अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन नेमक्या कोणत्या विचारांचे आहेत?
ग्रंथनामा - आगामी
अतुल देऊळगावकर
  • ‘विवेकियांची संगती’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 17 May 2019
  • ग्रंथनामा आगामी विवेकियांची संगती Vivekiyanchi Sangati अतुल देऊळगावकर Atul Deulgaonkar

प्रसिद्ध पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्ते अतुल देऊळगावकर यांचं ‘विवेकियांची संगती’ हे पुस्तक उद्या पुण्यात समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकातील नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांच्यावरील लेखाचा हा संपादित अंश...

............................................................................................................................................................

संपूर्ण जगाच्या विचारांना वळण देऊन नवीन व मूलभूत मांडणी करणाऱ्या व्यक्तींना ‘विचारवंत’ असं संबोधन लाभतं (एखादी उत्तम संज्ञा वा संकल्पना निघते आणि मग तिचा नको तिथे, नको तसा आणि नको तितका वापर सुरू होतो. गैरवापराने सत्यानाश व विद्रूपीकरण झालेल्या अनेक संज्ञांपैकी ही एक!) अमर्त्य सेन हे त्यांपैकी एक विचारवंत! गेली तीन दशके जगातील निवडक दहा विचारवंतांमध्ये त्यांचे नाव अग्रभागी आहे. जागतिक समस्यांवरील त्यांचे भाष्य ऐकण्यासाठी आज अवघे जग सदैव सज्ज असते. अर्थशास्त्रातील कूट समस्या असो वा मंदीतून बाहेर पडण्याचे उपाय, सेन यांचे मत अनिवार्य असते. “तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, अशा बहुविध अंगांनी अर्थशास्त्राचा अन्वय लावणारे अमर्त्य यांच्यासारखे तत्त्वज्ञ व भाष्यकार अतिशय दुर्मीळ असतात”, असे नोबेल सन्मानित जोसेफ स्टिगलिट्झ म्हणतात. पॉल गमन, अ‍ॅग्नेस डीटन, थॉमस पिकेटी, अँथनी अ‍ॅटिक्सन हे अर्थवेत्ते ‘आर्थिक विषमता, गरिबी, जागतिकीकरणाचे लाभ, हे मुद्दे जागतिक विषयपत्रिकेवर आणण्याचे श्रेय’ अर्थतत्त्वज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनाच देतात. खुद्द गुरुदेव रवींद्रनाथ यांनी दिलेले ‘अमर्त्य’ हे नाव डॉ. सेन यांनी सार्थ केले आहे.

दुष्काळ, सामूहिक निवड व मानव विकास

१९५३ साली अमर्त्य यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयात अर्थशास्त्राच्या पदवीकरता प्रवेश घेतला. पदवी परीक्षेत ते विद्यापीठात प्रथम आले आणि तिथेच त्यांनी पीएच.डी.साठी संशोधन चालू केले. या काळातच त्यांनी तर्कशास्त्र, तसेच नैतिक आणि राजकीय तत्त्वज्ञान या त्यांच्या आवडत्या विषयांचा कसून अभ्यास केला. सेन हे कल्याणकारी अर्थशास्त्राचा (वेल्फेअर इकॉनॉमिक्स) पाया घालणारे अर्थशास्त्रज्ञ केनेथ अ‍ॅरो (१९२१-२०१७) यांचे विद्यार्थी होते. त्या सुमारास अ‍ॅरो यांचा ‘सामाजिक निवड आणि वैयक्तिक मूल्ये (सोशल चॉइस अँड इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूज)’ हा प्रबंध प्रसिद्ध झाला होता. ‘लोकशाहीमध्ये एखादा समाज वा समाजातील गट आपल्या प्रतिनिधीची निवड कशी करतो, प्राधान्यक्रम कसे ठरवतो, समूहाच्या निर्णयात नि:संदिग्धता व सातत्य येऊ शकेल काय?’ अशा प्रश्नांचा तार्किक अन्वय लावण्याचे कार्य अ‍ॅरो हे करत होते. नोबेल विजेते जॉन रॉल्स, सर इसाया बर्लिन, सर बर्नार्ड विल्यम्स, रोनॉल्ड ड्वॉर्किन, डेरेक पॅर्फिट, थॉमस स्कॅन्लॉन, रॉबर्ट नॉझिक या जगातील अग्रगण्य तत्त्वज्ञांशी अनेक विषयांवर सविस्तर वादसंवाद करण्याची संधी ट्रिनिटी महाविद्यालयामुळेच मिळाली, असे सेन आवर्जून सांगतात. जॉन रॉबिनसन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच.डी. संपादन केली. “ह्या काळात डॉ. मॉरिस डॉब हे गुरू मला लाभले आणि त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला,’’ असे सेन म्हणतात.

ह्या काळात सेन यांना व्यक्तिगत आणि सामूहिक निवड हे गूढ उकलण्याची आतून निकड वाटू लागली. कोणत्याही प्रसंगी प्रत्येक व्यक्तीला निवड करण्याची संधी असते. उदाहरणार्थ, वेळ कसा घालवावा, काय शिकावे, इत्यादींची निवड सहज वाटली, तरी त्यामागे विचारप्रक्रिया असते. ती कधी सुसंगत तर कधी विसंगत असू शकते. “शिक्षण, आरोग्य, अन्नधान्य ह्या प्राथमिक गरजा पूर्ण होणे, ही समाजाची निकड असते. त्यानंतर समाजाच्या आकांक्षा वरचेवर उन्नत होत जातात. सामाजिक निकड व समाजाचे वर्तन हे असे तार्किक असते. समाजाच्या निवडीचा विचार करून कल्याणकारी अर्थशास्त्राने धोरणे ठरवणे आवश्यक आहे. असे झाले तरच लोकशाही प्रगत होऊ शकते’’ ह्या सेन यांच्या सिद्धांताला जगातील आघाडीच्या अर्थतज्ज्ञांनी मान्यता दिली. मानव विकास निर्देशांकाकरता ही संकल्पना पायाभूत ठरली. येथूनच एका नवीन ज्ञानशाखेचा - वर्तनवादी अर्थशास्त्राचा (बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स) उगम झाला.

पंचवीस ते तीस लक्ष बळी घेणाऱ्या १९४२ चा महाभयंकर दुष्काळाची चित्रे ही सेन यांच्या काळजाच्या आत सतत टोचणी लावत होती. बालमनाला ही टोचणी काळरात्रीच्या दु:स्वप्नासारखी होती. वास्तविक त्यांना स्वत:ला दुष्काळाची थेट झळ अजिबात लागली नव्हती. मानवी आयुष्यातील अटळ दु:खांमुळे गौतम अस्वस्थ झाला. त्या जातकुळीच्या अशांततेतून अमर्त्य गेले. ‘गोदामात धान्याच्या पोत्यांची थप्पी असूनही गोदामाबाहेर हाडांचे सापळे का हिंडतात?’ याचा ‘अर्थ’बोध करून घेण्यासाठी सेन अथक झटत राहिले. त्यातून दुष्काळाचे व भुकेचे अर्थशास्त्र जगासमोर आले. टागोर यांच्या मानवतावादी विचारांचा विस्तार सेन यांनी केला.

सेन यांच्या आधीचे अर्थशास्त्रज्ञ ‘दुष्काळात अन्न पुरवठा’ हा एकमेव उपाय मानून त्यावर लक्ष केंद्रित करीत होते. १९४२ सालचा बंगालचा दुष्काळ, १९७३ चा इथिओपियातील दुष्काळ आणि १९७४ साली बांगला देशमध्ये आलेला दुष्काळ यांचे सखोल विश्‍लेषण करून सेन यांनी हा सिद्धांत मोडीत काढून ‘अन्न विकत घेण्याची क्षमता’ हाच नवा आणि अतिशय महत्त्वाचा निकष मांडला. त्यासाठी त्यांनी दुष्काळविषयक राजकीय, अर्थशास्त्रीय व सामाजिक सिद्धांतांचा अभ्यास केला. “बेकारी, वेतनात कपात, अन्नधान्याची भाववाढ आणि सदोष धान्य वितरण यांमुळे भूकबळी जातात. लोकशाही भक्कम असणाऱ्या देशांत दुष्काळ आलेला नाही. दुष्काळाची चाहूल लागताच प्रसार माध्यमे शासनावर परखडपणे टीका करू लागतात. निवडणुकांत यशस्वी होण्याकरता जनतेचा संताप सरकारांना परवडणारा नसतो. त्यामुळे शासनाला दुष्काळ निवारणाकरता पावले उचलणे भाग पडते. हुकूमशाही असणार्‍या देशांत प्रसार माध्यमांना स्वातंत्र्यच नसते,’’

हे प्रतिपादन अनेक उदाहरणांनिशी डॉ. अमर्त्य सेन यांनी सिद्ध केले आहे. अर्थवेत्ते अ‍ॅडम स्मिथ यांची ‘अदृश्य हात’, तर जोसेफ शुम्पिटर यांची ‘सर्जनशील विनाश’ या संज्ञा हीच त्यांची ओळख झाली. तसाच अमर्त्य सेन यांच्या ‘दुष्काळा’ संबंधी भाष्यामुळे इतिहास घडवला गेला. तसे पाहता सेन यांचा दुष्काळविषयक सिद्धांत साधा व सरळ आहे, “अन्नधान्याची उपलब्धता नसल्यामुळे भूकबळी जात नाहीत, तर कित्येक वेळा धान्य उपलब्ध असूनही ते विकत घेणे हेच गरिबांना परवडत नाही. ते धान्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत’’ हा त्यांचा सिद्धान्त होता. आपल्या अभ्यासातून त्यांनी ‘गरिबांना धान्य विकत घेणे परवडेल, याची सोय करा’ हा संदेश दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघापासून ते अनेक देशांच्या राज्यांच्या धोरणांवर त्याचा प्रभाव जाणवतो. अतिशय नम्रपणे सेन म्हणतात, “आजवर कुणीही केली नाही अशी नवीन मांडणी मी केली आहे, या भ्रमात मी नाही. माझे मित्र अर्थतज्ज्ञ डॉ. अशोक मित्र नेहमीच म्हणतात, ‘आपल्या आज्यांनी वा पणज्यांनी सरकार चालवले असते तर असंख्य जीव वाचले असते.’ त्या रूपकाचा वापर करून मी म्हणेन, की ‘दुष्काळाच्या मांडणीनुसार धोरणे आखून अंमलबजावणी झाली असती, तर काही जीव नक्कीच वाचले असते’ असे मात्र मला वाटते.’’

वादसंवादाची भारतीय परंपरा                                    

‘द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन’ (२००५) ह्या ग्रंथात सेन यांनी “वादसंवादाच्या परंपरांमुळे भारतीय उपखंडातील सामाजिक व सांस्कृतिक जगाचीं जडणघडण होत गेली. त्यामुळेच बहुविधता हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. भारतीय लोकशाही ही ब्रिटिशांच्या प्रभावाची निष्पत्ती असल्याची ग्वाही अनेक स्वयंघोषित बुद्धिवादी देतात. अतिप्राचीन काळापासून चालत आलेल्या वादसंवाद परंपरांमुळे आपल्या लोकशाहीची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत, हा इतिहास त्यांना माहीत नसतो. असे नसते तर ब्रिटिश साम्राज्यांच्या आधिपत्यापासून मुक्त झालेल्या शंभर राष्ट्रांमध्ये लोकशाही सारखीच दिसली असती,’’ असा बिनतोड युक्तिवाद केला आहे. ‘वाद-संवादांतून चातुर्य येते’ या सुभाषिताची प्रचिती भारतीय इतिहासात वारंवार येते.

सध्याचे जग हे महाभयंकर हिंसा आणि पर्यावरणविनाश यांमुळे अंधारून गेले आहे. तर्क वा युक्तीने संवाद साधता येण्याची क्षमता नसणारे निर्बुद्ध लोक बळाच्या आधारे मत लादू पाहतात. असे लोक सर्व काळात, सर्व धर्मांत व पंथांत असतात. लोकशाही व समाजस्वास्थ्य धोक्यात येण्याचे प्रसंग येत असतात. आज समस्त जनता हवालदिल झाली असून, हे भीषण वातावरण जनतेला नकोसे झाले आहे. विविध पद्धतीने जनता तिच्या भावना व्यक्त करत आहे आणि हीच आशा आहे. बदल व्हावा ही अभिव्यक्ती महत्त्वाची असते. त्यातूनच युक्तिवाद व वादसंवाद झडू लागतात. मोठ्या परिवर्तनाची ती नांदी असते. कुट्टकाळ्या ढगांनी दाटी केली, तरी काही क्षणांत रुपेरी कड अवतरते आणि आसमंत उजळून जातो. निरंतर चालू राहिलेल्या वादसंवाद परंपरेने भारतावरील अनेक सावटे दूर केली आहेत. त्यामुळेच वादसंवाद परंपरा हीच भारतीयत्वाची ओळख आहे, हे सेन यांनी दाखवून दिले आहे.

अमर्त्य हे नेमक्या कोणत्या विचारांचे आहेत? हा प्रश्न कायमच विचारला जातो. नोबेल मिळेपर्यंत कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य त्यांना भांडवलशाहीचे समर्थक समजत. तर उजवे त्यांना मार्क्सवादी मानत असत. वास्तविक सेन यांना कुठल्याही साचेबद्ध विचारसरणीत टाकता येणार नाही. उदार मानवतावादी विचारांचे ते पाईक आहेत. जात, धर्म, हे भेद त्यांना मान्य नाहीत. गरिबी हा मानवजातीचा शत्रू आहे, ही त्यांची धारणा आहे. युरोप, चीन असो, अमेरिका वा सिंगापूर, प्रत्येकातील उत्तम ते घ्यावे, हा त्यांचा आग्रह आहे. “लोकशाही काळानुरूप प्रगल्भ करावयाची असेल तर संपूर्ण समाजाची प्रगती करावी लागेल. त्यासाठी युद्ध हा अग्रक्रम चालणार नाही. सामाजिक शांतता असेल, तरच सर्व स्तरांना प्रगती करता येईल. विकासामध्ये सर्वांचा समावेश होऊ शकेल’’ हे त्यांच्या विचारांचे सार आहे. त्यांनी वेळोवेळी काँग्रेस व मार्क्सवादी पक्षाच्या सरकारांच्या धोरणांवर टीका केली आहे. डॉ. मनमोहन सिंग हे त्यांचे जवळचे मित्र असूनही “त्यांच्या कारकिर्दीत प्राथमिक शिक्षणाची उपेक्षा झाली’’ असं डॉ. सेन यांनी रोखठोक सांगून टाकलं आहे.

परंतु २०१४ साली श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अमर्त्य सेन यांच्या टीकेला सकारात्मकतेने घेण्यात आले नाही. (२०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी सेन यांच्या “एक भारतीय म्हणून मला श्री. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावे, असे वाटत नाही’’ या उद्गारामुळे गहजब उडाला होता. २००२ साली झालेल्या गुजरातमधील धार्मिक दंगलीचा त्यामागे संदर्भ होता.) उलट, सेन यांच्या मार्गात निर्माण केल्या गेलेल्या अडचणींमुळे त्यांनी नालंदा विद्यापीठातून अंग काढून घेतले.

समाजाला विचारांचा आणि विवेकाचा आधार देऊ शकणारे विचारवंत अतिशय दुर्मीळ असतात. वाणी आणि लेखणी यांतून वर्तमानाचा अन्वय घेऊन भविष्यासाठी कृती आराखडा देणारे प्रो. सेन यांच्यासारखे तत्त्वज्ञ दुर्लभ असतात. महान कलावंत प्रदीर्घ कालखंडभर एखाद्या संकल्पनेचा विस्तार करत जातात, निरनिराळ्या पद्धतीने ती समजावून सांगतात. यातून रागमालिका, चित्रमालिका व वास्तुसंकुलं निर्माण होतात. गेल्या ४५ वर्षांपासून प्रो. सेन दारिद्रयामागील अनेक कारणांचा सखोल मागोवा घेत नवीन पद्धतीने विश्लेषण करत आहेत. एकाच वेळी तज्ज्ञ व सामान्यांशी संवाद साधताना तशीच मालिका सादर करत आहेत. त्यांच्यामुळे महाकाय व्यवस्थेचे आकलन होते. जटिलता, गुंतागुंत, अव्यवस्था ध्यानात येते. प्रश्नांचे स्वरूप आणि उत्तरांची दिशा समजते. या सर्व गोष्टींची गरज आहे की नाही ही निवड समाजानेच केली पाहिजे. सर्व सीमांच्या पलीकडे जाऊन विचार करणारी प्रो. सेन, रघुराम राजन, ही प्रभावळ राष्ट्राचे भूषण असते. त्यांना नाकारल्याने त्यांचे वैयक्तिक नुकसान काहीच होत नाही. ज्ञानाचा सन्मान न करण्याने राष्ट्राची मात्र अपरिमित हानी होते. लेखक राजमोहन गांधी यांच्या “प्रेषितांचे मायदेश हेच मोल समजून घेण्यात कमी पडतात’’ ह्या प्रतिपादनाची यातून प्रचिती येते.

............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4886/Vivekiyanchi-Sangati

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......