‘चांगली माणसं’ लक्षात राहावीत म्हणून लिहिलेल्या ‘ताम्रपट’ची पंचविशी!
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
राजा कांदळकर
  • ‘ताम्रपट’चे मुखपृष्ठ
  • Fri , 07 June 2019
  • ग्रंथनामा बुक ऑफ द वीक ताम्रपट Tamrapat रंगनाथ पठारे Rangnath Pathare राजा कांदळकर Raja Kandalkar

दु:खाचा अंकुश असो –

सदा मनावर –

हलाहल पचवल्याबद्दल माथ्यावर –

चंद्र असो!

चांगली माणसं मोजण्यासाठी

हाताला हजार बोटं असोत –

लक्षात राहात नाहीत बिचारी!

प्रा. रंगनाथ पठारे यांच्या ‘ताम्रपट’ या कादंबरीच्या सुरुवातीच्याच पानावरच्या या ओळी लक्ष वेधून घेतात. ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांच्या ‘मेलडी’ या कवितासंग्रहातल्या या ओळी आहेत.

‘ताम्रपट’ ही कादंबरी ९ ऑगस्ट १९९४ रोजी प्रकाशित झाली. या वर्षी तिला पंचवीस वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं संगमनेर (जि. अहमदनगर) इथं ‘ताम्रपट’ची पंचविशी साजरी करण्यात आली. स्वातंत्र्यसैनिक भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठाननं हा सोहळा आयोजित केला होता. ५ मे रोजी दिवसभर झालेल्या या सोहळ्याचा प्रारंभ सकाळाच्या सत्रात ‘साहित्य आणि राजकारण’ या विषयावरील परिसंवादानं झाला. सायंकाळी रंगनाथ पठारे यांचा गौरव करण्यात आला. ‘ताम्रपट’चा नायक असलेल्या भास्करराव दुर्वे यांचं सध्या संगमनेरमध्ये जन्मशताब्दी वर्ष साजरं होतंय. त्यानिमित्तानं हा कार्यक्रम घेण्यात आला होता. दुर्वे प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त राजाभाऊ अवसक आणि सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले होते.

‘साहित्य आणि राजकारण’ या परिसंवादात पत्रकार ज्येष्ठ प्रा. जयदेव डोळे, मुंबई विद्यापीठातील मराठीच्या प्राध्यापक डॉ. वंदना महाजन आणि ज्येष्ठ पत्रकार सदा डुम्बरे हे बोलले.

महाजन म्हणाल्या, ‘ ‘ताम्रपट’ ही मराठीतील महत्त्वाची राजकीय कादंबरी आहे. मराठीत ‘सिंहासन’, ‘मुंबई दिनांक’ या अरुण साधू यांच्या राजकीय कादंबऱ्यांनी राजकीय परंपरा रूढ होते. त्यानंतरची ‘ताम्रपट’ ही सकस कादंबरी आहे. १९९४ मध्ये ही कादंबरी आली. तिला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ८०० पानांची ही कादंबरी आहे. इतकी मोठी असूनही ती वाचनीय आहे. रंगनाथ पठारे यांची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. स्वातंत्र्यसैनिक भास्करराव दुर्वे ऊर्फ दुर्वे नाना या सत्शील नेत्याला वाचक बनवून अहमदनगर जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडी या कादंबरीत चितारल्या आहेत. भास्करराव दुर्वे आणि त्यांच्यासारख्या समस्त चांगल्या माणसांना पठारे यांनी ही कादंबरी अर्पण केलीय.’

‘ताम्रपट’ ही कादंबरी संगमनेर-अकोले या अहमदनगर जिल्ह्यातल्या दोन तालुक्यांत घडते. या कादंबरीत १९४२ ते १९७९ पर्यंतचा कालखंड चितारलाय. या काळातल्या राजकीय-सामाजिक घटनांचा पट या कादंबरीत पठारे यांनी उलगडून दाखवलाय. या कादंबरीत नाना सिरुर, सहकार चळवळीचे प्रणेते दादासाहेब भोईटे आणि वकिलीतून राजकारणात शिरलेले बापूसाहेब देशमुख या तीन प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. आजच्या राजकीय-सामाजिक जीवनातील तीन प्रवाहांचं ही तिन्ही पात्रं प्रतिनिधित्व करतात. तिघांनाही समाजाबद्दल कळकळ आहे. पण बापूसाहेब देशमुख करिअर म्हणून एखाद्या व्यवसायासारखं समाजकार्याकडे पाहतात. दादासाहेब भोईटे साधनशुचितेचा बाऊ न करता राजकीय धूर्ततेनं समाजकार्य आपल्या पकडीत ठेवतात.

कादंबरीच्या या मांडणी-पटाची माहिती देऊन महाजन म्हणाल्या – ‘ ‘ताम्रपट’मध्ये १९४२च्या स्वातंत्र्यलढ्याचा उल्लेख आणि घटना-घडामोडी आलेल्या आहेत. स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी-मध्यम जातीतल्या महिला पुढे आल्या होत्या. पण त्या महिलांचं पुढे काय झालं? त्यांच्यातलं नेतृत्व विकसित का झालं नाही? सामाजिक, राजकीय क्षेत्रात किंवा जीवनाच्या इतर क्षेत्रात या महिला काही भरीव काम करू शकल्या नाहीत? याचं उत्तर आपल्या पुरुषप्रधान व्यवस्थेत दिसतं. महिलांना कुटुंबात आणि समाजात अजूनही पुरुषांशिवाय वेगळं अस्तित्व नाही, असं दिसतं. मराठी कादंबऱ्यांत आलेलं स्त्री चित्रण बघितलं तर ते पुरुष नायकांच्या अवतीभवती घोटाळणारं आहे. स्त्रिया स्वतंत्रपणे काही करताना दिसत नाहीत. ही परिस्थिती बदलली पाहिजे. कादंबरी लेखनात महिला लेखिकांनी पुढे आलं पाहिजे. महिलांची स्वतंत्र कर्तबगारी सर्व क्षेत्रांत फुलली पाहिजे.’

भास्करराव दुर्वे हे स्वातंत्र्य चळवळीत एसेम जोशी, साने गुरुजी, नानासाहेब गोरे, अच्युतराव पटवर्धन यांच्या सोबतीनं लढले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गरिबांचा वकील आणि राष्ट्रसेवा दल सैनिक म्हणून त्यांची ख्याती झाली. त्यावेळच्या समाजवादी पक्षामार्फत त्यांनी संगमनेर नगरपरिषदेत ओबीसी, मुस्लीम आणि दलित यांना एकेककरून सत्तेत भरघोस वाटा मिळवून दिला. संगमनेरमध्ये पहिला मुस्लीम नगराध्यक्ष बनवला. या परिसरात ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळ राबवली. समाजवादी पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष यांची युती करून त्यामार्फत दादासाहेब रुपवते खासदारकीला आणि भास्करराव दुर्वे आमदारकीला उभे होते. विडी कामगार, धरणग्रस्त, आदिवासी आणि शेतकरी यांचा कैवार घेत भास्करराव दुर्वे यांनी या भागात राजकारण केलं. लोकांनी त्यांना लोकनेता मानलं. पण ते निवडणुकीच्या राजकारणात कधीच यशस्वी झाले नाहीत.

हा खराखुरा नायक, चांगला माणूस हरला! तो का? हा धागा पकडून प्रा. डोळे म्हणाले, ‘ ‘ताम्रपट’चे नायक भास्करराव दुर्वे यांच्या निमित्तानं ‘साहित्य आणि राजकारण’ या विषयावर चर्चा करताना आपण साहित्य आणि राजकारणाचा संबंध काय, हे समजून घेतलं पाहिजे. साहित्य हा समाजाचा आरसा असतो. त्यामुळे साहित्य आपल्यापुढे समाजातलं वास्तव चित्र मांडतं. आज राजकारण हा धंदा झाला आहे. राजकीय नेते सत्तेसाठी वाट्टेल त्या तडजोडी करत पक्ष कसे बदलतात, ते आपण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाहिलं. विचारांशी बांधीलकी मानण्याची कटकट नकोच, असं आता सर्वच पक्षातले नेते मानताना दिसतात. राजकीय स्वैराचाराच्या अशा दिवसांत तत्त्वाचा आग्रह धरणाऱ्या भास्करराव दुर्वे यांची आवर्जून आठवण येते.’

साहित्य आणि लेखक त्यांची जबाबदारी आजच्या काळात पार पाडत आहेत की नाही, यावर चर्चा करताना प्रा. डोळे म्हणाले, ‘गुजरात राज्यात गोध्रा आणि त्यानंतर दंगली, कत्तली झाल्या. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून गुजरातमध्ये अत्यंत बेलगाम कारभार केला. त्याचं खरं, वास्तव चित्रण करणारी एकही कादंबरी, नाटक वा सिनेमा गुजराती भाषेत आला नाही. तिथल्या लेखकांनी याविषयी लिहिणं टाळलं. विशेष धक्कादायक म्हणजे गुजरातच्या बहुसंख्य जनतेनं नरेंद्र मोदी यांचं एककल्ली, आक्रमक नेतृत्व मनोमन स्वीकारलं होतं. गुजरातनं मोदींना स्वीकारलं म्हणून देशही त्यांना स्वीकारेल, असा आत्मविश्वास भाजप, रा.स्व.संघ परिवाराला आला. त्यातून मोदी देशाचे नेते झाले. मोदींच्या काळात ‘पॅडमॅन’, ‘टॉयलेट - एक प्रेमकथा’, ‘अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ असे मोदी काळाचा उदो उदो करणारे चित्रपट आर्थिक साहाय्य देऊन तयार करवून घेतले आहेत. मोदींवरही सिनेमा तयार झालाय. हे सिनेमे अक्षय कुमार आणि विवेक ओबेरॉय यांच्यासारख्या टुकार नटांना घेऊन केलेत, हा भाग वेगळा. पण ते जनतेलाही आवडले नाहीत, हेही दिसलं. अगदी ‘ठाकरे’ हा सिनेमा थिएटरात चार-पाच दिवसही चालला नाही, हेही आपण बघितलं.’

‘ताम्रपट’मधील भास्करराव दुर्वे शेवटी संभ्रमित होतात. ‘आपण हरत आहोत. लोक आपल्याला स्वीकारत नाहीत. आपलं काहीतरी चुकतंय,’ असं त्यांना वाटतं. डोळे म्हणाले, ‘भास्करराव दुर्वे शेवटी आत्मपरीक्षण करण्याच्या मनोवस्थेत येतात. या समाजात आपण आपल्या विचारांनी बदल घडवण्यात कमी पडतोय, असं त्यांना जाणवू लागतं. तेव्हा ते आत्मताडण, आत्मश्लाघ्य हा मार्ग पत्करतात. आपलं काय चुकतंय, याचा शोध घेऊ लागतात. सत्तास्पर्धा, सहकारी संस्था, शिक्षण संस्था, दलितांचे प्रश्न, जातीयता या प्रत्येक क्षेत्रांत बाजारबुणग्यांचा प्रभाव वाढत गेला, तेव्हा भास्करराव दुर्वे अस्वस्थ होत गेले. कृतिशून्य आदर्श आणि कावेबाज, अदूरदर्शी नेतृत्व यांचं चित्रण ‘ताम्रपट’मध्ये रंगनाथ पठारे प्रभावीपणे करतात. इतर राजकीय कादंबऱ्यांत सहसा न आढळणारं विविध स्तरांतल्या स्त्रियांचं चित्रण आणि सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया या कादंबरीला वेगळ्या उंचीवर घेऊन जातात.’

सदा डुम्बरे या वेळी म्हणाले, ‘संगमनेर-अकोले हा सामाजिक चळवळीचा परिसर आहे. या भागानं समाजवादी, कम्युनिस्ट, आंबेडकरी व सत्यशोधक चळवळीला मोठमोठे नेते दिले. त्यापैकी भास्करराव दुर्वे हे एक होते. त्यांचं राजकारण तत्त्वाचं होतं. ते ‘ताम्रपट’नं साहित्यात प्रभावीपणे उमटवलं. ही मराठी साहित्यातील अक्षरलेणं ठरावी, अशी राजकीय कादंबरी आहे.’

पठारे हे संगमनेर महाविद्यालयात १९७३पासून भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. आता निवृत्त झाले आहेत. १९८२मध्ये त्यांची ‘दिवे गेलेले दिवस’ ही आणीबाणीवरची पहिली कादंबरी आली. ती गाजली. त्यानंतर ‘रथ’, ‘चक्रव्यूह’, ‘हारण’, ‘टोकदार सावलीचं वर्तमान’, ‘दु:खाचे श्वापद’, ‘सत्त्वाची भाषा’, ‘स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग’ अशी त्यांची पुस्तकं गाजत राहिली. ‘ताम्रपट’च्या पंचविशीच्या निमित्तानं संगमनेरकरांनी त्यांचा ख्यातनाम अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते गौरव केला.

यावेळी सयाजी शिंदे म्हणाले, ‘रंगनाथ पठारे यांच्यासारखा मराठीतला एवढा मोठा लेखक माझा मित्र आहे, याचा मला नेहमीच अभिमान वाटत आलाय. आम्ही चित्रपटातली मंडळी वाचतो कमी आणि बोलतो जास्त! पठारे यांनी एवढं लिहिलंय, हे मी बघितलं आणि मलाही काही लिहावंसं वाटू लागलं. मला प्रेरणा देणाऱ्या या लेखकाचा माझ्या हातून गौरव होतोय, यामुळे मीही हरखून गेलो आहे.’

रंगनाथ पठारे हे काही सोहळ्यात, समारंभात रमणारे लेखक नाहीत. भास्करराव दुर्वे यांच्या प्रेमापोटी त्यांनी हा सत्कार स्वीकारला. त्यावेळी ते म्हणाले, ‘गौरव, सत्कार या गोष्टी लेखकाला मिंधं करतात. मी मिंधेपणा टाळतो. मला असं वाटतं की, लेखकानं खरं लिहीत राहण्यासाठी सत्तेपासून, मिंधेपणापासून दूर राहिलं पाहिजे. ‘ताम्रपट’ ही काही भास्करराव दुर्वे यांची चरित्र कादंबरी नाही. पण त्यांच्यावर बेतलेलं पात्र या कादंबरीचा नायक आहे. संगमनेर-अकोले परिसरानं भास्करराव दुर्वे, भाऊसाहेब थोरात, दत्ता देशमुख अशी मोठी माणसं जन्माला घातली. या परिसराची माती सदगुणी आहे. आजही या थोर लोकांचा वैचारिक वारसा या भागात काहीबाही काम करत आहे. या चांगल्या माणसांचा वारसा सुरू राहावा.’

‘ताम्रपट’च्या आतापर्यंत तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्यात. १९९१-९३ अशी तीन वर्षं पठारे ही कादंबरी लिहीत होते. ८०० पानांची ही कादंबरी आहे. पठारे म्हणतात – ‘चांगली माणसं लक्षात राहावीत म्हणून ‘ताम्रपट’ लिहिली. चांगली माणसं, आदर्शवाद कसा हरतो, सत्तास्पर्धेत कावेबाज अदूरदर्शी नेतृत्व कसं पुढे जातं, समाजावर कबजा मिळवतं, हे ‘ताम्रपट’मध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. नव्या पिढीला ते समजून घेता येईल.’

.............................................................................................................................................

'ताम्रपट' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4905/Tamrapat

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......