जावेद अख्तर. हिंदी चित्रपटक्षेत्रातील प्रसिद्ध पटकथाकार आणि गीतकार. काल त्यांचा ७५वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांची ही विशेष मुलाखत. नसरीन मुन्नी कबीर यांनी अख्तर यांची घेतलेली दीर्घ मुलाखत इंग्रजीमध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झाली आहे. तिचा हिंदी अनुवादही प्रकाशित झाला आहे. त्यावरून चंद्रकांत भोंजाळ यांनी ‘गप्पा सिनेमाच्या’ हा मराठी अनुवाद केला आहे. अक्षर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून प्रस्तुत भाग संपादित स्वरूपात घेतला आहे.
.............................................................................................................................................
हिंदी चित्रपट क्षेत्रात जावेद अख्तर यांचं नाव खूपच मोठं आहे. त्यांनी सलीम खान यांच्याबरोबर ८०च्या दशकात खूप महत्त्वाच्या पटकथा लिहिल्या (जंजीर, दीवार, शोले, त्रिशूल), पण तरीही त्यांची रचनात्मक ऊर्जा ‘संपली’ नाही. १९८१ मध्ये त्यांनी गीतलेखनाला सुरुवात केली. ‘हवा हवाई’ (मिस्टर इंडिया) पासून ‘एक लडकी को देखा...’ (१९४२ ए लव्ह स्टोरी) पर्यंत त्यांनी गीतलेखनात वैविध्यपूर्ण भाषेचा आणि छंदांचा उपयोग गेला. उर्दू आणि हिंदी मध्ये प्रकाशित झालेला त्यांचा कवितासंग्रह ‘तरकश’ हा विद्वानांनी आणि सामान्य वाचकांनीही डोक्यावर घेतला. आपल्या सार्वजनिक जीवनातही ते खूप बेधडक आहेत आणि ज्यावर त्यांचा विश्वास आहे तो विश्वास सार्थ ठरवण्याची कलाही ते जाणतात. ते चांगले गप्पाही मारतात आणि ते मौलिक विचारवंतही आहेत, हे अनेकांना माहीत नसतं. जेव्हा ते या पुस्तकासाठी दीर्घ मुलाखत द्यायला तयार झाले, तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मुलाखतीच्या दरम्यान अनेक वेळा फोनची बेल वाजली, येणाऱ्या जाणाऱ्यांची तर रीघ लागलेली होती. पण त्यांनी आपलं लक्ष मुलाखतीवरून विचलित होऊ दिलं नाही. उर्दू शायरी, पारसी थिएटर किंवा गब्बरसिंह यांच्याविषयी बोलताना ते रंगून जात असत. पण एखादा नवा विचार सुचला की, ते रोमांचित होतं. जेव्हा त्यांच्या मनात नवा विचार येई, तेव्हा त्यांचे डोळे चमकत असत. आणि क्षणभर ते मौनात जात असत. ते खुल्या विचारांचे आहेत. त्यांचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ जबरदस्त आहे. आणि भारतीयत्वाशी त्यांचं खास नातं जुळलेलं आहे. ते आपल्या कामाशी आणि जीवनाशी प्रामाणिक आहेत. त्यांची हिंदी चित्रपटाविषयीची समज एखाद्या द्रष्ट्यापेक्षा कमी नाही. एप्रिल ते ऑक्टोबर १९९८ दरम्यान मी त्यांच्या जुहू इथल्या घरातील स्टडीरूममध्ये अनेक विषयावर तासनतास गप्पा मारल्या आहेत. त्यांची पत्नी शबाना आजमी जेव्हा आम्हास जेवणाची आठवण करून देई, तेव्हाच आम्ही थांबत असू. जावेद अख्तर यांच्याशी गप्पा मारणं हा माझ्यासाठी आनंदाचा भाग होता आणि त्या गप्पांचा मला खूप फायदाही झाला.
नसरीन मुन्नी कबीर : गप्पा चांगल्या रंगल्या असं कधी म्हणता येतं आणि अशा गप्पांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असतं?
जावेद अख्तर : गप्पांचे तीन स्तर आहेत : लोक, घटना आणि विचार. सगळ्यात खालच्या स्तरावरच्या गप्पा या लोकांच्या बाबतीतल्या असतात. जेव्हा आपण त्याच्या वरच्या स्तरावर जातो तो स्तर घटनांबद्दलचा असतो. याचा परीघ लोकांच्या बाबतीत आपण जे बोलतो, त्यापेक्षा थोडा मोठा असतो. पण सगळ्यात महत्त्वाच्या गप्पा त्याच ज्यात विचारांसंबंधी बोललं जातं. कारण विचार हे सार्वभौमिक आणि देश-काल यांच्या सीमारेषा, ओलांडून जाणारे असतात.
नसरीन मुन्नी कबीर : तुम्ही ‘फिल्मी डायलॉग’ आणि गप्पा यातलं अंतर कसं स्पष्ट कराल?
जावेद अख्तर : आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की, ‘फिल्मी डायलॉग’साठी वेळेचं बंधन असतं. आम्ही ‘ए’ पासून ‘झेड’ पर्यंत सर्व काही नव्वद मिनिटांत सांगावं असं बंधन असतं. एक प्रकारची मर्यादा आहे ही. हे म्हणजे असं आहे की, तुम्हाला भाषण द्यायचंय किंवा वाद-विवादात भाग घ्यायचाय आणि तुम्हाला तुमचं म्हणणं सहा मिनिटात मांडायचंय. चित्रपटामध्ये संपूर्ण कथा सांगण्यासाठी आमच्याजवळ ९० मिनिटं आहेत. म्हणून आम्ही जास्त शब्दांचा वापर करू शकत नाही. बिली विल्डर यांनी खूप छान म्हटलंय की, ‘फिल्मी डायलॉग हे एखाद्या गरीब माणसाने टेलिग्राम लिहावा तसे लिहायला हवेत.’ पण कधी कधी तुम्हाला ‘भाषणबाजी’ही करावी लागते. विशेषत: भारतीय सिनेमात तरी याची खूप आवश्यकता असते. ही स्क्रिप्ट आणि चित्रपट या दोन्हींची ही गरज आहे. पण मी ‘फिल्मी डायलॉग’ला संशोधित आणि निर्देशित गप्पा मानतो. तुम्ही भरकटून जाता कामा नये. चांगले ‘फिल्मी डायलॉग’ हे गप्पांसारखे नसतात. तर त्या एक प्रकारे प्रातिनिधीक स्वरूपाच्या गप्पा असतात.
नसरीन मुन्नी कबीर : ज्या गप्पांना तुम्ही ‘डायलॉग’मध्ये रूपांतरीत केलं, अशा गप्पा तुम्हाला आठवताहेत?
जावेद अख्तर : हो. मी असं केलंय. मी खरोखरीच्या गप्पा, म्हणी, वाक्प्रचार, बोलण्याची ढंग, पॉजेस, वाक्यांची रचना, त्याचं वैशिष्ट्य इत्यादीतून माझा कच्चा माल उचलला आहे. प्रत्येकाचा बोलण्याचा ढंग, बसण्याची पद्धत आणि चालण्याची पद्धत वेगवेगळी असते. तसंच बोलताना एखादा एका विशिष्ट शब्दांवर जोर देतो, तर दुसरा वेगळ्याच शब्दावर जोर देतो. प्रत्येक व्यक्तीची वाक्यरचना वेगळी असते. मी एखादी गोष्ट कशी व्यक्त करतो? एक वाक्य घ्या. आणि ते तीन लोकांना बोलायला सांगा. तिघंजण ते वेगवेगळ्या तऱ्हेनं बोलतील. एक संवेदनशील संवाद लेखक या गोष्टीची नोंद घेईल. तो जेव्हा ‘डायलॉग’ लिहीत असतो, तेव्हा कोणतं पात्र कसं बोलेल याचा निर्णय घेतो. तो एखादा ‘डायलॉग’ विशिष्ट प्रकारे ‘पॉज’ देऊन, जोर देऊन तयार करतो.
नसरीन मुन्नी कबीर : म्हणजे ‘डायलॉग’ हे चित्रपटातलं पात्र समजून घेण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. त्यांच्या बोलण्याच्या ढंगावरून आपल्याला त्या पात्राबद्दल काही गोष्टी समजतात. म्हणजे ते पात्र कोणत्या शब्दांचा वापर करतंय वगैर वगैरे.
जावेद अख्तर : माझं असं म्हणणं आहे की, शब्द हे माणसांप्रमाणेच असतात. तुम्ही लक्षपूर्वक त्याची निवड करा. तुम्ही इथं बसलेले आहात. दरवाजा उघडा आहे. एक माणूस आत आला. तो आत आल्यावर तो कसा दिसतो. या गोष्टीची पहिल्यांदा तुम्ही नोंद घेता. त्यानंतर त्याच्याशी तुमची ओळख करून दिली जाते. तुम्हाला कळतं की, तो इंजिनियर आहे किंवा चार्टर्ड अकाऊंटंट आहे. तो बसतो आणि तुम्ही त्याच्याशी बोलू लागता. लवकरच तुम्हाला काही ‘कॉमन’ गोष्टी लक्षात येतात. तो इंजिनियर आहे, म्हणजे तो एका विशिष्ट वर्गातून आला आहे, आणि तो अमक्या तमक्या शहरातून आला आहे... अच्छा! तो तुमच्या चुलत भावाच्या मित्राला ओळखतोय... वगैरे वगैरे. तुम्ही एक प्रकारे त्याच्याशी संबंध प्रस्थापित करता.आणि मग तुम्ही त्याला एका ‘स्लॉट’ मध्ये, वर्गामध्ये टाकता किंवा टाकण्याचा प्रयत्न करता. अशा प्रकारे तुम्ही असा एखादा शब्द घ्या... जो शब्द तुम्हाला परिचयाचा नाहीये. तुम्हाला त्या शब्दांपासून जो ध्वनी निर्माण होतो तो प्रथम ऐकू येतो... मग त्याचा अर्थ तुमच्या लक्षात येतो. शब्दांचा कोश, ‘डिक्शनरी’ तुम्हाला त्याचा अर्थ सांगते. त्या नंतर तो शब्द कोणत्या व्यवसायातून आला आहे हे तुम्हाला समजतं... ‘डिक्शनरी’ तुम्हाला ‘त्या’ शब्दाचा पेशा सांगते. म्हणजे ‘या’ शब्दाचा अर्थ असा असा आहे... याचं हे हे काम आहे. पण गोष्ट एवढ्यावरच संपत नाही. या शब्दांचे अनेक अर्थ असतात. ‘असोसिएशन्स’ असतात. तुम्ही विचार करू लागता की, हा शब्द आपल्याला पहिल्यांदा कुठे भेटला? त्याच्या बरोबर येणारे शब्द म्हणजेच त्याचे मित्र कसे आहेत? हा आला कुठून? हा कोणत्या तर्हेची मूल्य प्रस्थापित करतोय? चांगल्या संवाद लेखकाला तीन गोष्टींचं भान ठेवावं लागतं.... एखादा शब्द वापरण्यापूर्वी... त्या शब्दाचा ‘फिजिकल अॅपियरन्स’, तो कोणत्या व्यवसायातून आला आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या ‘मनात’ कोणत्या भावना जागृत होतात?
नसरीन मुन्नी कबीर : जेव्हा तुम्ही वयाने वाढत होतात, तेव्हा तुमच्यावर कुणाचा जास्त प्रभाव पडला? चित्रपटांचा की पुस्तकांचा?
जावेद अख्तर : पुस्तकांचा. फक्त पुस्तकांचा. जेव्हा मी मोठा होत होतो, तेव्हा मी फार ‘चित्रपट’ पाहिले नाहीत. पुस्तकं खूप सहज उपलब्ध होत असत. आणि घरात पुस्तकं वाचण्याची परंपरादेखील होती. सगळे वाचत होते. घरात खूपशी पुस्तकं आणि नियतकालिकं होती. लोक ती वाचून झाल्यावर त्यावर चर्चा करत असत. मीदेखील खूप वाचत होतो. तसंही चित्रपट महाग होते. महिन्यात जास्तीत जास्त दोनच चित्रपट पाहता येत असत. खरं म्हणजे दोन कुठले एकच. पण पुस्तकं आम्ही वाटेल तितकी वाचू शकत होतो.
नसरीन मुन्नी कबीर : ही पुस्तकं इंग्रजी होती, उर्दू होती की हिंदी होती?
जावेद अख्तर : मी जास्त करून उर्दू पुस्तकंच वाचत असे. मला आठवतंय मी इंग्रजी पुस्तक वयाच्या १५व्या वर्षी पहिल्यांदा वाचलं होतं.
नसरीन मुन्नी कबीर : तुम्हाला त्याचं नाव आठवतंय?
जावेद अख्तर : ते पुस्तक ख्वाजा अहमद अब्बास यांचं ‘इन्कलाब’ हे होतं.
नसरीन मुन्नी कबीर : इतक्या कमी वयातल्या मुलासाठी ही कौतुकाची गोष्ट आहे.
जावेद अख्तर : मी जेव्हा १३ वर्षांचा होतो तेव्हा मी गॉर्की यांच्या ‘मदर’ म्हणजे ‘आई’ या कादंबरीचा उर्दू अनुवाद वाचला होता. मी १५ वर्षांचा असताना गोगोल, चेस्कॉव्ह आणि पुश्कीन उर्दूमधून वाचले होते.
नसरीन मुन्नी कबीर : तुम्हाला त्यांचं जग वेगळंच वाटलं होतं की परिचित?
जावेद अख्तर : मी तेव्हा समजत नसताना पानामागून पानं वाचत असे आणि आजही असंच करतो. माझं असं मत आहे की, मी वाचत गेलो तर मला ते समजूही लागेल. तर तुम्ही असंही म्हणू शकता की माझी एकाग्रता चांगली होती.
नसरीन मुन्नी कबीर : यावरून असं लक्षात येतं की तुमच्या मनात जिज्ञासा आहे.
जावेद अख्तर : मी कितीतरी अशी पुस्तकं त्यावेळी वाचली, त्याचा अर्थ मला खूप नंतर समजला. मी शेर ओ-शायरी खूप वाचत असे. आणि सगळं माझ्या लक्षातही राहत असे. कादंबऱ्याही खूप वाचत असे. विशेषत: बंगाली साहित्य. त्यावेळी खूपसं बंगाली साहित्य उर्दूमध्ये उपलब्ध होतं. त्याकाळी उर्दूतले मोठे मोठे लेखकही अस्तित्वात होते. उदा. कृश्न चन्दर, राजिन्दर सिंह बेदी, इस्मत चुगताई आणि मंटो. अर्थात मंटोचं साहित्य मला त्या काळात वाचू देण्यात आलं नाही. मी कॉलेजमध्ये गेल्यावर मंटो वाचला. मंटोचं साहित्य वाचण्यावर बंधनं होती.
नसरीन मुन्नी कबीर : का?
जावेद अख्तर : कारण मंटो ‘सेक्स’च्या संबंधित विषयांवर लिहीत होता.
नसरीन मुन्नी कबीर : हे वाईट समजलं जायचं?
जावेद अख्तर : खरं म्हणजे तो वाईट होताच (हसतात) म्हणून मंटो मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो, तेव्हा वाचला. मी कृश्न चन्दर यांचा खूप मोठा फॅन होतो. एखादा तरुण, फिल्मस्टारचा फॅन असतो तसाच.
नसरीन मुन्नी कबीर : तुम्ही त्यांना कधी भेटला होतात?
जावेद अख्तर : मुंबईला आल्यावर मी त्यांना भेटलो होतो. आम्ही खूप जवळ आलो होतो. आम्ही मित्र झालो असं मी म्हणणार नाही. कारण ते वयाने माझ्यापेक्षा खूप मोठे होते. पण मी त्यांच्या खूप जवळ गेलो होतो.
नसरीन मुन्नी कबीर : तुम्ही ज्या व्यक्तीला तुमच्या मनात खूप उंच जागेवर नेऊन बसवलंय त्याला भेटणं तुम्हाला योग्य वाटेल का?
जावेद अख्तर : का नाही? हो कधीकधी तुम्ही निराशही होऊ शकता. पण असं होणंही स्वाभाविकच आहे. जर तुम्ही दुरूनच एखाद्याचा आदर करू लागलात तर तुम्ही तुमच्या मनात त्याची प्रतिमा तयार करता. त्यावरचं तुम्ही प्रेम करू लागता. पण लौकरच अशी वेळ येते की तुम्ही त्या व्यक्तीवर नाही, तर त्याच्या प्रतिमेवर प्रेम करू लागता. जी प्रतिमा तुमच्या मनात तुम्ही तयार केलीय आणि ही जी प्रतिमा आहे ती तुमच्या ‘फॅन्टसिज’चाच विस्तार असतो. ही प्रतिमा दुसऱ्या कुणाची नसून तुमची स्वत:ची प्रतिमा असते. ही एक प्रकारे आत्मरती आहे. स्वत:वर प्रेम करण्यासारखं आहे. (हसतात) तुम्ही त्या व्यक्तीला विसरून जाता. जर तो माणूस तुमच्या आकांक्षावर खरा उतरला नाही तर तुम्हाला निराशा येते. पण हे ठीक नाही. जर तुम्ही खरोखरच मोठे झालेले आहात, समजूतदार आहात, तुम्हाला काय करायचं आहे हे ठरलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की, कुणीतरी तुमच्या ‘फॅन्टसी’चा भाग असू शकत नाही. तो दुसरा कुणीतरी वेगळाच असतो.
नसरीन मुन्नी कबीर : तुम्ही तुमच्या तरूणपणी इतर कोणते लेखक वाचले?
जावेद अख्तर : इब्ने सफी, तो खूप छान लेखक होता. त्याची लिहिण्याची शैली, त्याची शब्दांची निवड, त्याचा ‘सेंस ऑफ ह्यूमर’ सगळं काही अजब होतं. त्याला जो मान मिळायला हवा होता तो मान, ते स्थान त्याला उर्दू साहित्यिकांनी, समीक्षकांनी दिलं नाही. ही दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. ही एक सांस्कृतिक ‘असुरक्षा’ आहे. ज्यामुळे आम्ही कलेच्या पारंपरिक कल्पनेपेक्षा वेगळं काही करणार्यांचं कौतुक करत नाही. आमच्यात तेव्हढी हिंमतच नाहीये. ही हिंमत सत्यजित राय यांच्यात होती. त्यांनी ‘शोले’चं कौतुक केलं होतं. नाहीतर बहुतेक समीक्षक तो चांगला चित्रपट आहे असं म्हणायला घाबरत होते. यामुळेच मला वाटतं की, आशिया खंडात चार्ली चॅप्लिन निर्माण होऊ शकला नाही, पुढेही होणार नाही. हे शक्यच नाहीये.
नसरीन मुन्नी कबीर : का?
जावेद अख्तर : कारण विनोद हादेखील सन्मान देण्याजोगा असतो हे तुम्हाला कबूल करावं लागेल. खरं म्हणजे ‘विनोद’ ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आपल्याकडे विनोदी साहित्याकडे किंवा कलाकृतीकडे ती खालच्या दर्जाची आहे असं का पाहिलं जातं हेच मला समजत नाही. आपल्याला विनोद हा निकृष्ट दर्जाचा वाटतो. मला वाटतं की, आपण आनंदाला, सुखाला नाकारतो आहोत. त्यापासून स्वत:ला वंचित ठेवतो आहोत. (हसतात) आपण असा विचार करतो की, जे लोकांना आनंदी बनवतं किंवा सुख देतं ते अनैतिक असणार किंवा कमी प्रतीचं असणार. ज्या गोष्टीबद्दल आदर व्यक्त केला जातो, त्या गोष्टीचं आपल्याला कौतुक असतं. कित्येक वेळा ती गोष्ट फारशी आनंद देणारी नसतेही. कंटाळवाणी असण्याचीच शक्यता असते. असं का होतं हे मला समजत नाही.
नसरीन मुन्नी कबीर : पण इब्ने सफीचा विनोद कोणत्या प्रकारचा होता? तो उपरोधिक स्वरूपाचा होता का?
जावेद अख्तर : नाही. तो जेम्स हेडली चेस किंवा अर्ल स्टेनली गार्डनर यांच्यासारखे थ्रिलर लिहित असे. पण माझ्या माहितीप्रमाणे ते पहिले असे लेखक होते की त्यांच्या लिखाणात Western Sophisticationच्या बरोबरीनं उर्दू भाषेतलं सौंदर्यही होतं... श्रीमंतीही होती. त्यात अमेरिकन नॉव्हेलमध्ये जे ‘अंडरस्टेटमेंट’ आणि ‘स्क्रिस्पनेस’ हे गुण असतात ते गुण त्यांच्या लिखाणातही होते.
न.मु.क. : पण अमेरिकन कादंबरीत जे प्रवाहीपण असतं ते त्यांच्या कादंबरीत असे?
जावेद अख्तर : हो कमालीचं प्रवाहीपण त्यांच्या लिखाणात असे आणि इब्ने सफी हे लोकांच्या पसंतीस उतरलेले लेखक होते. लाखो लोक त्यांचे वाचक होते. ते ‘जासूसी दुनिया’ या नावाची एक मालिका लिहित. इब्ने सफी इलाहाबादचे होते. मी त्यांना कधी भेटलो नाही. पण त्यांना ओळखणार्या लोकांशी माझी ओळख होती. ते नंतर कराचीला गेले आणि आता तर ते या जगात नाहीत. त्यांची पुस्तकं वाचूनही मला कित्येक वर्ष झाली आहेत.
न.मु.क. : त्यांची पात्रं मोठ्या शहरात हेरगिरी करणारी होती?
जावेद अख्तर : हो. ती दोन हेरांची एक टीम होती. कर्नल फरीदी आणि कॅप्टन हमीद. (हसतात) कर्नल अहमद कमाल फरीदी. ते असं काही पात्रं होतं की विचारू नका. त्यांचे खलनायकही वैशिष्ट्यपूर्ण असत. इब्ने सफी यांना पात्रांची नावं ठेवण्यात नैपुण्य प्राप्त होतं. ज्यांनी इब्ने सफी यांचं साहित्य वाचलेलं आहे ते त्यांच्या पात्रांची नावं कधीही विसरणार नाहीत.
न.मु.क. : नावात काय वैशिष्ट्य होतं?
जावेद अख्तर : ती विचित्र असत. एक चिनी व्हिलन होता. त्याचं नाव चिंग असंच होतं. गार्सन नावाचा एक पोर्तुगीज व्हिलन होता. ही ६०-७० च्या दशकातली गोष्ट आहे. त्यांचं अजून एक इंग्रजी पात्र होतं. जो हिंदुस्थानात येतो आणि योगा वगैरेच्या फंदात पडतो. त्याचं नाव गेराल्ड शास्त्री असं होतं. (न.मु.क. हसतात) इब्ने सेफीने एक वेगळचं विश्व निर्माण केलं होतं. हळूहळू तुम्हाला त्यांच्या पात्राचा परिचय होत जातो. आणि ते जिथे वावरतात त्या जागाही परिचयाच्या होत जातात.
न.मु.क. : त्यांच्या कथा कुठे घडतात? कोणत्या शहरात?
जावेद अख्तर : एका काल्पनिक शहरात. पण वाचक लौकरच त्या शहरातल्या गल्लीबोळांना ओळखू लागतो. खरं म्हणजे कर्नल अहमद कमाल फरीदी हे शाही खानदानाशी संबंधित होते. पण त्यांना काहीतरी काम करायचं होतं म्हणून ते ‘जासूस’ बनले. त्यांना कर्नल ही पदवी ऑनररी मिळालेली होती. कर्नल फरीदी यांची एक मोठी लायब्ररी होती. ते एंथ्रोपोलोजिस्टही होते. ते श्रीमंत गृहस्थ होते. त्यांचं मोठं घर होतं आणि कितीतरी कुत्री त्यांनी पाळलेली होती. ते सापांचे शौकीन होते आणि त्यांच्या घरी खूप साप होते. ते जगातली प्रत्येक भाषा बोलू शकत होते. खरंच अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं ते पात्र होतं.
न.मु.क. : एक ड्रीमर म्हणजे स्वप्न बघणारा, एक एडव्हेन्चरर म्हणजे धाडसी असा माणूस.
जावेद अख्तर : शेरलॉक्स होम्स आणि जेम्स बाँड यांचं एकत्रित रूप होतं. त्यांचे चाहतेही खूप होते.
न.मु.क. : तुम्ही इतक्या कादंबऱ्या वाचल्यात, त्यातल्या एखाद्या कादंबरीवर चित्रपट लिहावा असं कधी वाटलं नाही?
जावेद अख्तर : (थोडा विचार करून) मी कधी याविषयी विचार केला नाही. एक मिनिट (थोडं स्वत:शीच पुटपुटत) मला लेखकाचं नाव आठवत नाही. पण मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी एक कादंबरी वाचली होती. तिचं नावं होतं. ‘इफ आय फॉरगेट दी’ मला त्या कादंबरीनं प्रभावित केलं होतं. त्यात रोमन कुळातलं येरूशलम दाखवलं होतं. रोमच्या बाहेरच्या भागात राहणाऱ्या एका तरुणाची आणि त्याच्या आंधळ्या बापाची ती कथा होती. एके दिवशी बाप त्याला तो अर्धा रोमन अर्धा यहूदी आहे असं सांगतो. तो मुलगा येरूशलमच्या एका High Priestच्या मुलीवर प्रेम करत असतो. ती एक अतिशय नाट्यपूर्ण अशी प्रेमकथा होती. तो जेव्हा यहूदी बनण्याचा निर्णय घेतो. तेव्हा यहुदी त्याला विरोध करतात आणि रोमन म्हणूनही त्याला मान्यता नाकारण्यात येते. ती ‘बेनहर’ पेक्षाही चांगली कथा होती. यावर एक चांगला चित्रपट बनू शकतो असा माझा विचार होता.
न.मु.क. : एका चित्रपटापेक्षा पुस्तकाचा प्रभाव कसा असतो?
जावेद अख्तर : खरं तर मी वाचलेल्या पुस्तकांवर तयार करण्यात आलेले चित्रपट बघून माझी निराशाच झालेली आहे. पण साहित्यापेक्षा चित्रपट कमजोर मीडिया आहे असा याचा अर्थ नाही. खरं म्हणजे तुम्ही जेव्हा पुस्तक वाचत असता तेव्हा तुम्ही त्यात भाग घेत असता. जे चित्र तुमच्या मनात तयार होतं ते त्यातला तपशील आणि वाचकाच्या कल्पनाशक्तीच्या दरम्यानचं असतं. वाचक पुस्तकातला तपशील घेतो आणि आपल्या कल्पनेनं एक चित्र तयार करतो. त्यामुळे ते चित्र त्याच्यासाठी योग्यच असतं. या उलट चित्रपटात सगळं तयार मिळतं. त्याचा मेन्यू निश्चित असतो. तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या नाहीतर सोडून द्या. तुमचा चित्रपटात सहभाग नसतो. तुम्ही केवळ मूक प्रेक्षक असता. तुम्ही ‘ड्रॅकुला’ ही कादंबरी वाचा आणि मग चित्रपट पहा. चित्रपटात व्हिज्युअल्स आहेत, संगीत आहे, साऊंड इफेक्टस् आहेत, उलट कादंबरीत हे काहीही नाहीये. फक्त कागद आणि त्यावर लिहिलेले शब्द आहेत. पण असं असूनही जी भीती कादंबरी वाचताना तुमच्या मनात निर्माण होते ती भीती चित्रपटात सगळे इफेक्ट असूनही निर्माण होऊ शकत नाही. हाच फरक आहे दोन्ही माध्यमात आणि इथेच कादंबरी चित्रपटावर मात करते.
न.मु.क. : मला ‘द सायलेन्स ऑफ दी लॅम्ब्स’ ची आठवण येतेय. ही कादंबरी त्यावर बनलेल्या चित्रपटापेक्षा कितीतरी पटीनं भीतिदायक आहे.
जावेद अख्तर : अगदी खरंय. कारण तुम्ही जेव्हा वाचत असता तेव्हा तुम्हीच डायरेक्टर असता. तुम्हीच कॅमरामन असता आणि तुम्हीच एडिटर असता आणि तुम्हाला तुमचा चित्रपट चांगलाच वाटणार. (दोघेही हसतात) जेव्हा तुम्ही कादंबरी वाचत असता, तेव्हा तुम्ही स्वत:च कास्टिंग करता. स्वत:चं फ्रेम कम्पोजीशन नक्की करता. लोकेशन ठरवता. सेटदेखील तुम्हीच डिझाइन करता. मी असंही अनुभवलं आहे की, जेव्हा तुम्ही कादंबरी वाचत असता तेव्हा असं वाटतं की सेट तुम्ही रबराचे बनवता. तुम्ही एखाद्या सीनची कल्पना एका तऱ्हेने करता आणि त्याच लोकेशनवर घडणार्या दुसर्या सीनची कल्पना करताना सेटमध्ये तुमच्या सोयीने बदलही करता. तुम्हाला चित्रपटात ही सोय कुठे असते?
न.मु.क. : तुम्हाला तुमच्या लहानपणी पाहिलेला पहिला चित्रपट आठवतोय? तो चित्रपट तुम्ही कुठे पाहिला होतात? लखनौमध्ये?
जावेद अख्तर : मी जेव्हा पहिला चित्रपट पाहिला तेव्हा मी साधारण 3 वर्षांचा असेन. मी घरातल्या एका महिलेच्या मांडीवर बसलेलो होतो. आत्ता मला त्या चित्रपटातला फक्त एक सीन आठवतोय. मी लोकांना एका खास सीनबाबत प्रश्न विचारत होतो. मला खूप वर्षांनंतर कळलं की तो चित्रपट ‘नगीना’ होता. आणि त्यात नूतन आणि नासिरखान हे कलावंत होते. नूतनने जेव्हा या चित्रपटात काम केलं, तेव्हा त्या १४ वर्षांच्या होत्या. पण जो चित्रपट मला चांगला आठवतोय तो चित्रपट ‘आन’ होता.
न.मु.क. : हा मजेशीर योगायोग आहे की, मीदेखील सुरूवातीला जे चित्रपट पाहिल्याच आठवतंय त्यात महबुब खान यांचा ‘आन’ हा चित्रपट होता. मला अजून आठवतंय मी हा चित्रपट लंडनमध्ये पाहिला होता. पिवळ्या मोहरीच्या शेतातून निम्मी पळतेय असा ‘शॉट’ मला आजही आठवतोय. तुम्ही जेव्हा ‘आन’ पाहिलात तेव्हा तुमचं वय काय होतं?
जावेद अख्तर : मला पहिलीच्या वर्गात दाखल केलं होतं. त्याच दिवशी संध्याकाळी मी लखनौमधल्या वसंत टॉकीजमध्ये हा चित्रपट पाहिला होता. मी त्यावेळी सहा-सात वर्षांचा असेन. मी चित्रपट पाहण्यापूर्वी दिलीप कुमार यांचं नावं ऐकलं होतं. पण दिलीप कुमार कोण, ते दिसतात कसे हे आणि मी त्यांना पाहिलं आहे की नाही हे ही मला नीटसं माहिती नव्हतं. जेव्हा मी ‘आन’ पाहिला तेव्हा मला दिलीप कुमार कोण हे समजलं.
न.मु.क. : तुम्हाला तो चित्रपट पाहताना मजा वाटली होती?
जावेद अख्तर : तो एक मजेदार चित्रपट होता. त्यात घोडदौड, तलवारबाजी, गाणी हे सगळं काही होतं आणि दिलीप कुमार यांचा अभिनय खासच होता.
न.मु.क. : तुम्हाला चित्रपट हा प्रकार जादुई वाटत होता?
जावेद अख्तर : बेशक! जेव्हा मी छोटा होतो तेव्हाही माझ्यावर चित्रपटांचा जबरदस्त प्रभाव होता. आणि जेव्हा १२-१३ वर्षांचा होतो तेव्हा तर आपण फिल्मस्टार बनावं अशीच माझी इच्छा होती. लहानपणी मी खूप वाचत असे. आणि फिल्मी गाणीही खूप गात असे. मुन्नी, मला असं लक्षात आलंय की, आपण भविष्याचा विचार करून कोणतंही काम करत नाही असं कितीही म्हटलं तरी, अजाणतेपणी आपण स्वत:ला भविष्यासाठी तयार करत असतो. हा खूप लोकांचा अनुभव आहे. आयुष्यात मला दोन गोष्टींची खूप मदत झाली आहे. एकतर साहित्यात मला रूची होती आणि चित्रपटाबाबत तर माझी आवड वेडेपणाच्या हद्दीपर्यंत पोहोचलेली होती. या दोन्हीही वेडामुळे मला खूप मदत मिळाली आहे. खरं म्हणजे सिनेमाच्या ग्लॅमरनं मला खूपच थक्क केलेलं होतं.
न.मु.क. : चित्रपटांचा आपल्या देशातल्या लोकांवर खूपच प्रभाव आहे. तुम्ही मोठे होत असताना म्हणजे साधारणपणे ६०-७०च्या दशकानंतरही ही गोष्ट खरी होती?
जावेद अख्तर : ६० आणि ७०च्या दशकात लोक चित्रपटात खूप रस घेत असत. आणि ते एखादा चित्रपट पहात तेव्हा त्यावरची त्यांची प्रतिक्रिया खूप स्ट्राँग असे. त्या काळात चित्रपटांचे प्रकार ठळकपणे पाडले जात. म्हणजे त्या काळात स्टंट फिल्म्स् बनत, ज्यात माडिया, कामरान, रंजन, शेख मुख्तार आणि दारासिंग यांच्यासारखे कलावंत होते. त्या चित्रपटांचे प्रेक्षक खूप चंचल असत. जेव्हा ते एखादा अॅक्शन सीन पडद्यावर बघत तेव्हा खूप ओरडत, उड्या मारत आणि जेव्हा हिरो व्हिलनला मारत असे तेव्हा तर त्यांना खूप आनंद होत असे. आता तर हिंदुस्थानात स्टंट फिल्म असा काही वेगळा प्रकार नाहीच आहे.
न.मु.क. : त्यावेळी तुमच्या हृदयाला स्पर्श करेल असा कोणता चित्रपट तुम्ही पाहिलात?
जावेद अख्तर : ‘दो बीघा जमीन’ आणि ‘जागृती’. तुम्ही ‘जागृती’ बघितलाय?
न.मु.क. : नाही.
जावेद अख्तर : ‘जागृती’ ही फिल्मिस्तानची निर्मिती होती. आणि तो चित्रपट यशस्वीही झाला होता. त्यात अभिभट्टाचार्य यांनी एका शिक्षकाची आणि वॉर्डनची भूमिका केली होती. या चित्रपटाची कथा त्यांच्या देखरेखीखाली राहिलेल्या मुलांच्या प्रश्नांभोवती फिरत होती. या मुलांमध्ये काही मुलं खूप बंडखोर होती. काही खूप प्रेमाची भुकेलेली होती. तर काही गरीब होती.
न.मु.क. : तुम्हाला ‘जागृती’मधली कोणती गोष्ट आवडली?
जावेद अख्तर : त्यात माझ्या वयाची मुलं होती आणि त्यातल्या नायकाला समजून घेणारं कुणी नव्हतं, तो प्रेमाचा भुकेला होता. मला त्यांच्यात आणि माझ्यात साम्य आढळलं असावं. म्हणून तो चित्रपट मला आवडला असावा. त्या चित्रपटात जो शिक्षक होता तो पितृतुल्य आणि खूप चांगला माणूस होता. त्या वयात तुम्ही अशा पात्रांचा खूप आदर करता. मला ते वातावरण खूप आवडलं. त्यात मुलं हॉस्टेलमध्ये एकमेकांबरोबर राहून खूप खेळत होती, चेष्टामस्करी करत होती. कुण्या गरीब कुटुंबातला मुलगाही होता. तो कुबड्यांच्या आधारे चालत होता. आणि दुसरा मुलगा ‘चलो चले माँ... ’असं गात होता. मी चित्रपट पाहून खूप रडलो होतो. मला ‘जाल’ हा चित्रपटही खूप आवडला होता.
न.मु.क. : गुरूदत्तचा ‘जाल’? १९५२मध्ये ‘जाल’ प्रदर्शित झाला त्यावेळी तुम्ही तो पाहिला होता? त्यावेळी तुम्ही खूप छोटे असणार.
जावेद अख्तर : नाही. मी तो त्या वेळी पाहिला नव्हता. मी तो नंतर अलिगढच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पाहिला होता. मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा मला कळलं की पहिल्या मजल्यावर एक फिल्म शो आहे आणि तिकीट होतं एक रूपया. (हसतात) मी कसंतरी तिकीट मिळवलं. खरं म्हणजे मला आठवतंय कुणीतरी मला ते खरेदी करून दिलं होतं.तर अशा तऱ्हेने मी तो चित्रपट पाहिला.
न.मु.क. : तुम्ही पाहिलेला गुरूदत्त यांचा तो पहिलाच चित्रपट होता?
जावेद अख्तर : कदाचित. ‘जाल’ या चित्रपटानं मला निश्चितच खूप प्रभावित केलं होतं. मला वाटतं की या चित्रपटापासून मला ‘निगेटिव्ह हिरो’ आवडू लागला. कारण माझ्यामध्येही एक बंडखोरपणा होता आणि ‘हे मला मंजूर नाही’ असं म्हणणारे लोक आपल्याला आवडतात. म्हणूनच आम्हाला क्रिमसन दी पाइरेट, रॉबिनहूड, फुलनदेवी, मानसिंग यासारखे डाकू वगैरे आवडतात. हे लोक ‘जाल’ चित्रपटातल्या टोनीसारखेच आहेत. तो एक गुंड स्मगलर होता. त्याकाळी भारतीय सिनेमात अॅन्टी हिरो हा फारसा नव्हताच. पण जर आज तुम्ही म्हणालात की हिरो एक स्मगलर आहे तर ते ‘क्लीशे’ होईल. या कल्पनेचं नाविन्य आता लोप पावलेलं आहे. आणि लोक म्हणतील ‘ओ हो, पुन्हा एकदा!’ माझ्या मते ‘जाल’ अपयशी ठरला होता. पण तो चित्रपट काळाच्या पुढे होता. त्यामुळे मी तो विसरू शकत नाही. टोनीचा रोल देव आनंदनं साकारला होता आणि टोनी नैतिकता, सभ्यता ह्याची बिलकूल पर्वा करत नव्हता. या आधी देव आनंदनं चित्रपटातून नेहमी चांगल्या माणसाची भूमिका निभावली होती. कधीतरी त्यानं खिसेकापूची किंवा दादाचीही भूमिका केलेली होती; पण त्या भूमिकेत तो कडवटपणा दाखवू शकत नसे. त्यांचे बहुतेक रोल ग्लॅमरस आणि वरवरचे होते. पण ‘जाल’ हा गुरूदत्तचाच चित्रपट होता आणि त्यांचा हीरो आपल्याला समाजानं चांगलं म्हणावं अशी अपेक्षाच करत नव्हता. चित्रपटाच्या शेवटी टोनीला पश्चाताप होतो असं दाखवलं होतं. पण खूपच उडत उडत. आपल्याला वाचवण्यासाठी तो ज्या मुलीवर प्रेम करतोय त्या मुलीला गोळी मारत नाही एव्हढंच आपल्याला दिसतं.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment