श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या ललितलेखनावर आधारित अभिवाचनाची भन्नाट व्हिडिओ-मालिका
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
टीम अक्षरनामा
  • श्रीनिवास विनायक कुलकर्णी आणि त्यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 29 May 2020
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो श्रीनिवास विनायक कुलकर्णी Shrinivas Vinayak Kulkarni डोह Doh डोह : एक आकलन Doh - Ek Akalan

श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे मराठीतील एक सर्वोत्तम ललितलेखक आहेत. त्यांची ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ आणि ‘कोरडी भिक्षा’ ही चार ललितलेखांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ही चारही पुस्तके मराठी ललितलेखनातील मानदंड मानली जातात. नुकतेच त्यांच्या ‘डोह’ या पुस्तकाविषयीचे ‘डोह : एक आकलन’ हे विजया चौधरी यांनी संपादित केलेले पुस्तक मौज प्रकाशन गृहाने प्रकाशित केले आहे. १९६५ साली प्रकाशित झालेल्या ‘डोह’ या पुस्तकाला २०१५ साली ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ‘डोह : एक आकलन’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.

‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’ आणि ‘पाण्याचे पंख’ या पुस्तकांबद्दल दुर्गाबाई भागवत यांनी १९८९च्या ललितच्या दिवाळी अंकात लिहिले आहे - “श्रीनिवास कुलकर्णी यांची प्रतिमा त्यांच्या जीवनातल्या अनुभवांच्या नितळपणावर आधारलेली आहे.

- जरा वळुनि पाहता मागुती

कितीक हृदये सदा चरकल्याविना राहती

ही केशवसुतांची उक्ती एकदा वाचल्यावर विसरता येणार नाही अशी; जरब जन्मभर मनामनावर बसवणारी. माणसाला धोक्याचा कंदील दाखवावा तर केशवसुतांनीच. भले भले या चरकण्याच्या अनुभवातून पिळून निघाले आहेत नि हमेशा निघताना मी पाहते आहे. पण अशीही काही व्यक्तिमत्त्वे मी प्रत्यक्ष पाहिली आहेत, की त्यांना चरकावे लागतच नाही. ही पारदर्शक वाटावीत इतकी स्वच्छ माणसे आहेत. ही काही कुणी सुप्रसिद्ध नाहीत हे ओघानेच आले. पण ती सामान्यांच्या जगात आहेत नि ती आहेत म्हणूनच आपल्याला सुख वाटते. श्रीनिवास विनायक कुलकर्णी अशांपैकीच एक आहेत. अंतर्बाह्य एक, लाजवट वृत्तीचे. पक्क्या निश्चयाचे. चिंतन, जीवन नि लेखन एकरूप झालेले. म्हणूनच त्यांच्या लेखनावर लिहिणे सोपे नाही. इतके दिवस मला म्हणूनच काही लिहिता आले नाही. आजही त्यांच्या लेखनप्रपंचाला केवळ स्पर्श करत मी हे लिहिते आहे. गाभ्यापर्यंत पोहोचणे मला अजून जमत नाही; कारण गाभ्याजवळ गेले की, तिथे अनेक अनुभवी आत्म्यांची गर्दी दिसते. तिच्यात हरवून जाते.”

अतिशय तरल, आशयघन आणि चित्रमय शैली ही कुलकर्णी यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या लेखनाचा हा आविष्कार उजागर करण्याचा प्रयत्न २०१३ साली हिमांशू स्मार्त या नाटककाराने कालदर्शिकेच्या माध्यमातून केला होता. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, ग्रीष्म, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे बारा महिने, प्रत्येक महिन्याला सुसंगत असा श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या लेखनातील उतारा आणि या दोन्हींचा आशय अजून घन करणारी रिचा वोरा या चित्रकर्तीची पेंटिंग्ज, असा हा अफलातून प्रयोग होता.

त्याविषयीची आपली भूमिका स्पष्ट करताना या कालदर्शिकेच्या प्रकाशकांनी म्हटलं आहे की, “ऋतुमानानुसार बदलत जाणारी निसर्गसृष्टी आणि तिच्याशी असणारे मानवी जीवनाचे संवादी अनुसंधान हा श्रीनिवास विनायक कुलकर्णींच्या लेखनामधला एक प्रबळ धागा आहे. वर्तमानात आपण या सृष्टीपासून विलग झालेलो आहोत. ही कालदर्शिका आपल्याला खिडकीबाहेर पसरलेल्या ऋतुशी जोडून टाकेल आणि त्यातला उतारा ऋतुचा अनुभव अधिकच समृद्ध करेल. प्रत्येक वेळी उतरा ऋतुशी संबंधित असेलच असे नाही, परंतु उताऱ्याची ऊर्जा घेऊन आपण सृष्टीशी, तळठाव घेणारा, आत्मिक सांधा जोडू शकू. आमचा हा प्रयत्न सृष्टीची हाक आणि आपले अंत:करण यांमधला दुवा ठरेल अशी आम्हाला आशा आहे.”

मराठीमधला हा एकमेवाद्वितीय म्हणावा असा प्रयोग होता.

आता ‘सृजनशाळा’ या संस्थेने हाच प्रयोग काहीशा वेगळ्या अंगाने पुन्हा सादर केला आहे. २५ एप्रिल ते २८ मे २०२० या दरम्यान दर तीन दिवसांनी या संस्थेने एक व्हिडिओ आपल्या यु-ट्युब चॅनेलवर प्रकाशित केला आहे. हे व्हिडिओ अभिवाचनाचे आहेत. वेगवेगळ्या १२ कलाकारांनी हे अभिवाचन केले आहे. यातील साहित्य निवडले आहे श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या लेखनातून. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, ग्रीष्म, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन या बारा महिन्यांच्या अनुषंगाने कुलकर्णी यांच्या साहित्यातील लेखनाचे अंश निवडून त्यांचं अभिवाचन करण्याची ही कल्पना ‘कालदर्शिके’च्या कल्पनेसारखीच, किंबहुना त्याहून भन्नाट आहे.

प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला हिमांशू स्मार्त यांच्या कालदर्शिकेतील पेंटिंग व मजकुराचं पानही दिलं आहे. हे बाराही व्हिडिओ दीड ते अडीच मिनिट एवढ्या कालावधीचे आहेत. कोल्हापूरचे भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आणि सृजनशाळा यांचा हा कल्पक प्रयोग आवर्जून पाहावा, इतरांशी शेअर करावा असाच आहे. हे अभिवाचन हा समीक्षेचा विषय नाही, तो अनुभवण्याचा आहे.

सध्याच्या लॉकडाउनच्या काळात ‘खिडकी’ हेच आपल्या जगण्याचं, आनंदाचं निधान झालं आहे. खिडकीबाहेर प्रत्येक ऋतुत नवी रूप पांघरणारी सृष्टी नेमकी कशी असते, याचं विलोभनीय दर्शन या व्हिडिओमधून होतं... तेही प्रत्येक मराठी महिन्यानुसार...

प्रत्येक महिन्यानुसारच्या व्हिडिओ लिंक्स पुढीलप्रमाणे -

चैत्र

वैशाख

ज्येष्ठ

आषाढ

श्रावण

भाद्रपद

अश्विन

कार्तिक

मार्गशीर्ष

पौष

माघ

फाल्गुन

..................................................................................................................................................................  

‘डोह : एक आकलन’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5179/Doh-Ek-Akalan

..................................................................................................................................................................  

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................  

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......