अजूनकाही
चंद्रपुरातील तरुण कवी इरफान शेख यांचा ‘माझ्यातला कवी मरत चाललाय’ हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. संवेदना प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या संग्रहाला समीक्षक डॉ. किशोर सानप यांनी सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश...
............................................................................................................................................................
कवी इरफान शेख यांचा ‘माझ्यातला कवी मरत चाललाय’ हा खरे तर तिसरा कवितासंग्रह मानायला हरकत नाही. तरुणाईत कवितेची उमेदवारी करणाऱ्या या कवीचे पहिले कवितासंग्रह अनुक्रमे ‘वेदनांच्या खोलीत’ (२००३) व ‘मुक्तछंद’ (२००५) त्याच्या मित्रांनी प्रकाशित केलेले आहेत. ‘कोवळे पाषाण’ (२००३) हा बालकविता संग्रह त्याच्या शाळेतील शिक्षकांनी मिळून शाळेतील विद्यार्थ्याचे कौतुक म्हणून प्रसिद्ध केला होता. खुद्द आपला स्वतंत्र काव्यसंग्रह प्रकाशनाच्या भानगडीत न पडता इरफानने ‘आमच्या कविता’ (२०१०) हा प्रातिनिधिक कवींचा कवितासंग्रह प्रकाशित केला. २०१८ मध्ये वयाच्या पस्तीशीत इरफानचा ‘माझ्यातला कवी मरत चाललाय’ हा अत्यंत महत्त्वाचा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे.
२०१२ पासून इरफान यांनी सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरनगरीत स्थापन केला. गेल्या दहा वर्षांपासून इरफान वाङ्मयीन चळवळीत सक्रिय असून, नव्या उमेदीत लेखन करणाऱ्यांना साहित्याचे पीठ उपलब्ध करून देण्यासाठी धडपडतो. राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार, कविसंमेलने, साहित्य संमेलने आदींचे यशस्वी आयोजन करणाऱ्या सहकाऱ्यांचा चमूही इरफानने चंद्रपूर नगरीत उभा केला आहे. संस्थापक अध्यक्ष म्हणून इरफान सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक चळवळीत कार्यरत असून सूर्यांशला प्रतिष्ठित करण्यातही त्याचा मोठा वाटा आहे.
व्यक्ती ते समष्टीच्या जगण्याला अभिव्यक्तीचे रूप
खरे तर हा युवा कवी आपल्या समकाळातल्या व्यक्ती ते समष्टीच्या अवकाशातील जगण्याला आणि दुखण्याला कधी छंदातून, तर कधी मुक्तछंदातून उन्मुक्त आणि आर्त, उत्कट, तीव्र तर कधी कोमल अभिव्यक्तीचे रूप देणारा कवी आहे. तरुणाईत जगतानाही आपल्या घरातल्या मायबापांच्या रापलेल्या हातांच्या स्पर्शातून उगवलेली शब्दफुले कधी तरल, कधी तिरकस, तर कधी उग्रपणे परंतु हिंस्त्र भाषा टाळूनच काव्याभिव्यक्ती करणारा आहे.
हा कवी तरुणाईत प्रेमविव्हल आणि प्रेमव्याकूळ होतो. परंतु त्याची आर्तता विठोबारखुमाईच्या भक्तिभावाने व्यक्त होऊ पाहते. कवितेत त्याची वाट पाहणारी प्रेयसी असते ती, संसाराचा तारू सांभाळणारी निकाह करून घरात नांदायला आलेली, संवेदनशील व संसारमग्न बायको. मुलीचे आणि मुलाचे वाट पाहणे ही त्यांची आर्तता आणि प्रेमविव्हल व्याकूळता असते. निवांतपणे शेजाऱ्यांच्या सुखादुःखात खांद्यावर दुःखांची ओझी वाहून नेणारी घरातली व बाहेरचीही मोहल्ल्यातली माणसं असतात. बुरख्यातल्या बायकांचे दुखरे जग जसे बायकांना नकोसे असते, तसेच ते कवीलाही नष्ट करायचे असते. शिक्षणानेच माणूस जीवनातल्या आणि जगातल्या सर्व दुःखांशी दोन हात करून सुखसमाधानाने जगू शकतो हेही कवीला पदव्युत्तर शिक्षण घेऊन अभावांवर मात करताना अनुभवानेच पटलेले असते. शिक्षणातूनच माणूस घडू शकतो आणि जगालाही तो घडवू शकतो, या डॉ. बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या तत्त्वत्रयीच्या अंगीकारातून अल्पसंख्याकांना या नव्या जगात जगता येईल; यावरही कवीचा विश्वास आहे. जात आणि धर्म यापेक्षाही शिक्षण हे माणसाला आकार देणारे संजीवक रसायन आहे. हमीद दलवाईंपासून मलाला, तस्लिमा, रझिया आदींनी हातावर जीव घेऊन आपल्या समाजात जनजागृतीचे अभियान राबवले. कवीसुद्धा याच मानवतावादी अभियानाचा पाईक असल्याचे त्याच्या कवितेतून व्यक्त होते.
कवीच्या कवितेचे स्वरूप व अभिव्यक्ती
इरफानची कविता ही जगणं आणि कविता या जीवनाच्या परिप्रेक्ष्यात आपली एक जागा तयार करताना दिसते. त्याच्या पस्तीशीतल्या काव्यविश्वाचे मर्म शोधताना तीन परि आशयाभिव्यक्तीला व्यापून घेताना दिसतात.
एक, कवीचं स्वतःचं जगणं आणि अनुभवणं आत्मबद्ध व शब्दबद्ध करणारं कवितेचं भावविश्व. उदाहरणार्थ- ताकद बापाच्या बोटांमधली, तुझे थांबणे हेच माझे मरणे, तोरण, दिवसभराच्या तणावाचा ओघळ, मायचं जगणं आमच्यासाठी, माणसाचे चित्र, फुलांचं चित्र काढणाऱ्या मुली, मनाच्या ओहोटीच्या काळातही; तू, मी आणि कविता; बायको, कविता आणि मी; विठ्ठला, कपाटात बंद पुस्तके पाहतात काचेआडून, दुःखाची वेस, जाड भिंगाचा चष्मा लावून बसलेली आजी, कुठल्या पारड्यात मोजावी तिच्या दुःखाची गाथा, मुलाच्या ओठांमधले अपेक्षांचे थवे, झाडाने तोडले नाते मुळासकट मातीशी, सर्व वादळांची शांतता, कधी कधी येते माझी आजी अचानक या कवितांतून कवी संसारगाथेला अनुभवांनी प्रतिमांकित करून मनातल्या दुखऱ्या जखमांना मुक्तीची पायवाट देताना दिसतो.
दोन, व्यक्ती ते समष्टीच्या भोवतालातील सुखाच्या अपूर्ण कविता आणि दुःखांच्याही अर्धवट कविता. उदाहरणार्थ- वेदनेच्या पखाली, वेदनेची हळवी ओल, गाय आणि निबंध, बाई खरंच शतकांपासून आरस्पानी, पौरुषी अरेरावी, एका अनाम मित्रासाठी, यायला हवेत रहमत के फरिश्ते, जातीचा विकराल राक्षस, शून्यातून शोधत असलेले अस्तित्व, सरपण वेचणाऱ्या बाया, शेवटी जळणं बाईच्याच वाट्याला, लिहिता न आलेल्या कहाण्या, हातातून निसटावी माळ तशी, कशी लिहू पाण्यावर कविता, पाऊस आणि माती, मोहल्ल्यातले आठवपक्षी, लोक अचानक भेटलेले, दिवसभराची गजबजलेली गल्ली या कवितांतून कवी आपल्या भोवतालातील जगण्याला आणि जगण्यातील असुरक्षिततेला व्यक्त करतो. भोवतालातील जमिनीखाली बसणारे विनाशाचे हादरेही कवी अनुभवतो. व्यक्त करतो.
तीन, कवीचं कवी म्हणून असणं तपासताना व एकूणच सांस्कृतिक ऱ्हासाची उलटतपासणी करताना, कवी आणि कवीच्या नैतिकता व प्रतिभेचा धारदार धांडोळा घेणारं ऱ्हासशील सांस्कृतिक जगही कवी चितारतो. उदाहरणार्थ- माणूस आतला आणि बाहेरचा, माझ्यातला कवी मरत चाललाय, मानगुटीवर बसलेला कवितेचा वेताळ, कवितेचा मृत्यू, कवितेने बोलत राहिले पाहिजे, कविताच काठी आंधळ्याची, अर्धवट कविता १, अर्धवट कविता २, मी कविता करतो म्हणजे नेमके काय करतो, संभ्रमित कविता या कवितांच्या अभिव्यक्तीतून कवी, कविता, वाङ्मय, कवीची नैतिकता, कवीची प्रतिभा, कवी कविता का लिहितो, एकूणच समकालीन सांस्कृतिक मूल्यांची उन्मादी पीछेहाट कवीला अस्वस्थ करणारी आहे. परिणाम स्वरूप, माझ्यातला कवी मरत चाललाय की काय, हा प्रश्न कवी स्वतःसह इतरही कवींना विचारतो आहे. समकाळात दुःख पर्वताएवढे आणि सुख जर जवाएवढेच असेल, तर कवितेचे सृजन तरी शक्य आहे काय? मानगुटीवर बसलेला कवितेचा वेताळ, ही एक नवीन प्रतिमा निर्मून कवी सबंध काव्यविश्वाच्याच मानगुटीवर वेताळ बसल्याची कल्पना करतो. कवींवर नैतिकतेचा किंवा प्रतिभेचा अंकुश नसला, तरी वेताळाचा जागता पहारा असायलाच हवा, असे कवीला वाटते.
इरफानच्या या संग्रहातील एकूणच कवितांच्या सृजनावर समकालीन काव्यजगताच्या उलटतपासणीचा गडद परिणाम जाणवतो. प्रत्येकच कालखंडात आपल्या काळातल्या काव्याची कठोर चिकित्सा करण्यासाठी नवीन कवींनीच खरे तर पुढाकार घ्यायला हवा. कवितेच्या मार्गातील काटे-कुटे साफ करण्याचे हे दायित्व इरफाननेही पार पाडल्याचे दिसते.
कविश्वरांचा तो आह्मांसी विटाळ
इरफान एकाच वेळी कविताही लिहितो आणि आपल्या कवितेची चिरफाड करताना एकूणच कवितेच्या विशुद्ध जगाची जाणीवही तीव्रपणे करून देतो. तरुणाईतच हा कवी जर इतका कठोर आत्मचिकित्सक असेल तर उद्या त्याच्या कवितेला नव्या जगाची कविता म्हणून जरूर भवितव्य राहील.
समकाळात म्हणजेच एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे राहून ग्लोबल जगाकडे पाहताना कवीला आपल्या मोहल्ल्यातल्या वेदनांच्या पखाली वाहणाऱ्या गोरगरीब, उपाशी-तापाशी राहून, हातावरची पोटं जगवणाऱ्या माणसांच्या जगण्याचे तीव्र भान आहे. सोबतच मोलमजुरी करणाऱ्या मायबापांच्या झोपडीत इरफानला जगताना कुटुंबाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या वाताहतींशी अटीतटींची झुंज द्यावी लागली, त्या जगण्याच्या कलहांना आणि कल्लोळांना काव्यरूप देताना जीवघेण्या प्रतिभा सृजनांच्या कळांना सोसावे लागले. दुःख आणि वेदनांच्या नाना कळांनी व्यापलेल्या अवकाशाची अभिव्यक्ती इरफानच्या कवितेतून होतानाच त्याला, माझ्यातला कवी मरत चाललाय की काय, असा प्रतिभेचं अवघं आभाळ शब्दांनी रितं करणारा प्रश्न पडतो. हा प्रश्न खरे तर केवळ इरफानलाच नव्हे, तर प्रत्येकच नव्या कवीला समकाळात सतावणारा व अस्वस्थ करणारा प्रश्न असायला हवा. आपल्यातला कवी मरत चाललाय काय, या प्रश्नाचे उत्तर खरे तर प्रत्येकच काळात कविता लिहिणाऱ्या प्रतिभावंतांनी समाजाला आणि स्वतःलाही द्यायला हवे.
वयाच्या उमेदीतच हा प्रश्न कवीचे भावविेश व काव्यविश्व पोखरताना दिसतो. हे स्वतःलाच पोखरणे आणि मूळ भूमीचा तळठाव घेणे, खरे तर प्रत्येकच कवीला आवश्यक असते. अक्षरांचा श्रम करणारे आणि कविश्वरांचा विटाळ मानणाऱ्या तुकोबांनी सतराव्या शतकातच प्रत्येक कवीला हा कानमंत्र दिला होता. तो कालांतरात आणि मानसन्मानाच्या कोलाहलात कवींना ऐकूच येत नाही. कवीची नाममुद्रा ही जबाबदारीची आणि समाजाला नवे जीवनमूल्य देण्याची आणि त्यांचे समकाळातले जगण्याचे प्रश्न सोडवण्याची काव्यमुद्रा असते. याची जाणीव कवींना व्हायला हवी.
इरफानला ही जाणीव तीव्रपणे झाल्याचे त्याच्या एकूणच काव्यलेखनातून व संग्रहातील इतरही कवितांतून झाल्याचे दिसते. कवी असणे सिद्ध करणारी हीच कवीची रूढी त्याच्या काव्यसृजनाच्या आत्मगर्भातून अधोरेखित होते.
माझ्यातला कवी मरत चाललाय...
इरफान या संग्रहात जवळपास कवितांमध्ये कवी आणि कवितेची कठोर झाडाझडती घेताना दिसतो. प्रत्येकच काळात कवीने स्वतःला आणि कवितेला तपासूनच बघायला हवे. कविता हे जर जगातल्या दुःखमुक्तीचे माध्यम असेल, तर ते माध्यम अत्यंत तरल व विशुद्धपणे केवळ कवितेच्या सृजनासाठीच वापरले जायला हवे. खरे तर असे होत नाही. कवी कविता लिहून कविश्वर बनतात आणि कवितेचे माध्यम आपल्याच सुखासन्मानासाठी वापरतात. अशा सालोमालो कवींना तुकोबांनी,
आपुलिया पोटासाठी करी लोकांच्या गोष्टी,
तुका म्हणे शिंदळीच्या व्यर्थ श्रमविली वाचा...
या शब्दांत फटकारले होते. ‘स्वरे आपणच रिता, अंगी ज्ञानपणाची मस्ती’ अशाही शब्दांत कविश्वरांना सुनावले होते.
कवीही समकाळात आपल्या कविजगताला काहीसा असेच फटकारताना दिसतो. माझ्यातला कवी मरत चाललाय, असे जेव्हा म्हणतो तेव्हा आजच्या समकाळातल्या तमाम कवींना कवी म्हणून आपली आणि कवितेची उलटतपासणी करण्याचा सल्लाही देतो. समकाळ हा विषण्ण आणि अस्वस्थ करणारा आहे. कवीला कविताच लिहिता येत नाही. शब्दांवरही हक्क सांगता येत नाही. कविता लिहायला घेतली, की शब्द कवीशी अबोला धरतात. कवीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताना कविता कवीला अनेक प्रश्न विचारताना जराही कचरत नाही. कवीला कवितेशी नजरही मिळवता येत नाही.
समकाळात कवीला कितीतरी प्रश्न कविताच विचारते तर कवीजवळ कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नसतं. शेवटी कवीला वाटतं, मला कळलंच नाही अजूनही की, माझ्यातला कवी मरत चाललाय की काय? जगातल्या कुण्याही प्रतिभावंताच्या सृजनभूमीलाच सतत हादरे देणारा हा प्रश्न कवी विचारतो, तेव्हा त्याच्या जवळ कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नसते. मग कोण कवी कवितेच्या या समकाळातील जीवघेण्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो? कवीच्या मानगुटीवर तर कवितेचा वेताळ सतत प्रश्नांची मालिकाच घेऊन बसलेला असतो!
............................................................................................................................................................
'माझ्यातला कवी मरत चाललाय' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4807/Mazyatla-Kavi-Marat-Chalalay
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Fri , 26 April 2019
डॉक्टर किशोर सानप, पुस्तक परिचय व इरफान शेखांचं व्यक्तीचित्रण आवडलं. मला कवितेतलं फारसं कळंत नाही. मात्र या कवीस आपला अनुभव उत्कटपणे वाचकापर्यंत पोहोचवायचा आहे इतकं कळतं. इतकं संवेदनशील काव्य प्रसवूनही आज इरफानवर शब्द नाराज आहेत. एक कवी म्हणून तो आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. यावर मार्ग म्हणजे ज्या आर्ततेने त्याने विठोबाची आळवणी केली त्याच आर्ततेने सरस्वती मातेस हाक मारावी. शब्दांना यथार्थत्व प्राप्त करून देणारी तीच आहे ना? जमल्यास कवीस हा अभिप्राय कळवणे. धन्यवाद! बाकी, वास्तवाला भिडण्याची ताकद दाखवल्याबद्दल इरफान यांचं कौतुक आहे. आपला नम्र, -गामा पैलवान