लघुपल्ल्याचा दृष्टिकोन आणि स्वार्थाने ग्रासल्यामुळे ‘गोवा’ आणि ‘गोवेकर’ धोक्यात आलेली प्रजाती ठरली आहे!
ग्रंथनामा - झलक
राजू नायक 
  • ‘सुशेगाद’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 06 March 2020
  • ग्रंथनामा Granthnama झलक सुशेगाद Sushegad राजू नायक Raju Naik गोवा Goa गोवेकर Govekar

पत्रकार-संपादक राजू नायक यांनी ‘सुशेगाद’ या पुस्तकामध्ये गोव्याच्या संस्कृतीचा अनेक अंगांनी धांडोळा घेतला आहे. ‘सुशेगाद’ म्हणजे आरामात, मजेत राहणारा. आजच्या शब्दात ‘कूल’. कुठे धावपळ नाही, धकाधक नाही. तृप्त, संथ वाहणार्‍या मांडवी नदीसारखं जीवन. आज या जीवनाची काय स्थितीगती आहे, याची ओळख हे पुस्तक करून देतं. नुकत्याच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला नायक यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

गोव्याच्या संस्कृतीवरचं हे माझं पुस्तक विविध अंगांनी माझ्या जिवाभावाच्या मातृभूमीचा वेध घेतं. बरीच वर्षं मी ते लिहून ठेवलं होतं. पुस्तकरूपाने ते प्रदर्शित करायला त्यात काही बदल केले, भर घातली. यामध्ये इतिहास आहे, समाजकारण आहे, लोकांचा संघर्ष आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, येथील भूमी कशी घडली, येथील माणूस कसा घडला, त्याचा प्रकर्षाने वेध घेतला आहे.

बाहेरचा माणूस गोव्याकडे पाहताना हे एक सुंदर, नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं, आनंदी, खुशालचेंडू राज्य आहे, या दृष्टीने बघतो. पश्चिम किनाऱ्यांवरचं एक नंदनवन म्हणून गोव्याकडे पाहिलं जातं. निळाशार समुद्र, जीवन व्यापलेल्या नद्या, अनेक धबधबे, झरे, डोंगर, हिरवी रानं-वनं, सुपीक जमीन, निसर्गाने भरभरून दिलेलं वरदान; परंतु गोवा ‘तेवढाच’ नाही. अनेक परचक्रांतून, संघर्षातून स्थलांतर, जवळच्यांची ताटातूट आणि नवे नातेसंबंध यांतून घडला आहे. रोमहर्षक इतिहासातून गोवा घडला आहे. गोव्यावर बाहेरच्यांचं सतत आक्रमण होत राहिलेलं आहे. 

गोव्याची महती आणि महत्त्व वाढत गेलं, तसे वेगवेगळ्या ठिकाणाहून राज्यकर्ते आले व त्यांनी गोवा ताब्यात घेतला. वेगवेगळ्या राज्यकर्त्यांमुळे लोकसंख्या वाढत गेली. सुरुवातीला भोज होते, ज्यांची राजवट चौथ्या शतकापासून चालू झाली. त्यानंतर मौर्य, सातवाहन, बदामीचे चालुक्य, शिलाहार व नंतर आली ‘कदंब’ची देदीप्यमान कारकीर्द. त्यानंतर विजयनगर साम्राज्याचा गोवा भाग बनला. नंतर बहामनी, आदिलशहा... परंतु गोव्याच्या इतिहासावर सर्वांत अधिक प्रभाव आहे, तो पोर्तुगीज राजवटीचा, ज्यांच्यामुळे आजची गोव्याची सीमा निश्चित झाली.

गोव्याचा माणूस या सर्व राजकीय, सामाजिक वातावरणात घडला. अनेकांचे प्रभाव त्याच्यावर पडले. त्याची जीवनशैली निश्चित झाली आणि त्यातून ‘गोवेकार’ ही प्रवृत्ती घडली. सर्वांत अधिक काळ पोर्तुगिजांची राजवट होती, जिने गोव्यावर सांस्कृतिक, सामाजिक प्रभाव निश्चितच टाकला. त्यामुळे आजचा ‘गोवेकर’ त्याच परिवर्तनातून आकारास आला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पोर्तुगीज उमराव, सरदार त्या काळात सुखासीन, बऱ्याचदा आरामदायी, ऐटीत राहणारा होता. त्यातून ‘फिदाल्क’ हे विशेषण त्याला जोडलं गेलं. गोवेकरही बराचसा तसाच असल्याची अनेक गाणी आहेत.

तो राज्यकर्ता बनला नाही, त्याने बाहेरच्या सम्राटांना राज्य करू दिलं. तुम्हाला यायचे तर या, पण आमचा ताल बिघडवू नका, असं म्हणून त्याने त्यांचे रीतीरिवाज, जीवनशैली स्वीकारली; परंतु संघर्ष करून, रक्त वाहवून आपली भूमी राखण्याचा, आपणच भूमीचे रक्षणकर्ते बनण्याच्या फंदात पडला नाही. एका इतिहासकाराने तर गमतीने म्हटले आहे की, येथील प्रजा हुशार होती. त्यामुळे परिस्थितीचे भान त्यांना लागलीच यायचे आणि राज्यकर्त्यांची अवकृपा आपणावर होणार नाही, याबाबत चाणाक्षही असायची. जेव्हा विजापूरकरांविरोधात जाणं त्यांना शक्य झालं नाही, तेव्हा त्यांनी त्या राज्यकर्त्यांशी समेट केला. पोर्तुगिजांना पिटाळणंही शक्य झालं नाही, तेव्हा त्यांना सामील होण्याचाही मार्ग त्यांनी निवडला. त्यांनी पोर्तुगिजांची भाषाही आत्मसात केली आणि त्यांच्याहून आपण कमी दर्जाचे नाहीत, हे सिद्ध करण्याचा अट्टहास केला. अनेक तपशील सांगतात की, एका राजाला द्यावा लागणारा कर त्यांनी दुसऱ्यांना सहज देऊ केला व त्यांच्या राजवटीचा दाह सहन न करण्याचा सोपा मार्ग स्वीकारला.

पोर्तुगिजांनी बाटवण्यासाठी दबाव, लोभ यांचा जरूर वापर केला; परंतु सारेच लोक दटावणीला घाबरून ख्रिश्चन बनले यात तथ्य नाही. बऱ्याच जणांनी नव्या राज्यकर्त्यांचा धर्म स्वीकारला, यात तथ्य आहे. काहींनी धर्म स्वीकारूनही चालीरिती त्याच ठेवल्या. इथे समूहांनी येऊन नवीन धर्म स्वीकारल्यामुळे जातीव्यवस्था, प्रथा चालूच राहिल्या. पोर्तुगिजांनी अनेक नवीन प्रथाही निर्माण केल्या. उंची पोषाख, अन्नातील वैविध्य, नृत्य व संगीत, आरोग्य, स्वच्छता, सुविधा... त्यांचा स्थापत्यशास्त्रावरचा जबरदस्त प्रभाव अजूनही जाणवतो. पोर्तुगिजांनी जातीव्यवस्था संपूर्णत: जमीनदोस्त केली नाही. उलट तिला बळ दिलं. त्यामुळे ब्राह्मणांना जुन्या व्यवस्थेवरचा आपला कब्जा कायम ठेवता आला. जमिनीवरचं त्यांचं नियंत्रण कायद्याने बळकट बनलं. अर्थव्यवस्थेत त्यांचं स्थान आणखी बलवान ठरलं.

अनेक ऐतिहासिक संदर्भ तपासून पाहता दिसून येतं की, पोर्तुगीज मिशनऱ्यांनी हिंदूंचा केला तेवढाच अनन्वित छळ ख्रिश्चनांचाही केला. त्यांच्यावर अघोरी इन्क्विझिशन लादून त्यांना मुळांपासून तोडलं. हा धर्मछळ इतिहासाचं एक काळंकुट्ट पान आहे. गोव्याच्या आजच्या ख्रिश्चनांना समजून घेताना त्यांच्यावर झालेला अत्याचार, छळाचाही विचार करावा लागतो. त्यांना मूळ धर्मापासूनच नव्हे तर त्यांना या भूमीपासून, संस्कृतीपासून तोडण्याचा प्रयत्न झाला आहे! त्यांची भाषाही- या बळजबरीचा भाग म्हणून त्यांच्यापासून तोडण्याचा प्रयत्न झाला.

तरीही कोंकणी भाषा जगली, भाषेचा दर्जा तिने प्राप्त केला आणि ती समृद्ध बनवण्याचे प्रयत्न जोराने चालतात. पश्चिम घाटाच्या किनारी भागात-ज्याला कोकण म्हणून ओळखतात- जो मंगळुरूपर्यंत पसरला आहे- तिथे ही भाषा बोलतात आणि तिचे अनेक उपक्रम राबवले जातात. ख्रिस्ती पर्वाच्या सुरुवातीपासून ज्या कोकणाला ‘अपरांत’ म्हणून ओळखलं गेलं, तिची ही प्रमुख भाषा होती; परंतु तिचा निश्चित आविष्कार गेल्या १०० वर्षातच घडला, गोवा मुक्तीनंतर तिला विलक्षण गती आली. पोर्तुगिजांनी तिचं भाषावैभव नष्ट केलं यात काही तथ्य नाही, कारण तसा एकसुद्धा पुरावा उपलब्ध नाही. तिला अनेक नावांनी ओळखलं गेलं व तिचा अनेक भागांत वेगवेगळा प्रभाव पडला. परंतु कोंकणी ही इंडो-आर्यन भाषा कुळातील, स्वतंत्र शैली व स्वत:चं व्याकरण असलेली भाषा आहे. तिचा आठव्या परिशिष्टात समावेश झाल्यानंतर तिला मराठीची बोली म्हणणंही आता थांबलं आहे.

मी सुरुवातीलाच मान्य करतो की, हे पुस्तक म्हणजे गोव्याच्या संस्कृतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास नाही. वृत्तपत्रीय स्तंभाला साजेसं हे ललित अंगाने केलेलं लेखन आहे. गेल्या १० वर्षांत गोवा खूप बदलला आहे, खूप वेगाने बदलतो आहे. परकीय आक्रमणं आणि सांस्कृतिक ससेहोलपटीतही पूर्वजांनी गोव्याचं जे तत्त्व सांभाळून ठेवलं त्याला तडे जाताना आपण पाहतो आहोत. द्वेष, तिरस्कार, असहिष्णुता यातून दोन समाजांमध्ये तेढ आणि संशय उत्पन्न केला जातोय.

या पार्श्वभूमीवर गोवा म्हणजे काय, त्याचं तत्त्व काय, त्याचं स्वभाववैशिष्ट्य काय हे आजच्या घडीला साऱ्या भारताला समजणं महत्त्वाचं बनलं आहे. प्रजासत्ताकदिनी दिल्लीत गोव्याचे चित्ररथ सादर केले जातात. परंतु तिथे किंवा हिंदी चित्रपटात दाखवला जाणारा ‘गोवा’ हा सच्चा आहे काय? त्याबाबत नेहमीच गोव्यात टीका होते. परंतु इथेही गोवा, गोंयकारपण म्हणजे काय, हा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा विभिन्न विचार व्यक्त केले जातात.

गोव्यातही आम्ही गोव्याची ‘ओळख’ काय याचा विचार करतो, तेव्हा राजकीयदृष्ट्या त्यातून वेगवेगळे अर्थ काढण्याचा प्रयत्न केला जातो. गोव्याचा इतिहास आणि समाज यांनी वेगवेगळे प्रवाह पाहिले आहेत. हे सर्व प्रवाह एकत्र येऊन त्यातून एकच गोव्याचं व्यक्तिमत्त्व तयार झालंय काय? ही ओळख म्हणजेच ‘अस्मिता’ असेल तर पोर्तुगीज प्रभावातून जे व्यक्तिमत्त्व तयार झालंय, तेच गोवा आहे काय? एक गोवा ही ओळख ‘पुसून’ जाऊ नये म्हणून धडपडतो आहे, तर दुसरा गोवा काळाच्या प्रवाहाबरोबर वेगाने वाहत पुढे चालला आहे. एक धर्मांध घटक- जो अलीकडे खूप प्रभावी बनला आहे, त्याला गोव्याची युरोपियन ओळख पुसून टाकून नव्याने उभा राहिलेला हवा आहे. गोव्याची ही जी नवी जडणघडण होते आहे, ती गोव्याचा आत्मा शाबूत ठेवेल की तिचा नाश करेल?

पोर्तुगीज आगमनापूर्वीचा काळ काहींना ‘सुवर्णकाळ’ वाटण्याची शक्यता आहे. परंतु त्या काळात हिंदू समाज अनेक विकारांनी, विकृतींनी त्रस्त होता. अघोरी सती प्रथा, जाचक जात व्यवस्था, संसाधनांवर उच्च समाजांचं नियंत्रण... पोर्तुगिजांनी त्या अनिष्ट प्रथा नष्ट केल्या आणि स्वत:ची राजवट सुखनैव चालू राहावी म्हणून काही परंपरा त्यातील अनिष्ट जातीव्यवस्थेसह चालू ठेवल्या. त्यामुळे पिळवणूक अधिकृत बनली. सती प्रथा व केशवपन प्रथेचं निर्मूलन केलं असलं तरी विधवांना योग्य प्रकारे संरक्षण दिलं गेलं नाही. त्यांना देवळांच्या आश्रयाला जावं लागलं, तेथेही त्यांची ससेहोलपट झाली व घरांमध्येही आबाळ.

गोव्याच्या समाजाचं सर्वांत काळंकुट्ट अंग ही जातव्यवस्थाच होती, जिने उच्च-नीच भेदभावांचा पुरस्कार केला. अस्पृश्यता हा तिचा एक भीषण परिणाम होता. पोर्तुगिजांच्या आगमनानंतरही त्यांनी समाज व्यवस्था बदलण्यास प्राधान्य दिलं नाही, कारण त्यांना ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यात रस होता. शिवाय सत्ता ताब्यात ठेवायची होती व अंतर्गत कुरबुरी नको होत्या. त्यांना केवळ धर्मातून समाजात परिवर्तन हवं होतं, सामाजिक आणि आर्थिक दर्जा यामध्ये सुधारणा नको होती. त्यामुळे ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतरही अनेकांचा सामाजिक दर्जा बदलला नाही. जेव्हा संपूर्ण खेडी धर्म स्वीकारत होती, तेव्हा ती बेमालूमपणे ख्रिस्ती धर्मात आपली जातही गुंडाळून घेऊन आली होती. काही धर्मप्रसारकांनी ख्रिश्चनांना त्यांची जुनी आडनावंही धारण करण्यास मान्यता दिली होती. उदाहरणार्थ सिनाई, देसाई, नायक, पै व प्रभू. जेणेकरून या लोकांना त्यांचा जुना दर्जा कायम ठेवणं शक्य होईल. या प्रक्रियेत जात व्यवस्था या लोकांनी कवटाळून ठेवली. गुलामगिरीही पोर्तुगीज राजवटीत चालू राहिली होती.

भूतकाळात रमण्याची ओढ ही ख्रिश्चन तसंच हिंदू अशा दोन्ही घटकांमध्ये आहे. हिंदूंमधील ओढ ही प्रबळ ‘गोवा इंडिका’ चौकट अभिमानाने मिरवते. राष्ट्रवादी विचारातून ही प्रवृत्ती आपली भूमिका मांडते आणि गोव्याच्या जडणघडणीतील पोर्तुगिजांचा प्रभाव पुसून टाकू पाहते. सध्या तर हे दोन्ही अभिजन वर्ग एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले दिसतात अणि पोर्तुगीज राजवटीचा अभिमान बाळगणारा एक घटक खूपच प्रभोक्षक लेखन करताना दिसतो. गोव्याची ‘ओळख’ सांगताना दोन्ही गट एकमेकांबद्दल अनादर बाळगताना दिसतात.

एक गोष्ट खरी आहे की, त्या दोन्ही गटांनी आपापले अभिनिवेष जपताना आपल्या बहुजनांकडे सातत्याने दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे दोन्ही गट इतिहास आणि संस्कृती संकुचित दुष्टीने पाहतात. आधुनिक अभ्यासक अलेक्झांडर हेन, पराग परब यांचं संशोधन वाचताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे गोव्याची ‘ओळख’ सांगताना आम्हाला एकूणच समाजाच्या नव्या अपेक्षा, नव्या संधी आणि नवीन आव्हानांच्या संदर्भात ती विचारात घ्यावी लागणार आहे व एकूण इतिहासाकडेही केवळ पोर्तुगीज साम्राज्याचा इतिहास म्हणून न पाहता भारतीय-पोर्तुगीज परिप्रेक्ष्यातून अभ्यासावा लागणार आहे. त्यासाठी देशी पुराव्यांचा शोध आणि वापर महत्त्वाचा ठरणार आहे. हा अभ्यास वसाहतीय व वसाहतोत्तर कालावधींमधील संस्कृती, अस्मिता, राजकीय व अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून तपासला जातो.

इतिहास लेखनातील हे बदल संस्कृतीचा विविध अंगाने वेध घेत समाजातील खालच्या वर्गाच्या चेतना आणि आकांक्षांनाही भिडतात व त्यांना इतिहास आणि संस्कृतीतील नाकारलं गेलेलं त्यांचं स्थान पुन्हा मिळवून देतात. अशा प्रकारचे विचार माझ्या या पुस्तकातील लेखनातून तुम्हाला जाणवू शकतील. विशेषत: जाती व इतर सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरच्या लेखांमध्ये हा दृष्टिकोन मी मुद्दाम मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या लेखांना परिपूर्णता आली आहे, असं मला वाटतं.

आजचा ‘गोवा’ त्याचं निसर्गसौंदर्य व स्वभाववैशिष्ट्यांसह जगावा असं वाटत असेल तर नव्या गोव्याच्या भावभावना, आकांक्षा आपल्या सर्वांना समजून घ्याव्या लागतील. नवीन अंगाने आपल्याला गोव्याचा अभ्यास करावा लागेल. बाहेरचे लोंढे इतक्या झपाट्याने या भूमीत अवतरत आहेत की, आताच त्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या अर्धी बनली आहे. त्यामुळे येथील सामाजिक असंतोष उग्र स्वरूप धारण करतो आहे.

आमच्या सरकारांना लघुपल्ल्याचा दृष्टिकोन आणि स्वार्थाने ग्रासल्यामुळे त्यांना गोवा ‘विकून’ टाकण्याची अगदीच घाई झालेली आहे. ‘गोवा’ आणि ‘गोवेकर’ त्यामुळे धोक्यात आलेली प्रजाती ठरली आहे. गोव्यात अनेक राज्यकर्ते आले. येथे अनेक जाती, धर्म, आदिवासी समाज, धार्मिक, भाषिक चौकटी होत्या; परंतु तरी ‘गोवेकर’ अस्तित्वात होता व एका विशिष्ट सहजीवनातून त्याचे ‘गोंयकारपण’ टिकवलं होतं.

आणखीही एक प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे आम्ही गोव्याचं अस्तित्व, गोंयकारपणाच्या ज्या गोष्टी करतो, त्या केवळ उच्चभ्रू उदारमतवादी लोकांपुरत्याच मर्यादित नाहीत ना? सध्या असा विचार करणारे विचारवंत व बुद्धिवंत यांचा तळागाळातल्या लोकांबरोबरचा संबंधच तुटला आहे. त्याचा परिणाम गोवा अजागळ बनण्यात झाला आहे. गोव्यातील बुद्धिवादी राज्याच्या अस्तित्वाला धरून चिंतीत आहेत यात तथ्य आहे. परंतु गोव्याचं गोंयकारपण सांभाळण्यासाठी वावरणाऱ्या संस्था सध्या कुठे आहेत? ज्यांनी त्यासाठी वावरायला पाहिजे होतं, त्या भाषिक संस्था सरकारी अनुदानात गुदमरल्या आहेत. प्रादेशिक पक्ष सत्तेसाठी तडजोड करताना दिसतात. जातीय, धार्मिक तेढेही आहे. लिपीवादात अस्तित्वाच्या प्रश्नावर धुकं दाटलं आहे. त्यातून गोवा नावाच्या कल्पनेला तडे जातील का, अशी भीती आहे.

प्रागतिक विचारवंत जरी गोवा तत्त्वांबाबत प्रखर मतं मांडत असले तरी गोव्याच्या अर्थव्यवस्थेबद्दल ते फारसे गंभीर कुठे आहेत? गोव्याची धूळदाण उडवणाऱ्या आणि अंतर्गत गोव्याची नासधूस करणार्‍या खाण उद्योगांबाबत ते काही बोलत नाहीत आणि म्हादई नदीचं पाणी वळवण्याच्या प्रश्नावर चाललेल्या आंदोलनात योगदान देत नाहीत. धार्मिक अल्पसंख्य घटकांनाही या अर्थकारणाबद्दल सोयरसुतक नाही. अशा अनेक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर हे ‘गोंयकारपण’ म्हणजे नेमकं काय, कशामुळे ते शाबूत राहिलं व पुढे ते कशासाठी टिकून राहिलं पाहिजे त्याचा अभ्यास झाला पाहिजे.

अशा अभ्यासाची अनेक नवीन आधुनिक तंत्रं सध्या विकसित झालेली असून हा अभ्यास नवगोंयकारांसह संपूर्ण देशातील लोकांना नवी दृष्टी प्रदान करू शकतो. हा प्रेमळपणाचा, आतिथ्यशीलतेचा तसंच सौहार्दाचा इतिहास आहे. तो देशाचं वैविध्य समृद्ध बनवतो. गोव्याचं वेगळेपण हाच भारताचा समृद्ध वारसा आहे.

गोवा भारतीय संस्कृतीत पुरता मिसळून गेल्यानेच भारताचं श्रेष्ठत्व सिद्ध होणार नसून गोव्याची ओळख वेगळी ठेवण्यातच भारताला गौरव प्राप्त होऊ शकतो. म्हणूनच देशाच्या शिल्पकारांनीही गोव्याची आगळी ओळख जपून ठेवण्यावर भर दिला व तिलाच आज ‘गोवेकर’, ‘गोंयकारपण’ म्हणूनच देशभर वाखाणलं जातं. या पुस्तकातील प्रत्येक लेखात तुम्हाला या वेगळेपणाची किंवा अस्मितेची अत्यंत अभिमानाने ओळख करून देण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. त्याच्या जातीयवादाची, धर्मांधतेची, गोव्याच्या होणाऱ्या विकृतीकरणाची व भ्रष्ट तसंच संकुचित राजकारणाची निर्भत्सना केलेली आहे. राजकारणासाठी गोव्याची सतत धर्मावरून शकलं पाडून संशय आणि तिरस्कार पेरण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. असहिष्णुतेला धोका उत्पन्न करण्याचा प्रयत्न अत्यंत हेतुपुरस्सर चालला आहे. त्या संघर्षाला मूठमाती देऊन आगळ्या गोव्याचा प्रेमाचा, सौहार्दाचा आणि मिळून मिसळून राहण्याचा संदेश हे पुस्तक वाचकांच्या मनापर्यंत पोहोचवू शकलं तर मला आनंद वाटेल.

.............................................................................................................................................

राजू नायक यांच्या ‘सुशेगाद’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5170/Sushegad

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......