अजूनकाही
श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्यावरील ‘इथे विझली वीरश्री’ या पत्रकार राजेश हेन्द्रे यांच्या नाटकाचे काल पुण्यात समारंभपूर्वक प्रकाशन झाले. या पुस्तकाला अभ्यासक-संशोधक संजय सोनवणी यांनी लिहिलेली प्रस्तावना... सोबत हेन्द्रे यांच्या मनोगताचा संपादित अंश...
.............................................................................................................................................
संकटांची वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयाची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रूरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता यशवंतराव होळकर म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर. त्यांचे जीवन हेच एक महानाट्य आहे. त्यात नाट्यात आवश्यक असणाऱ्या सर्व छटा आहेत. त्यात शोकांतिक घटना आहेत, तशाच वीरश्रीने परिपूर्ण घटनाही आहेत. त्यांचे अवघे ३५ वर्षांचे जीवन एक झंझावात आहे. असे असले तरी या दुर्लक्षित ठेवलेल्या महानायकावर आजवर कोणी नाटक लिहिले नसावे. राजेश हेन्द्रे यांच्या ‘इथे विझली वीरश्री’ या नाटकामुळे ही उणीव दूर झाली आहे, याबद्दल श्री. हेन्द्रे यांचे करावे तेवढे अभिनंदन कमीच आहे. यशवंतरावांच्या झंझावाती जीवनातील काही घटना घेत हा नाट्यप्रपंच त्यांनी अत्यंत यशस्वीपणे मांडलेला आहे.
यशवंतराव होळकरांचा (३ डिसेंबर १७७६ ते २८ ऑक्टोबर १८११) एकूण जीवनप्रवास थक्क करणारा आहे. असा सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा जगाच्या इतिहासात क्वचितच सापडेल.
यशवंतरावांना राज्य सोडा, साधी बोटभर जहागीर वंशपरंपरेने मिळालेली नाही. ती त्यांना भिल्ल-पेंढारी व पठाणांच्या स्वत: उभारलेल्या अल्प सैन्याच्या जिवावर प्रशिक्षित पलटणींशी लढून मिळवावी लागली. त्यांनी शिंदे-पेशव्यांच्या घशातून जप्त झालेले होळकरी प्रांत अविरत लढत-लढतच मुक्त केले. एवढेच काय, पण शिंद्यांनी कैदेत टाकलेली पत्नी आणि अल्पवयीन कन्येलाही लढूनच मुक्त करावे लागले.
हडपसरच्या युद्धात पराभूत झालेला बाजीराव पेशवा पळून गेला आणि इंग्रजांच्या गोटात शिरून त्यांच्याशी तह करून त्यांचे मांडलिकत्व स्वीकारले. खऱ्या अर्थाने पेशवाईचा अंत तेथेच झाला. १८१८ला पेशवाई बुडाली म्हणतात ते केवळ तांत्रिक कारणांनी. मराठशाहीचाच नव्हे, तर देशाचा इतिहास यशवंतरावांनी बदलला. स्वातंत्र्य घोषित करत राज्याभिषेकही करून घेतला. शिवरायांनंतर स्वत:चे राज्य स्वत:च्या हिमतीवर मिळवणारा, शेवटपर्यंत स्वतंत्र राहणारा, स्वत:हून एकही तह कोणाशीही न करणारा हा एकमेव महायोद्धा होता. इंग्रज हाच देशाचा शत्रू आहे असे मानत त्यांनी इंग्रजांशी जो एकहाती लढा दिला आणि त्यांच्यावर विजयामागून विजय मिळवले, त्याला जागतिक इतिहासात तोड नाही. अन्य रजवाड्यांनी या लढ्यात सहकार्य करावे यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले; पण गुलामीची आस लागलेले शीखांसह सर्व संस्थानिक हातावर हात धरून बसले. तरीही निराश न होता त्यांनी भानपुऱ्याला तोफांचा कारखाना काढत स्वबळावर कलकत्यावर स्वारी करायची तयारी सुरू केली. अतिश्रमाने आणि मानसिक तणावांनी ते अखेर आजारी पडले... आणि ऐन तारुण्यात त्यांचा मृत्यू झाला.
यशवंतरावांचे जीवन एका महाकाव्याच्या नायकाला साजेसे आहे. हेन्द्रे यांनी हे महानाट्य लिहून मराठी साहित्यावरही उपकार केले आहेत. कारण त्यांनी ज्या शैलीत हे नाटक लिहिले आहे, ते यशवंतरावांचे नुसते बाह्यांग प्रकट करत नाही, तर त्यांचे अंतरंग समर्थपणे चित्रित करते. त्यांची अजरामर उमेद, व्यथा, निराशा आणि पुन्हा ताठ उभे होण्याची आस प्रत्येक प्रसंगातून अभिव्यक्त होते. हडपसरच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या दरबारातील पहिल्या प्रसंगापासूनच वाचकाला खिळवून ठेवायला सुरुवात होते आणि एकामागून एक येणारे प्रसंग, त्यातील नाट्यमय संवादातून हे नाटक उत्कर्षबिंदूकडे वाटचाल करू लागते.
या नाटकाचे प्रयोग होणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ महाराजा यशवंतरावांची जीवनकथा लोकांसमोर जावी यासाठीच नव्हे, तर प्रेक्षकांना एक विलक्षण नाट्यानुभव घेता यावा म्हणून. हेन्द्रे यांनी लिहिलेले हे पहिलेच नाटक. पण त्यात नवखेपणाच्या खुणा नाहीत. उलट वसंत कानेटकरांचा हेन्द्रे हे नवा प्रतिभाशाली अवतार आहेत याचीच ग्वाही हे नाटक देते. मी श्री. हेन्द्रे या उमद्या नाटककाराला शुभेच्छा देतो. या नाटकाचे आणि त्याच्या प्रयोगांचे स्वागत मराठी वाचक/प्रेक्षक करतील अशी आशा व्यक्त करतो.
.............................................................................................................................................
क्रूर, लहरी, भडक माथ्याचा आणि आततायी अशा अवगुणांनी बदनामीचे शिंतोडे अंगावर उडालेलं हे व्यक्तिमत्त्व खरं म्हणजे उत्तर पेशवाईतील एक लक्षवेधी चमत्कारच होता!
महाराजा यशवंतराव होळकरांवरील ही ऐतिहासिक नाट्यकृती रसिकांच्या सेवेशी सानंद सादर करताना आज माझं मन कृतार्थतेच्या काठावर समाधानानं उभं आहे. ‘खडतर जीवनप्रवास’ हा शब्दप्रयोग फक्त माणसाच्याच वाट्याला येतो असं नाही, तर एखाद्या कलाकृतीलाही त्यातून अटळपणं जावं लागतं, याचा मला या प्रस्तुत नाटकाबाबत अनुभव आला. सुमारे पंचवीसएक वर्षांपूर्वी झपाटून लिहिलेलं हे नाटक आजवर रंगभूमीवर येऊ शकलं नाही.
उत्तर पेशवाईच्या काळात सतत युद्धरत राहून आपल्या अद्भुत पराक्रमानं आसमंत उजळून टाकणाऱ्या यशवंतराव होळकर या देदीप्यमान ताऱ्याच्या जीवनचरित्रानं माझ्या मनाचा अक्षरश: कब्जा घेतला! क्रूर, लहरी, भडक माथ्याचा आणि आततायी अशा अवगुणांनी बदनामीचे शिंतोडे अंगावर उडालेलं हे व्यक्तिमत्त्व खरं म्हणजे उत्तर पेशवाईतील एक लक्षवेधी चमत्कारच होता. अंगात कमालीचं धाडस, त्याला गगनभेदी पराक्रमाची जोड आणि दुश्मनानंही हेवा करावा अशी दिलदार वृत्ती, यामुळे यशवंतरावाच्या बांड्या निशाणाखाली अवतीभवतीचे जवान भराभर गोळा होत असत नि आपल्या या उमद्या धन्याकरिता जिवाची बाजी लावून बेफामपणे लढत असत. रोज ५०-६० मैलांच्या दौडी मारून आपल्या गनिमी काव्याने इंग्रजांना अक्षरश: जेरीस आणलेल्या या ताऱ्याची तुलना पुढे त्याच्या समकालीन असणाऱ्या फ्रान्सच्या नेपोलियनबरोबर केली गेली.
यशवंतराव लहरी, संतापी आणि आततायी होते; पण कमालीचे स्वामिनिष्ठ होते. आपल्या धन्याशी, ध्येयाशी आणि देशाशी प्रामाणिक राहणारा होते. म्हणूनच मराठेशाहीच्या अखेरच्या काळात आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवणारे आणि अखेरपर्यंत इंग्रजांची तैनाती फौज न स्वीकारणारे फक्त यशवंतराव होळकरच होते. रणसंग्रमात एकट्याच्या जिवावर इंग्रजी सैन्याची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगणाऱ्या या वादळी जीवनाची अखेर दुर्दैवानं असामान्य वेडात व्हावी, यात मला ग्रीक शोकांतिकेसारखं खूप मोठं नाट्य गवसलं...
ऐतिहासिक नाटक लिहायचं तर इतिहासाशी शक्य तेवढं इमान राखून लेखन करावं म्हणून अनेक ऐतिहासिक पुस्तकं आणि संदर्भग्रंथ अभ्यासले. तत्कालीन घटनांच्या काळाचा मागोवा घेतला आणि १८०२ ते १८११ हा नऊ वर्षांचा कालपट मुक्रर करून जमेल तसं लिहीत गेलो. अखेर दोन-तीन वर्षांनी नाटकाची संहिता एकदाची सिद्ध झाली!
ऐतिहासिक नाट्यलेखन करताना नाटककाराला बरीच व्यवधानं सांभाळावी लागतात. यात इतिहासाच्या अभ्यासाबरोबरच तत्कालीन समाजरचनेप्रमाणे भाषाशैली आणि रंगमंचाच्या अवकाशाचादेखील विचार करावा लागतो. रसिक प्रेक्षकांचा रसभंग होऊ नये म्हणून इतिहासातील रूक्ष घटना वा ऐतिहासिक तपशील टाळावे लागतात. रंगमंचाच्या मर्यादित अवकाशात मोजक्या पात्रांच्या मदतीनं प्रवाही संवादलेखनाच्या माध्यमातून विषय नेमकेपणानं फुलवून मांडावा लागतो. त्या पात्रांचे स्वभाव, त्यांचे गुणदोष आणि त्यामुळे इतिहासाला मिळालेली कलाटणी याच्या अनवट धाग्यांनी नाटकाचे भरजरी वस्त्र विणावे लागते. त्यातून हे नाट्यलेखन करताना या कालखंडातील होळकर घराण्याचा इतिहास मराठी प्रेक्षकांना तसा अपरिचित असल्यामुळे फार पात्रांची गर्दी न करता ठराविक पात्रांच्या मदतीनं यशवंतरावांची मला भावलेली व्यक्तिरेखा नेटकेपणे उभी करणं एवढंच माझं प्रयोजन होतं. त्यामुळे नाटकाच्या सोयीसाठी काही व्यक्तिरेखांचे किरकोळ ऐतिहासिक तपशील मी थोडे मागेपुढे सरकून घेतले आहेत. नाट्यरसिकांना ते खचितच मान्य होईल अशी अपेक्षा आहे.
- राजेश हेन्द्रे
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment