एकाधिकारशाहीपेक्षा मध्यमवर्गाच्या अध:पतनाची जास्त भीती असते!
पडघम - सांस्कृतिक
अलका गाडगीळ
  • आल्बर्ट आईन्स्टाईन आणि सिग्मंड फ्रॉईड
  • Wed , 12 June 2019
  • पडघम सांस्कृतिक आल्बर्ट आईन्स्टाईन Albert Einstein सिग्मंड फ्रॉईड Sigmund Freud

आल्बर्ट आईन्स्टाईन आणि डॉ. सिग्मंड फ्रॉईड या विसाव्या शतकातील दोन दिग्गज विचारवंतांचा १९३१ ते १९३२ या कालखंडात पत्रसंवाद झाला. सापेक्षतावाद आणि भौतिकशास्त्रातील सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक म्हणून आईन्स्टाईन यांचे नाव झाले होते. डॉ. सिगमंड फ्रॉईड यांनी मानसवैद्यकशास्त्रात मनोविश्लेषण ही नवीन संकल्पना आणि त्यावर आधारलेली उपचार पद्धती विकसित केली होती. या पथदर्शी मानसशास्त्रीय संकल्पनेचा प्रभाव समाजशास्त्र, साहित्य, साहित्य-समीक्षा, कला आणि इतर विद्याशाखांवर पडला. तो प्रभाव अजूनही टिकून आहे.

१९३१-३२ या कालखंडात जर्मनीत नाझीवादाने आपले पाय घट्ट रोवले होते. पुढे १९३३ मध्ये अ‍ॅडॉल्फ हिटलर जर्मनीचा चॅन्सलर झाला आणि त्याच्या हाती अमर्याद सत्ता आली. दुसरं महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच आईन्स्टाईन आणि फ्रॉईड यांनी लोकशाही मार्गानं प्रस्थापित झालेली एकाधिकारशाही आणि युद्धखोरीबद्दल चिंतन केलं होतं. अशा राजवटीला पाठिंबा देणाऱ्या मध्यमवर्गाच्या अध:पतनाबद्दलची चिंता या दोघांना छळत होती.

आईन्स्टाईन यांच्या मनात बुद्धिवादी नेत्यांना एकत्र करण्याची योजना घोळत होती. ‘युद्धाच्या हिंसेपासून मानवाला आंतरबाह्य मुक्ती मिळावी या उद्देशानं प्रबुद्ध लोकांचं संघटन करण्याच्या संकल्पनेची चर्चा करू. तुम्हाला काय वाटतं?’ आईन्स्टाईन यांनी फ्रॉईड यांना पाठवलेल्या पहिल्या पत्रात म्हटलं होतं.

देशाचं प्राक्तन ठरवलं जाणाऱ्या प्रक्रियेची सूत्रं अनिवार्यपणे बेजबाबदार राज्यकर्त्यांच्या हातात पडण्याच्या घटना त्या काळात घडत होत्या. जवळजवळ नव्वद वर्षांनंतर अनेक खंडांत त्या पुन्हा घडताना दिसतायत.

‘त्यांची सत्ता त्यांनी निवडणुकीच्या बळावर मिळवलेली असते. पण देशातील उच्च नैतिकता किंवा सर्वोत्कृष्ट बौद्धिक घटकांचं ते प्रतिनिधित्व करतात असं म्हणता येत नाही. विचारवंत जागतिक इतिहासावर आपला थेट प्रभाव पाडू शकत नाहीत. ते अनेक गटांत विभागले गेले असल्यामुळे चर्चेसाठीही ते एकत्र येत नाहीत, ही शोकांतिका आहे. ज्यांचं कार्य आणि कर्तृत्व अनुकरणीय आहे, अशा लोकांनी संघटित व्हावं असं तुम्हाला वाटत नाही का? प्रयत्न करायला काय हरकत आहे?’ यासोबत आईन्स्टाईन एक टिपणी जोडतात- ‘धन्यवाद डॉ. फ्रॉईड, तुमचं लेखन वाचताना व्यतित झालेले अनेक तास अत्यंत आनंद देणारे होते’.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4902/anartha

...............................................................................................................................................................

बुद्धिवाद्यांना सोबत घेऊन काय करता येईल हे पाहावे असे आईन्स्टाईन यांना वाटत होते. आईन्स्टाईन जेव्हा हे पत्र लिहीत होते, तेव्हा युरोपात निवडणूक प्रक्रियेतून पुढे आलेल्या हुकूमशहांचा उदय झाला होता. पण लेखक, कलाकार, शास्त्रज्ञ आणि विचारवंतांनी समाजाला पुढे नेण्यासाठी काय केले? त्यांचा प्रभाव पडला का? पडला नसेल तर काय कारणे होती? या मुद्द्यांचा प्रस्तावित संघटनेत विचार व्हावा असे आईन्स्टाईन यांना वाटत होते.

दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी युरोपात अस्वस्थता पसरली होती. वंशवादी विचारसरणी रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवे, अशी चर्चा आईन्स्टाईन करू पाहात होते. आजही धर्मवाद आणि भारतीय उपखंडाला छळणारा जातीयवाद राजकारणात ठाण मांडून बसले आहेत. अमेरिकेत निवडणुकीच्या माध्यमातून वंशवादी आणि उजव्या विचारसरणीचे डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपली उजवी विचारसरणी आणि युद्धखोरी लपवून ठेवलेली नाही. २०१६ सालच्या अमेरिकन निवडणुकांमध्ये पुतीन यांनी छुप्या पद्धतीने हस्तक्षेप केला होता, असा निष्कर्ष रॉबर्ट मुलर यांनी आपल्या अहवालामध्ये काढला आहे. रशियाच्या हस्तक्षेपाची चौकशी करण्याचे काम सरकारी वकील रॉबर्ट मुलर यांच्यावर सोपवले होते.

लेखक-विचारवंतांना नेता मानणाऱ्यांची संख्या अगदी तुरळक असते. राजकीय घडामोडींवर त्यांचा किंचितही प्रभाव पडत नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही हे दिसून आले. शिक्षित समाज सत्ताधाऱ्यांनी पसरवलेल्या अपप्रचाराला बळी कसा पडतो, हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न आईन्स्टाईन आणि डॉ. फ्रॉईड यांनी त्या काळात केला होता. आज समाजमाध्यमांमुळे अपप्रचाराला मोकळे मैदान मिळालेले आहे. शिक्षित मध्यमवर्ग या प्रचारात उघडपणे भाग घेत आहे. आता वंचित वर्गही एकाधिकारशाही प्रशंसक झाल्याचे दिसतेय.

हे धोके ओळखून लेखणी, विचार वा कलेने समाजाला उन्नत करणाऱ्या लेखक, कलावंत, विचारवंत आणि शास्त्रज्ञांची संघटना आईन्स्टाईन यांना बांधायची होती. पण त्यांना वास्तवाचेही भान होते. ‘शिक्षित समाज राज्यकर्त्यांची भाषा बोलू लागला आहे आणि त्याची लागण या विचारवंतांना होण्याची शक्यता आहे. कारण मानवातल्या अनेक उणिवा अशा संघटनांमध्येही आपोआप शिरतात. असे कितीही धोके असले तरी अशी संघटना उभारण्याचा प्रयत्न का करू नये? मला तर हे माझं विहित कर्तव्य आहे असं वाटू लागलंय. उच्चतम नैतिकता असलेल्या या महनीय व्यक्ती सर्व धर्मातील धुरिणांशी चर्चा करतील आणि युद्धविरोधी भूमिका घेतील.’

१९३०च्या दशकातील पूर्वार्धात युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे या शास्त्रज्ञ तत्त्ववेत्त्याला वाटू लागले. प्रबोधनाच्या मार्गांनी आम आणि खास जनतेपर्यंत पोचता येईल का, याचा विचार करण्याकरता आंतरराष्ट्रीय धुरीणांनी एकत्र येऊन संघटना सुरू करावी, अशी योजना आईन्स्टाईन यांनी मांडली होती आणि त्यात त्यांनी डॉ. फ्रॉईड यांनाही सहभागी करून घेतले.

या दोन द्रष्ट्यांची प्रत्यक्ष भेट एकदाच झाली. १९२७ सालच्या नाताळात डॉ. फ्रॉईड आपल्या मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी बर्लिनला काही दिवसांसाठी आले होते. आईन्स्टाईन त्यांना भेटायला गेले होते. क्वॉन्टम थिअरीत लक्षणीय भर घातल्याबद्दल ४७ वर्षांच्या आईन्स्टाईन यांचे नाव झाले होते, तर ७० वर्षांचे फ्रॉईड मानसवैद्यकशास्त्रातील दिग्गज होते. पण या भेटीमध्ये दोघांची मने फारशी जुळली नाहीत. या भेटीनंतर काही महिन्यांनी एका मित्राने आईन्स्टाईन यांनी सायकोअनॅलिसिस थेरपी घ्यावी असे सुचवले. ‘माफ कर, मला ही थेरपी घ्यायची नाही. माझं मनोविश्लेषण व्हावं असं मला वाटत नाही’, असे उत्तर आईन्स्टाईन यांनी पाठवले होते. मात्र फ्रॉईड यांनी ‘त्यांना फिजिक्सबद्दल जेवढं समजतं, तेवढं मानसशास्त्राबद्दलही समजतं. आमची छान चर्चा झाली’ अशी टिपणी केली होती.

या दोन महान व्यक्तींच्या नातेसंबंधातील महत्त्वाचा टप्पा १९३१मध्ये सुरू झाला. फ्रान्स सरकारने आईन्स्टाईन यांच्यासोबत संघटना बांधणीची सुरुवात केली होती. या आराखड्यातून ‘लीग ऑफ नेशन्स’ ही संघटना स्थापन झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर त्याचं ‘युनाटेड नेशन्स’मध्ये रूपांतर झाले. ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटलेक्च्युल को-ऑपरेशन’ असे या संघटनेचे नाव. आईन्स्टाईन यांनी फ्रॉईड यांच्याशी सार्वजनिक चर्चा सुरू केली. त्यांचे पहिले अधिकृत पत्र ३० जुलै १९३१ ला पाठवले गेले. आपल्या पहिल्या पत्राचा शेवट करताना आईन्स्टाईन यांनी म्हटले होते, ‘तुमच्या थिअरीवर विश्वास नसणारेही तुम्ही विकसित केलेल्या इद्-ईगो-सुपर ईगो, इडिपस कॉम्प्लेक्स, लिबिडो अशा संज्ञा अभावितपणे वापरतात हे पाहून मला गंमत वाटते.’

फ्रॉईड यांची उपचारपद्धती आता प्रत्यक्षात वापरणारे कमी आहेत, पण त्यांच्या सिद्धान्तामुळे जटील मानसिक आणि सामाजिक प्रश्नही समजण्यास मदत झाली. त्यांची मनोविश्लेषणाची थिअरी साहित्य-समीक्षेतही वापरली जाते. शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ला इडिपस कॉम्प्लेक्स होता आणि तो आईबद्दल पझेसिव्ह होता, अशी मांडणी अनेक समीक्षकांनी केली आहे.

‘मानवाला युद्धापासून दूर ठेवण्याचा काही मार्ग आहे का? विज्ञानांमधील प्रगतीमुळे जगण्या-मरण्याचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. युद्धामुळे संस्कृती नष्ट होण्याचा धोका संभावतो आहे. यावर मात करण्यासाठी योजलेले उपाय मोडून पडतायत. शिक्षक, लेखक विचारवंत, कलाकार आणि समाजसुधारक समाजाला पुढे नेण्याचं काम करतात, पण त्यांचा प्रभाव पडत नाहीए. त्यामुळे वैज्ञानिक आणि मनोविकारतज्ज्ञांकडून जाणून घ्यावंसं वाटतंय. आपल्या पेशात व्यग्र राहूनही सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रश्नांची जाण त्यांना असते. स्थानिक आणि जागतिक स्तरावरील प्रश्न ते दूरवरून पाहत असतात. त्यांना मोठं चित्र दिसत असतं. त्यांच्या स्थानावरून दूरस्थपणे ते जागतिक प्रश्नांकडे कसं पाहतात, हे आता जाणून घेण्याची निकड समाजशास्त्रज्ञांना वाटतेय.’

‘तुम्ही अंतर्मनाचा अभ्यास करता. मला त्यातलं काही कळत नाही. त्यामुळे माणसाच्या अंतर्मनाचा या प्रश्नांवर काय प्रभाव पडत असेल याबद्दल तुम्हीच प्रकाश टाकू शकाल.

‘या संघटनेत सामील झालेल्या देशांमध्ये वितंडवाद झाल्यास संघटनेच्या कायद्याप्रमाणे त्या देशांना शांततेचा तह करावा लागेल आणि त्याच्या अटींचं पालन करावं लागेल. पण देशांच्या महत्त्वाकांक्षा त्यांना तसं करू देतील का हा प्रश्न आहे’.

आईन्स्टाईन यांनी पत्रातून आपले विचार विस्तृतपणे मांडले होते.

प्रत्येक राजवटीला अधिकाधिक भूमी आपल्या अधिपत्याखाली असावी असे वाटते. राज्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालणारा आणखी एक वर्ग असतो. भांडवलदार आणि व्यापारी वर्गाला आपला व्यापार वाढवायचा असतो, इतर देशांतही पसरवायचा असतो. त्यामुळे कधी राजकीय कारणासाठी तर कधी व्यापारी कारणासाठी दुसऱ्या देशांवर छुप्या मार्गांनी प्रवेश मिळवला जातो. वसाहतवादामुळे कॉर्पोरेट क्षेत्रालाही तिसऱ्या जगतातील बाजार उपलब्ध झाले.

ईस्ट इंडिया कंपनीने एलिझाबेथ राणीचे फर्मान घेऊनच भारतात प्रवेश केला होता आणि आपले पाय पसरले होते. व्यापारासोबत राज्यकर्तेही आले आणि त्यांनी देशांना गुलाम बनवले.

‘हिंद स्वराज’मध्ये गांधींनी पाश्चात्य औद्योगिक भांडवलशाहीचा सतत निषेध केला आहे. वसाहतवाद आणि औद्योगिकीकरण हातात हात घालून जाणारे विचार आहेत. भांडवलशाही आणि औद्योगिकीकरणाच्या चलनासाठी वसाहतवाद लागतो. ही युती कधी साम्राज्य मिळवण्यासाठी असते, तर कधी बाजारपेठ काबीज करण्यासाठी. हे धोके गांधींनी अगदी सुरुवातीस ओळखले होते.

भांडवलदारी वर्गाच्या अति महत्त्वाकांक्षेमुळे त्यांना अधिन असणारी सरकारे दुसऱ्या देशावर कधी उघड, तर कधी छुप्या पद्धतीचे युद्ध पुकारतात. अशा युद्धांबद्दलही मांडणी आईन्स्टाईन यांनी केली होती.

१९३१मध्ये फ्रॉईड यांना पत्र लिहिण्याआधी त्यांनी महात्मा गांधीजींशी संपर्क साधला होता. ‘हिंसेचा आधार न घेता तुम्हाला मोठं यश मिळालं आहे आणि हिंसेचा आधार घेणाऱ्यांसमोर तुम्ही तुमच्या अहिंसेतून मोठं आव्हान उभं केलं आहे’, असे गौरवोद्गार आईन्स्टाईन यांनी काढले होते. आईन्स्टाईन शांततावादी होते. दुसरे महायुद्ध सुरू होण्याआधी १९३९ साली त्यांनी अमेरिकन अध्यक्ष ए.डी. रूझवेल्ट यांना पत्र लिहून अणुबॉम्बचा धोका वर्तवला होता. कोणत्याही प्रकारची क्रूरता आणि हिंसेबद्दल त्यांना तिरस्कार वाटत होता. प्रत्यक्षात हिटलरला अणुबॉम्ब वापरता आला नाही. त्याचा उपयोग अमेरिकेने केला. दुसऱ्या महायुद्ध संपता संपता जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर बॉम्ब टाकून ती बेचिराख करण्यात आली.

आईन्स्टाईनचं पत्र वाचून डॉ. फ्रॉईडना आश्चर्याचा धक्का बसला होता. ‘युद्धाच्या धोक्यापासून मानवजातीला कसं वाचवायचं?’ हा तुमचा प्रश्न वाचून मला माझ्या अक्षमतेची जाणीव झाली. हा प्रश्न राज्यकर्त्यांशी निगडीत आहे. पण लवकरच लक्षात आलं की, तुम्ही मला वैज्ञानिकाच्या भूमिकेतून लिहिलं नसून मानवतेच्या कर्तव्यापोटी साद घातली आहे. नंतर लख्ख प्रकाश पडला -एक मनोवैद्यक युद्धप्रतिबंधाच्या प्रयत्नांकडे कसं पाहतो, हेच माझ्याकडून अपेक्षित असावं असं मी गृहीत धरतो आणि मांडणी करण्याचा प्रयत्न करतो. ‘बळी तो कान पिळी’ अशी सुरुवात तुम्ही केली आहे. पण ‘बळ’ हा शब्द काहीसा निष्प्रभ वाटतो. मी दुसरी संज्ञा वापरतो- हिंसा. हक्क आणि हिंसा यामध्ये नातंही आहे. माणसामाणसांमधले काही संघर्ष हिंसेने सुटले आणि त्यामुळे काही गटांना आपले हक्क मिळाले. प्राणी जगतातही हाच न्याय वापरला जातो. इतर प्राण्यांपेक्षा मनुष्यप्राणी फारसा वेगळा नाही. पण आपल्याकडे विचारशक्ती आहे. अमूर्त गोष्टी आणि संकल्पना मानवाला समजतात. या विचारशक्तीमुळेही काही प्रश्न सुटतात. पण मतं आणि विचारांचाही लढा सुरू होतो. पण लढा विचारांचा असो की भूमीचा, ध्येय एकच असतं- समोरच्याला अटकाव करणं, कुरघोडी करणं…’ डॉ. फ्रॉईड एकंदरीत हिंसा आणि युद्धाबद्दल चिंतन करत होते.

‘शत्रूला खतम केल्यानंतर समाधान वाटणं ही मानवाची आदिम प्रेरणा आहे. पण शत्रूवर कुरघोडी करण्यासाठी नेहमीच शिरकाण करण्याची जरुरी नसते. पराभूतांना गुलामगिरीतही ठेवता येतं, त्यांचा आत्मसन्मान ठेचता येतो, हेही मानवाला समजलं. परिणामी जेत्यांमध्येही सूडाची भावना चेतवली जाते. समाजाच्या उत्क्रांतीत कायदे आणि नियम विकसित झाले. एका सामर्थ्यवान व्यक्तीच्या महत्त्वांकांक्षेला दुर्बल घटकांचं सरकार अटकाव करू शकतं. कायदा हे दुर्बलांचं शस्त्र असतं.’

‘युद्धामुळे शांतता प्रस्थापित होऊ शकते हे विरोधाभासक वाटलं तरी सत्य आहे. पण शांततेचा हा काळ फार दिवस टिकत नाही कारण समाजातील ताणतणाव डोकं वर काढतात.’

‘हिंसक राजवटीसमोर कायद्याचं राज्य हा पर्याय आदर्शवादी वाटतो. पण कायद्याचं राज्य टिकवण्यासाठीही बळाचा वापर करावा लागतो. सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्ती एकत्रच नांदतात. त्यांना वेगळं करता येत नाही.’

डॉ. फ्रॉईड या आदिम प्रेरणांबद्दल बोलत होते.

‘तुम्ही युद्ध थांबवण्यासाठी धडपड करताय, पण विनाशक शक्तीही आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्यांच्यासंबधी चर्चा करायला हवी. मानवाच्या हिंसक प्रवृत्तीला रोखणं जवळजवळ अशक्य आहे.’

‘अखेरीस मला विचारायचंय- युद्ध कितीही हिंसक अणि किळसवाणं असलं तरी आपण युद्धविरोध का करत आहोत? मला तर युद्ध ही नैसर्गिक घटना वाटते, ते जैविक वास्तव आहे आणि अटळही.’

‘माझं उत्तर वाचून तुम्हाला धक्का बसेल म्हणून मी शिष्टाचार पाळून उत्तर देतो - मानवाला जगण्याचा अधिकार असतो, युद्ध तो हिरावून घेतो. पण सरसकट सगळी युद्धं अयोग्य नसतात, हेही सत्य आहे. मलासुद्धा युद्ध नकोच आहे. माझी अंत:प्रेरणा मला युद्ध चुकीचं आहे असंच सांगते. मी हिंसेचा पुजारी नाही. मी युद्धाची जैविक फोड करून सांगितली इतकंच. माझ्या या विश्लेषणामुळे तुमची निराशा होर्इल म्हणून मी आधीच खेद व्यक्त करतो.’

फ्रॉईड यांच्या उत्तराने आईन्स्टाईन यांना वाईट वाटले नाही. उलट ‘युद्ध या घटिताबद्दलच्या तुमच्या मांडणीमुळे आम्हाला नवी दृष्टी मिळाली. मी आणि संघटनेसाठी ही मोठी देणगी आहे’ असं उत्तर त्यांनी फ्रॉईड यांना पाठवले.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4851/Paul-Allen---Idea-Man

...............................................................................................................................................................

आईन्स्टाईन आणि फ्रॉईड यांचा पत्रव्यवहार १९३३ साली ‘व्हाय वॉर’ या नावाने पत्रकरूपाने प्रकाशित झाला. जर्मन भाषेतील या पत्रकाच्या फक्त २००० प्रती छापण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा पत्रव्यवहार सार्वजनिक चर्चेत आला नाही.

डॉ. फ्रॉईड ऑस्ट्रियातील व्हिएनामध्ये प्रॅक्टिस करत होते. १९३३मध्ये नाझींच्या अनुयायांनी त्यांची पुस्तके जाळली. त्याच वर्षी ऑस्ट्रियावर नाझींनी कब्जा केला. फ्रॉईडनी नाझींच्या कारवायांकडे सतत दुर्लक्ष केले. त्यांची हिंसा आपल्यापर्यंत येईल असे त्यांना वाटत नव्हते. पण १९३६ साली व्हिएन्नात राहणे त्यांना अवघड झाले आणि अतिशय नाखुशीने त्यांनी इग्लंडमध्ये आसरा घेतला.

हिटलरच्या ज्यू विरोधी हिंसेमुळे १९३३मध्ये आईन्स्टाईन यांनाही जर्मनी सोडावी लागली. त्यांनी अमेरिकेमध्ये आसरा घेतला. वैज्ञानिक वर्तुळात त्यांचे नाव होतेच, पण त्यांना अमेरिकेत प्रतिष्ठा मिळाली आणि त्यांच्या ज्ञानाचा आदर केला गेला.

तथाकथित विचारवंत आणि आत्ममग्न मध्यमवर्गासोबत दुर्बल वर्गही एकाधिकारशाहीचा जयजयकार करू लागतो, हे घटित समजून घेण्याचा प्रयत्न फ्रॉईड यांनी तेव्हा केला होता. भारतातल्या विचारवंत आणि शिक्षित वर्गाचंही अध:पतन का आणि कसं होत गेलं याचा उहापोह व्हायला हवा. विचार आणि मूल्यांचा थेट पराभव होताना आपण पाहात आहोत. अशा काळात बुद्धिवाद्यांची जबाबदारी वाढते. त्यांचे शिक्षण आणि करिअर सार्वजनिक निधीतून पार पडत असते. लोकांना नवीन कल्पना/संकल्पना देण्याचे काम लेखक-विचारवंत-कलाकार आणि बुद्धिवाद्यांचे असते, सरकार किंवा राजकीय पुढाऱ्यांचे नसते. हे नेते जनतेने केलेल्या निवडीबद्दल त्यांची खुशमस्करी करण्यात गुंग आहेत आणि विचारवंत आपल्या कोशात बंद आहेत.

‘भारतीय प्रसारमाध्यमं आणि शिक्षण क्षेत्रातील बुद्धिवाद्यांची मांडणी भंपक असते. समाजाचा विचार घडवण्याचं काम आपल्याकडे आहे अशी त्यांची धारणा असते. पण अर्थकारणात त्यांचा सहभाग शून्य असतो’, असे मत ज्येष्ठ पत्रकार अशोक मलिक यांनी व्यक्त केले आहे.

‘इंटलेक्चुअल्स अँड सोसायटी’ पुस्तकात अर्थतज्ज्ञ थॉमस सोवेल म्हणतात- ‘विचारवंतांनी प्रसृत केलेल्या संकल्पना इतर बुद्धिवाद्यांना चांगल्या वाटतात का? त्यांना त्या पटतात का? याचाच फक्त विचार ते करतात. इतर कोणत्याही निकषावर या संकल्पनाची चाचणी झालेली नसते. तरीही त्या पथदर्शी मानल्या जातात. या कल्पना चुकीच्या असल्या तरी त्या सर्वत्र स्वीकारल्या जातात.’

विचारवंत जगापासून तुटलेले असतात. शिक्षित मध्यमवर्ग आत्ममग्न असतो. या दोन गटांना सामान्य लोकांच्या अस्तित्वाच्या प्रश्नांची उकल करता येत नाही, असा निष्कर्ष फ्रॉईड आणि आईन्स्टाईन या दोघांनीही काढला होता.

दुसरे महायुद्ध सुरू झाल्या झाल्या जर्मनीत ज्यूविरोध विकृतपणे उफाळून आला. ज्यूंच्या मालमत्तेची नासधूस करण्यात आणि त्यांना पोलिसांच्या हवाली करण्यात मध्यमवर्गीय जर्मनांनी पुढाकार घेतला होता. या शिक्षित वर्गाचा कडवेपणा डॉ. फ्रॉईड आणि आईन्स्टाईन यांनाही प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला होता. विचारवंतांची घसरणही त्यांनी जवळून पाहिली होती. त्यामुळे त्यांचे निरीक्षण अधिक अस्सल ठरते.

.............................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 13 June 2019

च्यायला, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी ! तो आईनस्टाईन कम्युनिस्ट हेर होता. हे माझं मत नसून अमेरिकी गुप्तचर खातं एफबीआय चं मत आहे. म्हणूनंच त्याला मॅनहटन प्रकल्पावर ( = अणुध्वम बनवण्याचा प्रकल्प) घेतला नाही. याचे बर्लिनमध्ये असल्यापास्नं रशियन कम्युनिस्टांसोबत गुफ्तगू चालायचे. नाझींना सुगावा लागला. हिटलर सत्तेत आला तेव्हा आईनस्टाईन अमेरिकेत होता. त्याला कळून चुकलं की जरा जर्मनीत परतलो तर हिटलर त्याला टपकावणार. मग अमेरिकेतच राहिला.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......