नेहरू आणि बोस : राजकारणाने त्यांच्यातील मैत्री घडवली होती, राजकारणामुळेच ती तुटली!
ग्रंथनामा - झलक
रुद्रांग्शू मुखर्जी
  • नेहरू व बोस आणि मूळ इंग्रजी पुस्तक व मराठी अनुवाद यांची मुखपृष्ठ
  • Fri , 05 July 2019
  • ग्रंथनामा Granthnama झलक Nehru and Bose : Parallel Lives नेहरू व बोस : समांतर जीवनप्रवास Rudrangshu Mukherjee रुद्रांग्शू मुखर्जी

अशोका विद्यापीठाचे कुलगुरू व इतिहासाचे प्राध्यापक रुद्रांग्शू मुखर्जी यांचं ‘Nehru and Bose: Parallel Lives’ हे २०१४मध्ये आलेलं इंग्रजी पुस्तक पुष्कळ गाजलं. त्याचा ‘नेहरू व बोस : समांतर जीवनप्रवास’ या नावाने नुकताच मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे. तरुण कादंबरीकार अवधूत डोंगरे यांनी हा अनुवाद केला असून रोहन प्रकाशनाने तो केला आहे. या पुस्तकाला मूळ लेखकाने लिहिलेली ही प्रस्तावना...

.............................................................................................................................................

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाच वर्षांनी कलकत्त्यात (कोलकाता) माझा जन्म झाला. जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्या विचारसावल्यांखालीच मी लहानाचा मोठा झालो. नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान, आणि माझ्या लहानपणी देशातील सर्वांत महत्त्वाचं सार्वजनिक व्यक्तिमत्त्व होते. तर, बोस यांना बंगालच्या राजकीय स्मरणालयात सर्वाधिक आदराचं स्थान देण्यात आलेलं होतं. सार्वजनिक चर्चाविश्‍वात किंवा अनौपचारिक संवादांमध्ये अनेकदा या दोन्ही व्यक्तिमत्त्वांना एकमेकांचं प्रतिस्पर्धी मानून बोललं जात असे.

बोस हे नेहरूंपेक्षा अधिक महान व्यक्तिमत्त्व होतं, परंतु कायम गांधींच्या सूचनेवरून क्लृप्त्या लढवणार्‍या नेहरूंनी राष्ट्रीय राजकारणात बोस यांना मात दिली, असा अनेक बंगाली मंडळींचा ठाम समज होता. पण शेवटी सुभाषबाबूंनीच भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, असंही त्यांचे चाहते ठोसपणे मांडत असत. जवाहरलाल नेहरू आणि गांधी यांना दुय्यम ठरवून सुभाषचंद्र बोस यांचं उदात्तीकरण साधू पाहणार्‍या अशा दृष्टिकोनांकडे दुर्लक्ष करायची शिकवण मला लहानपणी मिळाली. इथे ‘शिकवण’ हा शब्द मी हेतूत: वापरतो आहे, कारण माझ्या वडिलांनी मला दिलेल्या इतिहासाच्या अनौपचारिक धड्यांमध्ये हा एक महत्त्वाचा घटक होता.

मी महाविद्यालयात प्रवेश करेपर्यंत माझ्या आयुष्यावर सर्वांत मोठा वैचारिक प्रभाव माझ्या वडिलांचाच होता आणि ते सुभाषचंद्रांचे प्रशंसक नव्हते. सुभाषचंद्रांच्या देशभक्तीबद्दल त्यांच्या मनात शंका नव्हती, पण १९४०च्या दशकात हिटलर व अक्ष राष्ट्रांसोबत आघाडी साधण्याची योजना करणार्‍या सुभाषचंद्रांची दिशाभूल झालेली होती, असं वडिलांना वाटायचं. फॅसिस्ट आणि स्टॅलिनवादी यांच्या विरोधात त्यांची अत्यंत ठाम, स्पष्ट अशी मतं होती आणि ते स्वत:ला विचाराने निखळ नेहरूवादीच समजत असत. त्यांच्या मते, जवाहरलाल नेहरूंच्या कल्पना व दृष्टिकोन अत्यंत यथायोग्य आणि बरोबर असेच होते. त्यामुळे घरात मला जे ‘इतिहासाचे धडे’ दिले जायचे, त्यांचा कल नेहरूंच्या बाजूने कललेला असायचा; बोस यांच्याकडे तसं दुर्लक्षच झालं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पुढे महाविद्यालयात आणि विद्यापीठामध्ये मी इतिहासाचा विद्यार्थी असताना भारतीय राष्ट्रीय चळवळ ज्या पद्धतीने शिकवली जात होती, त्यातून सुभाषचंद्रांबद्दलची माझी उदासीनता कायम राहिली. ते मुख्य प्रवाहातले नव्हते, असं वाटायचं. दरम्यानच्या काळात फॅसिझम व १९३०-४०च्या दशकांतल्या युरोपीय इतिहासाबद्दलचं माझं आकलनही वाढलं होतं. माझ्या वडिलांनी माझ्यात रुजवलेल्या फॅसिस्टविरोधी व एकाधिकारशाहीविरोधी भावना या काळात अधिक पक्क्या होत गेल्या. परिणामी, सुभाषचंद्रांबद्दल माझ्या मनात फारशी आस्था निर्माण झाली नाही. उलट, जपानच्या मदतीने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न अयोग्य व अदूरदर्शी असल्याचा माझा समज आणखी दृढ झाला.

प्रामाणिकपणे सांगायचं तर, सुभाषचंद्राच्या भक्त-समर्थकांच्या अतार्किक मनोभूमिकांमुळे, भारतीय राष्ट्रीय चळवळीतील सुभाषचंद्रांच्या भूमिकेबाबत माझ्या मनाची जी फसगत होत होती, ती वाढतच गेली. हे समर्थक सुभाषचंद्रांबाबत कायम भक्तिभावानेच बोलत. सुभाषचंद्रांचं  लग्न झालं होतं व त्यांना मुलगी होती, हे या समर्थकांनी कधीच मान्य केलं नाही आणि सुभाषचंद्र अजूनही जिवंत आहेत यावर या मंडळींचा ठाम विश्‍वास होता. हिमालयातल्या कुठल्यातरी गुहेत किंवा सायबेरियात निर्वासित अवस्थेत सुभाषबाबू लपलेले आहेत; आणि जवाहरलाल व काँग्रेसच्या सत्ताकाळात रसातळाला गेलेल्या भारत देशाला या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सुभाषबाबू परत येणार आहेत, अशा या भक्तांच्या समजुती असत. या समर्थकांच्या विचित्र आणि भाबड्या दृष्टिकोनांमधून सुभाषचंद्रांकडे बघता येणार नाही, हे माझ्या विवेकी मनाला एकीकडे वाटत होतं; पण सुभाषचंद्रांबद्दलचं माझं आकलन या समर्थकांच्या मतांनी कलुषित केलं होतं, हे मला प्रामाणिकपणे कबूल करावंच लागेल.

त्यामुळे सदर पुस्तक लिहिणं ही माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. ऐतिहासिक लेखन आणि दस्तऐवज वाचण्याच्या प्रक्रियेत मी माझ्याच काही पूर्वग्रहांना, समजुतींना व वैचारिक दबावांना छेद देत पुढे जातो आहे, याबद्दल मी सजग होतो. आणि हे केवळ सुभाषचंद्रांसंबंधीच लागू होतं असं नाही, तर जवाहरलाल यांच्याबाबतीतही माझा प्रवास असाच होता. माझ्या वडिलांना नेहरूंबद्दल वाटणारी आत्मीयता आणि आदर यांतून माझी नेहरूंबद्दलची मतं घडली, हे तर खरंच; पण त्यासोबतच माझे शिक्षक व नंतर मित्र बनलेले आणि अर्थातच जवाहरलाल नेहरूंचं महत्त्वाचं चरित्र लिहिलेले सर्वपल्ली गोपाळ यांचाही माझ्या मतांवर प्रभाव पडला.

नेहरूंकडे चिकित्सकपणे पाहणं महत्त्वाचं आहे आणि खुद्द नेहरूंनाही त्यांच्या फुढील पिढ्यांकडून असा चिकित्सकपणा अपेक्षित होता, असं गोपाळ यांच्यासोबत झालेल्या संवादांमधून माझं मत बनलं. किशोरवयात किंवा अगदी विशीमध्ये प्रवेश केल्यानंतरही माझी जवाहरलाल यांच्याबद्दलची जी काही मतं होती. ती मी मध्यमवयीन होईपर्यंत अधिक गुंतागुंतीची बनली, त्यांत अधिक सूक्ष्म जाण आली. माझा जन्म झाला तो काळ आणि माझ्या जन्माचं ठिकाण यांमुळे नेहरू आणि बोस या दोन विलक्षण व्यक्तिमत्त्वांचं अस्तित्व तसंही मी टाळू शकले नसतोच. त्या दोघांची व्यक्तिमत्त्वं समजून घेण्याच्या प्रयत्नांचा परिपाक म्हणजे हे पुस्तक.

शिवाय, फारशा फुलू न शकलेल्या एका मैत्रीचा शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे. फुलण्याआधीच कोमेजलेल्या या मैत्रीला तिच्या मरणोत्तर काही थोडीशी टवटवी आली, पण तात्पुरती. जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांचे जीवनप्रवास अगदी जवळून परंतु समांतर रेषांसारखे झाले, हे लक्षणीय होतं. सनावळीच्या हिशेबात दोघांमध्ये दहाहूनही कमी वर्षांचं अंतर होतं; दोघांचाही जन्म तुलनेने संपन्न घरांमध्ये झाला; दोघांचंही शिक्षण केम्ब्रिजमध्ये झालं; दोघांनीही फायदेशीर कारकिर्दीचा पर्याय नाकारून गांधींच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय चळवळीत सहभाग घेतला; युरोप व आशियातील घडामोडींबद्दल दोघेही सजग होते आणि या घडामोडींचा त्यांच्या विचारांवरही मोठा परिणाम होत होता; दोघेही स्वत:ला डाव्या विचारसरणीचे मानत, त्यांचा समाजवादाकडे ओढा होता. या पार्श्‍वभूमीवर दोघंही एकमेकांच्या जवळ येणं साहजिक होतं.

१९३०च्या दशकात काही वर्षं ते मित्र म्हणता येतील इतके जवळ आलेले होते. या काळात त्यांच्यात विविध मतं-दृष्टिकोनांची देवाणघेवाण होत असे, ते समान पुस्तकं वाचत असत आणि राष्ट्रीय चळवळीत काही मुद्दा लावून धरण्याच्या बाबतीतही ते सोबत असत. परंतु हे दशक संपत येईपर्यंत या दोघांमधील राजकीय अंतर अधिकाधिक स्पष्ट होत गेलं. राष्ट्रीय चळवळीचा मार्ग, गांधींबद्दलच्या त्यांच्या भावना, फॅसिझमबद्दलची मतं या मुद्द्यांवरून त्यांच्यातील असहमती वाढत गेली. दोघांच्या विचारप्रवासाचे मानसिक नकाशेच अत्यंत वेगळे होते. १९४०चं दशक सुरू झालं तेव्हा ही मैत्री, त्यातील आपुलकी या गोष्टी इतिहासजमा झाल्या. पण नंतर सुभाषचंद्रांचं अकाली निधन झालं, तेव्हा जवाहरलाल यांना सुरुवातीच्या काळातला जिव्हाळा विसरणं शक्य झालं नाही आणि सुभाषचंद्र व भारतीय राष्ट्रीय सेना (इंडियन नॅशनल आर्मी) यांच्याबद्दलची मतं जवाहरलाल यांनी बदलून घेतली. सुभाषचंद्रांच्या निधनानंतर जवाहरलाल यांनी सुभाषचंद्रांबाबतचे आपले विचार बोलून आणि लिहून व्यक्त केले. त्यातून एकप्रकारे त्यांच्या जुन्या मैत्रीला उजाळा मिळाला, परंतु अर्थातच तो अनुभवण्यासाठी सुभाषचंद्र हयात नव्हते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यातील संबंध सहज नव्हते, पण त्यांत एक प्रकारची मर्मभेदकता होती. या संबंधांकडे इतिहासकारांनी मात्र आवश्यक तेवढं लक्ष दिलेलं दिसत नाही. ही उणीव दिसल्यावर, नेहरू-बोस यांच्यातील मैत्रीसंबंधांची पुनर्रचना करून त्यातील दुवे उलगडण्याचा विचार मी केला. या पुस्तकात या दोघांमधील संबंधांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे, त्यांच्या संपन्न आयुष्यांची संपूर्ण कहाणी सांगण्याचा कोणताही प्रयत्न इथे नाही. त्यामुळे अर्थातच, हे या दोन व्यक्तींचं चरित्र नव्हे.

या दोघांच्या संबंधांना अर्थातच राष्ट्रीय चळवळीचीच पार्श्‍वभूमी होती. १९२०च्या दशकाची सुरुवात झाल्यापासून ते स्वातंत्र्य नजीक येईपर्यंत या दोघांचे विचार आणि कृती राष्ट्रीय चळवळीच्या पार्श्‍वभूमीवरच घडल्या. हा काळ अतिशय धामधुमीचा होता. काँग्रेसचं स्वरूप पालटून गांधींनी या संघटनेला कृतिशील बनवलं होतं आणि जनतेच्या अधिक जवळ नेलं होतं. जनतेनेही गांधींच्या आवाहनांना प्रतिसाद दिला होता. आधी असहकार आंदोलन आणि नंतर सविनय कायदेभंगाच्या आंदोलनावेळी जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली होती.

नेहरू व बोस यांनीही हा काळ अनुभवला होता आणि या उत्साही वातावरणात ते सहभागीही झाले होते. ब्रिटिश सत्तेपासून भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्याचं ध्येय राष्ट्रीय चळवळीच्या प्राधान्यक्रमावर आणण्याचं काम त्यांनी केलं. ध्येयासंबंधीचा हा आग्रह महत्त्वाचा होता, कारण १९२०-३०च्या काळात ब्रिटिशांनी भारतावरील आपलं वर्चस्व कायम राखण्यासाठी वेगळी पावलं उचलायला सुरुवात केली होती. घटनात्मक सवलती देऊन भारतीयांमधीलच प्रभावशाली गटांशी संगनमत करायचे ब्रिटिशांचे प्रयत्न या काळात सुरू झाले होते. पण अशा प्रदर्शनी कृत्यांनी जवाहरलाल किंवा सुभाषचंद्र विचलित होणारे नव्हते. पूर्ण स्वराज्याच्या आपल्या मागणीवर ते ठाम राहिले. प्रांतीय सरकारांमध्ये पदं मिळण्याच्या शक्यतेला काँग्रेसमधीलच काही नेते भुलले होते आणि त्यांच्याविरोधातही जवाहरलाल व सुभाषचंद्र यांना लढा द्यावा लागत होता. या लढ्यात नेहमीच त्यांचा विजय व्हायचा असंही नव्हतं. आणि अपयश आल्यास त्यावरच्या दोघांच्या प्रतिक्रिया मात्र अगदी भिन्न असायच्या : एक अधिक ठोसपणे आपलं प्रतिपादन मांडत असे, तर दुसरा अधिक अलिप्त आणि अंतर्मुख होत असे.

या दोघांच्या अपेक्षाभंगाची इतरही काही कारणं होती. असहकार व सविनय कायदेभंग ही दोन्ही आंदोलनं गांधींनी अचानक मागे घेतली होती, त्यामुळे जवाहरलाल व सुभाषचंद्र या जहाल तरुण नेत्यांची चिडचिड झाली होती. राष्ट्रीय चळवळीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर गांधींनी सामाजिक उत्थान आणि तत्सम बदलांवर भर दिल्यामुळे हे दोघे गोंधळात पडले होते. ब्रिटिश सत्तेविरोधातील संघर्ष पुढे नेण्याची प्रबळ इच्छा या दोन्ही नेत्यांमध्ये होती, तर १९३०च्या संपूर्ण दशकात गांधींनी जनआंदोल न उभारण्याबद्दल निरिच्छाच दाखवली; काँग्रेस आणि जनता यांपैकी कोणीच आत्ता अशा आंदोलनासाठी तयार नसल्याची गांधींची भूमिका होती. काँग्रेसमधील गांधींचे निकटवर्तीय पडद्यामागील राजकारणात गुंतलेले असायचे. संघटनेवरील आपल्या किंवा गांधींच्या नियंत्रणाला आव्हान देणार्‍या तरुण नेत्यांना दूर ठेवण्याची कामगिरी हे पडद्यामागचे राजकारणी पार पाडायचे. जवाहरलाल व सुभाषचंद्र या दोघांनाही या कारवायांचा फटका वेगवेगळ्या वेळी बसला होता. अशा कुटील क्लृप्त्यांवरही या दोघांच्या प्रतिक्रिया भिन्न प्रकारच्या असायच्या. जवाहरलाल शरणागती पत्करत, तर सुभाषचंद्र बंडखोरीच्या भूमिकेत जात.

गांधींबद्दल आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या भूमिकेबद्दल जवाहरलाल व सुभाषचंद्र यांच्या दृष्टिकोनांमध्ये तफावत होती आणि त्यातूनच त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये भिन्नता निर्माण झाली होती. दोघांच्याही मनात गांधींबद्दल आदर आणि कौतुक होतं, परंतु त्यांचा प्रभाव व नियंत्रण यासमोर संपूर्ण शरणागती पत्करायची सुभाषचंद्रांची तयारी नव्हती. जवाहरलाल हेसुद्धा गांधींवर टीका करत असत. परंतु ते त्यांच्यावर अवलंबूनही राहिले. गांधींनीही जवाहरलालकडे आपला नियुक्त राजकीय वारसदार म्हणून पाहिलं आणि सुभाषचंद्र हा काहीसा बंडखोर व मार्गभ्रष्ट मुलगा असल्याची गांधींची भूमिका राहिली. नेहरू व बोस यांच्या मैत्रीवर या सर्व गोष्टींचा प्रभाव पडत होताच आणि त्यानुसार त्यांच्या संबंधांमध्ये उतार-चढाव येत राहिले.

या घटकांचं व नेहरू-बोस या परस्परभिन्न प्रवृत्तीच्या व्यक्तींचं आणि त्यांच्या वैचारिक भूमिकांचं विश्लेषण करायचा प्रयत्न या पुस्तकात आहे. ते मित्र होते, पण ते एकमेकांचे सुहृद मात्र कधीच नव्हते. वैयक्तिक आपुलकी आणि ममता यांपेक्षाही राजकारणाने त्यांच्यातील मैत्री घडवली होती. राजकारणामुळेच ही मैत्री तुटली.

राजकीय भेदाभेदांपलीकडे जाऊनही टिकून राहण्यातले हे मैत्रीसंबंध नव्हते. पण उपलब्ध दस्तऐवजांवरून आपल्याला असंही दिसतं की, या दोघांमध्ये शत्रुत्वाची भावनाही नव्हती. त्यांच्या निष्ठा काही वेळा परस्परविरोधीही ठरल्या, परंतु भारत देश व या देशाचं स्वातंत्र्य यांवरची दोघांची निष्ठा अढळ होती. एका अशांत काळाला सामोरं गेलेल्या या दोन व्यक्तिमत्त्वांची गुंतागुंतीची कहाणी सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.

.............................................................................................................................................

‘नेहरू व बोस : समांतर जीवनप्रवास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4973/Nehru-Va-Bose---Samantar-Jeevanpravas

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......