‘नदीष्ट’ : अनाम, चेहराविहीन लोकांच्या जगण्याचं दाहक जीवनवास्तव मुखर करणारी कादंबरी!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अनिता यलमटे
  • ‘नदीष्ट’चं मुखपृष्ठ
  • Fri , 19 July 2019
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस नदीष्ट Nadishta मनोज बोरगावकर Manoj Borgaonkar

जेव्हा एखाद्या कवीला वाटतं की, आपल्याला हवा असणारा मोठा अवकाश कवितेतून अभिव्यक्त करता येणार नाही, तेव्हा तो कादंबरीतून अभिव्यक्त होतो. असंच काहीसं मूळच्या कवी असणाऱ्या मनोज बोरगावकर यांच्या ‘नदीष्ट’ या कादंबरीत जाणवतं.

ही कादंबरी प्रथमपुरुषी एकवचनी निवेदनात लिहिलेलं आत्मकथनच आहे. नदी, तिचं भव्य पात्र, मंदिर, भोवतालचं जंगल, घाटाच्या पायऱ्या, मासेमारी करणारे भोई, पुजारी, जनावरं चारायला नेणारे गुराखी, एवढंच नव्हे तर दुष्कर्म करणाऱ्यांनाही नदी ओटीत कशी घेते, अशी कितीतरी वर्णनं लेखकानं खूप ताकदीनं जीवंत केली आहेत. लेखकाचा व नदीचा कादंबरी लिहिण्यापुराता सहवास होता असं कुठेच जाणवत नाही. याउलट वर्षानुवर्षं लेखक नदीचा ‘नादिष्ट’ असल्याचं जाणवत राहतं. कितीतरी बारकावे लेखकानं रेखाटले आहेत. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, अपरात्री लेखक नदीवर पोहायला येतो. तेव्हा या नदीच्या ओढीनंच आलेली अनेक पात्रं लेखकाला भेटत जातात. खरं पाहता आपल्या पांढरपेशा समाजात लेखकाला भेटलेल्या या पात्रांना कुठलाच चेहरा नसला तरी लेखक या उपेक्षित माणसांमध्ये आपसूकपणे गुंतत जातो. कारण ही सगळीच माणसं नदीवर जीव लावणारी असतात, तर लेखक नदीवर जीव ओवाळणारा!

नदीवर भेटलेली भिकारीन सकीनाबी लेखकाचा जीव वाचावा म्हणून सावध करते, तर लांबपर्यंत पोहत गेल्यावर लेखकाचं बरं-वाईट तर झालं नाही ना, म्हणून दोन-अडीच तास अस्वस्थ झालेले कालूभैया व पुजारी नदीमुळेच जोडले गेलेले. नवस फेडणाऱ्या स्त्रीवर आपल्या डोळ्यासमोर बलात्कार झाला आणि आपण जीवाच्या भीतीनं काहीच करू शकलो नाही म्हणून बलात्कारी पोट्यापेक्षा स्वतःला जास्त अपराधी समजणारा बामनवाड म्हणतो की, त्या दिवशी त्या बाईच्या अश्रूसमोर नदीचं पाणी मला कमजोर वाटलं. कादंबरी वाचताना काळीज गलबलून येणारे असे अनेक प्रसंग अस्वस्थ करून जातात. विस्कटलेल्या त्या बाईला घरी जाऊनही नवऱ्यासोबत शरीरखेळ करावाच लागला असेल, तेव्हा तिला या दोन्हीपैकी कोणता बलात्कार अधिकचा असहाय्य झाला असेल? हा लेखकानं स्वतःला विचारलेला प्रश्न वाचकालाही अंतर्मुख करून जातो.

लेखकाला पोहण्याचे धडे देणारे दादारावही तितकेच भावून जातात. सख्खी आई वारल्यानंतर गोदावरी आईनं जवळ घेतल्याचं सांगताना खूपच भावूक होतात. ‘मी काही मेलेल्या मायचं दूध पिलो नाही’, हे किती मर्दानीपणानं आपण सांगतो, पण एका दमात नदी पार करणारे दादाराव मात्र आपण तान्हे असताना मृत आईला कसा पान्हा फुटला, हे वाचताना काळीज गलबलून येतं.

एके ठिकाणी मात्र मला लेखकाचं कमालीचं आश्चर्य वाटतं. ते म्हणजे स्वतः विज्ञानवादी असूनही अंधविश्वासानं ‘व्हर्जिन’ जागेवरची वाळू काढायची, हे खूळ डोक्यात घेऊन जीव कमालीचा धोक्यात घालणारा लेखक पोहण्याच्या थरारक कसरती करताना अंगावर काटा उभा राहतो. इतकं धाडस दाखवणारा लेखक मात्र अविरतपणे होत असलेल्या वाळू उपशानं कमालीचा अस्वस्थ होतो. लेखकाला नदीचा गाभा हा स्त्रीच्या गर्भासारखा वाटतो. त्यामुळे तो म्हणतो, ‘नदी म्हणजे आईचा विस्तारत गेलेला गर्भ’. पण अविरत होणाऱ्या वाळू उपशानं नदीला होणारी जखम लेखकाला थेट गर्भपातानं स्त्रीला झालेल्या इजेसारखीच भासते. या प्रतिमेतून लेखकाच्या गाभ्यातील मुळातला कवी हळूवारपणे डोकावतो.

कादंबरीला वेगळं वळण मिळतं ते नदीवर भेटलेल्या भिकाजी व सगुणामुळे. मध्येच लेखकाला सर्पमित्र प्रसादही भेटतो. अस्सल विषारी कोब्रा कोवळ्या वयात कसा आपण पकडला याचं वर्णन ऐकताना जाणवत राहतं की, एखाद्या कौशल्याला वयाचंही बंधन नसतं!

कादंबरीभर एक जाणवत राहतं की, लेखकाला नदीचा तर नाद आहेच, पण इथं भेटणाऱ्या समाजातील दुर्लक्षित माणसांचं भावविश्व उलगडण्याचाही अनामिक छंद दिसतो. असाच भेटलेला भिकाजी हा भिकारी पण रोज अंघोळ करणारा, मोजकं पण शुद्ध मराठी बोलणारा, पूर्वाश्रमीचा पीडित पण परिस्थितीनं भिकारी बनला असावा, हे लेखक हेरतो. त्याच्या अंतरी दडलेलं गूढ खोलण्यासाठी त्याच्यासोबत जेवण करताना लेखकाला अजिबात संकोच वाटत नाही. रानमांजराला पाहून ताबा सुटलेला भिकाजी आपल्या दुर्दैवी भूतकाळातील अपराधाचं ओझं मानगुटीवर घेऊन निरर्थक जीवन जगत असतो. मुलीचा पापा घेताना दारूचा वास आल्यानं मागे सरकणाऱ्या आपल्याच लेकराचा अनवधानानं आपल्या हातून झालेला अंत भिकाजीला जनातून व स्वतःच्याच मनातून उठवणारा ठरतो. बहिणीचं वांझपण, तिचा दुर्दैवी अंत आणि तिच्या विरहात आईचं संपणं, या दुःखगाठी भिकाजीच्या बायकोनंही कधी हळूवारपणे खोलल्या नाहीत. संतती होण्यापर्यंतचं नवरा-बायकोचं अंथरुणातील नातं मूल झाल्यावर मात्र किती बेगडी होतं, त्यातूनच दारूचं वाढलेलं व्यसन आणि मांजरीचा ‘फोबिया’ कसा घात करतो, हे सर्व आपल्या जिव्हारी लागतं.

एक स्त्री वाचक म्हणून मला हा प्रसंग खूपच जिव्हारी लागला. आपल्याच इवल्याशा लेकराचा चेंदामेंदा करणाऱ्या भिकाजीबद्दल आधी वाटणारी सहानुभूती क्षणभर तिरस्कारात परावर्तित झाली. भलेही ती अनवधानातील चूक असेल, पण रक्ताच्या थारोळ्यातील कोवळ्या बाळाला पाहून कोणती बायको हत्याऱ्याच्या बाजूनं उभी राहील? पंधरा वर्षाच्या शिक्षेनंतरही तो आजन्म अपराधाचं ओझं बाळगतोय म्हणून त्याच्याबद्दल वाईट वाटतं. लेखकानं त्याला बोलतं करून काहीतरी त्याचं ओझं कमी केलं, पण त्याच्या बायकोला दोष न देता ‘तिचीही काहीतरी बाजू असेलच की’ या विधानातून सामंजस्यही दाखवलं आहे.

‘नदीष्ट’मध्ये ठळकपणे जाणवत राहिली ती ‘सगूणा’. तिला कादंबरीची नायिकाच म्हणावं लागेल. समाजाच्या दृष्टीनं तिरस्कृत, भयावह व स्त्री-पुरुष या जातीत न बसणारा घटक म्हणजे ‘तृतीयपंथी’. खरं तर आज नदी व तृतीयपंथी हे दोन्हीही जागतिक प्रश्न आहेत, तरीही ते उपेक्षितच आहेत. या लोकांबद्दल सभ्य लोकांना नेमकी भीती वाटते की, तुच्छता हेही ठरवणं अवघडच. ‘नदीष्ट’मध्ये सगूणाची लेखकाशी झालेली भेट कादंबरीला उत्कंठतेच्या शिगेला पोहचवते. रेल्वेत, रस्त्यावर, बाजारात व यात्रेत भेटणाऱ्या या कम्युनिटीला आपण चोरून चोरूनच पाहतो. अशाच चोरून पाहून दूर पळून जाणाऱ्या लेखकाला सगूणानं ‘खरा हिजडा कोण?’ हा प्रश्न खूपच भेदक व व्यापक अर्थानं विचारला होता. तेव्हा लेखकाप्रमाणेच वाचकालाही विचार करावा लागतोच की, ‘खरा हिजडा कोण?’

तृतीयपंथीयात दीक्षा देण्याची अघोरी प्रथा प्रथमच वाचनात आली. अंगावर काटा आणणारी ही प्रथा खरंच गरजेची आहे का? तृतीयपंथीयांवर आपलं घर, गाव व समाज सोडून परागंदा होण्याची वेळ का यावी? आपल्याकडे दिव्यांग मुलांना कुटूंब व समाज हद्दपार करतो का? याउलट अपंगत्वाचं कटू सत्य स्वीकारून इतर मुलांइतकेच अधिकार आपण या मुलांना देतो. मग याच न्यायानं आपण तृतीयपंथीयांना का वागवत नाही, असे अनेक प्रश्न ही कादंबरी मुखर करते.

सगुनाने लेखकासमोर आपल्या मनाची ‘भडास’ काढते. पण अनेक विचार करायला लावणाऱ्या गोपनीय गोष्टींचाही उलगडा करते. आपण ही एक-दोघांना ‘हिजडा’ बनवण्यात सहभागी झाल्याचे सांगत सगूणा म्हणते, ‘केवळ ही कामं आमची बिरादरीच करते असं नाही, तर या समाजातले कितीतरी लोक हे काम करतात’. विचार करायला लावणारे अनेक प्रश्न सगुणा संवेदनशील लेखकासमोर उभे करते.

आईच्या भेटीच्या ओढीतूनच सगुणा नदी जवळ करते, पण लेखकाला सगुणाच्या भेटीची तीव्र ओढ का लागली होती, हा प्रश्न लेखकाला स्वतःलाही पडतो. पण पुढे जाणवत राहतं की, लेखकाला सगूणाच्या अंतर्मनाच्या खोल डोहातील ‘व्हर्जिन’ जागेवरचा ‘अनटच्ड’ गुंता खोलायचा होता.

खरं तर हे आत्मकथन असलं तरी लेखक कुठेच नायकाच्या भूमिकेत दिसत नाही. लेखकाचं खाजगी जीवन कुठेच उघड होत नाही. फक्त एके ठिकाणी पत्नीचा उल्लेख होतो. बाकी अप-डाऊन्सच्या नोकरीतून लेखकाचा व्यवसायही कळत नाही. लेखकानं नायकत्व बखूबीनं टाळलं आहे.

लेखक लिहितो तो एक सांस्कृतिक हस्तक्षेप असतो. स्वातंत्र्याच्या सातव्या दशकात आपण जगत असताना आजही समाजपरिघाबाहेरच्या अशा अनेक अनाम, चेहराविहीन लोकांच्या जगण्याचं दाहक जीवनवास्तव ‘नदीष्ट’ ही कादंबरी मुखर करते. नदीच्या काठावर चित्रित होणारा हा मानवी जीवननकाशाच आहे. मनोज बोरगावकर यांची चेहराविहीन माणसांवर असणारी अपार मानवतावादी निष्ठा ‘नदीष्ट’मधून दृग्गोचर होते. त्यामुळे ‘नदीष्ट’ मराठी कादंबरीत मौलिक भर टाकते, यात शंकाच नाही.

.............................................................................................................................................

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5009/Nadishta

.............................................................................................................................................

लेखिका अनिता यलमटे कथाकार आहेत.

anitayelmate@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................    

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......