अजूनकाही
प्राच्यविद्या अभ्यासक, संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘आ.ह.’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. इंद्रजित घुले व अमृत साळुंखे यांनी संपादित केलेल्या आणि शब्दशिवार प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील हा एक लेख.
डॉ. साळुंखे यांचे ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ हे पुस्तक १९९४मध्ये प्रकाशित झालं. त्यानिमित्तानं १२-१४ मार्च १९९४ रोजी रयत शिक्षण संस्था व फुले आंबेडकर साहित्य पंचायत यांच्यावतीनं एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानावरून एन. डी. पाटील यांनी केलेलं हे भाषण आहे.
............................................................................................................................................................
‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ या ग्रंथाच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्राचे उद्घाटक व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वरुटे, या ग्रंथाचे लेखक प्रा. डॉ.आ.ह. साळुंखे, या चर्चासत्राचे आयोजन करणाऱ्या फुले-आंबेडकर साहित्य पंचायतीचे व रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी दूरदूर अंतरावरून या ठिकाणी आलेले विचारवंत आणि उपस्थित भगिनींनो आणि बंधूनो…
आज एका अतिशय उपयुक्त उपक्रमाच्या निमित्ताने आपणाशी संवाद साधण्याची संधी मला संयोजकांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. माझे मित्र आ.ह. साळुंखे यांनी अतिशय मेहनत घेऊन ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ हा ग्रंथ लिहून पूर्ण केल्याबद्दल त्यांचे व हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ज्या सदाशिव बागाईतकर स्मृतिमालेने पार पाडले त्यांचे कितीही आभार मानले, तरी त्यांच्या सामाजिक ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही, अशी माझी धारणा आहे. भारतीय समाजव्यवस्थेच्या अध:पाताला कारणीभूत असलेली मनुस्मृती जाहीर रीतीने जाळण्याचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ७० वर्षांपूर्वी घ्यावा लागला होता. आंबेडकर ज्यांना गुरू मानत असत, त्या महात्मा फुल्यांनीही या मनुस्मृतीतल्या विकृत विचारांवर कडाडून हल्ला चढवला होता. भारतीय समाजामधील स्त्रिया आणि शूद्र या सुमारे ९० टक्के विभागाला अज्ञानाच्या अंधकारात गाडून टाकून त्यांच्यासाठी फक्त अपमान, तिरस्कार, गुलामगिरी यांचाच वारसा ठेवणारा ग्रंथ हजारो वर्षे आमच्या समाजकारणावर, धर्मकारणावर, राजकारणावर, शैक्षणिक धोरणावर अधिराज्य गाजवत राहिला, हीच भारतीय समाजव्यवस्थेची शोकांतिका मानली पाहिजे.
या ग्रंथाच्या संदर्भात एका महत्त्वाच्या प्रश्नाची चर्चा करणे युक्त ठरेल. काही लोकांना असे वाटण्याचा संभव आहे की, जो ग्रंथ शेकडो वर्षांपूर्वी लिहिला गेला व ज्या ग्रंथाचा कसलाही संदर्भ आजच्या समाजजीवनाशी राहिलेला नाही, अशा ग्रंथावर टीकाटिप्पणी करण्याने आपण शिळ्या कढीला ऊत आणत आहोत की काय? त्यांच्या या शंकेचे उत्तर असे आहे की, जो ग्रंथ कालबाह्य झाला आहे असे आपण मानता, तसा तो कालबाह्य झालेला नसून तो आजही जिवंत आहे. अनेक महाभाग मनुस्मृतीचे समर्थन करत आहेत. प्राध्यापक नी.र. वऱ्हाडपांडे या विद्वानांची मजल तर “आजचे आमचे संविधान (भारतीय राज्यघटना) देखील समतेचा निकष लावला, तर मनुस्मृतीपेक्षा हिणकस ठरते,” असा विकृत विचार व्यक्त करण्यापर्यंत गेलेली आढळते.
मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना सर्वतोपरी जनावराप्रमाणे तुच्छ लेखण्यात आलेले आहे. त्यांना साध्या माणुसकीच्या हक्कापासूनही वंचित ठेवण्यात आलेले आहे. ‘न स्त्रीस्वातंत्र्यमर्हति’ हे सूत्र जारी करून मनुस्मृतीने स्त्री ही स्वातंत्र्य देण्यास अपात्र असल्याचे घोषित केले. एवढेच नव्हे, तर पत्नी अप्रिय बोलली, तरी पतीने दुसरा विवाह करावा, अशी मुभा पुरुषवर्गाला देऊन ठेवली. मात्र पती चारित्र्यहीन असला तरी त्याची देवाप्रमाणे पूजा करावी, असा दंडक जारी करून स्त्रीचे वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा कुटिल डाव पार पाडलेला आहे.
स्त्रीवर्गाबाबत कमालीची हिणकस भूमिका मांडणाऱ्या मनुस्मृतीचे समर्थन करताना डॉ. सरोजा भाटे (पुणे विद्यापीठाच्या संस्कृत व प्राकृत विभागाच्या प्रमुख) यांची लेखणी कशी मोकाट सुटते, हेही पाहण्यासारखे आहे. त्या म्हणतात, “घर सोडून मोकाट सुटलेल्या स्त्रीला नाठाळ गुराप्रमाणे वठणीवर आणण्यासाठी दावणीला बांधणारा मनू स्त्रीच्या दृष्टीने क्रूर असेल. परंतु एकंदर समाजाच्या दृष्टीने अराजकातून सुराज्य निर्माण करू पाहणारा एक कठोर अनुशासक, अशी त्याची भूमिका असली पाहिजे.”
डॉ. सरोजा भाटे यांच्या या युक्तिवादावर काही भाष्य करण्याची गरज नाही. ब्राह्मणवर्णाचा खोटा अहंकार कुरवाळणारा व जोपासणारा एक ग्रंथ एवढ्याच दृष्टिकोणातून या ग्रंथाकडे पाहणाऱ्या डॉ. सरोजा भाटे यांच्याकडून कोणत्याही निकोप युक्तिवादाची अपेक्षा निरर्थक ठरेल.
मनुस्मृतीने सर्वांत कठोर हल्ला शूद्रांवर केलेला आहे. मनुस्मृतीने शूद्रांना माणुसकीचे हक्क सरळ सरळ नाकारलेले आहेत. त्यांना कुत्र्या-मांजरांच्यापेक्षाही निकृष्ट प्रतीचे जीवन बहाल केले आहे. पावलोपावली त्यांना अपमानित जीवन जगावे, लाचारीने जीवन कंठावे लागत असतानाही हाच आपला धर्म असे खोटे समाधान मानायलाही त्यांनी शिकावे, असा घाट मनुस्मृतीने घातलेला आहे. मनुस्मृती शूद्राला शिक्षण घेण्याची बंदी करते. वेदामधील एखादा शब्द शूद्राने ऐकला, तर त्याच्या कानांत शिशाचा रस ओतावा, असा फतवा काढते. एखाद्या शूद्राने वेदाचा मंत्र उच्चारला, तर त्याची जिव्हा तत्काळ कापून टाकण्यात यावी, असे फर्मान काढते आणि एखाद्या शूद्राने वेदाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केल्यास, त्याच्या त्या महान अपराधाबद्दल त्याचा शिरच्छेद केला जावा, असा बंदोबस्त करते. शंबूकाचा जो शिरच्छेद झाला, त्यापासून साऱ्या शूद्रांनी धडा घ्यावा व त्यांनी आपल्या पायरीने राहावे, त्यातच त्यांचे भले आहे, अशी मनुस्मृतीची रास्त (?) अपेक्षा आहे.
मनुस्मृतिकारांना एक गोष्ट ठाऊक होती. ज्या शूद्रांना ते माणुसकीच्या हक्कांपासून वंचित ठेवू पहात होते, ते शूद्र केव्हा ना केव्हा तरी त्या अन्यायाविरुद्ध बंड करून उठण्याची शक्यता होती. म्हणूनच या संभाव्य संकटाचा बंदोबस्त करण्यासाठी मनुस्मृतीने शूद्रांची सर्व बाजूंनी कोंडी केली. त्यांना शिक्षण घेण्याची जशी बंदी केली, तशीच त्यांनी संपत्ती धारण करता कामा नये, त्यांनी शस्त्रही धारण करता कामा नये, असे दंडक जारी केले. शूद्राने संपत्ती धारण केल्यास, ती संपत्ती लुटण्याचा अधिकार तिने ब्राह्मणाला बहाल केला.
शूद्रांच्या बाबतीत मनुस्मृतीने एवढे अन्याय आणि अत्याचार केले आहेत की, मनुस्मृतीचे समर्थन करण्याचे नैतिक धैर्य कोणीही दाखवू शकणार नाही. तथापि, त्या बाबतीतही मनुस्मृतीचे समर्थन करणारे महाभाग पुढे येत आहेत, ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे.
डॉ. पटवर्धन हे त्यांपैकीच एक महाभाग आहेत. शूद्रांना कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या शिक्षणाची गरज नसते. कारण, कोणत्याही प्रकारे मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्यास समर्थ करेल, अशा पातळीवरची बौद्धिक कुवत त्यांच्याकडे नसते, अशी मल्लीनाथी करायला धजावणाऱ्या डॉ. पटवर्धनांचीच बौद्धिक कुवत स्पष्ट झालेली आहे. ते या संदर्भात आणखी एक हास्यास्पद विधान करतात. शूद्राचा बुद्ध्यांक सर्वसामान्य व्यक्तीच्या बुद्ध्यांकापेक्षा कमी असल्यामुळे तो वेद शिकण्यास असमर्थ असतो आणि त्यामुळे त्याला द्विजापासून अलग करण्यात आले आहे. त्यामुळे तो वेदांचा अभ्यास करू शकत नाही.
शूद्रांना कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या शिक्षणाची गरज नसते. कारण, कोणत्याही प्रकारे मोठ्या प्रमाणात शिक्षण घेण्यास समर्थ करेल, अशा पातळीवरची बौद्धिक कुवत त्यांच्याकडे नसते - इति डॉ. पटवर्धन
डॉ. पटवर्धनांचे हे विधान त्यांचा बुद्ध्यांक काय दर्जाचा आहे, त्याचे निदर्शक आहे. शूद्रांचा बुद्ध्यांक कमी असतो, म्हणूनच भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे क्षुल्लक (?) काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या एका शूद्रावर सोपवण्यात आले आणि ब्राह्मणांचा बुद्ध्यांक उच्च दर्जाचा असल्याने पुणे शहरातल्या साऱ्या मंगल कार्यालयातील आचाऱ्यांची आणि पाणक्यांची महत्त्वपूर्ण (?) कामे एकजात ब्राह्मण मंडळींकडे सोपवण्यात आलेली असावीत!
कोणत्याही व्यक्तीचा बुद्ध्यांक हा ती व्यक्ती कोणत्या जातीत अगर वर्णात जन्माला आली, त्यावर बिलकुल अवलंबून नसतो आणि कोणत्याही एका जातीला बुद्धीचा मक्ता मिळालेला नाही, या गोष्टी जगजाहीर असताना, डॉ. पटवर्धन मनुस्मृतीचे समर्थन करण्याच्या भरात कोठपर्यंत वाहवत जातात, हे लक्षात घेता आपल्या सामाजिक जीवनाबाबत अधिकच चिंता वाटू लागते.
मनुस्मृतीचे समर्थक आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याऐवजी जेव्हा आक्रमक बनू पाहात आहेत, अशा वेळी कोणत्याही धर्माची व धर्मग्रंथाची चिकित्सा अतिशय आवश्यक वाटते. मनुस्मृतीचे समर्थक मोक्याच्या जागांवर मोर्चे बांधून बसलेले आहेत. ते विद्यापीठात आहेत, ते शासनात आहेत, ते न्यायालयात आहेत, जसे ते धर्मपीठांच्या गाद्यांवर विराजमान झालेले आहेत.
अगदी काल परवाचीच गोष्ट. कलकत्ता येथील शारदेश्वरी आश्रमात अरुंधती रॉय चौधरी या युवतीला पुरीचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी एका जाहीर समारंभात वेदपठण करण्यास सक्त मनाई केली! देश जेव्हा २१व्या शतकात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे, तेव्हा ही घटना घडते, यावरून या शक्ती किती आक्रमक व निर्लज्ज बनल्या आहेत, याची कल्पना येते.
अशा स्थितीत धर्मग्रंथांची चिकित्सा करण्याचे कार्य ऐतिहासिक महत्त्वाचे ठरते. कायद्यापुढे सारे समान ही भूमिका स्वीकारून वाटचाल करायची असल्याने माणसामाणसांमध्ये भेदभाव करणारी मनुस्मृती कचऱ्याच्या कुंडीत फेकून द्यावीच लागेल. आज कोणत्याही मुलीचे लग्न तिच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्याखेरीज करता येणार नाही, असा कायदेशीर निर्बंध आपण स्वीकारलेला असल्याने, ‘अष्टवर्षा भवेत् कन्या’ असा नियम सांगणारी मनुस्मृती आपल्या काय कामाची? भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार या देशातील कोणत्याही जातीत व कोणत्याही वर्णात जन्माला आलेल्या व्यक्तीला पंतप्रधान, राष्ट्रपती अगर सर्वोच्च न्यायालयाची न्यायमूर्ती होण्याचा अधिकार असल्याने शूद्राची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात येऊ नये, असे सांगणारी मनुस्मृती आपणाला फेकून द्यावीच लागेल. भारतीय राज्यघटनेच्या ४५व्या कलमानुसार या देशातील सहा ते चौदा वयोगटातील यच्चयावत मुलांना व मुलींना त्यांची जात कोणतीही असो सक्तीने व मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी राज्य शासनावर टाकण्यात आली असल्याने शूद्रांना शिक्षण देऊ नये, स्त्रियांना शिक्षण देऊ नये, असे दंडक घालणाऱ्या मनुस्मृतीला मूठमाती दिल्याखेरीज भारतीय समाजव्यवस्थेची कोंडी फुटेल कशी?
या पार्श्वभूमीवर धर्मग्रंथांची चिकित्सा करण्याची निकड अधिकच स्पष्ट होते. सर्व प्रकारच्या चिकित्सेचा उगम या धर्मचिकित्सेमधून व धर्मग्रंथांच्या चिकित्सेतूनच होत असतो. हे धर्मग्रंथ विज्ञानासमोर टिकू शकत नाहीत, हे अनेकवार सिद्ध झालेले आहे. गॅलिलिओ, कोपर्निकस, केप्लर यांच्या सिद्धांतानुसार बायबलमधील अनेक विचार खोटे ठरले. तथापि, धर्मपीठे व धर्ममार्तंड हे अनेक प्रकारे आपले कालबाह्य विचार समाजाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत.
लोकांनी निवडून दिलेल्या लोकसंसदेला बाजूला ढकलून जेव्हा धर्मसंसद तिची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशा वेळी मनुस्मृतीच्या समर्थकांना त्यांची योग्य जागा दाखवून देण्याची नितांत गरज आहे. डॉ.आ.ह. साळुंखे यांनी हा ग्रंथ लिहून या प्रक्रियेला फार मोठा हातभार लावला आहे. त्यांनी त्यांचे काम चोख रीतीने बजावले असल्याने त्यांचे आपण आभार मानू या आणि त्यांनी जे विचार दिलेले आहेत, ते सर्वसामान्य लोकांपर्यंत, ज्यांना मनुस्मृतीने मानसिक गुलामगिरीत खितपत ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करू या.
.............................................................................................................................................
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/search/?
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
............................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment