रवीन्द्रनाथ टागोरांची समकालीन समयोचितता
ग्रंथनामा - झलक
संजॉय मुखर्जी
  • टागोर आणि ‘चीन आणि भारत’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 07 May 2019
  • ग्रंथनामा झलक रवीन्द्रनाथ टागोर Ravindranath Tagor

आज वीन्द्रनाथ टागोर यांची १५९वी जयंती. त्यानिमित्त ‘चीन आणि भारत : इतिहास, संस्कृती, सहकार्य आणि चढाओढ’ या अनुवादित पुस्तकातील संजॉय मुखर्जी लिखित प्रकरणाचा हा संपादित अंश....

.............................................................................................................................................

भारत-चीन परस्परसंबंध आणि आकलनाचे दृढीकरण, आधुनिक शिक्षण, विशेषतः व्यवस्थापन शिक्षणामध्ये पर्यायी रूपबंध निर्माण करणे या अनुषंगाने ‘जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान समृद्धीच्या कालखंडात रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या कवी आणि तत्त्वज्ञाची समयोचितता काय?’ एक प्रश्न उपस्थित होतो. उपरोक्त प्रश्नाचा धांडोळा घेताना काही मुद्दे अधोरेखित केले आहेत.

टागोर प्रामुख्याने कवी असले तरी, प्राचीन भारतीय साहित्य म्हणता येईल अशा उपनिषदांमुळे बाल्यावस्थेपासून त्यांचे आत्मभान अधिकाधिक तीक्ष्ण होत होते. उपनिषदांमध्ये नमूद संदेश म्हणजे केवळ बौद्धिक विचारमंथन किंवा युक्तिवादाचे फलित नव्हते, तर, भारतीय ऋषीमुनींची स्व-जाणीव आणि सत्याचे भान त्यात प्रतिबिंबित होते. हे एकप्रकारे भारतीय लोकबंध आणि संस्कृतीचे सार आहे. या आत्मभानाचा प्रसार जगभर झाला होता. त्याचा प्रभाव आणि समयोचितता सर्वत्र समान होती. श्वेत-श्वतर उपनिषदातील सर्ग २, ऋचा ५ ची सुरुवातच ‘श्रुण्वन्तू विश्वेअमृतस्य पुतः’ अशी आहे. म्हणजेच, हे साधूमुनी केवळ भारतीयांना नव्हे तर, जागतिक व्यक्तिसमुदायाला संबोधित करत होते. टागोरांच्या शिक्षण आणि मानव विकासावरील विचारांचा धागा उपनिषदांमध्ये सापडतो. या विचारांची वैश्विक साद विश्वभारती या नामकरणात दृग्गोचर आहे. यामधील ‘विश्व’ जागतिक साद आणि ‘भारती’ भारतीय मूलसूत्र अधोरेखित करते. ‘एकोप्याने राहणे ही माणसाची मनीषा आणि क्षमता देखील असते. यातूनच मानवतावाद जन्माला येतो. यावर आधारित विश्वभारती हा जागतिक समाजाचा जगावेगळा आविष्कार आहे’.

विशेषतः भारत-चीन संबंधांच्या संदर्भात, टागोरांनी चिनी संस्कृतीचे सहानुभूतीपूर्वक गोडवे गायले. त्यांच्या घडणीच्या कालखंडात चीनला भेट दिलेल्या पूर्वजांचा वारसा त्यांना लाभला होता. तथापि, नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ आणि तत्त्वज्ञ अमर्त्य सेन यांनी नमूद केल्याप्रमाणे, ‘पाश्चिमात्य जगताच्या प्राधान्यांमध्ये काहीतरी गूढ अपूर्णत्व आहे याबाबत कवींची खात्री होती. ही नेमकी उणीव भरून काढण्यासाठी भारत आणि चीन येथील पौर्वात्य विचार विधायक योगदान देण्यास पात्र होता’ (सेन २०११, ४). आशियाचा वट प्रस्थापित होण्यासाठी टागोर प्रयत्नशील होते. पाश्चिमात्य भौतिकतावाद आणि प्रखरतेचा सामना करण्यासाठी मानवतावादाचे तत्त्वज्ञान आधारभूत ठरणार होते. या अनुषंगाने, १९१६ मधील टोकियो इम्पिरियल युनिव्हर्सिटी येथील व्याख्यानात त्यांनी प्रखर वक्तव्य केले. त्यायोगे पाश्चिमात्य संस्कृती आणि सभ्यतेची मूलभूतता यांना आव्हान देण्यात आले.

प्राचीन ग्रीसचा दिवा आता मालवला आहे. रोमचा प्रभाव विस्तीर्ण साम्राज्याच्या अवशेषांखाली पुरला गेला आहे. परंतु, समाज आणि आध्यात्मिक मानवी आदर्शांवर आधारित भारत आणि चीन येथील संस्कृती अजूनही जीवित आहेत. (दास गुप्ता २००९, २४६) त्यांच्या चीनमधील व्याख्यानांच्या दरम्यान या टीकेने अधिकच तीव्र रूप धारण केले. ही टीका टोकदार झाली. ‘या जगातील एखादे राष्ट्र एकाच वेळी भौतिकतावादी आणि श्रेष्ठ असू शकते यावर मी विश्वास ठेवू शकत नाही... भौतिकवाद सीमित स्वरूपाचा असून तो मानणारे लोक सुखोपभोगाचा आणि संपत्ती जतन हक्काचा दावा करतात.’ (टागोर २००९, ७७).

या टीकेनंतर त्यांनी आशियाचा वट प्रस्थापित व्हावा असा पर्याय सुचवला: ‘पूर्णत्वाकडे वाटचाल करण्यात खरा आनंद आहे. हे पूर्णत्व लौकिकतेच्या वृद्धीने नव्हे तर त्याच्या त्यागाने साध्य होणार आहे’. चीन येथील त्यांच्या सर्व व्याख्यानांद्वारे आशियामध्ये बळ एकवटण्यासाठी वैचारिक आणि काल्पनिक पातळीवर ते एकप्रकारे युद्धच छेडत होते.

आशियाचे बळ ऐक्य, सचोटीवरील अढळ श्रद्धा यामध्ये आहे हे आपण जाणले पाहिजे. विलगतेच्या किंवा स्वार्थाच्या भावनेने हे बळ साध्य होणार नाही... आशियामध्ये आपण सर्वांनी आपण तांत्रिकदृष्ट्या केवळ औपचारिकता म्हणून संघटित होऊ नये तर, सह-अनुभूतीच्या आधारे एकत्र यावे. यंत्रांची संघटित ताकद आपल्यावर वार करून आपला नाश करण्यास सज्ज आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आत्मबळ आवश्यक आहे. यासाठी संख्यात्मक नव्हे, तर गुणात्मक एकीकरण आवश्यक आहे.

पौर्वात्य राष्ट्रांचा वट प्रस्थापित झाल्यास सर्वत्र प्रभावी सुसंस्कृतता नांदेल यावर त्यांची अढळ श्रद्धा होती. पौर्वात्य जग जागृत झाल्याने आपण आपल्या संस्कृतीचे महत्त्व आणि वैश्विक ठसा नव्याने जाणून घेण्यास प्रवृत्त होऊ. त्या संस्कृतीच्या वाटचालीत आलेले अडथळे नाहीसे करणे, तीमध्ये कुंठितावस्थेमुळे आलेले दोष काढून टाकणे आणि सर्व मानव वंशांतील संपर्काचा हा मार्ग खुला करणे हे आपण जाणीवपूर्वक केले पाहिजे. (दास १९९९, ९९)

अशा प्रकारे, भारत-चीन स्नेहसंबंधांबाबत टागोरांना कायमच तळमळ होती. चीन भवनाच्या निर्माणात ती दृग्गोचर होते. त्यांच्या विद्यापीठातील चीन भवन म्हणजे या स्नेहसंबंधांचे दृढीकरण आणि जोपासनेचे प्रतीक आहे. याबाबतचा तपशील पुढे आला आहे.

...विसाव्या शतकामध्ये, टागोर सर्वंकष मानवी विकासासाठी सर्वांगीण शिक्षणाचे समर्थक होते. त्यांची ही दूरदृष्टी सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी कंटाळवाण्या कोलकता शहरापासून दूरवर निसर्गाच्या सानिध्यात विद्यापीठाची स्थापना केली. कोलकात्यातील शालेय जीवनाचा टागोरांचा स्वानुभव फारसा बरा नव्हता. घोकंपट्टीची कंटाळवाणी पद्धत त्यांना भावली नाही. त्यांच्या मते, अशी पद्धत अर्थहीन आणि अचेतन होती. औपचारिक शिक्षणाशी संबंधित त्यांच्या काही निराशाजनक स्मृती येथे नोंदवल्या आहेत. त्यांच्या मते, औपचारिक शिक्षणामुळे केवळ माहितीचा साठा होतो आणि ही माहिती केवळ ऐहिक उपभोगासाठी वापरावी असे अभिप्रेत असते.

एखाद्या बालकाचे आयुष्य शिक्षणनामक कारखान्यात आणले जाते. येथील वातावरण अचेतन, रंगहीन असते. चार भिंतींतील हे जग सुन्न असून वैश्विकतेपासून विलग आहे. जगामध्ये आनंदाने विहार करण्याच्या ईश्वरदत्त देणगीसह आपण जन्माला आलो. मात्र, शिस्तरूपी दडपणाने हा आनंद जेरबंद केला. जणू तो आनंद डांबूनच ठेवला आहे. यामुळे बालमनाची सर्जनशीलता खुंटली. खरे तर बालमन सतत चंचल आणि सजग असते, निसर्गाकडून प्रत्यक्ष भरभरून ज्ञान घेण्यास आतुर असते. मात्र, आपण एखाद्या संग्रहालयातील नमुन्यांप्रमाणे शिथिल बसून राहतो आणि त्या अवस्थेत शिक्षणाच्या धड्यांचा आपल्यावर मारा केला जातो... आणि निसर्गहृदयातून वाहणारा कल्पनांचा चिरंतन झरा मात्र आपल्या मनाला गवसत नाही (टागोर, २००९, ८७-८८).

व्यवस्थापन शिक्षणातील अगदी अलीकडच्या काही घडामोडींचा आढावा घेतला असता, त्यामध्ये टागोरप्रणीत विचारांतील समान सूत्र आढळते. रूढार्थाने प्रचलित शिक्षण पद्धतीकडून सचेतन शिक्षणपद्धतीकडील वाटचाल हे ते समान सूत्र होय. अशा अध्ययन पद्धतीमध्ये शिक्षकांनादेखील विद्यार्थ्यांसह संवाद साधताना विद्यार्थीच होणे भाग पडते. व्यवस्थापन शिक्षणाची उपरोक्त पद्धत निर्माण होण्यास स्नेहीजनभाव असलेला आणि सरधोपट पद्धतीचा भांडवलवाद जबाबदार आहे. यंत्रातून एखादे उत्पादन बाहेर पडावे तसे यातून विद्यार्थी बाहेर पडतात. असे विद्यार्थी केवळ कारकीर्द घडवणे, भौतिकवाद आणि उपभोक्तावाद यांबाबत आग्रही असतात. यामुळेच जगभरातील विवेकी अभ्यासक, उद्योजक आणि सल्लागारांना व्यवस्थापनाचा पर्यायी रूपबंध शोधण्याची गरज भासली. व्यवस्थापन शिक्षण आणि कृतीमध्ये कामाचा अर्थ, जगण्याचे उद्दिष्ट, प्रेरणादायी नेतृत्व, उद्योजकांचे सामाजिकदायित्व, निसर्ग आणि पर्यावरणाबाबतची जाणीव, नीतिमूल्यांप्रती बांधिलकी यांबाबत शोध घेण्याची गरजभासली. जगभरातील प्रेरणादायी नेते इतिहास, साहित्य, चरित्र, पौर्वात्य ज्ञानातून शिक्षणाचे पर्यायी स्रोत आणिपद्धती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हे रचनाबद्ध व्यवस्थापन साहित्य आणि अभ्यासक्रमाच्या परिघापलीकडले आहे. टागोरांचे जीवन, आत्मभान, व्यासंग आणि शिक्षणसंबंधी प्रयोग समकालीन व्यवस्थापन शिक्षणाच्या अनुषंगाने अधिकाधिक प्रसंगोचित ठरतो. यामुळे भांडवलवादाचा प्रभाव नाहीसा होऊन व्यवस्थापन शिक्षणपद्धती सजीव आणि अधिक आनंददायी होईल, त्याला मानवतेची छटा असेल.

टागोर, त्यांचे कार्य आणि संदेश कालातीत आहे. कविता आणि तात्त्विक मांडणीच्या पलीकडे जाणारा टागोरप्रणीत संदेश ज्ञान आणि उपयोजनाच्या हरएक शाखेसाठी समर्पक आहे. व्यवस्थापन अभ्यासशाखादेखील याला अपवाद नाही. याशिवाय, टागोरांचे सक्रीय आणि यशस्वी नेतृत्व वैश्विक प्रसंगोचीतता, सर्वांगीण शिक्षणातील उत्तमता आणि शाश्वतता, यावर आधारित होते. टागोरांनी स्थापन केलेले विद्यापीठ आजही अबाधित असून जगभरातील अभ्यासकांसाठी आकर्षण आहे. एतद्देशीय प्रेरणा आणि वैश्विक आवाहन, समग्र व्यवस्थापन तत्त्वज्ञान आणि शिक्षण, भावभावना आणि सौंदर्याभिरुची जोपासना, मानवाचे उदात्त प्रतिमान, व्यवस्थापन आणि मानव्यशास्त्रे, मौन आणि मनोलय, उद्योजकांचे सामाजिक भान आणि समावेशी भूमिका, नीतितत्त्वे आणि मूल्यांप्रती निष्ठा ही तत्त्वे म्हणजे टागोरांनी आधुनिक व्यवस्थापन अभ्यासक्षेत्राला दिलेला नवीन आयाम आहे.

.............................................................................................................................................

चीन आणि भारत : इतिहास, संस्कृती, सहकार्य आणि चढाओढ - संपादक : पारमिता मुखर्जी, अर्णब के. देब, मिआओ पांग

मराठी अनुवाद : देवयानी देशपांडे, प्रकाशक : सेज प्रकाशन, नवी दिल्ली.

पाने : २६८, मूल्य : ४९५ रुपये

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......