“आपल्या जवळ असणार्‍या गुणावगुणांचा शोध घेण्याची संधी हीच स्त्रीमुक्तीची पहिली पायरी आहे” - विद्या बाळ
ग्रंथनामा - झलक
अंजली मुळे व आशा साठे
  • विद्या बाळ (१२ जानेवारी १९३७ - ३० जानेवारी २०२०)
  • Fri , 31 January 2020
  • ग्रंथनामा Granthnama झलक विद्याताई आणि... Vidyatai Aani… विद्या बाळ Vidya Bal मिळून साऱ्याजणी Miloon Saryajani

ऑगस्ट २०१३मध्ये ‘विद्याताई आणि... : संवादातून उलगडलेला गृहिणी ते विचारसंपन्न कार्यकर्ती हा प्रवास’ हे अंजली मुळे व आशा साठे यांचं पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं. महाराष्ट्रात महात्मा फुले आणि महर्षी कर्वे यांनी स्त्री-शिक्षणाची पायाभरणी केली. नंतरची पायरी होती स्त्रियांचं आत्मभान जागृत करण्याची, समाजास स्त्रीप्रश्नांप्रती संवेदनशील बनवण्याची. हे कार्य हाती घेतलेल्यांमध्ये विद्या बाळ यांचं नाव अग्रस्थानी आहे. प्रथम ‘स्त्री’ आणि नंतर ‘मिळून साऱ्याजणी’चं माध्यम वापरून विद्याताईंनी स्त्रियांमध्ये स्वत्वाची भावना चेतवली. संवाद हे विद्याताईंचं बलस्थान. न पटलेल्या रूढी-रिवाजांशा संघर्ष करणं – तो मात्र पटेल अशा शब्दांत ही त्यांची खास शैली. दृढ कृतीचा आग्रह, पण भाषा मात्र अनाग्रही आणि ॠजू. पुरुषप्रधानतेस विरोध दर्शवतानासुद्धा त्या पुरुषांशी संवाद साधण्यास प्रयत्नशील असतात. म्हणून तर स्त्रीमुक्ती चळवळीतील नेमस्त पंथाचं नेतृत्व आपसूक त्यांच्याकडे जातं. पूर्णवेळ गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती हा विद्याताईंचा प्रवास म्हणजेच हे पुस्तक. यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

विद्याताई, तुमच्या आयुष्याचे मुख्यत: दोन टप्पे आहेत असं दिसतं. पस्तिशीपर्यंत तुम्ही आयुष्य जसं समोर आलं तसं स्वीकारलं. नंतर मात्र तुम्ही ते तुम्हाला हवं तसं घडवलं, आणि हे घडलं ते केवळ स्त्रीमुक्तीचा विचार समजून घेतल्यामुळे. तुम्ही हा विचार स्वीकारला आणि वेगवेगळ्या उपक्रमांतून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. त्यातून कित्येक मैत्रिणींना स्वत:कडे पाहण्याची, समाजाकडे पाहण्याची, त्यातल्या रूढी-प्रथा-परंपरा यांचा विचार करण्याची एक नवीच दृष्टी मिळाली. कला-साहित्य-राजकारण-समाजकारण याबद्दलचा विचार आणि या विचारांची देवघेव यासाठी तुम्ही व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्यातून स्त्रीची वैचारिक समृद्धता वाढली. तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व निर्माण होण्यासाठी मदत झाली. कित्येकींना स्वत:वरच्या अन्यायाची जाणीव झाली. इतरांवरचा अन्याय दूर करण्यासाठी मदत करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. कित्येकींना अन्याय झाल्यावर तुमची आणि स्त्रीमुक्तीच्या विचारांची आठवण झाली. हे सगळं घडत असलं तरी अजूनही अनेक जणांच्या मनात स्त्रीमुक्तीच्या विचारांची भीती आणि अनेक प्रकारचे गैरसमज आहेत, अनेक प्रश्‍न आहेत. उदा. :

- स्त्रीमुक्ती म्हणजे नेमकं काय?

- स्त्रियांना कोणत्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे?

- कशासाठी?

- त्यांना कोण मुक्त करणार आहे?

- स्त्री मुक्त झाली तर काय फरक पडणार आहे?

यांविषयी तुम्ही थोडं सविस्तर स्पष्ट करावं असं वाटतं.

स्त्रीमुक्तीच्या संदर्भात खूप गैरसमज आहेत. त्यामुळे मला समजली तशी एक छोटीशी व्याख्या करायला मला आवडेल. स्त्रीमुक्ती कशासाठी? तर प्रथमत: बाईच्या विकासासाठी. बाईच्या वाट्याला पुरुषसत्तेमध्ये सदैव जी दुय्यमता आली आहे, ती ओलांडून जाण्यासाठी.

स्त्रीमुक्तीचा नेमका अर्थ काय? या दुय्यमपणाच्या व्यवस्थेमध्ये स्त्रीला आपल्याजवळ काय आहे, कोणत्या प्रकारचं सामर्थ्य आहे, काय कमी आहे, या सगळ्याचा काही शोध घेण्याची संधी सहसा नसते. ती ज्या तर्‍हेनं वाढवली जाते, त्यामध्येही स्त्री-प्रतिमेचा एक परंपरागत साचा तिच्यावर थोपला जातो. मला असं वाटतं, की पहिल्यांदा आपल्या जवळ असणार्‍या गुणावगुणांचा शोध घेण्याची संधी हीच स्त्रीमुक्तीची पहिली पायरी. शोध घेता आला, की त्यानंतर त्याचा पाठपुरावा करता आला पाहिजे. कुणाला गाणं आवडतं, कुणाला खूप वाचायला आवडतं, आणखी काही आवडतं - तर जी ‘माझी’ आवड आहे, ती जोपासण्याची संधी मिळाली पाहिजे. प्रत्येक वेळी त्यातून काय मिळणार, याचा विचार करण्याबरोबरच तो आपल्या आनंदाचा भाग आहे याचं भान हवं. काही क्षेत्रात संशोधन करणं, काही कामगिरी करणं, काहीतरी मिळवणं हे उद्दिष्ट असू शकतं. अशी शोधायची आणि पाठपुराव्याची, त्यात काहीतरी मिळवण्याची, सिद्ध करण्याची संधी मिळाली की, मी मुक्त होते का? मला असं वाटतं की, हे तिथे थांबत नाही. अशी संधी ज्यांना मिळालेली नाहीये, त्यांच्याकडे बघण्याची एक समज माझ्यामध्ये जेव्हा येईल, तेव्हा खरा माझा मुक्तीचा प्रवास सुरू होतो. या प्रवासातच जे जे मला मिळतंय ते ज्यांना मिळत नाही, त्यांच्याकडे माझं लक्ष असणं, त्यांच्यासाठी मला काय करणं शक्य आहे ते करणं, याला मी स्त्रीमुक्तीची प्रक्रिया मानते.

यावर लोक असंही म्हणतात की, कशासाठी हे सगळं? काय जरूर आहे? आत्तापर्यंत चाललंच ना सर्व काही छान! काहीतरी खुळं काढता झालं! इथे मला अल्वा मिर्दाल आणि व्हायोला क्लेन यांचं म्हणणं आठवतं. मलाही खूप उशिराच्या टप्प्यावर ते कळलं. पण ते महत्त्वाचं आहे. अल्वा मिर्दाल आणि व्हायोला क्लेन या नोबेल पारितोषिक विजेत्या समाजशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी म्हटलंय की, कोणत्याही देशाची संपत्ती मोजताना आपण काय काय पाहतो? त्या देशाला सूर्यप्रकाश किती मिळतो? पाणी किती? जंगल किती? किनारा किती आणि कसा आहे? खनिजं किती वगैरे वगैरे. या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये लोकसंख्याही महत्त्वाची आणि त्यात अर्धी लोकसंख्या जी स्त्रियांची, तोही एक महत्त्वाचा मानवी स्त्रोत आहे, हे आपण विसरतो. या मानवी स्त्रोताचा उपयोग करून पुढे गेल्याशिवाय खर्‍या अर्थानं देशाचा विकासच होणार नाही. त्यांचं हे विधान मला महत्त्वाचं वाटतं, आवडतं. कारण आज विकासाच्या नव्या संकल्पनांमध्ये माणुसकीचा आणि माणसाच्या सर्वांगीण समृद्धीचा जो विचार डावलला जातो, त्याच्यावर त्यांनी नेमकं बोट ठेवलंय. स्त्रीमुक्तीचा मला तर लाभ होणार आहेच, पण माझं कुटुंब, माझा परिसर, माझा देश यांनाही लाभ होणार आहे. त्यासाठी स्त्रीमुक्ती हवी. अशा मुक्त होण्यात स्त्रीचा व्यक्तिगत स्वार्थ आहेच, पण तो इतर कोणाला डावलून नसल्यानं ‘स्वार्थ’ शब्दाला जो वाईटपणा चिकटलाय तो त्यात नाहीये. मला जे हवंय, मिळवायचंय त्यासाठीची ही धडपड आहे.

आता ‘स्त्रीमुक्ती’ यातील मुक्ती शब्दालाही काही लोकांचा विरोध आहे. या शब्दाला विरोध म्हणून काही पर्यायी शब्द शोधले गेले आहेत. ‘स्त्रीशक्ती जागरण’ वगैरे. पण ‘शक्ती’ हा शब्द देवकल्पनेकडे जाणारा वाटतो. आपलं ‘सामर्थ्य’ वाढवणं (empowerment) हे खरं यात अभिप्रेत आहे. वुमन एम्पॉवरमेंटलासुद्धा स्त्रीसबलीकरण शब्द वापरला जातो, तो मला खटकतो. तिथेही स्त्री सामर्थ्यशील होणं अभिप्रेत हवं असं वाटतं. सामर्थ्य हे Power किंवा सत्तेपेक्षा वेगळं आहे, असं मी मानते.

मुक्ती कोणापासून? तर बाईच्या परंपरेने घडवलेल्या प्रतिमेपासून. पारंपरिक प्रतिमा काय सांगते? बाई कशी असली पाहिजे? तर मी सोशिक असलं पाहिजे, मी वत्सल असलं पाहिजे, स्वार्थत्यागी असलं पाहिजे, मी निमूटपणे सर्व काही ऐकणारी असलं पाहिजे, पतीला परमेश्‍वर मानणारी, काय अन् काय! आपणही ह्या प्रतिमेचे बळी असतो. या प्रतिमेतून मुक्ती म्हणजे स्वत:पासूनच खरं तर सुरुवात असते. मी या पारंपरिक प्रतिमेतच बसणारं माणूस असायचं काही कारण नाही असं वाटायला लागणं, ही विकासाचीच सुरुवात असते. ह्या प्रतिमेत सतत पुरुषाला प्रधान आणि स्वत:ला दुय्यमपण स्वीकारून चालणं असतं.

‘ही प्रतिमा नाकारण्याची गरजच काय? बरं चाललंय की सगळं!’ विशेषत: माझ्या मागच्या पिढीतले लोक म्हणत, ‘आमचे संसार काय वाईट झाले का?’ म्हणजे मला आठवतंय माझ्या आई-वडलांचेही वाद व्हायचे. जाणतं झाल्यावर आम्हा भावंडांच्या लक्षात येत होतं की, वडलांपेक्षाही काही बाबतीत आई हुशार होती, तरी वडील तिच्यावर वर्चस्व गाजवत, अधिकार गाजवत. माझे वडील काही फार शिकलेले नव्हते. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी शिक्षण सोडलं. मग कमी शिक्षण म्हणून आयुष्यभर कारकुनी नोकरी करावी लागली. सगळा काटकसरीचा संसार करावा लागला. मग कुरबुरी, भांडणं होत. मी आईला म्हटलं की, ‘तू एवढी हुशार, शहाणी होतीस! तुला जर संधी दिली असती विकासाची तर तूही काही केलं असतंस. संसार अधिक सुखासमाधानाचा, चांगला झाला असता. तुमच्याकडे बघताना आम्हाला जे खटकलं, ती पार्श्‍वभूमी माझ्या पुढच्या कामाच्या वाटचालीला, विचाराला आहेच.’

जुन्या पिढीतल्या बायकांना वाटलं की, आमचे नाही का झाले संसार? तर संसार झाले. घटस्फोट घेतले नाही की, संसार होतातच. पण संसार आनंददायक असणं, एकमेकांना तो वाढवणारा असणं, संधी देणारा असणं, मुलांसाठी चांगलं वातावरण असणं, कुणावर अन्याय न करणारा असणं - एकमेकांचा आत्मसन्मान जपणारा असणं. या सगळ्या अर्थांनी जुन्या काळातले किती संसार हे खरे संसार झाले? इथे स्त्रीमुक्तीच्या विचारांची गरज आहे. त्यामुळे बायका शहाण्या झाल्या असत्या, त्यांना आत्मसन्मानाची जाणीव झाली असती आणि संसार चांगले झाले असते. भांडणं झाली असती, तरी ती नेहमीच पराकोटीला गेली असती असं नाही. पुरुषांना आपल्या मनातल्या किंवा इतर अनेक गोष्टी कळत नसतील, तर आपण बोलायला तर हवं. बोलल्यावर त्यांना पटलं नाही, वाद झाले, तरी संवादातून वाद मिटूही शकतात. पण स्त्री-पुरुषांमध्ये संवाद तर सुरू व्हायला हवा! माझ्या भावा-वहिनीचंच उदाहरण आहे. माझी वहिनी निगुतीनं उत्तम स्वयंपाक करणारी आहे. शाळेची नोकरी करत छान संसार सांभाळणारी. वाढत्या वयात नोकरी सोडली तेव्हा तिनं भावाला सांगितलं, ‘आता मी नोकरी सोडलीय, पण स्वयंपाकपाणी करायचाही मला फार कंटाळा आलाय.’ त्या दोघांमध्ये फार चांगलं अंडरस्टँडिंग आहे. नाहीतर ती हे बोलली नसती. शिवाय चला, आता ही मोकळी आहे, कुणाकुणाला जेवायला वगैरे सहज बोलवा असं झालं असतं. आता मी त्यांच्याकडे जाणार म्हणून फोन केला तरी भाऊ म्हणतो, ‘थांब, तिलाही विचारतो, तिची काही अडचण, दुसरा कार्यक्रम नाही ना?’ हा समजुतदारपणा माझी वहिनी बोलल्यामुळे पुढे आला. हे असं एकमेकांत शेअर करत राहणं, ही सुद्धा रूढ स्त्रीप्रतिमेच्या बाहेरचीच वाट आहे. नाही तर जे काय चाललंय त्यात निमूट सहभागी होणं, स्वत: कुचंबत राहणं हाच अर्थ पतिव्रतेचा आदर्श मानलेला. स्त्रीमुक्तीच्या विचारामध्ये बोलणं, परस्पर संवाद हेही महत्त्वाचं आहे.

पुरुषप्रधान व्यवस्थेत पुरुषावरही एक प्रतिमा थोपली आहे. त्यामुळे त्याच्यावरही अन्याय होत असतो. स्त्री आणि पुरुषांना आपापल्या काही भूमिका दिल्यात आणि त्यापेक्षा काही वेगळं वागण्याला नावं ठेवली जातात. बायकांना त्या पुरुषी होत चालल्या आहेत म्हणून नावं ठेवली जातात. तसंच नोकरी न करता मी घर सांभाळीन, मुलं सांभाळीन असं मनापासून एखाद्या पुरुषाने ठरवलं तर त्यालाही नावं ठेवली जातात. बायकोला चहा करून देणार्‍या पुरुषालाही नावं ठेवली जातात. पु.लं.च्याच एका लेखनात असा संवाद आहे ना की, त्या घरातल्या बाईकडे कुणी मैत्रिणी आल्या आणि नवर्‍याने चहा करून आणून दिला तर तो नवरा आहे हे न समजून ‘किती छान गडी मिळालाय!’ असं कुणीतरी म्हणतं. मला वाटतं की मग घरातल्या नेहमी चहापाणी करून देणार्‍या बायका काय मोलकरणी असतात का? आणि मुख्य असं की, पुरुषालाही याची जाणीव होत नाही, बाईलाही नाही.

आपापल्या आवडीनुसार काही करता येण्याची संधी स्त्री-पुरुष दोघांनाही हवी. अर्थात आपल्याला काय हवं ते कळणं महत्त्वाचं. स्त्रिया आणि पुरुष यांच्या सहजीवनासाठी, मग ते नवरा-बायको असोत का बहीण-भाऊ असोत किंवा मित्र मैत्रिणी असोत, दोघांना एका समान पातळीवरचा दर्जा असणं ही खूप आवश्यक गोष्ट मला वाटते. स्त्री-पुरुष समतेच्या चळवळीमध्ये ही गोष्ट महत्त्वाची मानलेली आहे. मूलभूत माणूसपणाची आठवण हे खरं समतेचं द्योतक.

आता लोकं नेहमीच असं बोलतात की स्त्री आणि पुरुष यात निसर्गानेच विषमता ठेवलेली आहे. स्त्री आणि पुरुष निसर्गत: वेगळे नाहीत का? हे वेगळेपण म्हणजे काय? तर शारीरिक पातळीवरचं. काहींच्या मते मेंदूतही काही वेगळेपण आहे. पण वेगळेपण याचा अर्थ विषमता नाही. We are different but equal. वेगळेपण म्हणजे श्रेष्ठ-कनिष्ठपण नाही. जीवशास्त्रीय शरीरधर्म वेगळे. त्याबाबत शकुंतलाबाई परांजपे यांनी म्हटलं होतं की, खरं म्हणजे स्त्री-पुरुष बरोबरीचा विचार केला तर पुरुष काही कधी बाळ जन्माला घालू शकणार नाही. ही शक्ती फक्त बाईजवळ आहे, तर हा स्त्रीच्या श्रेष्ठतेच्या दृष्टीने जमेचा मुद्दा आहे. पण हा मुद्दा पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत त्याची मूल्यात्मक बाजू बदलली की, योनीशुचिता, बलात्कारातून गरोदरपण येणं वगैरे प्रश्‍न उभे करतो. आता बलात्कार तर पुरुषच करतो, पण त्याच्या लिंगशुचितेचा सवाल कधीही ह्या व्यवस्थेने उभा नाही केला. का? तर तो कुठे गरोदर राहणार असतो? खरं म्हणजे ही वेगळी आधिक्याची आणि विधायक शक्ती बाईकडे आहे. आणि एका संकल्पनेतून तीच कोंडीत धरून बाईला अबला म्हटलंय. जीवशास्त्रीयदृष्ट्या जी नवमानव निर्माण करू शकते, ती कोणत्या तर्काने अबला ठरवली? नवमानव निर्मितीचं सामर्थ्य हे जसं स्त्री-पुरुषांतलं वेगळेपण आहे, तसं आणखीही एक गोष्ट संशोधनानं पुढे आलीय. मुलीचा गर्भ हा मुलाच्या गर्भापेक्षा जास्त सक्षम आहे. संतती नियमन वगैरे कोणताही कृत्रिम हस्तक्षेप नसेल तर १०० मुली जन्माला येतात तेव्हा १०६ किंवा १०७ मुलगे जन्माला येतात. ही निसर्गाचीच समतोल राखण्याची योजना आहे. आयुष्याच्या लढाईत मुलीचा गर्भ मुलापेक्षा अधिक तग धरणारा, चिवट. त्यामुळे काही मुलग्यांच्या गर्भांना जगण्यात यश आलं नाही, तरी स्त्री-पुरुष संख्येचा समतोल राखला जातो आणि आपण मात्र अशी तर्कटं रचली की बाई ‘अबला!’ बाईला असं सगळं जीवशास्त्रीय ज्ञान प्राप्त होणं, हेही तिचं एक प्रकारे मुक्त होणंच.

स्त्रीला पाळी येणं हा तिचा शरीरधर्म आहे. प्रथमच पाळी सुरू होते, तेव्हा एक परंपरा तिला मखरात बसवण्याची होती. तिच्या वाढीचा तो उत्सव मानत. तिच्या पूर्ण स्त्री होण्याची जाणीव करून देण्याची कल्पना त्यात असावी. पण पुढे मात्र पाळी आली की, तिला बाजूला बसण्याची सक्ती सुरू झाली. त्या काळात तिला अपवित्र समजू लागले. अशा वेळी जीवशास्त्रीय ज्ञान मिळणं हेच मुक्त होणं. मग तिचं तिलाही कळतं की, देवी म्हणून मखरात बसवणं नको. माणूस आहोत आम्ही, माणूस म्हणून आम्हाला जगता आलं पाहिजे. आपल्या महान संस्कृतीचे गोडवे गाणार्‍या परंपरेत शंभर वर्षांपूर्वीच्या शिरगणतीतील माहिती हेच सांगते की, तेव्हाही १९०१ मध्ये १००० पुरुषांमागे, ९७१ इतकंच स्त्रियांचं प्रमाण होतं. विकसित देशात दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या हजाराहून अधिक असते. आम्ही स्त्रीला देवी मानतो, तिची पूजा करतो तर हे प्रमाण कमी का? तुम्ही तर नेहमीच स्त्रीला गाडून टाकण्याच्या प्रवासावर निघालेले होतात. कायम स्त्रीची उपेक्षा, दुर्लक्ष, जन्मत:च मारून टाकणं ही वृत्ती कायम जोपासलेली होती. आता तर भारताच्या काही भागात १००० पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण ८००पर्यंत खाली आलेलं आहे. तर कसले आपल्या संस्कृतीच्या मांगल्याचे आणि गौरवाचे गोडवे गाणार?

स्त्री-पुरुष समतेचा विचार हा पाश्‍चात्त्यांकडून आयात केलेला विचार आहे, अशी काही जण टीका करतात. त्यातला एक भाग असा आहे की, इंग्रजी भाषेबरोबर ज्ञान आलं. उदारमतवादी विचारसरणीचा प्रभाव समाजसुधारकांवर होता. तो त्यांनी कृतीत आणला. आपण ह्याबाबतीत ‘करू पहिलं नमन जोतीबाला’ असं म्हणतो त्याला कारण आहे. त्यांचं साहित्य वाचायला लागलो, त्यांनी लग्नाचे वेळी घ्यायची जी शपथ लिहिली ती बघितली तर लक्षात येतं की, ते सर्व ठिकाणी स्त्री-पुरुष हे शब्द जाणीवपूर्वक वापरतात. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी १८४८ साली शाळा काढली. आपल्या पत्नीला बरोबरीनं आपल्या कामात सहभागी करून घेतलं, स्त्री-पुरुष समता कृतीत उतरवण्याचा त्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न राहिला. १९७५ साली आंतरराष्ट्रीय स्त्रीवर्ष जाहीर झाल्यावर जागतिक पातळीवर या विचारांना मान्यता मिळून अनेक दिशांनी उपक्रमांना जोर आला हे खरंय. पण आपल्याकडेही ही संकल्पना जवळपास १५० वर्षांपासून होती. ताराबाई शिंदे यांचं लिखाण आपल्यापुढे आहेच.’’

विद्याताई, ‘करू पहिलं नमन जोतीबाला’ असं म्हटलं तरी स्त्रीमुक्तीच्या संदर्भात अनेक पाश्‍चात्त्य विचारवंतांची मतं, पुस्तकं, पाश्‍चात्त्य देशातील चळवळींची उदाहरणं यांचा उल्लेख स्त्रीमुक्तिवाल्यांच्या चर्चेत अनेक वेळा येतो. त्याला काय म्हणायचं! पाश्‍चात्त्य विचारांचं हेतुपरस्सर भारतीयीकरण केलं गेलं? तुमचा काय दृष्टिकोन होता?

मला सारखं असं वाटतंय की, जगभरातले पुरुषसत्ताकतेचे मुद्दे खरं म्हणजे सारखेच आहेत. त्या त्या परिस्थितीमध्ये लोकांनी त्याचे तपशील बदललेले असतील. इंग्रजी शिक्षणामुळे इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाने जॉन स्टुअर्ट मिल किंवा थॉमस पेन यांच्या विचारांचं अभिसरण झालं हे खरंच.

माझ्या वाचनात जी पुस्तकं आली ती मला इथल्या परिस्थितीतही अधिक काही स्पष्ट करणारी वाटली. औद्योगिकीकरण तिकडे आधीच आलं. त्यामुळे तिथे निर्माण झालेल्या स्त्री-प्रश्‍नांवर ती पुस्तकं काही म्हणत होती. उदाहरणार्थ, स्त्रियांच्या नोकर्‍या कशा हव्यात? अर्धवेळ असाव्यात का? त्याचा परिणाम म्हणून स्त्रियांना पैसे कमी मिळणार, सेवा ज्येष्ठत्वामध्ये स्थान खालचं, पॅटर्निटी लीव्हचा मुद्दा हे प्रश्‍न त्या पुस्तकातून चर्चिले गेले होते. त्यामुळे इथे जेव्हा हे प्रश्‍न निर्माण झाले तेव्हा त्यांच्या चर्चेत ते आधार म्हणून मांडले गेले. ह्याचा अर्थ हे पाश्चात्त्यांकडून आलेलं खूळ म्हणायचं काय कारण?

‘फेमिनाईन मिस्टिक’ पुस्तकात प्रामुख्याने मध्यमवर्गीय स्त्रियांचाच विचार मांडलेला होता. दुसर्‍या महायुद्धानंतर ‘कुटुंब’ ही अत्यंत हळवी, नाजूक भावना व्यक्त करण्याची बाब बनत होती. मग पुन्हा मुली चांगला नवरा मिळवणं यासाठी शिक्षण घेत. नवरा मिळाला की संसारात गुरफटून जायचं. बेटी फ्रीडनने म्हटलंय की, त्यांना सबर्बिया नावाचा रोग व्हायचा. म्हणजे सबर्बमध्ये एक घर असावं, दारात फोक्सवॅगन गाडी उभी असावी, गाडी भरून जाईल इतकी मुलं व्हावीत अशी एक रिअ‍ॅक्शन उमटली होती. हेच स्वप्न. मग मुलं मोठ्ठी होईपर्यंत आई व्यस्त. ती मोठी होऊन आईचा पदर सोडून दूर गेली की बाईच्या आयुष्यात पोकळी. आणि हाच साधारण  मेनॉपॉझचा काळ तेव्हा ही आयुष्यातली पोकळी कशी भरायची? स्वत:साठी काही विचार करायचाच सोडून दिलेला. छंद, आवडी सगळं गुंडाळून आतापर्यंतचं आयुष्य जगलेलं. स्वत:ला ओळखणं, स्वत:चं स्वत्व जपणं, स्वत:साठी काही वेळ ठेवणं याचं महत्त्व सांगताना मलाही अशा पुस्तकांचा खूप चांगला उपयोग करता आला.

हे बायकांना सांगत असू तेव्हा एकदा माझे वडीलही मला म्हणाले होते, ‘तू कशाला त्यांच्या सुखात बिब्बा घालतेस? तू काही पर्याय देते आहेस का?’ पण मला वाटायचं, जे मला कळलंय ते सगळ्यांना कळलं पाहिजे. सगळ्यांचं सगळं करून चांगुलपणाचं, सगळ्यांना प्रिय होण्याच्या धडपडीचं गाठोडं जमवून काय साध्य होतं? त्या काळात मी एक गोष्ट लिहिली होती. त्यात मी लिहिलं होतं की, मी मेल्यावर माझ्या अंगावर काही फुलंबिलं उधळू नका. कारण मी लोकांना खूप खूष केलंय, पण मी स्वत:वर खूप नाखूष आहे, आणि अशा अवस्थेत मी मरतीये वगैरे... मी गोष्टी लिहायची केव्हाच थांबलीय, तरीपण अबोध पातळीवर केव्हाच लक्षात आलं होतं की, आपण आपल्या संसारात अनेक गोष्टी आवडत नसताना करतो आहोत. आता काही पाश्‍चात्त्य पुस्तकांतून जे विचार येत होते, ते इथल्या परिस्थितीशी सुसंगत ठरत होते, तेव्हा त्यांचा आधार मीही चर्चेत, भाषणात, लिखाणात नक्की घेतला आहे. पाश्‍चात्त्य विचारांचं भारतीयीकरण मी केलं असं मला नाही वाटलं. पण तपशील बदलले तरी मूळ विचार आणि तत्त्व तेच असेल, स्त्रियांची मागणी तीच असेल, तेव्हा त्या पुस्तकांचे दाखले जरूर दिले. त्यामुळे अन्याय जास्त ठळकपणे मांडता आला, मांडणी करणं सोपं झालं. ‘स्त्रिया शिकल्या तर आगाऊ होतील’, ‘घरकाम करणार नाहीत’ अशी विधानं व्हायची. ‘स्त्री शिकली की बिघडते आणि पुरुष शिकले तर शहाणे होतात.’ अशा विधानांचा मला त्रास व्हायचा; होतो. फुले, आगरकर, लोकहितवादी, म.कर्वे आणि आंबेडकरसुद्धा स्त्रियांसंबंधी विचार करत होते. त्यांना समजलेला अर्थ खरं म्हणजे सगळ्या शिकलेल्या पुरुषांना समजला नाही हे दुर्दैव आहे.’’

विद्याताई, विचारांचं अभिसरण ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. सुरुवातीला अतिरेकी वाटणार्‍या भूमिका हळूहळू स्वीकारल्या जातातही. इथं बाईनं घराबाहेर पडणं हे अजून स्वीकारलं जात नव्हतं तेव्हा पाश्‍चात्त्य देशात ’ब्रा बर्निंग’ची चळवळ उभी राहिली. याकडे तुम्ही कसं पाहता?

“माझ्यामध्ये झालेला या बाबतीतला फरक प्रामाणिकपणे नोंदवला पाहिजे. ‘ब्रा बर्निंग’च्या चळवळीचे उद्रेक इथे लोकांना दिसत होते. त्यावेळी आम्ही घेतलेली भूमिका मला आठवते आहे. त्यातला जो अतिरेकी स्त्री-मुक्तिवाद आहे त्यातले आम्ही नाही आहोत. आम्हाला नाही याची गरज असं वाटलं होतं. नंतर माझ्या असं लक्षात आलं की, ‘ब्रा बर्निंग’मध्ये एक महत्त्वाचा संदेश होता. तो असा होता की आम्ही चांगलं दिसावं, आमचं शरीर बांधेसूदच असावं, ते पुरुषाच्या नजरेला सुखावणारंच असावं यासाठी या सगळ्या गोष्टी आल्या असतील तर त्या आम्ही नाकारू. त्यातून आलेलाच विचार असा की, मला जसा देह मिळाला आहे त्याच्यावर माझं प्रेम आहे आणि मी त्याच्यावरच प्रेम करत जगणार आहे. मग कोणी काळं असेल, बुटकं असेल, कोणी लठ्ठ असेल, छाती लहान-मोठ्ठी असेल या सगळ्यांनी काही फरक पडत नाही. ‘ब्रा बर्निंग’च्या चळवळीमागे जर हे सूत्र असेल तर ते बरोबर आहे हे पटलं. मग आम्ही म्हटलं की इथे कदाचित आम्ही ‘ब्रा बर्निंग’ करणार नाही. पण त्या विचाराला आमचा पाठिंबा आहे. तशाच विचाराच्या सूत्राने विश्‍वसुंदरी वगैरे सौंदर्य स्पर्धांना आमचा विरोध आहे.

आता सुरुवातीच्या मुद्याकडे परत यायचं तर कशासाठी मुक्त व्हायचं? तर स्वत:साठी, कुटुंबासाठी, देशासाठी, सर्वांसाठी, मानवतेच्या भल्यासाठी हे तर आहेच. आणखी एक मुद्दा वारंवार मांडला जातो, कोण मुक्त करणार आहे? कोण स्वातंत्र्य देणार आहे स्त्रियांना?

स्वातंत्र्य कोणी देत नसतं. आपणच ते मिळवायचं असतं. सिद्ध करायचं असतं. सुरुवातीच्या काळात पुरुषापासून मुक्ती असाही काहींचा समज होता. तर पुरुष उदारमतवादी असला तर हा मुद्दाच येणार नाही असाही बायकांचा समज होता. सामान्यत: संवाद असे ऐकायला येत की, मला अगदी पूर्ण स्वातंत्र्य आहे घरामध्ये आणि मी काहीही करायला किंवा कुठेही जायला निघाले तरी मला ह्यांची ‘परवानगी’ असते अगदी. म्हणजे हिलाच ‘परवानगी’ शब्द वापरताना ‘मुक्त असणं’ ह्याचा अर्थ लक्षात येत नाहीये. आज तर स्त्रिया स्वत:ही मिळवताहेत. पण खर्‍या कसोटीच्या क्षणी तुम्ही मुक्त आहात की नाही ह्याचा कस लागतो. दोघेही मिळवत असताना, मला असं म्हणायचं नाही की एकमेकांत विचारविनियम करू नये. पण कसोटीच्या वेळी आपल्या मनाला पटलंय ते ठामपणे करण्याची आत्मनिर्भरता आलीय का हा मुख्य मुद्दा आहे. पारंपरिक स्त्री-प्रतिमेतून स्वत:ला मुक्त करताना स्त्री सामर्थ्यशील झाली पाहिजे. सर्व दृष्टीने मी स्वावलंबी झालं पाहिजे, माझ्यावरील नकोशा/वाईट पारंपरिक संस्कारातून मी मुक्त झालं पाहिजे, नात्यांच्या संदर्भात आत्मनिर्भर झालं पाहिजे. मी अगदीच एकांड्यासारखी निघालेय असं नाही, मला कुणी भेटलं तर ठीकच आहे, नाहीतर मी एकटीही माझं आयुष्य उत्तम तर्‍हेनं जगू शकेन असा आत्मविश्‍वास जेव्हा तिच्या मनामध्ये जागेल, तेव्हा काही चांगलं होण्याची शक्यता आहे. असं आहे की आपलं ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्यावर काही प्रमाणात अवलंबित्वही असतं. पण एकमेकांवर अवलंबून असण्यात नात्यातला गोड भाग असला, तरी त्याने दुबळेपणा येऊ नये. परस्परावलंबनातलं नातं छान असलं तरी त्यापलीकडे जी अवस्था आहे आत्मनिर्भरतेची, ती समजली पाहिजे. त्यासाठी प्रश्‍न पडणं, चर्चा करणं, विचार करणं, हे नाकारता कामा नये. प्रश्‍नांची भीती वाटता कामा नये. विचार करण्याचा आळस येता कामा नये. लोकांना तुच्छ लेखून, एकटेपणा मिरवावा असं नाही मला म्हणायचं. पण आपल्या विवेकाचा, तर्कसंगत विचाराचा आपल्याला कशाहीपेक्षा जास्त आधार वाटायला हवा. असलात बरोबर तर तुमच्यासह, नाहीतर तुमच्याविना ह्या अर्थाने आत्मनिर्भरता आली पाहिजे. माझ्या समोरच्या अडचणी, प्रश्‍न हाताळायची क्षमता मी मिळवली पाहिजे. यश येईल, न येईल. जे असेल त्याला सामोरं जाण्याची हिंमत असायला हवी माझ्यात. ह्या अर्थानं आपल्याला मुक्त करायचं आहे आपणच.

मलाही ही जाणीव खूप उशिरा झाली आयुष्यात. आजही असे खूप लोक असणार की त्यांना जाणीव झालेली नसणार. म्हणून मला वाटतं बोलत राहिलं पाहिजे. कुटुंबामध्ये, मैत्रिणींमध्ये कोणीतरी असावं, त्यांच्याकडून ही जाणीव आपल्यापर्यंत पोचावी. काही अन्याय झाला तरच ह्या पद्धतीने विचार करायला काहींची सुरुवात होते. कदाचित तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. अन्याय आज नसला झाला, तरी उद्याही होऊ शकतो. पण तुम्ही तयार पाहिजे ना! म्हणून हे विचार सर्वांपर्यंत पोहोचणं मला महत्त्वाचं वाटतं. कुणीच विचार न करता रखडत आयुष्य रेटावं, असं मला वाटत नाही.

पुन्हा स्त्रीला विचारानं उभं राहण्याची ताकद, शक्ती येईपर्यंत तिच्या विचारांचं स्वागत न होता खच्चीकरण झालं तर तिला उभारी कशी येणार? पुरुषांनी तिला स्वातंत्र्य ’द्यायचं’ नाहीये तर तिचं असलेलं स्वातंत्र्य मान्य करायचं आहे. मुलांचंही स्वातंत्र्य मान्य असतं, पण बाईचं नसतं. त्यासाठीही तिची खूप शक्ती खर्ची पडते. बाईचं स्वातंत्र्य कुटुंबाने मान्य करणं हा फार महत्त्वाचा टप्पा आहे स्त्रीमुक्तीचा.

पुरुष जन्मल्यापासून ‘मी’ कुणीतरी आहे ही भावना घेऊन वाढतो आणि बाई आपली ओळख नेहमी इतरांच्या संदर्भात सांगते. कुणाची मुलगी, बायको, सून, आई. हरकत नाही, पण मीच कुणीतरी आहे ही ओळख का पुरेशी वाटत नाही? ही भावना मनात जागणं, ती ओळख कमावणं हे महत्त्वाचं आहे. पुरुषांमध्ये स्वातंत्र्य असो वा नसो ते स्वतंत्रपणे वागतात. स्वत:ला बाईपेक्षा जास्त कळतं असं समजतात. कुटुंबातले कर्ते मानतात स्वत:ला. कारण त्यांना तसंच वाढवलेलं असतं, पण बाईच्या बाबतीत स्वत:ची ओळख तिला कमवायची आहे. जुन्या काळात शांताबाई किर्लोस्करांनी म्हटलंय की पाटलीणबाई ‘म्हणवून घेणं’ सोपं आहे, पण स्वत: पाटलीणबाई होणं अवघड आहे. त्यासाठी आपण काहीतरी करणं जरुरीचं आहे. महत्त्वाचं आहे.

बाईने काही करायला लागणं ह्यात तिचा विकास होतोच, पण तिच्या गुणांचा देशालाही उपयोग होतो अशी उदाहरणं आहेत. इतिहास आपल्याला असं सांगतो की, पुरुष काही कारणाने राज्य चालवायला नसला, काही दुर्दैवी प्रसंग, आणीबाणी आली तर बायकांनी कारभार सांभाळला आहे. देशातही आणि कुटुंबातही. अशा आपत्कालीन प्रसंगांपेक्षा आधीपासूनच स्त्री-पुरुष समता मान्य करून प्रत्येकाला वाढीला वाव ठेवण्याने आनंद वाढणार आहे. सहजीवनातला आनंद, समतेचा अनुभव, त्यातून येणार्‍या समृद्धीची आणि आनंदाची कल्पनाच कुणी केली नाही. इथे लोकशाही विचाराचा मुद्दा येतो. एकट्याच्या बुद्धिमत्तेपेक्षा आणि शहाणपणापेक्षा सगळ्यांच्या मताचा आदर करून पुढे जाणं हिताचं असतं. कौटुंबिक वातावरणातही लोकशाही हवी. इथे मला आगरकरांची आठवण होते. ते म्हणाले होते की, स्त्रियांना आणि पुरुषांना एकाच वेळी एकच शिक्षण द्यावं, एकाच ठिकाणी द्यावं. त्यातून स्त्रिया बाहेरही कामं करायला सक्षम झाल्या आणि तयार झाल्या, तर त्यांना ते करू द्यावं आणि अशा वेळी घरातल्या पुरुषांनी त्या बायकांची लुगडी धुतली, घरातली भांडी घासली, तर काही बिघडत नाही.

दोघांच्या सहकार्याने, चांगल्या सहजीवनाचा काय परिणाम होतो याचं आपल्यापुढे जोतीबा आणि सावित्रीबाईंचं केवढं उदाहरण आहे! फुल्यांनी खूप मूलभूत विचार मांडलाय. जातीपातींच्या अंगाने, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाच्या अंगाने, किंबहुना धर्मालाच अनेक प्रश्‍न विचारले आहेत.

स्त्रियांनी नोकर्‍या केल्या आणि पुरुषांनी भाकर्‍या थापल्या म्हणजे झाली का स्त्रीमुक्ती? असं आडमुठेपणाने अजूनही काही जण विचारतात. भूमिकांची अदलाबदल हा आपला विचार नाहीये. ते दोघे एकमेकांना पूरकच आहेत. पण ते कसे पूरक, हे त्यांचं त्यांना ठरवावं लागेल. सामान्यीकरण करून नाही चालणार. तूही वाढ, मीही वाढतो. मुळात वाढणे या कल्पनेवरचा विश्‍वास हे स्त्रीमुक्तीचं महत्त्वाचं अंग आहे. पुरुषाला वाढण्याची संधी होतीच. बाईची इच्छा असून ती तिला मिळत नव्हती. तिची वाढ होण्यात माझं काही गैर होत नाहीये हे सुद्धा पुरुषाला कळायला पाहिजे. वाढ वेगवेगळी असेल. पण एकमेकांच्या वाढीचा आनंद व्हायला हवा. दोघेही वाढू शकतात ही मूलभूत जाणीव हवी.

विद्याताई, स्त्रीमुक्तीच्या संदर्भात स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्याबद्दल चर्चा झाल्या. त्याचा व्यापक अर्थ लक्षात न घेता ‘मग आता काय तुम्हाला लैंगिक स्वातंत्र्यासाठी चळवळ करायची आहे का?’ असा प्रश्‍न विचारला जाई. अजूनही विचारला जातो. त्याबाबत काय भूमिका हवी?

लैंगिकता आपण नाकारत नाहीच. पण फक्त पुरुषव्यवस्थेने स्त्रीच्या चारित्र्याचे आणि पावित्र्याचे निकष ठरवायची गरज नाही. मुख्य मुद्दा हा आहे, की माझ्या शरीरावर माझा अधिकार आहे. त्या बाबतीत होकाराचा आणि नकाराचा मला अधिकार हवा. स्त्री-पुरुषांच्या कोणत्याही नात्यात तो अधिकार हवा.

विद्याताई, खरं तर स्त्री काय किंवा पुरुष काय दोघांनीही असं म्हटलं पाहिजे की मी स्त्रीमुक्तिवादी आहे. प्रत्यक्षात मात्र स्वत: मुक्त आहेत अशा स्त्रियाही म्हणतात, ‘मी फेमिनिस्ट नाही.’ स्त्रीमुक्तीची चळवळ वाढली तसे घटस्फोट वाढले समाजात, असाही एक मुद्दा आहे. मग स्त्रीमुक्तीबद्दलच समज-गैरसमज वाढले असं तर झालं नाही? म्हणून मग स्वतंत्रपणे जीवन जगणार्‍या यशस्वी स्त्रियाही ’मी नाही स्त्रीमुक्तीवाली’ असं म्हणताहेत का?

हो असं दिसतंय की मुळात स्वतंत्रपणे जीवन जगणार्‍या, आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून गौरवास प्राप्त झालेल्या स्त्रियासुद्धा मोठ्या अभिमानाने सांगत असतात की मी नाही स्त्रीवादी आणि ह्या स्त्री-मुक्ती चळवळीशी माझा काही संबंध नाही. त्यांना असं का म्हणावसं वाटत असेल? दोन-तीन गोष्टी आहेत. इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, डॉ. कमलाबाई सोहोनी या स्त्रिया असामान्य कुवतीच्याच होत्या. एवढ्या सामर्थ्यशील होत्या की जे जे करावंसं वाटलं ते स्वत:च्या वाटा स्वत: निर्माण करून त्यांनी केलं. काही प्रमाणात त्यांच्या भोवतीचं वातावरण, म्हणजे आईवडिलांचा दृष्टिकोन, त्यामुळे काही प्रमाणात मिळणारी अनुकूलता, सोयी-सुविधा यामुळे त्यांना सामाजिक चळवळीची गरज पडली नाही.

गौरी देशपांडेलाही हे असं सगळं अनुकूल वातावरण मिळालं. तिचे वडील तिच्या आईला म्हणजे डॉ. इरावर्ती कर्वे यांना आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी पूर्ण सहकार्य करणारे, प्रोत्साहन देणारे होते. वेळप्रसंगी मुलींच्या वेण्या घालून त्यांना शाळेत पाठवण्याची तयारी ते करून देत, असं तिनं नमूद केलं आहे. तिलाही चळवळीची गरज नव्हती. ती प्रत्यक्ष चळवळीतल्या कार्यक्रमात नव्हती. पण तरी ती म्हणाली, कुणीतरी प्रश्‍न विचारल्यावर, की मी नाही तर दुसरं कोण फेमिनिस्ट? तिला पुढे आयुष्यात जी माणसं दिसली त्यातून तिच्या लिखाणात ते उतरलं. चळवळीविषयी जे अनेक समज-गैरसमज निर्माण झाले. त्यातून काहीजण म्हणाले, हा विचार आम्हाला पटतो. आम्ही फेमिनिस्ट आहोत पण चळवळीत नाही आहोत. आणि फेमिनिस्ट आहेत म्हणजे चळवळीत असलंच पाहिजे हे नाहीच गरजेचं. पण तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य स्त्रियांना घडोघडी प्रश्‍न आहेत. भीती आहे निर्णय घेण्यामागे, जे वाटतं ते करायचं धाडस नाहीये, निर्धार केला तरी त्यांच्यापाठी कुणाचं बळ असण्याची गरज आहे आणि हे बळ त्यांना चळवळीनं दिलं हे मान्य करायला हवं.

काहींना काही मुद्द्यांवर चळवळीनं आवेशानं बोलणं आवडत नाही. लैंगिक स्वातंत्र्याबद्दलचं बोलणं, कौटुंबिक पातळीपासून राजकारण येतं असं म्हणणं यांसारखे काही विचार काहींना न पटणारे आहेत. किंवा काहींनी ते व्यापक पातळीवर समजूनही घेतलेले नाहीत; आणि म्हणून स्वत:ला फेमिनिस्ट म्हणवून घ्यायला ते तयार नसतात. पण हे दुर्दैवी आहे. काही असंही म्हणतात की, तुम्ही स्त्री-मुक्ती चळवळीत ज्या पातळीवर विचार करता त्या पातळीपेक्षा आम्ही वेगळ्या पातळीवर ’माणूस’ म्हणून जगण्याचा विचार करतो. ते विकसित रूप आम्हाला अपेक्षित आहे. तुमच्या विचारात आम्हाला मर्यादा जाणवतात. आता कसं आहे की, चळवळ वाढत असते ती टप्प्याटप्प्याने. भोवतीच्या सामाजिक परिस्थितीवर हे टप्पे अवलंबून असतात. त्यांना जे माणूस म्हणून विकसित रूप अभिप्रेत आहे त्या मानवमुक्तीकडे जाणारा स्त्री-मुक्ती चळवळ हा एक टप्पा आहे. त्या दोन्हीत विरोध नाही. काहींना त्यासाठी चळवळींशी नातं जोडण्याची गरज नव्हती असं म्हणता येईल. या चळवळीबद्दल, स्त्रीमुक्तीच्या विचाराबद्दल बर्‍याच जणांना माहितीच नसते. त्याच्या बद्दलचे गैरसमज मात्र त्यांच्यापर्यंत पोचलेले असतात. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. रूढ गोष्टींपेक्षा वेगळं काही स्वीकारण्याची तयारी नसते, कारण भीतीही वाटते. असुरक्षित वाटतं चाकोरी सोडताना. काहींच्या मनात नवीन विचारांविषयी आकस असतो. एकूण समाजाचा बौद्धिक आळस दिसतोच काही समजून घेताना.

आपली एक मैत्रीण पांढरकवड्यासारख्या लहान गावात शिक्षिका म्हणून गेली. आंतरजातीय विवाह केलेली, गळ्यात मंगळसूत्र न घालणारी आणि गरोदर असलेली. तिला तिच्या शिक्षणसंस्थेनं खूप त्रास दिला, या सगळ्याकडे पाहून मी त्याबद्दल लिहिलं. तेव्हा फलटणसारख्या तालुक्याच्या जागी राहणारी जाई निंबकर म्हणाली की, ‘खरं आहे, मीही छोट्या गावात राहते, पण सधन, श्रीमंत आहे. गावाचं काही देणंघेणं पडतच नाही. मला कुणी जाब विचारत नाही. पण ह्या स्तरावर नसलेल्या, परावलंबी बाईला गावात अगदी साध्या साध्या गोष्टीने म्हणजे लग्नानंतर नाव न बदलणं, मंगळसूत्र न घालणं, गरोदर राहणं यासाठी त्रास होऊ शकतो.’ अशा वेळी विशिष्ट रूढी न पाळण्यामागे आपला काय विचार आहे, हे सांगण्यासाठी त्यांना सपोर्ट सिस्टिमची गरज लागते.

पुन्हा ज्या स्वत:ला फेमिनिस्ट मानत नाहीत त्यांना विचारलं, उदाहरणार्थ, सानिया मिर्झाला विचारलं की, तू ‘मी फेमिनिस्ट नाही’ असं म्हणतेस, तर तुला स्त्री-पुरुष समता असायला हवी, हे मान्य नाही का?’ तर समतेचा मुद्दा मला मान्य आहे असं ती म्हणाली. अनेक उच्चशिक्षित स्त्रिया, ‘माझे विचार टोकेरी नाहीत. त्यामुळे मी कुठल्याही ‘वादाची’ समर्थक नाही’ असं विधान करतात. त्यातून कुठलाही वाद ‘टोकेरी’च असतो असं त्या गृहीत धरतात. पण बहुतेक वाद ‘विचारी’ असतात असे त्या मानत नाहीत. म्हणजे मुळात स्त्रीमुक्ती विचाराचा व्यापक संदर्भ मनात नसतो. एकूण समाजातील विविध स्तरांमधील स्त्रियांचा संदर्भ त्यांच्या मनात नसतो असं वाटतं.

स्त्रीवादाचेही वेगवेगळे विचारप्रवाह आहेत : उदारमतवादी, जहालमतवादी, लोकशाही समाजवादी आणि आता पर्यावरणवादी. जहालमतवादींमध्ये सुरुवातीला एक प्रवाह होता की पुरुष नकोतच. ‘वुमेन ओन्ली.’ आता हे ह्या जगात कसं टिकणार? त्यामुळेही चळवळीविषयी काही गैरसमज झाले. हा तोटाच झाला. बाकी विचारप्रवाहही बदलत गेलेच.

सुरुवात स्त्रियांपासून पण पोचायचं पुरुषांपर्यंत असं आम्ही म्हणत आलो, तरी आम्ही पुरुषांशी पुरेसा संवाद साधला नाही. पुरुषांबरोबर बोलण्याची आणि त्यांनाही आश्‍वस्त करण्याची गरज आहे. हा चळवळीतला एक नवा टप्पा आहे. थोडेथोडे प्रयत्न सुरू झाले आहेत. उदाहरणार्थ, नारी समता मंचाने पुरुष संवाद केंद्र सुरू केलं आहे. आनंद पवार, मिलिंद चव्हाण असे जे फेमिनिस्ट कार्यकर्ते आहेत त्यांनी पुढाकार घेऊन ‘समतेसाठी आपण पुरुष’ असा एक मंच सुरू केला आहे. पुरुषांमध्येही अशी संवेदनशीलता वाढावी म्हणून ‘मावा’ (men against violence) सारखी संघटना काम करते आहे.

वेगवेगळ्या टप्प्यावर स्त्रीमुक्तीच्या प्रश्‍नावर वेगवेगळ्या आंदोलनांची धार वाढणं गरजेचं असतं. आता लिंगनिदान चाचण्या रोखण्याचा प्रश्‍न समोर आहे. ग्रामीण भागातल्या एका चर्चेत एक मुलगी एकदा म्हणाली की, वंशाला दिवा हवा, दिवा हवा असं म्हणतात; मग आम्ही मुली म्हणजे काय मेणबत्त्या आहोत का फुंकरून टाकायला? आता मुलीचा गर्भ खुडून टाकणं म्हणजे फुंकरून टाकणंच चाललंय. त्या मुलीच्या बोलण्याची भेदकता अधिकच वाटते आहे. अनेक प्रश्‍न पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे निर्माण झाले आहेत हे लोकांना कळत नाहीये. पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये पुरुषाचं नाव, त्याचा वंश चालत राहणं आणि म्हणून मग वंशाला दिवा ही कल्पना. त्यातून पुढे मग स्त्री-गर्भ असेल, तर फुंकरून टाका. मुलीची जरूरच काय? पुन्हा मुलीचं लग्न त्यात होणारा खर्च- हुंडा - त्यापेक्षा मुलगी नकोच. टाका गर्भातच खुडून. म्हणून मग स्त्रीमुक्ती चळवळीत ह्या प्रश्‍नाला धार चढणं स्वाभाविकच.

पुरुषांना स्त्री-प्रश्‍नांबाबत संवेदनशील बनवणं गरजेचं आहे. त्याबाबतही स्त्रीमुक्ती चळवळीची भूमिका महत्त्वाची ठरते. ह्याबाबत सातत्याने काम करत राहायला हवंय. डॉक्टर्स, पोलीस, राजकारणी, न्यायाधीश सगळ्यांना स्त्री प्रश्‍नांबाबत संवेदनशील बनवण्याची गरज आहे. ‘साक्षी’ या गटाने एकदा न्यायाधीशांना प्रश्‍नावली भरायला दिली होती. त्याच्या अहवालात काय दिसलं? तर विसंगती! म्हणजे माझ्या मुलीचा विचार करताना मी संवेदनशील. पण न्यायदान करताना भूमिका पारंपरिक. ज्या स्त्रिया उच्चपदावर काम करतात त्या स्त्री-पुरुष समतेचा विचार समजलेल्या असायला हव्यात अन्यथा पारंपरिक विचारांच्या पगड्यात अडकूनच निर्णय होतील.

सुप्रीम कोर्टात स्त्री न्यायाधीशांची संख्या अगदी कमी आहे. पण त्यांच्या संवेदनशीलतेबद्दलही खात्रीने सांगता येणार नाही. तिथल्या एका न्यायाधीशबाईंनी आपल्यावरच्या जबाबदार्‍या कोणत्या ह्या रकान्यात ’मुलीचं लग्न’ असं लिहिलं. अनवधानानेही असेल. पण वर्तमानपत्रात त्याची बातमी झाली. त्यांना मुलीचं लग्न ही जबाबदारी का वाटली? असं का नाही वाटलं की, मी खर्चिक लग्न करणार नाही! न्यायाधीश पदावरील ही बाई पुरुषसत्ताक विचारसरणीच अंगीकारणारी होती. भँवरीदेवीच्या बाबतीत न्यायाधीशानी म्हणणं की उच्च जातीचे हे पुरुष ह्या दलित स्त्रीवर बलात्कार कसा करतील? अशा विचारसरणीबद्दल चळवळीला काही भूमिका घेऊन आंदोलनं करावी लागतात. मुलीवर होणारा खर्च, तिच्या सुरक्षिततेची काळजी यामुळे मुलगीच नको म्हणणार्‍यांच्या लक्षात आणून द्यावं लागतं की ही असुरक्षितता कोण निर्माण करतं? मुलीवर स्वामित्व गाजवणारी पुरुषसत्ताक वृत्तीच. जन्मापूर्वी मुलीला नष्ट करताना जगण्याच्या हक्काची, मूलभूत मानवी हक्काची पायमल्ली होते आहे हे लक्षातही येत नाही.

शहरी काय किंवा ग्रामीण काय, सगळीकडे मूळ दुय्यमपणा तसाच आहे. काही बाबतीत शिक्षणामुळे शहरी स्त्रीला काही सुविधा अधिक मिळाल्या असल्या, तरी जोपर्यंत डोक्यात त्याबद्दलच्या विचारांचा प्रकाश पडत नाही, तोपर्यंत शिक्षणालाही अर्थ नाही. ग्रामीण बाईला बाहेर अधिकच असुरक्षितता आहे. शेवटी कुठेही आत्मभान येणं, आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होणं महत्त्वाचं ठरतं.

चळवळीनं ‘मातृत्व गौरवा’च्या परंपरेचा फुगाही फोडला. म्हणजे त्याबद्दल विचार करायला शिकवलं. स्वत:ला काय वाटतंय ते म्हणण्याचं धाडस दिलं. मला लग्न हवंय पण मूल नको आहे किंवा एकच हवंय, मग ती मुलगीही असली तरी चालेल हे म्हणायचं धाडस बाईला येतंय. मूल नसलेली बाई तो कमीपणा मानत नाहीये. अर्थात ती कुठे आहे यावर आणि तिचा स्वत:चा वैचारिक प्रवास किती झाला आहे ते यात महत्त्वाचं ठरतं. मला एक मूल झाल्यावर दुसरं हवं, तर मी दत्तक घेईन असं म्हणणारे वाढताहेत. मातृत्वाचे गोडवे गाणार्‍यांना प्रश्‍न विचारले जाताहेत की मातृत्व इतकं थोर आहे, तर मग बलात्कारातून जन्मलेली, लढाईच्या काळात शत्रूसैन्याकडून झालेल्या अत्याचारातून जन्मलेली मुलं यांना का नाही चांगलं वागवलं जात? अनाथ मुलांची संख्या का वाढते? लग्नापूर्वीचं मातृत्व म्हणजे पाप का? ती बाई पोटच्या पोराला का टाकते? मातृत्व एवढं थोर मग कुमारीपण, योनीशुचिता हे महत्त्वाचं का? चळवळीने याबाबत विचार करायला शिकवलं.

आमच्या एका मैत्रिणीला मूल नाही. तिला तिच्या मैत्रिणीनं विचारलं, ‘तुला त्याबद्दल काय वाटतं?’ तर मैत्रिणीने उत्तर दिलं की, ‘तुम्हाला मुलं आहेत ना, तर तुमचं प्रेम तुमच्या मुलांपर्यंतच संकुचित आहे. माझं प्रेम सगळ्या मुलांपर्यंत पोचू शकतं.’ मातृत्वाबाबतचा नकारात्मक भाग तिनं किती विस्तृत आणि व्यापक केला! हे चळवळीचं यश.

ह्या बाबतीत मला पुन्हा म. फुले आठवतात. त्या काळात त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं. बायकांना आधार दिला. त्या गृहात जन्माला आलेलं एक मूल स्वत: दत्तक घेतलं. मला नेहमी वाटतं म. फुल्यांनी जे जगून दाखवलं, ते जर घराघरातील सगळ्या पुरुषांना कळलं असतं, तर आम्हाला आज चळवळीची गरज भासली नसती. त्यांना आपल्या बायकोच्या कर्तृत्वाची भीती वाटली नाही. आपल्याला स्वत:चं मूल नसल्याचा कमीपणा वाटला नाही, आपल्याला मूल नसताना आपल्या बायकोनं दुसरं लग्न का करू नये, असा प्रश्‍न बायकोला विचारताना भीती वाटली नाही, हे सगळं जर पुरुषांनी समजून घेतलं असतं तर कशाला चळवळीची गरज वाटेल? ‘सावित्रीबाई घरोघरी आणि जोतीबांचा शोध जारी’ अशी घोषणा उगीच नाही येत. चळवळीमुळे घरोघरी सावित्रीबाईंची संख्या वाढते आहे. पण जोतीबांचा मात्र शोध घ्यावा लागतो आहे.

विद्याताई, अजूनही मुलीचं लग्न वेळच्या वेळी झालंच पाहिजे. लग्न झालं की मुलं पण व्हायला हवीतच अशी एकंदरीत समाजाची मानसिकता आहे. अशा वेळी नवर्‍याबरोबर पटलं नाही तर शेवटचा उपाय म्हणून ती घटस्फोटाचा विचार करते. हे बळ तिला अर्थातच चळवळीनं आणि तिच्या आर्थिक स्वावलंबनानं दिलं आहे. पण समाज तिच्यावर बेजबाबदारपणाचा आणि चळवळीवर घरं फोडण्याचा आरोप करतो. बाईने स्वत:च्या मनासारखं जगणं हा बेजबाबदारपणा म्हणणं बरोबर आहे?

ह्यात दोन-चार प्रश्‍न गुंतलेले आहेत. दोघांमुळे मुलं झाली. ती फक्त बाईचीच आहेत का? घटस्फोटाच्या केसेस पहिल्या तर असं दिसतंय की, बाईला त्रास देण्यासाठी मुलांचा शस्त्र म्हणून तो वापर करतो.

दुसरं असं की बाई तिच्या आयुष्याच्या अगदी पस्तिशी-चाळीशीपर्यंत परंपरेच्या विचारामध्ये समजा जगली. मग तिच्या लक्षात आलं की ह्या संसारात ह्या नवर्‍याबरोबर राहण्यात काही अर्थ नाहीये. अशा वेळेला आपलं उरलेलं आयुष्य तिनं वाया घालवलं पाहिजे का, त्याच कुचंबणेच्या विचारामध्ये? पुन्हा तो सुधारला तर ठीक. तो नाही सुधारला, मग ती बाहेर पडली तर ह्याला बेजबाबदारपणा कसा म्हणणार? ती मुळात माणूस म्हणून जन्माला आली, मग बाई ठरली, कुणाची तरी मुलगी, बायको, आई ठरली. खरं माणूसपणाशी इमान राखण्याचा मुद्दा घेतला तर आयुष्याची चाळीस वर्षं वाया नाही का गेली? पण उरलेली पस्तीस वर्षं तरी तिला नीट जगू दे. मला नाही हा बेजबाबदारपणा वाटत. हे उशिरा आलेलं शहाणपण असलं तरी तो जबाबदार निर्णय आहे.

मुलांना ‘ती’ सोडत नसते. मुलं कधी वडिलांच्या बाजूची असतात, कधी आईच्या. तो त्यांच्या वाढीच्या प्रक्रियेचा भाग आहे. ती कशी वाढतात, किती स्वतंत्र विचार करतात यावर सगळं अवलंबून असतं. एक मुद्दा असा आहे की, आई-वडिलांचं जर पटत नसेल आणि घरातलं वातावरण दूषित असेल, तर मग त्याचा मुलांवर काय परिणाम होणार आहे, याचाही विचार केला पाहिजे. आई-वडील केवळ असणं म्हणजे मुलांसाठी चांगलं ठरतं का? जे काय छत्र आहे ते फाटलंय, मोडलंय, टोचतंय तरी त्या छत्राखाली राहणं याला काही अर्थ नाही. आईवडिलांमध्ये ताण असतात, जरी ती मुलांच्या देखत भांडली नाहीत तरी मुलांना बरोबर कळतं की यात प्रेम नाहीये. दुरावा आहे. ताण आहेत. तरी त्या मोडक्या घरात मुलांसाठी राहणं आणि जगानं म्हणणं काय झालं, शेवटी आई-वडील आहेत ना? तर हे सगळं ढोंगी, भोंदूपणाचं पोकळ विधान आहे.

आईवडिलांना वेगळं व्हावं लागलं तरी दोघांनाही मुलांना भेटायला येतं. ही शक्यता आपण विचारातच घेत नाही की शहाणपणानीही घटस्फोट होतो. तुझं माझं पटत नाही, आपण एकमेकाला ओरबाडत राहण्यापेक्षा वेगळे राहू या, असा शहाणपणाचा निर्णय असू शकतो. अशा मताला नकार देणारे लोक हे परंपरेचे बळी असतात, किंवा अहंकाराचे. पण घटस्फोट होऊनही मैत्री असू शकते. आईवडील आणि मुलं यांच्यात समजही असू शकते. पुन्हा लग्न टिकलेल्या घरातले आईवडील पालकत्व चांगलं निभावतात का? हा वेगळाच मुद्दा आहे. मुलं चांगली निघाली तर ‘माझी मुलं’ आणि वाईट निघाली तर जबाबदारीची चेंडूफेक चालते.

मघाशी आपण चळवळीतल्या वेगवेगळ्या विचारसरणीबद्दल बोलत होतो. खरं सांगायचं तर यासंदर्भात मला अभ्यासाची पार्श्‍वभूमी नव्हती. माझ्या अनुभवातून ते झालं. वैयक्तिक आयुष्यात स्त्री-पुरुषांमधले असमतेचे, विषमतेचे अनुभव घेताना असंही वाटू लागलं की, मला अमुक का मिळू नये? वगैरे. घराघरात नवराबायकोचं वागणं सुधारलं तर प्रश्‍न सुटतील. पण प्रत्यक्षात वाकडेपणा वाढताना जाणवत होता. पण ह्याच टप्प्यावर माझी मैत्रीण - शैला बापट हिने ह्याकडे बघण्याची एक दृष्टी मला दिली. ती सांगायची की, समाजामध्ये एक पुरुषसत्ताक व्यवस्था आहे. धर्म, परंपरा, संस्कार, संस्कृती यांचे जे दबाव आहेत, त्यांनी मिळून जी व्यवस्था तयार झाली आहे ती बाईला आणि पुरुषाला असं वागायला भाग पाडतीय. मला ते कळलंही नव्हतं. या प्रकारे मी विचार नव्हता केलेला. माझा जन्म मध्यमवर्गातला. मी जिथे काम करत होते, ते ‘स्त्री’ मासिक, त्याचं उद्दिष्टही असंच की मध्यमवर्गातली बाई शहाणी झाली पाहिजे. ती नीटनेटकी, सुंदर, स्मार्ट (स्मार्ट शब्द नव्हता तेव्हा, पण अर्थ तसाच) झाली पाहिजे. तिला रेसिपीज आल्या पाहिजेत, भरतकाम, विणकाम आलं पाहिजे, मुलांचं पालकत्व घेता आलं पाहिजे, राजकारण आणि जगातल्या सगळ्या घडामोडी कळल्या पाहिजेत वगैरे वगैरे. शैला बरोबरच्या चर्चांनंतर आणि माझ्या व्यक्तिगत अनुभवातून मध्यमवर्गाला काय प्रश्‍न आहेत हे मला कळायला लागलं. स्त्रीच्या कुटुंबातल्या इतर नात्यांइतकंच तिचं स्वत:चं स्वत:शी व्यक्ती म्हणून असलेलं नातं महत्त्वाचं आहे, हा माझा अनुभव होता. शिवाय असं स्वत:शी नातं शोधलेल्या स्त्रीचं समाजाशी एक अतूट नातं असायला हवं याबाबतही मी स्वत:शी झगडून, भांडून एका निश्‍चयाला आले होते. ‘स्त्री’ या मला मिळालेल्या एका माध्यमातून सामाजिक चळवळीशी नातं जोडत मी मध्यमवर्गीय स्त्रियांशीच संवाद करू लागले. सुरुवातीच्या काळात मला चळवळीत खूप डावललं गेलं आणि कमीही लेखलं गेलं, आणि मी ते स्वीकारलंही.

डावललं गेलं त्यामागची कारणं काय होती? त्रुटी कोणत्या वाटत होत्या?

म्हणजे एक तर माझी मांडणी अनुभवावर आधारित असायची. त्यामागे काही अ‍ॅकॅडेमिक विश्‍लेषण नसायचं. मी म्हणतेच की मी काही नवी सैद्धांतिक मांडणी करणारी अभ्यासक नाही. दुसरा मुद्दा म्हणजे माझे विचार एकूण मध्यमवर्गीय स्त्री, कुटुंब याभोवती फिरणारे. अगदी ठाामीण स्त्रीचे प्रश्‍न, दलित स्त्रीचे प्रश्‍न यांपर्यंत मी नाही पोहोचू शकले फारशी. कष्टकरी श्रमिक वर्गापर्यंत नाही पोचू शकले. त्यामुळे महिला आंदोलन संपर्क समितीमध्येसुद्धा मला प्रथम घ्यायचं का नाही ह्याबद्दल चर्चा झाली.

मला नेहमी वाटतं, ज्या मध्यमवर्गाचं मला लेबल लागलं तो वर्ग मला महत्त्वाचा वाटला, विचार करणं परवडणारा वाटला. मी तिथे पोचू शकले. आता सुद्धा मी संपर्क समितीच्या कार्यक्रमाला जाते. त्या सभांना जाते तेव्हा लक्षात येतं की तिथे संख्येनं खूप बायका आलेल्या असतात. त्या खूप चालून, दमून आलेल्या असतात. सभा चालू असताना त्या आपापसात बोलत असतात, भूक लागली म्हणून जवळचा डबा खात असतात. मला त्यांना नावं ठेवायची नाहीत. त्या वागतात ते स्वाभाविक आहे. मला वाटतं आम्हालाच कळत नाही की, त्यांच्यापुढे ही भाषणं द्यावीत की नाहीत? की त्यांना इथे छान वाटेल अशी वेगळी काही कार्यक्रमांची आखणी करावी? ८ मार्चच्या कार्यक्रमांची आम्ही आखणी करतो, तेव्हा ह्याचा विचार झाला पाहिजे.’’

विद्याताई, ‘मिळून सार्‍याजणी’च्या दशवार्षिक प्रवासाचा आढावा पुणे विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या ‘संवाद’ गटातर्फे घेतला गेला तेव्हा काढलेले काही निष्कर्ष तुमच्या भूमिकेच्या मर्यादा सांगत होते. म्हणजे अनुभव व वैचारिकता यांचा परस्परसंबंध जोडण्याच्या मिळून सार्‍याजणीच्या प्रयत्नात सातत्य नाही. बरेच लेख चौकोनी कुटुंबाच्या नात्याच्या मर्यादेतच फिरत राहतात. म्हणजे एकूण मासिकाच्या मध्यमवर्गीय चेहर्‍याबद्दल टीका होती. अर्थात मिळून सार्‍याजणीचं. वेगळेपणही मान्य केलं होतं. आज तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं?

एकतर आपल्या मासिकानं अशा प्रकारच्या समाजशास्त्रीय पाहणीची तयारी दाखवली हे विशेष नाही का? पाहणीत जे निष्कर्ष मांडले गेले त्यावर चर्चाही घडवून आणली. त्यात जे म्हटलं त्यातलं जे पटलं, जे शक्य झालं त्याबाबत मासिक नेहमीच प्रयत्नशील राहिलं. राहत आहे. आज २०पेक्षा जास्त वर्षांची वाटचाल होऊन गेली. हे मासिक सर्वांगांनी फुलावं यासाठी नेहमीच आपण प्रयत्नशील राहू इच्छितो.

मध्यमवर्गाला दुर्लक्षित करावं असं मला वाटत नाही. मध्यमवर्गाकडे हातात काही सुविधा आहेत, काम करण्याची क्षमताही आहे. त्यांच्या जाणिवा व्यापक व्हाव्यात म्हणून, त्यांची दृष्टी व्यापक व्हावी म्हणून प्रयत्न चालू ठेवायला हवेत. मध्यमवर्गाचं मर्यादित क्षेत्र म्हणूनच मला महत्त्वाचं वाटलं होतं. कालौघात कामाची गरज वाढतेच आहे. मध्यमवर्ग संख्येनेही वाढतो आहे. ह्यातले काही नवश्रीमंत, सुखवस्तू वर्गात जाताहेत. पण चळवळीचे वारे अंगावर घेत घेत वाढलेला हा वर्ग चळवळीची शिकवण आचरणात आणून सजग नागरिक बनतो. मला अजूनही वाटतं की ह्या वर्गात खूप पोटेन्शियल आहे. हा वर्ग बोलणारा, टीका करणारा असतो. म्हणूनच ह्या वर्गाची जबाबदारी वाढते. त्याने सतत स्वत:त मश्गुल न राहता एकूण समाजाचा विचार केला पाहिजे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी संस्था, संघटना जे प्रयत्न करत असतात, त्यात मोठ्या संख्येनं सामील झालं पाहिजे. पुरोगामी विचार समजावून घेतला पाहिजे. राजकारणात सक्रिय झालं पाहिजे. निवडणुकात भाग घेणं शक्य नसेल प्रत्येकाला, पण निदान चांगला उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. निवडून आलेल्या उमेदवारावर लक्ष ठेवून अंकुश ठेवला पाहिजे. त्यामुळे समाजात एक समतेचं, सुरक्षिततेचं वातावरण तयार होईल आणि मग स्त्री-मुक्तीकडून मानवमुक्ती ही गोष्ट फार दूरची वाटणार नाही.

.............................................................................................................................................

‘विद्याताई आणि... : संवादातून उलगडलेला गृहिणी ते विचारसंपन्न कार्यकर्ती हा प्रवास’ हे अंजली मुळे व आशा साठे यांचं पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5169/Vidyatai-ani

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......