या कथा भारतीय निवडणुकीतील चमत्कारांवर बोट ठेवतात. त्यातील विस्मित करणारे वैविध्य आणि गुंतागुंत उत्कटपणे टिपतात
ग्रंथनामा - झलक
एन. गोपालस्वामी
  • ‘अॅम्बुश : कथा मतदानाच्या’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 08 May 2019
  • ग्रंथनामा झलक अॅम्बुश : कथा मतदानाच्या Ambush : Tales of the Ballot आलोक शुक्ल Alok Shukla

केंद्रीय निवडणूक आयोगाचे माजी निवडणूक उपायुक्त आलोक शुक्ल यांच्या ‘Ambush : Tales of the Ballot’ या इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद ‘अॅम्बुश : कथा मतदानाच्या’ या नावानं नुकताच प्रकाशित झाला आहे. कवयित्री अश्विनी धोंगडे यांनी केलेला हा अनुवाद दिलीपराज प्रकाशनानं प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहाला माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.............................................................................................................................................

जवळजवळ १५० वर्षांच्या परकीय सत्तेतून स्वतंत्र झाल्यावर भारत १९५० मध्ये प्रजासत्ताक झाला. पायाभरणी करणाऱ्या आपल्या ज्येष्ठांनी बहुसंख्येने दरिद्री, मोठ्या प्रमाणात अशिक्षित असलेल्या आपल्या देशबांधवांवर गाढ श्रद्धा ठेवली. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सुशिक्षितांचे प्रमाण फक्त १५ टक्के होते. प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देऊन त्यांनी त्यांच्यावरचा विश्वास प्रकट केला. प्रत्येक प्रौढाला मतदानाचा हक्क हे त्यांच्यासाठी कायद्याचे कलम असले, तरी आपल्या देशातील स्त्री-पुरुषांनी या विश्वासाची चांगली परतफेड केली.

गेल्या साठ वर्षांत लोकसभेच्या १६ निवडणुका, विधानसभेच्या ३५० निवडणुका घेतल्या गेल्या. बंदूक नव्हे, तर मतदानाच्या सामर्थ्याने अत्यंत चांगल्या मार्गाने जनतेने आपले शासक निवडले. सत्तेचे लगाम आपल्या हातात ठेवण्यासाठी जनतेचे प्रतिनिधी निवडण्यासाठी वेळोवेळी निवडणुका घेणे, ही लोकशाहीची अर्धी खूण असेल तर आपल्याकडे लोकशाही नक्कीच आहे. आपल्या शेजारचे जे देश साधारणत: आपल्याबरोबरच स्वतंत्र झाले, त्यांच्या देशातील परिस्थितीशी तुलना करता लोकशाहीची मुळे आपल्या देशात रुजली आहेत, हे स्पष्ट आहे. लोकशाहीवरील लोकांच्या गाढ विश्वासाला धन्यवाद!

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल की, वेळोवेळी होणाऱ्या निवडणुका सुरळीत आणि बऱ्याचशा निर्विघ्न पार पडतात. या यशामुळे भारतीय निवडणूक आयोग ही जागतिक मान्यताप्राप्त संस्था झाली आहे. पण आयोगाच्या या यशासाठी केंद्र आणि राज्याच्या नागरी सेवेतील शेकडो अधिकारी व सेवकवर्ग, पोलीस खात्यातील सर्व कर्मचारी हे जीव ओतून काम करतात, हे सर्वश्रुत आहे; पण त्याची क्वचितच दखल घेतली जाते.

डॉ. आलोक शुक्लांना याचे श्रेय दिले पाहिजे की, त्यांनी या पुस्तकामधील कथांमध्ये त्यांची लक्षणीय कामगिरी नेमकेपणाने पकडली आहे. आपल्या स्वतंत्र शैलीमध्ये, काल्पनिक व्यक्तिरेखांमधून त्यांनी प्रथम छत्तीसगडमध्ये आणि नंतर निवडणुकांशी त्यांचा जो काही संबंध आला, त्याच्या निरीक्षणातील अनेक उदाहरणांमधून आपल्या कथा बांधल्या आहेत.

डॉ. शुक्ल हे छत्तीसगडमध्ये प्रमुख निवडणूक अधिकारी होते आणि नंतर भारतीय निवडणूक आयोगाचे निवडणूक उपायुक्त झाले. त्या वेळी मी मुख्य निवडणूक आयुक्त होतो. छत्तीसगडमध्ये प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून काम करताना काही मतदान केंद्रांवर झालेल्या संशयित खोट्या मतदानाची चौकशी करण्याच्या आयोगाच्या सूचनेची अंमलबजावणी करताना त्यांना आपल्या जीवावरचा धोका पत्करावा लागला, याची फार थोड्यांना कल्पना असेल. कर्तव्याच्या हाकेपलीकडे जाऊन त्यांनी निर्भयपणे केलेले काम प्रशासकीय सेवेच्या उच्च प्रथेला शोभून आहे.

डॉ. शुक्ल हे तंत्रज्ञाननिपुण आहेत. मतदारांची ऑनलाईन नोंदणी पद्धत आणि छत्तीसगडमधील मतदारयादीतील सुधारणांच्या विकासाची योजना त्यांनी कार्यान्वित केली, याकडे निवडणूक आयोगाचे लक्ष गेले. त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून छत्तीसगडमध्ये समर्पित वृत्तीने केलेल्या उत्तम कामामुळे त्यांना भारतीय निवडणूक आयोगात बोलावले गेले. तिथे त्यांनी नियमानुसार पद्धतशीर काम केले. तिथेही व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) (आपले मत कोणाला गेले आहे, हे मतदाराला कळण्याची सोय) तंत्रज्ञान विकसित करण्यात ते सहभागी होते.

भारतीय निवडणूक आयोगात सहभागी झाल्यावर लगेचच सार्वजनिक प्रशासकीय अत्युत्कृष्ट सेवेबद्दल पंतप्रधानांच्या विशेष पुरस्काराने (प्राईम मिनिस्टर्स अ‍ॅवार्ड) त्यांचा सन्मान झाला. छत्तीसगडचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक होण्यापूर्वी छत्तीसगडमध्ये भातशेतीची खरेदीप्रक्रिया आणि सार्वजनिक वितरण-व्यवस्था याचे संगणकीकरण करण्यात असलेल्या सहभागासाठी हा पुरस्कार होता.

छत्तीसगडमधील मितानिन (Mitanin) या खूप मोठ्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमातही त्यांचा सहभाग होता. कथाकार हा डॉ. शुक्ल यांच्या व्यक्तित्वातील एक नवा पैलू या पुस्तकाच्या निमित्ताने उजेडात येत आहे. निवडणुकीशी संबंधित घटनांवर त्यांच्या कथा आधारित आहेत. जवळजवळ या सगळ्या वास्तव जगातील कथा आहेत, पण कल्पित व्यक्तित्वांमागे त्यांची खरी ओळख झाली आहे.

‘दबा धरून’ या कथेत नक्षलग्रस्त भागात निवडणुकीशी संबंधित ड्युटी करताना पोलिसांच्या सैन्यदलाला जे धोके पत्करावे लागतात, त्यांचे क्लेशदायी अनुभव व्यक्त होतात. ‘कर्तव्याची हाक’ ही कथा दूरवरच्या दुर्गम प्रदेशात मतदान घेणाऱ्यांना करावे लागणारे शारीरिक कष्ट, गीरच्या जंगलात केवळ एका मतदारासाठी उभे केलेले मतदान केंद्र, या गोष्टी रेखीवपणे उलगडून दाखवते. ‘बदलते वास्तव’ ही कथा दादा माणसे निवडणुकीच्या लुच्चेगिरीच्या क्लृप्त्या कशा हुशारीने वापरतात याचे गंभीरपणा न आणता चित्रण करते.

या आणि इतर अनेक गोष्टी भारतीय निवडणुकीतील चमत्कारांवर बोट ठेवतात. भारताच्या निवडणूक दृश्यांमधील हे विस्मित करणारे वैविध्य आणि गुंतागुंत या कथांनी फार उत्कटपणे टिपली आहे. मला खात्री आहे की, माझ्याप्रमाणेच इतर अनेक जण या कथा उत्सुकतेने वाचून त्यांचा आस्वाद घेतील.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......