लळित : सोंगे आणून केलेले कीर्तन
ग्रंथनामा - आगामी
महेश केळुसकर
  • ‘लळित’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 13 April 2019
  • पडघम आगामी लळित Lalit महेश केळुसकर Mahesh Keluskar

कवी, पत्रकार डॉ. महेश केळुसकर यांचं ‘लळित’ हे पुस्तक रविवारी समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. या पुस्तकात ‘लळित’ या लोककलेची चर्चा केली आहे. ही लोककला मराठवाडा, विदर्भ आदि भागांत सादर केली जात असली तरी मालवणी मुलुखातील लळित त्याहून वेगळे आहे. त्या लळिताविषयीचे हे पुस्तक. हे पुस्तक अनघा प्रकाशन, ठाणे तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

महाराष्ट्रातील बहुतेक लोककलांचा प्रवास विधीनाट्याकडून लोकनाट्याकडे होत गेलेला आढळतो. लळिताचा मूळ उद्देशही वेदान्तपरच होता आणि एक धार्मिक विधी म्हणून ते सुरू झाले. लोकरूढ नाट्यप्रकार म्हणून प्रत्येक उत्सवाच्या शेवटी लळित होऊ लागले; हा त्याचा नंतरचा प्रवास. लळिताचे मूळ प्रयोजन होते भगवंताच्या लीळा दाखवणे. ह्या लीळा दाखवताना, ‘सुष्टांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी’ परमेश्वराने घेतलेल्या विविध अवतारांची महती लोकमानसावर ठसवण्यासाठी लळित सादर केले जावयाचे. त्यानिमित्ताने लोकांमध्ये सत्प्रवृत्ती वाढावी आणि दुष्ट वृत्तीचा नाश व्हावा, अशी भावना असावयाची. लळिताचे धार्मिक कृत्य हा उत्सवाचाच एक भाग होता आणि ते केल्याने देवाची सेवा होऊन पुण्य मिळते, गावगाडा सुरळीत चालू राहतो, अशी लळित सादर करणाऱ्यांची व प्रेक्षकांचीही श्रद्धा होती.

लळिताशी निगडित असलेल्या लोकश्रद्धांचे महत्त्व जाणून संतांनी लोकप्रबोधनासाठी त्याचा कौशल्याने उपयोग करून घेतला. डॉ. प्रभाकर मांडे हे लळिताला लोकप्रकटन संस्था म्हणतात. अध्यात्मतत्त्वाचा प्रचार हे लळिताचे एक मुख्य प्रयोजन संतकाळात झाले. त्याकडे निर्देश करताना डॉ. मांडे म्हणतात, ‘‘केवळ लोकगीतांचाच त्यांनी (संतांनी) अध्यात्मतत्त्व प्रचारासाठी वापर केला असे नसून लोकसांस्कृतिक संस्था ज्या प्रकटन माध्यमातून सामान्यजनांच्या धार्मिक जीवनाची जोपासना करीत होत्या, त्याचाही वापर संतांनी केला. गोंधळी, भारुडे, भुत्ये, वासुदेव या भगवंताच्या आविष्कार पद्धतीबरोबरच ज्या प्रकटन संस्थांद्वारे हे जनसामान्यांना सामोरे जात होते, त्यांचाही स्वीकार त्यांनी केला. कीर्तन, लळित, भजन इत्यादी लोकप्रकटन संस्थाद्वारे संतसाहित्याचे नियमन केले किंवा संतसाहित्याचे स्वरूप निश्‍चित केले. त्याचबरोबर संतांनी आपल्या प्रतिभासामर्थ्याने वाङ्मयनिर्मिती करून या लोकप्रकटन संस्थांना आकार प्राप्त करून दिला. अनेक कलातत्त्वांचा त्यात संयोग केला. लळित या प्रकटनसंस्थेद्वारे समाजाला सामोरे जाणारे भारूड नाट्य, काव्य, नृत्य, संगीत आणि अभिनय या माध्यमांच्या संयोगातून साकार होते.’’

भारूड आणि कीर्तन यामधून लळित विकसित होत गेले. त्यामुळे भारूड व कीर्तनाची जी प्रयोजने होती, तीच लळिताचीही झाली.

‘सोंगे आणून केलेले कीर्तन’ असे लळिताचे स्पष्टीकरण मराठी शब्दकोशात आढळते. प्राचीन काळी लळित हे कीर्तनाचाच एक भाग होते. कीर्तनाच्या शेवटी ते सादर केले जायचे. कीर्तनामध्ये जे आख्यान हरदास लावायचा, त्याच आख्यानातील मुख्य पात्रांची सोंगे आणून ते अभिनित केले जायचे.

संत नामदेवांना मराठी कीर्तनसंस्थेचे प्रस्थापक मानतात. परंतु त्यांच्या अभंगात लळिताचे वर्णन सापडत नाही. किंबहुना ज्ञानेश्वर-नामदेवकालीन अभंगवाङ्मयात या शब्दाचा आढळही होत नाही. कृ. बा. मराठे यांच्या मते ‘सोंगे आणून केलेले कीर्तन’ हा लळिताचा कोशगत अर्थ ज्ञानेश्वर-नामदेव काळानंतर केव्हातरी अस्तित्वात आला असावा. ते म्हणतात, ‘‘संत भानुदास मात्र ‘जाला त्रिभुवनी उल्हास । लळित गाये भानुदास ॥’ असा लळिताचा उल्लेख करतात. त्यावरून ‘शेवटचे मंगल गाणे’ एवढाच त्याचा अभिप्रेत अर्थ असावा, असे वाटते. पण भानुदासांनी ‘काला’ या सदराखाली जे दोन अभंग लिहिले आहेत, तेथे हा चरण आला आहे. त्यावरून त्याचा अर्थ महाराष्ट्र शब्दकोशकार देतात तसा करणे शक्य आहे.’’

कीर्तनाचे फार प्राचीन काळापासून चालत आलेले दोन प्रमुख संप्रदाय आहेत. डॉ. रा. शं. वाळिंबे यांनी ‘कीर्तनाची प्रयोग प्रक्रिया’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यासंबंधी माहिती दिली आहे. कीर्तनाचा वैयासिक संप्रदाय म्हणजे व्यास महर्षींनी प्रवर्तित केलेला संप्रदाय. आणि दुसरा नारदीय म्हणजे नारदमुनींचा संप्रदाय. वैयासिक संप्रदायाच्या कीर्तनात आसनावर बसून आणि पुढे पोथी ठेवून भागवतासारख्या पुराणांचे विवेचन केले जाते. नारदीय संप्रदायात वीणा, मृदंग, झांज इत्यादी वाद्यांच्या साथीत कीर्तनकार उभा राहून हरिकथा निरूपण करतो. हरिदासांनी केलेली कथा ही या नारदीय संप्रदायाला धरून आहे. वैयासिक संप्रदायानुसार समोर पोथी ठेवून केलेल्या निरूपणालाही ‘कथा’ म्हणण्याचा प्रघात फार प्राचीन काळापासून चालत आला आहे. या सर्व विवेचनावरून, लळित हे नारदीय संप्रदायातील कीर्तनाशी अधिक जवळचे आहे, असा निष्कर्ष काढण्यास प्रत्यवाय नसावा. लळितातील सूत्रधार आणि इतर सोंगेही आपापल्या भूमिका उभे राहून वठवतात. नृत्य आणि संगीत यांची त्यांना साथ असते. आणि सूत्रधार जी संपादणी करत असतो, ते एकप्रकारे निरूपणच असते. येथे सूत्रधार (किंवा पाटील) हा हरिदास असतो.

महाराष्ट्रात वारकरी, रामदासी, ख्रिस्ती असे कीर्तनाचे इतर संप्रदायही प्रचलित आहेत. वारकरी संप्रदायाचे कीर्तन भक्तीप्रधान असून नामभक्ती हा परममोक्षमार्ग समजला जातो. विठ्ठल हे या संप्रदायाचे दैवत असून सादर करणारेच प्रेक्षक असे त्याचे स्वरूप असते. वारकरी लोक प्रामुख्याने आत्मानंदासाठी कीर्तन करतात. पूर्वरंग, उत्तररंग असे भाग या कीर्तनात नसतात. तर वारकरी संप्रदायातील संतांचा एखादा अभंग घेऊन त्याचे विवेचन केले जाते आणि त्याला अनुलक्षून पुढील कथाभाग सांगितला जातो. तो अभंग हे या कीर्तनाचे मुख्य विषयसूत्र असते. कीर्तनासाठी प्रामुख्याने एखादे संतचरित्रच घेतले जाते. वारकरी कीर्तनकाराचा अभिनय करण्याकडे विशेष कल नसतो. तुलनेने नाट्यगुणही कमी असतात.

नारदीय कीर्तनात पूर्वरंग व उत्तररंग असतात. पूर्वरंगात अभंग निरूपण केले जाते. आणि उत्तररंगात आख्यान लावले जाते. आर्या, साकी, दिंडी, ओवी, पद, घनाक्षरी कटाव यांचा सढळ वापर या कीर्तनात असतो. नारदीय कीर्तनकाराच्या कलाजाणिवा तुलनेने अधिक संपन्न असतात. तो रसाळ व विनोदप्रचुर बोलणारा वक्ता असतो. संगीत, नृत्य, अभिनयादी अंगात त्याला रस असतो. त्याचा पोशाख आणि थाट अधिक ‘दर्शनीय’ असतो. ‘लळिता’तील सूत्रधार ह्या कीर्तनकाराशी अनेक बाबतीत नाते सांगतो.

लळित हा कीर्तनाचाच एक भाग होता. मग कालौघात ते कीर्तनापासून स्वतंत्र का झाले असावे? या प्रश्नाचा शोध घेताना एक प्रमुख कारण जाणवते ते असे की, कीर्तनाचा आणि लळिताचा प्रेक्षकवर्ग अभिरुचीच्या दृष्टीने भिन्न होता, म्हणून संतांनी आणि कीर्तनकारांनी जाणीवपूर्वक लळिताला कीर्तनापासून अलग केले असावे. यासंदर्भातील डॉ. गं. ना. मोरजे यांचे पुढील विवेचन महत्त्वाचे ठरावे : ‘‘कीर्तनपरंपरा ही महाराष्ट्रातील अगदी खालच्या पातळीवरील लोकसमूहात नसलेली लोककला व लोकसाहित्य आहे. या परंपरेचा ‘लोक’ काहीसे धार्मिक संस्कार असलेला, दोन वेळचे खाऊन-पिऊन जगणारा, धर्मावर श्रद्धा असलेला असतो. संतवाङमयावर, पंडिती काव्यावर त्याच्या सौंदर्य जाणिवा घडलेल्या असतात, असे स्थूल मानाने म्हणता येईल.’’

लळिताचा प्रेक्षकवर्ग हा उपरोल्लेखित प्रेक्षकापेक्षा थोडासा खालच्या पातळीवरील आणि सर्वसामान्य म्हणता येईल असा असतो. संतांना कीर्तनामध्ये रसभंग होऊ नये असे वाटत असावे आणि त्याच वेळी तळागाळातला सामान्य माणूसही आपल्या तत्त्वज्ञानाकडे आकर्षिला जावा याकडे त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळेच परमेश्वराचे गुणगान करण्याचे मूळ प्रयोजन कायम ठेवून कीर्तन आणि लळित हे स्वतंत्र लोककला प्रकार म्हणून पुढे विकसित झाले असावेत.

धर्मोपदेशाचे तसेच पारमार्थिक आणि नैतिक तत्त्वांच्या प्रतिपादनाचे प्रभावी साधन म्हणून कीर्तनाचा तसेच लळिताचाही उपयोग करण्यात आला. उद्बोधन आणि रंजन ह्यांच्या सुमेळातून समाजशिक्षणाचे कार्य करणारे एक लोकप्रिय माध्यम म्हणून कीर्तनाने कार्य केले. लळिताचेही उद्दिष्ट यापेक्षा वेगळे नव्हते. सादरकर्ते आणि प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार ह्या दोन माध्यमांच्या आकृतिबंधात फरक झालेला असला तरी त्यांच्या लोकजाणिवा एकच असलेल्या आढळतात ते याचमुळे.

लळित आणि भारूड

लळिताचे बीज भारुडात आहे, असे म्हटले जाते. वारकरी संप्रदायातील संत एकनाथांनी प्रामुख्याने भारुडांचा उपयोग जनजागरण करण्यासाठी केला. ‘स्वधर्माची शिकवण लोकभाषेत करून देणे आणि लोकाचारातील हीनत्व दूर करून निरोगी समाजजीवनाकडे लोकौघ वळवणे’ ही भारुडाची प्रमुख प्रयोजने आढळून येतात. ती साध्य करत असतानाच अध्यात्माची शिकवण हा प्रमुख हेतू भारुडे विसरलेली नाही. ‘लांबच लांब, गुंतागुंतीची, कंटाळवाणी वृत्तान्तकथा, अवघड कूट कविता, लेख, रूपक इत्यादी...’ असा ‘महाराष्ट्र शब्दकोशा’ने ‘भारूड’ या शब्दाचा अर्थ दिला आहे.

महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापर्यंत जाऊन तेथील लोकांच्या भाषेत लोकरंजन करणाऱ्या लोकभूमिकांच्या परंपरेचा संतांनी उपयोग करून घेतला. विशेषत: संत एकनाथांनी ह्या लोकभूमिकांचे सामर्थ्य ओळखले होते. ‘‘समाजातील ह्या लोकभूमिकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याच लोककलेला मिळतीजुळती अशी रूपकात्मक पद्धतीच्या तत्त्वज्ञानाची मांडणी करून सामाजिक नैतिकतेला जाग आणण्यासाठी ‘भारूड’ ह्या वाङ्मयप्रकाराचा जन्म झाला.’’

लळिताची निर्मिती प्रेरणाही भारुडाप्रमाणेच आहे. त्याचा रूपबंध भारुडाशी मिळताजुळता असून रूपकात्मक पद्धतीने आध्यात्मिक प्रबोधन करणे हा प्रधान उद्देश दिसतो.

भारूड म्हणजे ‘बहुरूढ’ असलेले कवन अशीही व्युत्पत्ती सांगितली जाते. या कवनातून जेव्हा असंबद्ध विषयांची भरताड भरती करण्यात आली, तेव्हा त्याला ‘लांबच लांब कंटाळवाणी वृत्तान्तकथा’ असा अर्थ प्राप्त झाला असावा.

संत एकनाथांनी सुमारे ३०० भारुडे रचिली; ती रूपकांच्या स्वरूपाची होती. अध्यात्म सांगावयाचे ते एखाद्या गोष्टीच्या किंवा रूपकाच्या स्वरूपात सांगावयाचे, हाच या भारुडांचा हेतू होता. त्यांची लक्षणीयता सांगताना ह.भ.प. ल. रा. पांगारकर लिहितात - ‘‘एकनाथी भारुडांची संख्या, व्यापकपणा, सौंदर्य, ठसठशीतपणा, विनोद व अध्यात्मबोध हे गुण अद्भुत असल्यामुळे नाथांच्या भारुडांचा अनन्यसाधारणपणा कायमच आहे.’’

भारुडे ठिकठिकाणी केली जात असल्यामुळे ही लोकप्रिय होत असत. त्यामुळेच त्यांना भावगाणी असेही म्हटले जात असे. लोकजीवनाचे खरेखुरे प्रतिबिंब या भारूड गीतात सापडते. तत्कालीन बलुतेदार आणि व्यावसायिक, कचेऱ्यांचा कारभार, आध्यात्मिक विषय, निरनिराळे खेळ, गौळणी व विराणी, स्त्रीजीवनातील विषय, सण, कूटविषयक, पशुपक्षी, भक्ती आदी अनेक लोकविषय संतांनी भारुडात हाताळले. त्यामुळेच ती बहुरूढ झाली. त्या काळी प्रचलित असलेल्या खेळ-तमाशाचा मुख्य भाग भारुडांचाच होता. भारुडे ही भजनी मंडळीत गाण्यासाठी केलेली नसून नाटकी अभिनयासाठी केलेली होती.

भारुडासाठी नित्य नवी सोंगे आणण्याच्या लोकप्रिय पद्धतीतूनच पुढे लळितांचा उदय झाल्याचे दिसते. लळितातील सोंगांना यथातथ्य वेश व रंगभूषा देण्यात येऊ लागली. लळित हे भारुडांचेच अधिक विकसित रूप होते. त्यामुळे साहजिकच लळितांनी स्वतंत्र रंगभूमीचा आग्रह धरला. मराठेशाहीत लळितांना राजमान्यता मिळाल्याचे दिसून येते. त्यावेळचे राजे, सरदार, मुत्सद्दी, शिलेदार हे सहकुटुंब सहपरिवार लळितांना जाऊन बसत असत.

लळित आणि भारुडे यातील साम्य-भेद सांगताना डॉ. शरद व्यवहारे म्हणतात, ‘‘एक लोकधर्मी नाट्य म्हणून लळित आणि भारूड यात काही बाबतीत साम्य आढळते. विशेषत: सोंगाची सजावट, लळितातील संवाद आणि समाजाचे रंजनातून उद्बोधन याबाबतीत लळित आणि भारुडे यात साम्य पाहावयास मिळते. लळिताच्या पदात आणि भारुडात रचनेच्या दृष्टीने काही साम्य आहे. लळितातून भारुडेही सादर केली जातात. पण लळिताला लाभलेले लोकप्रकटन रूप भारुडाला आलेले नाही. दासोपंतांची लळिताची पदे, रामानंद स्वामी आणि अच्युताश्रम यांच्या संपादण्या आणि सांप्रदायिक भक्तिमार्गांनी केलेले लळिताचे कार्यक्रम पाहून लळिताचे स्वतंत्र अस्तित्व आणि वेगळेपणा लक्षात येऊ शकतो.’

संतांचा उद्देश स्वधर्मजागृती हा होता. भगवंताचे महत्त्व सांगून त्याच्या भक्तीतून सत्विचारांची मांडणी करणाऱ्या संतांच्या वाङ्मयातून भारुडांचा जन्म झाला. आणि त्यातील ‘वेदान्तोपदेश’ हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन नाट्यमय रूपात भगवंताची लीला लळितातून सोंगी रूपात मांडली गेली. भारूड आणि लळित यांचा हा असा परस्परसंबंध आहे.

मराठवाडा व विदर्भ भागातील लळित

महाराष्ट्रात ‘लळित’ सादर होण्याची परंपरा फार जुनी आहे. दिवसेंदिवस ही लोककला क्षीण होत असली तरी मराठवाड्यातील आणि विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा या मराठवाड्याच्या सीमारेषेवर असलेल्या काही गावात अजूनही ‘लळित’ सादर केले जाते.

डॉ. शरद व्यवहारे यांनी आपल्या ‘लोकधर्मी नाट्याची जडण-घडण’ ह्या ग्रंथात (पृ. ६०/६१) यासंबंधीची आपली निरीक्षणे पुढीलप्रमाणे दिली आहेत : जांभळ अमावास्या, पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी, रंगपंचमीच्या दिवशी आणि यात्रा व उत्सवप्रसंगी या भागात लळिताचे कार्यक्रम होतात. काही गावात सुरुवातीला भजन होऊन नंतर सोंगे आणण्याचा कार्यक्रम होतो. तर काही भागात गावातील मंदिरात देवाची आरती केल्यावर मंदिराच्या आवारात सोंगे आणून खेळ केले जातात. तर यात्रा, उत्सव प्रसंगी आजूबाजूच्या गावातील हुन्नरी तरुण आपापल्या गावातून एकएक गट आणून सोंगे सजवतात व खेळ करतात.

या सर्वच प्रसंगी ती सोंगे आणण्यात येतात, त्यांचे बव्हंशी स्वरूप सारखेच असते. याप्रसंगी पुराणकथातील एखादी लहान घटना घेऊन संवादाच्या माध्यमातून ही सोंगे नाट्यमयरीत्या सादर करतात. तर काही सोंगे ही सद्य समाजजीवन विशेषांचा आविष्कार करणारी अशी असतात... अशा स्वरूपाच्या सोंगात त्या त्या प्रसंगांप्रमाणे संवाद असतात. मधूनच एखादे पद म्हटले जाते. सोंगाचे काम संपल्यावर अशा स्वरूपाच्या सोंगाची आरती केली जाते व ही आरती प्रेक्षकांत फिरवून पैसे जमा केले जातात. या जमलेल्या पैशातून सोंगासाठी वेशभूषा आणि रंगभूषेचे साहित्य विकत घेतले जाते.

मराठवाडा व विदर्भातील लळिताचे हे स्वरूप पाहिल्यावर काही निष्कर्ष निघतात ते असे :

१. केवळ नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशीच नव्हे तर इतर उत्सवप्रसंगीही तिथे लळित केले जाते.

२. लळिताच्या शेवटी इष्टदेवतेची आरती करण्याची प्रथा आहे. तथापि या भागात सुरुवातीलाच आरती केली जाते. शेवटी आरती केली जाते ती देवतेची नव्हे तर सोंगाची. शिवाय काही ठिकाणी सुरुवातीला भजन केले जाते. लळिताच्या रूढ प्रयोगपद्धतीहून ही प्रथा भिन्न असल्याचे दिसून येते.

३. लळित सादर करणारा एकच संच नसून आजूबाजूच्या गावातील ‘हुन्नरी तरुण’ ही सोंगे आणतात. त्यात पुनरावृत्ती असते.

४. सोंगांच्या संपादणीचे प्रमाण फारच कमी असते. वस्तुत: लळितात संपादणी हा प्रयोगाचा प्राण असतो. यावरून असे म्हणता येते की मराठवाडा विदर्भ विभागात सोंगीभारुडालाच लळित म्हणण्याची प्रथा असावी.

५. मराठवाडा-विदर्भात स्वतंत्र देवस्थान व्यवस्था नसल्याने लळित सादर करण्यासाठी यावयाचा खर्च प्रेक्षकांनी दिलेल्या देणगीतून करण्यात येतो. देवस्थानांचा आर्थिक आश्रय तेथील लळित सादर करणाऱ्यास मिळत नसावा.

दशावताराप्रमाणेच, विधीनाट्य व लोकनाट्य यांच्या सीमारेषेवर असलेल्या ‘लळित’ या प्रयोगात्म लोककलेच्या स्वरूपासंबंधीची चर्चा येथवर आपण केली. या चर्चेचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे निघतात :

१. लळित हा शब्द ‘लीला’ ह्या शब्दावरून तयार झाला असावा. उत्सवाचे वेळी लळित करण्याची प्रथा प्राचीन दिसते.

२. ‘व्यक्तीने एखाद्याचे सोंग घेऊन केलेली भूमिका’, ‘संतांची भारुडे प्रत्यक्ष सोंग घेऊन मंचावर सादर केली जातात तो कार्यक्रम’, अशा लळिताच्या अन्य व्याख्या दिसतात.

३. लळिताचा मूळ उद्देश वेदान्तपर होता आणि एक धार्मिक विधी म्हणून ते सुरू झाले. त्यानंतर लोकप्रबोधन व लोकरंजन अशी त्याची प्रयोजने बदललेली दिसतात. तथापि अद्यापही लळिताने आपला मूळ तत्त्वांश कायम राखला आहे.

४. भारूड आणि कीर्तन यामधून लळित विकसित होत गेले.

५. प्रारंभी लळित हे कीर्तनाश्रयी होते. नारदीय कीर्तनपरंपरेशी लळिताचे नाते आहे. त्यानंतर विकसित सौंदर्यजाणिवा व विकसनशील सौंदर्यजाणिवा असा प्रेक्षक अभिरुचीत भेद जाणवल्याने संतांनी कीर्तनापासून लळिताला वेगळे केले.

६. लळितावरील भारुडांचा प्रभाव लक्षणीय आहे. स्वधर्माची शिकवण लोकभाषेत करून देणे आणि लोकाचारातील हीनत्व दूर करून निरोगी समाजजीवनाकडे लोकौघ वळविणे ही भारुडाची प्रयोजने लळितातही आढळून येतात. त्याचा रूपबंधही भारुडाशी मिळता-जुळता आहे.

७. मराठवाडा-विदर्भ विभागात सोंगी भारुडालाच ‘लळित’ म्हणण्याची प्रथा असल्याचे दिसते. लळिताचे हे स्वरूप पाहिल्यावर त्याच्या प्रयोगात्म क्षमतेचा अंदाज यावा. विधी-विधीनाट्य-लोलोकधर्मीनाट्य असा हा लळिताचा प्रवास दिसतो.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4802/Lalit 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......