मे-जून : सर्वाधिक वाचल्या गेलेल्या १० लेखांची झलक
संकीर्ण - वर्षाखेर विशेष
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 30 December 2019
  • संकीर्ण वर्षाखेर विशेष

मे २०१९

१) नरेंद्र मोदीच पुन्हा केवळ निवडून नाही, तर पुन्हा जिंकून येवोत! - श्रीकांत आगवणे

https://www.aksharnama.com/client/article_detail/3247

मोदी जिंकून यावेत! घसघशीत मतांनी निवडून येवोत!! माझ्या हातात नील चीझमन आणि ब्रिअन क्लास या प्रोफेसर दुकलीनं लिहिलेलं ‘How To Rig An Elction’ची प्रत आहे. निवडणूक आधी जिंकायची असते आणि मग निवडणुकीला उभं राहायचं असतं, अशा उदाहरणांनी या पुस्तकाची पानं भरली आहेत. सध्या लोकशाही हा जगभरातल्या हुकूमशहांना सत्तेवर येण्याचा ‘सरधोपट राजमार्ग’ आहे! उगाच का अमेरिका-युरोप ‘तेल’ देशांना ‘बऱ्याबोलानं वागा, नाहीतर लोकशाही निर्यात करू‘ अशी धमकी देतात!! 

सिंगापूरच्या च्युइंगमवर बंदीचं कौतुक असलेल्या आणि तरीही त्या मुर्दाड हुकूमशाहीला पाहू न शकणाऱ्या भारतीयांसाठी मोदींनी परत यायला हवं! पाकिस्तानच्या इमरान खाननं मोदींची जाहीर चुम्माचाटी करूनही ज्यांना अणुबॉम्ब वापरायची खुमखुमी आहे, त्यांच्यासाठी ‘राजे, तुम्ही परत या’च्या चालीवर ‘मोदी, तुम्ही परत या!!’ 

२) इम्तियाज जलील निवडून आल्यामुळे सर्वांचे चेहरे उतरले आहेत? - जीवन नवगिरे

https://www.aksharnama.com/client/article_detail/3311

इम्तियाज जलील मुस्लीम आहेत, हा जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर त्याला तुमची पूर्वग्रहदूषित विचारधारा जबाबदार आहे. मुसलमान म्हटले की, आपल्यात अस्वस्थतेची भावना निर्माण होत असेल तर त्याला आपला मुस्लीमद्वेष जबाबदार आहे. मुस्लीम असल्याने त्यांच्या देशभक्तीवर शंका घेणे, ते हिंदूविरोधीच असतील असा विचार करणे, हे आततायीपणाचे लक्षण आहे. ही पूर्वग्रहदूषित नजर बदलणे गरजेचे आहे. वैयक्तिक पूर्वग्रह नेहमी सत्य अस्पष्ट करून टाकतात!

३) आंबेडकर विरुद्ध आंबेडकर? - प्रज्वला तट्टे

https://www.aksharnama.com/client/article_detail/3296

१५ मे रोजी नागपुरात अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पूर्व-निष्ठावंतांनी पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या भाजप-संघाला मदत करण्याच्या ऐतिहासिक चुकीत ते सहभागी नसल्याचा खुलासा केला आहे. वर्तमानपत्रांनी या पत्रपरिषदेला चांगली प्रसिद्धी दिली.

या परिषदेत प्रसारित केलेल्या पत्रकात लिहिले आहे की, ‘बाळासाहेब आंबेडकरी जनतेला सत्ता स्थापनेचे स्वप्न दाखवून फक्त स्वहितासाठी त्यांची मते कुजवण्याचे काम करत आहेत.’ अ‍ॅड. आंबेडकरांचे हे कारस्थान वर्षभरापासून लक्षात आल्यामुळे ही पूर्वीची निष्ठावंत मंडळी अस्वस्थ होती व आपसात चर्चा करत होती. एका प्रश्नाच्या उत्तरात मिलिंद पखाले - जे पत्रकावर सही करणाऱ्यांपैकी एक आहेत – यांनी सांगितले की, “आमच्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नुकसान झाले असे असा कुणाचा गैरसमज होऊ नये म्हणून आज १५ मे रोजी, लोकसभेच्या मतदानाच्या बहुतांश फेऱ्या संपल्यावर आम्ही आमची अस्वस्थता उघड करत आहोत.”

४) २०१९च्या निवडणुकीत मीही हरलो आहे का? - रवीश कुमार

https://www.aksharnama.com/client/article_detail/3318

२०१९चा जनादेश माझ्याविरुद्ध कसा गेला? मी गेली पाच वर्षं जे लिहिलं, बोललो ते कसोटीला लागलं होतं? ज्या लाखो लोकांचं दु:ख आम्ही दाखवलं ते चुकीचं होतं? मला माहीत होतं की, तरुण, शेतकरी आणि बँकांमध्ये गुलामासारखं काम करणारे लोक भाजपचे समर्थक आहेत. तेही कधी माझ्याशी खोटं बोलले नाहीत. सर्वांनी सुरुवातीला किंवा नंतर कबूल केलं होतं की, ते नरेंद्र मोदींचे समर्थक आहेत. पण त्यामुळे मी त्यांच्या समस्या दाखवणं बंद केलं नाही. उलट त्यांची समस्या वास्तव असल्यामुळेच दाखवली. आज एक खासदार म्हणू शकत नाही की, त्यानं ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना नोकरीचं नियुक्तीपत्र दिलंय. माझ्या ‘नोकरी सीरिज’मुळे दिल्लीपासून बिहारपर्यंतच्या अनेक लोकांना नियुक्तीपत्रं मिळाली आहेत. अनेक परीक्षांचे निकाल जाहीर झाले. त्यातील अनेकांनी शिव्या दिल्याबद्दल नियुक्तीपत्रं मिळाल्यावर माझी माफी मागितली. त्याची माझ्याकडे शेकडो पत्रं आणि मॅसेजेसचे स्क्रीनशॉट आहेत. त्यातील एकही जण हा पुरावा देऊ शकणार नाही की, मी कधी नरेंद्र मोदी यांना मत देऊ नका असं त्यांना सांगितलं होतं. हे जरूर सांगितलं होतं की, मत विचार करून द्या. मत दिल्यावर नागरिक व्हा!

५) ‘अ‍ॅड. आंबेडकरांच्या भाजपबरोबर वाटाघाटी झाल्या आहेत’ असं म्हणणं तर्कदृष्ट्या पटत नाही! - कॉ. भीमराव बनसोड

https://www.aksharnama.com/client/article_detail/3248

सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. त्यातील तीन टप्पे पूर्ण झाले असून बाकी टप्पे मे महिन्याच्या मध्यापर्यंत संपणार आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी ठिकठिकाणी सभांचे आयोजन, इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून मुलाखती तर मुद्रित माध्यमांतून लिखाण केले जात आहे. यातून निवडणुकातील विविध पक्ष, युत्या, आघाड्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातील सत्य-असत्य काय ते जनतेला ठरवावे लागते. बऱ्याचदा त्यांची दिशाभूलही होऊ शकते. अशापैकीच महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर केला जाणारा ‘त्यांनी काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपशी डिलिंग केले आहे’ हा आरोप. या मूळ सूत्राला धरून जे ते कार्यकर्ते, राजकीय विरोधक, तथाकथित विचारवंत आपापल्या समजाप्रमाणे याबाबतच्या अफवा पसरवत आहेत. ज्यांची पोहोच वरील माध्यमांपर्यंत आहे, ते त्यामार्फत, तर उरलेले गप्पागोष्टींच्या स्वरूपात, काहीजण कुजबुजीच्या स्वरूपात तसा अपप्रचार करत आहेत.

.............................................................................................................................................

जून २०१९

१) अ‍ॅड. आंबेडकरांच्या निधड्या आणि लढावू भूमिकेबद्दल महाराष्ट्रातील ४१ लाखांवर लोकांना शंका नाही! - रेखा ठाकूर

https://www.aksharnama.com/client/article_detail/3394

मुस्लीम समाज, मुस्लीम समाजधुरिण आणि नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न अ‍ॅड. आंबेडकर करत आहेत. आपल्या देशात आज एक प्रकारचा क्रायसिस निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. विचारधारेशी बांधीलकी न ठेवता आयाराम-गयाराम व खरेदी-विक्रीचे सत्ताकारण सुरू आहे. त्यामुळेच स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्या काँग्रेसचा विरोधी पक्षनेता भाजपवासी होतो! आणि अशाच प्रकारे अनेक नेते सर्रास सत्तेच्या मोहात भाजपकडे जात आहेत. भाजप व संघ परिवाराच्या धर्मांध राजकारणाचा पराभव करायचा असेल तर विचारावर बांधीलकी असलेले राजकारण करावे लागेल. या देशात धर्मनिरपेक्षतेचे समर्थन करणाऱ्यांचे, भाजपच्या धर्मांध विद्वेषी राजकारणाचा विरोध करणाऱ्यांचे जनमत संघघित करणे आणि ते मतपेटीतून दाखवून देणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपचा पराभव करू शकणाऱ्यांना मतं देण्याची रणनीती फसवी आहे. आम्ही निवडणुकीतल्या यशाचा विचार न करता विचारधारेला मत देऊ, असा निर्णय करणे आवश्यक आहे. वंबआला महाराष्ट्रातील ज्या ४१ लाख मतदारांनी मतं दिली, ते सेक्युलर मतदार आहेत. आणि सेक्युलर मतदारांसोबत मुस्लिमांनी स्वत:ला जोडून घेतलं पाहिजे, असे गंभीर मुद्दे अ‍ॅड. आंबेडकरांनी समोर ठेवले आहेत.

२) मोहसीन-पायल, आम्हाला माफ करा! - निखिल वागळे

https://www.aksharnama.com/client/article_detail/3361

मोहसीन शेखच्या निर्घृण हत्येला पाच वर्षं पूर्ण झाली. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर हिंदुत्ववादी दहशतवाद्यांनी घेतलेला हा पहिला बळी. २ जूनला हिंदू राष्ट्र सेनेच्या गुंडांनी मोहसीनचा खून केला. कारण काय तर त्याला दाढी होती, त्याने हिरवा शर्ट घातला होता आणि तो नमाजावरून परतत होता. फेसबुकवर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची कुणीतरी विटंबना केली. त्याचा राग निरपराध मोहसीनवर काढण्यात आला. त्याआधी या हिंदुत्ववादी अतिरेक्यांनी जाळपोळ आणि दगडफेकही केली. या घटनेनंतर हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई आणि २१ हल्लेखोरांना अटक झाली होती.

आज पाच वर्षांनंतर काय परिस्थिती आहे? धनंजय देसाई आणि त्याचे गुंड जामिनावर बाहेर आहेत. तो सुटला तेव्हा हिंदू राष्ट्र सेनेनं मिरवणूक काढून उन्मादाचं प्रदर्शन केलं. पोलीस काहीही करू शकले नाहीत. या काळात मोहसीनचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत हाल सहन करत राहिलं. कबूल केलेली नुकसान भरपाईही त्यांना मिळालेली नाही. मोहसीन हा आयटी कंपनीत कामाला होता. घर त्याच्या कमाईवर अवलंबून होतं. त्याच्या भावाला नोकरी लावण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. तेही पूर्ण झालेलं नाही. या तगमगीनं मधल्या काळात वडिलांचा मृत्यू झाला. भावाची मुलगीही याच काळात वारली. एकूण आर्थिक आणि मानसिक ओढाताण मोहसीनच्या कुटुंबाच्या नशिबी आली आहे.

३) ‘नेहरू नसते तर...’ हा भयशंकित करणारा प्रश्न पडणे रास्तच म्हणायला हवे! - किशोर बेडकीहाळ

https://www.aksharnama.com/client/article_detail/3377

पंडित जवाहरलाल नेहरू हे एका अर्थाने १९व्या शतकातील भारतीय प्रबोधनाचे अपत्य म्हटले पाहिजे. आधुनिकता, विज्ञाननिष्ठा, लोकशाही, धर्मनिरपेक्षता व समाजवादाशी सुसंगत राष्ट्रवाद ही नेहरूंच्या विचारविश्वाची वैशिष्ट्ये होती. स्वातंत्र्यापूर्वीच स्वातंत्र्योत्तर भारताच्या पुनर्रचनेचा सर्वांगीण विचार करायला नेहरूंनी सुरुवात केली होती. नियोजन मंडळाची स्थापना ही याची एक चुणूक. स्वातंत्र्यानंतर कोणत्या प्रकारचे राज्य निर्माण करावयाचे याबाबत नेहरू स्पष्ट होते. १९२९च्या संपूर्ण स्वराज्याचा ठराव, १९३१च्या कराची काँग्रेसमधील मूलभूत हक्कांच्या ठरावावरील भाषण आणि १९३६ साली काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून नेहरूंनी केलेल्या भाषणातून याची स्पष्ट कल्पना येते.

नेहरूंनी संसदीय लोकशाहीबद्दल आपले मत दिले आहे. साध्य-साधन विवेक, शांततामय मार्ग, इतर राज्य प्रकारांतून व्यक्तींवर येणार्‍या दडपणांचा अभाव, स्वयंशिस्त, व्यक्तिविकासाची संधी या व अशा इतर वैशिष्ट्यांमुळे तसेच भारताचा खंडात्मक आकार व वैविध्ये लक्षात घेता ‘संसदीय लोकशाही’ हाच उपाय ठरतो, यावर नेहरूंचा भर  होता. चर्चा, संवाद, सल्ला-मसलत यातून लोकशाहीत निर्णय होत असल्याने त्या निर्णयांचा टिकाऊपणा जास्त असतो. त्यातून लोकांचा आत्मविश्वास वाढतो व राष्ट्रबांधणीच्या प्रक्रियेत ते सहभागी होऊ शकतात, अशी नेहरूंची धारणा होती.

४) महाराष्ट्रात विरोधी पक्ष कोण? वंचित की मनसे? - संजय पवार

https://www.aksharnama.com/client/article_detail/3410

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा डिजिटल प्रचार धडकी भरवणारा होता. पण भाजपच्या विजयानंतर तो टिंगलीचा विषय केला गेला. राज ठाकरेंच्या प्रचाराचा बार फुसका ठरला, असं म्हटलं गेलं. पण नीट विचार केला, तर राज ठाकरेंचा घणाघाती मोदी विरोध झाला नसता तर आज युती ४८ जागांवर जिंकून आली असती.

वंचितमुळे आघाडीच्या १०-१२ जागा कमी झाल्या असं एक विश्लेषण केलं जातंच आहे. कारण वंचितचे उमेदवार होते. राज ठाकरेंचा प्रभाव झाला की नाही हे कसं ठरवणार? कारण त्यांचे उमेदवारच नव्हते. साहजिकच मोदींचे पराक्रम पाहून त्यांना पराभूत करण्यासाठी राज ठाकरेंनी पर्याय कोणते ठेवले? काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित!

आणि या तिन्ही पक्षांना आज जी काही मतं पडलीत, त्यात राज ठाकरेंचा हस्ते-परहस्ते प्रभाव आहे. भाजप-सेना नको, पण मग काँग्रेस-राष्ट्रवादीही नको असं वाटणाऱ्या काही लोकांनी वंचितला मतं दिली. पण ज्यांना काही कारणासाठी वंचतही नको होती त्यांना मनसेचा पर्याय नव्हता!

५) “एकानंतर एक आघात पचवत आम्ही खचत चाललोय. मग न्याय कसा मिळेल?” - सरफराज अहमद

https://www.aksharnama.com/client/article_detail/3343

सत्तेतल्या बदलानंतर ‘मॉब लिंचिंग’ नावानं हत्येचं नवं तंत्र विकसित झालं. त्याची सुरुवात पुण्यामध्ये मोहसीन शेख या तरुणाच्या हत्येनं झाली. कोणतंही कारण नसताना एका विशिष्ट धर्ममताचा अनुयायी म्हणून त्याला संपवण्यात आलं. २ जून २०१४ रोजी ही घटना घडली. उद्या या घटनेला पाच वर्षं पूर्ण होत आहेत. या दरम्यान बऱ्याच घटना घडल्या. या हत्येच्या सर्व २२ आरोपींना जामीन देण्यात आला. दुसरीकडे न्यायासाठी लढणाऱ्या मोहसीनच्या पित्याचंदेखील हृदयविकारानं निधन झालं. ते आपल्या मुलाला न्याय मिळाल्याचं पाहू शकले नाहीत. शासनानं दिलेलं मदतीचं आश्वासन पूर्ण झालं नाही. त्याच्या लहान भावाला नोकरी देण्याचा शब्द फिरवण्यात आला. आता मोहसीनचं कुटुंब असहाय्य आहे. त्यांना न्यायाचा विश्वास देण्याची गरज आहे. त्यासाठीच महाराष्ट्रातील तरुणांनी ‘जस्टीस फॉर मोहसीन मुव्हमेंट’ सुरू केली आहे. उद्या त्यांच्यावतीनं मोहसीनच्या जन्मगावी सोलापुरात निदर्शनं केली जाणार आहेत. महाराष्ट्रातील शेकडो तरुण यात सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘जस्टीस फॉर मोहसीन मुव्हमेंट’च्या वतीनं मोहसीन शेखचा भाऊ मुबीन शेखची मुलाखत...

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......