठ्या प्रमाणात श्रमविभागणी शक्य झाली. या श्रमविभागणीतून विषमता फैलावली; त्या बरोबरच चार हजार वर्षांपूर्वी ज्ञानाची व तंत्रज्ञानाची जोपासना करणारा विशेषज्ञ वर्ग निर्माण झाला. त्यांच्या प्रभावातून विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग वाढू लागला.

याचीच एक परिणती म्हणजे युरोपात पाचशे वर्षांपूर्वी अतिशय परिणामकारक अशी वस्तुनिष्ठ व तर्कशुद्ध विज्ञान प्रणाली विकसित झाली आणि विज्ञानाच्या व तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग अचाट वाढला.

यातील माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून आज मानवाचे सर्व ज्ञान सर्वांपर्यंत पोचू शकण्याची शक्यता दिसू लागली आहे. तसेच या प्रगतीतून मानव कृत्रिम जीवांची निर्मिती करू लागला आहे आणि त्यातून तो उत्क्रांतीला एक नवी दिशा देईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......