‘रोमिओ अकबर वॉल्टर’ : गुप्तहेरांनी नटलेल्या ‘रॉ’चं बॉलिवुडीकरण आणि चष्मे, विग, जखमा, देशप्रेम वगैरे वगैरे
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘रोमिओ अकबर वॉल्टर’चं पोस्टर
  • Sat , 06 April 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie रोमिओ अकबर वॉल्टर RAW Romeo Akbar Walter जॉन अब्राहम John Abraham जॅकी श्रॉफ Jackie Shroff मौनी रॉय Mouni Roy

साल आहे १९७१. नुकतंच घडून गेलेलं भारत-चीन युद्ध, पाकिस्तानातील अंतर्गत भागात घडत असलेली उलथापालथ (शिवाय पुढे जाऊन घडणारं पाकिस्तानचं विभाजन आणि बांगलादेश नामक नवीन देशाची निर्मिती) अशा नानाविध घडामोडी पाहता माहितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माहिती अनेक प्रकारची असते आणि अनेक स्वरूपात येते. सध्या लष्करी आणि राजकीय हालचालींची माहिती आणि किंमत महत्त्वाची आहे. भारतातील गुप्तचर संस्था ‘रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग’ ऊर्फ ‘रॉ’ या माहितीचं अर्थात ‘इंटेल’चं महत्त्व जाणते. त्यानुषंगानं भारतीय हेरांचं पाकिस्तानमधील अस्तित्व आणि त्यांच्याद्वारे मिळणारी माहिती इथं केंद्रस्थानी आहे. असं असलं तरी स्वतः ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ मात्र माहितीचं महत्त्व, गुप्तता आणि हवा तो परिणाम साधण्यासाठी गरजेची असलेली अस्पष्टता यांचं महत्त्व जाणतोच असं नाही. ज्यामुळे तो प्रेक्षकाच्या बौद्धिकतेला कमी, किंबहुना स्वतःच्या (लेखकांच्या) बुद्धिमत्तेचा गवगवा करत प्रत्येक गोष्टीचं अतिसुलभीकरण करण्यात धन्यता मानत एकूण परिणाम कमी करत जातो.

श्रीकांत राय (जॅकी श्रॉफ) हा रॉचा तत्कालीन संचालक पाकिस्तानमध्ये राहून गुप्तपणे काम करू शकेल, अशा व्यक्तीच्या शोधात असताना त्याची भेट रोमिओ अलीशी (पुढे जाऊन अकबर मलिक आणि वॉल्टर खान बनणारा - जॉन अब्राहम) होते. बँकेत नोकरी करणारा आणि रंगभूमीवर काम करणाऱ्या (भलेही अभिनयाबाबत कामचलाऊ असला तरी वेष बदलण्यात पारंगत असलेला) रोमिओच्या रूपात रॉला या मोहिमेला न्याय देऊ शकेल अशी योग्य व्यक्ती सापडते. काहीशा अपरिपक्व आणि अपरिणामकारक भासणाऱ्या ट्रेनिंगच्या दृश्यांच्या नंतर आताच्या अकबरची रवानगी पाकव्याप्त काश्मीरला होते. तिथून हत्यारांचा पुरवठादार आणि पाकिस्तानी लष्कर प्रमुखाच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक असलेल्या इसाक आफ्रिदीच्या (अनिल जॉर्ज) संपर्कात राहून त्याच्या हालचालींची बित्तंबातमी भारतीय हेरांच्या जाळ्याचा सूत्रधार, जोकरकरवी (मुश्ताक काक) रॉला कळवणं हे त्याचं काम. तर साहजिकच त्याला त्यात मिळणारं यश-अपयश इत्यादी घटनाक्रम म्हणजे सदर चित्रपटाचं कथासूत्र.

हे एकूण प्रकरण जेम्स बाँड, इथन हंट अशा काल्पनिक गुप्तहेरांहून अधिक रंजक असलं तरी त्याचं हे पडद्यावरील चित्रण मात्र काहीसं संमिश्र भावना निर्माण करणारं आहे. कारण मुळातच रंजक असलेल्या प्रकरणात प्रेक्षकांच्या तथाकथित आवडीच्या हिशोबानं अधिकची भर घालण्याची मुख्य प्रवाहातील चित्रपटांची जुनीच खोड इथंही आपलं काम करते. ज्यामुळे नायक म्हटलं की गरजेचं असलेलं अनावश्यक (आणि अतर्क्य) प्रेमप्रकरण, एकाच माणसाच्या कथेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी (दिग्दर्शक-निर्मात्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे) वास्तव जगतातील तीन निराळ्या लोकांच्या कथा एकत्र गुंफत प्रकरण अधिक क्लिष्ट करण्याचं सत्र इथंही सुरू राहतं.

बरं, क्लिष्टपणा बहाल करणं चुकीचं नसलं तरी आधी उल्लेख केल्याप्रमाणे त्यातील घटनाक्रमाचा सगळा संभाव्य परिणाम नाहीसा करेल इतकं अतिसुलभीकरण इथं केलं जातं, जे अधिक रटाळ ठरतं. इथं चावून चावून चोथा झालेली रूपकं दिसत राहतात आणि प्रेक्षकाच्या बुद्धिमत्तेला वारंवार कमी लेखलं जातं. श्रीराम राघवन म्हणत असतो, ‘प्रेक्षकाला काहीच कळत नाही असं समजून प्रत्येक गोष्ट नको तितक्या प्रमाणात उलगडून सांगण्याची गरज नसते.’ पुढे घडणाऱ्या घटनांची कल्पना जर आधीच दिलेली असेल (एका शब्दात - फोरशॅडोइंग) तर ती गोष्ट पुन्हा उलगडून न सांगणं अनावश्यक असतं. मात्र ही गोष्ट सदर चित्रपटकर्त्यांच्या गावी नसल्यानं माहितीचा भडीमार केला जातो.

‘रोमिओ अकबर वॉल्टर’मधील प्रमुख भूमिका निभावणारा जॉन अब्राहम आणि नायिकेच्या (?) भूमिकेतील मौनी रॉय नेहमीप्रमाणे कामचलाऊ ठरतात. रॉय कायम सुंदर दिसण्यात यशस्वी ठरत असल्यानं तिच्या पात्राच्या इतर कौशल्यांपेक्षा मेकअप करण्याचं कौशल्य अधिक कौतुकास्पद ठरतं. याउलट जॅकी श्रॉफ, अनिल जॉर्ज, रघुबीर यादव, सिकंदर खेर, राजेश शृंगारपुरे ही मंडळी अधिक प्रभावी ठरतात. श्रॉफ आणि यादव तर अभूतपूर्व कामगिरी करतात. जॉर्ज सध्या हमखास पाकिस्तानी व्यक्तींच्या भूमिकेत दिसून टाइपकास्ट होत असला तरी तो आपली कामगिरी चोख बजावतो.

चित्रपट तांत्रिकदृष्ट्या अधिक उजवा ठरतो. तपन तुषार बासूचं छायाचित्रण आणि रॉबी ग्रेवालचं दिग्दर्शन नेटकं आणि प्रभावी आहे. गाण्यांचा अट्टाहास टाळता असता तर बरं झालं असतं. कारण चित्रपट सुरू होताच तीनेक मिनिटांपासूनच गाण्यांची सुरुवात होते. हानिफ शेखचं पार्श्वसंगीत काही वेळा परिणामकारक, तर इतर वेळी लाऊड आणि उथळ ठरतं. चित्रपट शेवटाकडे जाताना अधिक बाळबोध होत जातो, आणि बराच लांबतो. ही अतिरिक्त लांबी चित्रपटकर्त्यांच्या तथाकथित ट्विस्ट्सच्या अट्टाहासाला अधोरेखित करते.

‘रोमिओ अकबर वॉल्टर’ हा बऱ्यापैकी चांगला आणि जॉन अब्राहमच्याच निव्वळ असह्य ठरणाऱ्या ‘परमाणु’ आणि ‘सत्यमेव जयते’पेक्षा उजवा चित्रपट आहे. तो पाहणं अनिवार्य नसेल आणि मनापासून इच्छा असेल तेव्हा फारशा अपेक्षा न बाळगता पाहिल्यास उत्तम.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......