‘हाऊसफुल ४’ : विनोदाच्या नावाखाली अनेक सुमार गोष्टी घडत राहतात!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘हाऊसफुल ४’चं पोस्टर
  • Wed , 30 October 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie हाऊसफुल ४ Housefull 4 अक्षय कुमार Akshay Kumar रितेश देशमुख Riteish Deshmukh बॉबी देओल Bobby Deol

‘हाऊसफुल’ चित्रपटमालिका काही अभिजात आणि अभिनव विनोदांकरिता प्रसिद्ध आहे अशातला भाग नाही. त्यामुळे ‘हाऊसफुल ४’कडून तशा अपेक्षा असण्याचं कारण येत नाही. निर्बुद्ध, वैचित्र्यपूर्ण नि अतिशयोक्तीपूर्ण कथानकं, त्याहून निर्बुद्ध विनोद ही या चित्रपटमालिकेची खासीयत आहे. आधीच्या तिन्ही चित्रपटांनी अगदी सातत्यानं हा मार्ग निवडत ही प्रतिमा निर्माण केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे आधीचे तिन्ही चित्रपट किमान मनोरंजन करणारे आहेत. ‘हाऊसफुल ४’ थोड्या फार प्रमाणात त्याच मार्गावरून जाणारा असला तरी तो रंजक नाही.

‘पुनर्जन्म या संकल्पनेभोवती फिरणारं विनोदी कथानक’ ही चित्रपटकर्त्यांना अपेक्षित असलेली मध्यवर्ती संकल्पना आहे. परिणामी ‘हाऊसफुल ४’चं कथानक दोन पातळ्यांवर घडणारं आहे. ज्यात त्याचा पूर्वार्ध मध्यवर्ती पात्रांच्या पूर्वजन्मातील कथानकानं, तर उत्तरार्ध सध्याच्या काळातील पात्रांच्या आयुष्यातील कथानकानं व्यापलेला आहे. अर्थात तसं म्हणण्यापेक्षा कथानकाच्या अभावानं ग्रासलेला आहे, असं म्हणणं अधिक योग्य ठरेल.

२०१९ मधील कथानकात हॅरी (अक्षय कुमार), रॉय (रितेश देशमुख) आणि मॅक्स (बॉबी देओल) हे तिघे भाऊ लंडनमध्ये राहत असतात नि एक सलून चालवतात. चित्रपटातील काही विनोद हॅरीच्या काहीतरी मोठा आवाज होताच आधीच्या काही मिनिटांत घडलेल्या गोष्टी (कथानकाच्या सोयीनुसार) विसरण्याच्या कृतीतून निर्माण होतात. तर इतर काही विनोद बोलताना क्रियापदात बदल करत कर्त्याच्या लिंगात बदल करण्याच्या रॉयच्या गुणवैशिष्ट्यांमुळे उद्भवणारे आहेत. याखेरीज स्त्रियांची छेड काढणं, कमरेखालचे विनोद करणं इत्यादी प्रकारही आहेतच. थोडक्यात, विनोद्युत्पत्तीचे (?) पुरातनकालीन, कालबाह्य प्रकारच वापरलेले आहेत.

या तिघा भावांना बिग भाई (मनोज पाहवा) या गुंडाला पन्नास लाख की तत्सम काहीतरी रक्कम परत करायची असते. ती कशी करणार यासाठी त्यांच्या डोक्यातून निघालेली सुपीक कल्पना म्हणजे ठकराल (रणजीत) या लंडनस्थित श्रीमंत व्यक्तीच्या तीन मुलींशी लग्न करून पैसे उकळायचे. याहून नावीन्यपूर्ण असं उपकथानक गेल्या शतकभरात हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या लेखकांना सुचलेलं नसावं!

या तीन मुली म्हणजे - क्रिती (क्रिती सेनन), पूजा (पूजा हेगडे) आणि नेहा (क्रिती खरबंदा). ‘हाऊसफुल ४’ त्यातील स्त्री कलाकारांबाबत (आणि एकुणातच स्त्रियांबाबत) इतका आदर राखणारा आहे की इथं पात्रांची नावंही ती साकारणाऱ्या अभिनेत्रींच्या नावावर बेतलेली आहेत! (साहजिक कारणांमुळे खरबंदाच्या पात्राचं नाव क्रिती ठेवता आलेलं नाही, याचा चित्रपटकर्त्यांना नक्कीच खेद असेल!) दरम्यान चित्रपटकर्ते पुढे जाऊन ‘हां, गुंडों से छुडाया है - मैंने तुझे बचाया है - एक चुम्मा तो बनता है’ असं गाणं गाऊन घेतात. तीन पुरुष, तीन स्त्रिया त्या गाण्यावर दुष्ट लागेलशा पद्धतीनं नृत्यही करतात. स्त्रीदाक्षिण्य (दुसरा अर्थ - आमच्याकडे स्त्रियांचा इतका आदर केला जातो की, त्यांना चित्रपटात वावच नसतो!) आणि स्त्रियांचे ऑब्जेक्टिफिकेशन यांचा इतका सुंदर मिलाप कुणालाच घालता आला नसता.

लवकरच या तिघांच्या लग्नासाठी म्हणून सगळे सीतमगडला जायला निघतात. त्याचवेळी हॅरीला कथानकातील मध्यवर्ती पात्रांचा पुनर्जन्म झाला आहे, असा साक्षात्कार होतो. मग १४१९ मधील कथा उलगडू लागते. जी ‘बाहुबली’सारख्या चित्रपटांचं विडंबन म्हणून काम करते. इथं हॅरी - राजकुमार बाला, रॉय - बांगडू महाराज आणि मॅक्स - अंगरक्षक धरमपुत्र आहे. इथं बाला तिरस्करणीय, मात्र (चित्रपटकर्त्यांच्या दृष्टीनं) विक्षिप्त नि विनोदी राजकुमार आहे. राजदरबारात नृत्य करवून घेण्यासाठी स्त्रियांचं अपहरण करणं, लोकांना यमसदनी धाडायचे आदेश देणं, इत्यादी प्रसंगांतून त्याचं विनोदी असणं अधोरेखित केलं जातं. पुढे बाहुबलीची थट्टा उडवणारे प्रसंग येऊन या कालखंडातील कथानक संपतं. मात्र अजून चित्रपटाच्या लांबीतील बराच वेळ बाकी असतो.

आता २०१९ मधील कथानकात नवीन समस्या उद्भवलेली असते. हॅरीला कळतं की, गेल्या जन्मातील प्रियकराच्या-प्रेयसी जोड्या नि आताच्या काळातील जोड्यांमध्ये घोळ झालेला आहे. आता हा घोळ शब्दांत सांगणं अवघड आहे, पण साधारण - इथं प्रत्येक दीर आपल्या भावजयीच्या प्रेमात आहे - असं म्हणता येईल. मग हे सगळं इतरांना पटवून देण्याच्या निमित्तानं विनोद्युत्पत्तीचे प्रयत्न होतात. आता इथल्या मूलभूत संकल्पनेतच किती गोंधळ आहे, हे लक्षात यायला फारसा वेळ लागणार नाही. आताच्या काळातील प्रेमी युगुलांच्या जोड्या जुन्या कालक्रमाच्या दृष्टीनं चुकीच्या असल्यानं त्यांची अदलाबदल करावी लागणार हे इथं एकमेकांना पटवून दिलं जातं. (अर्थात आपल्याकडे भारतवर्षात इतिहासात बदल करण्याचे प्रसंग घडत असताना चित्रपटातील पात्रांनी इतिहासाच्या हिशोबानं विचार करत वर्तमानात बदल केल्यानं काय बिघडतं म्हणा!)

इथल्या विनोदाचा आणखी एक प्रकार समलैंगिकतेवरील हिडीस विनोदांच्या रूपात दिसून येतो. बांगडू महाराज-रॉय ही रितेश देशमुखने साकारलेली पात्रं त्यासाठीच उभी केली जातात. हे कमी म्हणून की काय, उत्तरार्धात जॉनी लिव्हरचं पात्र साडी नेसून आणि भडक मेक-अप करून चंकी पांडेच्या पात्राची पत्नी म्हणून उभं राहतं. अर्थात ‘हाऊसफुल’ चित्रपट मालिकेतील चित्रपटाकडून तार्किकतेची अपेक्षा ठेवणं ही चूकच झाली म्हणा! बाकी चित्रपटातील विनोद अधिक वाईट आहेत की गाणी, हा प्रश्न सुटणं अवघड आहे.

चित्रपटातील त्यातल्या त्यात चांगले विनोद हे नव्या-जुन्या हिंदी चित्रपटांचे उल्लेख आणि इतर काही शाब्दिक करामतीतून निर्माण होतात. पण, असे विनोद पाहायचे असल्यास याच्याच लेखक-दिग्दर्शक फरहाद सामजीचं सहदिग्दर्शन असलेला ‘एंटरटेन्मेंट’ (२०१४) पाहणं अधिक योग्य राहील. कारण, काही मोजके प्रसंग वगळता ‘हाऊसफुल ४’मध्ये विनोदाच्या नावाखाली अनेक सुमार गोष्टी घडत राहतात. इतक्या सुमार की, सदर चित्रपटात मोजून चार विनोद ‘विनोदी’ आहेत, असं म्हटलं तरी ते फारसं अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......