असे होते माझ्या आठवणीतले प्रबोधनकार ठाकरे 
ग्रंथनामा - झलक
शंकर लक्ष्मण चिटणीस 
  • प्रबोधनकार ठाकरे आणि ‘प्रबोधनकार ठाकरेंचे ‘हिंदुत्व’ आणि ५१ मौलिक विचार’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 13 March 2020
  • ग्रंथनामा झलक प्रबोधनकार ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचे ‘हिंदुत्व’ आणि ५१ मौलिक विचार

‘प्रबोधनकार ठाकरेंचे ‘हिंदुत्व’ आणि ५१ मौलिक विचार’ हे छोटेसे पुस्तक संजय चिटणीस यांनी संपादित केले आहे. हे पुस्तक नुकतेच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात ज्येष्ठ पत्रकार दिवंगत शंकर लक्ष्मण चिटणीस यांच्या प्रबोधनकारांविषयीच्या लेखाचा समावेश आहे. त्याचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

प्रबोधनकार हे त्यांच्या घरातच नव्हे तर सर्वत्र ‘दादा’ म्हणून परिचित होते.

१९२५ सालातील गोष्ट. मी त्या वेळी १३ वर्षांचा शाळकरी विद्यार्थी होतो. त्या काळात कोल्हापूरमधील अंबाबाईच्या देवळातील रामाचा पार म्हणजे व्याख्यानांचा गाजलेला अड्डा होता. येथेच केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची ‘साताऱ्याचे दैव की दैवाचा सातारा’ या शीर्षकाखाली चार व्याख्याने झाली. प्रत्येक व्याख्यान अक्षरश: मन हेलावून टाकणारे होते. खोचक शब्दप्रयोग, भाषणात ऐतिहासिक शब्दांची रेलचेल हे ठाकरे यांचे खास वैशिष्ट्य. त्यांनी साताऱ्याचे शेवटचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या जीवनाची कहाणी इतक्या हृदयद्रावक शब्दांत सांगितली की, अनेक श्रोत्यांच्या डोळ्यांतून अक्षरश: अश्रू ओघळू लागले. कोल्हापूरमधील त्यावेळचे एक पुढारी बाबुराव गायकवाड तर अक्षरश: हुंदके देत होते.

या भाषणांत त्यांनी अनेक सत्यशोधकी पुढाऱ्यांच्या स्वार्थी वृत्तीवरही सडकून टीका केली. ते बोलता बोलता उद्गारले, “आज जगात एकच सत्यशोधक आहे व तो म्हणजे तुर्कस्तानचा केमाल पाशा.’’ सत्यशोधक समाजाच्या कोणत्याही कार्यकर्त्याने सरकारी पद स्वीकारू नये, यावर प्रबोधनकारांचा कटाक्ष होता. जेव्हा सत्यशोधक समाजाचे एक पुढारी भास्करराव जाधव यांनी सरकारमध्ये मंत्रिपद स्वीकारले, तेव्हा दादांनी त्यांच्यावर  कडक टीका केली.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं आहे

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

प्रबोधनकारांच्या त्या भाषणानंतर मी त्यांची आणखी काही भाषणे ऐकली; पण मी ऐकलेल्या त्यांच्या आरंभीच्या चार भाषणांचा ठसा आजही माझ्या मनावर कायम आहे.

पुढे कोल्हापुरातील ‘सत्यशोधक समाजा’च्या वार्षिक उत्सवात त्यांची व्याख्याने ऐकण्याचा योग आला. त्या व्याख्यानांत त्यांनी ब्राह्मणांवर कडाडून हल्ले चढवले. ब्राह्मणांचा उल्लेख ते ‘बामणं’ असा करत. अंगावर युरोपियन पोषाख पण डोक्यावर रुमाल अशा वेशातील प्रबोधनकार ठाकरे यांची सडपातळ मूर्ती आजही माझ्या डोळ्यांपुढे आहे.

त्यानंतर प्रबोधनकार ठाकरेंची गाठ पडली ती १९३५ - ३६च्या सुमारास. तेव्हा मी कोल्हापूरच्या ‘सत्यवादी’ साप्ताहिकात सहसंपादक होतो. त्या वेळी प्रबोधनकार विक्रम जनरल इन्शुरन्स कंपनीचे ‘ऑर्गनायझर’ म्हणून कोल्हापूरला आले होते. ते सत्यवादीच्या कचेरीत काही कागदपत्रे टाइप करून घेण्यासाठी येत. ते स्वत:च टायपिंग करत. त्यांचे इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व होते.  टा़यपिंग करता करता ते अनेक आठवणी मार्मिकपणे सांगत. त्यांचा त्या वेळी मला लाभलेला चार दिवसांचा सहवास म्हणजे सुखद अनुभव होता. त्या वेळी मला त्यांच्याकडून अनेक गोष्टींची माहिती झाली. प्रबोधनकार हे त्या वेळच्या महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक व धार्मिक चळवळींचा एक चालताबोलता संदर्भ ग्रंथच होते. ‘प्रबोधन’ हे त्यांचे नियतकालिक खूपच गाजले होते. प्रबोधनकारांचा बाणा कसा होता, याची आजच्या पिढीला सार्थ कल्पना यावी म्हणून दोन प्रसंग सांगतो.

कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. पण त्याचबरोबर त्यांचा रोख केवळ ब्राह्मणी संस्कृतीविरुद्ध नसून एकूणच ब्राह्मण समाजाविषयी त्यांच्या मनात अढी होती, यात शंका नाही. आपल्या राज्यातील ब्राह्मण जगद्गुरूंची उचलबांगडी करून शाहू महाराजांनी त्यांच्या जागी  बेनाडीकर पाटील नावाच्या एका तरुण मराठ्याची क्षात्र जगद्गुरू म्हणून नेमणूक केली. त्याबद्दल प्रबोधनकारांनी टीका केली :

‘‘ब्राह्मण जगद्गुरूचे दास्य नको म्हणून क्षात्र जगद्गुरूचे पीठ निर्माण करणे, म्हणजे जुन्या गुलामगिरीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी नव्या गुलामगिरीचे जोखड पत्करण्यासारखे आहे. समाजोन्नतीसाठी किंवा धर्मोन्नतीसाठी शंकराचार्यांचा एक मठच पाहिजे, त्यावर एक मठपतीच हवा, ही कल्पनाच मुळी मानसिक दास्याची स्पष्ट निशाणी आहे. गुलामगिरीचा नायनाट गुलामगिरीने होत नसतो. शिवाय, वर्णाश्रमवादी ब्राह्मण जगद्गुरूच्या मानसिक दास्यप्रवर्तक भिक्षुकशाहीला जमीनदोस्त करण्यासाठी थेट तसल्याच तत्त्वांवर उभारलेल्या क्षात्र जगद्गुरूच्या मठाला निर्माण करणे, म्हणजे जोखडासाठी देवाने आपल्याला मान दिलेली आहे, ही कल्पना दृढमूल झालेल्या बैलाने नाऱ्या तेल्याच्या घाण्याला रामराम ठोकून पिऱ्या तेल्याच्या गोंडस घाण्याला स्वत:स जुंपून घेण्यासारखे आहे. मठ आला की मठाधिपती आले, मठाधिपती आले का सांप्रदाय सुरू झाला. सांप्रदायाच्या मागोमाग सांप्रदायिक गुलामगिरी. अर्थात क्षात्र जगद्गुरूच्या मठाचा अनाठायी खटाटोप करणारे आज जरी या नवीन परिस्थितीत काही समाधान मानत असले, तरी निदान व्यक्तिप्रामाण्याची मुर्वत राखण्यासाठी, त्यांना कालवशात एका नवीन स्वरूपाच्या भिक्षुकशाहीच्या गुलामगिरीत जखडून पडल्याशिवाय गत्यंतरच उरणार नाही.”

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या लेखाने मराठा मंडळींत खूपच खळबळ उडाली. काही मराठा पत्रकारांनी तर ‘ठाकरे आपले नव्हेत’ येथवर इशाऱ्यांची लांबीरुंदी ताणली. ब्राह्मणेतर बहुजन समाजाच्या उद्धाराचे कंकण बांधलेल्या शाहू महाराजांच्या हर एक कृत्याला सविनय मान डोलावणे, हेसुद्धा व्यक्तिप्रामाण्याच्या गुलामगिरीला बिनशर्त मान वाकविण्याइतकेच लाजिरवाणे आहे, याची त्या आक्षेपकांना शुद्धच राहिली नाही.

प्रबोधनकार ठाकरे हे एक अजब रसायन होते. ते हुंडाविरोधी चळवळ चालवत असतानाची गोष्ट. माझ्या परिचयाच्या एका सद्गृहस्थांनी कोल्हापूर येथे लग्न केले. त्या वेळी त्यांनी हुंडा घेतल्याचे प्रबोधनकारांना कळले. त्यावर त्यांनी निषेधाची एक नामी युक्ती शोधून काढली. ते वधूसह कोणत्या गाडीने व कधी मुंबईला परतणार आहेत, याची माहिती काढली. त्यानुसार दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर प्रबोधनकारांच्या कार्यकर्त्यांनी ‘हुंडा घेणारा मी गाढव आहे’ असा फलक तयार करून तेथे एक गाढव आणून ठेवले. ठरल्याप्रमाणे ते सद्गृहस्थ दादरला येताच प्रबोधनकारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गाढवावर बसवले व त्यांच्या गळ्यात तो फलक अडकवला. तो प्रतीकात्मक पण आगळावेगळा निषेध  होता.

असे होते माझ्या आठवणीतले प्रबोधनकार ठाकरे.

.................................................................................................................................................................

‘प्रबोधनकार ठाकरेंचे ‘हिंदुत्व’ आणि ५१ मौलिक विचार’ : संकलन - संजय चिटणीस

लोकवाङ्मय गृह, मुंबई, पाने : ६२, मूल्य : २५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......