टिळक यांचे चरित्र ही गोष्ट परत परत लिहावी अशीच आहे!
ग्रंथनामा - झलक
सदानंद मोरे
  • ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 12 August 2019
  • ग्रंथनामा Granthnama झलक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक Lokmanya Bal Gangadhar Tilak सदानंद मोरे Sadanand More महात्मा गांधी Mahatma Gandhi

१ ऑगस्ट २०१९ पासून लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने संतसाहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांच्या ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ या चरित्राची नवी आवृत्ती काल पुण्यात समारंभपूर्वक प्रकाशित झाली. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला मोरे यांनी लिहिलेल्या मनोगताचा व पूर्ववृत्ताचा हा संपादित अंश...

............................................................................................................................................................

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. संपूर्ण देशाचे नेतृत्व करणारा टिळक हा पहिला नेता. ज्याला मानणारे व ज्याचा शब्द झेलून त्यानुसार वागणारे अनुयायी सर्व धर्मांच्या, प्रदेशांच्या व जातीपातींच्या लोकांमध्ये होते, असे अखिल भारतीय पातळीवरील पहिले नेतृत्व हे टिळकांचे.

१८५७च्या उठावापूर्वी आणि नंतरही वहाबी बंडखोरांनी ब्रिटिशांना कधी सतावले असे नाही; पण ते पडले एका विशिष्ट धर्मांचे आणि त्यांना ब्रिटिश सत्ता- ब्रिटिश कायदा काहीच मान्य नव्हते. टिळकांनी कोणत्याही एका विशिष्ट समाजघटकाचे प्रतिनिधित्व करण्याऐवजी ‘आपण सर्वांचे नेते आहोत’, अशी भूमिका घेतली आणि आपण जे काही लिहितो, बोलतो वा करतो ते सर्व ब्रिटिश कायद्याच्या चौकटीत, असे म्हणून ब्रिटिशांचे काम अवघड करून सोडले.

दुसरे असे की, टिळक यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला वैचारिक, खरे तर तात्त्विक अधिष्ठान दिले. तिला जीवनदृष्टी दिली. टिळकांनी स्वातंत्र्याची गरज ही मूलभूत गरज असण्याची जाणीव करून दिली. ‘स्वराज्याची सर सुराज्यात नाही’ या शब्दांत ही जाणीव व्यक्त झाली आणि स्वराज्य तर जन्मसिद्ध हक्क.

आता अशी व्यक्ती चर्चेचा विषय न झाली तरच आश्‍चर्य. ही चर्चा टिळक यांच्या हयातीतच सुरू झाली आणि ती अजूनही म्हणजेच काळाला पुरून उरली आहे.

नवी साधने उपलब्ध झाली तर चरित्र नव्याने लिहिणे भागच पडते. तिथे ते लिहायचे की लिहायचे नाही अशा पर्यायांना वावच नसतो. मुद्दा असा आहे की, या नव्या साधनसामग्रीचा उपयोग करून एखाद्या अभ्यासकाने ते लिहिले म्हणजे सारे काही संपले असे होत नसते. इतिहासलेखनात ‘डेड एन्ड’ कधीच येत नाही. सदर अभ्यासक कितीही विद्वान, मेहनती आणि प्रामाणिकही असला, तरी त्याने या नव्या उपलब्ध सर्वच्या सर्व साधनांचा परामर्श घेतला असेलच असे म्हणता येत नाही.

दुसरे म्हणजे त्याने या पुराव्याचा लावलेला अन्वयार्थ एकमेव आणि अंतिम असलाच पाहिजे, असेही नव्हे. तिसरे असे की या साधनांची एकूण पुराव्यात कोठे ‘प्लेसमेंट’ करायची, त्यांना किती वजन किंवा महत्त्व द्यायचे याबद्दल मतभेद होऊ शकतात आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा अभ्यासकाच्या दृष्टिकोनाचा आहे. अभ्यासक कोणत्या संप्रदायाचा (School) आहे हा प्रश्‍न विचारावाच लागतो. येथे संप्रदाय या शब्दाने केवळ अभ्यासक्षेत्रातील (Academic) संप्रदाय (जसे पॉझिटिव्हिझम) अभिप्रेत नसून अभ्यासकाची सामाजिक, राजकीय, धार्मिक (आणि भारतासारख्या देशात जातीयसुद्धा) बांधिलकी विचारात घेतली आहे.

चरित्रविषय असणार्‍या व्यक्तीच्या अंगानेही याचा विचार करता येतो. असा विचार टिळक यांच्या संदर्भात शि.ल. करंदीकर यांनी ‘टिळक भारत’ या टिळक चरित्रात समर्पकरीत्या मांडला आहे. “टिळक ही विभूतीच इतकी अनेकांगी होती की, कोणा एका माणसाला तिच्या सर्वांगीण चरित्राचे आकलन करता आले नसते.’’ चरित्रनायक आणि लेखक यांच्याप्रमाणे वाचकांचाही विचार व्हायला हवा. करंदीकरांनी तोही केला आहे. ते लिहितात - ‘नवी पिढी आली की तिचे लक्ष नव्या विषयांत गुंतते, मागच्या पिढीत लोकप्रिय ठरलेली लेखनपद्धती चालू पिढीत मागे पडते. त्यामुळे टिळकांसारख्या लोकोत्तर विभूतीचे चरित्र तर नव्या पिढीने नव्याने लिहिणेही आवश्क आहे, असे मला वाटते.’

टिळक त्यांच्या हयातीतच चरित्रलेखनाचा विषय म्हणजेच चरित्रनायक बनले होते. (त्याही अगोदर ते नाटकाचे विषय झाले होते; नंतरही राहिले.) कृष्णाजी आबाजी गुरुजी यांनी १९०६मध्ये टिळक यांच्या चरित्राचा पहिला भाग प्रसिद्ध केला, तो टिळक यांच्या एक्कावनाव्या वाढदिवसानिमित्ताने. टिळक यांचे लेखनिक म्हणून काम करणारे आपाजी विष्णु कुलकर्णी यांचे ‘लोकमान्य टिळक यांची गेली आठ वर्षे’ हे पुस्तक १९०९मध्ये ‘इंदुप्रकाश’चे दामोदर सावळाराम यंदे यांनी प्रकाशित केले. थोडक्यात सांगायचे म्हणजे टिळक यांचे चरित्र ही गोष्ट परत परत लिहावी अशीच आहे.

वासाहतिक काळात अखिल भारताचे नेतृत्व करणारे पहिले नेते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळकांमुळे महाराष्ट्राचे नाव पुन्हा एकदा भारतीय पातळीवर पोहोचले. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात टिळकांनी पहिल्यांदाच साध्य आणि साधन यांच्याविषयी स्पष्टता दिली. त्या अनुरोधानेच महात्मा गांधींनी भारताचा स्वातंत्र्यलढा पुढे नेला.

टिळक केवळ सेनापती नव्हते. ते अव्वल दर्जाचे अभ्यासक आणि तत्त्वचिंतक होते. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यालाही आपोआप तात्त्विक बैठक प्राप्त झाली. ‘स्वराज्याची सर सुराज्याला नाही’ आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ ही टिळकांची वाक्ये म्हणजे स्वातंत्र्याच्या तत्त्वज्ञानाची महावाक्येच होत.

टिळकांचे चरित्र ही एक आव्हानात्मक गोष्ट आहे. याचे कारण म्हणजे आपल्या अगोदरच्या पिढीचे न्या. म.गो. रानडे, समकालीन गोपाळराव गोखले आणि नंतरच्या पिढीतले रँग्लर र.पु. परांजपे अशा राजकारणातील नेमस्तांच्या तीन पिढ्यांशी टिळकांनी संघर्ष केला. दुसरीकडे सामाजिक बाबतीत आगरकर प्रभृतींशीही त्यांना लढावे लागले. तिसरीकडे आपल्या सनातनी अनुयायांना सांभाळून घेताना त्यांना नाना कसरती कराव्या लागल्या. या सर्व मुद्द्यांचा परामर्श चरित्रकारास घ्यावा लागेल. मी त्यासाठी पात्र असल्याचा माझा दावा नाही; परंतु टिळकांविषयीच आदरामुळे मी हे साहस करायला प्रवृत्त झालो. त्याचे मूल्य ठरवण्याचा अधिकार अर्थातच वाचकांचा आहे.

............................................................................................................................................................

'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा - 
https://www.booksnama.com/book/5016/Lokmanya-Bal-Gangadhar-Tilak

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......