‘ग्रामसंस्कृती’ समजून घेण्यासाठी ही ‘ग्रामशिदोरी’ दिशा देणारी ठरेल!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शंकर विभुते
  • ‘ग्रामशिदोरी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 07 February 2020
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस ग्रामशिदोरी Gramshidori केशव सखाराम देशमुख Keshav Sakharam Deshmukh

‘पाडा’, ‘चालणारे अनवाणी पाय’, ‘अथक’, ‘गाभा’, ‘तंतोतंत’ या कवितासंग्रहांमुळे कवी डॉ. केशव सखाराम देशमुख परिचित आहेत. ‘ग्रामशिदोरी’ हा त्यांचा ललितलेखसंग्रह नुकताच सकाळ प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. दै. ‘ॲग्रोवन’मध्ये साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे.  

या पुस्तकात एकूण सत्तेचाळीस लेखांचा समावेश असून त्यातून जुन्या आठवणी, मातीचा गंध, अस्वस्थ करणारे वर्तमान, चिंतनशीलता, नकळत केलेला उपदेश, परिवर्तनाचा ध्यास, शिक्षणाचे महत्त्व, माणसाचे ममत्व, स्वभावातील अंतरंग, गावशिवाराचे नातेसंबंध आणि जगण्यातील दिलखुलासपणे अशा जीवन अनुभूतीच्या विविध पैलूंचा आविष्कार घडतो.

साधी भाषा, छोटी वाक्यं, प्रभावी उदाहरणं, पाच-दहा मिनिटांत वाचून पूर्ण होणारे लेख हे या संग्रहाचे वेगळेपण आहे. लेखक मुळात कवी असल्यामुळे प्रत्येक लेखात काव्यमय तरलता आहे.

लेखकाने ज्या जुन्या आठवणी नोंदवलेल्या आहेत, त्यांनी एकूण पुस्तकाचा एक तृतीयांश भाग व्यापला आहे. चुलीवरच्या भाकरी, बालपणी जत्रेत घेतलेला आनंद, गावातील पंचांनी दिलेला न्याय, आठ दिवस चालणारे लग्नसमारंभ, म्हशीच्या पाठीवर बसून रुबाबदार फिरणे, गाई-म्हशी-बैल-कोंबड्या-शेळ्या-कुत्रे-मांजर हा गोतावळा, पावसात मनसोक्त भिजणे, आलटून-पालटून घातलेला सदरा किंवा पैसे नसतानाही साजरी केलेली दिवाळी... या सगळ्या अनुभूती आपल्याला नकळत बालपणात, भूतकाळात घेऊन जातात. आणि हे अनुभव आपलेच आहेत असे वाटू लागते. आणि हेच या लेखांचे सामर्थ्य  आहे. याचा अर्थ लेखक फक्त आठवणी सांगून थांबत नाही, तर जीवन व जगणे अतिसुंदर होण्यासाठी नकळत उपदेशही करून जातो. उदाहरणार्थ- छोट्या छोट्या गोष्टींमुळे जी माणसे अबोलपणा धरतात, त्याविषयी लेखक अतिशय मार्मिक भाष्य करतो. तो म्हणतो-

“येता-जाता नमस्कार केला नाही म्हणून अबोला धरणे, नवरा-बायकोमध्ये खटका उडाला म्हणून अबोला धरणे, उसने पैसे दिले नाही म्हणून, लग्नात मानपान दिला नाही म्हणून, त्यालाच का बोलतो मला का बोलत नाही म्हणून, अशा अबोला धरण्याला फारसा अर्थ नसतो. संवाद हे जगण्याचं छान औषध आहे.” (पृ.८५)

तसाच ‘शिक्षणातील भावना व शिक्षणातील भूमिका स्वच्छ असली पाहिजे.’ (पृ.६९), ‘रिकामटेकडेपणा आणि आळस हे दोघे एकत्र आले की आयुष्याचा नाश व्हायला फार वेळ लागत नाही’ (पृ.७७), ‘तुमच्या डोक्यामध्ये असलेले प्रश्न घेऊन लोकांत जाऊ नका, लोकांत जा आणि तेथील प्रश्न लक्षात घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करा.’ (पृ.८२), ‘भाकर यंत्रामधून जन्म घेत नाही, फ्लॅटच्या गच्चीवर निर्माण होत नाही. माती बिगर भाकरीची निर्मिती होऊ शकत नाही’ (पृ.४९) यांसारख्या अनेक विधानांतून वाचक चिंतनशील बनतो. ते हे या लेखनाचे बलस्थान आहे.

दर शनिवारी वाचकांसाठी तयार केलेली ही ‘शिदोरी’ असल्याने काही लेखांत पुनरुक्तीचा दोष आलेला आहे. पण हा दोष भाषिक अंगाने असला तरी संवेदनशील मन संस्कारशील करण्यासाठी या दोषाच्या ‘डोसा’ची गरज वारंवार जाणवते. विषयानुरूप आलेल्या म्हणी, वाक्प्रचार, सुविचार आणि कविता यांमुळे हे पुस्तक मनाला आनंद देणारे, भावसौंदर्य टिपणारे ठरले आहे.

ही ग्रामशिदोरी वाचकांना चिंतन करायला भाग पाडणारी व दिशा देणारी आहे. मुख्य म्हणजे ग्रामसंस्कृती समजून घेण्यासाठी ही ‘ग्रामशिदोरी’ दिशा देणारी ठरेल.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......