अजूनकाही
प्रा. दिलीप चव्हाण यांच्या ‘समकालीन भारत : जातीअंताची दिशा’ या पुस्तकात भारतातील जातीप्रश्नाचे मुख्य स्वरूप; भांडवलशाही, पितृसत्ता, राजकारण, धर्म, भाषा, शिक्षण, विवाह, राष्ट्रवाद, जमीन, हिंसा, जागतिकीकरण, प्रबोधन यांच्याशी जातीव्यवस्थेचा असलेला संबंध; जातीय अस्मितांचा भारतीय जनजीवनावर काय परिणाम होतो, यांचा धांडोळा घेतला आहे. जातीमुक्त समाजनिर्मितीसाठी सकारात्मक दृष्टी देणारे हे पुस्तक क्रांतीसिंह नाना पाटील अकादमी आणि हरिती पब्लिकेशन्स यांनी संयुक्तपणे प्रकाशित केले आहे. अवघ्या आठ दिवसांत दुसरी आवृत्ती प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक सुधाकर गायकवाड यांनी सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
समकालीन महाराष्ट्रातील तरुण विचारवंतांमध्ये सखोलपणे, निरपेक्षपणे, साक्षेपीपणे, गंभीरपणे, अभिनिवेशशून्यपणे आणि तरीही स्वातंत्र्य व समता या आपल्या ध्येयावर प्रखर निष्ठा ठेवून विचारगर्भ लेखन करणाऱ्यांमध्ये दिलीप चव्हाण हे प्रमुख नाव आहे. त्यांच्यात एक लोभसवाणा प्रांजळपणा आहे. ते समतेवर अधिष्ठित समाजाची पुनर्रचना करणे, या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पण, आपल्या भूमिकेने रचलेल्या विचारव्यूहात काहीतरी कमतरता असण्याची शक्यता आहे, आपल्या विचाराला दुसरी बाजू असू शकते, यावरदेखील त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे आपल्या विचारांची चिकित्सा व्हावी, अशी अपेक्षाही ते करतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जो नम्रपणा आहे, तोच त्यांच्या लेखनातदेखील उतरलेला आहे.
दिलीप चव्हाण हे स्वत:पुढे एक समस्या ठेवतात. चळवळीच्या ध्येयाच्या मार्गातील अडथळ्यांचे निश्चितीकरण कसे करायचे? ते अडथळे घडतात कसे? त्याचे स्वरूप काय? या अशा प्रश्नांचे आकलन झाले की, ते दूर करता येतात. ते म्हणतात की, “जर तुम्ही परंपरेच्या साखळदंडांचे स्वरूप जाणू शकलात; तर ते साखळदंड तुम्ही तोडूही शकता.” म्हणजे भारतातील समाज वास्तवाचे नेमके आकलन करून घेण्याचा ते प्रयत्न करतात. पण त्यासाठी वास्तवाचे सत्ताशास्त्र व ज्ञानशास्त्र मांडणे आवश्यक असते आणि ते कवळ अन्वेषण पद्धतीनेच मांडता येते. आंबेडकर व मार्क्स यांच्या विचारांची साक्षेपी चिकित्सा करून त्यातील जी तत्त्वे वास्तवाचे सत्ताशास्त्र व ज्ञानशास्त्र मांडू शकतात, तीच तत्त्वे चव्हाण उचलतात. त्यांच्या मते, भारतातील समाजवास्तव हे जातीचे वास्तव आहे. आंबेडकर व मार्क्स यांच्या विचारव्यूहातून जातीच्या वास्तवाच्या आकलनाबाबत एक सूत्र निर्धारित झाले होते. जातवास्तव हे भौतिक तसेच मानसिक आहे. यामुळे जातीअंतासाठी ते उत्तर देतात की, “व्यापक पातळीवर भौतिक सुधारणा करून जातिव्यवस्थेवर मोठा आघात करणे जसे आवश्यक आहे, तसेच प्रत्येक व्यक्तीच्या जाणीव-नेणीवेत बदल घडवून आणणेही आवश्यक आहे.”
दिलीप चव्हाण हे जातीप्रश्नाच्या सोडवणुकीची मांडणी करताना रावसाहेब कसबे व गेल ऑमव्हेट यांना बाजूला सारीत, शरद् पाटलांची मांडणी करीत, बरेच पुढे जातात. “आंतरजातीय विवाहाशिवाय भारतात वर्ग समाज बनू शकतो काय?” हा त्यांचा मूलभूत प्रश्न आहे. या प्रश्नात अशी समस्या आहे की, वर्गनिर्मितीतील आर्थिकता व धर्मातील सांस्कृतिकता यांचा मेळ घालत, त्यातील मूलभूत प्रश्न असे उपस्थित करायचे की, ते जातीअंताच्या चळवळीपुढील कार्यक्रम होतील, ते तशा कार्यक्रमांची मांडणी करतात.
दिलीप चव्हाण यांना जातीअंताचे सिद्धांतन मांडायचे नाही. ते चळवळीच्या व्यावहारिक पातळीवर जातीअंताची शक्यता पाहतात. परंतु जातीअंताच्या मूळाशी असलेल्या सिद्धान्तांचे त्यांना खोलवर आकलन आहे. सिद्धान्त व व्यवहार यांची एकरूपता कशी साधायची, ही मार्क्सवादातील समस्या त्यांच्यापुढे आहेच. पण ते सिद्धान्तात अडकत नाहीत. सिद्धान्त चळवळीपुढे ध्येय ठेवू शकतो. ध्येयाशिवाय व निश्चित विचारसरणीशिवाय चळवळ असू शकत नाही; पण चळवळीने केवळ सिद्धान्तात अडकता कामा नये. चुका होत असतील तर त्या मान्य करीत आणि नव्या सिद्धान्ताची मांडणी करीत चळवळीने पुढे जायचे असते. म्हणून ते जातीअंताच्या चळवळीपुढे वस्तुनिष्ठ कार्यक्रम काय असू शकतील, याची अतिशय निग्रहाने मांडणी करतात. विचारवंत व चळवळीतील कार्यकर्ते यांनी या मांडणीची चर्चा करणे गरजेचे आहे.
.............................................................................................................................................
‘समकालीन भारत : जातीअंताची दिशा’ या पुस्तकामागील भूमिका मांडणारा दिलीप चव्हाण यांचा १५ मिनिटांचा व्हिडिओ
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment