प्रिय, महुआ मोईत्रा, प्राउड टू बी अ पार्लमेंटरीयन...
पडघम - देशकारण
प्रदीप दंदे
  • महुआ मोईत्रा
  • Mon , 01 July 2019
  • पडघम देशकारण महुआ मोईत्रा Mahua Moitra आंतरराष्ट्रीय संसदवाद दिन International Parliamentarism Day ३० जून 30 June नरेंद्र मोदी Narendra Modi

प्रिय,

महुआ मोईत्रा,

प्राउड टू बी अ पार्लमेंटरीयन...

गो अहेड, युअर कंट्री इज विथ यू!

काल, ३० जून २०१९ रोजी ‘International Parliamentarism Day’ म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय संसदवाद दिन’ होता. संसदवाद नेमका काय असतो, ते तू राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना तुझ्या १० मिनिटांच्या भाषणात दाखवून दिलंस. त्याबद्दल तुला सलाम! गो अहेड युअर कंट्री इज विथ यू!! लोकसभा सदस्याच्या शपथविधी सोहळ्यातील ‘जय श्रीराम’ ही राजकीय घोषणा आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून देण्यात आलेले नारे बघितल्यानंतर ‘आंतरराष्ट्रीय संसदवाद दिना’निमित्तानं या वर्षी काय लिहावं असं मनात सुरू असतानाच तुझं संसदेतील भाषण ऐकायला मिळालं. 

तू  तुझ्या पदार्पणातील पहिल्याच भाषणात सद्यस्थितीवर जे भाष्य केलं, ते पाहून यासाठीच आपण आपला प्रतिनिधी संसदेत पाठवतो याची प्रचिती आली! नाहीतर सध्या संसदेतील प्रतिनिधी पाहता काही वेळा हसू येते! संसद म्हणजे मनोरंजनाचं, भक्ती करण्याचं ठिकाण आहे का?

आंतरराष्ट्रीय संसदीय यूनियन १३० वर्षांपासून लोकशाहीच्या वाढीसाठी प्रयत्न करणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सोबतीनं ती काम करते. मागील वर्षांपासून ३० जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय संसदवाद दिन’ म्हणून साजरा करत आहे. जगभरातल्या संसदेच्या, त्या देशातील निवडणुकांच्या नोंदी ठेवणं आणि भयमुक्त, पारदर्शी, निवडणुकाकरता सहकार्य करणं हे तिचं काम आहे.

भारत जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहे. अनेक बोली, भाषा, धर्म, पंथ, अशी बहु-सांस्कृतिकता (multi cultural diversity) असणाऱ्या भारतात लोकशाही कशी टिकून आहे, याबाबत जगातील अनेक  देश आश्चर्य व्यक्त करतात आणि भारताच्या  लोकशाही टिकवून ठेवणाऱ्या संविधानाचा अभ्यास करतात. आपल्यासाठी ही जमेची बाजू असली तरी आपण संसदेत देशाच्या व जगातील राजकारणाचा अभ्यास असणारे लोकप्रतिनिधी निवडून पाठवतो का? आपण नट-नट्या, साध्वी यांना पाठवतो. त्यांनी संसदेत जाऊ नये असे नाही, पण ते तिथे करतात काय? 

मात्र तुझ्या रूपानं १७व्या लोकसभेला ‘लोकशाहीचा सजग प्रहरी’ मिळाला, याबद्दल तुला निवडून पाठवणाऱ्या बंगालच्या जनतेचे आभार मानले पाहिजेत. कारण तू मुळात बँकर म्हणजे उच्चशिक्षित असल्याचे कळते. त्यामुळे तुला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारण, समाजकारणाची जाण आहे. अशा स्थितीत तुझ्यासारख्याला निवडून देणं ही कमालच आहे. जगातील बेस्टसेलर ‘वुई कॅन  विन’ म्हणणाऱ्या शिव खेरासारख्या लेखकाचं दिल्लीकरांनी डिपॉझिटसुद्धा वाचू दिलं नाही, हा इतिहास आहे.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y2756e25

.............................................................................................................................................

अमेरिकेतील होलोकास्ट मेमोरियल म्युझियमच्या मुख्य लॉबीमध्ये ‘7 signs  of  early Fascism’ पोस्टरचा हवाला देत तू फॅसिझमची सात लक्षणं सांगितली. ती सातही लक्षणं सध्याच्या सरकारला चपखल बसतात, हे तुझं म्हणून मनाला भावलं. पण हे खरंच आहे का? कारण हे सरकार तर ‘सबका साथ, सबका विकास’ आणि आता ‘...सबका विश्वास’ (‘सबका विश्वास’ हा शब्द मोदींनी संसदेत भाषण करताना जोडला) म्हणत सत्तेवर आलं. मग तू कशी काय म्हणतेस- हे सरकार जनतेला भूत दाखवून सत्तेवर आलं!

आणि हो, तू आजीच्या भुताची गोष्ट सांगितलीस, ती तर आजीची आठवण करून देणारी होतीच, पण आजुबाजूच्या भुताटकीची (मॉब लिंचिंग) भीती दर्शवणारी ही होती, हे मात्र खरं.

बरं लिहिता लिहिता एक राहून गेलं. मी तुला पत्र का लिहितो आहे? मी तसा मोदी भक्त नाही आणि मोदी विरोधकही नाही. मी लोकशाही समर्थक आहे. इतक्यात संसदेतील भाषणं, कोट्या, वाद-संवाद पाहिल्यानंतर तुझ्या भाषणानं जरा बरं वाटलं. म्हणून तुला लिहावंसं वाटलं. बाकी काही नाही.

गेल्या ७० वर्षांच्या काळात काही संसद सदस्यांनी लोकशाहीचे सजग नागरिक म्हणून आपली भूमिका चोख बजावलेली नाही. केवळ १०-२० लोकप्रतिनिधीच संसदेत भाव खाऊन जातात. तीन तीन-चार चार वेळा निवडून संसदेत येणाऱ्या लोकप्रतिनिधींना संविधानात नेमकं काय आहे, हेही माहीत नसतं! 

तू सध्याच्या लोकसभेत विरोधी पक्षाची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावशील याकरता तुला शुभेच्छा देण्यासाठी आणि भारतातील मतदाराना त्यांनी खासदार म्हणून कशा प्रकारच्या सदस्यांना लोकसभेत पाठवावे, याची त्यांना आठवण करून देण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय संसदवाद दिना’निमित्तानं लिहीत आहे.

आता शेवटचं. ‘जय श्रीराम’च्या गोंगाटात ममतादिदींचं काय होईल हे येत्या विधानसभा निवडणुकीनंतर कळेलच. परंतु तुझ्यारूपानं प. बंगालला ममतारूपी मोइनी मिळाली, हे मात्र खरं!

आजकाल ‘मित्रों’ उच्चारला गेला की, लोक घाबरतात. तू ‘महुआ मोईत्रा’ आहेस, म्हणून गो अहेड… यूअर कंट्री इज विथ यू… तू  भाषणाचा शेवट केलेल्या राहत इंदोरीच्या शब्दांतच सांगायचं झाल्यास ‘सभी का खून हैं शामिल यहां की मिट्टी में, किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है!! 

.............................................................................................................................................

लेखक प्रदीप दंदे महिला कला, वाणिज्य महाविद्यालय चांदूर रेल्वे, जि. अमरावती येथे राज्यशास्त्र विभाग प्रमुख आहेत. 

pradipdande@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा