वास्तवाचे बहुमुखी आकलन, हे या लेखांमधील समान सूत्र आहे!
ग्रंथनामा - झलक
डॉ. श्रद्धा कुंभोजकर
  • ‘विविधा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 13 December 2019
  • ग्रंथनामा झलक विविधा Vividha सोपान शेंडे Sopan Shende श्रद्धा कुंभोजकर Shraddha Kumbhojkar मैत्री पब्लिकेशन्स Maitri Publications

‘विविधा : महाराष्ट्राचा समग्र इतिहास खंड १’ हे प्रा. सोपान शेंडे यांचे पुस्तक १० डिसेंबर रोजी पुण्यात समारंभपूर्वक प्रकाशित झाले आहे. मैत्री पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला इतिहासाच्या अभ्यासक डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.............................................................................................................................................

इतिहासाचे ज्येष्ठ अध्यापक प्रा. सोपान शेंडे यांनी अनेक वर्षांच्या अध्यापन, संशोधन आणि चिंतनानंतर विविध विषयांवर लिहिलेले इतिहासविषयक लेख ‘विविधा’ या शीर्षकाने प्रस्तुत संग्रहात एकत्रितपणे वाचकांना अभ्यासायला मिळत आहेत ही समाधानाची गोष्ट आहे. निव्वळ पुराभिलेखागारांमध्ये सापडणाऱ्या कागदपत्रांवर आधारलेला इतिहास हाच इतिहासजमा होत असतानाच्या काळात असे विविधांगी संशोधनावर आधारलेले लेख प्रकाशित होणे गरजेचे ठरते.

माणसाच्या समाजजीवनाची कथा साकल्याने समजून घेणे ही जर इतिहासाची व्याख्या मानली तर अधिकृत कागदपत्रे, ग्रंथव्यवहार आणि पुरावे यांच्या कक्षेबाहेरही इतिहास घडला आणि घडवला जातो, याची जाणीव जागती ठेवता येते. त्यामुळेच डॉ. शेंडे यांनी दोन तीन दशकांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये अभ्यासलेल्या वेगवेगळ्या संदर्भसाधनांवर आधारलेले हे इतिहासविषयक लेख वाचकाच्या इतिहासाच्या आकलनात नक्कीच भर टाकतात. आणि त्याही पलीकडे जाऊन इतिहास हा केवळ सरकारी पुराव्यातूनच नव्हे तर रस्त्यावरच्या पुतळ्यापासून ते आत्मचरित्रे, वृत्तपत्रे आणि वंशावळींच्या कहाण्यांमधूनदेखील उलगडणे, हे निष्णात इतिहासकाराचे काम आहे, याबद्दलही वाचकाला ते सजग करतात.

या संग्रहातील लेख हे समाजकारण, राजकारण, धर्म आणि संस्कृती या चार प्रमुख परिप्रेक्ष्यांमधून भारतीय इतिहासाlतील अनेक विषयांबद्दलचे लेखकाचे आकलन वाचकांसमोर मांडतात. अर्थात् विषयांच्या मांडणीपुरतीच ही परिप्रेक्ष्यांची विभागणी गृहीत धरलेली आहे. वास्तविक जीवनाप्रमाणेच इतिहासातील घटनांचेही आकलन हे सर्व परिप्रेक्ष्यांचा एकत्रित विचार करूनच अधिक यथार्थ ठरते याची जाण प्रा. शेंडे यांना आहेच. त्यामुळेच नेवासे तालुक्यातील शेंडे घराण्याच्या इतिहासासारखा स्थलकालविशिष्ट विषय अभ्यासतानादेखील त्यांनी चर्मकार जातीच्या जीवनातील बदलांची ऐतिहासिक नोंदही घेतली आहे. विसाव्या शतकातील महाराष्ट्रामध्ये किर्लोस्कर डिझेल इंजिनाच्या रूपाने औद्योगिक आणि तंत्रानात्मक क्रांती समाजात रुजली, याचा परिणाम म्हणून चामड्याच्या मोटा दुरुस्तीचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या चर्मकार जातींच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारी बदल कसे झाले, हे प्रा. शेंडे यांनी नमूद केले आहे. किंवा डॉ. भाऊ दाजी लाड यांच्यासारख्या आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीबद्दल लिहिताना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासोबतच त्यांनी मराठी रंगभूमीला दिलेल्या प्रोत्साहनाचीही दखल त्यांनी घेतली आहे. वास्तवाचे बहुमुखी आकलन, हे या लेखांमधील समान सूत्र आहे, हे सहज लक्षात येईल.

प्रा. शेंडे यांचा स्वत:चा संशोधनाचा विषय हा मराठेकालीन धार्मिक तसेच लोकजीवन हा असल्याने त्यांच्या संशोधकीय लिखाणामध्येदेखील या विषयावर आधारित अनेक लेख दिसतात. खरं तर समकालीन मोडीसारख्या लिपी आणि अस्सल प्रकाशित आणि अप्रकाशित साधनांचा सखोल अभ्यास प्रा. शेंडे यांनी आपल्या संशोधनात केलेला आहे.

मात्र प्रस्तुत संग्रहातील लेखांमध्ये मात्र प्रामुख्याने प्रकाशित प्राथमिक आणि दुय्यम साधनांचेच संदर्भ अधिकतर वापरलेले दिसतात. प्रत्यक्ष क्षेत्रीय अभ्यास जिथे आवश्यक ठरला, तिथे त्यांनी क्षेत्रभेटी देऊनही आपले संशोधन अधिक संदर्भपुष्ट केले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संयतपणे परंतु सत्याचा अपलाप न करता आपल्या अभ्यासविषयाबद्दल संशोधनांती तयार झालेली मते त्यांनी स्पष्टपणे मांडली आहेत. उदाहरणार्थ- ‘ब्राह्मणी धर्मशास्त्रांनी समाजातील फार मोठ्या वर्गाला तुच्छ लेखून त्यांच्यावर निर्बंध घातले होते’ असं सांगून अठराव्या शतकातील किमान तीन उदाहरणे ससंदर्भ देऊन ते आपलं विधान सप्रमाण सिद्ध करतात.

याही पुढे जाऊन इतिहासकारांनी किंबहुना सर्वच सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांनी आपल्या सुट्या निष्कर्षांच्या बळावर जे स्थायी आणि व्यापक स्वरूपाचं सिद्धांतन करणं अपेक्षित असतं, तेदेखील छोट्या लेखांच्या मर्यादांमध्ये राहूनही प्रस्तुत संग्रहात किमान काही ठिकाणी तरी दिसतं, ही आशादायी बाब आहे. मराठेकालीन धार्मिक व लोकजीवनासंबंधीच्या लेखात ‘त्यांनी धर्माला अतिरेकी महत्त्व दिल्यामुळे वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर बरेच धोके समाजाला पत्करावे लागले’ हे त्यांचं म्हणणं हे मध्ययुगीन समाजाच्या एका महत्त्वाच्या लक्षणाकडे आणि समस्यांच्या निदानाकडेही स्पष्ट निर्देश करतं.

एकूण पाहता ‘विविधा’ या नावाने संग्रहित केलेल्या वाचनीय आणि संग्राह्य लेखांचा हा संग्रह इतिहासाच्या जाणकार वाचकांना, तसेच त्या विषयाचे जाणकार नसतानाही समाजाची जडणघडण समजून घेण्यात रस असणाऱ्या इतर वाचकांनादेखील नव्या माहितीच्या आणि अन्वयार्थाच्या दिशा कळून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.

स्फुट लेखनासोबतच प्रा. शेंडे यांनी लवकरच दीर्घ स्वरूपाचे आणि घटनांचा मोठा कालपट मांडणारे लिखाण करावे अशा शुभेच्छा देते.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-04@cloudtestlabaccounts.com

Sat , 14 December 2019

(する(


5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-04@cloudtestlabaccounts.com

Sat , 14 December 2019

(する


5KN52OEQD5CZ7Z3IHWL3Y4CJCQ-04@cloudtestlabaccounts.com

Sat , 14 December 2019

(する(


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......