माणसाच्या हस्तक्षेपामुळे कुत्र्यांमध्ये साडेतीनशेपेक्षा जास्त जाती तयार झाल्या!
पडघम - विज्ञाननामा
सौरभ नानिवडेकर
  • कुत्र्यांच्या विविध जातीची छायाचित्रं
  • Mon , 09 September 2019
  • पडघम विज्ञाननामा जागतिक श्वान दिन International Dog Day कुत्रा Dog चुवावा Chihuahua ग्रेटडेन Great Dane

२६ ऑगस्ट हा ‘जागतिक श्वान दिन’ (International Dog Day). त्यानिमित्तानं कुत्र्यांविषयी काही रंजक व रोचक माहिती देणारी ही लेखमालिका सुरू झाली. त्यातला हा तिसरा लेख. पुढचा लेख येत्या सोमवारी प्रकाशित होईल.

.............................................................................................................................................

कुत्रा हा जगातला पहिला माणसाळलेला आणि इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा सर्वांत जास्त वैविध्य असणारा प्राणी आहे. जगातील सर्वांत छोटा कुत्रा चुवावा (chihuahua) हा एका पर्समध्येही मावू शकतो. त्याची उंची जास्तीत जास्त २३ सेंमी आणि वजन जेमतेम तीन किलो असतं. त्याउलट ग्रेटडेन (great dane) हा सगळ्यात मोठा कुत्रा जेव्हा माणसाचा खांद्यावर आपले पुढचे पाय ठेवून उभा राहतो, तेव्हा त्याची उंची भरते सात फूट. या जातीच्या कुत्र्याचं वजन साधारण ९० किलोपर्यंत असतं. गंमत म्हणजे हे दोन्ही canis lupus familiaris या एकाच प्रजातीचे प्राणी मिळून एक तंदुरुस्त जीव जन्माला घालू शकतात.

एवढंच नव्हे तर कुत्रा लांडग्याबरोबरही तंदुरुस्त जीव जन्माला घालू शकतो. तरीही लांडग्यामध्ये आणि त्याच्यापासून उत्क्रांत झालेल्या कुत्र्यात एवढी विविधता कशी? जगभरात कुत्र्यांच्या जवळ जवळ ३४० वेगवेगळ्या जाती आढळतात. प्रत्येक जातीचा किंवा breedचा कुत्रा दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो. Selective breeding हे जरी त्याचं कारण असलं तरी पृथ्वीवरच्या इतर कोणत्याही प्राण्यात एवढी विविधता आढळत नाही.

या वैविध्याची सुरुवात कुत्र्याच्या जन्मासारखी फार पूर्वीच झाली. माणसांनी माणसाळवलेला इतर कोणताही प्राणी बघा, त्याचा उपयोग मर्यादित असतो. गाई-गुरं दुधासाठी, शेतीच्या कामासाठी व मांसासाठी, शेळ्या-मेंढ्या मांस, लोकर व दुधासाठी, कोंबड्या व डुकरं मांसासाठी असे त्यांचे उपयोग असतात, पण कुत्रा यापैकी कोणत्याच कामाला येत नाही.

फार पूर्वी आपले पूर्वज जेव्हा शिकार करून राहायचे, तेव्हा कुत्र्यांना ते आपल्यासोबत न्यायचे. कुत्र्यांच्या तीक्ष्ण नाकांचा, कानांचा उपयोग त्यांना शिकार शोधण्यासाठी व्हायचा. असे जे कुत्रे सावजाचा वास घेऊन शिकार शोधण्यात चांगले असायचे, त्यांना माणसांच्या टोळ्यात चांगली वागणूक मिळायची. शेकोटीजवळची जागा मिळायची, त्यांना अन्नही जास्त दिलं जायचं. त्यामुळे त्यांची जगण्याची आणि पुनरुत्पादनाची शक्यता वाढू लागली. असं सातत्यानं होत राहिल्यामुळे त्यांची पुढची पिढी आपोआपच इतरांपेक्षा तीक्ष्ण नाक असलेली तयार व्हायला लागली. त्यामुळे शिकारीसाठी त्यांचा जास्त उपयोग व्हायला लागला. परिणामी त्यांना माणसांकडून आणखी चांगली वागणूक मिळू लागली. survival of the fitest या नियमानुसार पहिला scent hound या प्रकारातला कुत्रा तयार झाला.

जी कुत्री सावजाच्या मागे वेगानं पळून स्वतः शिकार करायची, त्यांच्या बाबतीतही हाच नियम लागू झाला. त्यामुळे त्यांची पिल्लं होण्याची शक्यता वाढली आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या शिकारीत आणखी आणखी पटाईत आणि जास्त जास्त वेगवान होत गेल्या.

शेतीचा शोध लागून शेळ्या-मेंढ्या, गाई-गुरं जेव्हा माणसाळली, तेव्हा शिकारीच्या अगदीच विरुद्ध म्हणजे जनावरं राखण्याचं काम कुत्री करायला लागली. त्यातही जी कुत्री हलतं जनावर बघून त्याची शिकार करण्याची ऊर्मी (prey drive) नियंत्रित करू शकली, त्यांना आपोआपच प्राधान्य मिळत गेलं. शेळ्या-मेंढ्यांवर हल्ला न करता जे त्यांचं रक्षण करायचे, त्यांना माणसांकडून अन्नातला मोठा वाटा मिळाययला लागला. परिणामी त्यांची पुढची पिढी अजून सक्षम होत गेली.

पुढं खाजगी मालमत्ता म्हणजेच घर, जमीन, गुरं अस्तिवात आल्यावर त्यांच्या रक्षणार्थ कुत्री वापरली जायला लागली. ज्या कुत्र्यांमध्ये teretorial instinct जास्त असायचं, अशी कुत्री प्राणपणानं आपल्या जागेसाठी भांडायची. त्यामुळे अशा कुत्र्यांना प्राधान्य मिळायला लागलं. त्यातून त्यांच्या पुढच्या पिढ्या आणखी निष्णात होत गेल्या. अशा प्रकारे रानटी लांडग्यातले वासावरून माग काढत शिकार करणं, कळपाची सुरक्षा करणं, आपल्या हद्दीची राखण करणं इत्यादी कुत्र्यांचे गुण माणसांनी आपल्या फायद्यासाठी वापरले आणि प्रत्येक गुणात निष्णात असे कुत्र्यांचे त्यांच्या कामावरून वेगवेगळे प्रकार पडत गेले.

व्हिक्टोरियन काळापर्यंत या प्रकारात कुत्री विभागली गेली. त्या काळात शिकार आणि राखणीसाठी उपयोगी पडणारी hound आणि masttif प्रकारातली मोठी कुत्री राजे-राजवाडे यांच्याकडे आणि इतर कुत्री मेंढपाळ व शेतकऱ्यांकडे असायची. व्हिक्टोरियन काळात selective breeding या प्रकारचा शास्त्रशुद्ध पद्धतीनं वापर करून कुत्र्यांच्या रंगरूपावर आधारित अनेक जाती तयार केल्या गेल्या. त्यातूनच आज परिचित असलेल्या बहुतांशी जाती तयार झाल्या.

पुढं जनुकीय तंत्रज्ञान (genetices) जसजसं विकसित होत गेलं, तसतसं कुत्र्यांच्या आकारातल्या वैविध्याचं कोड सुटलं. Inbreedingमुळे कुत्र्यांची genetic diversity कमी झाली, तसा माणसांना फायदा झाला. कारण genetic diversity कमी असल्यामुळे एखाद्या कामासाठी संबंधित जीन शोधणं कुत्र्यांच्या limited genepoolमुळे शक्य झालं. insulin like growth factor हे संप्रेरक तयार करणारी igf1 ही जीन सस्तन प्राण्यांमध्ये संप्रेरक तयार करते. ती हाडांच्या आणि स्नायूंच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. कुत्र्यांमध्ये उत्क्रांतीच्या कोणत्या तरी टप्प्यावर या जीनमध्ये उतपरिवर्तन (mutation) घडून आलं. त्यातून चुवावासारख्या अतिशय लहान आकाराच्या कुत्र्यामध्ये हे संप्रेरक खूप कमी प्रमाणात तयार होतं, तर ग्रेट डेनसारख्या अतिविशाल कुत्र्यामध्ये खूप जास्त प्रमाणात होतं, हे लक्षात आलं. कुत्र्यांच्या आकारात एवढी विविधता दिसून येते ती यामुळेच.

रशियात राखी कोल्ह्यांवर (silver foxes) केल्या गेलेल्या प्रयोगातून आणखी काही गोष्टी लक्षात आल्या. लांडग्याचं कुत्र्यात रूपांतर कसं झालं हे पाहण्यासाठी या प्रयोगाला १९६० मध्ये सुरुवात झाली. पन्नासेक राखी कोल्ह्यांना पकडून त्यांना एका बंदिस्त पिंजऱ्यांमध्ये वेगवेगळं ठेवण्यात आलं. त्यातले जे सगळ्यात जास्त मवाळ (tame) आहेत, माणसांवर हल्ला करत नाहीत, असे नर-मादी निवडले गेले आणि त्यांचं मीलन घडवून आणलं गेलं. असं त्यांच्या अनेक पिढ्यांचं tameness या एकाच वैशिष्ट्यासाठी selective breeding केल्यानंतर साधारण आठव्या-नवव्या पिढीमध्ये मोठे बदल दिसायला लागले. राखी रंग जाऊन त्यांच्या अंगावर कुत्र्यासारखे पांढरे ठिपके दिसायला लागले. त्यांची शेपटी वाकडी झाली, कुत्र्यांसारखे कान पडायला लागले. काही कोल्हे तर नाव घेतल्यावर प्रतिसादही द्यायला लागले. कुत्र्यांसारखीच माणसं जवळ आली की, शेपूट हलवत ते त्यांच्याकडून कुरवाळून घ्यायला लागले.

पुढं असं लक्षात आलं की, tameness या एकाच गुणासाठी निवडलेल्या कोल्ह्यांमध्ये adrinalin या संप्रेरकाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळेच ते मवाळ आणि कमी आक्रमक झाले होते. Adrinalin चा melanin या रंगद्रव्याला कारणीभूत असलेल्या संप्रेरकाशी रासायनिक संबंध आहे. त्यामुळे ज्या कोल्ह्यांमध्ये adrinalinचं प्रमाण कमी होतं, त्यांच्यात melanin ही कमी प्रमाणात तयार होत होतं आणि त्यामुळे त्यांचा रंग उजळला होता.

लांडग्याचं कुत्र्यात रूपांतर होतानाही अगदी असंच घडलं होत. मावळ लांडगेच आधी माणसाळले. यावरून लांडग्याच्या रंगात आणि वर्तनात कसा बदल झाला आणि त्याचा कुत्रा कसा झाला, हे समजलं. आणि लांडगा व कुत्र्यामध्ये एवढं शारीरिक वैविध्य का हेही.

अशा प्रकारे माणसाच्या हस्तक्षेपामुळे कुत्र्यामध्ये एवढी विविधता तयार झाली!

एवढे शेकडो प्रकार असले तरी कुत्री कधी ‘आम्हीच श्रेष्ठ!’ असं म्हणत भांडताना दिसत नाहीत. ते काम माणसांचंच!

............................................................................................................................................

या मालिकेतले आधीचे लेख -

१) प्रमाणीकरणाच्या हव्यासामुळे खूप कुत्र्यांचे बळी जातात, जगभर!

https://www.aksharnama.com/client/article_detail/3585

२) लांडग्याचा ‘कुत्रा’ झाला, तो कुत्रा ‘माणसाळला’, त्याचा माणसाला प्रचंड ‘फायदा’ झाला, त्या गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट!

https://www.aksharnama.com/client/article_detail/3598

............................................................................................................................................

लेखक सौरभ नानिवडेकर व्यवसायाने मॅकेनिकल इंजिनीअर असून त्यांना वाचन, लेखन, संगीत, चित्रपट, रानावनात फिरणे, आकाशनिरीक्षण, प्राणी, पक्षी इत्यादी अनेक विषयांची आवड आहे.

 saurabhawani@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......