त्या जाणीव पातळीवर । गेलीया मिळे उत्तर ॥
पडघम - सांस्कृतिक
विजय बाणकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 28 September 2019
  • पडघम सांस्कृतिक ज्ञानेश्वर Dnyaneshwar तुकाराम Tukaram अर्जुन Arjun श्रीकृष्ण Shree Krishna राजा हरिश्चंद्र Raja Harishchandra राजा जनक Raja Janaka

‘नो प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्हड् क्रॉम दि सेम लेवल ऑफ कॉन्शसनेस दॅट क्रिएटेड इट’, असे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटले आहे. अर्थात कोणतीही समस्या ज्या पातळीवरील जाणीवेत निर्माण होते, ती त्याच पातळीवरील जाणीवेत राहून नि:शंकपणे सोडवणे शक्य होत नसते. खालील पातळीवरील जाणीवेत निर्माण होणाऱ्या प्रश्नाचे नि:संदिग्ध उत्तर उच्च पातळीवरील जाणीवेत गेल्यावरच मिळते व ते मनोमन पटते. हेच सत्य जणू ज्ञानदेवांनी ‘कोणाचे हे घर, हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥’ या अभंगातूनही सूचित केले आहे.

जाणीव व्यावहारिक, प्रातिभासिक व आध्यात्मिक वा पारमार्थिक अशा तीन पातळीवर वावरते. जागृतावस्थेतील हालचाली या जाणीवेच्या व्यावहारिक पातळीवरील होत, स्वप्नावस्थेतील अनुभव हे प्रातिभासिक पातळीवरील होत, तर आत्मतत्त्वज्ञानी महात्म्यांचे व्यवहार आध्यात्मिक पातळीवरून होत असतात.   

‘कोणाचे हे घर’, ‘हा देह कोणाचा’ यासारखे प्रश्न व्यावहारिक जाणीवेच्या पातळीवर निर्माण होत असतात. ‘हे घर माझे’ व ‘हे शरीर माझे’ असे सामान्य म्हणजे आत्मज्ञान नसलेल्या म्हणजे अज्ञानी व्यक्तींना वाटत असते. हे शरीर व हे घर माझेच आहे व माझेच कायम राहणार आहे, अशा कल्पनेत त्या जगत असतात.

आपल्या आहेत असे वाटत असते, तोपर्यंत घर, देह, व्यक्ती व इतर गोष्टी त्यांना सुखद वाटत असतात. प्रतिकूल परिस्थितीत वा मृत्युमुळे त्या साऱ्यांना सोडून जाण्याची वेळ येते, तेव्हा मात्र त्या त्यांना दु:खद वाटू लागतात. अशा प्रकारे व्यावहारिक पातळीवर दु:खच दु:ख आहे; ‘सुख जवांपाडे व दु:ख पर्वताएवढे’ आहे, असे अनुभवास येत असते. म्हणून जाणीवेच्या व्यावहारिक पातळीवर खरे म्हणजे दु:खविरहित असे निर्भेळ सुख मिळतच नसते, असे ज्ञानेश्वरीत सविस्तर पटवून दिले आहे. (पहा : ९.४९५-५०२ आणि १३.७२८-७५२)

घर, देह व इतर व्यक्ती यांच्याबाबतच्या सुखदु:खयुक्त अनुभवांमुळे व्यक्ती अंतर्मुख होते व खऱ्या सुखासाठीच्या उपायाचा विचार करू लागते. पण, ज्यांच्यात आपला जीव गुंतलेला आहे, त्या व्यक्तींना व घरादी वस्तूंना सोडून जाता येत नाही, यांना सोडून गेलो तर लोक काय म्हणतील, नंतर आपले व त्यांचे कसे होईल, अशा विचारांनी ती थबकते आणि ‘जीवन हे असेच असते’ असे म्हणत पूर्ववत व्यवहार करू लागते. थोडक्यात, व्यावहारिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी ती पातळी सोडून उच्च आध्यात्मिक पातळीवर जाणे हा उपाय करणे आपल्याला जमत नाही, हे तिला वारंवार जाणवत असते.

देह, मन व बुद्धी यांच्या बाबतीतल्या समस्यांचे समूळ निराकरण जाणीवेच्या उच्च पातळीवर गेल्यावरच होते. जाणीवेची ही उच्च पातळी म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडील तुर्यानामक चौथी खरी पारमार्थिक किंवा आध्यात्मिक अवस्था होय.

उदा. राजा हरिश्चंद्राला ती प्राप्त होती. अर्थात, तो आत्मज्ञानी होता. जागृत्यादी तिन्ही अवस्थांचा साक्षी असतो ‘तो मी अविनाश आत्मा’ आहे, हे त्यास ठाऊक असते. त्याला स्वप्न पडते. त्यात तो आपले राज्य वगैरे सारे विश्वामित्राला दान देतो. दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन, ‘वचन दिल्याप्रमाणे, तू तुझे सारे राज्य मला दे,’ असे विश्वामित्र त्याला म्हणतो. विश्वामित्र अंतर्ज्ञानी असल्याचे राजास माहीत असते. देह, राजवाडा, राज्य वगैरे सारे नाशिवंत आहे, मिथ्या आहे व एक आत्माच चिरंतन सत्य आहे, हे त्यास ज्ञात असते. म्हणूनच अजिबात आढेवेढे न घेता म्हणजे पूर्णपणे सत्यनिष्ठ राहत, तो आपले राज्य विश्वामित्राला अर्पण करतो; नंतर मुलगा, पत्नी यांनाही विकतो, डोंबाघरी पाणी वाहतो व दिलेल्या वचनाची पूर्तता करतो.

स्वप्न हे भासमय असते, खोटे असते, असे म्हणत राजाने स्वप्नात दिलेले वचन पाळले नसते, तरी जाणीवेच्या फक्त व्यावहारिक पातळीवर जगणाऱ्या म्हणजे सामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून ते चुकीचे ठरले नसते. राजाची ती कृती चुकीची आहे, असे कुणाला वाटलेही नसते व तसे कुणी म्हटलेही नसते. पण राजा हरिश्चंद्र तसे करत नाही. जागृतावस्थेतील मी व स्वप्नावस्थेतील मी हे दोन वेगवेगळे नसतात, या दोन्ही अवस्थेतील मी हा एकच असतो, हे अभंग सत्य तो अनुभवत असतो. म्हणून स्वप्नात दिलेले वचन हे त्याच्यालेखीं जागेपणी दिलेल्या वचनासमानच असते. आत्मज्ञान नसलेल्या म्हणजे सामान्य व्यक्तीच्या दृष्टिकोनातून स्वप्नातले वचन न पाळून तो समस्येचे निराकरण करू शकला असता; पण, मग तो सत्यनिष्ठ, सत्यवचनी व सदाचारी राहिला नसता आणि एक आदर्श राजा म्हणून त्याचा महिमाही नंतर धर्मग्रंथांमधून व संतसाहित्यातून गायिला गेला नसता.        

सत्त्वशील हरिश्‍चंद्र राजाने व्यावहारिक पातळीवरील क्षणिक शारीरिक-मानसिक-बौद्धिक सुखापेक्षा आध्यात्मिक पातळीवरील शाश्वत सुखाला महत्त्व दिले व त्यासाठी अनेक यातना सहन केल्या, असे केवळ व्यावहारिक माणसांच्या दृष्टिकोनातून म्हटले जाते. पण खरे तर, वचन दिल्याप्रमाणे राज्य देऊन टाकणे, ही हरिश्चंद्र राजासाठी मुळी समस्याच नव्हती. राज्य असणे वा नसणे या दोन्ही गोष्टी त्याला सारख्याच होत्या. राज्य व राजा असताना किंवा नसताना आत्मस्वरूपात किंचितही बदल होत नसतो, या अनुभवयुक्त जाणीवेची निष्कंप ज्योत त्याच्या अंत:करणात अखंड तेवत होती. म्हणूनच त्याच्यालेखी दु:ख निर्माणच होत नव्हते आणि त्यामुळे त्याला त्याचे निराकरणही करावे लागणार नव्हते.

त्या उच्च आध्यात्मिक पातळीवरील जाणीवेने युक्त असे जीवन जगणाऱ्या जनक राजाचा संत तुकारामांनी दोनदा उल्लेख केला आहे. ते म्हणतात, १) “तुका म्हणे राज्य करिता जनक । अग्नीमाजी एक पार जळे ॥” व २) “जेणें अग्निमाजी घातलासे पाव । नेणता तो राव जनक होता ॥” सिंहासनावर बसलेला जनक राजा आपला एक पाय अग्नीमध्ये असताना ‘या शुकदेव!’ असे म्हणत त्यांचे स्वागत करतो. पाय अग्नीत जळत आहे हे कळणे म्हणजे व्यावहारिक पातळीवरील जाणीवेत असणे होय. पण, पाय अग्नीत असूनही जनकराजास काही होत नव्हते. तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे त्याबाबत तो ‘नेणता’ होता. एक पाय अग्नीत ठेवून जनक राजा राज्यकारभार करत आहे म्हणजे आपल्याला अद्याप माहीत वा अवगत नसलेल्या सुखदु:खातीत अशा उच्चतम जाणीवेच्या पातळीवरून व्यवहार करत आहे, हे शुकदेवांना उमगते व ते त्या विदेहराज जनकापुढे नतमस्तक होतात. जनकराजाला होती ती उच्च आध्यात्मिक पातळीवरील जाणीव १९ वर्षीय जेनीलाही प्राप्त होती. तिला देवाकडून संदेश येत असत. लोकांना ते खरे वाटत नव्हते. तिला चेटकीण म्हणून घोषित केले जाते. शिक्षा म्हणून मोठ्या जमावापुढे तिला जाळण्यात येते. ती लवकर जळून खाक व्हावी म्हणून तिला सगळीकडून पेटवत असणाऱ्या माणसावर एक जळते लाकूड पडणार असते; पण तत्पूर्वीच ‘बाजूला हो, तुला भाजेल’, असे ती त्यास सांगते. स्वत: जळत असताना दुसऱ्याची काळजी घेणाऱ्या जेनीचे ते बोल ऐकून ती एक असामान्य मुलगी असल्याचे तिचा प्रचंड द्वेष करणाऱ्या त्या माणसाच्या व इतरांच्या लक्षात येते, त्यांचे डोळे उघडतात. या घटनेचा परिणाम म्हणूनच जणू फ्रान्समध्ये ती ‘सेंट जोन’ म्हणून प्रसिद्धी पावते. (पहा : विकिपीडिया, बर्नार्ड शॉलिखित ‘सेंट जोन प्ले’ व त्याबाबतची माहिती)

स्वत:चा पार अग्नीत असताना दुसऱ्याशी बोलणे, व स्वत: अग्नीच्या भक्ष्यस्थानी असताना दुसऱ्याला भाजू नये म्हणून ‘बाजूला हो’ असे सांगणे, हे केवळ आत्मज्ञानी महात्म्यांनाच शक्य असते. देव आत्मरूप आहे आणि तोच पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभूतांचे बीज होय. अर्थात, आत्मा हा पंचमहाभूतांचा जनक होय. तोच जीवरूपाने शरीरधारी झालेला असतो. ज्यास अग्नी जाळू शकत नाही, असा हा आत्मा हेच आपले खरे स्वरूप आहे, असा अनुभव असलेल्या व्यक्तीचे शरीरही तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे, ते बीज म्हणजे ब्रह्मरूप झालेले असते. राजा जनक व जेनी हे दोघेही ब्रह्मरूप वा आत्मरूप आपण अग्नीचाही अग्नी वा जनक असल्याचे अनुभवत होते. म्हणूनच सामान्य माणसांना असते, तशी अग्नीची वा इतर कशाचीही भीती वा समस्या त्यांना उरली नव्हती. 

व्यावहारिक पातळीवरील समस्येचे निराकरण, केवळ व्यावहारिक पातळीवरील विचारांनी करणे निष्फळ ठरते व उच्च आध्यात्मिक पातळीवरून केल्यावर सफल होते, असे गीता-ज्ञानेश्वरी वाचतानाही आपल्या लक्षात येते. आपल्या सग्यासोयऱ्यांशी युद्ध करणे उचित नाही, असे अर्जुनास वाटू लागते. श्रीकृष्णापुढे तो आपला विचार व्यक्त करतो. धनुष्यबाण खाली ठेवतो. त्याच्या मनात निर्माण झालेल्या त्या मोहरूपी समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न म्हणून कौरवांनी पांडवावर केलेल्या अनेक अन्यायांची आठवण श्रीकृष्ण त्यास करून देतो. हे धर्मयुद्ध आहे, युद्ध हे क्षात्रकर्तव्य आहे, तुझा तो स्वधर्म आहे, हे तुझे भाग्य आहे, तू युद्ध केले नाहीस तर तुझे शत्रू तू त्यांना भ्यायला म्हणून तुला चिडवतील, तुझी निंदा करतील, तुझ्यासारख्या शूराला ती अपकीर्ती सहन करणे कठीण होईल, युद्धात मेलास तर स्वर्गात जाशील व जिंकलास तर राज्य उपभोगशील, अशा अनेक प्रकारे तो अर्जुनाला समजावून सांगतो.

म्हणजे, व्यावहारिक पातळीवरील समस्या व्यावहारिक पातळीवरूनच सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण अर्जुनाला त्याचे म्हणणे पटत नाही. शेवटी, तू मारले तरच तुझे शत्रू वगैरे सारे मरतील, नाही तर ते मरणारच नाहीत, हे खरे नसून त्यांचा काळच त्यांना ग्रासावयास जवळ येऊन ठेपला आहे, कर्ता करविता एक देवच आहे, मारणारा तू केवळ निमित्तमात्र आहेस, हे अंतिम सत्य श्रीकृष्ण आपल्या विश्वरूपाचे दर्शन घडवत म्हणजे अर्जुनास आपल्या आध्यात्मिक पातळीवर नेऊन पटवून देतो.    

त्या विश्वरूपात चाललेला हा सारा मायेचा खेळ आहे, शत्रूंची व मित्रांची शरीरे जरी नाहीशी झाली, तरी त्यांचे जीव अमरच असतील, असे श्रीकृष्णाने दिलेल्या दिव्यज्ञानदृष्टीने पाहिल्यानंतरच म्हणजे व्यावहारिक पातळीवरील कठीण प्रश्नाचे आध्यात्मिक पातळीवरील जाणीवेत सर्वथैव उचित उत्तर मिळाल्यानंतरच अर्जुन युद्ध करू लागतो, विजयी होतो आणि त्यानंतर श्रीकृष्णोक्तिनुसार राजा जनकादींप्रमाणे राज्यकारभार करत राहतो. (पहा - गीता, ३.२० व १८.७३)

.............................................................................................................................................

लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

vijaymaher@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......