द्वैभाषक बुद्धिजीवींचा उदय आणि ऱ्हास
ग्रंथनामा - झलक
रामचंद्र गुहा
  • म. गांधी, टागोर, लोकमान्य टिळक, डॉ. आंबेडकर, राजा राममोहन राय, वि. दा. सावरकर, राम मनोहर लोहिया, यू. आर. अनंतमूर्ती, हरिवंशराय बच्चन, सी. राजगोपालाचारी, ईएमएस नंबुद्रीपाद, बी. एस. केशवन आणि ‘देशभक्त आणि अंधभक्त’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 05 June 2019
  • ग्रंथनामा झलक म. गांधी Gandhi टागोर Tagor लोकमान्य टिळक Tilak डॉ. आंबेडकर Ambedkar राजा राममोहन राय Raja Ram Mohan Roy वि. दा. सावरकर V.D. Savarkar राम मनोहर लोहिया Ram Manohar Lohia यू. आर. अनंतमूर्ती U.R. Ananthamurthy रामचंद्र गुहा Ramachandra Guha देशभक्त आणि अंधभक्त Deshbhakt ani andhbhakt Patriots and Partisans

प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या ‘Patriots and Partisans : From Nehru to Hindutva and Beyond’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘देशभक्त आणि अंधभक्त’ या नावाने ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांनी केला आहे. मनोविकास प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या या पुस्तकातील हे एक प्रकरण. केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात त्रिभाषा सूत्राचा अवलंब केला असून त्याद्वारे अहिंदी भाषक राज्यांवर हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा समज झाल्याने दक्षिण भारताने या मसुद्याला कडाडून विरोध केला. परिणामी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हिंदीसह त्रिभाषा धोरण ‘सक्तीचे’ नसून ‘ऐच्छिक’ असा या धोरणात बदल केला आहे. या पार्श्वभूमीवर हा लेख आवर्जून वाचावा असा आहे.

............................................................................................................................................................

१.

विद्वान-ग्रंथपाल बी. एस. केशवन आणि त्यांचा मुलगा मुकुल यांच्यात माझ्या साक्षीने झालेले संभाषण या निबंधाची प्रेरणा ठरले आहे. त्यांच्या वादाचा विषय काय होता, हे आता स्मरत नाही. पण नव्वद वर्षांचे वडील त्यांच्या मुलाला फैलावर घेत होते. मध्येच ते माझ्याकडे वळत आणि मुलाकडे बोट दाखवीत उद्गारत, ‘मक्कू!, पैथियम!’. हिंदी भाषक आईच्या पोटी दिल्लीत जन्मलेल्या मुकुलला या शब्दांचा अर्थ कळत नव्हता, पण मला कळत होता. ढोबळपणे ‘मंद’ आणि ‘वेडा’.

मी बंगलोरचा, माझे आई-वडील तामिळ आणि माझे एक चुलतआजोबा तामिळमधील विद्वान होते, हे केशवन यांना माहीत होते. त्यामुळे दोघे ज्या इंग्रजी भाषेत बोलत होते, ती मुलाचा (त्यांच्या मते) मूर्खपणा व्यक्त करण्यास अपुरी वाटू लागली, तेव्हा त्यांनी त्यांच्या मातृभाषेचा आश्रय घेतला होता. ती ‘तत्त्वत:’ माझीही मातृभाषा होती. तत्त्वत: अशासाठी, की तामिळ भाषातज्ज्ञ असलेले माझे चुलतआजोबा मला पत्रे लिहून, ‘तामिळ शिक आणि साधी राहणी अंगीकार,’ असा उपदेश करीत असत. दुसरा उपदेश मी अजिबातच पाळू शकलो नाही, मात्र काळाबरोबर मी तामिळमधील काही डझन शब्द अवगत करू शकलो. ‘मक्कू’ आणि ‘पैथियम’ हे त्यापैकीच दोन!

बी. एस. केशवन बहुभाषक होते. तामिळ, कन्नड आणि इंग्लिश या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. बंगालीत ते संभाषण करू शकत, तर हिंदी अडखळत बोलू शकत. शिवाय संस्कृतची त्यांना उत्तम जाण होती. ‘नॅशनल लायब्ररी’चे पहिले भारतीय संचालक म्हणून काम पाहताना, राष्ट्रीय माहिती यंत्रणेचे संवर्धन करताना आणि प्रकाशन व छपाई या क्षेत्रांच्या इतिहासलेखनाचे पायाभूत काम हाती घेताना त्यांना त्यांच्या या बहुभाषकत्वाचा लाभ झाला. त्यांच्या पिढीतील अनेक भारतीयांना एकापेक्षा अधिक भाषांत रुची असे. त्यांच्या व्यावसायिक कामाची ती अनिवार्य गरज नसतानाही. माझे वडील व्यवसायाने कागद तंत्रज्ञ होते. ते इंग्लिश आणि तामिळ उत्तम बोलतात. शिवाय कामचलाऊ कन्नड आणि हिंदी. ते फ्रेंच आणि जर्मन वाचू शकतात. मात्र मुकुल केशवन आणि मी केवळ इंग्लिश भाषेतच मनासारखे व्यक्त होऊ शकतो. हिंदीतून कामचलाऊ संभाषण जमते. शिवाय संशोधनासाठी हिंदी कागदपत्रांचा वापरही करतो. मात्र हिंदीत अभ्यासपूर्ण ग्रंथ वा निबंध लिहू शकत नाही. आम्ही दोघेही तिसरी भाषा येते, असा आव आणू शकत नाही.

२.

व्यक्तिगत अनुभवाकडून आता इतिहासाकडे वळू या. दोन महान आधुनिक भारतीयांच्या ‘भाषा’ या विषयावर झालेल्या चर्चेपासून सुरुवात करू या. एप्रिल १९२१मध्ये महात्मा गांधी यांनी इंग्रजी शिक्षणावर हल्ला चढविला होता. ओरिसात केलेल्या भाषणात त्यांनी इंग्रजी शिक्षणाची संभावना ‘वादातीत दुष्प्रभाव’ अशी केली होती. ‘इंग्रजी शिक्षणाची बाधा झाली नसती, तर लोकमान्य टिळक आणि राजा राममोहन रॉय हे आहेत त्यापेक्षा अधिक उत्तुंग पुरुष झाले असते,’ असेही ते म्हणाले होते. त्यांच्या मते, हे दोन्ही प्रभावशाली आणि आदरणीय असे भारतीय, ‘चैतन्य, शंकराचार्य, कबीर आणि नानक यांच्या तुलनेत लोकांवरील प्रभावाच्या दृष्टीने खुजे होते.’ ‘शंकराचार्यांनी एकट्याने जे केले, ते इंग्लिशशिक्षितांची अख्खी फौजही करू शकत नाही. अशी अनेक उदाहरणे मी देईन. गुरू गोविंद हे इंग्रजी शिक्षणातून घडले होते का? धैर्य आणि त्याग यांबाबतीत कोणाच्याही पुढे असलेल्या पंथाची स्थापना करणाऱ्या गुरू नानक यांच्या पंक्तीत बसण्याची पात्रता असलेला एक तरी इंग्रजीशिक्षित भारतीय आहे का?... भारतीयांचे पुनरुज्जीवन करायचेच असेल, तर ते इंग्रजी शिक्षणाने नक्कीच नाही,’ असेही गांधींनी बजावले होते.

या भाषणाची वृत्ते वाचून त्यांच्या एका मित्राने याचे गांधींकडे अधिक स्पष्टीकरण मागितले. गांधींनी त्यांच्या वृत्तपत्रातून खुलासा केला होता: ‘ज्या पद्धतीने येथे इंग्रजी शिक्षण दिले जाते, त्यामुळे इंग्रजीशिक्षित भारतीय दुबळे झाले आहेत. या शिक्षणाने भारतीय विद्यार्थ्यांच्या मानसिक ऊर्जेवर ताण आला आहे आणि आपण अनुकरणवादी झालो आहोत. लोकभाषांचे विस्थापन हे ब्रिटिशांच्या प्रभावाखाली (घडणाऱ्या घटनांपैकी) सर्वात दु:खद प्रकरण आहे.’ ‘इंग्रजी भाषेतून विचार करणे आणि आपले चिंतन मुख्यत: इंग्रजी भाषेतून मांडणे, या बंधनात ते जखडले नसते, तर राममोहन रॉय हे अधिक महान सुधारक झाले असते आणि लोकमान्य टिळक हे अधिक विद्वान अभ्यासक.’ असे नमूद करून गांधी लिहितात : ‘स्वातंत्र्याची संकल्पना बिंबवणे आणि काटेकोरपणे विचार करण्याची क्षमता रुजविणे, यासाठी इंग्रजी भाषा अनिवार्य आहे, ही भारतातील सर्वांत मोठी अंधश्रद्धा आहे. इंग्रजी शिक्षणपद्धतीच्या परिणामी, भारतीय शरीर, मन आणि आत्मा यांना खुजे लेखण्याची प्रवृत्ती वाढली आहे.’

या स्पष्टीकरणाने महात्म्याच्या या अनामिक मित्राचे समाधान झाले होते का, हे कळायला मार्ग नाही. मात्र रवींद्रनाथ टागोर यांना ते अपुरे वाटले होते. युरोपमध्ये असताना गांधींच्या लेखांच्या प्रती पोस्टाने त्यांच्यापर्यंत पोचल्या. लेखांचा सूर आणि विशेषत: राममोहन राय यांच्याविषयीचा उल्लेख यांमुळे टागोर यांना धक्काच बसला. त्यांनी त्यांचे व गांधींचे मित्र सी. एफ. अ‍ॅन्ड्रूज यांना १० मे १९२१ रोजी पत्र लिहिले : ‘आधुनिक शिक्षणाची अवहेलना करण्याच्या नादात आधुनिक भारतातील एक महान सुधारक राममोहन रॉय यांचे महात्मा गांधींनी केलेले अवमूल्यन निषेधार्ह आहे.’ गांधींनी गुरू नानक आणि कबीर यांची उदाहरणे दिली होती. त्याचा परामर्श घेताना टागोर लिहितात : ‘हे संत महान होते; कारण त्यांचे जीवन तसेच शिकवण यांत त्यांनी हिंदू आणि मुस्लीम संस्कृती एकजीव केल्या. अशा प्रकारे बाह्य विविधतेतील आत्मिक एकत्वाचा साक्षात्कार होणे, हे अस्सल भारतीयत्व आहे.’

‘इंग्रजी भाषेचे शिक्षण घेणे आणि तिचा आदर करणे, हे राममोहन रॉय यांचे कृत्य नानक आणि कबीर यांचेच कार्य पुढे नेणारे आहे,’ असा युक्तिवाद टागोरांनी केला होता. ‘हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन या संस्कृतींमधील आत्मिक एकतेचा प्रत्यय घेण्याइतके राममोहन रॉय यांचे मन विशाल होते. त्यामुळे त्यांनी सत्यार्थाने भारताचेच प्रतिनिधित्व केले आणि हे सत्य नकारावर नव्हे, तर समग्र आकलनावर आधारित होते.’ असे नमूद करून टागोर म्हणतात : ‘पाश्चात्यांचा स्वीकार हा राममोहन रॉय यांच्यासाठी स्वाभाविक होता... केवळ त्यांचे शिक्षण अस्सल पौर्वात्य होते म्हणून नव्हे, तर भारतीय शहाणपणाचे ते सच्चे वारसदार होते म्हणूनही. पाश्चात्य राष्ट्रांतील शालेय विद्यार्थी ते कधीच नव्हते. त्यामुळे पाश्चात्यांचे मित्र होण्याइतकी सभ्यता त्यांच्यात होती. आधुनिक भारताला जर ते उमजू शकत नसतील, तर याचा अर्थ इतकाच, की भावनावेगाच्या वादळी ढगांनी आजच्या घडीला स्वयंप्रकाशी सत्य झाकोळून टाकले आहे.’

टागोरांचे हे पत्र वृत्तपत्रांना प्रसिद्धीसाठी देण्यात आले. गांधींनीही ते वाचले. ‘इंग्रजी शिक्षणाला माझा विरोध नाही,’ मात्र त्याच्या आकर्षणाला आणि मातृभाषेतील शिक्षणापेक्षा इंग्रजी शिक्षणाला प्राधान्य द्यायला आहे, असे उत्तरादाखल गांधींनी स्पष्ट केले होते. ‘माझा धर्म कारागृहाचा धर्म नाही,’ असे नमूद करून गांधी म्हणतात : ‘त्यात ईश्वरनिर्मित प्रत्येकाला- मग तो कितीही छोटा का असेना- स्थान आहे.’ गांधी वा त्यांचे असहकार आंदोलन हा विदेशांविषयीच्या पूर्वग्रहदूषित दृष्टीचा आविष्कार आहे, या आरोपाचा प्रतिवाद करताना गांधी म्हणाले होते : ‘महान कवी (रवींद्रनाथ टागोर) यांच्याइतकाच मीही खुल्या हवेचा चाहता आहे. माझ्या घराला चारही बाजूंना भिंती असाव्यात आणि खिडक्याही बंद असाव्यात, असे मला वाटत नाही. सर्व प्रदेशांच्या संस्कृतींचे वारे घराच्या चारही दिशांनी मुक्तपणे वाहावे, अशीच माझी इच्छा आहे. फक्त त्यांपैकी कुणीही मला भिरकावून देणे, मला अमान्य आहे.’

हे शब्द आता भारतातील अनेक सभागृहांत कोरले गेले आहेत. फक्त त्यातून ‘महान कवी (रवींद्रनाथ टागोर) यांच्याइतकाच मीही खुल्या हवेचा चाहता आहे,’ ही महत्त्वाची पहिली ओळ वगळली आहे. हा तात्त्विक वाद बाजूला ठेवला, तर व्यवहारात गांधी आणि टागोर जवळपास एकाच बाजूला होते. गांधींनी त्यांची पुस्तके गुजरातीत लिहिली, मात्र ती व्यापक वाचक वर्गापर्यंत पोचावी, यासाठी इंग्रजीत भाषांतरित होतील, याचीही काळजी घेतली. शिवाय गरज पडली, तर ते स्वत:ही साम्राज्यवाद्याच्या भाषेचा परिणामकारक वापर करू शकत असत. त्यांचे पहिले लेख ‘व्हेजीटेरियन सोसारटी ऑफ लंडन’च्या नियतकालिकात १८९१ साली प्रसिद्ध झाले होते. थेट आणि अनलंकृत भाषा हे त्यांच्या इंग्रजीतील लिखाणाचे वैशिष्ट्य होते. वसाहतवादी राजवटीला दिलेले अर्ज, ‘इंडियन ओपिनियन’, ‘यंग इंडिया’ आणि ‘हरिजन’ या त्यांच्या नियतकालिकांतील संपादकीये वा मित्रांना लिहिलेली असंख्य पत्रे यांतून ते प्रतीत होते.

एकापेक्षा अधिक भाषांत लिहिताना, ज्यांच्यावर गांधींनी टीका केली होती, त्यांच्याच पावलावर ते पाऊल टाकीत होते. लोकमान्य टिळकांची मातृभाषा मराठी होती आणि त्या भाषेत त्यांचे विविधांगी लेखन प्रसिद्ध झाले होते. राममोहन रॉय यांनीही इंग्रजी लिखाणाबरोबरच, पर्शियन आणि बंगाली या भाषांत लिखाण केले होते. संस्कृत आणि अरेबिक या भाषांवरही त्यांचे प्रभुत्व होते. आपल्या कादंबऱ्या आणि कविता यांनी बंगाली भाषेवर अमीट ठसा उमटवलेल्या रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांचे महत्त्वाचे ललितेतर लेखन इंग्रजीत उपलब्ध असेल, याची काळजी घेतली होती. ‘नॅशनॅलिझम’ हे त्यांचे महत्त्वाचे राजकीय लिखाण, इंग्रजीत दिलेल्या भाषणांचा संग्रह होता. पूर्व आणि पश्चिम यांच्या संबंधांवरील त्यांचे आजही प्रस्तुत असलेले निबंध इंग्रजीत लिहिलेले होते, वा त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्याने भाषांतरित केलेले होते. व्यक्तिगत वा कौटुंबिक पातळीवरील प्रेम वा अवहेलना यांसारख्या भावना मातृभाषेत अधिक प्रत्ययकारी पद्धतीने व्यक्त करता येतात, याची जाणीव टागोर यांना होती. मात्र त्याच वेळी विवेक आणि न्याय यांच्याशी संबंधित व्यापक अव्यक्तिगत स्वरूपाच्या प्रश्नांवर लिहिताना, अधिक लोकांपर्यंत पोचणाऱ्या आणि व्यापक भौगोलिक क्षेत्रात वाचल्या जाणाऱ्या भाषेत लिहिणे अधिक गरजेचे असते, हेही त्यांना माहीत होते.

मातृभाषेत आणि सोबत इंग्रजीत लिहून गांधी आणि टागोर समाजाचे तसेच स्वत:चेही हित साधत होते. जगभरातील व वेगवेगळ्या स्तरांतील वाचकांपर्यंत ते पोचू शकले आणि इतरांचे प्रतिसाद विचारात घेत, आपापल्या विचारांच्या पायाचाही विस्तार करीत राहिले. हा वैचारिक खुलेपणा त्यांच्या वाचनातूनही प्रत्ययाला येतो. गांधींनी ज्या विचारवंतांची पुस्तके वाचली आणि ते प्रभावितही झाले, ते सर्व गुजराती नव्हते. रायचंदभाई वा नरसिंग मेहता यांच्यापेक्षा रस्किन आणि टॉलस्टॉय यांचे त्यांच्यावरील ऋण कमी नव्हते. गुजरातबाहेर इंग्लंडमध्ये काही वर्षे, दक्षिण आफ्रिकेत काही दशके आणि नंतर भारतभरातील ग्रामीण भागांत गांधींनी घालविलेला काळ त्यांना समृद्ध करणारा ठरला होता.

टागोर यांचा युरोपीय साहित्याचा गाढा अभ्यास होता. त्यांचे प्रकाशक कुर्ट वोल्फ यांच्या निमंत्रणावरून टागोर १९२०च्या दशकात जर्मनीला गेले होते. टागोर यांच्या ‘ज्ञानाच्या वैश्विक व्याप्ती’ची नोंद घेत वोल्फ म्हणतात : ‘ते ज्या युरोपीयांना भेटले, त्यांना पूर्वेची जेवढी माहिती होती, त्यापेक्षा टागोरांना पश्चिमेची अधिक माहिती होती.’ टागोर यांनी इतर अनेक विषयांप्रमाणेच टी. एस. इलियटच्या साहित्यावरही भाष्य केले होते. भारतात १८६१ साली जन्मलेल्या व्यक्तीला, त्यांच्यापेक्षा ३० वर्षांनी तरुण असलेल्या एका अँग्लोअमेरिकन कवीच्या लेखनात एवढा रस असावा आणि त्याची एवढी सखोल समज असावी, हे आश्चर्यकारक होते.’

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4901/Startup-marnarach-mi-udyojak-honarach-mi

...............................................................................................................................................................

३.

गांधी आणि टागोर या दोघांच्या दृष्टीने, परदेशी भाषा हे अन्य संस्कृती, अन्य नागरी समाजजीवन, जगण्याची (वा जगण्याच्या) अन्य पद्धती यांत डोकावण्याची सुसंधी होती. मातृभाषेव्यतिरिक्त आणखी एका भाषेवर प्रभुत्व मिळविणे, म्हणजे एकाच वेळी स्वत:वरील प्रादेशिकवादी प्रभाव कमी करणे आणि आपले काम जगभर पोचविणे, अशी दोघांचीही भावना होती. त्यांचे वाचन आणि प्रवासातील अनुभव यांचे प्रतिबिंब पुन्हा त्यांच्या लेखनात उमटत असे. त्यायोगे अवघे जग बंगालमध्ये वा गुजरातमध्ये अवतरत असे आणि ते विदेशी भाषेत लिहीत, तेव्हा बंगाल व गुजरात जगापुढे येत. द्वैभाषकत्व हे येथे एक वाहन होते किंवा त्यापेक्षाही व्यापक आणि शाश्वत असे काही- म्हणजे बहुसांस्कृतिकता.

या दृष्टीने पाहता, गांधी आणि टागोर हे प्रातिनिधिक होते. त्यांच्या आधी सर सय्यद अहमद खान यांनी उर्दू आणि इंग्लिश या दोन्ही भाषांत लिखाण केले. मुस्लिमांच्या हितसंबंधांची जाणीव ब्रिटिशांना करून देणे आणि त्याच वेळी आधुनिकतेशी जुळवून घेण्यास मुस्लिमांना प्रवृत्त करणे, असे त्यांचे दुहेरी उद्दिष्ट होते. गांधी आणि टागोर यांच्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थानिक लोकांसाठी मराठीत, तर उर्वरित भारत आणि जग यांच्यापर्यंत पोचण्यासाठी इंग्लिशचा आश्रय घेतला होता. आंबेडकरांना त्यांचा तुकाराम माहीत होता, तसाच जॉन स्टुअर्ट मिलही. आणखी एक उदाहरण चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचे. त्यांची इंग्रजी लिखाणाची शैली आजही नावाजली जाते, मात्र तामिळमध्ये निबंधलेखन आणि लघुकथा यांचा पाया त्यांनी घातला, हे फारच थोड्यांना आज माहीत असेल. राजगोपालाचारींना त्यांचे कुरल माहीत होते, मात्र महात्मा गांधींना भेटण्यापूर्वी त्यांनी हेन्री डेव्हिड थोरोच्या साहित्याचे वाचन केले होते. राजगोपालाचारी यांचे समकालीन वि. दा. सावरकर यांनीही मराठीत विपुल ललित तसेच वैचारिक लिखाण केले होते, त्याचबरोबर इंग्रजीतही. दुसऱ्या राजकीय टोकाचे प्रतिनिधित्व करणारे ईएमएस नंबुद्रीपाद यांनीही मल्याळी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत मोठ्या प्रमाणावर लेखन केले होते.

(याला अपवाद दिसतात, ते मोहमद अली जीना, जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. हे तिघेही विचारवंत-राजकारणी होते, पण बव्हंशी एकभाषक प्रकारचे. जीना यांचे उर्दूवर प्रभुत्व नव्हते, हे सर्वज्ञात आहे. नेहरू हिंदीत आणि बोस बंगालीत भाषणे देऊ शकत, पण जीनांप्रमाणेच त्यांचे महत्त्वाचे लेखन हे इंग्रजीतच आहे.)

डॉ. राममनोहर लोहिया हे असेच एक विचारवंत-राजकारणी. प्रथमदर्शनी त्यांची भूमिका विरोधाभासी वाटू शकेल. शैक्षणिक संस्थांतून आणि सार्वजनिक जीवनातून इंग्रजीला हद्दपार करावे आणि देशभर हिंदीचा प्रसार व संवर्धन करावे, असा लोहियांचा आग्रह होता, हे खरे आहे. मात्र लोहियांनी एकभाषकत्वाचा नव्हे, तर बहुभाषकत्वाचा नेहमीच पुरस्कार केला होता. शालेय शिक्षण मातृभाषेतून द्यावे आणि त्याखेरीज आणखी दोन भाषा मुलांनी शिकाव्यात; एक, हिंदी आणि दुसरी विदेशी वा अन्य भारतीय भाषा, असे त्यांचे म्हणणे होते. आंतरराष्ट्रीर स्तरावरील देवाणघेवाणीसाठी परदेशी भाषेची गरज त्यांना मान्य होती, पण ही भाषा नेहमीच आणि सर्व काळासाठी केवळ इंग्लिशच असली पाहिजे, हे त्यांना अमान्य होते. भूतकाळात ही भूमिका फ्रेंच भाषेने बजावली होती, भविष्यात कदाचित रशियन वा चिनी भाषा बजावेल, असा त्यांचा युक्तिवाद होता. लोहियांचे जर्मन भाषेवर प्रभुत्व होते. जर्मनीतील बर्लिन विद्यापीठातून त्यांनी पीएच. डी. केले होते. मात्र इंग्लिशच्या विरोधातील त्यांचे काही उत्कृष्ट निबंध इंग्लिशमध्येच होते.

त्यामुळे प्रथमदर्शनी समज होतो, तसे लोहिया हे अपवाद नव्हते. त्यांच्या पिढीच्या इतर नेत्यांप्रमाणेच, द्वैभाषकत्व आणि बहुसांस्कृतिकता हे त्यांच्यासाठी स्वाभाविक होते. त्यांचे समकालीन असलेल्या समाजशास्त्रज्ञांतही ही मूल्ये स्वाभाविकपणे आली होती. १९४० आणि ५०च्या दशकांत सक्रिय असलेले मानववंशशास्त्रज्ञ निर्मल कुमार बोस आणि इरावती कर्वे, अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ आणि समाजशास्त्रज्ञ डी. पी. मुखर्जी हे सर्वच इंग्रजी, तसेच त्यांच्या मातृभाषेतील लेखनासाठी नावाजलेले होते. साधारणत: संशोधनपर प्रबंध इंग्रजीत आणि लोकप्रिय वाङ्मयप्रकार मातृभाषेत प्रसिद्ध केला जाई. काही वेळा मातृभाषेतील त्यांचे लिखाण इंग्रजीत भाषांतर स्वरूपात उपलब्ध केले जात असे आणि त्याचा प्रभावही पडत असे. (उदाहरणार्थ, महाभारतावरील ‘युगान्त’ हे इरावती कर्वे यांचे चिंतनशील लेखन.)

राजकारणी आणि विद्वान यांच्याप्रमाणेच अनेक लेखक आणि समीक्षक यांनी द्वैभाषकत्वाचा अंगीकार केला होता. विसाव्या शतकाच्या मध्यावरील दशकांतील अनेक नामवंत लेखक हे इंग्रजीचे प्राध्यापक होते, तरीही त्यांनी अन्य भाषेत कविता आणि कथा लिहिल्या, असे (बहुधा) हरीश त्रिवेदी यांनी नमूद केले होते. त्यांचा लेख आता माझ्याजवळ नाही, मात्र त्यांनी कन्नड कवी गोपालकृष्ण अडिगा, कादंबरीकार यु. आर. अनंतमूर्ती, हिंदीतील कवी हरिवंशराय बच्चन आणि लघुकथाकार निर्मल वर्मा आणि उर्दूतील फिराक गोरखपुरी यांचा उल्लेख केला होता. हे सर्व इंग्रजी साहित्य शिकवीत. त्यांपैकी काही ब्रिटिश विद्यापीठांतील पीएच. डी. होते. ज्यांनी उपजीविकेसाठी इंग्लिशचे अध्यापन केले, पण जगण्यासाठी मातृभाषेत लेखन केले, अशा इतर भारतीय भाषांतील लेखकांची भर साहित्याचे इतिहासकार या यादीत घालू शकतील.

येथेही एकापेक्षा अधिक भाषा अवगत असणे हा केवळ कौशल्याचा भाग नव्हता, तर संवेदनशीलतेचा होता. एकापेक्षा अधिक भाषिक तसेच सांस्कृतिक विश्वात संचार असलेल्या लेखकामुळे तो लेखक, त्याचे साहित्य आणि वाचक या तिन्हीचा लाभ झाला होता. बच्चन त्यांनी केंब्रिज विद्यापीठात ज्या महान कवी डब्ल्यू. बी. यीट्स यांच्यावर पीएच. डी.साठी संशोधन केले, त्यांच्या साहित्याचा कोणत्या ना कोणत्या पातळीवर बच्चन यांच्या हिंदी काव्यावर नक्कीच प्रभाव पडला असणार. त्याच न्यायाने बच्चन यांनी इंग्रजीत केलेले लेखन, हिंदी साहित्यविश्वाने त्यांच्यावर केलेल्या संस्कारांनी समृद्ध झाल्याविना राहिले नसणार.

(या द्वैभाषकत्वाचे लक्षणीय उदाहरण म्हणजे १९३६ साली प्रसिद्ध झालेली प्रेमचंद यांची ‘गोदान’ ही कादंबरी. आधुनिक हिंदी कादंबरीचा पाया तिने घातला, असे मानले जाते. मात्र तिचा पट लेखकाने इंग्रजीत रचला होता!)

महायुद्धांमधील काळात बहुभाषकत्वाचा सर्वाधिक आविष्कार म्हैसूर शहरातून झाला. बी. एस. केशवन यांनी या शहरात घालविलेला काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळापैकी एक होता. इंग्लिशमधून राजकीय निबंधलेखन करणारे कन्नड कवी के. व्ही. पुटप्पा (कुव्हेम्पू), तामिळ आणि कन्नड या भाषांवर प्रभुत्व असलेले, पण इंग्लिशमधून कादंबरीलेखन करणारे आर. के. नारायण, आणि पत्रकार शारदा प्रसाद हे १९३० आणि ४०च्या दशकात म्हैसूरमध्ये वास्तव्याला होते. शारदा प्रसाद यांनी कन्नडमधून लेखन केले, मात्र त्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व पुढे अनेक पंतप्रधानांसाठी भाषणे लिहून देताना कामी आले. तुलनेने तरुण पिढीचे प्रतिनिधी ए. के. रामानुजन होते. ‘म्हैसूरमध्ये लहानाचे मोठे होताना, मी तीन भाषा शिकलो. एक, रस्त्यावरील म्हणजे कन्नड; दोन, स्वयंपाकघरातील म्हणजे त्यांची आई बोलत असे ती, तामिळ; आणि तिसरी, वरच्या माळ्यावरील अभ्यासिकेत माझे वडील बोलत ती म्हणजे इंग्लिश,’ अशी आठवण रामानुजन यांनी सांगितली होती. रामानुजन हे कन्नड आणि इंग्लिश या दोन्ही भाषांत कवी म्हणून नावाजले गेले होते. कन्नड आणि तामिळ लोककला, तसेच लोकगीते यांच्या इंग्रजीत केलेल्या भाषांतरामुळे त्यांना अमाप लोकप्रियता लाभली. म्हैसूरमधील बहुभाषक बौद्धिक विश्वात त्यांच्या झालेल्या जडणघडणीचीच ही देणगी होती.

वसाहतवादी भारतातील इतर शहरांचे म्हैसूर हे एक प्रतिनिधी होते. धारवाड, कोचीन, अलाहाबाद इ. शहरांची संस्कृती अशीच द्वैभाषक होती. येथील लेखक आणि अध्यापक इंग्लिशबरोबरच स्थानिक भाषेतही लेखन करीत. कसबा आणि महानगर यांत एक सलग असा सांस्कृतिक धागा होता.

मी वर्णन केलेले द्वैभाषकत्व हा विशिष्ट ऐतिहासिक घटनांचा परिपाक होता- प्रारंभी वसाहतवादाचे आगमन आणि नंतर राष्ट्रवादाचे. राज्यकर्ते म्हणून ते आणि सामान्य जनता यांच्यात संवाद साधता यावा, तसेच प्रशासन आणि व्यवस्थापन यांत साह्य व्हावे (जोडीला व्यवसाय आणि व्यापारातही), यासाठी ब्रिटिशांना काही इंग्रजीशिक्षित भारतीय हवे होते. मात्र कालांतराने सत्ताधाऱ्यांची भाषा ही त्यांच्याकडे समान हक्कांची मागणी करण्याचे साधन ठरली. म्हणजेच, एखाद्या प्रदेशावर सत्ता लादण्याच्या आणि जितांचे नियंत्रण करण्याच्या प्रक्रियेतील एक सहायक ते सत्ताधारी राजवटीचा निषेध आणि निंदा यांसाठीचे माध्यम असा इंग्रजीचा प्रवास सुरू झाला. ब्रिटिश त्यांच्याच उज्ज्वल परंपरा पायदळी कसे तुडवीत आहेत, हे याच भाषेत भारतीय राष्ट्रवादी त्यांना सुनावू लागले. त्याच वेळी बौद्धिक वा राजकीय कल असलेल्या व्यक्तींचे, साम्राज्याच्या विविध भाषिक पट्ट्यांतील नागरिकांशी संवाद साधण्याचे साधन इंग्रजी भाषा झाली. मात्र इंग्रजीवर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळवूनही, या सुधारणावादी भारतीयांनी त्यांच्या मातृभाषेतून काम चालू ठेवले. सर्जनशील साहित्याच्या आविष्कारासाठी आणि प्रतिगामी सामाजिक प्रथांच्या निर्मूलनाचा प्रसार करण्यासाठी मातृभाषेतील लेखन उपयुक्त ठरले, तर राजकीय कृतीसाठी विविध प्रदेशांत समन्वर वाढविण्यात इंग्रजी भाषेने महत्त्वाची भूमिका निभावली. समाजशास्त्रज्ञ वा राजकीय कार्यकर्ते यांचे द्वैभाषकत्व हे प्रामुख्याने इंग्रजी आणि मातृभाषा असे असले, तरी सर्जनशील लेखकांची विभागणी नेहमीच इंग्रजी आणि इतर भाषा अशी नव्हती. कोकणी आणि मराठी, वा बंगाली आणि मैथिली अशा दोन वेगवेगळ्या भारतीय भाषांत लिहिणाऱ्या सर्जनशील लेखकांची संख्या लक्षणीय होती.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4900/Smart-Nirnay-Kase-ghyawe

...............................................................................................................................................................

४.

साधारणत: १९२०च्या दशकापासून १९७०च्या दशकापर्यंतच्या काळात भारतातील बौद्धिक विश्व हे द्वैभाषक होते. काही अपवाद वगळता, बहुसंख्य महत्त्वाचे राजकीय विचारवंत, अभ्यासक, सर्जनशील लेखक आणि इतरही अनेक किमान दोन भाषांत विचार करीत, बोलत आणि लिहीत. त्यापैकी एक मातृभाषा असे, तर दुसरी सामान्यत: (पण नेहमीच नव्हे) इंग्लिश असे. आता मात्र ही परिस्थिती उरलेली नाही, असे दिसते. भारतातील बौद्धिक आणि सर्जनशील विश्वाचे अधिकाधिक ध्रुवीकरण होते आहे- केवळ इंग्लिशमध्येच विचार, कृती आणि लेखन करणारे आणि केवळ मातृभाषेतच विचार, कृती आणि लेखन करणारे यांच्यात.

ही विभागणी दीर्घ काळ रोखून धरण्यात पश्चिम बंगाल यशस्वी झाले आहे, असे दिसते. किमान कोलकात्यात तरी द्वैभाषकत्व जपणारे अनेक बुद्धिजीवी आढळतात. टागोर यांच्यावरील बंगाली पुस्तकासाठी सन २००९मध्ये रणजित गुहा यांना प्रतिष्ठेचा ‘आनंद पुरस्कार’ देण्यात आला होता. योगायोग म्हणजे त्यांचा इंग्रजी निबंधांचा संग्रह त्याच आठवड्यात प्रकाशित झाला होता. रणजित गुहा हे ‘प्रवासी’ (अनिवासी) भारतीय आहेत. पण कोलकात्यात आजही वास्तव्याला असलेले सुप्रिया चौधरी, सुकांत चौधरी, पार्थ चॅटर्जी आणि स्वपन चक्रवर्ती हे सर्व इंग्लिश भाषेतून अभ्यासपूर्ण लेखनासाठी जगभर नावाजलेले आहेत. त्याच वेळी त्यांनी बंगालीतही तेवढेच सकस लेखन केले आहे. या सर्वांनी पन्नाशी ओलांडली आहे, मात्र जग आणि स्थानिक परिसर या दोघांच्याही भाषांत सारख्याच अधिकाराने वावरणारे तिशीतील आणि चाळिशीतील बंगाली अभ्यासकही अनेक आहेत, असे मला सांगण्यात आले आहे.

विद्यापीठे आणि माध्येमे यांच्यात वावरताना, अशा अनेक द्वैभाषक बुद्धिजीवींशी माझा परिचय झाला. तनिका आणि सुमीत सरकार, कल्पना आणि प्रणब बर्धन, मीनाक्षी आणि सुजीत मुखर्जी ही बंगाली जोडपी; कुमार केतकर, माधव गाडगीळ, दिलीप चित्रे, राजेंद्र व्होरा हे मराठी; शाहीद अमीन आणि कृष्णकुमार हे हिंदी; गिरीश कार्नाड आणि डी. आर. नागराज हे कन्नड; सी. व्ही. सुब्बाराव हे तेलुगु; जतीन कुमार नायक हे उडिया आणि एन. ए. जगन्नाथन हे तामिळ, हे त्यांपैकी काही. या सर्वांनी माझ्यासारखेच इंग्रजीत विपुल लेखन केले आहे, मात्र त्यांनी अन्य भाषेतही महत्त्वाचे योगदान दिले आहे, जे मी दिलेले नाही. गेली अनेक दशके असंख्य वेळा त्यांच्याशी माझे संभाषण झाले आहे. गांधी आणि टागोर यांच्याविषयी त्यांच्या वाचकांची जी भावना होती, तीच माझी त्यांच्याविषयी आहे. मला ज्या भाषांचा गंध नाही, त्यांवरील त्यांच्या अधिकारातून त्यांना प्राप्त झालेल्या ज्ञानाचा आणि आकलनाचा एक कृतज्ञ ज्ञानार्थी.

वर नमूद केलेल्या सर्व व्यक्ती ५०हून अधिक वर्षांपूर्वी जन्मलेल्या आहेत. तरुण पिढीकडे वळायचे, तर निदान बंगालबाहेर तरी द्वैभाषक बुद्धिजीवी तुरळक आहेत. चाळिशीतील अभ्यासकांचा विचार करता, माझ्या नजरेसमोर तीनच नावे येतात- ए. आर. व्यंकटचलपथी, त्रिदीप सुहृद आणि योगेंद्र यादव. तिघांनीही स्वतंत्रपणे त्यांच्या मातृभाषेतील (म्हणजे अनुक्रमे, तामिळ, गुजराती आणि हिंदी) आणि इंग्रजीतील लिखाणाने मान्यता मिळविली आहे. चौथे नाव अरूपज्योती सैकिया या तरुण इतिहासकाराचे घेता येईल. ते आसामी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांत लिहितात.

ते काहीही असले, तरी पिढ्यांबरोबर ही तफावत वाढते आहे, ही वस्तुस्थिती आहे. सदानंद मोरे यांचे उदाहरण घेऊ. कवी संत तुकाराम यांच्या कार्याचा विश्लेषणात्मक इतिहास आणि पश्चिम भारतातील राजकारणात टिळक ते गांधी असे झालेले परिवर्तन यांचा अभ्यास हे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. पुण्यातील अनेक भेटींत माझ्या लक्षात आले, की त्यांची पुस्तके आणि वृत्तपत्रीय स्तंभलेखन यांमुळे महाराष्ट्रात त्यांना मोठी वैचारिक मान्यता आहे. त्यांनी इंग्लिशमध्ये लेखन केले असते, तर विषयवैविध्य आणि चिंतनशीलता पाहता ते महाराष्ट्राचे पार्थ चतर्जी म्हणून ओळखले गेले असते.

एखादी भाषा बोलता येणे आणि तिची सखोल जाणकारी असणे यात फरक केला पाहिजे. काही व्यवहारापुरते द्वैभाषक असतात, तर इतर काही बौद्धिक आणि भावनिक स्तरावरही द्वैभाषक असतात. माझ्या संशोधनासाठी मी हिंदी पत्रे, वृत्तपत्रांतील वृत्तान्त चाळतो, त्यातून तथ्ये तसेच भाष्ये गोळा करतो. मात्र आनंदासाठी मी हिंदीतील पुस्तके वाचत नाही, ना दर्जेदार नियतकालिकांत मी हिंदीतून लेखन करू शकतो. या बाबतीत मी माझ्या वयाच्या वा त्याहून तरुण अशा समाजशास्त्रज्ञांचे प्रतिनिधित्व करतो. तेही संशोधनस्त्रोत म्हणून भारतीय भाषांतील लेखन वापरू शकत असतील, मात्र निर्मलकुमार बोस वा इरावती कर्वे यांच्याप्रमाणे मातृभाषेत अभ्यासपूर्ण प्रबंधवजा लेखन करू शकत नाहीत. आमच्याकडे विशाल वैश्विक दृष्टी असली, तरी ती ढोबळ अर्थाने. जगाची उत्तम जाण आहे, पण स्थानिक परिसराची अत्यल्प किंवा शून्य.

त्याच वेळी, भाषिक पटाच्या दुसऱ्या टोकाला असे अनेक तामिळ, हिंदी, कन्नड, उडिया, गुजराती इ. भाषांतील अनेक (वा कदाचित बहुसंख्य) सर्वोत्तम कवी वा लेखक आहेत, जे अभिव्यक्तीसाठी केवळ एकच भाषा पसंत करतात. त्यांचा अधिक भर त्या भाषेतील साहित्य वाचनावरच असतो. पाश्चात्य साहित्य आणि सामाजिक सिद्धान्त यांचा जसा सखोल परिचय आधीच्या पिढीतील यु. आर. अनंतमूर्ती यांच्यासारख्या लेखकाला होता, तसा तरुण पिढीतील एकाही कन्नड कादंबरीकाराला नाही. मी ज्या हिंदी लेखकांना भेटतो, त्यांची मुळे त्यांच्या भवतालात घट्ट रुजलेली आहेत; मात्र बाह्य जगाविषयी निर्मल वर्मा यांना जसे कुतूहल होते, ज्ञान होते, ती उर्मी त्यांत अपवादानेच दिसते.

या पुराव्यांना व्यक्तिगत अनुभवाचा आधार आहे, तरीही खऱ्या अर्थाने द्वैभाषक विद्वान, तसेच लेखक यांची संख्या आणि दृश्यमानता घटते आहे, या माझ्या निष्कर्षाशी बहुसंख्य निरीक्षक सहमत होतील. द्वैभाषक राजकारणी, हा तिसरा वर्ग आता जवळपास अस्तंगत व्हायच्या मार्गावर आहे. माझ्या मते, कल्पक चिंतनशीलता असलेले शेवटचे सक्रिय राजकारणी जयप्रकाश नारायण होते. अर्थात त्यांनी विचार, कृती आणि लेखन हिंदी तसेच इंग्रजी या दोन्ही भाषांत केले. (थोडे सढळ मापन करणारे, मणिशंकर अय्यर आणि अरुण शौरी यांची नावे सुचवितील. मात्र त्यांचे लेखन मुख्यत: इंग्लिशमध्येच आहे.)

द्वैभाषक संस्कृती काही प्रमाणात जपली आहे ती नाट्यक्षेत्राने. नामवंत नाटककार आणि नाट्यदिग्दर्शक अरुंधती नाग, के. व्ही. अक्षरा आणि सुधन्वा देशपांडे हे कानडी, मराठी वा हिंदी यांबरोबरच इंग्लिश नाट्यव्यवहारातही सहजतेने वावरतात. या सर्व उपखंडात एका भाषेत लिहिलेली नाटके नियमितपणे अन्य भाषांत रूपांतरित करून केली जातात. बहुभाषक नाट्यकलाकारांत नसीरुद्दिन शाह हे नाव सर्वपरिचित आहे. मात्र असे अनेक आहेत आणि त्यात विशीतील व तिशीतील कलाकारांचा समावेश आहे.

भारतीय नाट्यव्यवहारातील बहुभाषकत्वाची एक आठवण. एकदा गिरीश कर्नाड या नाटककाराबरोबर मी विमानाने प्रवास करीत होतो. पूर्ण वेळ मी इंग्रजीतील एक पुस्तक वाचत होतो. कर्नाड यांची जागा काही रांगा पुढे होती. ते मुद्रिते तपासत होते. विमान हवेत स्थिरावल्यावर मी त्यांच्याजवळ गेलो. कर्नाड कानडीत त्यांची नाटके लिहितात आणि स्वत:च ती इंग्लिशमध्ये भाषांतरितही करतात, हे मला माहीत होते. मात्र त्या दिवशी ते त्यांच्या नाटकाचे मराठी भाषांतर तपासून पाहत होते. कानडी आणि इंग्रजी इतकेच त्यांचे मराठीवर प्रभुत्व आहे, मात्र ज्या भाषेत ते वाढले, त्या कोकणीतून बोलणे त्यांना अधिक भावते, असे ते सांगतात.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4902/anartha

...............................................................................................................................................................

५.

भारतातील बुद्धिजीवींमध्ये अजूनही बऱ्याच प्रमाणात द्वैभाषकत्व आहे, पण ते कामचलाऊ. एकेकाळी सार्वत्रिक असलेले बौद्धिक वा भावनिक द्वैभाषकत्व आता काही भागांत आणि तेही वृद्ध स्त्री-पुरुषांतच आढळते. यामागील कारणे कोणती? मुख्य कारण, १९५६ साली झालेली भाषावार प्रांतरचना. ऐतिहासिक आणि तुलनात्मक दृष्टीने पाहिले, तर भाषावार प्रांतरचनेमुळे देशाचे ऐक्य दृढ होण्यास साह्य झाले, यांत शंका नाही. भाषेनुसार राज्यांची फेररचना केली नसती आणि सर्व देशावर हिंदी लादली असती, तर अविभक्त पाकिस्तानच्या वा श्रीलंकेच्या मार्गाने आपणही गेलो असतो.

सर्व बाजू विचारात घेता, भाषिक राज्ये हे योग्य धोरण होते. बौद्धिक व्यवहारांपुरतेच बोलायचे, तरी त्यामुळे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम झाले. शालेय साखळीचा विस्तार आणि वंचित वर्गांचा राजकीय व्यवस्थेतील वाढता सहभाग, यामुळे बुद्धिजीवी वर्गाचा सामाजिक पाया खूपच विस्तारला आहे. एकेकाळी साहित्य आणि विद्वत्ता ही ब्राह्मण, बनिया, कायस्थ आणि उच्चवर्गीय मुस्लीम यांची मक्तेदारी होती. मात्र १९५०च्या दशकापासून दलित आणि इतर मागास वर्गही शिक्षणाच्या प्रवाहात दाखल झाले. त्यांतील अनेक प्राध्यापक आणि लेखक म्हणून नावारूपाला आले. अर्धशतकापूर्वी जवळपास बंद असलेल्या क्षेत्रांची दारे या वर्गासाठी खुली झाली.

बहुतेक राज्यांतील सरकारी शाळांत शिक्षणाचे माध्यम हे त्या त्या राज्यांची अधिकृत भाषा हेच होते. इंग्रजी शिक्षणाला त्यांत अल्प वाव होता. गुजराती शाळांतून १९५०च्या दशकांत इंग्रजी भाषा वगळण्यात आली, तर पश्चिम बंगालमधील शाळांतून १९७०च्या दशकात. हा बदल अनुक्रमे मोरारजी देसाई आणि ज्योती बसू व अशोक मित्र यांच्या आग्रहापायी झाला होता. या तिन्ही नेत्रांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते, हे वेगळे! संकुचित आणि विशिष्ट धर्म, वंश इ. बाबतची पूर्वग्रहदूषित दृष्टी वाढल्याच्या परिणामी विशिष्ट गुजराती राजकीय नेत्याचा उदय झाला, त्याचे मूळ इंग्रजी भाषा वगळण्याच्या या निर्णयात आहे, असा जो युक्तिवाद केला जातो, त्यात अजिबात तथ्य नाही, असे नाही. एका विशाल मनाच्या गुजराती राजकीय नेत्यानेच म्हटल्याप्रमाणे, इंग्रजीमुळे अनेक देशांची संस्कृती पश्चिम भारताच्या किनारपट्टीवरील या प्रदेशात खुलेपणाने वाहण्यास मदत झाली असती. त्याचप्रमाणे, विज्ञान आणि विद्वत्तेचे केंद्र म्हणून प. बंगालचा झालेला ऱ्हास हाही राज्यातील शाळांत इंग्रजी शिक्षणाला केलेल्या बंदीचे कटू फळ असू शकते.

१९६० आणि ७०च्या दशकांत कनिष्ठ वर्गातून मोठ्या प्रमाणात अभ्यासक आणि लेखक मध्यवर्ती प्रवाहात येऊन दाखल होऊ लागले असतानाच, अभिजन वर्गाने केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वळायला सुरुवात केली होती. मी ज्या उत्तर भारतातील इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकलो, तेथे हिंदी वर्ज्य होती. व्याकरणदृष्ट्या चुकीचे, हिंदी शैलीत इंग्रजी बोलणाऱ्या विद्यार्थ्याला सर्वाधिक त्रास दिला जात असे. देशभरातील इतर शहरे आणि महानगरे यांचा अनुभव वेगळा नव्हता. एकेकाळी संस्कृत आणि स्थानिक भाषा यांना शिक्षणात महत्त्वाचे स्थान देणाऱ्या सरकारी शाळांत एकेकाळी शिकलेले उच्चवर्णीय पालक आता त्यांच्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये वा पब्लिक स्कूलमध्ये टाकू लागले. तेथे इंग्रजी हे संवादाचे माध्यम होते आणि हिंदी वा स्थानिक भाषा यांना अभ्यासक्रमात दुय्यम, किरकोळ वा तुच्छतेचे स्थान होते.

वसाहतोत्तर काळात इंग्लिश ही उच्च दर्जा आणि प्रतिष्ठा यांच्याशी निगडित भाषा होती. आर्थिक उदारीकरणानंतर म्हणजे १९९१नंतर ती आर्थिक आणि भौतिक प्रगतीची भाषा झाली. शहरी भागांतील आंतरजातीय तसेच आंतरसमाज विवाहांचाही इंग्रजीच्या वाढीत मोठा वाटा होता. उदाहरणार्थ, तामिळभाषक मुलगी इंग्रजी ही संवादाची मुख्य भाषा असलेल्या कार्यालयातील बंगालीभाषक मुलाच्या प्रेमात पडली आणि दोघांनी विवाह केला, तर त्यांच्या घरात प्राधान्राने इंग्रजीचाच वापर होणार, त्यांच्या मुलांचीही तीच पहिली आणि बहुधा एकमेव भाषा होणार. आजवर अशांची संख्या हजारोंत पोचली असणार. अशा व्यावसायिक जागी जमलेल्या जोड्यांनी देशातील अनेक उल्लेखनीय अभ्यासक तसेच लेखक यांना जन्म दिला आहे आणि पुढेही देणार आहेत.

कसबा आणि महानगर यांच्यातील वाढती सांस्कृतिक तसेच भौगोलिक दरी त्यांच्या चर्चाविश्वाच्या विभागणीतून प्रत्ययाला येते. प्रामुख्याने स्थानिक भाषेत कार्यरत असलेले विचारवंत आणि लेखक हे छोट्या शहरांचे वैशिष्ट्य झाले आहे, उलट महानगरांतील उच्चभ्रू शिक्षणसंस्थांतील प्राध्यापक आणि विद्यार्थी केवळ इंग्रजीतच व्यक्त होऊ शकतात. सांस्कृतिक आणि भाषिकदृष्ट्या धारवाडचे कर्नाटक कॉलेज आणि बेंगळुरूतील ख्रिस्त कॉलेज यांत जसा जमीन-अस्मानाचा फरक आहे, तसाच डेहराडूनच्या डी. ए. व्ही. कॉलेज आणि दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेज यांत आहे.

भारतीर भाषांतील अनेक लेखकांच्या स्थितीचे वर्णन यु. आर. अनंतमूर्ती ‘व्हर्नाक्युलर अँग्झिटी’ (लोकभाषक अस्वस्थता) असे करतात. केवळ इंग्लिशमध्ये लिहिणाऱ्यांमध्येही त्याच स्वरूपाची ‘कॉस्मोपोलिटन अस्वस्थता’ असू शकते. काही वेळा ती उद्धटपणाचे रूप घेते (उदाहरणार्थ, सलमान रश्दी आणि भारताविषयीचे सर्वोत्तम साहित्य इंग्रजीत लिहिले गेले आहे, हा त्यांचा दावा.), तर कधी बचावात्मक पावित्र्याचे.

बौद्धिक द्वैभाषकत्वाचा ऱ्हास होत असताना, कामचलाऊ द्वैभाषकत्वात मात्र सार्वत्रिक वाढ होताना दिसून येत आहे. पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात लोक आता एकापेक्षा अधिक भाषांत बोलू लागले आहेत. शेत आणि गाव हे जग अस्सल एकभाषक आहे, तर कार्यालये आणि कारखाने यांचे जग निर्विवादपणे तसे नाही. घरी आपापल्या भाषा बोलणाऱ्या लक्षावधींना औद्योगिकीकरणाने आणि शहरीकरणाने एकत्र आणले आहे. शहरात आलेल्या स्थलांतरितांच्या मातृभाषेपेक्षा त्यांच्या कामाच्या ठिकाणची भाषा बहुतेकदा वेगळी असते. कोलकात्यात कामासाठी आलेल्या मजुराला- मोडकीतोडकी का होईना, बंगाली बोलावीच लागते; त्याचप्रमाणे बेंगळुरूमधील सार्वजनिक क्षेत्रात नोकरीसाठी आलेल्या मल्याळी कर्मचाऱ्याला कन्नड.

दरम्यान, हिंदी आणि इंग्लिश या देशभर संपर्काच्या आणि संभाषणाच्या भाषा बनल्या आहेत. हिंदीच्या प्रसाराचे सरकारी प्रयत्न दक्षिण आणि पूर्व भारतात अपयशी ठरले असले, तरी चित्रवाणी व चित्रपट या अधिक अनौपचारिक आणि अधिक स्वीकारार्ह माध्यमांतून हिंदी देशभर पोचली आहे. बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद आणि आता कोलकाता येथेही भिन्नभाषक परस्परांशी हिंदी हेच संवादाचे माध्यम म्हणून वापरू लागले आहेत. इंग्रजीची वाढ ही गरजेपोटी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची आणि त्यात सहभागी असलेल्या उद्योगांची व व्यवसायांची ती भाषा आहे. भरपूर मोबदला आणि प्रतिष्ठा देणाऱ्या नोकऱ्यांसाठी इंग्रजीचे ज्ञान आवश्यक असल्यामुळे, ती भाषा शिकण्यास एवढी प्रेरणा पुरेशी ठरली आहे.

परिणामी, बुद्धिजीवींचे वर्तुळ एकाच भाषेपुरती मर्यादित झाले असताना, उपजीविकेसाठी नोकऱ्या, व्यापार व व्यवसाय यांसारख्या क्षेत्रांत राबणारे लक्षावधी भारतीय त्यांच्या मातृभाषेव्यतिरिक्त इतर भाषाही अवगत करू लागले आहेत.

६.

टागोर यांचा रोष ओढवून घेणाऱ्या इंग्लिशविरोधी निबंधांत गांधी यांनी ‘पण-परंतु’च्या स्वरूपात अनेक बचावात्मक पवित्रेही घेतले होते. ‘इंग्रजी शिक्षणाच्या अतिरेकाच्या मी विरोधात आहे, इंग्रजी शिक्षणाच्या नव्हे,’ असे नमूद करून गांधींनी लिहिले होते : ‘हिंदुस्तानी आणि संस्कृत या भाषा अवगत नसल्यामुळे मी ज्ञानाचा किती मोठा खजिना गमावला आहे, याची मला कल्पना आहे.’ गांधींच्या या भावनेशी सहमत होतानाच, त्यांच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी हेही मान्य करायला हवे, की इंग्रजीविरोधाचा अतिरेकही सारखाच धोकादायक आहे. प. बंगालने इंग्रजीवर बंदी घालून, लाखो शालेय विद्यार्थ्यांना व्यापक शिक्षणाच्या संधीपासून वंचित ठेवले. केवळ मातृभाषेतच शिक्षण द्यावे, अशी मागणी करणाऱ्या कन्नड लेखकांना दलितांचे उत्तर असते : आधी संस्कृत शिक्षणापासून आम्हाला वंचित ठेवलेत आणि आता इंग्रजी शिक्षणापासून दूर ठेवू पाहत आहात.

समकालीन भारतात द्वैभाषक बुद्धिजीवींचे प्रमाण घटण्यास अनेक घटक एकत्रितपणे कारणीभूत आहेत. केवळ मातृभाषेवर भर देणारे सार्वजनिक धोरण, मातृभाषेला नकार देणारा वा तिचे महत्त्व नगण्य करणारा अभिजन प्राधान्यकम, आंतरभाषक विवाहासारखे सामाजिक बदल आणि इंग्रजीतील कौशल्यामुळे भौतिक लाभ वाढविणारा आर्थिक बदल, हे ते घटक होत.

माझा युक्तिवाद काळाच्या बाबतीत विसावे शतक आणि स्थळाच्या बाबतीत माझा देश यांपुरताच मर्यादित आहे. गतकाळातील बौद्धिक चर्चाविश्वाच्या बहुभाषक स्वरूपाविषयी, वसाहतपूर्व भारताच्या इतिहासातील जाणकारांकडे अधिक रोचक आणि महत्त्वाची माहिती असू शकते. समकालीन युरोपच्या ढोबळ परिचयाच्या आधारे मी असे सुचवतो, की त्या खंडातील बुद्धिजीवींची वाटचाल आपल्या बुद्धिजीवींच्या तुलनेत नेमकी उलट आहे. एकेकाळी ते केवळ त्यांच्या राष्ट्राची ओळख असलेल्या भाषेतच बव्हंशी व्रवहार करीत. म्हणजे फ्रेंच फ्रेंचमध्ये, स्पॅनिश स्पॅनिशमध्ये इ. मात्र आता युरोपीयन युनियनची स्थापना आणि इंग्लिशचा जागतिक भाषा म्हणून झालेला विस्तार यांची दखल घेत, फ्रेंच, स्पॅनिश आणि जर्मन बुद्धिजीवींनी इंग्लिशला असलेला विरोध बासनात बांधून ठेवला, मात्र स्वभाषेची जबाबदारी न नाकारता. सध्याचे सर्वोत्तम वा यशस्वी फ्रेंच विचारवंत स्वभाषेबरोबरच इंग्रजीतही आपले निबंध वा पुस्तके यांचे लेखन करू लागले आहेत. अन्य युरोपीय देशांतील विद्वानांनी पुढची पायरी गाठली आहे. जे. मार्टिनेझ-अलायर हे नामवंत परिसर तत्त्वज्ञ. जागतिक वाचकांसाठी ते इंग्लिशमध्ये लिहितात, देशवासीयांसाठी स्पॅनिशमधून आणि त्यांच्या प्रांतातील वाचकांसाठी कॅटलान भाषेतून.

सर्वोत्तम प्रकारच्या द्वैभाषकत्वाच्या अनपेक्षित यशाच्या दोन कहाण्यांनी या निबंधाचा समारोप मी करणार आहे. एच. वाय. शारदाप्रसाद यांचे २००९ साली निधन झाले, तेव्हा ‘आउटलुक’ नियतकालिकातील एका बातमीदाराने अशी तक्रार केली होती की, नवी दिल्लीतील वास्तव्य काळात अनेक पंतप्रधानांच्या विश्वासाचा आणि आदराचा विषय झालेल्या शारदा प्रसाद यांनी एकाही कन्नडिगासाठी कधी शब्द टाकला नाही. या पत्रलेखकाचा प्रादेशिकवाद आजच्या काळाचे वैशिष्ट्य आहे. शारदा प्रसाद यांनी शिवराम कारंथ यांच्या कादंबऱ्यांचे इंग्रजीत भाषांतर करून कन्नड भाषा आणि कानडी लोक यांच्यासाठी महत्त्वाचे काम केले आहे. एखाद्या कन्नडिगाला इंदिरा गांधींच्या भेटीसाठी दहा मिनिटांची वेळ मिळवून देणे वा प्राधान्याने गॅसजोडणी मिळवून देणे, यांपेक्षा हे अधिक मोठे योगदान आहे, याची जाणीव पत्रलेखकाला नाही.

कन्नड, तामिळ, तेलुगु आणि इंग्लिश या चार भाषा शारदा प्रसाद उत्तम बोलत असत. शिवाय संस्कृत आणि हिंदी त्यांना समजत असे. बहुभाषकत्वाचे माझ्या परिचयातील दुसरे आदर्श उदाहरण, लेखक आणि लोकसेवक गोपालकृष्ण गांधी यांचे. विक्रम सेठ यांच्या ‘अ सुटेबल बॉय’ या कादंबरीचे त्यांनी हिंदी भाषांतर केले आहे. इंग्लिशमध्ये त्यांनी स्वत:चे ग्रंथलेखन केले आहे. मात्र ते अस्खलितपणे वाचू, लिहू आणि बोलू शकतात अशा भाषांपैकी या केवळ दोन. ते १७ वर्षांचे असताना मनू गांधी यांच्या गुजरातीतील आठवणींचे त्यांनी इंग्रजीत रूपांतर केले होते, असे मला सांगण्यात आले होते. ही त्यांची पहिली साहित्यकृती. ते तामिळ भाषेतही बोलू शकतात, कारण ती त्यांच्या आईची भाषा होती. अलीकडेच त्यांनी बंगाली भाषेचेही पुरेसे ज्ञान मिळविले आहे.

त्यांचे यश कितीही मोठे असले, तरी भारतीय बुद्धिजीवींमध्ये गोपाल गांधी यांची पहिली ओळख ही तत्त्वज्ञ रामचंद्र (रामू) गांधी यांचे धाकटे भाऊ हीच राहणार. अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे रामू गांधी हे लेखक असले, तरी वक्ता म्हणून ते सर्वांत वरचढ होते. त्यांच्याइतके प्रभावी वक्तृत्व मी अनुभवलेले नाही. अनेक जण याला दुजोरा देतील. हिंदीतील आणि इंग्रजीतील त्यांच्या व्याख्यानांनी भारावलेले अनेक विद्यार्थी राजस्थान, दिल्ली, हैदराबाद आणि शांतिनिकेतन विद्यापीठांत आढळतील. अध्यापनाच्या क्षेत्रातून निवृत्ती घेतल्यानंतर ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ हे त्यांचे कार्यक्षेत्र राहिले. त्याच्या सभागृहात अधूनमधून त्यांची व्याख्याने होत आणि लाऊंजमध्ये वा बारमध्ये नियमितपणे.

रामू गांधी हे महात्मा गांधींच्या धाकट्या मुलाचे पुत्र. त्यांची आई राजगोपालाचारी यांची मुलगी होती. १९५०च्या दशकात रामू विद्यापीठात शिकत असताना, राजाजी यांनी काही काळ राजकारण संन्यास घेतला आणि रामायण तसेच महाभारत यांचे आधुनिक दृष्टीतून अर्थ लावणारे लेखन केले. हे लेखन त्यांनी प्रथम तामिळ या त्यांच्या मातृभाषेतून केले आणि नंतर त्यांचे इंग्रजीत भाषांतर केले.

या महाकाव्यांचे आधुनिक स्वरूप इतके लोकप्रिय झाले, की इतर भाषांतही ती उपलब्ध व्हावीत, अशी मागणी होऊ लागली. राजाजींची कन्या लक्ष्मी देवदास गांधी यांनी हिंदी भाषांतराची जबाबदारी घेतली. दिल्लीतील दीर्घ वास्तव्यात त्यांनी हिंदीवर प्रभुत्व मिळविले होते. हिंदी आवृत्ती अल्पावधीत लोकप्रिय झाली. १९६०च्या आणि ७०च्या दशकांत भाषांतराच्या प्रतींना सातत्याने मागणी होती. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस लक्ष्मी गांधी यांनी मृत्युपत्र करण्याचे ठरविले, मात्र नि:संग पित्याची कन्या आणि तशाच सासऱ्याची सून असल्याने, त्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नव्हती.

अपवाद केवळ भाषांतरित महाकाव्यांच्या स्वामित्वधनाचा. ते कुणाला द्यावे? लक्ष्मी यांना तीन मुलगे होते. एक राजमोहन गांधी. त्या वेळी ते पत्रकार आणि अनेक लोकप्रिय चरित्रग्रंथांचे लेखक होते. त्यांच्या आर्थिक सुदृढतेची काळजी घेण्यास त्यांचे प्रकाशक सक्षम होते. धाकटा मुलगा गोपाल तेव्हा सनदी सेवेत होता. कालांतराने महागाईशी निगडित सरकारी पेन्शन त्यांना मिळणारच होते. उरला मधला मुलगा रामू. स्वप्नाळू तत्त्वज्ञ. त्याने सहा नोकऱ्या सोडल्या होत्या आणि आणखी सहा स्वीकारण्यास नकार दिला होता.

साहजिकच त्यांनी स्वामित्वधन रामूच्या नावे केले. आईच्या १९८३ साली झालेल्या मृत्युनंतर दर वर्षी काही हजार रुपयांचा चेक रामूंना स्वामित्वधनापोटी मिळू लागला. त्यातून ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’मधील त्यांचा खर्च भागत असे. मुळात संस्कृतमधून तामिळमध्ये आणलेल्या आणि नंतर हिंदीत भाषांतरित झालेल्या महाकाव्यांनी एका मूलगामी चिंतनशील व्यक्तीच्या उदरनिर्वाहाची आणि चिंतनाची काळजी वाहिली.

ही कदाचित आख्यायिकाही असेल, पण ती सत्य असायला हवी; कारण साहित्यिक द्वैभाषकत्वातील माधुर्य आणि क्षमता यांचा ती वस्तुपाठ आहे. येथे ते वडील, मुलगी आणि नातू अशा तीन पिढ्यांनी आचरणात आणले आहे.

...............................................................................................................................................................

‘देशभक्त आणि अंधभक्त’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4874/Deshbhakt-ani-andhbhakt

...............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......