जनसंवादीय कलांमध्ये पारंगत होण्यासाठी स्वरसाधना कशी करावी?
ग्रंथनामा - आगामी
महेश केळुसकर
  • ‘माझा आवाज’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 13 April 2019
  • ग्रंथनामा आगामी माझा आवाज Maza Awaj महेश केळुसकर Mahesh Keluskar

कवी, पत्रकार डॉ. महेश केळुसकर यांचं ‘माझा आवाज’ हे पुस्तक रविवारी समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. हे पुस्तक पत्रकार, शिक्षक, वकील, रंगकर्मी, वृत्तनिवेदक, निवेदक, सूत्रसंचालक, व्यवस्थापक, डबिंग आर्टिस्टस, कॉमेन्टेटर्स यांना आपल्या आवाजाची कशी काळजी घ्यावी, तो चांगला राहण्यासाठी काय करायला हवं, याविषयी मार्गदर्शन करतं. हे पुस्तक अनघा प्रकाशन, ठाणे तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

पत्रकारितेच्या क्षेत्रात ज्यांना आपली ‘स्वतंत्र मुद्रा’ (Independent Indentity) उमटवायची असेल त्यांनी फक्त पत्रकारितेची पदविका किंवा पदवी घेऊन चालणार नाही. अशी पदवी मिळवून वर्तमानपत्रात किंवा एखाद्या वृत्तवाहिनीवर नोकरी मिळू शकेल. पण ज्यांना ‘अनेक पत्रकारांपैकी आपणही एक’ अशी आपली ओळख न होता ‘स्टार जर्न्यालिस्ट’ म्हणून आपलं मूल्य वाढवण्याची इच्छा असेल त्यांनी जनसंवादाची विविध कौशल्ये प्राप्त करणं सध्याच्या काळात अपरिहार्य झालं आहे. हल्लीचा पत्रकार जेवढा बहुमुखी आणि बहुउद्देशीय असेल तेवढा तो ‘वजनदार’ होत चालल्याचं आढळेल. आणि म्हणूनच जनसंवादीय पत्रकारितेसाठी आवाजाशी संबंधित विविध कलांचा परिचय करून घेणं इष्ट ठरेल.

पत्रकारांना फक्त आपापल्या कचेरीत काम करून फारशी ओळख मिळत नाही. आपल्या माध्यमाव्यतिरिक्त अन्य माध्यमांमधूनही ते लोकांसमोर आले तर त्यांचं प्रतिष्ठामूल्य वाढतं. गोविंद तळवलकर यांची पत्रकारितेतील विद्वत्ता वादातीत होती. पण ते लोकांसमोर अगदीच क्वचित यायचे. डॉ. अरुण टिकेकर हेही व्यासंगी ज्येष्ठ पत्रकार होते. ते व्याख्यानं द्यायचे. मात्र सर्वसाधारणपणे वरच्या दर्जाच्या बौद्धिक वर्गालाच त्यांचं आकर्षण वाटायचं. याउलट निखिल वागळे, विजय कुवळेकर, कुमार केतकर, भारतकुमार राऊत यांच्यासारख्या पत्रकारांचा पिंड बहुजनाभिमुख असल्यानं हे पत्रकार सतत लोकांमध्ये प्रत्यक्ष मिसळत आलेत. हे अनेक सभासमारंभातून भाषणं देतात आणि आपल्या प्रभावी वक्तृत्वानं आपली भूमिका लोकांसमोर सातत्यानं मांडत राहतात. विविध चर्चा, परिसंवाद आणि मुलाखतींमधून आपल्या जनसंवादीय कौशल्यांधारे आपापल्या चॅनलचं किंवा वर्तमानपत्रांचं ते हित साधतात. विजय कुवळेकरांसारखे पत्रकार तर मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय करतात व गाणी लिहितात. विविध माध्यमांचा कौशल्यानं उपयोग केल्यानं हे पत्रकार जनसामान्यांमध्ये अधिक प्रिय असल्याचं आढळून येईल.

भाषण, कवितावाचन, कथाकथन, नाट्यवाचन, चर्चा सहभाग, मुलाखत, सूत्रसंचालन, वृत्तनिवेदन आदी जनसंवादीय कलांमध्ये पारंगत होण्यासाठी स्वरसाधना कशी करावी, याचा ऊहापोह केला पाहिजे. केवळ पत्रकारांसाठीच नव्हे; तर शिक्षक, वकील, सूत्रसंचालक, निवेदक, व्यवस्थापक, डबिंग आर्टिस्ट्स, रंगकर्मी आदींनाही आपापल्या व्यवसायात ‘स्टार’ होण्याकरिता ही जनसंवादीय कौशल्यं अत्यंत उपयोगाची आहेत.

भाषण 

भाषणातील ध्वनींचं स्वरूप संदर्भावर अवलंबून असतं. बोलणारी व्यक्ती, प्रसंग, श्रोते यानुसार ध्वनीचं स्वरूप बदलतं. त्यामुळे आपल्याला फक्त ध्वनीच ऐकून येतात असं नाही तर विशिष्ट आवाज, त्यातील आरोह-अवरोह, शब्दांच्या विविध छटा समजतात. स्वर आणि व्यंजनं यांचं लयबद्ध उच्चारण म्हणजेच काही भाषा नाही. भाषणात याच्याही व्यतिरिक्त काही गुणधर्म आहेत. या गुणधर्मांनुसार अर्थामध्ये फरक होतो. वाक्यात, शब्दांत जेव्हा अनेक अक्षरं येतात, तेव्हा त्यांच्यात बलाचा, स्वराघाताचा किंवा दोघांचाही फरक असतो. विदेशी आघात - कोणतीही भाषा ठरावीक किंवा मान्य पद्धतीला धरून नसेल तर ते विदेशी आघातात बोललं आहे, असं समजतात. प्रत्येक भाषेची आघात पद्धती स्वतंत्र आहे.

स्वत:च्या भाषेत ज्याप्रमाणे आपण शब्दांवर जोर देतो, ज्या स्वराघात पद्धतीनं आपण आपल्या भाषेत बोलतो तोच बलाघात आणि स्वराघात दुसऱ्या भाषेला तसाच लागू पडत नाही. अन्य भाषा आपण आपल्या भाषेच्या आघातात बोललो तर ज्याची ती मातृभाषा आहे त्याच्या कानाला खटकते. अशा भाषाबाह्य आघाताला विदेशी आघात म्हणतात. अक्षर प्रबलता - ध्वनीच्या उच्चारणासाठी जेव्हा आपण तोंड उघडतो, तेव्हा तोंडाच्या आकारावरून त्या ध्वनीचा जोर मापता येतो. उच्चारणात वापरल्या गेलेल्या शक्तीवरून बलाघात (Stress) मिळतो आणि कंपनांवरून स्वराघाताचा अंदाज येतो.

भाषण आणि लय

छोट्या सभेसमोरील भाषण, हजारोंच्या जनसमुदायासमोर केलेलं भाषण, रेडिओवरील भाषण इत्यादी अनेक प्रकारांनुसार भाषण आणि लय यांचा परस्परसंबंध नियत होतो. शेकडो-हजारो लोकांना मोर्चासाठी चेतवणारं भाषण विलंबित लयीत सुरू होऊन अंतिम चरणात आघाती द्रुत लयीत सुरू होऊन भावनावेगाच्या एका उच्च तीव्र बिंदूवर संपेल. भक्त मंडळींसमोर केलं जाणारं आध्यात्मिक भाषण (किंवा प्रवचन) एकाच संथ लयीत सुरू राहील. छोट्याशा वर्गात केलेलं निरोप समारंभाचं भाषण आणि मोठ्या मैदानात विशाल जनसमुदायासमोर होणारं राजकीय भाषण यात फक्त भाषेचाच फरक असणार नाही, तर शब्दफेकीची लय राहावी, याचाही विचार करावा लागणार. भाषण खंड कमी कालावधीचे असोत की दीर्घ कालावधीचे, त्यांना आपल्या नैसर्गिक श्वसनलयीशी विशिष्ट नातं जुळवावं लागणार. आपण जे नेहमीचं बोलत असतो, त्या बोलण्याची लय म्हणजे सर्वसाधारण श्वसनलय असते आणि ती त्यानुसारचं बोलणं फारसं परिणामकारक नसतं. पण किमान पन्नास जणांसमोर एखादी व्यक्ती जेव्हा प्रत्यक्ष बोलायला उभी ठाकते तेव्हा त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्या व्यक्तीचं भाषण दैनंदिन श्वसनलयीपेक्षा विलंबित किंवा द्रुत लयीत असायलं हवं, तरच ते परिणाम साधू शकतं.

आकाशवाणीवर भाषण करायचं असेल तर छोटी छोटी वाक्यं परिणामकारक लय निर्माण करतात. तिथं श्रोते अदृश्य असतात. आणि ते भाषण ऐकत असताना अन्य एखादं काम (भाजी चिरणं, दाढी करणं इत्यादी) करत असण्याची शक्यता असते. परिणामी श्रवणक्रिया केंद्रीभूत असेलच असं नाही. अशा वेळी वक्ता घाईघाईत बोलत राहिला किंवा त्याच्या भाषणात दीर्घ वाक्यखंड येत राहिले तर श्रोत्यांच्या कानात अर्थाशिवायचे शब्द फक्त पडत राहतात. मात्र प्रेक्षकांसमोर एखादं नाट्यात्म भाषण करायचं असेल तर विलंबित व द्रुत लयीमधले चढउतार सांभाळावे लागतात. तुटक व छोटी वाक्यं अशा भाषणात फारशी परिणामकारक होत नाहीत.

चर्चा सहभाग

पत्रकार वृत्तपत्रात काम करत असो की एखाद्या वृत्तवाहिनीसाठी, त्याला/तिला अधूनमधून विविध चर्चांमध्ये सहभागी व्हावं लागतं. ही चर्चा कधी जाहीर मंचावर असते, कधी आकाशवाणीवर, तर कधी वृत्तवाहिनीवर असते. अशा वेळी आपल्या देहबोलीवर आणि स्वरबोलीवर हजारो प्रेक्षकांची नजर आणि श्रोत्यांचे कान लक्ष ठेवून असतात. चर्चेतील आपला सहभाग आत्मविश्वासपूर्ण, मुद्देसूद आणि सहज नैसर्गिक नसेल तर आपली ‘प्रतिमा’ लोकांसमोर निर्माण होत नाही. चर्चेतील सहभागातही आपला स्वतंत्र चेहरा हवा.

चर्चेमध्ये सर्वसाधारणपणे तीन किंवा अधिक लोकांचा समावेश असतो. त्यातील एकजण चर्चेचं संचालन करतो. संचालन करणाऱ्यानं विषयाचा उपोद्घात करून सहभागी वक्त्यांचा अल्पपरिचय श्रोत्यांना/प्रेक्षकांना करून द्यावयाचा असतो. मग चर्चेला तोंड फोडून विषयाच्या अनुषंगानं एकामागून एक मुद्दे येत राहतात. चर्चेमध्ये एकाच विषयावर मतमतांतरे असू शकतात. पण आपलं मत मांडताना किंवा दुसऱ्याचं मत खोडतना आरडाओरडा करायचा नसतो. आपला स्वर ठाम असेल आणि मुद्दा तर्कसंगत असेल तर चर्चेतील आपला सहभाग आत्मविश्वासपूर्ण होतो.

वेळेचंही भान प्रत्येक वक्त्याला हवंच. दिलेल्या अल्प वेळात आपला मुद्दा ठाशीवपणे मांडण्याची कला आत्मसात करायला हवी. पाल्हाळ लावून एकाच मुद्यावर घोळ घालत बसण्याची वाईट सवय काही वक्त्यांना असते. अशा वेळी चर्चेचा संचालक त्यांना मध्येच तोडतो आणि फजिती होते. काही वक्ते चर्चेत आक्रमक होतात, पण मुद्दा पोकळ असेल तर आक्रमक सूर लावून काहीच साध्य होत नाही. लोकांवर प्रत्येक वेळी आक्रमकतेचा प्रभाव पडतोच असं नाही. दुसरा वक्ता बोलत असताना मधेच आपण घुसणं हेही अयोग्य आहे. चर्चेतील एखादी व्यक्ती तुलनेनं खूपच नामवंत असेल तर अन्य वक्त्यांवर दबाव येण्याचीही शक्यता असते. असा दबाव येण्याचीही शक्यता असते. असा दबाव येऊ देता कामा नये.

चर्चेत सहभागी होण्यापूर्वी दिलेल्या विषयाचा अभ्यास करायलाच हवा. आपले मुद्दे कोणते आहेत आणि ते कोणत्या शैलीत मांडायचे आहेत, याचाही गृहपाठ करायला हवा. अनेकदा वैचारिक धुसरतेमुळे प्रत्यक्ष चर्चेच्या वेळी वक्ते तुटक व अडखळत बोलतात. ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका घेतात. अशा वेळी त्यांचा एकंदर वकूब ओळखून चर्चेचा संचालक शिताफीनं त्यांना अत्यंत कमी वेळ देतो. ज्या वक्त्याच्या बोलण्यात काही दम आहे, त्याला साहजिकच जास्त वेळ मिळतो. मागील वक्त्याच्या बोलण्याचं सूत्र धरून पुढील वक्त्याला मागील मुद्याशी सहमत होता येतं किंवा विरोधही करता येतो, पण तसं करत असताना आवाजात भारावलेपण किंवा तुच्छता आणून चालत नाही. आपल्याही मुद्याला महत्त्व आहे एवढंच लोकांना कळायला हवं.

मुलाखत

पत्रकारांना मुलाखती घ्याव्या लागतात आणि द्याव्याही लागतात. मुद्रित माध्यमांसाठी मुलाखती घेताना आवाजाचा काही फारसा संबंध नसतो. सर्दी झालेल्या आवाजात प्रश्न विचारूनही आपल्या पत्रकारीय कौशल्यानं पत्रकार रंगतदार मुलाखती छापू शकतात. पण आकाशवाणीवर, इलेक्ट्रॉनिक चॅनलवर किंवा जाहीर कार्यक्रमात मुलाखती घेताना पत्रकारांना आपल्या आवाजाचं आणि मुद्राभिनयाचं कौशल्य पणाला लावावं लागतं. मुलाखती जर थेट (लाईव्ह) असतील तर जबाबदारी अधिकच वाढते. एकदा सुटलेला प्रश्नाचा बाण परत घेता येत नाही. अडखळत, चाचरत बोलून चालत नाही. हजरजबाबीपणा तर असावाच लागतो.

मुलाखती रंगवणाऱ्यांमध्ये तर मराठीत प्रा. वि. शं. चौघुले, सुधीर गाडगीळ, मंगला खाडिलकर, किशोर सोमण आदी मंडळी प्रसिद्ध आहेत. ‘ई टीव्ही’ वरील ‘संवाद’ हा कार्यक्रम लोकप्रिय होण्यात राजू परुळेकर यांचं मुलाखती घेण्याचं कौशल्य वादातीत होतं. अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं प्रसारमाध्यमातील हे लोक मुलाखती घेतात. मुलाखती घेणं हा एक स्वतंत्र व्यवसाय होऊ शकतो आणि त्यातून चांगली अर्थप्राप्ती होऊ शकते, हे या माध्यमकर्मींनी दाखवून दिलं आहे.

मुलाखत घेण्यापूर्वी मुलाखतकाराला त्या संबंधित विषयाचे अनेक संदर्भ माहीत असावे लागतात आणि मुलाखत देणाऱ्याची व्यक्तिगत माहिती आणि व्यक्तित्वाचा अभ्यास असावा लागतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखती घेताना विविध कारणांमुळे अनेक पत्रकार बावचळून गेलेले आहेत. मुलाखत देणारं व्यक्तित्व आक्रमक असेल तर मुलाखतकारानं दबून न जाता त्या व्यक्तित्वाच्या ‘अहं’ला धक्का न लावता, आपल्याला हवी असलेली माहिती वदवून घ्यावी लागते. काही वेळा मोकळ्या जागा ठेवून प्रेक्षकांना अर्थ लावण्याची मुभा ठेवावी लागते. मुलाखतकारानं वाद घालवावयाचा पवित्रा ठेवला तर मुलाखतकार अधिक आक्रमक होण्याचा संभव असतो किंवा तो स्वत:ला आकसून घेऊन आपण शब्दात पकडले जाणार नाही अशी काळजी घेत जेवढ्यास तेवढी उत्तरं देऊ लागतो. अशा मुलाखती रंगत नाहीत. अत्यंत काळजीपूर्वक आणि मुलाखत देणाऱ्याला विश्वासात घेऊन प्रश्न विचारावे लागतात. याचा अर्थ असा नव्हे की मुलाखतकारानं केवळ सोयीस्कर प्रश्न विचारायचे. वादग्रस्त विषयात मुलाखत देणाऱ्याला न आवडणारे प्रश्नही जनतेच्या वतीनं विचारावे लागतात. पण ते विचारताना मुलाखत देणाऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात नेऊन चालत नाही. असे प्रश्न विचारताना आवाजाची तारता संयमित हवी.

मुलाखतीच्या प्रारंभी मुलाखतकारानं विषयाचा परिचय थोडक्यात करून देऊन मुलाखतदात्यासंबंधी आवश्यक माहिती आपल्या प्रेक्षकांना द्यावी. संपूर्ण ‘बायोडाटा’ सांगण्याची गरज नाही. मुलाखतकारानं त्रोटक प्रश्न विचारायचे नसतात आणि पाल्हाळही लावायचं नसतं. खाही मुलाखतकारांचे प्रश्न इतके त्रोटक आणि संदिग्ध असतात की, ‘तुमच्या प्रश्नाचा नेमका रोख काय आहे?’ असं त्यांना मुलाखतदाते विचारतात. काही वेळा मुलाखतकारच एवढे बोलू लागतात की, मुलाखत नेमकी कोणाची घेतली जातेय तेच प्रेक्षकांना/श्रोत्यांना कळत नाही. तेव्हा आपण किती आणि कसं बोलायचं याचं तारतम्य मुलाखतकाराला हवं.

दहा मिनिटांची मुलाखत असेल तर पाच-सहा प्रश्न पुरेसे असतात. एखाद-दुसरा उपप्रश्नही विचारता येतो. मुलाखतदाता एखाद्या प्रश्नाचं उत्तर थोडं सविस्तर देऊ इच्छित असेल तर त्याला मधेच अडवता कामा नये. पण माहितीची पुनरावृत्ती करत तो पाल्हाळ लावत असेल तर त्याला न दुखावता मुलाखतकारानं त्याला मूळ प्रश्नावर आणावं लागतं. मुलाखतीपूर्वी मुलाखतकारानं प्रश्नांचा क्रम ठरवून घ्यावा. मुलाखतदात्याला प्रश्नांची पूर्वकल्पना दिली तरी चालेल. पण संपूर्ण मुलाखतीची रंगीत तालीम मात्र करू नये. तसं केल्यास मुलाखतीतली उत्स्फूर्तता नष्ट होण्याची भीती असते. मुलाखतीला निश्चित आरंभ हवा आणि शेवटही हवा. हे दोनही बिंदू आकर्षक करावे लागतात. एकमेकांच्या आवाजावर कुरघोडी न (Overlaping) करण्याचं पथ्यही पाळावं लागतं. वृत्तनिवेदन, कॉमेन्ट्री इत्यादी

अलीकडे अनेक मुक्त पत्रकार वृत्तलेखनाबरोबर वृत्तनिवेदनाच्या व्यवसायाकडे वळलेले दिसतात. पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर जशी वृत्तपत्रांमधून वार्ताहर, वृत्तसंपादक या पदांवर सेवा करता येते, त्याचप्रमाणे आकाशवाणी किंवा चित्रवाणीवर वृत्तनिवेदक होण्याची संधी असते. वृत्तनिवेदक म्हणून कायमची नोकरी मिळू शकते किंवा प्रासंगिक करारावर वृत्तनिवेदवक म्हणून कायमची नोकरी मिळू शकते किंवा प्रासंगिक करारावर वृत्तनिवेदकांना नेमलं जातं.

आकाशवाणी वृत्तनिवेदन

आकाशवाणीवर प्रादेशिक बातमीपत्रं, तसंच सर्व भाषांमधून राष्ट्रीय बातमीपत्रं प्रसारित होतात. News on phone ही सेवाही आकाशवाणीनं नव्यानं सुरू केली आहे. (विशिष्ट दूरध्वनी क्रमांक फिरवल्यावर ध्वनिमुद्रित केलेल्या ताज्या बातम्या आपल्याला ऐकता येतात. दर तासाला हे बातमीपत्र नवीन असतं.) महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या आकाशवाणी केंद्रांवर स्वतंत्र प्रादेशिक वृत्त विभाग आहेत. पुणे केंद्रावरून सकाळी ०७-०५ वाजता प्रसारित होणारं आणि मुंबई केंद्रावरून संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र मोठ्या प्रमाणावर ऐकलं जातं. मराठी भाषेत प्रसारित होणाऱ्या या बातमीपत्रांना खूप वर्षांची परंपरा असून शरद चव्हाण, कुसुम रानडे, सुधा नरवणे या वृत्तनिवेदकांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

आकाशवाणीवर कायम स्वरूपी किंवा हंगामी वृत्तनिवेदकांच्या जागा भरताना लेखी परीक्षा आणि स्वरचाचणी व मुलाखती घेतल्या जातात. वृत्तनिवेदकाला मराठी भाषेचं उत्तम ज्ञान तर असावं लागतंच, पण त्याचबरोबर इंग्लिश आणि हिंदी या भाषांमधून मराठीत अनुवाद करण्याची कला अवगत असावी लागते. काही मुद्दे व तपशील देऊन त्याआधारे बातमी लिहायलाही सांगितलं जातं. वृत्तनिवेदकाकडे अद्ययावत सर्वसाधारण ज्ञान (जनरल नॉलेज) असणं आवश्यक समजलं जातं.

काही वेळा त्यावेळच्या चर्चेतील विषयावर संक्षिप्त टिपा लिहायला सांगितलं जातं. स्वरचाचणीमध्ये आवाज, उच्चारण शैली आणि एकूण सादरीकरण या घटकांवर भर असतो. आवाज चांगला असूनही उच्चारणात जाणवण्याइतके दोष असतील तर उमेदवार नाकारला जातो. काही वेळा आवाज आणि उच्चारण निर्दोष असूनही शैली रटाळ असते. त्यामुळे सादरीकरणाची शैली आणि परिणाम महत्त्वाचा ठरतो. बातमीपत्रात एकाच व्यक्तीला दहा किंवा पंधरा मिनिटं लाखो लोक ऐकत असतात. त्यामुळे सादरीकरणात चूक होऊन चालत नाही.

आकाशवाणीवरील बातमीपत्रांचं वैशिष्ट्य हेच आहे की ताज्या घडामोडी अत्यंत जलद गतीनं लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतात. सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी झालेल्या अपघाताचं वृत्त वार्ताहर दूरध्वनीद्वारे वृत्तसंपादकाला कळवू शकतो आणि लगेचच ७-०५च्या प्रादेशिक बातमीपत्रात हे वृत्त समाविष्ट केलं जाऊ शकतं. वृत्तपत्रांना आणि चित्रवाणी वाहिन्यांना सर्वसाधारणपणे हा लाभ नसतो. ‘ताजी बातमी’ (Breaking News) या सदराखाली आपल्या वार्ताहराच्या आवाजात चित्रवाणी वाहिन्या बातम्या देऊ शकतात. तथापि, त्या बातमीला दृश्य नसतं. शिवाय टी.व्ही. सेटसमोर दर्शक बसलेला नसेल तर बैलगाडीत, लोकलमध्ये किंवा शेतावर ही ‘ताजी बातमी’ त्याला मिळू शकत नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात, म्हणूनच तर आकाशवाणीवरील बातमीपत्रं लोकप्रिय आहेत. ‘विश्वासार्हता’ हाही रेडिओ बातमीपत्रांचा सर्वांत मोठा गुण आहे. आणि म्हणूनच इथल्या वृत्तनिवेदकाला आपला आवाज विश्वासार्ह ठेवावा लागतो.

चित्रवाणी निवेदन

दूरदर्शन आणि अन्य चित्रवाणी वाहिन्यांवरील बातमीपत्रंही लाखो दर्शक बघतात. या वृत्तनिवेदकांना आवाज आणि दर्शनीय रूप असावं लागतं. काही बातमीपत्रं आसनस्थ स्थितीत तर काही उभं राहून मंचीय हालचाली करत दिली जातात.

वृत्तनिवेदक अन्य चित्रवाणी वाहिन्यांवर प्रसिद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवरील प्रणव रॉय, विनोद दुआ, राजदीप सरदेसाई यांच्यासारख्या पत्रकारांचं वृत्त सादरीकरण नव्या पत्रकारांना अभ्यास करता येण्याजोगं आहे.

चित्रवाणीच्या बातमीपत्रात विविध बातम्यांना दृश्यांची जोड दिलेली असते. त्यांच्या ताळमेळाचं भान वृत्तनिवेदकाला ठेवावं लागतं. चित्रवाणीच्या वृत्तनिवेदकासमोरील ‘टेलिप्रॉम्प्टर’वर बातम्यांचा मजकूर विशिष्ट गतीनं सरकत असतो. वृत्तनिवेदकाला आपल्या वाचनाची आणि बोलण्याची गती या टेलिप्रॉम्प्टरच्या गतीशी जुळवावी लागते. समोर कॅमेरा रोखलेला असतो. त्यामुळे मुद्राभिनय विचित्र होणार नाही, याचं सतत भान ठेवावं लागतं. ‘ओ बी व्हॅन’वरून एखादा वार्ताहरमध्येच थेट (लाईव्ह) बातमी देतो, तेव्हा सुरुवातीला व शेवटी दर्शकांना त्याची कल्पना द्यावी लागते. दूरध्वनीवरूनही एखादी ताजी बातमी मध्येच घेतली जाते. अशा वेळी तांत्रिकदृष्ट्या वार्ताहराच्या आवाजात खंड पडला किंवा दृश्य दिसत नसलं, तर हजरजबाबीपणे दर्शकांना विश्‍वासात घेऊन दुसर्‍या बातमीकडे वृत्तनिवेदकाला वळावं लागतं. अशा वेळी वृत्तनिवेदकाला ‘नर्व्हस’ होऊन चालत नाही.

एखादी इमारत कोसळली, कुठे आग लागली, दंगल झाली, पूरपरिस्थिती निर्माण झाली किंवा निवडणूक विजयानंतरची मिरवणूक निघाली तर चित्रवाणी वाहिन्यांचे वार्ताहर त्या त्या स्थळावरून थेट वृत्त देतात. स्टुडिओच्या बाहेरून हे वृत्तनिवेदन केलं जात असताना बाह्य परिस्थिती वृत्तनिवेदकाच्या किंवा तंत्रज्ञाच्या हातात नसते. तरीही वृत्तनिवेदकाच्या चेहर्‍यावर पुरेसा प्रकाश आहे की नाही, संबंधित दृश्यं कॅमेऱ्यात येत आहेत की नाहीत याचं भान ठेवावं लागतं. आजूबाजूला कोलाहल असतो, तो कमीत कमी करण्यासाठी वार्ताहरानं माईक कुठल्या दिशेनं ठेवून कुठं उभं राहून बातमी द्यावी, हे क्षणार्धात ठरवावं लागतं.

बाह्य स्थळावरून बातमी देताना वार्ताहराच्या आवाजाची तारता थोडी वाढणं साहजिक आहे, पण किंचाळत बोलण्याची आवश्यकता नसते. अत्यंत घाईत या बातम्या दिल्या जात असल्या तरी चित्त शांत ठेवून आपल्या आवाजाचा आब सांभाळत वार्ताहराने बातमी दिली तर दर्शकांना कौतुक वाटतं. अशा वेळी विचित्र हातवारे करत अडखळत बोलणाऱ्या वार्ताहरांना फारशी मान्यता मिळत नाही.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4799/Maza-Awaj

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 15 April 2019

चांगला माहितीपूर्ण लेख! बलाघात हा शब्द विशेष आवडला. विविध अर्थछटांनी मायमराठी अशीच समृद्ध होवो. लेखकास त्यानिमित्त पुन्हा एकदा धन्यवाद! :-) -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......