अजूनकाही
‘टीव्हीच्या पडद्यामागचं विश्व’ हे माध्यमअभ्यासक डॉ. कविता राणे यांचं पुस्तक नुकतंच डायमंड पब्लिकेशन्सच्या वतीनं प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात टीव्हीच्या पडद्यामागचं रचनात्मक, प्रक्रियात्मक आणि संशोधनात्मक पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आहे. पाश्चिमात्य आणि विकसित देशांमध्ये इतर सर्व समाजमाध्यमांप्रमाणेच टीव्ही या माध्यमाचाही अनेक अंगानी विचार आणि अभ्यास केला गेला. भारतात टीव्ही या विषयावर गांभीर्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण लेखन अभावानेच वाचायला मिळते. मराठी वाचकांना, संज्ञापन आणि पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टीव्ही या विषयाची ओळख व्हावी हा या पुस्तकाचा मूळ हेतू आहे. या पुस्तकाला लेखिकेनं लिहिलेली ही प्रस्तावना...
...........................................................................................................................................
टीव्ही हा सध्या त्याच्या नव्वदीकडे वाटचाल करतोय. एका पिढीचा काळ हा साधारण २० वर्षांचा असतो असं मानलं, तर टीव्हीची सध्या पाचवी पिढी जगभरात वावरतेय असं म्हणायला लागेल. टीव्हीची पहिली पिढी ही विकसित देशांतील काही विशिष्ट लोकांपुरती मर्यादित होती, पण टीव्हीच्या या पाचव्या पिढीनं मात्र आता अवघं जग व्यापलंय. टीव्ही नाही असा देश सापडणं आता तरी शक्य नाही.
या शतकभराच्या काळात टीव्हीनं अनेक बदल अनुभवले. हे बदल प्रामुख्यानं दोन प्रकारचे होते. एक म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीत झालेले बदल आणि दुसरे म्हणजे टीव्हीच्या कार्यक्रमांच्या बाबतीत झालेले बदल. दोन्ही प्रकारचे हे बदल स्थल-कालपरत्वे थोडेफार वेगवेगळे होते, मात्र आता पाचव्या पिढीत आलेलं टीव्हीचं तंत्रज्ञान आणि कार्यक्रम या दोन्हींच्या बाबतीत काही साचे पक्के झाले आहेत. यामध्ये विशिष्ट जागेसाठी टीव्हीचा आकार ते विशिष्ट लोकांसाठी आणि विशिष्ट वेळेसाठी कार्यक्रमांची रचना, या सर्वांसाठीचे साचे आहेत. टीव्ही असा एकत्रितपणे विचार करताना, या सगळ्या साच्यांचा विचार करणं क्रमप्राप्त ठरतं.
टीव्ही या विषयाच्या दोन बाजू आहेत आणि त्या समोरासमोर उभ्या असतात. या दोन्ही बाजू आपापल्या नजरेनं पलीकडच्या बाजूचा विचार करत असतात. एक बाजू टीव्हीच्या पडद्याच्या अलीकडे असते, तर दुसरी बाजू टीव्हीच्या पडद्याच्या पलीकडे असते.
टीव्हीच्या पडद्याच्या अलीकडील बाजू टीव्हीवरील मजकूर तयार करणारी असते, तर टीव्हीच्या पलीकडील बाजू त्या मजकुराचं ग्रहण करणारी असते. एक बाजू देणारी असते तर दुसरी बाजू स्वीकारणारी असते. टीव्हीवर काय दाखवायचं, कसं दाखवायचं, केव्हा दाखवायचं या सगळ्या प्रश्नांना नियंत्रणात ठेवणारी बाजू असते टीव्हीच्या अलीकडची; ज्यामध्ये टीव्ही वाहिन्यांचे मालक, कार्यक्रमांचे निर्माते आदींचा समावेश असतो. टीव्हीची ही अलीकडील बाजू जवळपास सगळ्या गोष्टी आपल्या हातात नियंत्रित ठेवते.
टीव्हीवर दिलेला मजकूर पाहायचा की नाही, हे टीव्हीच्या दुसर्या बाजूकडे म्हणजे प्रेक्षकांकडे असलेलं एकमेव नियंत्रण. मात्र हे एकमेव नियंत्रण इतकं मजबूत की, त्यानेच दोन्ही बाजूंचा समतोल राखला जावा. टीव्हीशी संबंधित असणारी प्रत्येक व्यक्ती हा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते.
टीव्हीच्या या शतकभराच्या प्रवासात पडद्याच्या अलीकडील आणि पलीकडील अशा दोन्ही बाजूंमध्ये असणारा समतोल ढळणार्या अनेक गोष्टी घडल्या, मग तो चित्रपटांचा टीव्हीच्या पडद्यावर झालेला उदय असो, रिमोट कंट्रोलसारखं भन्नाट नियंत्रण असो, केबलचा बोलबाला असो किंवा अगदी आत्ताच्या काळात फोफावलेलं इंटरनेट असो. या सगळ्या गोष्टींनी टीव्हीच्या जगतात प्रचंड उलथापालथ घडवून आणली. अनेकदा पडद्याच्या अलीकडल्या आणि पलीकडल्या बाजूंची ताकद प्रचंड वाढली, मात्र ढळलेला समतोल फार काळ टिकून राहील, अशी परिस्थिती काही निर्माण झाली नाही.
गेल्या साधारण दशकभरापासून मात्र टीव्हीच्या एकूण अस्तित्वाबाबतच चर्चा सुरू झाल्या आहेत. येत्या काही वर्षांत टीव्ही राहील की जाईल, याबाबतच्या या चर्चा आहेत आणि त्याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे इंटरनेट. टीव्ही व्यतिरिक्तच्या पडद्यावर टीव्ही पाहता येणं, हे इंटरनेट आणि मोबाईलचा संगम साधणार्या स्मार्टफोन्सनं सहज शक्य केलं. आता टीव्ही पाहण्यासाठी टीव्हीचा पडदा मुळीच गरजेचा नाही. अगदी भारतासारख्या विकसनशील देशातही टीव्ही न पाहताच मोठी होणारी एक पिढी सध्या जन्माला येतेय. ही पिढी टीव्ही पाहत नाही, म्हणजे टीव्हीसाठी बनवलेला मजकूरच पाहत नाही असं म्हणता येणार नाही; कारण ही पिढी फक्त टीव्हीच्या पडद्यावर हा मजकूर न पाहता मोबाईलच्या पडद्यावर पाहतेय. इंटरनेटसाठी तयार केलेला स्वतःचा असा मजकूर खूप कमी असल्याने हे घडतं.
टीव्हीचा मजकूर इंटरनेटवर सगळ्यात जास्त लोकप्रिय होण्याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे, टीव्हीकडे एक लेखक किंवा एक निर्माता म्हणून असलेली कायदेशीर, विश्वासदर्शक ओळख आहे, जी इंटरनेटकडे नाही. इंटरनेटवर लाखोंच्या संख्येनं पाहिल्या जाणार्या एखाद्या व्हिडिओचा नेमका निर्माता कोण आणि त्या निर्मितीमागची त्याची नेमकी भूमिका काय, हे प्रेक्षकाला सहसा कळत नाही. त्यामुळे मनोरंजनात्मक गोष्टींपुरता, सोयीनुसार इंटरनेटचा वापर असा साधारण पायंडा पडला आणि पडद्याच्या पलीकडच्या हातांमध्ये जास्तीत जास्त नियंत्रण जातंय, असं हळूहळू स्पष्ट व्हायला लागलं. मात्र इंटरनेटवर टीव्हीवरीलच मजकुराचा प्रभाव जसजसा वाढत गेला, तसतसा मात्र नियंत्रणाचा समतोल पुन्हा एकदा मूळ पदावर आला.
गेल्या तीन-चार वर्षांत मात्र परिस्थिती पुन्हा एकदा दोलायमान झाल्याचं वातावरण स्पष्ट होतंय. स्वतंत्रपणे इंटरनेटसाठी निर्माण केलेल्या मजकुराचं प्रमाण आणि त्याचा खप यात प्रचंड वाढ झालीय. ‘नेटफ्लिक्स’ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. भारतातही ‘अॅमेझॉन प्राईम’सारख्या उत्पादनांच्या माध्यमातून हे प्रमाण वाढताना दिसू लागलंय. याशिवाय स्वतंत्र यू-ट्युब वाहिन्याही प्रचंड लोकप्रिय होतायत. त्यामुळे टीव्हीच्या पडद्यावर कधीही न येणारा मजकूर आता फक्त इंटरनेटच्या माध्यमातून पाहिला जातोय. त्यामुळे टीव्हीचा साचेबद्ध मजकूर पाहणं टाळणारी पिढी सध्या आजूबाजूला वावरताना दिसतेय. त्यामुळे दोलक पुन्हा एकदा टीव्हीच्या पलीकडच्या बाजूला झुकताना दिसतोय. मात्र ही दोलायमान परिस्थिती फार काळ टिकून राहिल असं वाटत नाही
आणि याला कारण आहे, ते म्हणजे टीव्हीची सर्वसमावेशकता. एक किंवा दोन वाहिन्यांपुरता मर्यादित असलेला टीव्ही शेकडो वाहिन्यांचं जाळं सुरू झालं तरी डगमगला नाही. स्वतः चित्रपट बनवण्याच्या फंदात न पडताही टीव्हीनं सगळ्या चित्रपटांना आपल्या कवेत ओढलं. रेडिओ आणि वृत्तपत्र यांनी बनवलेल्या साच्यांमध्ये फारशी प्रगती न करता, टीव्हीवरील बातम्यांचा वेगळा साचा तयार केला, इतर कोणत्याही माध्यमाला जमू नये इतक्या शिताफीनं जगभरातल्या अधिकाधिक भाषांना आपल्या कवेत ओढलं. या सगळ्याच्या तुलनेत इंटरनेटनं टीव्हीच्या समोर उभं केलेलं आव्हान नक्कीच मोठं आहे, मात्र तरीही टीव्हीनं आपल्या परीनं या आव्हानाला तोंड द्यायला सुरुवात केली आहे.
गेल्या वर्षभरात टीव्हीच्या विविध वाहिन्यांवर इंटरनेटवर प्रसिद्ध होत असणार्या व्हिडिओजचे कार्यक्रम प्रसारित व्हायला सुरुवात झाली आहे. चित्रपटांना टीव्हीनं जसं जवळ केलं, इंटरनेटला टीव्हीनं जसा आपला मजकूर दिला, तसाच इंटरनेटसाठी तयार झालेला मजकूर आपल्या पडद्यावर आणण्याची टीव्हीची पुढची खेळी असू शकते.
या सगळ्या द्वंद्वामध्ये मजकूर हा सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. हा मजकूर कोण बनवतो, तो कुठे पाहिला जातो आणि कोण पाहतो हे त्यासंबंधीचे महत्त्वाचे घटक. मजकुरासंबंधीचे हे सगळे घटक समजून घेतले, तरच टीव्ही आणि पर्यायानं दृकश्राव्य माध्यमाचं हे मायाजाल उलगडणं सोपं जातं. टीव्ही असो, चित्रपट असो वा इंटरनेट; दृकश्राव्य माध्यमासाठी जेव्हा मजकुराची निर्मिती केली जाते, तेव्हा ती काही ठरावीक चौकटींच्या, साच्यांच्या अधिन राहूनच केली जाते. या चौकटींची आणि साच्यांची जाणीव असेल, तर ही माध्यमं आणि त्यांतील वेगवेगळ्या घटकांची भूमिका समजणं शक्य होतं.
टीव्हीच्या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण चौकटींची चर्चा करण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आलाय. ‘Television Critical Methods and Applications’ या जेरेमी जी. बटलर (Jeremy G. Butler) या लेखकानं लिहिलेल्या पुस्तकावर आधारित हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद नाही; कारण बटलर यांनी लिहिलेलं पुस्तक हे पूर्णपणे अमेरिका हा देश आणि तेथील टीव्ही माध्यम यावर आधारित आहे. सदर पुस्तक मात्र भारत आणि येथील टीव्ही यांना अनुसरून लिहिलं आहे. या पुस्तकातील प्रकरणांची रचना मात्र जेरेमी बटलर यांच्या पुस्तकातील प्रकरणांच्या रचनेवर आधारित करण्यात आली आहे.
हे पुस्तक मराठीत असलं, तरी इंग्रजी भाषेतील काही शब्द मात्र तसेच ठेवण्यात आले आहेत. काही तांत्रिक इंग्रजी शब्दांना अनुवादित मराठी शब्द वापरण्याऐवजी मूळ इंग्रजी शब्द तसेच ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून त्यांच्या अपेक्षित अर्थामध्ये कोणताही बदल होऊ नये. काही इंग्रजी शब्द मराठी भाषेत इतके रुळलेत की, त्यांच्यासाठी मूळ मराठी शब्द वापरला, तर त्याचाच अर्थ शोधण्याची गरज वाटावी.
‘टीव्ही’ हा टेलिव्हिजन या इंग्रजी शब्दाचं लघुरूप आणि दूरचित्रवाणी हा त्याला पर्यायी मराठी शब्द. मात्र घराघरात पोहोचला तो टीव्हीच. आता टीव्ही हे नाव इंग्रजीही वाटू नये, इतका तो सगळ्यांच्या अंगवळणी पडलाय. शिवाय अनेकदा प्रेक्षकांनाच नाही, तर टीव्हीविश्वात काम करणार्यांनाही दूरचित्रवाणी आणि दूरदर्शन यांतील फरक ध्यानात येत नाही. म्हणूनच सर्वांनाच खूप जवळचा असलेला ‘टीव्ही’ हाच शब्द या पुस्तकात कायम वापरण्याचं ठरवलं.
पत्रकारितेत किंवा टीव्ही या माध्यमात काम करू इच्छिणार्या उमेदवारांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त असेल, पण टीव्ही या माध्यमाविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा असणार्या सर्वसामान्यांसाठीसुद्धा हे पुस्तक माहितीपूर्ण ठरेल.
...........................................................................................................................................
‘टीव्हीच्या पडद्यामागचं विश्व’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4970/Tvchya-padadyamahacha-Vishwa
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment