अजूनकाही
कवी, पत्रकार डॉ. महेश केळुसकर यांचं ‘चित्रकथी’ हे पुस्तक रविवारी समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. या पुस्तकात चित्रकथीशी मालवणी मुलुख, बोली, लोकजीवन आणि लोकविश्वास यांचा असलेले संबंध यांची सविस्तर चर्चा केली आहे. त्याचबरोबर कळसूत्र व छायाबाहुल्या या खेळांविषयीही माहिती दिली आहे. हे पुस्तक अनघा प्रकाशन, ठाणे तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
भारतात छायाबाहुल्यांचे खेळ नक्की केव्हापासून सुरू झाले, याविषयी संशोधकांत मतभेद आहेत. डॉ. पिशल यांच्या मते, छायानाटकांचा उल्लेख महाभारतात व थेरीगाथात सापडतो, त्याअर्थी ती ख्रिस्ती शकापूर्वी होत असत. तर प्रो. रिज्वे सांगतात की हिंदुस्थानात छायानाटके चालू असल्याचा पुरावा फक्त ख्रिस्ती शकाच्या दहाव्या शतकात सापडतो. कै. पु. गो. काणेकर यांच्या मते, महाभारतातील ‘रूपोपजीवन’ व कळसूत्री बाहुल्या यांच्या संबंधीचे उल्लेख, अभिनवगुप्ताची भरत-नाट्यशास्त्रापूर्वी छायानाटकाचा प्रकार अस्तित्वात असल्यासंबंधीची साक्ष, इत्यादी गोष्टींचा विचार केला असता ग्रीसच्या पूर्वीही (ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकापूर्वी) हिंदुस्थानात कळसूत्री बाहुल्यांचे खेळ व छायानाटके लोकांच्या परिचयाची होती. या सर्व मतांचा परामर्श घेऊन वि. कृ. जोशी यांनी, छायानाटके महाभारताच्या कालापूर्वी हिंदुस्थानात होत असत, असे अनुमान काढले आहे.
‘लोकनाट्याची परंपरा’ ह्या ग्रंथात ‘काष्ठपांचालिका नाट्य’ ह्या प्रकरणात वि. कृ. जोशी यांनी छायानाटकांच्या परंपरेविषयी व स्वरूपाविषयी विस्तृत विवेचन केले आहे. त्याचा सारांश पुढीलप्रमाणे :
ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात ‘ईश्वर : सर्वभूतानां हृद्दशेऽर्जुन तिष्ठति । भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥’ या गीतेच्या श्लोकावर टीका लिहिताना ज्ञानेश्वरांनी असे म्हटले आहे की, ‘स्वमायेचे आडवस्त्र । लेऊनि एकला खेळवी सूत्र । बाहिरी नटी छाया विचित्र । चौऱ्यांशी लक्ष ॥’ (ज्ञानेश्वरी १८ : १२९४) याचा अर्थ असा की, ‘जो आपल्या मायेचा आडपडदा लावून आतून एकटाच सूत्र हालवून बाहेर चौऱ्यांशी लक्ष छायारूपी चित्रे नाचवितो.’ यावरून त्या काळात छायानाटके लोकांना परिचित होती असे दिसते. दासबोधाच्या दशक ८, समास १ मध्येही छायाबाहुल्यांच्या खेळाचा उल्लेख आला आहे :
खांबसूत्रीचीं बाहुली । जेणें पुरुषें नाचविली ।
तोचि बाहुली हे बोली । घडे केवीं ॥३५॥
छायामंडपीची सेना । सृष्टीसारिखीच रचना ।
सूत्रें चाळी परी तो नाना - । व्यक्ति नव्हे ॥३६॥
‘मार्ग’च्या जून १९६८ च्या अंकात छायाबाहुल्यांच्या विविध राज्यातील खेळांच्या परंपरेची माहिती दिली आहे. त्यानुसार हा खेळ भारताच्या दक्षिण आणि पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात दाखवला जातो. केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओरिसा या राज्यांत, इतकेच काय दक्षिण मलबारच्या किनाऱ्यावर तो पाहावयास मिळतो. ह्या अंकात महाराष्ट्रातील पिंगुळीच्या छायाबाहुल्यांची मात्र माहिती नाही.
ओरिसातील चामड्याच्या बाहुल्या ह्या प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेल्या असतात. विशेषत: मेंढ्याच्या कातडीचा सर्रास उपयोग होतो. दोन फुटांहून त्यांची उंची अधिक नसते, आणि त्यांच्या रचनेत बालसुलभ सहजता असते. पुराणातील विविध व्यक्तिरेखांच्या बाहुल्यांप्रमाणेच वातावरणनिर्मितीसाठी झाडे, तंबू, सिंहासने यांच्या चामडी प्रतिकृतीही ओरिसातील खेळात उपयोगात आणल्या जातात. ‘रावणछाया’ ह्या नावाने ओरिसात हा खेळ ओळखला जातो व वर्षातील कुठल्याही वेळी सादर केला जातो.
तामिळनाडूत हाच खेळ ‘पवई कुठू’ म्हणजेच ‘ललनांचे नृत्य’ या नावाने संबोधिला जातो. त्यामागची दंतकथा अशी सांगितली जाते की, राक्षसी आणि दुष्ट प्रवृत्तींना पळवून लावण्यासाठी या चामड्याच्या बाहुल्या लक्ष्मी देवतेप्रमाणे नाचल्या. तामिळनाडूत वसंत ऋतूतील उत्सवात, शैव मंदिराबाहेर, दुष्ट शक्तींच्या निर्दालनासाठी, ‘पवई कुठू’चे खेळ करण्याची प्रथा आहे. तामिळनाडूतील छायाबाहुल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना उंची दागिन्यांनी सजवलेले असते. शिवाय त्या अचलित म्हणजे हालचाल न करणाऱ्या असतात. चार बांबूंच्या खांबांवर दोन लुगड्यांचा फेर धरून पडदा केला जातो आणि या पडद्यावर आतल्या बाजूने सगळ्या छायाबाहुल्या दृश्याच्या अनुक्रमानुसार टोचून ठेवल्या जातात. त्या बाहुल्यांच्या मागे तेलाचे टांगते दिवे असतात. त्याहीमागे ताडाच्या चटईची भिंत आधारासाठी असते. क्वचित ह्या बाहुल्या हालतातही; पण सर्वसाधारणपणे त्यांच्या छाया स्थिर असतात.
केरळमध्ये शूरनूरजवळचे कुंथर हे खेडे संपूर्णपणे छायाबाहुल्यांच्या खेळासाठी वाहून घेतलेले आहे. तेथील बाहुलेकर मूळ आख्याने तामीळमधून कथन करतात आणि लगेचच त्यांचे मल्याळममध्ये भाषांतर करून सांगतात. त्यांच्या खेळावर तामिळनाडूचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. कर्नाटकातील ‘चकाला गोंबी आटा’ हा छायाबाहुल्यांचा खेळ फक्त शिवमंदिराबाहेर उत्सप्रसंगीच सादर केला जातो. बाहुल्यांच्या मागे दिव्यांची रांग नसते; तर कथक-गायक जशी कथा पुढे नेत जातो, त्याप्रमाणे पडद्यामागील कलाकार एकाच दिव्याच्या हालचाली करतो; जेणेकरून त्या त्या बाहुलीची छाया पडद्यावर दृश्यमान होते.
‘पवई कुठू’च्या पद्धतीप्रमाणेच मलबार किनाऱ्यावर छायाबाहुल्यांचा खेळ सादर केला जातो. फरक एवढाच की, ‘ओला पवई कुठू’ ह्या नावाने परिचित असलेल्या या खेळातील छायाबाहुल्या ताडाच्या पानांपासून बनवलेल्या असतात.
‘थोलु बोमाळट्टा’ या नावाने आंध्र प्रदेशातील छायाबाहुल्यांचा खेळ लोकप्रसिद्ध आहे. जातक कथांतील संदर्भ पाहता ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात आंध्रमध्ये ही कला अस्तित्वात आली असावी. सातवाहन, पल्लव, चालुक्य या राजवंशांनी ह्या कलेला राजाश्रय देऊन ती लोकप्रिय केली. सोळाव्या शतकात विजयनगरचा राजा कोना भुधा रेड्डी याच्या काळात ती खऱ्या अर्थाने भरभराटीला आली. त्याच्या काळात छायाबाहुल्यांच्या खेळासाठी तेलुगू भाषेत स्वतंत्रपणे ‘रामायण रंगनाथन’ हे आख्यान लिहिले गेले.
‘थोलु बोमालट्टा’मधील बाहुल्या मेंढे, गायी, बैल यांच्या चामड्यापासून बनवलेल्या असून त्यांचे आकार पात्रांच्या महत्त्वानुसार कमी-जास्त असतात. हे खेळ दाखवण्यासाठी १० फूट उंच, २१ फूट लांब व ६ फूट खोल असा रंगमंच वापरला जातो. महाशिवरात्रीला शंकराच्या देवळाच्या बाहेर उघड्या जागेवर रंगमंच उभारून खेळ दाखवले जातात.
पिंगुळी परंपरेतील छायाबाहुल्यांच्या खेळाला ‘चामड्याच्या जायती’ असे संबोधले जाते. बाहुल्या बकऱ्याच्या चामड्याच्या बनवलेल्या आहेत. तुणतुणे आणि हुडुक (डमरू) ही लोकवाद्ये वापरली जातात. या ताल हुडुकासाठी ‘उजळी’ म्हणजे गुरांच्या कोथळ्याच्या आतले चामडे वापरले जायचे. त्यामुळे आवाज कडक यायचा. गुरे फाडून चामडे सुकवणारा दलित वर्ग आता धर्मांतरानंतर ते काम करत नसल्यामुळे, उजळी मिळत नाही असे प्रस्तुत अभ्यासकास गणपत मसगे यांनी सांगितले. त्याऐवजी बेडकाची चामडी किंवा बकऱ्याचे कातडे वापरले जाते. पिंगुळीचे ठाकर बाहुल्यांमागे तेलाचे दिवे न धरता ‘गोड्यातेलाची काडवात’ धरतात. पिंगुळीचे ठाकर चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या आणि चामड्याच्या जायती म्हणजे छायाबाहुल्यांचे खेळ गावोगावी करतात. पिंगुळीतून बाहेर पडण्यापूर्वी ते दांडेकराला म्हणजे देवाचाराला (रक्षणकर्त्याला) गाऱ्हाणे घालतात.
दिवाळीनंतर तुळशीचे लग्न म्हणजे ‘बारस’ झाल्यावर ते गावाबाहेर पडतात आणि अक्षय्यतृतीयेच्या दरम्यान पुन्हा गावी परततात. चित्रकथीची चित्रे, कळसूत्री बाहुल्या आणि छायाबाहुल्या ठेवण्यासाठी एक पेटारा असतो. दुसऱ्या गावी खेळ करण्यासाठी निघताना नारळ, कोंबडा देऊन ह्या पेटाऱ्याची पूजा करण्याची प्रथाही अजून अस्तित्वात आहे.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4800/Chitrakathi
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment