निर्वासित, हिंदी सिनेमा आणि एककल्ली, एकधर्मी भारतीय राष्ट्रवाद!
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
शुभांगी जगताप-गबाले
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 18 May 2019
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय निर्वासित Refugees हिंदी सिनेमा Hindi cinema बॉलिवुड Bollywood राष्ट्रवाद Nationalism

जिथं असाल तिथंच थांबून स्वतःशी एक विचार करून बघा. अचानक कुणी तुम्हाला क्षणार्धात राहतं घर, हक्काचा देश सोडून जायला सांगतं, नव्हे तशी वेळ तुमच्यावर लादली जाते अनाहूतपणे, किंवा मग तुमच्या डोळ्यांसमोर जिवंत घरदाराचे ढिगारे बनतायेत, काहीच अंतरावर स्फोटांमुळे आगीचे लोट उठतायेत अन भेदरून लोक किंचाळत सैरावैरा धावतायेत जीव वाचवायला… आजवरची तुमची धार्मिक, वांशिक ओळखच तुमचं जगणं, जिवंत राहणं मुश्कील करून टाकते. मग तुम्हीही धावता प्राण गळ्याशी आणून... आणि एके दिवशी तुम्ही काही समजण्याच्या आत एका दुसऱ्याच मुलखात असता. रंग, त्वचा, भाषा, संस्कृती, भूगोल, इतिहास, पर्यावरण या सर्वच पातळ्यांवर पूर्णपणे अनोळखी जगात. जिथं माती आणि आभाळ यांसहित सगळं काही अगदी परक्याहून परकं…

जगातली अर्धा टक्का लोकसंख्या अशी घरदार मुकलेल्या स्थितीत सीमा पार करून घरा-दाराविना जगतेय. आपण त्यांना ‘Refugee’ (निर्वासित) म्हणतो. वस्तुस्थिती अशी की, हा ‘टॅग’ लावून जगणारे बहुतांशी चेहरे मध्य पूर्व जगाचा भाग असलेले दिसतात.

धार्मिक, वांशिक, यादवी युद्धांच्या वाताहतीनं त्यांना इथवर आणलेलं असतं.

मागील वर्षभरापासून या ‘Refugee’ मित्रांसोबत काम करताना त्यांचं जग जवळून निरखता आलं. सीमेच्या भिंती भेदून त्यांचं जगणं समजून घेता आलं. एरवी अशी एक दुनिया आपल्या भोवती वाहते आहे, याची जाणीवच आपल्याला नसते. अन असलीच तर अनेकदा माध्यमांमध्ये चमकणाऱ्या तत्कालीन ब्रेकिंग न्यूजमधून आपल्यापर्यंत पोचत राहणाऱ्या अर्ध्यामुर्ध्या माहितीतून तयार झालेली.

इथं काम करताना अगदी पहिल्या दिवसापासून ‘मी भारतातून आलेय’ असं आवर्जून कधी सांगावं लागलं नाही, इतका भारत या मध्य पूर्व दोस्तांना ओळखीचा असतो. मला मात्र रंगरूपावरून त्यांचा नेमका देश ओळखता येण्यासाठी काही दिवस जावे लागले. सांगायचं म्हणजे पहिल्याच ओळखीत चर्चेची गाडी एकदम भारतीय हिंदी सिनेमांवरच पोचते. आणि लक्षात येऊ लागलं की, भारत यांना इतका ओळखीचा का? हिंदी सिनेमा हे त्याचं उत्तर. हिंदी सिनेमाचं असं भलतंच अप्रूप आहे यांना हे एव्हाना माझ्या परिचयाचं झालंय. म्हणजे पाकिस्तान, इराण, बांगलादेशात भारतीय सिनेमा खूप पाहिला जातो, हे नक्की ठाऊक असतं आपल्याला. पण सुदान, अफगाण, कुवेत ते फारसे माहीत नसणाऱ्या Eritrea, अल्बानिया, इथिओपिया, लिबिया, कुर्दस्तानसारख्या देशांमध्येही हिंदी सिनेमा तुफान लोकप्रिय आहे, हे इथं आल्यावरच लक्षात आलं माझ्या.

खरं तर मी आजवर Eritrea हा आफ्रिकन देश क्वचित ऐकलेला. तिथला मुहम्मद म्हणतो, ‘I Love Indian movies. Amir khan and Salman khan are my favorites.’ मग तो अलीकडे पाहिलेल्या सिनेमांची पटापट नावं घेतो. लोकशाही नावालाही नसलेली अनाचारी एकहाती राजवट, सक्तीची सैन्यभरती, तिथला अमानवी अत्याचार आणि दैनंदिन जगण्यात नागरी स्वातंत्र्याची अपरिमित गळचेपी असा काळा इतिहास नि वर्तमान वागवत असलेल्या Eritrea तून सुटका व्हावी आणि माणूस म्हणून मोकळा श्वास घेण्याची संधी मिळावी, या आशेनं असंख्य Eritrean शब्दशः जीव धोक्यात घालून सीमेवरच्या तारा ओलांडून इंग्लंड-युरोपात पोचतात. मुहम्मद त्यांच्यापैकीच एक. त्याच्या देशातल्या टीव्ही, सिनेमा, इंटरनेटच्या अतिशय मर्यादित अवकाशातही भारतीय सिनेमाचं वेड त्यानं जपलंय, हे ऐकून क्षणभर काही बोलायलाच सुचलं नाही मला.

मुहम्मद म्हणतो, ‘‘इथं आल्यावर हिंदी सिनेमे जास्त पाहतोय. इंटरनेटची चांगली सोय आणि ताण घालवायला तेच एक मनोरंजन आहे इथं. इंग्लिशपेक्षा हिंदी सिनेमेच एंटरटेनिंग असतात. इंडियन फॅमिलीज खूपशा आमच्या फॅमिलीजसारख्याच असतात, म्हणून तुमचे सिनेमे आवडतात. इंग्लिश कल्चर आवडत नाही मला तितकं. त्याच्याशी कनेक्ट नाही होऊ शकत आपण.” त्याच्या ‘आपण’मध्ये मीही होकार भरते हसून.

अफगाणचा सुलेमान तर सलमान खानचा इतका फॅन की, त्याचं कुठलंसं ब्रेसलेट घालून तो फिरतो नि कौतुकानं मलाही दाखवतो. वर मिश्किलीनं म्हणतो, ‘मी माझं नाव बदलून सलमान ठेवलंय. अक्षरांची मोडतोड केली जरा बस...’ इराणची फरिदेह सांगते- “माझ्या मुलांकडे (इराणमध्ये) हिंदी सिनेमाच्या डीव्हीडी, सीडींनी कपाट भरलंय. आलेला प्रत्येक नवा सिनेमा पहायचाच असतो त्यांना.” मला प्रश्न पडतो का आवडत असावेत यांना हिंदी सिनेमे इतके? भाषा, संस्कृती, राहणीमान या सगळ्या फरकाच्या पार जाऊन? सलमान ऊर्फ सुलेमानला विचारून पाहिलं. तेव्हा म्हणाला, ‘‘नृत्य, संगीत तर आवडतंच, पण खूप जास्त family drama असतो त्यात म्हणूनही. आणि जबरदस्त अॅक्शन, कॉमेडीमुळेही. दारी किंवा पाश्तोमधील सबटायटल्स वापरून बघतो आम्ही ते. पण मला थोडंबहुत हिंदीही समजू लागलंय त्यामुळे.” दारी नि पाश्तो अफगाणच्या राष्ट्रीय भाषा. मग थोडा गंभीर होत म्हणतो, ‘‘कित्येक वर्षे तर टीव्ही, इंटरनेटवर बंदीच होती अफगाणमध्ये. ती उठल्यावर आम्ही खूप हिंदी सिनेमे पाहू लागलो. बंदीतही लपूनछपून पहायचो क्वचित. पण ती जीवघेणी रिस्क असायची. आताही टेंशन कमी करायला हिंदी सिनेमेच मला मदत करतात, जे NHS ची औषधं करू शकत नाहीत... आणि त्यातला हिरो कायम जिंकतोच शेवटी. ते खूप आवडतं. Positive end...” निष्ठूर कायदे अन रक्तपातानं जर्जर झालेल्या त्याच्या अफगाणमध्येही सगळ्या अनागोंदीचा कधीतरी हिंदी सिनेमासारखा ‘positive end’ होईलच, असं जणू काही सुलेमानला म्हणायचं असतं!

कुवेतचा रहमान तिथल्या डोंगराळ भागातल्या ट्रायबल कम्यिनिटीशी नातं सांगणारा. आखाती राष्ट्रातल्या वंशभेदाचा सामना असह्य होऊन इथं आलेला. तो त्याच्या अरेबिकमध्ये डब केलेले हिंदी सिनेमे खूप पाहतो. अरब जगताला हिंदी सिनेमे आणि त्यातल्या हीरो-हिरॉईन्सची खूप क्रेझ आहे. तो म्हणतो- “आमचे सिनेमे सरधोपट असतात. कडकडीत इस्लामी सेन्सॉरशिपखाली बनलेले. अनेक नैतिक, व्यावहारिक बंधनांचा चाप आवळून बनलेल्या अरेबिक टीव्ही मालिका आणि सिनेमे आम्हाला रटाळ वाटतात खूप. कधीतरीच पाहतो आम्ही ते. हॉलिवुडपेक्षा बॉलिवुडची संस्कृती जवळची वाटते. भारतीय आमच्यासारखेच वाटतात आम्हाला खरं तर.” ‘मुळात अॅक्टिंग अजिबात जमत नाही अरबांना’ हे तो मस्त हसून सांगतो. भारतीय सिनेमांमधला रोमान्स नि अॅक्शन भारी आवडते म्हणतो.

भारताचा सिनेमा असा जगातल्या प्रत्येक कोनाड्यात मन लावून पाहिला जातोय.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4809/Golda-_-Ek-Ashant-Vadal

.............................................................................................................................................

अफगाणच्या तालिबानी शिस्तीशी मुकाबला करून इथं पोचलेली फातिमा मैत्रीण होऊन गेलीय छान. भारतीय संस्कृती, कुटुंबव्यवस्थेतलं मोकळंढाकळं वागणंबोलणं याचं कौतुक आहे तिला खूप. इंग्लंडला येण्याआधी ती हिंदी मालिका खूप बघायची सिनेमाच्या तुलनेत. पण म्हणते, “लाईट्सची दिवसरात्र कटकट असते अफगाणमध्ये. कुठे स्फोट झाला की वीज बंद. हिवाळ्यात तर बर्फाच्या दिवसात दिवसेंदिवस वीजपुरवठा बंदच राहतो. तालिबानी मुद्दाम विजेच्या तारा तोडतात बऱ्याचदा सरकारला परेशान करण्यासाठी. त्याचा त्रास मात्र आम्हाला भोगायला लागतो.” मग फातिमा इंग्लंडबद्दल सांगू लागते, “इथं तर घरात टीव्ही नाही आणि पुरेसा वेळही नाही. इथल्या formalities मध्येच पुष्कळ वेळ जातो. होम ऑफिसचा निर्णय काय येईल हीच चिंता असते सतत. घराची, घरच्यांची आठवण येत राहते सारखी. इथलं कल्चर वेगळंच वाटतं. आपल्याला शेवटी आपलाच देश आवडतो ना! त्यामुळे इथं शांत, निवांत वाटतच नाही. सिनेमे पाहायला, एन्जॉय करायला मन शांत हवं ना? माझं सध्या कशातच मन रमत नाहीये खरं तर...” तमाम ‘Refugee’ मनांचा एक कवडसा फातिमा असा नकळत उघडा करते.

अफगाणमध्ये सार्वजनिक ठिकाणं स्त्रियांना जवळपास वर्ज्यच आहेत. कामाव्यतिरिक्त त्यांचं अशा ठिकाणी फिरणं सैल, असभ्य मानलं जातं. अफगाणी खेड्यांमध्ये अधिककरून. तरुण मुला-मुलींचं

एकत्रित फिरणं तर न झेपणारं. पुरुषांना तर आपल्या घरातली बाई कामासाठी, बाजारहाट करायला बाहेर पडणं मानहानीचं वाटतं. हा अफगाणी घरंदाज रिवाजाचा भाग असतो. काबूल, कंदाहरसारख्या शहरी भागात मात्र स्त्रिया मोठ्या प्रमाणात घराबाहेर वावरतात. शाळा-कॉलेज, कार्यालय, विविध क्लासेसना जाण्यासाठी तसेच शॉपिंगसाठीही. अर्थातच निळ्याशार गच्च बुरख्यात. इथल्या तथाकथित गृहिणी म्हणवणाऱ्यांना मात्र घरातली कामं निपटत राहण्याखेरीज पर्याय नसतो. त्यांच्यासाठी टीव्ही ही एकमेव करमणूक असते. या अफगाणी महिलांमध्ये हिंदी मालिका खूप आवडीनं पाहिल्या जातात. फातिमा खूप काही सांगत राहते अफगाणी जगाबद्दल असं.

इराणची वहिदा म्हणते, “indians are very happy people. तुमच्या सिनेमात, मालिकांमध्ये कॉमेडी फॅमिली ड्रामा, संगीत, नृत्य सगळंच भरून वाहतं. आमचे सिनेमे, मालिका रडक्या असतात खूप किंवा सतत बायकांचे प्रॉब्लेम अधोरेखित करणाऱ्या. दुसरीकडे माध्यमांवरची सरकारी निगराणी तर न टाळता येणारी. इराणी चॅनेल्स म्हणजे इस्लामी राष्ट्रवादाचे डोस उठताबसता. मनोरंजन फारच कमी. म्हणून आम्ही भारतीय सिनेमे, मालिका सतत बघतो.”

पुण्याच्या स्त्री अभ्यास केंद्रामध्ये पाहिलेले इराणी चित्रपट मला आठवतात, खोमेनी फतवे, इस्लामी कायदे यावर भाष्य करणारे. धर्मनीतीची बंधनं वाकवून वळवून सुरू असलेली तिथल्या स्त्रियांची छुपी बंडखोरी ठळक करणारे. जी इतर मुस्लीमबहुल देशांमध्ये काहीशी दुर्मीळ आहे. याबद्दल वहिदा म्हणते, “इराणी स्त्रिया स्वभावतःच खंबीर असतात. नियमांना फार न जुमानणाऱ्या. पण खोमेनी राजवटीनं इराणची दुर्दशा केलीय. त्याआधीचा आमचा इराण नंदनवन होता मध्य पूर्वेचा.”

अब्दुल अफगाणचा. होम ऑफिसच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत गेली सहा वर्षं इथं आहे. त्याच्या मोबाईलवर हिंदी सिनेमातली असंख्य गाणी डाऊनलोड केलेली आहेत. म्हणतो, “एकटं वाटतं तेव्हा मन रमवायला ही गाणी बघतो मी. ऐकायला ती समजत नाहीत फारशी. मला ती पाहायलाच अधिक आवडतात.”. त्यातला रोमान्स आणि हीरोची हिरोगिरी याचा तो दिवाना आहे. त्याच्याच काबूलची फरीदा श्रीदेवीची मोठी फॅन आहे. ती म्हणते, “अफगाणी लोक अमिताभ बच्चन आणि श्रीदेवीसाठी वेडे आहेत. ‘खुदा गवाह’ सिनेमाच्या चित्रीकरणासाठी ते काबूलमध्ये आले होते, तेव्हा लोक वेडे होऊन गेले होते त्यांना प्रत्यक्ष पाहायला. त्या काळात मुजाहिदीनकडून कधीही, कुठेही फुटणारे बॉम्ब आणि होणारे हल्ले यांची तमा न बाळगता असंख्य लोक जीव धोक्यात घालून काबूलच्या रस्त्यावर उतरले होते, त्यांच्या स्वप्नतल्या शहेनशहाला पाहण्यासाठी.”

सुदानची रुबिनाही भारतीय सिनेमे आणि मालिकांबद्दल भरभरून बोलते. ‘तुमची संस्कृती खूप छान आहे’ म्हणते. किती मोकळेपणानं वागतात लोक याचं तिला अप्रूप आहे. ‘म्हणजे तुम्ही लोक मुक्तपणे हिंडताफिरता, प्रेमाची गाणी गाता, त्या तालावर मनसोक्त ठेका धरता आणि सुंदर सुंदर कपडे, दागिने घालता असं तिला म्हणायचंय’, असं शेजारी बसलेली अल्बानियाची एलिना हसत हसत म्हणते. वर ‘‘मीही याकरताच भारतीय सिनेमे खूप पाहायची इथं येण्याआधी. इथं टीव्ही नाही अन नेट परवडतही नाही. ‘हम आपके...’ खूपदा पाहिला म्हणते. Indian women are so beautiful” असा सूरही जोडून देते.

बहुतेकदा सिनेमा आपल्याला मुक्तीचा अवकाश देत असतो. आपल्या आवाक्यात नसलेल्या दुनियेसोबत जगण्याचे काहीएक क्षण अनुभवायला देऊन. बेफाम, बेलगाम प्रेम अन शृंगाराची मुभा आपली संस्कृती आपल्याला क्वचितच देते. नाहीच जवळपास. तथाकथित सभ्यता अन समाजभान नावाच्या सेन्लॉरशिपखाली भावनिक कोंडमारा, साचून राहणारे शंका-संदेह यांना खुलं क्षितिज मिळण्याची जागा सिनेमाचा पडदा काही काळ देऊ करतो. ती कल्पित अवास्तवता म्हणूनच जवळची वाटते.

तुलनेनं निवडीचा अवकाश अत्यंत संकुचित असलेल्या, मोजकीच मोकळीक वाट्याला येणाऱ्या मध्य पूर्वेतल्या बाई व पुरुषांसाठी म्हणूनच कदाचित भारतीय पडद्यावरचं रोमांचक जग मुक्तपणातल्या कैक शक्यतांची अनुभूती ठरतं. ते व्यवहारी जगात सहजी अनुभवास येत नाही त्यांना. डोक्याचा केस व पायाचं नखही नजरेस न पडू देण्याची टोकाची mysogyny वागवणाऱ्या समाजाचा भाग बनून जगताना होणारी घुसमट सैलावण्याची संधी इथल्या स्त्री-पुरुषांना मिळते ती टीव्ही, सिनेमांच्या माध्यमांतून. या अर्थानं बऱ्यापैकी मुक्तीदायी भवताल दाखवणारा भारतीय सिनेमा, दैनंदिन मालिका त्यांच्यासाठी पर्वणी ठरतात. भाषा संस्कृतीचे अडसर ओलांडून त्यांना ते आपले वाटतात.

मुलाबाळांच्या सान्निध्यात छोट्या छोट्या आनंदानी बहरलेलं, जगण्यातले हलकेफुलके क्षण साजरे करत निर्धास्तपणे जगू पाहणारं हसतंखेळतं कुटुंब इतकी माफक अपेक्षाही पूर्ण न होऊ देणारी भोवतीची प्रचंड अस्थिरता भोगत, कडक मापदंडाच्या शिस्तीत स्त्री-पुरुष अशी कठोर विभागणी करणाऱ्या व्यवस्थेच्या जागत्या पाहऱ्याला तोंड देत हा मध्य पूर्वेतला समाज जगतो आहे. त्यामुळे भारतीय सिनेमात पाहायला मिळणारी विमुक्त जीवनशैली, कुटुंबव्यवस्था, स्त्री-पुरुषातलं मोकळं संवादी नातं, भावना, नात्यांना जीवापाड जपणारा भोवतालचा सामाजिक पैस आणि या जोडीला प्रेमासाठी वाट्टेल ती साहस करणारे आपली हिरो-हिरॉईन्स, या सगळ्याचं नुसतं अप्रूप नाही तर तेच आदर्श, स्वप्नवत जगणं आहे आणि ते आपल्याही जगात घडावं ही अभिलाषा या लोकांना भारतीय सिनेमांची भुरळ घालत राहते. जी अवाजवी निश्चित नाही. आपल्याकडील अभावात जगणारा समाजही याच भावनेतून सिनेमाशी जोडला जातो. त्यातल्या स्वप्नांच्या दुनियेत जगत राहतो.

अर्थात इथल्या मोजक्या प्रतिक्रिया म्हणजे अख्खा मध्य पूर्व निश्चितच नाही, जसं ते ज्या सिनेमाचे दिवाने आहेत तो व्यावसायिक हिंदी सिनेमा म्हणजे अख्खा भारत नाही. मध्य पूर्वेतल्या समाजांना असलेलं भारतीय हिंदी सिनेमाचं व्यसन ते सोसत असलेल्या कठोर धर्माभिमानी व्यवस्थेतल्या दैनंदिन निर्बंधांशी, मजबुरींशी जोडलेलं आहे, हे या दोस्तांशी बोलताबोलता स्वच्छ होत जातं. खरं तर त्यांना सांगावंसं वाटतं, मर्यादित चौकटीत फिरत राहणाऱ्या मालिका अथवा व्यावसायिक हिंदी सिनेमातली फँटसी म्हणजे खराखुरा भारत नाही. ठराविक उच्चभ्रू वर्तुळाला समोर ठेवून निर्मिलेलं ते एक अभासी आदर्शवादी जग आहे. ते त्या पडद्यामागील असंख्य दुर्भिक्ष्य झेलत उभ्या अस्लेल्या वास्तव दुनियेपासून फारकत घेऊन उभं आहे.

पण मी हे सांगायचं टाळते. वाट्याला आलेली सगळी दाहकता मागे टाकून ज्या नितळ आयुष्याच्या शोधात ते इथवर पोचतात, नव्या परिस्थितीशी निकरानं झगडत राहतात, त्या रोजमर्रा घालमेलीत टीव्ही-सिनेमाच्या आभासी दुनियेतली स्वप्नंच त्यांचा एकमेव आधार आहेत, त्यांचा आशावाद जागवणारी, ही वस्तुस्थिती मला रोखून धरते.

हेही खरंच की, कुठल्याही राष्ट्राचा, प्रांताचा सिनेमा हा तिथला समाज, सांस्कृतिक मूल्यं, अस्मिताही दृश्य करत असतो एका परीनं. तो तिथल्या मातीचा, माणसांचा आवाज प्रतिबिंबित करत असतो. हेच काम काही अंशी भारतीय सिनेमा जागतिक प्रतालावर ‘भारतीय आवाज’ उमटवून करतो आहे. आणि हा आवाज जगातल्या एका बलाढ्य लोकशाही धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा आहे. आधुनिक उदारमतवादी राष्ट्राचा आहे, हे नाकारता येत नाही. ज्यामुळे अनेक मध्य पूर्व देशांना भारतीय सिनेमा मनापासून भावतो, त्याचं एक निश्चित कारण हा आवाज आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4795/Spasht-Bolayacha-Tar

.............................................................................................................................................

मला आठवतं, पाकिस्तानचा सईद त्याचा मी visitor's form (इंग्लंडमधील बहुतेक एनजीओजमध्ये Asylum seekers/ Refugees ना ‘Visitor’ म्हणतात!) भरत असताना, म्हणाला होता, “आप इंडियन लकी हो बहोत. आपको ऐसा asylum का फॉर्म भरने की, refugee बनने की जरूरत नहीं पडती. आपका वतन ये नौबत नहीं लाता आप लोगोंपे.” सईदसारखं जेव्हा इतरही refugee मित्र-मैत्रिणी भारताविषयी असं भरभरून बोलतात, त्यावेळी माझ्या आतला सुप्त अभिमान जागा होतो. वागण्याबोलण्याचं निर्भेळ मुक्तपण देऊ करणारा, नागरिक म्हणून मनसोक्त वाढू देणारा आपला भक्कम देश आठवून अभिमान वाटतो.

आणि त्याचा एक तंतू जोडलेला असतो नेहरू, गांधी, आंबेडकरांच्या स्वप्नातल्या भारताशी. धर्मनिरपेक्ष लोकशाही असं त्या स्वप्नातलं मुख्य चित्र होतं. नेहरूंच्या आधुनिक नजरेनं पाहिलेलं, गांधी-आंबेडकरांच्या सहिष्णू समन्यायी विचारांची जोड मिळालेलं. हे चित्र त्या स्वप्नातून निखळून आज फार फार पुढे निघून गेलंय.

नेहरूंच्या स्वप्नातला भारत असतो प्रतिगामीत्वाला मोडीत काढून पुरोगामीत्वाचा ध्यास घेणारा, हरतऱ्हेच्या संस्कृती-धर्मांना समन्वयानं बांधू पाहणारा. मस्तकातली पुराणी जळमटं उतरवून नवतेचा सोस धरणारा. तिथं संविधान हाच सामान्यांचा मुख्य धर्म असतो अन लोकशाही धर्मनिरपेक्षतेचा सन्मान हे मुख्य तत्त्व. ललाटरेषेऐवजी कर्म मोठं असतं अन पूर्वपुण्याईच्या जागी असते स्वतःच्या कर्माबाबतची अढळ आस्था .

तो असतो ‘वैष्णव जन तो तेने कहीए..’चे सूर आळवणारा गांधींचा भारत, ‘बुद्धं शरणं गच्छामि’ची धून सूनवणारा आंबेडकरांचा भारत. तळातल्या समाजाला हाताशी धरत समावेशाची अन विद्रोहाची बोली प्रखर करणारा. भारताची खरीखुरी नस नेहरूंच्या द्रष्ट्या हातांना नेमकी सापडली होती. जातधर्माचं, आस्था-विश्वासाचं विलक्षण भिन्नत्व सोबत घेऊन जगणारा इथला बहुधर्मी बहुसांस्कृतिक समाज एक पायरी, एक भिंत शेअर करत एकत्रित नांदतो आहे आणि हे त्यांचं नांदणं, वाढणं विकसित होणं शाबूत ठेवायचं असेल, सामूहिक दुफळी लांब ठेवत खराखुरा विकास साधायचा असेल तर संपूर्ण समाजाला धर्मनिरपेक्षतेची लस टोचण्याखेरीज दुसरा नेमका इलाज नाही, हेही त्यांच्या चाणाक्ष नजरेनं ओळखलं होतं. म्हणूनच भारतासारख्या राष्ट्राचा एकच एक राष्ट्रवाद नसेल, तर तिथं धर्मनिरपेक्षतावादच टिकू शकेल हा त्यांचा खणखणीत दावा होता.

पश्चिमी परकीय ताकदीच्या नियंत्रणातून मुक्त होताच भारत वगळता जवळपास सर्व अविकसित राष्ट्रांनी उलटा प्रवास सुरू केला. धर्म-सांप्रदायिकतेचा रासवट आग्रह आणि धर्मनिष्ठांचं अघोरी स्तोम माजवत जनमताला नाकारणारी एकाधिकारशाही त्यांनी अटळ मानली. आधुनिकतेला, कुठल्याही पुरोगामित्वाला तुच्छ लेखत रीतीरिवाजांचं-परंपरांचं जोखड गच्च आवळताना बाईपणाला सर्वांत अधिक बेड्या घातल्या. बाई नि लैंगिकता यांची शिसारी असावी अशी विकृत व्यवस्था राबवणं सुरू केलं. शिक्षण, विकास, आरोग्य या कशाचाही मुलाहिजा न राखता केवळ धार्मिक ढोल बडवत बसलेले हे देश विकासाची कुठलीच स्थिर पातळी गाठू तर शकले नाहीतच, पण व्यवस्थात्मक पातळीवर आपल्याच लोकांना विलक्षण असुरक्षितता भोगायला लावून त्यांना हिंसा अन अराजकाच्या अधीन केलं. इस्लामी देशांमधून वाढत चाललेली प्रचंड अस्थिरता, अशांतता इथल्या नाकर्त्या धर्मांध शक्तींच्या आडमुठ्या धोरणांचा परिणाम आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वाधिक Refugees जन्माला घालण्याचं काम आज जगभरातल्या तमाम धर्माग्रही, हुकूमशाही राजवटी निष्ठूरपणे करत आहेत.

नेमका हाच उलटा प्रवास चाणाक्षपणे नाकारून, समाज-व्यवहारातली नेमकी ठसठस ओळखून भारतानं मात्र स्वतःचा ‘मध्य पूर्व’ (Middle East) होऊ दिला नाही. किंबहुना कोणत्याही धर्म-संप्रदायाच्या अंकित होण्यापासून स्वतःला दक्षतापूर्वक दूर ठेवलं. आणि जगातली सर्वांत मोठी धर्मनिरपेक्ष लोकशाही जाणीवपूर्वक घडवली... आधुनिकतेची आस असलेली.

मुळात भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा बुरुज सांभाळणारी, स्वतंत्र राष्ट्राची सशक्त पायाभरणी करणारी नेत्यांची फौज अतिशय दूरदर्शी अन धोरणी होती. त्यामुळेच इतर वसाहतींची वसाहतवाद्यांना जी नासधूस करता आली, तशी ते इंडिया नामक वसाहतीची करू शकले नाहीत.

खंद्या सहकाऱ्यांच्या पाठिंब्यातूनच नेहरूंचा ‘आधुनिक भारत’ आकार घेऊ शकला. ज्यानं इथल्या जनतेच्या नसानसांत लोकशाही भिनवली, मोकळा श्वास घेत तिला स्वप्नं पहायला शिकवलं. विचारांचं, अभिव्यक्तीचं सकस पर्यावरण देऊ केलं. म्हणूनच या ‘नेहरुवियन मॉडेल’ला अभ्यासकांनी, टीकाकारांनी कितीही प्रश्नाकित केलं, तरी स्वातंत्र्यानं सत्तरी ओलांडूनही त्याला विचारात घेतल्याखेरीज विकासाची चर्चा आज पुढे नेताच येत नाही.

मुळात नेहरूंच्या नजरेतली आधुनिकतेची व्याख्या विज्ञान-तंत्रज्ञानानं संपृक्त असण्याशी, शिक्षित, विवेकी अन डोळस समाज घडवण्याशी जोडलेली होती. धर्म-संस्कृती निपटून काढण्याची भाषा त्यांनी कधीच केली नाही. पण त्यात अडकून कुजून राहणारा समाज मात्र त्यांना नको होता. संस्कृतीच्या प्रवाहीपणावर, तिला विकासाशी जोडण्यावर त्यांची सर्व भिस्त होती. परंपरांवर विसंबलेला श्रद्धाळू, भोळसट, आळशी समाज त्यांना जागा करायचा होता. आणि विज्ञान, तंत्रज्ञान हे त्याचं मर्म होतं. अंधश्रद्धापायी स्वतःच्या ताकदीबद्दलची, सामर्थ्याबद्दलची खात्री हरवून बसलेला नि वाट्याला आलेल्या परिस्थितीसाठी नशिबाला कोसणारा तळचा समाजवर्ग याखेरीज कात टाकणार नाही, हे नेहरूंनी जाणलं होतं. धार्मिक प्रभावाला खाजगी जगात बंदिस्त ठेवून सार्वजनिक जगाचा आरपार विकास त्यांना घडवायचा होता. मुळात लोकांचं लक्ष सांस्कृतिक कर्मकांडाच्या संकुचित परिघातून व्यापक समृद्धीच्या परिघाकडे वळवायचं होतं.

नेहरू, गांधी, आंबेडकर या तिघाही धुरिणांनी स्त्री-पुरुष समतेचा कायमच पुरस्कार केला. त्यातील अनेक फटी जाणवूनही ‘A test of a civilisation is the way it treats its women.’ असं नोंदवलेल्या नेहरूंची हिंदू कोड बिलाला कायमच मान्यता होती, हे नाकारता येत नाही. तसंच सातासमुद्रापार नीती-नियमांच्या कडी-कुलपांमध्ये बंदिस्त असलेल्या आयुष्यांना ज्या मनमोकळ्या भारतीय जीवनशैलीचं, स्त्री-पुरुषातल्या सहजी नात्याचं अप्रूप वाटतं, ती जीवनशैली व नात्यांचा सकस अवकाश उभा राहण्यामागेदेखील याच मान्यतेचा स्वीकार होता… जी उदार लोकशाही मुशीतूच घडलेली होती.

नेहरूंच्या वारसदारांना आणि त्यांच्या भक्कम लोकशाहीची, खुल्या लोकतंत्राची फळ चाखणाऱ्या आपल्याला ते समजून घेता आलं नाही. मुळात लोकशाहीसाठी कुठलीच किंमत न मोजलेल्या आपल्या पिढीनं ती कायम गृहीत धरली. तितक्याच सहजतेनं आज ती प्रतिगामी हातांच्या ताब्यातदेखील देऊन टाकली. अर्थात नेहरूंच्या आधुनिक भारताचं स्वप्न अगदी परिपूर्णच होतं असा दावा नाही इथं. पण आशावादाला, चिकित्सक अभिव्यक्तीला त्यात भरपूर जागा होती. आज त्या स्वप्नासोबत ती जागाही आकसत चाललीय.

भारतात आता धर्म-अध्यात्माच्या नावे हिंसेचं, तुच्छतावादाचं निक्षून समर्थन करणारा आक्रमक राष्ट्रवाद जोशा-त्वेषानं व्हायरल होऊ लागलाय. ज्ञाननिर्मितीच्या प्रत्येक स्थानावर, साहित्यावर तो वार करू लागलाय. तो तुमच्याकडून तुम्ही सच्चे देशभक्त असण्याच्या खणखणीत पावतीची मागणी करतो. व्यवस्थेविरुद्ध परखड मत मांडायला, तुमच्याच संस्कृती-परंपराची तीक्ष्ण चिकित्सा करायला मज्जाव करतो. प्रेमात पडण्याचं, जोडीदार निवडीचं अत्यंत खाजगी जग तो धर्म-जातीय राजकारणाशी जोडून घेतो. तुमचं खानपान, राहणीमान याभोवतीही तथाकथित पावित्र्याचे निर्बंध आखतो. धर्माचा कुठला रंग देशभक्तीचा, कुठला देशद्रोहाचा ही व्याख्या तो आता रुजवू पाहतोय. त्या व्याख्येच्या तळाशी प्रेमाचं राजकारण करणारा ‘लव-जिहाद’ असतो, प्रेमाचा गुलाबी रंग निपटून काढायला धाक दडपशाहीची ‘घरवापसी’ असते, न जुमानणारी मनं खुडायला ‘ऑनर किलिंग’ असतं. धर्मांतराच्या रस्त्यावर गुमराह झालेल्यांकरता धर्मशुद्धी, वंशशुद्धी असते. गायीची सुरक्षा जिवंत माणूस उभा चिरून केली जाते. प्रथा-रिवाजांबाबत सजग, डोळस समाज उभारू पाहणाऱ्यांना संपवून टाकण्याची मग्रुरी असते. नाहीतर बाईसाठी खास ठेवणीतली बलात्काराची धमकी असते!

मंदिर-मशिदींची प्रवेशद्वारं आजच्या रोबोट, क्लोनच्या युगातही बाईला वर्ज्य असतात. न्यायसंस्था, संविधानापुढे धर्मसत्ता सच्ची असते. विकासाऐवजी धर्म-अध्यात्माची चर्चा अधिक जोरदार असते. आणखी म्हणजे भगव्या कफणीतल्या तथाकथित साधू-संतांच्या हाती ही व्यवस्था निर्धोकपणे सोपवली जातेय. बेकारी, बेरोजगारीनं हताश झालेल्या तरुणाईला धर्माच्या नावानं चेतवून, एकधर्मी राष्ट्रवाद त्यांच्या गळी उतरवून गटातटानं लढण्यास शिकवलं जातंय. प्रगत विकासाची स्वप्नं पाहण्याऐवजी ते आता धर्मरक्षक बनून हत्यारं चालवतायेत.

इतिहासातील वसाहतवादाला उत्तर म्हणून सांस्कृतिक अस्मिता वर्तमानात घट्ट केल्या जातायेत. धर्म-संस्कृतीची महनीयता पश्चिमी आधुनिकतेला उत्तर म्हणून वापरली जातेय. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध अशा प्रमुख ओळखी मिरवणारं प्रत्येक राष्ट्र आज ‘एक ईश्वर, एक धर्म’ या अस्मितावादी मानसिकतेत गुरफटत चाललं आहे. यातून सुरू असलेली तीव्र राष्ट्रवादी अहमहमिका विकासाला खीळ घालून समाजाला मध्ययुगाकडे लोटते आहे, आर्थिक, मानसिक मागास बनवते आहे.

या धर्मवाद्यांना सांगावंसं वाटतं, समाजाला धार्मिक अफूच्या धुंदीत ठेवून आजघडीला सत्ता राखण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकालही, पण पुढे जाऊन त्या धुंदीतून शुद्धीवर आलेला समाज प्रगतिशील राज्याची, धड जगता येण्याची, भरभराटीची जेव्हा मागणी करेल, त्यासाठी हत्यारं उचलेल, तेव्हा त्याला आवरणं कुणालाही शक्य होणार नाही. अरब स्प्रिंग उठावांनी हे दाखवून दिलं आहेच.

मूलतः धर्म, संस्कृती ही कुणा एकाची मक्तेदारी नाही. कुणी कुणावर थोपवावी, शिकवावी, समजवावी इतक सोपं तत्त्वज्ञान नाही ते. मुख्यतः हिंसा, अनाचाराला पोसणारा, चेतवणारा तो उद्दाम विचार तर नाहीच नाही. ज्यांना तो हाताळणंच माहीत नाहीये, अशा धार्मिक अनपढ हातांमध्ये तो आता एकवटत चालला आहे… सामाजिक पर्यावरण कलुषित करत. असंख्य अस्मिता पोटात घेऊन वाढणाऱ्या भारतासारख्या बहुप्रसवा समाजात त्यावरून दुही उफाळणार नाही, असा दावा कुणीच करू शकणार नाही. मात्र या खदखदीचा सकारात्मक निचरा होण्याकरता विवेकी, संवेदनशील असा ‘liberal valve’ आपण स्वतःच्या आत नक्की बसवून घेऊ शकतो. निव्वळ भावनांना हात घालून चेतवले जाणारे सामाजिक विस्फोट थोपवणं अगदीच अशक्य प्राय नाही. अन्यथा हा एककल्ली, एकधर्मी राष्ट्रवाद असाच फोफावत राहिला तर कुणी सांगावं आपणही असू उद्या या मध्य पूर्वेतल्या दोस्तांच्या राष्ट्रयादीत. अन ‘Asylum claim’च्या रांगेतदेखील.

.............................................................................................................................................

लेखिका शुभांगी जगताप-गबाले Swindon (England) येथील The Harbour Project या refugee साठी काम करणाऱ्या NGO च्या कामाशी जोडलेल्या आहेत. 

shubhangigabale@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 20 May 2019

काय हो शुभांगीताई, सिनेमापर्यंत लेख वाचनीय आहे. पुढे हिंदू धर्मावर अनाठायी टीका करतांना वास्तवाचं भान सुटलं आहे. तुम्ही योगी आदित्यानाथांना कफनीतला अनपढ म्हंटलंय. मला एक सांगा, मनमोहनसिंग एव्हढा शिकलेला होता ना? त्याने काय दिवे लावले? असल्या मेकॉलेछाप शिक्षणाने समस्या बळावतात. योगी आदित्यनाथ गुन्हेगारांना सरळ ठोकतो. उगीच त्यांच्या मानवाधिकारांची चिंता करत बसंत नाही. तुम्ही जशी घुसखोरांना इंग्लंडमध्ये सेटल व्हायला मदत करता, तसले लाड तो चालवून घेत नाही. म्हणून तुम्ही त्याला नावं ठेवता. चालायचंच! आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा