सौरव गांगुलीच्या मुलीने दिलेला खुशवंतसिंगांच्या पुस्तकातील उतारा ‘व्हायरल’ झाला, त्या पुस्तकात ‘व्हायरल’ करण्यासारखे अजूनही बरेच काही आहे!
ग्रंथनामा - झलक
खुशवंतसिंग
  • सौरव गांगुली, त्याची मुलगी सना आणि तिची पोस्ट. सोबत खुशवंतसिंग आणि त्यांच्या ‘द एण्ड ऑफ इंडिया’चे मुखपृष्ठ
  • Thu , 19 December 2019
  • ग्रंथनामा झलक सौरव गांगुली Sourav Ganguly सना गांगुली Sana Ganguly खुशवंतसिंग Khushwant Singh द एण्ड ऑफ इंडिया The End of India

काल क्रिकेटपटू सौरव गांगुली यांची मुलगी सना हिच्या ‘इन्स्टाग्राम’वरील एक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने ‘व्हायरल’ झाली! त्या पोस्टमध्ये सनाने प्रसिद्ध लेखक खुशवंतसिंग यांच्या ‘द एण्ड ऑफ इंडिया’ या २००३ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातील एक उतारा देत ‘भारतात कुणीही सुरक्षित नाही’ असे लिहिले होते. ही पोस्ट व्हायरल होताच सौरव गांगुली यांनी ‘Please keep Sana out of all this issues .. this post is not true .. she is too young a girl to know about anything in politics.’ असे ट्विट करून तत्परतेनं खुलासा केला आहे. असो. त्यानिमित्ताने खुशवंतसिंग यांचे पुस्तक चर्चेत आले ही चांगली गोष्ट झाली. हे छोटंसं पुस्तक खुशवंतसिंग यांनी २००२ सालच्या गुजरात दंगलीनंतर व्यथित अंत:करणानं लिहिलेलं पुस्तक आहे. भारतापुढील जातीयवादाच्या, जात-धर्म द्वेषाच्या भयानक संकटमालिकेचे भयावह दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत, याची जाणीव हे पुस्तक करून देते. या पुस्तकाचा २००४ साली चिनार पब्लिशर्सतर्फे मराठी अनुवादही प्रकाशित झाला आहे. चंद्रशेखर मुरगूडकर यांनी केलेला हा अनुवाद ‘भारताचा अंत’ या नावाने प्रकाशित झाला आहे. खालील उतारे या पुस्तकातून घेतलेले आहेत.

.............................................................................................................................................

भारतीय लोकशाहीला कम्युनिस्टांचा धोका नसून धार्मिक कर्मकांडातून पुढे येऊ लागलेल्या वेडगळ कल्पनांच्या पुनरुत्थानाचा धोका संभवतो हे फक्त नेहरू जाणून होते… भारतीय लोकशाहीला खरा धोका होता तो ८० टक्के हिंदूंमधल्या धार्मिक मूलतत्त्ववाद्यांकडूनच! जोपर्यंत नेहरू जिवंत होते, तोपर्यंत त्यांनी समर्थपणे त्यांच्याशी चार हात केले. कदाचित काही जणांना आठवत असेल, की त्या वेळी सोमनाथ इथल्या नूतनीकरण केलेल्या एका मंदिराच्या उदघाटनाला राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद निघाले होते. तेव्हा नेहरूंनी पत्र लिहून त्यांना सांगितलं होतं की, निधर्मी राष्ट्राच्या प्रमुखाने धार्मिक बाबींमध्ये अशा प्रकारे सामील होऊ नये. दुर्दैवाने नेहरूंनंतर आलेल्या नेत्यांचा कणा तेवढा ताठ नव्हता आणि ते खंबीरही नव्हते. त्यामुळे कट्टर हिंदुत्ववाद्यांची ताकद वाढू लागली.

.............................................................................................................................................

आज अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा जन्म झाला आहे. त्यापैकी अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा कट्टर आणि कडव्या आहेत. आपल्या जहाल वक्तव्यानं श्रोत्यांच्या भावनांना हात घालणारे बाळ ठाकरे यांची ‘शिवसेना’ ही एक अशा प्रकारची कडवी हिंदुत्ववादी संघटना!... शिवसेनेव्यतिरिक्त बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या आणखी जहाल संघटना उदयाला आलेल्या आहेत… संघ परिवाराचे हे सगळे सदस्य स्वत:ला कायदे-कानून यांच्यापेक्षा नेहमीच वरचढ समजतात. एक अब्ज भारतीयांचं भविष्य आपल्याच हातात आहे, अशी (गैर)समजूत त्यांनी करून घेतली आहे.

.............................................................................................................................................

देशात एकूण लोकसंख्येच्या ८२ टक्के असलेल्या हिंदूंना ‘तुम्हाला या देशात दुसऱ्या दर्जाची वागणूक मिळत आहे’ असं पटवून देण्याची अतर्क्य कामगिरी संघ परिवारानं पार पाडली आहे. सध्याच्या न्यूनगंडाचं हे कारण आहे?

.............................................................................................................................................

धर्माचे अवडंबर माजवून, त्याचे वेडेवाकडे अर्थ काढून ती तत्त्वं इतरांवर पाळायची सक्ती करणारे थोडीशी विक्षिप्त, वेडी माणसेच प्रत्येक धर्माचे खरे शत्रू असतात… प्रत्येक धर्मामध्ये काही अति कडवे धर्माभिमानी सतत जन्माला येत असतात, हे आपल्याला इतिहासानं सांगितलंय. ही कडवी माणसं धर्मसंस्थापकानं सांगितलेल्या गोष्टींचा विपर्यास करून त्या धर्माचं नाव कलंकित करत असतात. खिश्चन धर्मातल्या पाखंडीपणाची चौकशी करणारी न्यायपीठं अशीच रुजलेली होती. त्यांनी निष्पाप स्त्री-पुरुषांना जिवंत जाळण्याच्या शिक्षा दिल्या होत्या. मुस्लीम धर्मीयांमधल्या कडव्या मुस्लीम बांधवांनी फतवे काढून धर्माच्या तत्त्वांचं उल्लंघन करणाऱ्यांना देडदंडाच्या शिक्षा दिल्या होत्या… आणि शीख पंथातला तो भिंद्रनवाले. त्याने शीख पुरुषांनी केसांना रंग लावायचा नाही, दाढी मोकळी सोडायची; स्त्रियांनी साड्या, जीन्स असे पोशाख करायचे नाहीत, कपाळावर बिंदी लावायची नाही, असे वेडे फतवे काढले होते… याची लागण आता हिंदू धर्मातही झाली आहे. ख्रिश्चन आणि मुस्लीम हे परप्रांतीय धर्म असल्याच्या वल्गना करणारे हिंदू जन्माला आले आहेत. पण ‘मूँह में राम, बगल में छुरी’ या म्हणीप्रमाणे तोंडामध्ये मात्र सर्वधर्मसमभावाच्या गप्पा ते मारत असतात.

.............................................................................................................................................

मी आजपर्यंत नेहमीच सांगत आलोय की, धर्म आणि राजकारण यांची गल्लत कधीच होऊ द्यायची नाही. त्या दोन्ही गोष्टींनी सुरक्षित अंतरावर राहिलं पाहिजे. पण भारतीय राजकारणाचं रूपांतर हिंदुत्वामध्ये व्हायला लागलंय. इतर धर्मांचा द्वेष करणाऱ्या अति देशप्रेमी संघटनांची दिवसागणिक वाढणारी बांडगुळं आणि भाजपचं केंद्रात सत्तेवर येणं या सगळ्या घटना एका धोक्याची सूचना देतात आणि अस्वस्थ करणारं एक कटु सत्य सांगून जातात : धर्म आणि राजकारण यांची ही जोडगोळी इथून पुढे आपल्या देशात अधिकाधिक विकसित होत जाणार असून भविष्यात तुम्ही किंवा मी कल्पनादेखील न करू शकणाऱ्या विध्वंसक घटना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

.............................................................................................................................................

भारत हा सहिष्णू आणि इतर धर्मांना सामावून घेणारा असून जगातला सर्वांत मोठा लोकशाही देश असल्याचं आपण अभिमानाने सांगतो. त्याच देशाची, राष्ट्राच्या इतिहासाला, वर्तमानाला आणि भविष्याला सुरुंग लावण्याची धमकी देणाऱ्या दांभिक शक्तींशी गाठू पडू लागली आहे. या शक्ती सहज ओळखू येतात. बहुतेक शक्ती या विक्षिप्त अशा संघ परिवाराची पिळावळ आहे.

.............................................................................................................................................

मूलतत्त्ववाद्यांचा जर कोणता धर्म असेल तर तो आहे द्वेष! घडलेल्या घटनेची तर्कसंगती शोधणे किंवा त्या मागचा कार्यकारण भाव जाणून घेणे, या आधीच त्यांच्या तोंडून घाणेरड्या शिव्या येतात, अफवा पसरवल्या जातात. राजकीय पातळीवर झालेल्या नियमांची, ठरावांची अंमलबजावणी करण्याचं काम त्यांचे खासगी सैन्य धाकदपटशा दाखवून करीत असतात आणि तेच सैनिक जातीय दंगली उडवून आणण्यात अग्रभागी असतात. देशात कायदा आणि सुव्यवस्था कायम करायची जबाबदारी न्यायसंस्थेची आणि पोलिसांची असते. अशिक्षित साधू आणि सशस्त्र भामट्यांनी त्याचं कंत्राट आपणहून घ्यायची गरज नसते.

.............................................................................................................................................

जर्मनीसारख्या राष्ट्रामध्ये साक्षरतेचं प्रमाण उच्च होतं, पण तरीही ते वांशिक भेदाभेदांच्या जंजाळात अडकले गेले. आपल्या देशात निरक्षरता अफाट आहे. त्यामुळे नुसत्या बोलण्यानं त्यांच्या भावना भडकवणं हे फार सोपं काम आहे. सत्याचा विपर्यास करा, आपल्या स्वत:च्या जातीविषयी, धर्माविषयी त्यांचा थोडासा स्वाभिमान जागृत करा, इतर धर्मांविषयी त्यांच्या कानात द्वेषाचे थोडे तेल ओता आणि मग पाहा. समोरच्या भल्या मोठ्या जमावाचं पाहता पाहता राक्षसांमध्ये रूपांतर झालेलं तुम्हाला दिसेल. त्यांच्या डोक्यात आता फक्त द्वेष असेल आणि त्याचा स्फोट तुम्हाला हवा तेव्हा करता येईल.

.............................................................................................................................................

दुसऱ्या संस्कृतीबद्दल, धर्माबद्दल द्वेष निर्माण करणारी टोकाची देशभक्ती ही इतिहासाच्या दृष्टीने आणि नीतीमत्तेच्या दृष्टीने कधीही हितकारक ठरणार नाही. आपण इतिहासात सांगितलेल्या घटनांचा संदिग्ध अर्थ लावून, सत्याचा विपर्यास करून काही काल्पनिक कुभांड रचून आपल्या तरुण पिढीच्या मनात द्वेषाचं हे विषारी जहर ओतायचं थांबवलं नाही, तर समाजाची घडी विस्कटल्याची जबाबदारी आपल्याला डोक्यावर घ्यावी लागेल. देशाची अखंडता अबाधित ठेवायला आपण जर कमी पडलो तर ते आपल्याच हाताने आपण अपयशाची दुर्दैवी गाथा लिहिल्यासारखं होईल आणि मग भारताला त्याच्या विनाशाकडे नेणाऱ्या भयानक अशा वैराण वाटेने आपला प्रवास सुरू होईल.

.............................................................................................................................................

फॅसिस्ट विचारणीची मुळं धरायला काही तशा जमातींची आवश्यकता असते आणि ती पद्धतशीरपणे पसरवण्यासाठी काही कट्टर आणि कडवे गट कार्यरत असावे लागतात. एक-दोन गटांच्या दबावाखाली त्यांची सुरुवात होत असते. पण तिथेच ती न पसरता कधीच संपत नाही. द्वेषाच्या दुर्दैवी पायावर उभी असलेली ही चळवळ वायुवेगाने पुढे सरकते, कारण तिच्यातून दहशत आणि दंगली निर्माण होत असतात. आपण ख्रिश्चन किंवा मुस्लीम नाही, म्हणून आपण सुरक्षित आहोत, ही आपली चक्क गैरसमजूत आहे. संघाने कधीपासूनच पाश्चिमात्यांच्या अनुकरणावर आक्षेप घेऊन ते सहजपणे करणाऱ्या तरुण पिढीवर लक्ष केंद्रित केलं आहे. उद्या ते स्कर्ट, जीन्स वापरणाऱ्या स्त्रियांवर आक्षेप घेणार आहेत. मांस खाणे, मद्य पिणे आणि इंग्रजी चित्रपट पाहण्यावर ते जबरदस्तीने बंदी आणणार आहेत. इतकंच काय तर टूथपेस्टऐवजी दंतमंजन वापरण्याची सक्ती ते करू शकतात. अॅलोपॅथीऐवजी आयुर्वेदिक उपचारच घेण्याची जबरदस्ती ते करणार आहेत. हस्तांदोलन करण्यालादेखील ते विरोध करतील आणि त्याऐवजी आपल्याला ‘जय श्री राम’ म्हणायला लावतील! या देशात आता कोणीही सुरक्षित नाही. आपल्या देशाला जर खऱ्या अर्थानं जिवंत ठेवायचं असेल तर हे बारकावे समजून घ्यायला हवेत!

(सना गांगुलीने शेअर केलेल्या विधानांचा हा मराठी अनुवाद आहे.)

.............................................................................................................................................

ज्या ज्या ठिकाणी, वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे आणि वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक एकत्र नांदत असतात, तिथे तिथे ‘आपण सगळे भाऊ भाऊ’ वगैरे काही नसतं. तिथे असतो एक शांततापूर्ण तणाव! आणि त्यातून जमीन, स्थावर मालमत्ता किंवा व्यवसाय यांचे वाद असतील, तर अनेक वेळा या तणावपूर्ण शांततेचे रूपांतर रौद्र अशा दंगलीमध्ये होत असतं. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ब्रिटिशांनी ‘भेद करा आणि राज्य करा’ (डिव्हाईड अँड रूल) नीतीचा अवलंब केल्यानंतरच हिंदू-मुस्लिमांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं, त्या आधी काहीच नव्हतं, अशी एक छान अफवा पसरवण्यात आली आहे. वास्तविक मुस्लीम ज्या वेळी भारतात आले, त्या प्राचीन काळापासून या दोन्ही जमातींमध्ये तणाव होता आणि इस्लाम येण्यापूर्वी हिंदू-जैन, हिंदू-बौद्ध, द्रविड-आर्य अशा सर्वांमध्ये तणाव होतेच.

जातीयवादाचा शोध संघ परिवाराने लावला आणि त्याचं बीजारोपण भारतात केलं असं म्हणणं सर्वस्वी चुकीचं ठरेल. सध्या दोन्हीमध्ये जो द्वेषरूपी ‘हिंस्त्र कीटक’ आहे, त्याचं ‘राक्षसा’त रूपांतर करण्याचं काम, मात्र संघानं केलं आहे.

.............................................................................................................................................

आज मानवी जीवनाचा प्रत्येक पैलू धर्माशी जुळायला लागलाय. हे आधी थांबलं पाहिजे. कारण हा मार्ग विनाशाकडे जातो. तुम्हाला हवी तेवढी भजनं हव्या तेवढ्या वेळा म्हणा. हवा तितक्या वेळा तुम्ही नमाज पढत जा; पण हे सगळं घरी किंवा तुमच्या प्रार्थनास्थळावर करा. आत्मिक शांतीसाठी आपण हे करतो. कृपया देशाच्या आत्म्याला त्यापासून मुक्त ठेवा. आपल्या घटनेच्या आणि कायद्याच्या मर्यादित चौकटीत तो सुखी आहे.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Priyadarshani Ghorpade

Fri , 20 December 2019

@Satish calling a Sardar's opinions a joke is pretty sick move in itself. It just shows that you do think you are better than anyone else. Sangh calling themselves Hindu Rashtra is no problem, but the problem arises when they try to impose their policies on rest of the India. Banning beef, CAB, are the signs that minorities does not matter and you are above else. honestly India was not formed on these basis. About Sana Ganguly, that kid sees what you don't. the article isn't about her.


Satish Bendigiri.

Thu , 19 December 2019

खुशवंत सिंग हा सरदार होता. सरदारजी चे जोक्स असतात. संता बंता सारखे. त्याला जेंव्हा म्हातारचळ लागले तेंव्हा तो अशी बडबड करीत असे. त्याला स्वतःच्या देशाचा अभिमान नव्हताच. आणि संघ परिवार स्वतःला हिंदू राष्ट्र म्हणवून घेत असेल तर कुठे बिघडले? आणि सना गांगुलीला काय जग माहिती आहे? तिला एवढे महत्त्व द्यायचे काहीच कारण नाही.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......