अजूनकाही
‘प्राचीन भारतीय संस्कृती : मूलाधारांच्या शोधात’ हे गोपाळ चिप्पलकट्टी यांचे प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी पूर्णपणे नवी मांडणारे करणारे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. सदामंगल पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील प्रकरणांची ही थोडक्यात ओळख...
.............................................................................................................................................
भारताच्या प्राचीन इतिहासात आजवर पश्चिम आशियाई आणि युरोपचे उल्लेख इंडो-युरोपीय भाषा कुल आणि आर्य वंशासंदर्भात येतात. पूर्वेकडील प्राचीन चीनचा त्यात उल्लेख नसतो. बुद्धपूर्व काळात युनान आणि सिचुआन या प्रदेशांशी पूर्वेचा मगधचा काहीएक संबंध\प्रभाव असावा असे दुवे आढळतात. प्राचीन भारतीय इतिहास, वंश, धर्म, भाषा, संस्कृतीविषयीचे आकलनच बदलण्याची शक्यता-क्षमता या दुव्यांमध्ये दिसते. या दुव्यांना जोडणारे एक चित्र या लिखाणात रेखले आहे. या मांडणीद्वारे प्राचीन भारतीय संस्कृतीच्या एकपेडी गृहीतकाला सुरुंग लागतो. तिचा एक नवा स्त्रोत दिसू लागतो. नवे दिशासूचन होते. एक संपूर्णपणे नवा विचारव्यूह उभा राहतो.
इसवीसन पूर्व दुसऱ्या हिमालयोत्तर सिल्क रुटने बल्हिकला पोहचलेल्या झांग क्वीआनने त्याच्या आधी हजार वर्षांपासून सिचुआनची वस्त्रे आणि बांबूच्या काठ्या पूर्वेच्या अवघड मार्गाने मगधात येत होत्या, असे नमूद करून ठेवले आहे. यासारख्या चिनी आणि भारतीय स्त्रोतात असलेल्या तुटपुंज्या आधारांचे यथासांग संशोधन झाले पाहिजे, त्यांचे सांस्कृतिक वगैरे अनुबंध शोधले पाहिजेत, अशी अपेक्षा या लिखाणात केली आहे.
या पुस्तकाची मांडणी आठ प्रकरणांमध्ये केली आहे. पहिल्या दोन प्रकरणांमध्ये ईशान्य भारत, बंगाल आणि मगध यांचा सिचुआन आणि युनान या चिनी प्रांतांशी प्राचीन काळी असलेल्या संबंधांचे धागेदोरे विविध रस्त्यांचे प्राचीन आणि मध्ययुगीन उल्लेख नोंदवून स्पष्ट केले आहेत. त्यासाठी हरप्रसाद राय, पी.सी. बागची, शरत आणि सुप्रीती फूकून, अरविंद जामखेडकर, अमलेंदू गुहा, श्रीधर व्यंकटेश केतकर, सुनीतीकुमार, चटर्जी यांच्यासारख्या भारतीय इतिहासकारांचे संदर्भ वापरले आहेत. शिवाय जोसेफ नीडहॅम, बिन यांग यांच्यासारख्या पाश्चात्य आणि चिनी संशोधनांची उदाहरणे दिली आहेत. चिनी इतिहास संक्षिप्तपणे देऊन विविध सांस्कृतिक अनुबंधांचे सूचन केले आहे. बांबू, रेशीम, तांदूळ, कवड्या या वस्तू आणि चीनमध्ये उत्तरेकडील शकांचे आगमन, चीनच्या भिंती, सिचुआन-युनानमधील चीनहून वेगळी स्वतंत्र संस्कृती, घोड्यांचा-रथांचा वापर, तांब्याची-कास्यांची हत्यारे व भांडी, चीन-मगधातील धर्मांचे, तत्त्वज्ञानांचे साम्य या बाबींची लेखकाने विस्तृतपणे मांडणी केली आहे.
तिसऱ्या प्रकरणात आर्य आणि इंडो-युरोपियन्सचे बंधू शोभणारे शक-सिथीयान यांच्या अस्तित्वाचा ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय मागोवा घेतलाय. चीनमध्ये त्यांचे आगमन आणि पूर्व भारतातील लिच्छवी-शाक्य आणि श्रमण परंपरांचा त्यांच्याशी असलेला अनुबंध मांडून दाखवलाय.
चौथ्या प्रकरणात वैदिक आणि श्रमण परंपरांमधील भेद स्पष्ट करत श्रमणभूमी ही भारतीय इतिहास आणि संस्कृतीची अधिष्ठात्री भूमी असल्याचे दाखवून दिले आहे.
श्रमणांतील पार्श्वनाथी दर्शन आणि जैनांचा आदिवासींशी असणारा प्राचीन संपर्क पाचव्या प्रकरणात दाखवून पार्श्वनाथाच्या आद्यतम मौलिकतेचा खुलासा केला आहे.
सहाव्या प्रकरणात बौद्ध धर्म, तत्त्वज्ञान आणि परंपरा यांचा चिकित्सक आढावा आणि जगात धर्म पसरण्याची रूपरेषा दिली आहे.
तिबेटो बर्मन भाषांचा पूर्वेतील, आसाम, बंगालमधील भाषांशी असलेला संपर्क सातव्या प्रकरणात मांडून दाखवलाय.
आठव्या प्रकरणात प्राचीन वैदिक आर्य बोली, प्राकृत, पाली, अर्धमागधी आणि संस्कृत यांचा काळानुरूप आणि विस्तार लक्षात घेऊन चिकित्सक आलेख मांडलाय.
याशिवाय लेखकाने विस्तृत असे प्राक्कथन लिहून स्वत:ची भूमिका स्पष्ट केली आहे. विस्तृत संदर्भ ग्रंथसूची हेही या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य आहे.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5008/Prachin-Bharatiya-Sanskruti
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment