युवापिढी, नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि राजकारण वगैरे वगैरे
पडघम - देशकारण
सतीश देशपांडे
  • नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी
  • Mon , 27 May 2019
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi राहुल गांधी Rahul Gandhi युवा Youth काँग्रेस Congress भाजप BJP

युवक-युवतींनी राजकारणात यावं, युवा हे देशाचे आधारस्तंभ आहेत, युवापिढीच सत्ताबदल करू शकते… अशी विधानं नेहमी ऐकायला वाचायला मिळतात. ती सत्यदेखील आहेत; पण या सत्यामागे असणारं वास्तव काहीसं वेगळं असतं. नुकत्याच देशात मध्यवर्ती निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ समजल्या जाणाऱ्या या गटाला राजकीय पक्षांनी कसं हाताळलं, यावर एकदा नजर टाकली तर आपल्याला हे वास्तव दिसून येईल.

देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी एकतृतीयांश असणारा युवावर्ग राजकीय पक्षांच्या दृष्टीनं मतदार म्हणून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. राजीव गांधींनी घटनादुरुस्ती करून मतदानाचं वय २१ वरून १८ केल्यानं युवावर्गाला अधिकच महत्त्व प्राप्त झालं. केवळ याच नव्हे तर मागील; म्हणजे २०१४ च्या मध्यवर्ती निवडणुकीतही युवा वर्गानं बजावलेली भूमिका निर्णायक ठरली आहे. दोन्ही लोकसभा निवडणुकांचं निरीक्षण केलं तर असं दिसून येईल की, देशातील युवापिढी मोठ्या प्रमाणावर नरेंद्र मोदींच्या मागे उभी राहिली आहे. त्याच वेळी असंही दिसून येईल की, मोदींना वैचारिक विरोध करण्यात विरोधी पक्षाहून अधिक चांगली भूमिका बजावण्यात युवक-युवतीच पुढे होते. अर्थात मोदींना विरोध करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या पाठीशी राहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती आणि आहे.

आवाहनाला प्रतिसाद

जे मोदींच्या पाठीशी उभे राहिले, ज्यांनी आपलं पहिलंवहिलं मत मोदींना दिलं, त्या पिढीचं भावविश्व समजून घेतलं पाहिजे. ‘मोदींच्या पाठीशी’, ‘मोदींना मत दिलं’, हे शब्द मुद्दामहून वापरतो आहे. कारण या निवडणुकांना संसदीय नव्हे तर अध्यक्षीय निवडणुकीचं स्वरूप देण्यात मोदी यशस्वी ठरले आहेत. ‘कमळाला मत म्हणजे मला मत’ इथपासून ते ‘कमळाला मत म्हणजे देशाला मत’ असं भिनवून त्यांनी मी आणि देश म्हणजे एकच आहोत, असं पटवून देण्यात यश मिळवलं!

मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या युवकांच्या प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिक्रिया समजून घेतल्या. माढ्यातून मतदान करणारा राजेंद्र कावरे म्हणाला, “मोदींनी पाकिस्तानला कसा धाक दाखवला? असा नेता पाहिजे देशाला.” हा राजेंद्र प्रातिनिधिक आहे. मोदींच्या या प्रतिमेचं गारूड लाखो तरुणांवर आहे.

२०१४ ला मोदी सत्तेत यायचे होते, तेव्हाच असा प्रचार चालू होता की, ‘आता मोदी येणार आहेत, म्हणून पाकिस्तान आणि चीनदेखील घाबरला आहे.’ या वाक्यातील हास्यास्पदता आजही कायम आहे; पण मोदी म्हणजे प्रखर राष्ट्रवादी, ही प्रतिमा गडद आहे. मोदींच्या राष्ट्रवादाच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या तरुणांना असंही वाटत होतं की, ‘कमळाच्या समोरचं बटण दाबलं की, पाकिस्तानवर बॉम्ब टाकल्याचा अनुभव मिळतो.’ अशी वाक्यं मतदानाच्या दिवशी मुलांच्या व्हॉट्सअप स्टेटसला वाचायला मिळत होती.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4851/Paul-Allen---Idea-Man

...............................................................................................................................................................

आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या युवक-युवती तर वेगळ्या दुनियेत असतात. मोदी म्हणजेच विकास, मोदी म्हणजे धाडसी निर्णय, मोदी म्हणजे निर्भीडता, देशाचा विकास करायचा असेल तर मोदींनाच संधी दिली पाहिजे, वगैरे वगैरे... असं बहुतांश युवक-युवतींकडून ऐकायला मिळेल. त्यांच्या लेखी विरोधक म्हणजे, ज्या शब्दांत मोदी सांगतात अगदी तसे. राहुल गांधींचं नाव काढलं तरी यापैकी अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात. मोदी हे जणू मसिहा आहेत आणि तेच आपल्या देशाचे सर्वेसर्वा आहेत, असा समज युवा पिढीतील बहुतेकांचा आहे.

याची कारणं मोदींच्या शैलीत, त्यांच्या भाषणांत, त्यांच्या आयटीसेल्समधून जाणाऱ्या संदेशांत, त्यांच्या पक्षाचं आणि मातृसंघटनेचं जे संघटन आहे, त्या संघटनेच्या प्रयत्नांत शोधता येतील. चिकित्सा नावाचा प्रकारच इथं पाहायला मिळत नाही. बुद्धीला गंज चढतो म्हणजे नेमकं काय होतं, याचा प्रत्यय इथं येतील. मोदी म्हटलं की विषय संपला! उमेदवार कोण आहे, त्याचं कर्तृत्व काय आहे, याचं काडीचंही भान त्यांना दिसत नाही.

हा वर्ग थोडासा बरा म्हणावा लागेल. कारण यात त्यांचा काही दोष नाही, ते वाहवत गेले आहेत, त्यांच्या हातून अद्याप तरी हिंसक काही घडलं नाही. पण आंधळ्या धर्मभक्तीमुळे, व्यक्तिस्तोमामुळे ज्यांनी स्वत:चा विवेक हरवला आहे, ज्यांचे हात आदेशाबरहुकूम हिंसा करायला तयार असतात, अशा युवकांचा गंभीरपणे विचार करायला हवा. योगी अदित्यनाथ, स्वाध्वी पूजा पांडे, साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या मागे असणाऱ्या हिंदू युवावाहिनी, बजरंग दल, विहिप ते मनोहर भिडे यांच्या मागे असणाऱ्या धारकऱ्यांपर्यंतच्या युवकांनी राजकीय-सामाजिक वातावरण दूषित केलं आहे. या युवकांवर विकासाचं, राष्ट्रवादाचं नव्हे, तर धर्मरक्षणाचं मोठं गारूड आहे.

कोलकत्यात नुकतीच उसळलेली दंगल असो, अखलाखला मारणं असो, गोरक्षा असो, अशा अनेक प्रसंगांत ही युवकांची हिंसक झुंड पाहायला मिळते. याचा वापर अत्यंत विचारपूर्वक केलेला दिसून येतो. गरज असेल तेव्हा या झुंडीला कुरवाळायचं नि गरज संपली की, त्यांच्यापासून स्वत:चं नाव वेगळं करायचं. योगी अदित्यनाथ आता आपल्या हिंदू युवावाहिनीवर बंदी घालणार आहेत म्हणे!

युवा प्रतिनिधित्व

युवा पिढीचा राजकीय वापर ही नित्याचीच बाब आहे. कमी-अधिक प्रमाणात सर्वच पक्ष संघटना हे करत असतात. या पिढीचा नेतृत्व म्हणून पुढं आणण्यात कितपत विचार केला जातो, हे काही ताज्या उदारणांवरूनही दिसून येईल. ज्या मोदींच्या मागे इतक्या मोठ्या संख्येनं युवा पिढी उभी राहिली, त्या प्रमाणात त्यांनी युवा पिढीच्या प्रतिनिधित्वाचा विचार करायला हवा होता. पण तसा केलेला दिसत नाही. त्यांनी आणि त्यांच्या पक्षानं जात-धर्म ही समीकरणं समोर ठेवली आणि त्याभोवती युवकांना हवं तसं फिरवलं.

विरोधकांनीही युवा पिढीबाबत तितका गांभीर्यानं विचार केलेला दिसून येत नाही. राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य यांचा मुख्यमंत्री म्हणून विचार होईल असं वाटत होतं, पण युवा असलेल्या पक्ष नेतृत्वानं तसा विचार केला नाही. युवा पिढीला पुढं आणायचंय म्हणून खास प्रयत्न केल्याचंही दिसत नाही.

महाराष्ट्रात मावळमध्ये आम्ही युवा पिढीला प्रतिनिधित्व देत आहोत, म्हणणाऱ्या काँग्रेसनं नगर, माढ्यात मात्र हा विचार बाजूला ठेवला. ‘ज्याच्या त्याच्या नातवांचे, मुलांचे लाड ज्याने त्याने पुरवावेत’ असं विधानं करणं हे युवा पिढीला कितपत रूचेल याचा विचार जाणत्या राजानं करायला हवा होता. पार्थ केवळ युवा आहे, म्हणून युवा पिढी त्याच्या पाठीमागे उभी राहील, असा गैरसमज करून घेऊन स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतला. राज्याचा विचार करता माढा, हातकणंगले, नगर, औरंगाबाद, कोल्हापूर, मावळ, शिरूर, अमरावती इथं युवा मतदानाचा निकालावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडल्याचं दिसून येईल. यात ‘विजय’ म्हणून जर मोजमाप केलं तर मोदींच्याच बाजून मोठ्या प्रमाणावर कल असल्याचं दिसून येईल.

प्रादेशिक पक्षांना युवा मतदारांना आपल्या सोबत ठेवणं जमलं नाही. ईशान्य भारताचा तर असा इतिहास आहे की, विद्यार्थ्यांच्या संघटनांबरोबर एके काळी केंद्र सरकारला चर्चा कराव्या लागत होत्या. प्रादेशिक पक्षाच्या पाठीमागे युवा मोठ्या प्रमाणावर असल्याचं पाहायला मिळत होतं. आता हाच युवा प्रादेशिक पक्षांपासून दूर जाऊन केंद्रीय नेतृत्वाकडं म्हणजे मोदींकडं भाबड्या आशेनं पाहत आहे.

धोरणनिर्मितीत युवा सहभाग

याबाबत भाजपचा विचार न केलेलाच बरा. कारण त्यांचं धोरण म्हणजे मोदी आणि शहा जे ठरवतील ते! काँग्रेसमध्ये मात्र राहुल गांधींमुळे युवा पिढीचं थोडंतरी प्रतिबिंब असल्याचं दिसून येईल. यंदा महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनामा समितीत युवा सहभाग दिसून आला.

सुप्रिया सुळे वेगवेगळ्या मार्गांनी यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचं दिसून येईल. राज्यात युवा धोरण आखणं आणि राबवण्यातही त्यांनी भूमिका घेतली. शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आदित्य ठाकरेंचा सहभाग होता. पण आदित्य यांचं आकलनच इतकं तोकडं आहे की, ते राज्यभरातल्या युवकांना कसं समजून घेणार, हा प्रश्न पडतो.

विरोधी भूमिका मांडणारी युवा पिढी

हा गट तुलनेनं कमी असला तरी लोकशाही टिकवण्यात अग्रभागी असणारा हा गट आहे. २०१४ आणि २०१९ या दोन्ही मध्यवर्ती निवडणुकांमध्ये विरोधी भूमिका घेणाऱ्यांत युवकांचा सहभाग महत्त्वाचा होता. सध्या विरोधी पक्ष जितक्या जोमानं मोदी आणि परिवाराचा विरोध करत नाही, त्याहीपेक्षा जोरदार विरोध संख्येनं अल्प असणारा हा युवक-युवतींचा गट करत आहे. मुळात संख्याच अल्प असल्यानं या गटाचा मतदानावर मात्र तितकासा प्रभाव पडत नाही; पण सोशल मीडियातून, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या व्यासपीठांवरून हा गट अधिक सक्रीय असतो.

कन्हैया कुमारच्या रूपानं बेगुसरायमध्ये ही सक्रियता आपल्याला दिसून येईल. गुजरात विधानसभा निवडणुकीतही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. महाराष्ट्रात मात्र असं चित्र दिसत नाही. मोदींच्या धोरणांची चिकित्सा करण्यात, मंत्र्यांच्या निरनिराळ्या निर्णयांना विरोध करण्यात हा गट अग्रेसर आहे. युवांच्या या गटाला सत्ताधारी वर्गाकडून अनेकदा टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला, पण हा गट नमला नाही. २०१९ च्या निकालानंतर मात्र खूप मोठ्या प्रमाणावर नाराजी वाट्याला आलेला हा गट आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4772/Mahilanvishayiche-Kayade

.............................................................................................................................................

दलित-मुस्लीम युवकांचं काय?

युवकांचा विचार करताना सरसकट विचार करता येणार नाही. दलित-मुस्लीम युवकांचा स्वतंत्रपणे विचार करावाच लागेल. ज्यावेळी आपलं नेतृत्व आपल्याला पसंत नसलेल्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसलं असेल, त्यावेळी दलित युवक हताश होताना दिसतो. युपीमध्ये सत्ताधारी भाजप आणि विरोधी सप, बसपा या सर्वांनीच तिथल्या दलित युवकांना हताश केलं आहे. मुस्लीम युवक सुरक्षेपोटी दुसरा सक्षम पर्याय नसल्यानं काँग्रेसच्या मागे राहत होता. महाराष्ट्रात मात्र दलित आणि मुस्लीम युवकांना वंचित बहुजन आघाडीच्या निमित्तानं स्वत:ची स्पेस सापडलीय. खरं तर याकडे सकारात्मक बाब म्हणून पाहायला हवे. वंचितनं काँग्रेसच्या विजयात अडथळा आणला म्हणून त्यांना भाजपची ‘बी टीम’ ठरवणं, हे अल्पबुद्धीचं लक्षण आहे. राज्याचा विचार करता या युवापिढीचा, त्यांच्यातील वंचितपणाचा नीटसा विचार यापूर्वी केला असता तर हा वर्ग मोठ्या प्रमाणावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिला असता.

युवतींचं प्रतिबिंब किती?

मुली राजकारणारचा विचार करत नसतात, असं गृहित धरूनच राजकीय पक्षांनी वाटचाल चालू ठेवलीय. जे मीडियातून पुढे येतंय, स्थानिक पातळीवर जे बोललं जातंय, यावर आधारितच युवती आपलं मत देताहेत. मोदींच्या प्रतिमेचं गारूड युवकांपेक्षा युवतींमध्ये कमी आहे; पण इतर नेत्यांपेक्षा निश्चितच जास्त आहे. वेगवेगळ्या पक्षाचे युवती सेल आहेत; पण त्यामार्फत काम काहीच होताना दिसत नाही. अपवाद राष्ट्रवादीचा युवती सेल. युवतींना प्रचारात पुढं आणण्याचं काम राष्ट्रवादीनं केलं आहे; पण ते खूप प्रभावी नाही. औरंगाबादेतल्या स्थानिक वृत्तवाहिनीनं मुस्लीम युवतींना काय वाटतंय याचा अंदाज घेतला होता. त्या मुली सरसकट एकसारखंच मत नोंदवत होत्या. तिथल्याच काही हिंदू, त्यातही उच्चवर्णीय मुली निकालानंतर व्यक्त होताहेत, पण त्यात नावीन्यपूर्ण असं काहीच नाही. मतांच्या पलीकडे जाऊन युवतींचा विचार करणारं सध्यातरी कुणी दिसत नाही. किंबहुना युवतींच्या विचारांना आकर्षित करून घेता येईल, याचा कुणीच वेगळा विचार केला नाही आणि केला असेल तर त्याची अंमलबजावणी होत नाही.

राहुल गांधींनी राजीनामा द्यावाच

आपलं नेतृत्व आपल्याच पिढीला मान्य नसेल तर आपण दुसऱ्या फळीत जाऊन इतर युवानेत्यांना पुढे करणं योग्य. राहुल गांधी प्रामाणिक आहेत, सुसंस्कृत आहेत हे मान्य, पण याच्या जोडीला अपेक्षित असणारी धडाडी, राजकीय भूमिका, लोकांमधला प्रचंड वावर हे त्यांना इतक्या वर्षांमध्ये जमलेलं नाही. त्यांनी स्वत:ला प्रमुख पदावरून दूर करून कार्यकर्ता म्हणून देश पिंजून काढणं, युवा पिढीच्या भावना समजून घेणं योग्य ठरेल. राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा की नाही, याबद्दल काँग्रेसनं सर्व्हेसुद्धा करण्याची गरज नाही. स्वत:च युवा पिढीच्या भावना ओळखून हा निर्णय घ्यावा. शिवाय पक्ष म्हणून नव्हे तर सामाजिक संघटना म्हणून जी युवा पिढी कार्यरत आहे, त्या युवांना सोबत घेऊन पुढे जाण्यात शहाणपण आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सगळी परिस्थिती पाहिल्यास युवापिढीला किती दुर्लक्षित केलं जातंय, त्यांचा कसा सोयीस्कर वापर केला जातोय हे दिसून येईल. आपला पराभव का झाला, याचं चिंतन काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष करतीलच, पण त्यांच्या चिंतनात या मुद्यांचा समावेश होईल असं वाटत नाही. यावर त्यांनी गंभीरपणे विचार केल्यास पराभवाच्या कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण त्यांच्या नक्की हाती लागेल!

............................................................................................................................................................

लेखक सतीश देशपांडे मुक्त पत्रकार आहेत.

sdeshpande02@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 27 May 2019

सतीश देशपांडे, लेख चांगला आहे. फक्त ते कन्हैय्या कुमारची भलामण नको होती. बेगुसारायात जी सक्रियता दिसते त्याला युवा चळवळ म्हणंत नाहीत. असो. लेखातला आजूनेक विरोधाभास दाखवायचा होता. तुम्ही म्हणता की रास्वसंघात चिकित्सेला वाव नसतो. ठीके. तुम्ही करता का चिकित्सा स्वत:च्याच लेखाची? मी करतो थांबा जरा. लेखात तुम्ही मसीहाचा उल्लेख केलाय. ही संकल्पना भारतीय नाही. मग भारतीय युवावर्गाच्या डोंबल्यावर मसीहाचं ओझं कशापायी लादताय ? मी तर उलट म्हणतोय की आज भारतीय युवक जगभर फिरल्याने अधिक सजग व चिकित्सक बनलाय. तेव्हा संघाच्या चिकित्सेची आजिबात काळजी करू नका. भारतीय युवक ती काळजी वहाण्यास समर्थ आहे. आपला नम्र, -गामा पैलवान


Ashwini Funde

Mon , 27 May 2019

लेख आवडला, युवा केंद्रस्थानी ठेवून केलेलं विश्लेषण उत्तम झाले आहे.


Bhaskar rao Mhaske

Mon , 27 May 2019

लेख वाचला. आवडला. असेच विश्लेषण शेतकरी केंद्रस्थानी ठेवून करावे. त्यामुळे सरकारसमाेरील आव्हानांचा विचार हाेईल.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......