अजूनकाही
सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील इतिहासाचे प्राध्यापक रवींद्र लक्ष्मण लोणकर यांचे ‘युरोपातील आरंभीच्या विद्यापीठांचा उदय : सालेर्नो, बोलोग्ना आणि पॅरिस’ हे पुस्तकच नुकतेच डायमंड पब्लिकेशन्सच्या वतीने प्रकाशित झाले आहे. सालेर्नो, बोलोग्ना आणि पॅरिस या युरोपातील सुरुवातीच्या विद्यापीठांविषयीचे हे पुस्तक आहे. त्यातील ग्रंथालयांविषयीचे हे छोटेसे प्रकरण....
.............................................................................................................................................
मध्ययुगातील ग्रंथालयास स्वतंत्र इमारत तर नसेच परंतु ग्रंथालयासाठी स्वतंत्र वर्गाचाही विचार करणे जड जात असे. ग्रंथालयासाठीचा लॅटिन शब्द ‘अर्मारिअम’ आणि याचा अर्थ मोठी पेटी किंवा कपाट; यात पुस्तके ठेवली जात. ही पेटी वा कपाट चर्चमध्ये ठेवले जाई, नंतर पुष्कळदा मठाच्या भिंतीतील खान्यांमध्ये पुस्तके ठेवली जात. काही ठिकाणी शाळेच्या पुस्तकांसाठी वेगळी जागा असे. अर्थात पुस्तकांचा संग्रहही अगदीच कमी असे. मठांच्या अगदी आरंभीच्या याद्यांमध्ये काही थोड्या ग्रंथांचा उल्लेख येतो आणि ही संख्या कदाचित २० किंवा इतपतच असावी. इ.स. ११ व्या शतकाच्या अखेरीस, मठातील सर्व पुस्तकांचा ढीग एका कांबळ्यावर लावून ठेवणे शक्य होईल इतपतच पुस्तकांची संख्या असे, अशा प्रकारचे वर्णन येते. प्रत्येक मठवासीला वार्षिक वाचनासाठी एका प्रतीचा पुरवठा करता येईल इतक्या पुरेशा प्रती असतील असेही पाहिले जात असे. ‘ग्रंथालयाशिवाय मठ असणे म्हणजे शस्त्रागाराशिवाय किल्ला असण्यासारखे होय’ असे समजले जाई.
पुस्तकांचा संग्रह देणगीतून, खरेदीद्वारा आणि मठात तयार केलेला प्रतींमधून वाढत असे. पुस्तकाची नक्कलप्रत तयार करणार्या व्यावसायिकांचा वर्ग अद्याप उदयास आलेला नव्हता. त्यामुळे पुस्तकांची सर्वसामान्य स्वरूपाची बाजारपेठ अशी नव्हती. यास अपवाद बोलोग्ना आणि पॅरिस; येथे पुस्तकांची खरेदी होत असावी असे दिसते. सर्वसाधारणपणे इ.स. १२ व्या शतकात पुस्तकांची खरेदी ही नेहमीची बाब नव्हती. हस्तलिखिते स्वाभाविकपणे महागच होती, विशेषतः चर्चमधील गायकवृंदासाठीची मोठी सेवा-पुस्तके. काही हस्तलिखित प्रतींबद्दलची माहिती आपणास मिळते. मोठ्या स्वरूपातील बायबलसाठी १० टॅलेन्ट्स द्यावे लागले तर एका प्रार्थना-पुस्तकासाठी द्राक्ष-मळा द्यावा लागला. इ.स. १०४३ मध्ये बार्सिलोनाच्या बिशपने एका ज्यूकडून एक घर आणि एका जमिनीच्या तुकड्याच्या मोबदल्यात प्रिस्किअनचे दोन भाग विकत घेतले. ग्रंथालयास भेटीदाखल पुस्तके मिळत इ.स. ११६४ मध्ये बेयूस्कच्या बिशप फिलिप याने बेकच्या ग्रंथालयासाठी १४७ भाग मृत्युपत्राद्वारे दिले; अर्थात यातील २७ पुस्तके ग्रंथालयात कधीच आली नाहीत. इ.स. ११८०मध्ये सॅलिसबरीच्या जॉनने त्याचा लहानसा ग्रंथसंग्रह चारत्रेजच्या कॅथीड्रलला दिला.
हस्तलिखित प्रत तयार करणे हा निरस प्रकार होता आणि त्रासदायकही होता. ओर्डेरिकससारख्या परिश्रमी नक्कलकाराची बोटे थंडीमुळे जेव्हा संवेदनाशून्य झाली, तेव्हा त्याला नक्कल करण्याचे त्याचे काम बाजूला ठेवावे लागले. इ.स. १० व्या शतकात नोव्हाराच्या ब्रदर लिओने तक्रार केली की, तीन बोटांनी लिहीत असताना पाठ वाकली जाते; बरगड्या पोटात खोल जातात आणि संपूर्ण शरीराला त्रास होतो. नक्कल-प्रत तयार करताना लागणारा वेळही आपणास कळतो. इ.स. ११०४मध्ये लुक्झिलच्या कॉन्स्टन्टाइनने बोएथिएसच्या भूमितीची नक्कल प्रत ११ दिवसात तयार केली - आजची नेहमीच्या आकाराची ५५ छापील पाने. इ.स. ११६२मध्ये लिऑन येथे बायबलची नक्कल प्रत सहा महिन्यात तयार करण्यात आली आणि सातव्या महिन्यात त्यावरील नक्षीकाम करण्यात आले. इ.स. १२२०-२१ मध्ये नोव्हारामध्ये नक्कलकाराने बायबलची नक्कल प्रत तयार करण्यास १५ महिने घेतले. नक्कल-प्रतीचे काम पूर्ण झाल्यानंतर शेवटी परमेश्वराचे आभार मानले जात. हस्तलिखित प्रत तयार करणार्याच्या श्रमास प्रशंसनीय सेवा म्हणून मान्यता मिळाली. क्लुनीच्या मठात नक्कलकारांना वाद्यवृंदाच्या सेवेतून मोकळीक देण्यात आली. सिस्टेरसिअनांनी सुगीचा हंगाम सोडता नक्कलकारांना शेतीच्या श्रमातून मोकळे केले. इ.स. ११ व्या शतकामध्ये आरासचा मठवासी लिहितो - ‘‘प्रत्येक अक्षर, ओळ आणि बिंदूसाठी मला पाप माफ आहे.’’ मठवासींना नक्कल-प्रत तयार करण्यास सांगणे हे नेहमीच सहजशक्य नसे, त्यामुळे नक्कलकारांना बाहेरून बोलवावे लागत असे.
मध्ययुगाच्या आरंभी एका जातीच्या लाव्हाळ्यापासून (पपाइरस) तयार केलेल्या कागदावरील (भूर्जपत्र) लिखाण सर्वसाधारणपणे उपयोगात राहिलेले नव्हते. पश्चिम युरोपात कागद अद्याप आलेला नव्हता. मेंढीच्या कातड्यापासून काळजीपूर्वक तयार केलेल्या खरबरीत स्वरूपातील चर्मपत्रासारख्या दिसणार्या पिवळसर कडक कागदावर किंवा कोवळ्या कोकरापासून तयार केलेला मुलायम स्वरूपातील चर्मपत्रासारख्या दिसणारा कागद कापून त्यास दुमडून दस्ता तयार केला जाई आणि त्यावर ओळी आखल्या जात. हस्तलिखिते वेगवेगळ्या आकारातली असत. मोठ्या हस्ताक्षरातील मोठ्या आकाराची बायबल आणि सेवापुस्तके आढळतात. इ.स. १२ व्या शतकातील बारीक परंतु सुस्पष्ट हस्ताक्षरातील लहान खंड मोठ्या संख्येने आढळतात. काही तर इतकी लहान असतात की प्रवासी ती आपल्या खिशात ठेवू शके. इ.स. १२ वे शतक हे सुबक हस्ताक्षरातील लेखनकलेचा सुवर्णकाळ म्हणून ओळखले जाते. कारोलिन्गियन काळातील लघुत्तम अक्षरांचा सुवाच्यपणा याही काळात आढळतो. इ.स. १३ व्या शतकात तिरप्या लिखाणाचा पुन्हा आढळ होतो आणि गोथिक पद्धतीचे फटकारे आणि अक्षरजोडणी आणि असंख्य संक्षेप येतात.
इ.स. १२ व्या शतकातील पुस्तकांच्या सुमारे साठ एक सूच्या मिळतात. अर्थात या सूच्यांचा फार उपयोग आहे असे नाही. यात तारीख दिलेली नसते; आशयाबाबतची माहिती फारच असमाधानकारक आढळते. काही वेळा तर अभिजात कालीन लेखकाचा ग्रंथ शाळापुस्तक म्हणून दाखविलेले असते. नंतरच्या काळात अधिक विस्तृत आणि नेमक्या सूच्या केलेल्या आढळतात. मध्ययुगातील सूच्या वर्णानुक्रमे नसत. सूच्या करताना फारतर आद्याक्षर विचारात घेतले जाई. यास अपवाद कोर्बी आणि सेंट बेर्टिन येथील सूच्यांचा होय; येथील ग्रंथसूच्या वर्णानुक्रमे आढळतात. ग्रंथसूची विषयानुसार सैल मांडणीत केलेली आढळते. त्यात आरंभीला बायबल नंतर सेवा पुस्तके आणि नंतर ख्रिस्ती आचार्यांचे लिखाण येते.
या काळातील चांगल्या ग्रंथालयात नेहमीची आढळणारी पुस्तके म्हणजे प्रथम बायबल, याचे अनेक भाग असत. बायबलच्या काही प्रतींमध्ये कठीण शब्दांच्या स्पष्टीकरणात्मक टीपा दिलेल्या नसत. खरोखरच बायबलला अनेकदा - ‘बिब्लिओथेका’ - ग्रंथालय म्हटले जाई. ख्रिस्ती उपासनेच्या दृष्टिकोनातून बायबलचे काही भाग - पवित्र गीतांचे पुस्तक, शुभवर्तमाने, उपदेशपर पत्रे- स्वतंत्रपणे ठेवलेले असत. यानंतर चर्चमधील सेवापुस्तके-निरनिराळ्या वेळी म्हणावयाच्या प्रार्थनांचे पुस्तक, चर्चमधील सेवेच्यावेळी गाईल्या जाणार्या प्रश्नोत्तररूपी धर्मगीतांचे पुस्तक, पाठसंग्रह ग्रंथ, पत्रानंतरचे गाईले जाणारे प्रश्नोत्तररूपी गीत आणि ‘ट्रोपर’ इत्यादी आणि धार्मिक दिनदर्शिका आणि एक किंवा अधिक मठांविषयीचे नियम येतात. यानंतर ख्रिस्ती आचार्यांचे लिखाण - अॅम्ब्रोज, जेरॉम, ऑगस्टीन आणि ग्रेगरी; यापैकी अॅम्ब्रोज आणि जेरॉमला कमी जागा लागे. चांगल्या ग्रंथालयात जोपर्यंत ग्रेगरी द ग्रेटच्या ‘मोरालिआ ऑन जॉब’चे सहा भाग येत नाहीत तोपर्यंत त्यास पूर्णत्व येत नाही, असे समजले जाई.
आवश्यक पुस्तकांच्या वर्गात मार्टिआनुस कपेला, प्रिस्किअन, बोएथिअस, इझिडोर आणि बेडे यांचे ग्रंथ असत. बायबल आणि व्हर्जिल नंतरचा मध्ययुगातील सर्वात लोकप्रिय लेखक म्हणून मार्टिआनुस कपेलाचा उल्लेख येतो; त्याने मन मुक्त करणार्या सात विषयांची - ‘लिबरल आर्ट्स’ - संकल्पना प्रत्येक विषयाच्या रूपरेखेसह मांडली. प्रिस्किअन लॅटिन व्याकरणासाठी आणि लॅटिन साहित्यातील उदाहरणांसाठी प्रसिद्ध होता. इ.स. १२ व्या शतकात बोएथिअस व्यापक प्रमाणावर माहीत होता, तो त्याच्या ‘कन्सोलेशन ऑफ फिलॉसॉफी’ आणि ख्रिस्ती धर्मशास्त्रावरील ग्रंथांसाठी. तसेच तर्कशास्त्र, अंकगणित, वक्तृत्व आणि लेखन संपन्न करणारी कला ‘रेटरिक’ आणि संगीत या विषयांवरील त्याच्या पाठ्यपुस्तकांसाठी तो प्रसिद्ध होता. इझिडोरचा ‘एटिमॉलॉजि’ हा मध्ययुगात मोठा ज्ञानकोश म्हणून ओळखला जाई. धार्मिक नियमांच्या संदर्भातील ग्रेशिअनचा ‘डिक्रीटम’ महत्त्वाचा मानला जाई. याशिवाय ग्रंथालयात कारोलिन्गियन काळातील धर्मशास्त्रीय आणि ह्युमॅनिस्टांचे लिखाण आढळत असे. इ.स. १२ व्या शतकातील सेंट आन्सेल्म, सेंट इव्हो, सेंट बर्नार्ड, पीटर लाँबर्ड यांच्याही ग्रंथांना ग्रंथालयात जागा मिळाली. मात्र या काळात देशी भाषांमधील पुस्तके क्वचितच आढळतात.
मध्ययुगातील ग्रंथालये ही सार्वजनिक ग्रंथालये नव्हती, कारण त्या काळात वाचक-वर्ग असा नव्हता. पुस्तके ज्याची असत त्याच्याचसाठी ती असत. काही वेळा नक्कल-प्रत तयार करण्यासाठी हस्तलिखितप्रत मागवून घेतली जाई. कालौघात बंद कपाटात ठेवलेली पुस्तके आणि मुक्त वाचनासाठी असलेली पुस्तके असा फरक केला जाऊ लागला.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4968/Europatil-Arambhichya-Vidyapeethancha-Uday
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment