हिमा दासच्या यशाबद्दल आपल्याला जरा उशिराच जाग आली, पण आता आपण जागं व्हायला हवं!
पडघम - क्रीडानामा
सागर शिंदे
  • हिमा दास
  • Wed , 24 July 2019
  • पडघम क्रीडानामा वर्ल्ड कप २०१९ हिमा दास Hima Das द्युती चंद Dutee Chand World cup 2019 भारतीय क्रिकेट संघ Indian Cricket team

क्रिकेटबद्दल आम्हाला सर्व काही माहीत असतं! पण हिमा दास कोण? किंवा द्युती चंद कोण? यांविषयी फार कमी लोकांना माहीत असतं. या दोघींविषयी भारतीयांना कालपर्यंत फार काही माहिती नव्हती. आणि समजा भारत वर्ल्डकप जिंकला असता, तर कदाचित आता झाली आहे, तेवढीही माहिती झाली नसती. सारे वर्ल्डकपच्या विजयोत्सवात रममाण झाले असते. दुर्दैवानं तसं काही झालं नाही. म्हणूनच हिमा दास आणि द्युती चंद यांची चर्चा सुरू झाली आहे.

क्रिकेटपटूंची प्रत्येक गोष्ट लोकांना माहीत असते. ते काय खातात? काय पितात? त्यांच्याकडे कोणती गाडी महागडी आहे? ते कोणत्या ब्रँडचे कपडे वापरतात? कोणत्या हॉटेलमध्ये राहतात? त्यांच्या हातातलं घड्याळ कोणत्या कंपनीचं आहे? त्यांच्या बायका कोण आहे? त्यांच्यावरही प्रसारमाध्यमांत चर्चा होते. त्यांच्या फॅशन ट्रेंडची चर्चा होते. एखाद्या खेळाडूनं शतकं केलं आणि सामना संपल्यावर पत्रकारानं विचारलं, ‘तुला हे शतकं करून कसं वाटलं?’ तेव्हा तो हमखास बायका-पोरांचं नाव  घेतो. मग त्या क्षणापासून तीच ब्रेकिंग न्यूज होते. यात लोकांचं काही चुकत नाही. ते आपले लहानपणापासून क्रिकेट पाहत आलेले. म्हणजे ते त्यांना दाखवण्यात आलेलं असतं. मग तेच ते पहात जातात.

गेल्या दीड महिन्यांत तर क्रिकेटबद्दल खूपच चर्चा झाली, अजूनही होत आहे. अगदी एखादा क्रिकेटपटू खेळपट्टीवर पाण्याच्या बाटल्या घेऊन आला किंवा कुठे तरी शिंकला किंवा कुठे तरी हेड फोन लावून गाणी ऐकत बसला तरी त्याच्याविषयी लिहिलं-बोललं जातं किंवा वृत्तवाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूजही चालवली जाते.

केदार जाधव किंवा शिखर धवन जखमी झाले तर सगळीकडे चर्चा होते. त्यांच्या जागेवर कोणता खेळाडू घ्यावा म्हणून सोशल मीडियावर मोहीम राबवली जाते. विजय शंकर हा कसा महत्त्वाचा नाही, याबद्दल घसा ओरडून सांगितलं जातं.

क्रिकेटचा सामना पन्नास ओव्हरचा असेल तर तो किमान सात-आठ तास चालतो. ट्वेंटी ट्वेंटी सामना असेल तर किमान चार तास आपण टीव्हीसमोर बसून असतो. आणि जर कसोटी असेल तर दिवसाचे आठ तास म्हणजे पाच दिवसाचे चाळीस तास. भारतीय संघाच्या सामन्याचा विचार केला तर वर्षाकाठी किमान ३० एकदिवसीय सामने, किमान २० ट्वेंटी ट्वेंटी सामने आणि किमान १० कसोटी सामने होतात. आयपीएलचे सामने वेगळे. आणि इतर संघाचे सामनेही आपण आवड म्हणून बघत असतोच. म्हणजे इतक्या वेळ आपण टीव्हीसमोर बसून असतो किंवा रेडिओ ऐकत असतो. 

आता हिमा दासच्या एका धावण्याच्या स्पर्धेचा विचार करू. तिची स्पर्धा फक्त पाच मिनिटांत संपते. आपण तितका वेळही टीव्हीसमोर बसू शकत नाही. पण त्याच्या तुलनेत कितीतरी जास्त वेळ क्रिकेट पाहतो.

असं का होतं? कारण आपल्याला इतर खेळ पहावेसे वाटत नाहीत. वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या आणि खेळाच्या विविध वाहिन्या क्रिकेटला कितीतरी जास्त कव्हरेज देतात. त्या तुलनेत इतर खेळांना किती कव्हरेज दिलं जातं? 

आपल्याकडे क्रिकेटला कितीतरी वेळ दिला जातो, पैसा ओतला जातो, कोट्यवधींचे करार होतात. क्रिकेटपटू इतर खेळाडूंपेक्षा काही पट अधिक पैसे कमवतात. म्हणजे क्रिकेट सर्वच बाबतीत आघाडीवर आहे. मग आपल्याला किती यश मिळायला पाहिजे! शिवाय क्रिकेट हे खेळपट्टीवर बऱ्याच अंशी अवलंबून असतं. खेळपट्टीवर गवत असेल तर भारतीय फलंदाज कसे खेळतात, हे आपण पाहत आलो आहोत. तेच फलंदाज भारतात किंवा आशिया खंडात खेळले की, धावांचा रतीब घालत असतात. पण तेच फलंदाज आफ्रिका किंवा इंग्लंडमध्ये एका एका धावासाठी तरसतात.

मुळात क्रिकेट हे २५ देशांत खेळलं जातं. त्यात वर्ल्ड कपमध्ये दहा देश खेळतात. आणि त्यात चांगले म्हणावे असे चार किंवा पाच देश असतात. अंतिम सामन्यात जाण्याची संधी ही मुख्य संघाला असते. आणि असं असूनही अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला ‘विश्वविजेता’ म्हणणं निव्वळ हास्यास्पद आहे. फुटबॉल २०० देशांत खेळला जातो. ३२ संघ वर्ल्ड कपमध्ये सहभागी होतात. फुटबॉलमधील विजेत्या संघाला ‘विश्वविजेता’ म्हटलं तर एक वेळ शोभेल!

क्रिकेटमध्ये इतका पैसा ओतून काय मिळतं? तर न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये आपल्याला पराभूत करतो. २०१५ मध्येही आपण सेमी फायनललाच हरलो होतो. इतका वेळ देऊन, पैसा ओतून आपण आतापर्यंत फक्त १९८३ व २०११ चे वर्ल्ड कप जिंकले आहेत. या दोनपैकी एक वर्ल्ड कप आपण आपल्याच देशात जिंकलो आहोत. पुढचा वर्ल्ड कपही भारतात आहे. तो आपण जिंकू अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. म्हणजे इतर देशात आपण जिंकण्याची आपल्याला खात्री नाही! 

या उलट ऑस्ट्रेलियानं आजवर १२ पैकी ५ वर्ल्ड कप जिंकले आहेत. आपल्याकडे क्रिकेटमध्ये राहुल द्रविड, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, लक्ष्मण, धोनी, सेहवाग, बुमराह, शमी इत्यादी खेळाडू असतात; पण मॅकग्रा, स्टिव्ह वॉ, रिकी पॉंटिंग, बेन स्टोक्स, शेन वॉर्न, मुरलीधरन, केन विल्यमसन असे दिगग्ज खेळाडू आपण तयार करू शकलो नाहीत. आफ्रिकेचा जॅक कॅलिस, फ्लिटॉप किंवा बेन स्टोक्ससारखे अष्टपैलू खेळाडूही आपण तयार करू शकलो नाही. जॉटी रोडस आपण तयार करू शकलो नाही.

ज्या दिवशी भारत न्यूझीलंडकडून हरला, त्या दिवशी तेवीस वर्षीय द्युती चंदनं न्यापोली इथं १०० मीटर स्पर्धेत ११.३२ सेकंद इतक्या कमी वेळात पहिलं सुवर्णपदक मिळवलं. त्याची कुठेही बातमी आली नाही आणि जिथं आली तिथं ती नजरेस पडणार नाही, अशाच पद्धतीनं आली! त्या उलट भारत का हरला यावर पान-पानभर लिहिलं गेलं. त्यामुळे द्युती चंदचं अस्सल यश मात्र झाकोळलं गेलं. काहींना तर द्युती चंद कोण हा प्रश्न पडला. 

जे द्युती चंदच्या बाबतीत घडलं, तेच हिमा दासच्या बाबतीतही घडलं. 

हिमा दास कोण, हे आम्हाला नेटवर जाऊन शोधावं लागलं! तिने १९ दिवसांत पाच सुवर्णपदकं जिंकली. तरी त्याचा अनेकांना थांगपत्ता नव्हता. म्हणावं तितकं तिला कव्हरेजही मिळालं नाही. पण त्याच्या उलट एखाद्या माजी खेळाडूंचा मुलगा जर क्रिकेट खेळत असेल तर, तो सराव करण्यासाठी कोणत्या गाडीतून येतो, याची चर्चा दिवस-दिवसभर होते. पण हिमा दास कोण हे आम्हाला जाणून घ्यावंसं वाटत नाही. 

मुळात लोकांना क्रिकेट सोडून दुसरा खेळच आवडत नसेल तर माध्यमं तरी कशाला इतर खेळाची दखल घेतील. याला जोडूनच भारतातील लोकांना क्रिकेट सोडून दुसरा खेळ बघायचा आहे का, हा मोठा प्रश्न आहे.

क्रिकेटसाठी जितकी मेहनत घ्यावी लागते, त्याच्याहून अधिक मेहनत अॅथॅलेटिक्ससाठी घेतली जाते. अवघ्या ११-१२ सेकंदांसाठी दिवस दिवसभर धावण्याचा सराव करावा लागतो. तरी पदक मिळेल याची खात्री नसते. अॅथॅलेटिक्स जगभरातल्या २०० देशांमध्ये खेळलं जातं. हिमा दास ज्या प्रकारात खेळते, तो प्रकार क्रिकेटपेक्षा निश्चितपणे कठीण आहे. आणि म्हणून तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आता तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय! तो झालाच पाहिजे“, तिचा तो हक्कच आहे!!! आसाम पूरग्रस्तांसाठी तिनं आपलं मानधन दिलं.

त्याच वेळेस आपले क्रिकेटपटू काय करत होते, हा प्रश्न विचारला गेला आणि तो रास्त होता.

हिमा दासच्या यशाबद्दल आपल्याला जरा उशिराच जाग आली, पण आता आपण जागं व्हायला हवं. तिच्या पाच सुवर्णपदकांच्या रूपानं लोकांना जाग येईल ही अपेक्षा.

............................................................................................................................................................

लेखक सागर शिंदे रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून सुधागड या तालुक्यात गाठेमाळ ठाकूरवाडीत कार्यरत आहेत.

sagararjunshinde6664@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 24 July 2019

लेखाशी पूर्णपणे सहमत. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......