‘लालबत्ती’ : माणूसपण जपण्याचा निर्धार करणाऱ्या पोलिसांची कहाणी
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘लालबत्ती’चं पोस्टर
  • Sat , 24 August 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie Laal Batti लालबत्ती मंगेश देसाई Mangesh Desai गिरीश मोहिते Girish Mohite

या सिनेमाची सुरुवात मुंबई या शहरापासून होते. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांनी एक ‘शीघ्र कृती दल’ (क्विक रिस्पॉन्स टीम) स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला असतो. ही टीम निर्माण करण्याचा उद्देश दहशतवादी हल्ल्याला रोखणं आणि जशास-तसं उत्तर देणं हा असतो. त्यात काम करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या माणूसपणाची ही कथा आहे.

या टीमसाठी निवडलेल्या कमांडोची पूर्वतयारी वरिष्ठ पोलीस अधिकारी एस. बी. पवार (मंगेश देसाई) यांच्याकडे असते. पवारांची ओळख एक शिस्तप्रिय आणि कर्तबगार पोलीस अधिकारी अशी असते. मात्र जेव्हा पोलीस खात्याअंतर्गत चाललेले वाद आणि पोलिसांची ढासळती मानसिक स्थिती याचा त्यांना अंदाज यायला लागतो, तेव्हा ते सावध होतात. त्यांच्याभोवती असणाऱ्या पोलिसांबद्दल ते सहानभूतीनं विचार करायला लागतात.

त्यांच्या कमांडो टीमचा गणेश धांगडे (तेजस) हा तरुण सतत उदास असल्याचं त्यांना जाणवतं. त्यामुळे त्याची अडचण समजून घेण्याचा ते प्रयत्न करू लागतात. आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम करताना त्यांना त्रास सहन करावा लागतो. वरिष्ठ पोलीस अधिकारी अनुराग दीक्षित (मनोज जोशी) यांचा पवार यांच्यावर विश्वास असतो, मात्र त्यांच्या कानावर पवार करत असलेल्या सगळ्या गोष्टी जायला लागतात. प्रसंगी सगळं सोडून पवार माणूसपण जपण्याचा निर्धार पत्नीजवळ व्यक्त करतात आणि तिथून पुढे सिनेमा एका वेगळ्याच रोमांचक दिशेला प्रवास करू लागतो.

सिनेमाचा गाभा पोलीस हा घटक आहे. मात्र त्याला असलेला भावनिकतेचा स्पर्श पोलिसांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करतो. सिनेमा पोलिसावर असला तरी अ‍ॅक्शनपटासारखी मारधाड त्यात नाही. त्यामुळे त्यात उथळ आणि भडक असे प्रसंग नाहीत. कथेला पूरक आणि संवादाचा परिणामकारक वापर यांनी हा सिनेमा बहरलेला आहे. 

‘क्विक रिस्पॉन्स टीम’ ही मुंबई पोलिसांची एक तगडी टीम पडद्यावर उभी करताना दिग्दर्शकानं त्यातला धाडसीपणा अचूकपणे टिपला आहे. त्यातल्या छोट्या-छोट्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे. कमांडोची ट्रेंनिग कशी घेतली जाते इथपासून ते वरिष्ठाचा आदर राखण्याचे संकेत आणि परेड वेळीच्या प्रत्येक हालचाली हुबेहूब पडद्यावर दिसतात. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी संतापलेला असताना सर्वत्र पसरलेली भयाण शांतता आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी केली म्हणून कौतुकाची थाप पाठीवर मारणारे वरिष्ठ अधिकारी, या सगळ्या माणसाच्या पातळीवर घडणाऱ्या छोट्या-छोट्या घटना अत्यंत प्रभावीपणे सिनेमात आल्या आहेत.

सिनेमाचं नाव ‘लालबत्ती’ हे नाव रहस्यमय पद्धतीनं सिनेमाच्या परिघावर फिरत राहतं. त्यामुळे त्याचा अर्थ उलगडून सांगणं हे सिनेमावर अन्याय करणारं ठरेल. कारण सिनेमाची भिस्त त्यावर अवलंबून आहे.

पोलीस आणि कुटुंब यांच्यातला दुरावा, दिवस-रात्र नोकरीमुळे आलेली उदासीनता, घरातील वाद, सामाजिक पातळीवर मिळणारी वागणूक, नोकरीचा मिळणारा मोबदला आणि त्यावर उभारलेली स्वप्नं अशा अनेक बाजूंचा उलगडा करत असताना कथा ताणली गेलेली नाही. सिनेमा या बाजूंना स्पर्श करत राहतो आणि कथा पुढे जात राहते.

सिनेमाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी कथा परिणामकारक ठरली आहे. पूर्वार्धात संशय निर्माण करणाऱ्या गोष्टी घडत जातात, तर उत्तरार्धात सिनेमाला कलाटणी देताना चकित करायला लावणाऱ्या घटना पुढे येत राहतात. त्यातल्या प्रत्येक घटनेचा दुसऱ्या घटनेशी संबंध जोडलेला आहे. एक बाजू मात्र सिनेमाला किंचित मागे खेचते, ती म्हणजे सिनेमाची गती. कॅमेऱ्याच्या नजरेतून प्रत्येक गोष्ट दाखवताना सिनेमाच्या गतीवर त्याचा नकारात्मक परिणाम झाल्याचं दिसतं. त्यामुळे लांबलचक प्रसंग तयार झाले आहेत. मात्र संवाद आणि अभिनयामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येतं. पूर्वार्धाच्या शेवटी दारू पितानाचा प्रसंग दाखवताना त्यात चालणाऱ्या गमतीजमतीच्या वेळी वरिष्ठ-कनिष्ठ असा भेद स्पष्ट दाखवण्यासाठी कॅमेरा वापरला आहे. संवादापेक्षा कॅमेरा जास्त बोलतो, तिथं प्रसंगाची लांबी वाढते. त्यामुळे अशा प्रसंगाकडे कानाडोळा करावा लागतो.

गिरीश मोहिते यांनी ‘भारतीय’, ‘कंडीशन अप्लाय’, ‘फेराफेरी हेराफेरी’ यांसारख्या सिनेमानंतर ‘लालबत्ती’ दिग्दर्शित केला आहे. एका गंभीर विषयाला हाताळण्यात ते यशस्वी झाले आहेत. सिनेमाचे संवाद अरविंद जगताप यांनी लिहिलेले आहेत. संवाद पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या आवतालभोवतालाशी समर्पक ठरतात. गणेशची भूमिका साकरणारा तेजस संपूर्ण सिनेमात मोजकेच संवाद बोलतो. मात्र त्याचे संवाद एकप्रकारे त्याला संशियत ठरवण्यास उपयोगी ठरतात. पवार आणि त्यांचा ज्युनिअर (रमेश वाणी) यांच्यातले संवाददेखील असेच प्रभावी आहेत.

मंगेश देसाई यांनी अत्यंत विचारी आणि माणूसपण जपणारा पोलीस आपल्या अभिनयातून साकरला आहे. भार्गवी चिरमुले यांनी साकारलेली भूमिका (सायली) पवारांच्या समजदार पत्नीची आहे. पतीच्या कर्तव्याची जाणीव असणारी आणि त्यामुळे मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वतः वाहणारी सायली प्रचंड संयमी दाखवली आहे. कमांडोच्या भूमिका साकारणारे बरेच कलाकार नवीन आहेत. त्यांच्याकडून उत्तम अभिनय करून घेतला आहे. त्याचबरोबर तेजस, मनोज जोशी, रमेश वाणी, मीरा जोशी यांनीदेखील अभिनयाचं आव्हान बखुबी पेललं आहे.

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......