‘बाबो’ हा सिनेमा पूर्णपणे मनोरंजन करणारा आहे!
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘बाबो’चं पोस्टर
  • Sat , 01 June 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie बाबो BaBo सयाजी शिंदे Sayaji Shinde भारत गणेशपुरे Bharat Ganeshpure किशोर कदम Kishore Kadam

विनोदी अंगानं बहरत जाणारं मनोरंजन आणि त्याला दिलेली हलकीशी वास्तवाची जोड हा ‘कॉम्बिनेशन’चा धमाका सिनेमात क्वचितच पाहायला मिळतो. त्यात सिनेमाची कथा मर्यादित अर्थानं सृजनाची भाषा आखत असेल तर कलेचा मनसोक्त आनंद घेता येतो. या तिन्हीचं अचूक मिश्रण म्हणजे रमेश चौधरी दिग्दर्शित ‘बाबो’ हा सिनेमा.

‘बाबो’ हा बोली भाषेतील शब्द. अनपेक्षित घटना घडल्यानंतर तोंडातून जो शब्द बाहेर पडतो, तोच हा ‘बाबो’! सिनेमाचं नाव लक्षवेधक असलं की, प्रेक्षकांचं लक्ष वेधलं जातं, असं साधं गणित लक्षात घेऊन हे नावं दिलं असावं.

याची कथा एका गावात घडते. कुस बुद्रुक हे या गावाचं नाव. या गावातील राजकारण हा सिनेमाचा विषय. (यापेक्षा जास्त सिनेमाची कथा सांगणं योग्य ठरणार नाही) गावगाड्यात चालणारे हेवेदावे, व्यक्तिपरत्वे बदलत जाणारी मानसिकता, त्यात स्वतःची प्रतिमा टिकून ठेवण्यासाठी चाललेली प्रत्येकाची धडपड, एकमेकांविरुद्ध आखलेले डावपेच, नव्या पिढीची स्वप्नं आणि सुमधुर प्रेमाची भाषा यांचा मिलाफ विनोदी पद्धतीनं पाहायला मिळतो.

एका अर्थानं स्त्री-पुरुष यांच्यातला भेदभाव न जुमानणारा हा विनोदी सिनेमा आहे. कमी-अधिक प्रमाणात कथा परिचयाची वाटली तरी तिची विनोदी पद्धतीनं केलेली मांडणी सिनेमाला उंचीवर घेऊन जाते. त्यामुळे शेवटपर्यंत उत्सुकता कमी होत नाही.

कथेतल्या छोट्या-छोट्या गोष्टींवर अचूक बोट ठेवल्यामुळे ती बोजड वाटत नाही. कथेतील निरीक्षणं नोंदवत असताना दिग्दर्शक ठाम निष्कर्षापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे कथा एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांना सामावून घेते. यामागची पटकथा लेखक अरविंद जगताप यांची मेहनत दिसून येते. पटकथेला लवचीक ठेवण्यात आलेलं यश हे सिनेमाला पूरक ठरलं आहे. विनोदासोबतच ग्रामीण भागातील माणसांची वेगवेगळी स्वभाव वैशिष्ट्यं दिग्दर्शकानं कौशल्यानं टिपली आहेत.

पूर्वार्ध पात्राच्या व्यक्तिगत पातळीवर विनोदानं भरलेला आहे, तर उत्तरार्ध सार्वजनिक पातळीवर तितक्याच गंमतीजमतीनं भरून राहतो. कथेतील चढउतार सिनेमातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला उजेडात आणतो. त्यामुळे कथा विविध स्वभावांभोवती फिरत नात्यातले चढउतार दाखवते. लयबद्ध पद्धतीने चालणारी कथा आणि त्याला मांडणीची जोड ही सिनेमाची महत्त्वाची बाजू आहे.

संवाद कथेला नेमकेपणानं प्रेक्षकांपर्यंत पोहचवतात. सर्वसाधारण भारतीय सिनेमात विनोदी अंगानं जाणाऱ्या द्वयअर्थी संवादाच्या माध्यमातून विनोद करण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रयत्न या सिनेमातदेखील केला आहे. मात्र तारतम्यानं हे संवाद येतात. त्यामुळे विनोद भडक होत नाही.

अभिनयाच्या बाबतीतही सिनेमा सरस आहे. पटकथा, संगीत, तांत्रिक बाबी, फ्रेम यांबाबतीत सिनेमा चांगलाच प्रभावी ठरतो. सिनेमाला सयाजी शिंदे, किशोर कदम, भारत गणेशपुरे, किशोर चौगुले यांच्या दर्जेदार अभिनयानं गती दिली आहे. सिनेमाचा गाभा विनोद असल्यानं त्यातला निखळपणा विविध बाजूंनी मनोरंजक ठरतो.

यातली प्रत्येक व्यक्तिरेखा ही समाजातल्या वेगवेगळ्या प्रवृत्तीला अधोरेखित करते. त्यांची जीवनशैली आणि स्वभावगुण यांच्यावर बोट ठेवते. त्यामुळे सिनेमाला वास्तवाचा स्पर्श जाणवतो. ग्रामीण पार्श्वभूमी असलेली प्रत्येक व्यक्तिरेखा सिनेमाला आशयपूर्ण बनवते.

थोडक्यात ‘बाबो’ मनोरंजन हा उद्देश पूर्ण करणारा सिनेमा आहे. त्यातला विनोद पारंपरिक विनोदाची चौकट ओलांडणारा आहे. 

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......