महाराष्ट्रातील १९४७ नंतरच्या जगात जगणाऱ्या बाईच्या आयुष्याचा संपूर्ण पटच येथे उलगडत जातो
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
दीपक कसाळे
  • ‘आरपारावलोकिता’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 19 April 2019
  • ग्रंथनामा शिफारस आरपारावलोकिता Aarparavlokita विद्युत भागवत Vidyut Bhagvat

स्त्रीवादी विचार अभ्यासकीय शिस्तीत आणण्याचा यशस्वी प्रयत्न करणाऱ्या विद्युत भागवत यांनी साहित्य, भाषाशास्त्र, समाजविज्ञान, स्त्रीप्रश्नाचा अभ्यास आणि संशोधन असा अथक प्रवास केला. साहित्याच्या क्षेत्रात ललित निबंधांपेक्षा वेगळ्या वाटेने जाण्याचा, कादंबरीच्या रूपाने केलेला हा त्यांचा प्रयत्न मात्र पहिलाच आहे.

जन्मापासून मृत्यूच्या दारात आलेल्या जानकीची ही कहाणी आहे. मराठी साहित्यात समर्थ लेखकांनी भिन्न टप्प्यावर पांडुरंग सांगवीकरसारख्या कहाण्या लिहिल्या. मात्र एखाद्या साध्यासुध्या मध्यमवर्गीय शहरी कुटुंबात जन्मलेल्या आणि काळाच्या एका विशिष्ट टप्प्यावर, म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात वाढलेल्या मुलीची कहाणी मात्र आपल्याला तशी आढळत नाही. मालतीबाई बेडेकरांची ‘शबरी’ कादंबरी आठवते, पण तसे उदाहरणही दुर्मीळच. शेवटी ‘कळ्यांचे नि:श्वास’ गाजले आणि ‘शबरी’ मागेच पडली.

ही कादंबरी म्हणजे आत्मकथन नाही तसेच सामाजिक निबंधवजा दस्तऐवजही नाही. १९७० च्या आसपास जन्मलेल्या नव्या पिढीतील खणखणीत स्त्रीवादापेक्षा जानकीचे परिप्रेक्ष्य वेगळे आहेत, हे सतत जाणवून ही संहिता निर्माण झालेली आहे. यातील जानकी म्हणजे कोणत्याही एका स्वच्छ निर्णयापाशी येता न येणाऱ्या पिढीची प्रतिनिधी आहे.

भावंडांबरोबर वाढणारी आणि शहरी मध्यमवर्गीयतेकडे जाऊ पाहणारी जानकी अगदी सर्वसामान्य कुटुंबातली आहे. तिला स्त्री विरुद्ध पुरुष असे काही पाहणे जमत नव्हते. परंतु, तिला हळूहळू अनुभवातून आणि अभ्यासातून पुरुषसत्ताकता आणि जातीव्यवस्थेतील विषमता आतून जाणवली आणि त्याबद्दल ती बोलते आहे. महाराष्ट्रातील १९४७ नंतरच्या जगात जगणाऱ्या बाईच्या आयुष्याचा संपूर्ण पटच येथे उलगडत जातो.

जानकीला निर्माण करणाऱ्या विद्युत भागवत यांना स्त्री लेखिका म्हणून उभे रहायचे नाही तर स्त्रीवादी परिप्रेक्ष्य घेऊन उभे रहायचे आहे. विद्युत भागवत यांनी १९७४-७५मध्ये एक वाक्य मनावर कोरले होते. ते म्हणजे ‘जीवनातील प्रत्येक पावलावर लिंगभावात्मक आशय आकार घेत असतो’. म्हणूनच सर्व धैर्य गोळा करून उलट-सुलट विचार करणाऱ्या जानकीला प्रत्येक टप्प्यावर दिसणाऱ्या फटी लिहून काढण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. अशा फटी टाळता येत नाहीत, हाच तो भारतीय गुंतागुंतीचा संदर्भ.... तो सुटता सुटत नाही...

या उलट पाश्चिमात्य जगात एक विकसित व्यवस्था अशी दिसते की, त्याचे व्यवस्थेच्या पातळीवर उत्तर तरी सापडते. जसे की, वयोवृद्धांसाठी उत्तम वृद्धाश्रमे, मुलांसाठी पाळणाघरांची चोख व्यवस्था किंवा कामाच्या ठिकाणी घेतली जाणारी आरोग्याची काळजी. अगदी एकेकट्या माणसांची कुठलीही सामाजिक लांच्छनं नसलेली घरेही तिथे दिसून येतात. भारतात एका टप्प्यावर जगणाऱ्या जानकीला गुंतागुंत कळते, जाणवते आणि त्याला भरीव रूप कसे द्यावे हा तिच्या समोरचा तिढा आहे.

जानकीला गोतावळा घेऊन, कुटुंब घेऊन स्त्रीवादी परिप्रेक्ष्य विकसित करायचे आहे आणि हे ध्यानात घेतले, तर जानकी आणि तिचे मित्र आणि मैत्रिणी, तिच्या पोटी जन्मलेला मुलगा यांकडे वाचकांना भारतीय संदर्भात पाहता येईल येवढे नक्की...

या कादंबरीत एकीकडे स्त्री जात म्हणजे नेमके काय याचा वेध घेतला आहे, तर दुसरीकडे जाती जातीच्या विभेदनामध्ये स्त्री जातीचे काय होते, याचाही छडा लावण्याचा प्रयत्न केला आहे. फुले, आंबेडकर, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे ही स्थानिक चौकट घेतानाच या कादंबरीच्या मागे सिमॉन दी वुव्हासारख्या अस्तित्ववादातून स्त्रीवादी होणाऱ्या ‘सेकंड सेक्स’ नावाचा ग्रंथ लिहिणाऱ्या आणि स्त्रीवादाला सैद्धांतिक पाया देणाऱ्या फ्रेंच विचारवंताचाही आधार आहे.

कादंबरीतील प्रकरणे लहान लहान आहेत आणि शक्य तितकी सोप्या पद्धतीने वाचकांना वाचता यावीत अशी केली आहेत. आपल्याकडे हिंदू नावाच्या समृद्ध अडगळीबद्दल बोलताना खंडप्राय लेखन झाले, परंतु त्याच वेळी पु.शि. रेगे यांच्या सारख्या तत्त्वज्ञानाचा पाया देणाऱ्या कादंबरीकाराने अगदी लहान लहान ‘सावित्री’, ‘अवलोकिता’ अशा कादंबऱ्या लिहिल्या. कमल देसाई यांनी ‘हॅट घालणारी बाई’ आणि ‘काळा सूर्य’ अशा लघु कादंबऱ्या लिहिल्या, हे लक्षात घेता हा सघन-सधन वारसा घेऊनच ही कादंबरी उभी रहात असल्याचे लक्षात येते. ‘सात सक्कं त्रेचाळीस’सारख्या कादंबरीतील किरण नगरकरी बाजसुद्धा या लेखनाच्या पाठीशी आहे. तसेच मनमोकळेपणाने लिहिणाऱ्या गौरी देशपांडे यांच्या लेखनाचीही साथ येथे दिसून येते.

स्त्री-पुरुषांच्या नात्यातील हिंसा आणि निखळलेपणाचे वास्तव अनेक प्रसंगांमधून या कादंबरीत चित्रित होत जाते आणि वाचकांना अंतर्मुख करत अनेक प्रश्नही उभे करते. एकीकडे सर्वसामान्यांच्या जगण्यातील शहाणपणाशी संवादी राहत, दुसरीकडे पुरोगामी, शहरी-आधुनिक वगैरे जगण्यातील ढोंगाला ही कादंबरी अधोरेखित करत जाते. त्यातही विशेष हे की, केवळ कुणाची तरी खिल्ली उडवत निसटती बेजबाबदार विधाने करण्याची पद्धत या लेखनात विद्युत भागवत यांनी टाळलेली आहे. अलिकडचे नेमाडपंथी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साहित्यात (येथे भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य असे म्हणायचे नाही) तशा स्वरूपाचा हेटाळणीचाच सूर आपल्याला दिसून येतो. परंतु प्रश्नांची खोल समाजशास्त्रीय जाण असल्याने समाजातील विसंगतींची मुळे शोधण्याचा विद्युत भागवत यांच्या लिखाणाचा प्रधान हेतू असल्याचे दिसून येते. कादंबरीतील न-नायिका स्वत:च उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांचा उलटसुलट विचार करते, स्वत:च्याच चुका शोधत राहते. खरे तर कठोर स्वचिकित्सेच्या स्त्रीवादी अभ्यास पद्धतीचेच अत्यंत सर्जनशील अशी रीत आपल्याला या कादंबरीत दिसते.

“आपलं वेगळेपण जाणवून त्याला अनुसरणं कठीण असतं. प्रवाहाच्या विरुद्ध एक पाऊलही टाकणं अशक्यच... श्वास गुदमरतो, जीव तडफडतो... पुन्हा जीव जाता जाता जगणं किती महत्त्वाचं आहे हे कळतं. मरणं सोपं नसतं कारण तशी संपूर्ण निराशाही क्वचितच येते. काही चांगले क्षण कळत नकळत येऊन चिकटलेले असतात. ते हळूवार फुंकर घालतात. माणूस अपूर्ण, त्याला मिळणारं सुख अपूर्ण आणि दु:खही अपूर्ण.”

जानकीचं हे स्वगत कादंबरीला तत्त्वज्ञानाच्या एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं. तिथे केवळ मरणाला कुरवाळणाऱ्या पुरुष निर्मित तत्त्वज्ञानांची मर्यादा सहजच ओलांडली जाते आणि ही कादंबरी मराठी साहित्य व्यवहारात मोलाचा हस्तक्षेप करते. अगदी इतका मोलाचा की, कादंबरीतील जानकी हे पात्र पांडुरंग सांगवीकरच्या मर्यादा ओलांडून मराठी साहित्य व्यवहारात नवा मापदंडच घडवते.

“खूप वर्षांनी आता मात्र जाणवतंय की, बायका फक्त जातिव्यवस्थेच्याच प्रवेशद्वार नसतात, तर पुरुषांचा पुरोगामीपणा किंवा आधुनिकता सिद्ध करण्याच्याही साधन ठरतात... मग त्यातून होणारी कोंडी... एकाकीपण...” कादंबरीतील अशी विधाने सत्याचा आरपार वेध घेताना केवळ आजूबाजूच्या वास्तवाचे निरीक्षण नोंदवत त्यांतून केवळ उपहासात्मक निराशा व्यक्त करत नाहीत; तर कधी जख्ख म्हातारी होऊन, मृत्यूच्या दारात जाऊन, तर कधी अकाली मृत्यूचा आकांत अनुभवून, तर कधी लहानगी जाई होऊन साध्या माणसांच्या जमीनीत रुतलेल्या शहाणपणाशी संवादाचा प्रांजळ प्रयत्न करते आणि हीच बाब तिला मराठी साहित्यातील आजवरच्या पात्रांपेक्षा वेगळं करते, स्वत:ला इतरांइतकंच साधं आणि तरीही झुंडीचा भाग नसलेली चिकित्सक व्यक्ती करते... बायका बायकांच्या नात्यात तिला नाळेचे नाते सापडते तर पुरुषांनी मैत्री करताना सत्ता आणि ज्ञान नाकारले जाऊन कधी फक्त शरीर तर कधी मातृत्व वाट्याला येण्याचा अनुभव ती घेते.

जानकीला जाणवतं की, एकाच वेळी अनेक भूमिकांमधून आपण जगतो आहोत. आपल्या परिस्थितीत आपण पूर्णवेळ काहीच करू शकत नाही. ना संशोधक, ना शिक्षक, ना विचारवंत, ना कलावंत! परंतु, तिला कसोशीने प्रामाणीकपणे भूमिका घ्याव्याशा वाटतात. म्हणूनच ती मुक्ता खोब्रागडेसारखे तडाखे सोसत पण पाय जमीनीवर घट्ट रोवून उभी राहते, मैत्री करते- तीही निर्भयपणे. परंतु, कुठेच लाचारी स्वीकारत नाही. अंधारातला एकटेपणा स्वीकारते आणि अनेकदा आभासांमध्ये जगते. अशा जानकीला केवीलवाणे पराभूत होणे मान्य नाही. ‘हॅट घालणारी बाई’सारखे वेडे होणे तिला मंजूर नाही. कधी अभ्यास, कधी मोर्चे, कधी विद्यापीठीय वर्गात शिकवणे असे बहुआयामी आयुष्य जगणारी जानकी वाचकांनाही वेगळी जाणवेल, अशी खात्री वाटते.

.............................................................................................................................................

दीपक कसाळे

dniipmuu30@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sun , 21 April 2019

दीपक कसाळे, पुस्तक परिचय आवडला. फक्त एक सरसकट विधान आहे : >> ....पाश्चिमात्य जगात एक विकसित व्यवस्था अशी दिसते की, त्याचे व्यवस्थेच्या पातळीवर उत्तर तरी सापडते. जसे की, वयोवृद्धांसाठी उत्तम वृद्धाश्रमे, मुलांसाठी पाळणाघरांची चोख व्यवस्था किंवा कामाच्या ठिकाणी घेतली जाणारी आरोग्याची काळजी. >> पाश्चात्य जगाच्या स्वत:च्या अडचणीही आहेत. एव्हढ्या सोयीसुविधा असूनही घटस्फोट का होतात? आता तर लग्नाचं प्रमाणच घसरलं आहे. एकाकी वृद्ध, एकल पालक आणि गुन्हेगारीकडे नकळत भरकटणारी तरुण पिढी या समस्या कुटुंबव्यवस्था मोडकळीस आल्यामुळे उद्भवल्या आहेत. भारतीय स्त्रीला घर सोडून जा म्हणून कोणी म्हणंत नाही. अगदी निरुपायाने का होईना पुरुष संसार चालू ठेवतात. बाईला कुंकवाचा का होईना धनी मिळतो. त्यातूनही तिची घुसमट वगैरे होत असेल तर लग्न न करणं इष्ट. पण लग्न न करता एकटी राहिल्याचे अनेक तोटेही आहेत. त्यामुळे बाईच्या वेदना अटळ आहेत. या ना त्या प्रकारे तिची कोंडी होतेच. एकंदरीत बाईच्या जन्माला घालणं हा निसर्गाने तिच्यावर केलेला अन्याय आहे. पण त्यासाठी पुरुषाला जबाबदार धरायची फ्याशन पडली आहे. ही वृत्ती अंतिमत: बाईच्या हिताची नाही. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......