‘जय मम्मी दी’ : प्रसंगांमागून प्रसंग सरत राहतात, ना चित्रपट रंजक ठरतो, ना खिळवून ठेवतो!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘जय मम्मी दी’चं पोस्टर
  • Sat , 18 January 2020
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie जय मम्मी दी Jai Mummy Di Navjot Gulati Sunny Singh Sonnalli Seygall Poonam Dhillon Supriya Pathak

शत्रुत्व असलेल्या कुटुंबांतील मुलांनी प्रेमात पडणं ही संकल्पना अर्थातच बॉलिवुडला नवीन नाही. उदाहरणादाखल सांगायचं झाल्यास मन्सूर खानच्या ‘कयामत से कयामत तक’पासून (१९८८) ते प्रियदर्शनच्या ‘हलचल’पर्यंत (२००४) अगदी टोकाच्या चित्रपट प्रकारांमध्ये ही संकल्पना समोर आलेली आहे. ‘जय मम्मी दी’मध्येही इथले नायक-नायिका एकमेकांच्या प्रेमात आहेत, मात्र त्यांच्या आया एकमेकीच्या शत्रू आहेत. चित्रपटभर सांगितलं जातं त्यानुसार या दोघी कॉलेजपासून भांडत आल्या आहेत नि आता लग्नानंतरही शेजारी शेजारी राहून हट्टानं भांडतात. अर्थात यामागे असलेलं कारण अगदीच उथळ आणि अतार्किक असतं. चित्रपटकर्त्यांच्या दृष्टीनं विनोदी असणं अपेक्षित असलेला नवजोत गुलाटी लिखित-दिग्दर्शित ‘जय मम्मी दी’ कदापिही विनोदी नाही. इथं फक्त विनोदनिर्मितीचे असफल प्रयत्न दिसतात. हा चित्रपट इतका अविनोदी आणि कंटाळवाणा आहे की, साजिद खानचा ‘हाऊसफुल २’ यापुढे चित्रपटनिर्मितीचा उत्कृष्ट नमुना वाटू लागतो. 

लाली (सुप्रिया पाठक) आणि पिंकी (पूनम ढिल्लन) या अनुक्रमे पुनीत (सनी सिंग) आणि सांझ (सोनाली सेगल) या दोघांच्या आया. त्यांची ही मुलं आणि दोघींचे पती त्यांना दबकून असल्यानं त्यांच्यापुढे काहीच बोलत नसतात. त्यामुळेच गेली काही वर्षं पुनीत आणि सांझमधील प्रेमसंबंध इतरांसमोर दोन्ही कुटुंबांतील वादाचं पांघरूण ओढून सुरू असतात. चित्रपटभर ना एकाही पात्राची वाढ होते, ना त्यांचा भावनिक, मानसिक प्रवास होतो. प्रसंग जरूर बदलतात, पण त्यांचे स्वभावविशेष सुरुवातीला असतात तसेच राहतात. एकतर इथली दोन्ही पात्रं प्रेमात असल्याचं केवळ सांगितलं जातं, ते प्रेम कधीच समोर दिसत नाही. कारण, जेव्हा पाहावं तेव्हा ती एकतर भांडत असतात किंवा मग नातं, नात्याची जबाबदारी यांपासून पळत तरी असतात. सांझ पुनीतला लग्नासाठी विचारते, तेव्हा तो परिस्थितीपासून पळ काढू पाहतो; तर पुनीत सांझला विचारतो तेव्हा तीही हेच करते. पुढे जाऊन दोघांचं वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न ठरतं, तेव्हा दोघं एकत्र बसून त्यांच्यावर लादली गेलेली परिस्थिती स्वीकारत त्यांच्या आयांनी ठरवून दिलेल्या लोकांशी लग्न करायचं ठरवतात. त्यांचं प्रेम आहे असं गृहीत धरून चालायचं असतं, भलेही त्यांच्या कृतींमधून ते दिसलं नाही तरीही चालेल अशी चित्रपटकर्त्यांची अपेक्षा असावी.

‘कयामत से कयामत तक’ किंवा अगदी ‘हलचल’मधील एकमेकांसाठी काहीही करायला तयार असणारी जोडपी आणि इथले दोघे यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. हा फरक असणं-नसणं हा मुद्दा नसला तरीही त्यांचं प्रेम ज्या संदर्भात, विश्वात येतं किमान त्या संदर्भात तरी ते विश्वासार्ह वाटावं लागतं, जे इथं घडत नाही. 

हे विचित्र प्रेमी युगुल (?) आपापल्या (आयांना घाबरणाऱ्या) वडिलांच्या मदतीनं एकाच दिवशी एकाच स्थळी होऊ घातलेली त्यांची लग्नं मोडायचं ठरवतं. त्यांच्यात असणारा प्रेमाचा अभाव, चित्रपटात आणि पात्रांत असलेली आशयाची कमतरता प्रासंगिक विनोदाच्या, माध्यमातून भरली जाईल, अशी चित्रपटकर्त्यांची अपेक्षा असावी. उत्तरार्ध त्यांचे आणि दोघांच्या वडिलांच्या लग्न मोडण्याच्या विचित्र योजनांनी व्यापला जातो. प्रसंगांमागून प्रसंग सरत राहतात, ना चित्रपट रंजक ठरतो, ना खिळवून ठेवतो. इथं सगळं काही सोयीस्कररीत्या घडत राहतं. चित्रपटाच्या नावात आयांचा उदो उदो केला जात असला तरी प्रत्यक्ष चित्रपटात मात्र सुप्रिया पाठक आणि पूनम ढिल्लनची पात्रं दुर्लक्षित राहतात. सनी सिंग आणि सोनाली सेगल अभिनयाबाबत ढिम्म असल्यानं त्यांच्या खांद्यावर चित्रपट तरणं म्हणजे जरा अवघडच. 

हितेश सोनिक हा त्याच्या कर्णकर्कश्श अशा पार्श्वसंगीतानं सदर चित्रपट अधिक उथळ आणि असह्य बनवण्यास हातभार लावतो. तनिष्क बागची आणि इतर लोकांची पंजाबी ढंगाची गाणीही तितकीच कर्कश्श आहेत. नवजोत गुलाटीचं लेखन-दिग्दर्शन असंबद्ध, विस्कळीत आणि प्रभावहीन आहे. ते तसं का आहे याचं उत्तर चित्रपटाच्या ढिसाळ मांडणीत आणि आशयाचा अभाव असणाऱ्या कथानकात आहे. इथले प्रासंगिक विनोद विनोदी नाहीत, आणि इतर अनेक विनोद हे थेट समस्यात्मक आणि आक्षेपार्ह आहेत. उदाहरणार्थ, पुनीत हे पात्र त्याचं दुसऱ्या कुणाशी तरी होत असलेलं लग्न टाळण्यासाठी तो समलैंगिक असल्याचं खोटं सांगतो, ज्यावर समोरील स्त्री त्याला उद्युक्त करत एका रात्रीत विषमलैंगिक बनवण्याची भाषा करते, असे इथले विनोद! इथल्या आक्षेपार्ह बाबी, पंजाबी कुटुंबाभोवती फिरणारं कथानक, इथली एकूणच भडक दृकश्राव्य मांडणी ही सदर चित्रपटाचा सहनिर्माता असलेल्या ‘प्यार का पंचनामा’ फेम लेखक-दिग्दर्शक लव रंजनच्या नावाला शोभणारी आहे. 

‘जय मम्मी दी’ मुळातच कमी लांबीचा असला तरीही तो इतका कंटाळवाणा आहे की, त्याची पावणे दोन तास इतकी लांबीही अधिक वाटू लागते. मुळात हा चित्रपटच आळशी चित्रपटनिर्मितीचा एक नमुना आहे. इथं चित्रपटनिर्मितीचे पुरातत्त्वकालीन साचे वापरून त्यांस सध्या चलतीत असलेल्या पंजाबी पार्श्वभूमीवर घडणाऱ्या हिंदी चित्रपटांचा, गाण्यांचा मुलामा दिला गेलेला आहे. ‘जय मम्मी दी’ पाहण्याचं कुठलंही तार्किक कारण सांगता येणार नाही, तो न पाहण्याची कारणं मात्र अनेक असतील. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......