काल जेएनयूमध्ये कुणी हिंसाचार केला?
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयुषा घोष आणि तोडफोडीची दृश्यं
  • Mon , 06 January 2020
  • पडघम देशकारण जेएनयू JNU अभाविप ABVP

काल रात्री जेएनयूमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात प्रवेश करून तेथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना बेदम मारहाण केली. त्यात जवळपास २५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. चेहऱ्यावर रुमाल बांधून व हातात दंडुके, रॉड घेऊन या कार्यकर्त्यांनी मुला-मुलींच्या वस्तीगृहात घुसून मारहाण केली. त्यांच्या खोल्यांची नासधूस केली. रस्त्यावरून धुमाकूळ घालत असताना ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘आरएसएस जिंदाबाद’ यासारख्या घोषणा ते देत होते, असे एका विद्यार्थिनीने एनडीटीव्हीच्या वार्ताहरांना सांगितले. त्याचबरोबर गेटवर पोलीस असताना, त्यांच्या संमतीने जेएनयु कॅम्पसमध्ये त्यांना सोडण्यात आले. याचा अर्थ जेएनयू प्रशासन, पोलीस यंत्रणा, अभाविप यांच्या संगनमताने हा पूर्वनियोजितपणे हल्ला केलेला होता, हे सिद्ध होते. पण एनडीटीव्ही वगळता इतर प्रसारमाध्यमांतून, जेएनयू प्रशासनाकडून तसेच पोलीस यंत्रणेकडून हा विद्यापीठातील दोन विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष आहे, असे स्वरूप या गुंडगिरीला देण्यात येत आहे.

कोणत्याही कारखान्यात आपल्या न्याय हक्कासाठी कामगार विरुद्ध मालक असा संघर्ष चालू असताना मालकलोक कारखान्यातील काही कामगारांना हाताशी धरून एखादी नामधारी युनियन स्थापन करतात आणि तिच्या मार्फत, पोलिसांच्या मदतीने बहुसंख्य कामगारांची युनियन असलेल्या कामगारांवर हल्ले करून त्यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करतात. हा कामगार संघटनांचा नित्याचा अनुभव आहे. पण मालक व पोलीस यंत्रणा हा दोन युनियनमधील संघर्ष आहे, अशी बतावणी करत असतात. तसलाच हा प्रकार आहे.

खरं तर जेएनयूमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून तेथील फी वाढीच्या व इतर मागण्यांसाठी  प्रशासनाविरुद्ध शांततामय मार्गाने आंदोलन चालू आहे. पण प्रशासनाने या आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही. खरा संघर्ष जेएनयू व त्याचे प्रशासन यांच्यातच आहे. असे असताना प्रशासनाच्यावतीने, पोलिसांमार्फत अभाविपने हस्तक्षेप करून या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचाच भाग म्हणून विद्यार्थ्यांवर हिंसक हल्ला करण्यात आला आहे.

असाच हल्ला साधारण एक महिन्यापूर्वी जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर, तेथील वस्तीगृहात व तेथील वाचनालयात घुसून खुद्द पोलिसांनी केला होता. तेव्हापासून ते कॅम्पस आजपर्यंत बंद होते. आजच उघडणार, ते या जेएनयूच्या नवीन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर. तो हल्ला खुद्द दिल्ली पोलिसांनी केला होता. त्याला केंद्र सरकारचे पूर्ण पाठबळ होते, तर आताचा हल्ला त्याच दिल्ली पोलिसांच्या मदतीने अभाविप या संघटनेने केला आहे. जवळपास ५०च्या संख्येत असलेल्या गुंडांपैकी एकालाही पोलीस अद्यापपर्यंत अटक करू शकलेली नाही. त्यांच्या संरक्षणात त्यांना जसे कॅम्पसमध्ये सोडण्यात आले, तसेच त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्याचे चित्रणसुद्धा टीव्हीवर पाहायला मिळते.

या हल्ल्याचा निषेध विरोधी पक्ष संघटनांच्या नेत्यांनी तर केलाच आहे, पण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या हल्ल्याला आतून सहानुभूती असलेल्या सत्ताधारी पक्ष संघटनेच्या मंत्र्यांनी, पुढाऱ्यांनीसुद्धा केलेला आहे. विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास करावा, राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनू नये, असा मानभावी सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत.

खरे तर भाजप सत्तेत आल्यापासूनच जेएनयू व तत्सम विद्यापीठांच्या मागे हात धुवून लागली आहे. त्यांना कष्टकरी लोकांना उच्चशिक्षण देणारी ही विद्यापीठे बंदच पाडायची आहेत. पण आपल्या अस्तित्वासाठी चिवटपणे ही विद्यापीठे झुंजत आहेत. त्यात जेएनयू आघाडीवर आहे. ती सत्ताधाऱ्यांच्या डोक्यातील किरकिरच बनली आहे. येनकेनप्रकारे त्यांना हे विद्यापीठ बंद पाडायचे आहे. हा हल्ला त्याचाच एक भाग आहे. निदान अशा मारहाणीने तरी घाबरून जाऊन विद्यार्थी विद्यापीठ सोडून जातील, आई-वडील आपल्या अपत्त्यांना जिवाच्या भीतीने बोलावून घेतील, असे त्यांना वाटते.

अभाविप या संघटनेने विद्यापीठातील डाव्या संघटनांनीच हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे. त्यांचेही अकरा विद्यार्थी गायब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खरे तर यात जखमी झालेले सर्व डाव्या संघटनांचे विद्यार्थी आहेत. तेथील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयुषा घोष या एआयएसए या डाव्या संघटनेच्या आहेत. त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाला आहे. तेव्हा डाव्या संघटनांनी बाहेरून गुंड आणून आपल्याच कार्यकर्त्यांवर हल्ले केले?

या हल्ल्याच्या तीव्र प्रतिक्रिया देशभर उमटल्या आहेत. विविध शहरांतील अनेक विद्यापीठांतील विद्यार्थी आपापल्या ठिकाणी सनदशीर मार्गाने, शांततेने आंदोलने करत आहेत. सत्ताधारी पक्षाने सीएए व एनआरसी विरोधात जे देशभर आंदोलन चालू आहे, त्यावरून आपले लक्ष हटवून आता या प्रकरणाकडे वळवले आहे.

ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यात सत्ताधारी पक्ष माहीर आहे, हेच यातून सिद्ध होते!

.............................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......