कवि, कुछ ऐसी तान सुनाओ
पडघम - साहित्यिक
विनय हर्डीकर
  • ‘एक संध्याकाळ कवितांची- विनयसाठी’ या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका
  • Thu , 04 July 2019
  • पडघम साहित्यिक विनय हर्डीकर कविता कवी मर्ढेकर माडगूळकर बाबा आमटे. कुसुमाग्रज इंद्रजित भालेराव

लेखक, पत्रकार, प्राध्यापक, समीक्षक, संपादक, शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता-अभ्यासक इत्यादी नात्यांनी ओळख असलेल्या विनय हर्डीकर यांच्या लेखनाची सुरुवात मात्र कवितेनेच झाली होती. त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झालेला नाही, मात्र एक संग्रह होईल इतक्या त्या आहेत. २४ जून रोजी त्यांनी वयाची ७० वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने ‘एक संध्याकाळ कवितांची- विनयसाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. २३ जूनला सायंकाळी साडेपाच वाजता, पुणे येथील नॅशनल फिल्म अर्काइव्हच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. डॉ. स्वर्णलता भिशीकर व इतर काही मित्रांनी हर्डीकरांच्या कविता सादर केल्या. यावेळी स्वत: विनय हर्डीकर यांनीही काही कविता वाचल्या. शिवाय, त्यांच्या काही ध्वनिचित्रफिती (कविता सादरीकरणाच्या) यावेळी दाखवल्या गेल्या. त्या पार्श्वभूमीवर हर्डीकरांचे हे मनोगत. 
.............................................................................................................................................

काही वर्षांपूर्वी ‘साधना’च्या एका दिवाळी अंकात ‘माझा वैचारिक प्रवास’ असा दीर्घ लेख मी लिहिला होता. त्या लेखात मी असा स्पष्ट उल्लेख केला होता की, माझा जीव कवितेत अडकलेला होता. त्यामुळे आता जरी माझं सगळं लिखाण गद्य आणि त्यातही बरंचसं विश्लेषणात्मक/ टीकात्मक आहे, तरी मुळात मला कवी व्हायचं होतं! त्यामुळे इतकं गद्य लिहूनही एक संग्रह होईल एवढ्या कविता मी लिहिलेल्या आहेत. कविता लिहिली की, मला ती पाठच होते. तिच्या दोन-चार प्रती मी काढतो आणि त्या त्या वेळी कवितेमुळे माझ्याशी जोडल्या गेलेल्या मित्रांना देऊन टाकतो. माझ्याकडे कवितांची वही वगैरे नाही. दहा वर्षांपूर्वी माझ्या साठीनिमित्त जे चार कार्यक्रम झाले, त्यातील दोन संगीतविषयक होते आणि दोन वैचारिक होते. तेव्हा माझ्या एका मित्राने त्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेवरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, त्या चार कार्यक्रमांत ‘विनय आणि कविता’ हा विषय कुठेच आलेला नव्हता. त्यावेळच्या मुलाखतीत आणि भाषणात बोलताना मी काही कविता म्हटल्या होत्या. पण कवितेशी असलेलं माझं जिव्हाळ्याचं आंतरिक नातं त्या कार्यक्रमात पूर्णपणे निसटून गेलं होतं. त्यामुळे आता १० वर्षांनी माझ्या मित्रांनी ‘विनय आणि कविता’ हाच विषय ठरवला. त्यावेळी मी त्यांना म्हटलं की, ‘आपण सगळेच मिळून कविता म्हणू.’ तर हे या कार्यक्रमाचं निमित्त आणि प्रयोजन!

माझा कविता ‘वाचण्यावर’ विश्वास नाही. कविता ही वाचायची गोष्टच नाही. कविता ही ‘म्हणायची’ गोष्ट आहे. इथे थोडं स्पष्टीकरण दिलं पाहिजे, ज्ञानेश्वरीपासूनचे जे ग्रंथ आहेत (ज्यांचा विषय तत्त्वज्ञान असूनही ते काव्यग्रंथ आहेत.) त्या सगळ्या श्रोत्यांसमोर म्हटलेल्या ओव्या आहेत. ज्ञानेश्वर कुठेतरी एकांतात जाऊन ते लिहीत बसले नव्हते. ज्ञानेश्वर गीतेचं विवरण करत होते आणि सच्चिदानंदबाबा ते उतरून घेत होते. अभंगसुद्धा ‘म्हणण्यासाठी’ लिहिले गेलेले आहेत. नामस्मरणाचे इतके अभंग का आहेत? कारण ते अभंग म्हटले की, नामस्मरणाचं पुण्य आपोआप मिळतं. आपल्या सगळ्या आरत्या, स्तोत्रं, लावण्या, पोवाडे या लोकांसमोर म्हणायच्या गोष्टी होत्या; केवळ कागदावर लिहिण्यासाठी त्या नव्हत्या. अगदी टीकात्मक ग्रंथही श्रोत्यांसमोर ‘म्हटला’ जायचा. ‘तुमचं काय पाठांतर आहे?’ असं विचारण्याऐवजी ‘तुम्ही काय म्हटलं आहे?’ असं विचारण्याचीच पद्धत परंपरेमध्ये होती. भारतातल्या सगळ्याच भाषांमधील मौखिक परंपरा फार मोठी आहे. लोकगीतं, जात्यावरच्या ओव्या, बहिणाबाई चौधरींची कविता हा त्याचाच भाग आहे. ही ‘म्हटलेली’ कविता नवरसपरिपूर्ण असते. म्हणून मला असं वाटतं की, कविता ही वाचायची गोष्ट नसून म्हणायची गोष्ट आहे. त्याप्रमाणे मी कविता ‘म्हणतो’. आत्मस्तुती म्हणून घेऊ नका, पण हजार वर्षांतले मराठीतले जे महत्त्वाचे कवी आहेत; त्यातल्या प्रत्येकाचं मला काही ना काही पाठ आहे. ते घोकून पाठ केलेलं नाही; मला ‘मेमरीआई’ प्रसन्न आहे. म्हणण्याची आवड आणि त्यासाठी आवश्यक पाठांतर या दोन्ही गोष्टी माझ्याकडे आहेत. थोडं ट्रेड सिक्रेट सांगायचं तर, कविता म्हणताना मला त्या पुस्तकाचं पानच दिसत असतं आणि ते मी वाचत असतो. काही वेळेला एखादी ओळ अस्पष्ट झाली तर मीसुद्धा अडतो. गेली पन्नास ते साठ वर्षं कुठेही मित्रांचा, विद्यार्थ्यांचा गट जमला आणि मला कुणी म्हटलं, ‘एक दोन कविता म्हणा..’ तर मी दहा-बारा कविता म्हटल्याशिवाय थांबत नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पूर्वी आपल्याकडे जे काव्यगायन व्हायचं ते आणि या कविता यांचा काही संबंध नाही. ते काव्यगायन कवी वृत्तानुसार करत असे. म्हणून तांब्यांपासून कुसुमाग्रजांपर्यंतचे कवी कवितेच्या वृत्ताचं नाव देत असत. काही वेळा वृत्त कवितेला, विषयाला, कवीच्या स्वभावाला अनुसरून असतं; काहीवेळा घोटाळा होतो. उदाहरणार्थ, कुसुमाग्रजांच्या ‘अहिनकुल’ या कवितेत वृत्त, वृत्ताची गती, कुसुमाग्रजांची भाषेवरील हुकुमत आणि त्या कवितेचा विषय हे सगळं जुळून आलेलं आहे. ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या कुसुमाग्रजांच्याच कवितेत तिचं सुमंदारमाला वृत्त, त्याची संथ गती आणि पृथ्वीची विरहाची वेदना हे सगळं जुळून आलं आहे. काही वेळा हे विसंगत होतं. उदाहरणार्थ, ‘कोलंबसाचं गर्वगीत’ ही कविता तात्यासाहेब ‘गायले’ असते. त्या कवितेचं वृत्त केशवकरणी आहे. ‘केशवकरणी । अद्भुत लीला । किर्तनी ऐकू चला।। उपेंद्रा शरण जाई तो भला।।’ हा धावा याच वृत्तात आहे. या वृत्तात त्यांनी कोलंबसाचे गर्वगीत लिहिले. ‘हजार जिव्हा। तुझ्या गर्जू दे। प्रतिध्वनीने त्या। समुद्रा डळमळूदे तारे।।’ इथे विसंगती आहे. वृत्त आणि कविता यांचं योग्य मॅचिंग इथे झालेलं नाही. कोलंबस गर्वाने सांगतो आहे की, आपल्याला जग पादाक्रांत करायचं आहे. इथे कविता म्हणताना वृत्त बाजूला ठेवावं लागतं.

कालांतराने माझ्या असं लक्षात आलं की, प्रत्येक कवितेत वृत्त आणि छंद तर असतोच, पण प्रत्येक कवितेची एक आंतरिक लय असते, प्रत्येक कवितेचा एक टोन असतो. त्यामुळे कोलंबसाचे गर्वगीत हे गीत नाही; ते भाषण आहे. त्यामुळे ती कविता ‘म्हटली’ पाहिजे. पण पृथ्वीचं प्रेमगीत हे ‘गीत’ आहे. त्यामुळे ती म्हणताना गीतासारखी म्हटली पाहिजे. हे करून दाखवता येतं. त्या कवितेची लय आणि टोन सापडेपर्यंत थांबलं पाहिजे.

केशवसुतांचं उदाहरण घ्या. ‘गोष्टी घराकडील मी वदता गड्या रे’ आणि ‘नैऋत्येकडला वारा’ या दोन्ही कविता नॉस्टेल्जिकच आहेत. पण दोन्हींचे टोन आणि लय वेगळी आहे. ‘तुतारी’ ही समुदायाला उद्देशून लिहिलेली कविताही भाषणच आहे. ‘काठोकाठ भरू द्या पेला फेस भराभर उसळू द्या’ ही ‘स्फूर्ती’सारखी कविता समूहाला उद्देशूनच असली, तरी ‘तुतारी’प्रमाणे वैचारिक नाही; भावनिक आहे. ‘गोफण’ही संतापून लिहिलेली कविता आहे. ‘सतारीचे बोल’ ही कविता हृद्य आणि मनाला स्पर्श करणारी आहे. यातील प्रत्येक कवितेचा टोन आणि लय वेगवेगळी आहे. हे मला फार लहान वयात जाणवायला लागलं आणि त्यातून स्वतःची कविता सुचायला लागली. सुरुवातीच्या कवितांचे विषय ठरलेलेच असतात. टिळक पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी शाळेत कार्यक्रम असे, मग टिळकांवर कविता लिहिली. तेवढ्यात नेहरू वारले, मग नेहरूंवर कविता लिहिली. त्यांच्यापाठोपाठ शास्त्री वारले, त्यांच्यावर कविता लिहिली. शास्त्रीमधून आम्ही सावरतोय तोच सावरकर वारले... असं चाललं होतं. शाळेच्या निरोपसमारंभात म्हणायला म्हणून एक कविता लिहिली, ‘संगीताच्या सुरापरी सारे कौमार्य विराले आणि शालेय जीवन आता इथेच संपले.’ चांगल्या संगीताचे सूर कधी विरत नाहीत हे मला तेव्हा कळत नव्हतं; पण काव्य आणि संगीत, काव्य आणि लय, काव्य आणि स्वर (त्या त्या कवीचा/कवितेचा) यांचं जैविक नातं असतं हे मला अगदी लहान वयात लक्षात आलं होतं.

पुण्याला आलो तेव्हा मी मर्ढेकरांच्या प्रचंड प्रभावाखाली होतो. एकाचवेळी मर्ढेकर आणि बाबा आमटे! ‘ज्वाला आणि फुले’ हे पुस्तक १९६५-६६ सालीच आलेलं होतं. मर्ढेकरांची पूर्णपणे आत्मकेंद्रित कविता आणि बाबा आमट्यांची पूर्णपणे समाजकेन्द्री कविता, या दोन्हींमध्ये मी सापडलो आणि मला असं लक्षात आलं की, माझ्या कवितेला हे दोन्ही आयाम सांभाळता आले पाहिजेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

कवी कविता लिहितो, या अर्थाने ती त्याची निर्मिती आहे. पण ती कुणासाठी लिहितो? माझा या आचरट सिद्धांतावर विश्वास नाही की, कवितेने नुसते असावे! नुसते असून ती कविता करणार काय? यावर असं म्हणता येईल की, तिने ‘कवीपुरते असावे.’ एवढ्याने भागत नसेल तर मग तिने आणखी ‘तीन चार कवींपुरते असावे’. कवितेने समाजाकरता का नसावे? काही अनुभव फक्त स्वतःपुरते असतात, काही एखाद्या लहान गटात शेयर होऊ शकतात. काही अनुभवांसाठी मोठा गट लागेल. काही अनुभव तुम्ही पत्नी किंवा प्रेयसी यांच्याशीच शेअर करू शकाल. पण काही कविता अशा असतील ज्यांना एक-दोन माणसं पुरायची नाहीत.

माझ्यावर एकीकडे मर्ढेकरांच्या आधुनिक, व्यक्तिनिष्ठ, आत्मनिष्ठ कवितेचा, ‘कलेसाठी कला’ या विचाराचा जबरदस्त प्रभाव होता. पण दुसरीकडे बाबा आमटे आणि वि.वि.पेंडसे या दोघांचा लाडका माणूसही संबंध महाराष्ट्रात मी एकटा होतो. १९६६ सालच्या दसऱ्याच्या दिवशी हे सगळं जुळून आलं. मी ज्ञानप्रबोधिनीसाठी पहिलं काव्य लिहिलं. तोपर्यंत प्रबोधिनीमध्ये संघाची गाणी म्हणून काम भागवायची पद्धत होती. ते गाणं आज ५३ वर्षं प्रबोधिनीमध्ये म्हटलं जातं. ‘‘नव्या युगाचे पाईक आम्ही, तारे नवक्षितिजावरचे, निजरुधिराची आण वाहुनी रूप पालटू देशाचे.’’ बारकाईने पाहिलं तर यातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्यांतला आशय बाबांचा दिसेल. पहिल्या कडव्यात मी भारताच्या भूतकाळाचं वर्णन केलं आहे, तिथे थोडी संघविचारांची छाप दिसेल. वैयक्तिक कविता आणि सामाजिक कविता याप्रमाणेच पारंपारिक भारत आणि आधुनिक भारत हे दोन कंस आहेत ज्यांच्यामध्ये माझी विचारप्रक्रिया, बोलणं घडत असतं. ते गाणं आणि दुसरं एक गाणं (जिथे जायचे ठरले तेथे आम्ही जाउच जाऊ) यांना अनुक्रमे ५३ आणि ४७ वर्षं झाली, अजून प्रबोधिनीत म्हटली जातात. हा एक वेगळा अनुभव असतो. प्रत्येक कवीला तो कधीतरी यायला हवा. यात कमीपणा वाटण्यासारखं काही नाही.

ग.दि.माडगूळकरांनी असं नोंदवलेलं आहे की, घरच्या परिस्थितीमुळे २२व्या वर्षी त्यांच्यावर सगळी जबाबदारी आली, त्यामुळे ४२ च्या आंदोलनात उडी घेणं त्यांना शक्य नव्हतं. तेव्हा क्रांतिसिंह नाना पाटलांचे अनुयायी शंकर लाड त्यांना म्हणाले की, ‘तू आम्हांला गाणी लिहून दे.’ माडगूळकरांची सुरुवात शाहिरी परंपरेमधून झालेली आहे. त्या स्वातंत्र्य- चळवळीमधली आपली गाणी लोकांच्या तोंडून ऐकताना आपण त्या चळवळीत आहोतच असं वाटण्याचा अनुभव मला आला, असं त्यांनी नोंदवलेलं आहे.

हा अनुभव विलक्षण असतो. तो समूहाचाच उद्‌गार असतो. ज्यावेळी तुम्ही एखादं स्फूर्तिगीत लिहिता, देशभक्तीपर गीत-कविता लिहिता; त्यावेळी ती देशभक्ती/स्फूर्ती तुमची एकट्याचीच नसते. किंवा एखाद्या अन्यायावर तुम्ही लिहिता, पण त्या अन्यायाची चीड अनेकांना आलेली असते. आणि तुमच्या तोंडून ते येतं. यात काही श्रेय तुमचं आहे; पण काही श्रेय त्या घटनाक्रमाचंही आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मी त्याबाबत भाग्यवान आहे. त्या गाण्याच्या दहा हजार प्रती त्यावेळचे ज्ञानप्रबोधिनीचे कार्याध्यक्ष, स्वस्तिक रबर प्रॉडक्ट्‌सचे संस्थापक संचालक वसंतराव वैद्य यांनी छापून घेतल्या. (माझ्या अहंकारी असण्याचं हेही एक कारण असेल.) त्या प्रती संपवता संपवता मात्र आमची दाणादाण झाली. नंतर पाचेक वर्षं पाकिटातून पत्र जाणार असेल तर त्यात ‘नव्या युगाचे पाईक आम्ही’ची एक प्रत आम्ही घालत असू.

मग लक्षात आलं की, दोन्ही प्रकारचं काव्य महत्त्वाचं आहे. काव्य व्यक्तिगत असलं पाहिजे, आत्मनिष्ठ असलं पाहिजे आणि तितकंच ते समाजनिष्ठ असलं पाहिजे. संतांचंसुद्धा असंच आहे. तुकारामाचे काही अभंग अतिशय व्यक्तिगत आहेत, त्याच वेळी काही अभंग अतिशय समाजाभिमुख आहेत. ज्ञानेश्वरांच्या विराण्या व्यक्तिगत आहेत. पण ‘‘हरी मुखे म्हणा। हरी मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी।।’’ हे समूहासाठी लिहिलेलं आहे. नामदेवांचं ‘‘तू वृंदावन मी चिरी। तू तुळसी मी मंजिरी। तू पावा मी मोहरी। स्वये दोन्ही।।’’ हे स्वतःसाठी लिहिलेलं आहे. पण नामदेवाचे इतरांसाठी लिहिलेले अभंग इतके आहेत की, ते गुरुग्रंथसाहिबातही मिळतात. हे सांभाळता आलं पाहिजे.

बालकवी हे ‘फुलामुलांचे कवी’ असं म्हणण्याची पद्धत आहे, पण बालकवींच्या ‘श्रावणमास’, ‘निर्झरास’, ‘आनंदी आनंद गडे’ या समूहाच्या कविता आहेत. ‘फुलराणी’ ही कविता काही वैयक्तिक तर काही सामूहिक आहे, समूहासाठी लिहिलेली आहे. माधव ज्युलियनांच्या प्रेमकविता अत्यंत वैयक्तिक आहेत; परंतु ‘‘मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे,’’ ‘‘प्रेम सिंधू आई वात्सल्यसिंधू आई’’ या समूहाच्या कविता आहेत. हे तुम्हाला कुसुमाग्रजांमध्येही दिसेल. मर्ढेकरांचे ‘नाठाळाचे अभंग’सुद्धा समूहाचेच आहेत आणि उरलेल्या कविता वैयक्तिक आहेत. अनिलांमध्येही आपल्याला हेच दिसेल. बोरकरांनीसुद्धा देशभक्तीपर आणि समूहासाठीच्या कविता लिहिलेल्या आहेत, पण तिथे त्यांची खूप त्रेधा उडाली आहे. ‘महात्मायन’ हे त्यांनी गांधींसाठी लिहिलेलं काव्य समूहासाठीच होतं.

माडगूळकर, नारायण सुर्वे हेही समूहाचेच कवी. महाराष्ट्रात शाहिरांची परंपरा आहे. शिवशाहीतील अज्ञानदासापासून पेशवाईतले अनंत फंदी, राम जोशी; संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील तीन शाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख, शाहीर साबळे हे सगळे समूहासाठीच लिहीत होते.

समूहासाठी लिहिलेलं गाता यावं लागतं, समूहासमोर कविता वाचून दाखवणं जमणार नाही. बंगलोरच्या ‘सृष्टी’ या संस्थेने कबीरावर जो प्रकल्प केला त्यात मीही होतो. कुमार गंधर्वांचं कबीर म्हणणं बरोबर, की पारंपरिक कबीर गाणं बरोबर’ अशी चर्चा चालली होती. प्रल्हाद टिपाणिया म्हणून जे पारंपरिक कबीर गाणारे आहेत; त्यांचा एक सहकारी मला म्हणाला, ‘‘कुमारजीका सब ठीक है. लेकिन माया महा ठगनी हमजानी’ ऐसा धीमी लयमे आलाप कर करके नही गाना चाहिए. या तो सामने बैठे लोग सो जायेंगे; या उठ के चले जायेंगे.’’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

समूहासाठी लिहायचं तर ते गाता आलं पाहिजे. शिवाय त्यात चेतना येत नाही. निदान वक्तृत्वासारखी ती म्हणता यावी लागते. प्रबोधिनीच्या आप्पांना हे बरोबर कळलं होतं. ते म्हणायचे, सगळी पद्य गाण्याची नाहीत; काही ‘म्हणायची’ आहेत. माझ्या दोन्ही गाण्यांना त्यांनी चाली दिल्या आहेत. एक त्यांनी ‘म्हणायचं’ केलं आणि दुसरं ‘गायचं’ केलं. गेय कविता लिहिणं सोपं नाही. गेयता हे काव्याचं एकमेव लक्षण नक्कीच नाही; पण अत्यावश्यक लक्षण आहे. शास्त्रीय संगीतातसुद्धा शब्दांची गेयता, सौम्यता मुद्दाम पाहिली जाते. मी जेव्हा मर्ढेकरांना रागदारीतल्या चाली लावू लागलो; तेव्हा माझी पंचाईत झाली. शास्त्रीय संगीतातल्या चीजेमध्ये जोडाक्षर सहसा येत नाही, आणि मर्ढेकरांच्या कवितांमध्ये जोडाक्षरं व यतीभंग इतके आहेत की ते सुरात आणि लयीत बसवणं अवघड जाऊ लागलं. यातून सुटण्यासाठी कवी अनिल यांनी मुक्तछंद आणला. मुक्तछंदामध्येही लय जपली पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता.

मुक्तछंद म्हणजे काय? अक्षरगणवृत्तं ही फारच कठोर होती, मात्रावृत्तं त्या मानाने सैल. आर्या हे मात्रावृत्त आहे, पण शार्दूलविक्रीडित हे अक्षरगणवृत्त आहे. पादाकुलक हे दोन्हीकडे आहे. अनिल वृत्तामध्ये उत्तम रचना करत होते. मुक्तछंद रूढ करताना त्यांनी स्वतःची सोय पाहिलेली नाही. मुक्तछंद म्हणजे पाच अक्षरांची आणि सहा अक्षरांची अशा जोड्या असलेल्या छंद आणला. ‘व्याकुळ पृथ्वी। प्रखर उन्हात। होरपळता।।’ पाच-सहा-पाच इतकी अक्षरं. पुढे स्वतःला कवी म्हणवणाऱ्या लोकांनी हेही झुगारून दिलं. मर्ढेकरांना हे पसंत नव्हतं. त्यांनी ‘इरेस पडलो जर बच्चमजी’ ही कविता अनिलांना उद्देशून, त्यांच्या मुक्तछंदाची टिंगल करण्यासाठी लिहिली. पण मुक्तछंदामध्येही छंद आहे, ठेका आहे, लय आहे. पुढे अनिलांनी ‘दशपदी’ नावाचा स्वतःचा छंद निर्माण केला. सोळा-सतराव्या शतकातल्या इंग्लिश काव्यामधल्या Iambic Tetra किंवा Penta Meter वरून तो छंद त्यांनी मराठीत आणला असण्याची शक्यता आहे .

पुढे तर फक्त छंदमुक्तच नाही तर सगळीच मुक्त कविता आली. हे नुकसान ‘लिटल मॅगझिन’वाल्यांनी केलं. मी दिलीप चित्रे, नेमाडे, ग्रेस यांच्या कविता फार गांभीर्याने वाचलेल्या नाहीत. गद्य वाक्य मध्ये मध्ये तोडलेले, तशा कविता एके काळी त्या प्रभावाखाली मीही लिहिलेल्या आहेत. पण आता त्या कविता मला कविताच वाटत नाहीत. काही कल्पना, काही प्रतिमा ते एकामागून एक वाचकांच्या समोर ठेवत जातात. मर्ढेकर हेच करत होते; पण ते वृत्तात करत होते. वृत्ताला सोडून मर्ढेकरांची एकही कविता तुम्हाला सापडणार नाही. मर्ढेकरांनी काव्याच्या रचनातत्वाची मोडतोड केलेली नाही- आशयाची जास्त केलेली आहे.

अशा नुसत्या प्रतिमा एकत्र आणणं, हे काव्य नाही; काव्याचं ‘रॉ मटेरियल’ आहे. जेव्हा जेव्हा मला कवींच्यासमोर बोलायचा योग येतो तेव्हा मी त्यांना सांगतो, ‘तुम्ही अधूनमधून एखादी कविता एखाद्या वृत्तात लिहा. व्यायाम करून जसा शरीराला आकार येतो, डौल येतो- तसं वृत्तामध्ये कविता लिहिली तर कवितेलाही डौल येईल, रचना येईल, सौष्ठव येईल. ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे ते असेल.’ वृत्तात लिहिली म्हणून ती कविता श्रेष्ठ असं नाही. ‘‘आईच्या नवऱ्यास बाप म्हणती, मामा तिच्या बंधूला’’ हे शार्दूलविक्रीडित वृत्तात आहे, म्हणून ते काही श्रेष्ठ काव्य नाही. कवितेचा विषय आणि कवीची ताकद यावर श्रेष्ठत्व ठरेल. पण वृत्तामध्ये लिहिलं गेलं पाहिजे.

कथा कादंबरीतली गोष्ट, नाटकातली ॲक्शन आणि कवितेतलं गाणं जपलं पाहिजे! त्यासाठी निदान लय तरी सांभाळली पाहिजे. विंदा करंदीकर, नारायण सुर्वे यांच्यापर्यंत तशा कविता मिळतात. इंदिरा संतांची एखादीच कविता अशी असेल, जिला कुठलाच छंद नाही. तात्यासाहेबांच्याही एक-दोन सापडतील. आता कवितेमधलं गाणं हरवत चाललं आहे. त्यामुळे कवितांचा प्रसारही होत नाही. कविता गेय असेल, छंदबद्ध किंवा लयबद्ध असेल तर ती लक्षात राहायला सोपी असते. आरत्या, अभंग आपण पुस्तक पाहून पाठ करत नाही. ते कानावर पडत असतात आणि लयीमुळे लक्षात राहतात. यासाठी कवितेतलं गाणं परत आणलं पाहिजे. त्याला एकच उपाय आहे. ‘रॉ मटेरियल’वर भरपूर काम केलं पाहिजे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मी एका कविसंमेलनाला गेलो होतो. गोव्यात धारगळ नावाचं एक गाव आहे, तिथे ते भरतं. थंडीच्या दिवसांत रात्रभर शेकोटी पेटवून दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत ते संमेलन चालतं. त्या भागातले सगळे ‘कवी’ त्या संमेलनाला झाडून हजर असतात. माझा मित्र इंद्रजित भालेराव त्या संमेलनाचा अध्यक्ष होता. पहिल्या दहाएक कवींच्या कविता झाल्यावर त्याने एक घोषणा केली की, या कवितांवर कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारावेत. ‘‘कित्ती छान! हे कसं सुचलं तुम्हाला?’’ असे नेहमीचे प्रश्न झाल्यावर कवींनी त्यावर सांगायला सुरुवात केली की, ‘ते वरूनच येतं, यांत्रिकपणे सुचत नाही...’ वगैरे! संगीतात जसं सांगतात की, ‘दोन तंबोऱ्यांमध्ये बसलं की साक्षात परब्रह्म समोर उभं राहतं!’ मग मी हात वर केला. मी म्हटलं, ‘या कविता लिहायला तुम्हाला वेळ किती लागला?’ त्यावर ते म्हणाले, ‘अहो, ती स्फूर्ती आली की थांबताच येत नाही.’ मी म्हटलं, ‘‘माझं तेच म्हणणं आहे, तुम्ही थांबायला हवं होतं. या कविता नाहीत, हे ‘रॉ मटेरियल’ आहे. तुम्ही यावर काम केलं असतंत तर याच्या चांगल्या कविता झाल्या असत्या. तुम्ही आम्हाला अर्धंकच्चं आणून दिलेलं आहे; चिरलेली भाजी म्हणजे काही खायची भाजी नव्हे.’’

हे ऐकून तिथे भडकाच उडाला! ‘‘कोण तुम्ही? तुम्हाला काय अनुभव आहे?’’ इंद्रजित मध्ये पडला आणि म्हणाला, ‘‘कोण प्रश्न विचारत आहे ते लक्षात घ्या. हर्डीकरांच्या मते मर्ढेकरांच्या निम्या कविता ‘रॉ मटेरियल’ आहेत आणि माझ्या ८० टक्के कविता ‘रॉ मटेरियल’ आहेत.’’ त्यानंतर कविता वाचायला येणाऱ्या प्रत्येक कवीचं पहिलं वाक्य हेच असायचं की, ‘‘ही कविता आहे की ‘रॉ मटेरियल’- ते काही मला माहीत नाही, पण लिहून आणलं आहे ते वाचून दाखवतो.’’ त्यावर गोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर म्हणाले, ‘‘हर्डीकर, काय करून ठेवलं तुम्ही हे? आजपर्यंत आपण व्यास-वाल्मिकी यांच्या तोडीचे कवी आहोत असं हे लोक समजत होते; सगळ्यांची वाट लावून ठेवलीत. तुम्ही कुठल्या कविसंमेलनाला जात जाऊ नका.’’

माझा दुसरा प्रश्न कविता, साहित्य, तथाकथित वैचारिक लेखन या सगळ्यांशीच संबंधित आहे. कवितेमध्ये समूहाला आवाहन राहिलंच नाही. वैयक्तिक झाल्यामुळे ती निराशात्मक झाली. प्रेमकवितेमध्येसुद्धा शृंगार का नाही? एवढी रडारड का असते? काव्य लिहिण्यासाठी फक्त वैफल्य आणि वेदनाच हवी का? एका तरी दलित कवीने ‘उद्याचा काळ आपला आहे’ अशी कविता का लिहू नये? वेदना, वैफल्य, मनातले सल, आतल्या आत कुढणं यातून मराठी कवितेची सुटका कधी होणार? आपल्याकडचं गंभीर लेखनही तसंच आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

भविष्यकाळाचं स्वप्नरंजन करावं असं नाही, पण परिस्थिती इतकी काही वाईट नाही. जसं मी म्हणतो की, ‘‘आविष्कारस्वातंत्र्य सरसकट धोक्यात आलं आहे असं दिसत नाही; कांगावा फार आहे. हा समाज असहिष्णू नेहमीच होता आणि तुम्ही समाजाच्या मध्यप्रवाहाला धक्का देणार असाल, तर काहीतरी प्रतिक्रिया तुम्ही अपेक्षित धरली पाहिजे. त्याच्यासाठी ‘कॅलक्युलेटेड रिस्क’ घ्यायला तयार राहिलं पाहिजे.’’ पण वैचारिक लेखन म्हणजे काहीतरी उकरून त्याची चिरफाड करायची. काव्य म्हणजे एकजात सगळं निराशाजनक. (‘रंडागीतानि काव्यानि’ असंही संस्कृतमध्ये म्हटलं आहे.) केशवसुत, बालकवी असे नव्हते. त्यांना वैयक्तिक आयुष्यात कदाचित आजच्या लोकांपेक्षा जास्त दुःखं होती. परिस्थिती गरिबीची होती. त्यांच्या बायकांना त्यांच्या काव्य वगैरेकडे लक्ष देण्यासाठी वेळच नव्हता. पण त्यांच्याकडे दोन गोष्टी होत्या, ‘सखये कविते, दर्शन दे मज तुजवीण कोणी नसे। बघसी अंत किती राजसे.’ त्यांचं खरं प्रेम कवितेवरच होतं.

वि.द. घाटे यांचं ‘दिवस असे होते’ नावाचं पुस्तक आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे. बडोद्याला चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांना बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी राजकवी म्हणून ठेवून घेतलं होतं. राजकवी म्हणजे काही त्यांना तिथे रोज सोन्याच्या ताटात जेवायला वाढत नव्हते. तर वर्षातल्या महत्त्वाच्या प्रसंगी पोशाख करून एखाद्या कवितेचा नजराणा घेऊन हजर व्हायचं. तिथे ते कुठल्यातरी ऑफिसमध्ये क्लार्क होते. जेमतेम पगार होता. घाट्यांनी लिहिलं आहे की, ‘ते कारकुनी करून संध्याकाळी घरी आले की डोक्याला बांधलेला रुमाल, अंगातला कोट, उपरणं, धोतर सगळं काढून ठेवायचे (घरी जास्त कपडे नसल्यामुळे) आणि एक साधा पंचा लावायचे. ते आपला आपण स्वयंपाक करत असत. तो करता-करता ते कविता म्हणायला लागले की, त्या खोलीचं दारिद्रय, अभावग्रस्तता आणि उद्याची पडलेली भ्रांत जाऊन चंद्रशेखरांचा राजा होऊन जायचा.’ असं या लोकांचं कवितेवर प्रेम होतं. उद्या संमेलनात म्हणायची आहे, परवा मासिकाला पाठवून मोबदला वसूल करायचा आहे- यासाठी ते कविता लिहीत नव्हते. वैयक्तिक आयुष्यातलं नैराश्य त्यांना सामूहिक वैफल्यात रूपांतरित करायचं नव्हतं. ओशाळवाणी सहानुभूती नको होती.

अमुचा प्याला दुःखाचा, डोळे मिटूनी प्यायाचा पिता बुडाशी गाळ दिसे, त्या अनुभव हे नाव असे असे ते जीवनाच्या अडी-अडचणींतून, दुःखांतून शिकत होते. तक्रार करत नव्हते. तक्रार न करण्यामध्ये हिंदू मनाची आध्यात्मिकता आणि स्थितीशीलता नव्हती; त्यांनी ते दुःख स्वीकारलं होतं.

स्वतःचं दुःख पचवून समाजाला स्वप्नं दाखवणं, आशा-आकांक्षा दाखवणं ही प्रक्रिया आम्ही नारायण सुर्व्यांच्यामध्ये पाहिली. बाकीच्यांनी कविता पूर्णपणे वैयक्तिक केल्यामुळे ती गाता येत नाही आणि कवितेमधला आशावाद संपवून टाकल्यामुळे, लोक त्या कविता वाचायला तयार होत नाहीत. आज कवितेला वाहिलेली मंडळं, मासिकं चालत का नाहीत? कारण ती इनब्रिडिंगने मरतात. त्यांच्या त्यांच्यातच ते फिरत राहतं. इथे मी त्यांच्यातील गटबाजीमध्ये जात नाही. हल्ली संग्रह येतो, पुरस्कार मिळतो, पण बहुतेकदा पुस्तकविक्रेते कळवतात की, कृपया करून कवितासंग्रह पाठवू नका.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आणि मला असं वाटतं की, कवितेमधून समाजाला स्वप्न दिली पाहिजेत, विचार दिला पाहिजे. त्यासाठी कुणाची खुशामत करण्याची गरज नाही. केशवसुतांनी कधी कुणाची खुशामत केली? पण ‘गोफण’सारखी एक कविता वाचली तरी आपल्या साऱ्या आयुष्याचं प्लॅनिंग केशवसुत बदलून टाकतात. अर्थात, जीवनातल्या दुःखाचा, वैफल्याच्या उद्गार कवितेत येणारच! मी म्हटलं म्हणून तो थांबणार नाही. पण समाजाला वास्तव स्वप्नं, वास्तव विचार, तत्त्वं देणं हेसुद्धा कवितेचं काम आहे. आणि मला एक कबूल केलं पाहिजे की, या लाटेमध्ये मीही थोडा सापडलेला आहे. त्यामुळे समूहाला उद्देशून लिहिलेल्या माझ्या कवितांची संख्याही आता कमीच निघेल. सगळ्या मिळून माझ्या साठ-पासष्ठच कविता आहेत. मी छोट्या समुदायाला उद्देशून कविता लिहीत राहतो. शेतकऱ्यांसाठी एक कविता लिहिली होती; जी समूहगीताच्या प्रकारची होती. पण त्यावेळी शेतकरी संघटना इतकी थकली होती की, त्या कवितेचा फारसा प्रभाव पडला नाही.

पहाट फुटते स्वातंत्र्याची आत्मघाताचा मार्ग सोडू या

बळीराजाची आण वाहुनी सन्मानाने चला जगू या

माझ्या डोक्यात हे लिहीत असताना ‘बी’ कवींच्या ‘‘नव्या उमेदी नवे जिव्हाळे नव्या मराठ्यांचे, नवे भरोसे नवे कवन हे नव्या उमाळ्यांचे’’ या दोन ओळी होत्या. पण ती कविता मी वीस वर्षांपूर्वी लिहायला हवी होती. (तेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच झाल्या नव्हत्या). रा.ग. जाधवांच्या साहित्य संमेलनातल्या अध्यक्षीय भाषणावर आम्ही दोघांनी काम केलं होतं. त्यात त्यांना या दोन ओळी मी घालायला लावल्या होत्या. तर इथून पुढे तरी आपण कवितेकडे आत्मनिष्ठ परंतु समाजाभिमुख, समूहाभिमुख माध्यम म्हणून बघू या, आणि ‘नवे भरोसे नवे कवन हे नव्या उमाळ्यांचे’ लिहायचा प्रयत्न करू या.

.............................................................................................................................................

(शब्दांकन : सुहास पाटील)

(‘साधना’ साप्ताहिकाच्या २९ जून २०१९च्या अंकातून साभार)

.............................................................................................................................................

विनय हर्डीकर यांची पुस्तके खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -

https://goo.gl/x7lErb

.............................................................................................................................................

लेखक विनय हर्डीकर पत्रकार व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत.

त्यांचा मोबाईल नं. - ९८९०१ ६६३२७.

vinay.freedom@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......