मराठी पुस्तकांचे माहेरघर, ‘बॉम्बे बुक डेपो’ आणि मी, पुस्तक पंढरीचा वारकरी!
ग्रंथनामा - झलक
पांडुरंग कुमठा
  • पांडुरंग कुमठा आणि ‘पुस्तक पंढरीचा वारकरी!’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Tue , 02 April 2019
  • ग्रंथनामा झलक पांडुरंग कुमठा पुस्तक पंढरीचा वारकरी

गिरगाव येथील ‘बॉम्बे बुक डेपो’चे जनक पांडुरंग नागेश कुमठा यांचे २८ मार्च २०१९ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ‘मराठी पुस्तकांचे माहेरघर’ हे बिरुद मिरवण्याचा अधिकार काही वर्षांपूर्वी फक्त मुंबईच्या गिरगावातील ‘बॉम्बे बुक डेपो’ या दुकानाचा होता. आणि त्याचे शिल्पकार होते, पांडुरंग कुमठा. ‘बालसाहित्य जत्रा’, ‘पुस्तक जत्रा’, ‘स्वाक्षरी सप्ताह’,‘पुस्तक पंढरी’, ‘साहित्य दिंडी’, ‘बॉम्बे बुक क्लब’, ‘बॉम्बे बुक अ‍ॅवॉर्ड’, ‘बालसाहित्य जत्रा’ मासिक, ’पुस्तक पंढरी’ मासिक, लंडनमध्ये मराठी पुस्तकांचे प्रदर्शन, असे कितीतरी नावीन्यपूर्ण उपक्रम कुमठा यांनी राबवले. त्यांचं ‘पुस्तक पंढरीचा वारकरी’ हे आठवणीपर पुस्तक २०११ साली पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं. त्यातील एका हा वेचक संपादित अंश...

.............................................................................................................................................

१.

पॉप्युलर प्रकाशनची पहिली दोन पुस्तके आमच्या प्रेरणेमुळे प्रसिद्ध झाली. त्याअगोदर ‘पॉप्युलर बुक डेपो’ या नावाने इंग्रजीत मेडिकल व इतर क्रमिक पुस्तकांचे प्रकाशन चालू होते. माझे मेहुणे रामदास भटकळ त्या वेळी कॉलेजमध्ये शिकत होते. पण त्यांचे पुस्तक प्रकाशन करायचे एक स्वप्न होते. जेव्हा आम्ही गंगाधर गाडगीळ यांचा कथासंग्रह बॉम्बे बुक डेपोतर्फे प्रकाशित करावयाचा असे ठरले, तेव्हा रामदासने त्यांना भेटून तो संग्रह बॉम्बे बुक डेपोच्या ऐवजी ‘पॉप्युलर प्रकाशन’ या नावाने करायचा ठरवले व त्याच वेळी त्यांनी अरविंद गोखले यांचाही एक संग्रह प्रसिद्ध करावा असे ठरवून ‘कबुतरे’ आणि ‘कमळण’ ही दोनही पुस्तके १९५२ च्या ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध केली. त्यानंतर पॉप्युलर प्रकाशनाची अनेक पुस्तके हळूहळू निघायला लागली. पण त्यांच्या विक्रीची सर्व जबाबदारी आम्ही बॉम्बे बुक डेपो मार्फतच घेतली.

२.

५ ऑगस्ट १९६२ ला ताडदेव येथे गंडभीर यांच्या पॉप्युलर प्रेसच्या पहिल्या मजल्यावर आमचे होलसेल डिपार्टमेंट- ‘भटकळ बुक्स इंटरनॅशनल’ ही संस्था सुरू झाली. त्याचप्रमाणे ‘पॉप्युलर प्रकाशन’ ह्या संस्थेचे कार्यालयही तेथे सुरू झाले. ह्या कार्यालयाचे उद्घाटन तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही. के. कृष्ण मेनन ह्यांच्या हस्ते झाले. मी मात्र बेंगळूरला असल्यामुळे उपस्थित राहू शकलो नाही. ह्या अगोदर पॉप्युलर प्रकाशनचे सर्व संपादकीय कामकाज पॉप्युलर बुक डेपो लॅमिंग्टन रोडवरूनच चालत असे. आता सर्व वितरणाचेही व्यवहार ताडदेव ऑफीसमधूनच सुरू झाले.

मी जेव्हा बेंगळूरहून मुंबईला परत आलो, तेव्हा आमचा आनंद व सौ. मीरा ह्यांना ताप येत होता. त्यामुळे काही काळ त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये गेला. त्यानंतर मी पुन्हा बॉम्बे बुक डेपोच्या कामात मग्न झालो. याच वेळेस क्रॉस मैदानमध्ये भरलेल्या ग्रंथ प्रदर्शनात आम्ही भाग घेतला होता. त्यामुळे मला एक कल्पना सुचली की, आम्हीच अशा तऱ्हेचे फक्त बालवाङ्मयाचे प्रदर्शन आयोजित केले तर काय प्रतिसाद मिळेल हे पाहायचे. तसेच बालवाङमय किती आहे ह्याचा अंदाजही लागेल. याच हेतूने मला माहीत असलेल्या सर्व प्रकाशकांसाठी एक पत्रक तयार करून त्यांना त्या पत्रकाप्रमाणे त्यांच्या बालवाङ्मयाच्या प्रत्येकी पाच प्रती आमच्याकडे पाठवण्याची विनंती केली. त्याचे पैसे एक महिन्यात पाठवू असेही आश्वासन दिले. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील बहुतेक सर्व प्रकाशकांनी त्यांच्याकडे असलेल्या सर्व बाल-कुमार पुस्तकांचा ढीग बॉम्बे बुक डेपोमध्ये पाठवला. मुलांसाठी असलेले हे ग्रंथभांडार पाहून आश्चर्य वाटले. हा सर्व उपदव्याप मी मार्च महिन्याच्या मध्यावर सुरू केला. मला माहीत होते की, सर्व शाळांच्या परीक्षा २० एप्रिलपर्यंत पूर्ण होतात व रिझल्ट ३० एप्रिलला होऊन सुट्टी सुरू होते. म्हणून मी असे ठरवले की आमच्या दुकानातच एक ‘बालसाहित्य जत्रा’ भरवावी. ’Fair’ याला ‘जत्रा’ हा शब्द मी याच वेळेपासून वापरायला सुरू केला व आता तर सर्व लोक ह्या शब्दाचा वापर सर्रासपणे सर्व ठिकाणी करीत आहेत. असो.

ह्याप्रमाणे सर्व योजना आखली व एक पत्रक तयार करून सर्व स्थानिक वृत्तपत्रांना एक निवेदन केले की, २० एप्रिल १९६४ ते मेच्या १५ तारखेपर्यंत बॉम्बे बुक डेपोमध्ये ‘बालसाहित्र जत्रा’ भरवली जाईल. त्या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे बालवाङ्मयाकडे मुलांना व पालकांना आकृष्ट करणे. सुट्टीच्या दिवसांत त्यांनी पुस्तके खरेदी करून वाचनाचा आनंद लुटावा. वृत्तपत्र प्रसिद्धीमुळे अपेक्षेबाहेर प्रतिसाद मिळाला. सुरुवातीपासूनच अफाट गर्दी सुरू झाली. माझ्या प्रयत्नाला यश आले हे पाहून मला हुरूप आला.

३.

‘बालसाहित्य जत्रा’ जेव्हा यशस्वी झाली, तेव्हा मला कळून चुकले की मराठी माणूस थोडा कंजूष वृत्तीचा असला तरी तो पुस्तकप्रेमी आहे. म्हणून काही निवडक प्रकाशकांची चांगली व घरी ठेवण्याजोगी, ‘अक्षर वाङमय’ (classics) म्हणून गणली गेलेली पुस्तके निवडून त्याचा अशाच तऱ्हेचा ‘पुस्तक जत्रा’ मेळावा किंवा सध्या ‘यात्रा’ म्हणतात तसे करून लोकांसमोर ठेवले तर कसा प्रतिसाद मिळेल यांविषयी मी विचार करू लागलो. ही योजना मी सदानंद व रामदास भटकळ, श्री. पु. भागवत व विष्णुपंत भागवत यांच्यासमोर मांडावी असा विचार करून एके दिवशी मौज ऑफिसमध्ये भेटण्याचे ठरवले व आम्ही तेथे सर्व जमलो. बराच विचारविनिमय झाल्यानंतर ‘ग्रंथ प्रसार केंद्र’ ही एक नवीन संस्था सुरू करावी अशी कल्पना आली.

या विषयी आम्ही जयवंत दळवी यांच्याशी चर्चा केली व त्याप्रमाणे सहा प्रकाशकांची नावे पुढे आली- मौज, पॉप्युलर, मॅजेस्टिक, नवलेखन, व्होरा अ‍ॅण्ड कंपनी व परचुरे प्रकाशन. या प्रकाशकांचे निवडक पुस्तकांचे प्रदर्शन गावोगावी-महाराष्ट्रभर आयोजित करायचे असे ठरले. या उपक्रमात आलेला खर्च सर्वांनी विभागून घ्यायचा होता.

हे काम कोणी करायचे व कसे करायचे हा प्रश्न मी सोडवला. या सर्व प्रकाशकांची पुस्तके बॉम्बे बुक डेपोमध्ये मागवायची व त्याचे प्रदर्शन करायचे याची जबाबदारी मी स्वीकारली. त्यासाठी एक सेल्समन व एक प्यून घ्यायचे मी ठरविले. त्यांना थोडे ट्रेनिंग द्यायचे व त्यांना निरनिराळे ठिकाणी पाठवून प्रदर्शन भरवायचे ठरले. हा सर्व हेतू पूर्ण करण्याकरिता ‘ग्रंथ प्रसार केंद्र’ची स्थापना १९६५ च्या जानेवारीत झाली. हे काम करण्यासाठी विष्णुपंतांनी अरुण गाडगीळ या तरुण मुलाची शिफारस केली. हा अरुण गाडगीळ युनिव्हर्सिटीमध्ये काम करीत होता. त्याचे अक्षर व हिशोब वगैरे लिहिण्याची पद्धती चांगली व चोख होती हे त्यांनी पाहिले होते. म्हणून त्यांना आमच्या या नवीन उपक्रमांमध्ये येण्याविषयी भागवतांनी गाडगीळबरोबर विचारविनिमय करूनच त्याला ग्रंथ प्रसार केंद्राचे काम पाहण्याकरिता नेमले. त्याला एक जाणीव दिली होती की, हा एक प्रयोग आहे व याची शाश्वती नाही. पण किमान तीन वर्षे हा प्रयोग राबविला जाईल व त्याला पगारही चांगला दिला जाईल. तीन वर्षांनंतर हा प्रयोग बाद झाल्यास त्यांनी आम्हांला दोष देऊ नये. (आपली परमनंट नोकरी सोडल्याबद्दल!) त्यानेही ही अट कबूल केल्यावरच आम्ही ही संस्था सुरू केली.

या संस्थेचे पहिले प्रदर्शन २३ जानेवारी १९६५ ला रत्नागिरी येथील पटवर्धन हारस्कूलच्या मोठ्या हॉलमध्ये भरवले गेले. प्रदर्शन तीन दिवस होते. कोकण विभागात अशा तऱ्हेचे पहिलेच प्रदर्शन असल्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला व वृत्तपत्रांनीही या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले. ‘ग्रंथ प्रसार केंद्र’ व ‘बॉम्बे बुक डेपो’ यांच्या सहकार्याने उपक्रम केल्यामुळे आम्हांलाही हुरूप व उत्साह आला.

या सर्व कामाला आम्ही निवडलेले अरुण गाडगीळ (विशीतला तरुण) व त्याच्याबरोबर सदाशिव कुडकर (हा त्याचा असिस्टंट कम प्यून) यांचा फार उपयोग झाला. दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन नव्याण्णव प्रदर्शने भरविली व शेवटचे शंभरावे प्रदर्शन दिल्ली येथे तेव्हाचे संरक्षणमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होऊन पार पडले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. दिल्लीत भरणारे हे पहिलेच मराठी पुस्तकांचे भव्य प्रदर्शन असावे. तेथील बहुतेक सर्व प्रतिष्ठित मराठी माणसे हे प्रदर्शन पाहायला आली होती. मीही त्या प्रदर्शनाला मुद्दाम जातीने हजर होतो. आमच्या नवीन उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला, पण खर्च मात्र वाढत राहिला. त्यामुळे तीन वर्षांनंतर (म्हणजे १९६८ साली) हा उपक्रम बंद करावा लागला.

४.

ह्याच काळात (म्हणजे १९६४-६७) मला व सदानंद ह्यांना दुसरी एक कल्पना सुचली. प्रदर्शने आम्ही भरवतोच. पण पाश्चात्य देशांत जसे Meet the Author - लेखक आपल्या भेटीस- असे उपक्रम फार यशस्वी ठरतात तसे आम्ही मराठीमध्ये असा एखादा नावीन्यपूर्ण प्रयत्न का करू नये? ह्याविषयी आम्ही तिघे - रामदास, सदानंद व मी विचार करू लागलो. त्याप्रमाणे श्रेष्ठ अशा लेखकांची नावे लिहून काढली. हा प्रयोग केव्हा केला तर त्याला प्रतिसाद योग्य रीतीने मिळेल ह्याबद्दलही विचार केला. ह्याला नाव काय द्यायचे हाही एक प्रश्न होता. ह्याविषयी श्री. पु. भागवत व ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्याशी गप्पागोष्टी करताना ज्ञानेश्वरने ‘पुस्तक पंढरी’ हे नाव सुचविले. सर्वांना ते नाव आवडले. ह्या उपक्रमाची पूर्वतयारी करायला बरीच मेहनत घ्यावी लागली. पहिल्यांदा कोणाला बोलवायचे ह्याबद्दलही चर्चा झाली. रोज एका लेखकाला पाचारण करायचे व संध्याकाळी सहा ते साडेसातपर्यंत बॉम्बे बुक डेपोमध्ये बसण्यासाठी खास व्यवस्था करायची असे ठरवले. तसेच त्या त्या लेखकाची सर्व पुस्तके आमच्या शोकेसमध्ये चांगल्या रीतीने प्रदर्शित करारची होती. सोमवार ते शनिवारपर्यंत रोज एका लेखकाला बोलवायचे आणि या उपक्रमाची जाहिरात एक विशिष्ट डिझाईन करून मुख्य दैनिकांमध्ये द्यायचे ठरविले. त्याप्रमाणे एक पत्रकही टाइप करून घेतले. त्याची सायक्लोस्टाईल कॉपी करून सर्व वृत्तपत्रांना पाठवली. आम्ही पहिली ‘पुस्तक पंढरी’ १० मे १९६९ ते १६ मे १९६९ या तारखांना ठरवून ‘स्वाक्षरी सप्ताह’ योजला होता. पण प्रचंड रिस्पॉन्स पाहून तो २० मेपर्यंत वाढवावा लागला.

योजनेची वैशिष्ट्ये अशी होती - ग्रंथप्रेमी मंडळींना मुक्तद्वार होते. कथा, कादंबरी, काव्य, टीका, निबंध, नाटके, व्यवसाय मार्गदर्शन, प्रवास व विविध असंख्य विषयांची वर्गवारी करून पुस्तके ठेवली होती. ही आपल्या आवडत्या लेखकांच्या स्वाक्षऱ्या घेण्याची अपूर्व संधी होती. स्वाक्षरी सप्ताहाचा कार्यक्रम रोज सायंकाळी ६ ते ७.३० पर्यंत आणि प्रदर्शन रोज सकाळी ९ ते रात्री ८ वा. पर्यंत चालू ठेवून फक्त सप्ताहापर्यंतच खास सवलत १० टक्के देण्यात आली.

प्रत्येक दिवशी त्या त्या लेखकांची सर्व उपलब्ध पुस्तके आमच्या शोकेसमध्ये ठेवली जात होती. लेखकाचे मोठे चित्र असेल तर (किंवा फोटो) तेही बाहेरच्या शोकेसमध्ये सजवून ठेवले जाई. आतल्या बाजूमध्येही पुस्तके विषरानुसार ठेवली होती. एका बाजूला ध्वनिमुद्रिका लावल्यामुळे मधुर तंतुवाद्याचे सूर सर्वत्र प्रदर्शनात बहरत होते.

पहिल्या दिवशी तोबा गर्दी झाली. कारण आचार्य अत्रे यांच्या हस्ते स्वाक्षरी सप्ताहाचे उद्घाटन झाले. ते स्वतः स्वाक्षरी देतात म्हटल्यावर ग्रंथप्रेमी लोक सायंकाळी पाच वाजल्यापासूनच येऊन पुस्तके निवडून त्यावर स्वाक्षरी घेण्यास उत्सुक होते. ठीक ६ वाजता गजाननराव परचुरे आणि सदानंद भटकळ आचार्य अत्रे यांना घेऊन बॉम्बे बुक डेपोच्या दरवाजाजवळ येताच आमचे मित्र राजदत्त (फोटोग्राफर) कॅमेरा घेऊन सज्ज होते. पत्रकारांपासून फोटोग्राफरही तेथे हजर होते. त्यामुळे थोडी गडबड झाली. पण आचार्य अत्रेसाहेबांची एण्ट्री मात्र झकास झाली. मी त्यांचे स्वागत केले व त्यांना खास आसनावर बसायला सांगितले. पण ग्रंथप्रेमी रसिकांना घाई होती व त्यांनी अत्रेसाहेबांना चहा पिण्यासही सवड दिली नाही व अत्रेसाहेबांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे स्वाक्षऱ्या देण्यास सुरुवात केली. सतत सात वाजेपर्यंत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ग्राहक रांगेत उभे राहून अत्रेसाहेबांशी गप्पागोष्टी करत स्वाक्षऱ्या घेत होते. तो एक अविस्मरणीय देखावा होता. एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे अत्रेसाहेब प्रत्येक पुस्तक पाहून त्या व्यक्तीकडे पाहत होते व त्यांची निवड छान आहे असे म्हणून स्वाक्षरी देत असत. त्यामुळे प्रत्येकाला फार आनंद होत होता. एका मुलाने तर एक रुपयाची नोट पुढे केली व स्वाक्षरी मागितली. तेव्हा अत्रेसाहेब ओरडले की, ‘अरे मुला, त्यावर मी कशी स्वाक्षरी देऊ? जा व एक रुपयाचे पुस्तक घे. त्यावर मी स्वाक्षरी देतो.’ मग त्या मुलाने गोष्टीचे एक पुस्तक घेऊन त्यावर स्वाक्षरी घेतली.

हा उपक्रम एकंदरीत फारच गाजला. सर्व वृत्तपत्रांनी ह्या उपक्रमाबद्दल चांगला अभिप्राय देऊन आणि अत्रेसाहेबांचा फोटो देऊन माझे व बॉम्बे बुक डेपोचे कौतुक केले होते. आचार्य अत्रे यांच्यानंतर ‘पुस्तक पंढरी’ या उपक्रमात श्री. ज. जोशी, गंगाधर गाडगीळ, ना. गो. कालेलकर, मंगेश पाडगांवकर, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, ज्योत्स्ना देवधर यांच्या उपस्थितीने या ‘स्वाक्षरी सप्ताहा’चा हुरूप वाढला. वाचकांचा प्रचंड प्रतिसाद या उपक्रमाला लाभला. १६ मे रोजी तर ‘ठणठणपाळ’ यांच्या स्वाक्षरीच्या वेळी अशीच गर्दी झाली होती. ‘ललित’ मासिकाचे सर्व वाचक ‘ठणठणपाळ’ कोण हे पाहण्यासाठी आले होते व त्याविषयीचे एक कुतूहल निर्माण झाले होते. वाचकांचे कुतूहल वाढवण्याची एक नामी संधी मिळाली होती.

‘ललित’मधील ‘ठणठणपाळ’ सदरावरील चित्राचे एक मोठे कटआऊट करून त्याला एक लहानशी खिडकी तयार करून घेतली होती. बाजूला प्लायवूडची फळी लावल्यामुळे लोकांना आत कोण आहे हे कळत नव्हते. प्रत्येकाचे पुस्तक घेऊन झाल्यावर आत खिडकीमधून सरकावले जायचे व लगेच ‘ठणठणपाळ’ अशी स्वाक्षरी होऊन ते पुस्तक बाहेर दिले जाई. आत कोण आहे हे इतरांना कळणे शक्य नव्हते. अशा तऱ्हेने हे गुपित सात वाजेपर्यंत चालू राहिले. मात्र ‘महाराष्ट्र टाइम्स’चे अशोक जैन हे फार उतावीळ झाले होते व ते श्री. पु. भागवत व ‘ललित’चे संपादक केशवराव कोठावळे यांना आग्रह करत होते की, ‘ठणठणपाळ’ यांना बाहेर प्रकट करा म्हणून. त्यांनी एक तऱ्हेचा सत्याग्रहच केला म्हणावे लागेल. त्यामुळे शेवटी केशवरावांनी आत एक चिठ्ठी पाठवली व ‘ठणठणपाळ’ ही व्यक्ती हळूहळू बाहेर पडली व सर्वांना धक्का बसला की, ही व्यक्ती दुसरे कोणी नसून जयवंत दळवी हे आहेत.

१९६९ ते १९८० ह्या बारा वर्षांत मुंबईतील वाचकांना त्यांच्या आवडत्या लेखकांना भेटण्याची सुवर्णसंधी आम्ही उपलब्ध करून दिल्याचे समाधान नक्कीच आहे. ह्यामुळे माझा संबंध अशा ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिकांशी आला.

५.

१९६५ ते १९७५ सालात कादंबरी क्षेत्रात मराठीमध्ये कुसुम अभ्यंकर व बाबा कदम ह्या दोन व्यक्ती फार लोकप्रिय होत्या असे मला आठवते. त्यांच्या कादंबऱ्यांना फार मागणी असारची. आमच्याकडे त्यांच्या कादंबऱ्यांना अनेक वाचनालयांकडून मागणी यायची. तेव्हा १९७८ साली इतर लेखकांबरोबर आम्ही बाबा आढाव, बा. भ. बोरकर, यशवंत देव, रविंद्र पिंगे, ग. प्र. प्रधान, वि. स. वाळिंबे यांच्या नंतर आम्ही कुसुम अभ्यंकर व अरुण साधू यांना आमंत्रित केले होते. कुसुमताई तेव्हा रत्नागिरीत आमदार पदावर होत्या असे आठवते. त्या फार लोकप्रिय कादंबरीकार होत्या. त्या दिवशी खरेच त्यांचे चाहते, वाचक भरपूर प्रमाणात उपस्थित होते. त्यांचे मित्रमंडळ व वाचक भरपूर होते. त्या स्वाक्षरी समारंभ संपल्यावर फार खूष दिसल्या व आम्हाला त्यांनी रत्नागिरीला यायचे आमंत्रण दिले. ह्या अगोदर मला आठवते आम्ही पुस्तक प्रदर्शन रत्नागिरीला भरवले होते व तेव्हा आम्ही त्यांना आमंत्रण दिले होते व त्यांच्या घरी जाऊन चहा व फराळही घेतला होता. पण तेव्हा त्या फक्त लेखिकाच होत्या. त्यांचा अजून राजकारणांत प्रवेश झाला नव्हता. ह्या खेपेला मात्र त्या एका निराळ्या पदावर होत्या. त्यांनी आम्हाला जरूर या म्हणून आमंत्रण दिले.

पुढच्या वर्षी आम्ही बाबा कदम यांना बोलविले होते. आम्हा सर्वांना वाटले की, त्यांना भेटायला बरीच गर्दी होईल. त्यामुळे त्यांच्या सर्व उपलब्ध कादंबऱ्यांची शोकेसमध्ये व आतल्या बाजूलाही आकर्षक मांडणी केली होती. संध्याकाळपर्यंत फारसे लोक आले नाहीत. सातच्या नंतर त्यांचे प्रकाशक व काही मित्र भेटायला आले. पण आमचा अंदाज मात्र चुकला. अपेक्षित गर्दी आम्हाला जाणवली नाही. त्यांचे चाहते वाचक मुंबईपेक्षा इतर ठिकाणी जास्त असावेत असे मला वाटले. पण माणूस म्हणून ते फार बोलके व अगत्यशील वाटले. त्यांनी सुद्धा मला कोल्हापूरला अवश्य यायचे आमंत्रण दिले.

६.

१९७५ साली मौज प्रकाशनाचा रौप्य महोत्सव साजरा होणार होता. तेव्हा सदानंद, रामदास व मी भागवतांना भेटून सांगितले आमच्या पुस्तक पंढरीच्या सातव्या वारीकरिता ऑक्टोबर ७५ साली आम्ही त्यांच्याच लेखकांना बोलवू व त्यांची सर्व पुस्तके आम्ही आमच्या शोकेसमध्ये ठेवू. त्याप्रमाणे त्यांच्या नऊ लेखकांना आम्ही आमंत्रित केले होते. हा उपक्रम आम्ही एक तपाहून जास्त काळ राबवला. ‘ख्यातनाम कवी, कादंबरीकार, नाटककार, लघुकथा लेखक व इतर वाङमय शाखेतील सर्व तऱ्ङेच्या लेखकांना आग्रहाने बोलावले व १९८१पर्यंत स्वाक्षरी सत्राचे शतकही पूर्ण केले.

हा पुस्तक पंढरीचा उपक्रम आम्ही १९६९ ते १९८० पर्यंत बारा वर्षे चालू ठेवून शंभरएक लेखकांना आमच्या ह्या सोहळ्यात सहभागी करू शकलो. आणखी पुढे गेलो असतो. पण हळूहळू ह्याला सुरुवातीपेक्षा प्रतिसाद कमी दिसू लागला व मी एक निर्णय घेतला की, आता हा उपक्रम थोडे दिवस बंद ठेवावा. कारण इतरही आमचे व्याप वाढत चालले होते. हा सप्ताह घडवून आणताना फार टेन्शन येत असे. ह्याच काळात मला प्रोस्टेटचा त्यास होऊ लागला होता. त्यामुळे ‘पुस्तक पंढरी’चा उपक्रम एक तप चालवल्यावर १९८१ मध्ये थोडी विश्रांती घ्यायचे ठरवले.

७.

त्यापूर्वी पुस्तक पंढरीचा उपक्रम तीन वर्षे यशस्वीरीत्या राबविल्यानंतर मला एक कल्पना सुचली की, आम्ही अशा तऱ्हेचे प्रदर्शन फक्त धार्मिक ग्रंथांकरिता करून पाहावे. म्हणून १९७२ साली चातुर्मास सुरू होताना ‘साहित्य दिंडी’ या नावाने जुलैच्या अखेरच्या आठवड्यात सुरू करून पंधरा दिवसांपर्यंत हा उपक्रम आम्ही सुरू केला. पहिल्या वर्षी प्रा. न. र. फाटक, रा. शं. वाळिंबे, स. कृ. देवधर व प्रा. प्र. न. जोशी या मान्यवर व्यक्तींना स्वाक्षरीसाठी बोलावले. सर्वांनी आम्हांला चांगल्या रीतीने सहकार्य दिले. या उपक्रमासही आम्हांला चांगला प्रतिसाद मिळाला. धार्मिक ग्रंथांना या उपक्रमामुळे चांगला उठाव मिळाला व शेकडो लोकांनी याचा फायदा घेतला. एक प्रेरक गोष्ट म्हणून आम्ही या १५ दिवसांच्या अवधीमध्ये पुस्तकांवर १० टक्के सवलत देण्याचे ठरविले होते. ह्यामुळे थोडा घोटाळा झाला. कारण माधवबागमधील धार्मिक पुस्तकाच्या विक्रेत्यांनी आमच्यावर राग धरला. त्यांच्या विक्रीवर ह्याचा थोडा तात्पुरता परिणाम झाला असेल. पण त्यांचे ग्राहक वेगळे होते व आमच्याकडे येणारे पुस्तकप्रेमी लोक वेगळे होते. धार्मिक पुस्तकांबरोबर इतरही पुस्तकांची विक्री होत असे. तशी आम्ही इतरही पुस्तके दर्शनी मांडली होती. तसेच एक उत्सवी वातावरण आम्ही आमच्या दुकानात आणले होते.

हा उपक्रम आम्ही १९९१ पर्यंत चालू ठेवला. या प्रदर्शनात नवीन पुस्तकांबरोबर काही दुर्मीळ पुस्तकेही होती. त्यांच्या किमतीही कमी असत. आम्ही त्याच किमतीत ती देत असू. याबद्दल आमच्या ‘पुस्तक पंढरी’ मासिकातही माहिती देत होतो. त्यामुळे आमचे वर्गणीदार याचा फायदा घेत असत.

८.

‘साहित्य दिंडी’ १९७२ ला सुरू केली व दुसऱ्याच वर्षी ‘बॉम्बे बुक क्लब’ ही योजना सुरू झाली. या अगोदर ‘किर्लोस्कर’ मासिकाने अशाच तऱ्हेची एक योजना आपल्या प्रकाशनांकरिता सुरू केली होती असे स्मरते. तसेच कुलकर्णी ग्रंथागार यांनी आपल्या प्रकाशनासाठी एक बुक क्लब सुरू केला होता. पण आमची रोजना ही वेगळ्या तऱ्हेची होती. कारण आम्ही सर्व तऱ्हेच्या चांगल्या प्रकाशकांची, चांगल्या पुस्तकांची निवड करून ती आमच्या ग्राहकांना घरपोच देण्याची योजना सुरू केली. लोकांमध्ये वाचनाची आवड उत्पन्न करायची ही अभिनव रोजना होती. ही योजना आखण्यामध्ये मला सदानंद भटकळ यांची बरीच मदत व मार्गदर्शन मिळाले. रामदास भटकळ हेही या योजनेत सहभागी होते. त्यांनी आमच्या बुक क्लबकरिता भेट पुस्तक म्हणून ‘स्मृतिचित्रें’ हे साहित्य अकादेमीच्या वतीने प्रसिद्ध केलेले सुबक पुस्तक आम्हांला बऱ्याच सवलतीने दिले. या योजनेचे पत्रक, त्याची सूची व एकूणच सर्व योजनेमध्ये या दोघांचा वाटा भरपूर आहे. कृष्णा करवार यांनी आम्हांला या उपक्रमाकरिता माहितीपत्रक कसे करावे हे सांगितले व सर्व प्रिंटिंगचे काम जातीने पाहिले. हे माहितीपत्रक सुबक झाले होते. आम्ही हे माहितीपत्रक आमच्या मेलिंग लिस्टप्रमाणे बऱ्याच लोकांना पाठविले होते. याबद्दल थोडी जाहिरातही केली होती. दुकानात येणाऱ्या बहुतेक लोकांना आम्ही हे माहितीपत्रक देत होतो. त्यामुळे याला चांगला प्रतिसाद मिळाला. जयवंत दळवी हे आमचे पहिले सभासद झाले.

ही अभिनव बुक क्लब योजना दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली. पहिल्या वर्षीच त्याचे सभासद दोन हजारहून जास्त झाले. मुंबई व परिसरातील सभासदांबरोबर बाहेरगांवचे पुस्तकप्रेमी लोकही ड्राफ्ट पाठवून बुक क्लबचे सभासद झाले. सुरुवातीला एक भेट पुस्तक व एक वर्ष पूर्ण झाल्यावर आणखी एक भेट पुस्तक मिळत होते. त्यामुळे ही योजना आकर्षक होती. हा प्रतिसाद पाच वर्षांपर्यंत वाढतच गेला. सभासदही वाढत गेले.

९.

पाच वर्षांनंतर पोस्टेज खर्च वाढला. तसेच भेट पुस्तके आम्हांला जास्त सवलतीने प्रकाशक देऊ शकले नाहीत. त्यामुळे आम्हांला थोडा बदल करावा लागला. १९७७ नंतर आम्ही पोस्टेज खर्च आकारू लागलो. स्थानिक सभासदांना काही फरक जाणवत नव्हता. पण बाहेरगांवचे लोक थोडे कुरकुरू लागले. पण त्याला इलाज नव्हता.

आणखी एक रोजना १९७५ साली आम्ही जाहीर केली. ती म्हणजे ‘बॉम्बे बुक अ‍ॅवॉर्ड’. याची आखणी अशी होती की, आम्ही एका वर्षांत प्रसिद्ध झालेल्या सर्व पुस्तकांतून चांगली चारशे ते पाचशे निवडक पुस्तकांची यादी आमच्या ‘पुस्तक पंढरी’च्या अंकामध्ये छापून सर्व सभासदांना पाठवीत होतो. त्याबरोबर त्यांना एक प्रश्नपत्रिका पाठवीत होतो. त्यामधून त्यांना आवडलेली पाच पुस्तके निवडावी व त्यांची नावे लिहून आमच्याकडे पाठवायची विनंती केली होती.

या रोजनेलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. आम्ही एक निवड समिती केली व त्यांनी या सर्व पत्रांची छाननी करून कुठल्या पुस्तकाला जास्त मते आहेत हे पाहून त्या पुस्तकाच्या लेखकाला व प्रकाशकाला एक छानशी ट्रॉफी (मेमण्टो) देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे हा पुरस्कार १९७५ साली अनिल बर्वे यांच्या ‘थँक यू मि. ग्लाड’ या पुस्तकाला, १९७६ साली बाबा आढाव यांच्या ‘एक गाव एक पाणवठा’ या पुस्तकाला व १९७७ साली जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘पिंगळावेळ’ व जयवंत दळवी यांच्या ‘बॅरिस्टर’ या दोघांना विभागून दिला गेला. १९७८ मध्ये डॉ. अरुण लिमये यांच्या ‘क्लोरोफोर्म’ या पुस्तकाला जास्त मते मिळाल्यामुळे त्याला पुरस्कार दिला गेला.

सर्व समारंभ आम्ही खास व्यक्तींना बोलावून साजरे केले. शेवटचा समारंभ विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघ यांच्या मोठ्या हॉलमध्ये संपन्न झाला. त्याला भरपूर लोक हजर होते. कारण सर्वांना वाटले जयवंत दळवींबरोबर जी.ए. कुलकर्णी हेही येतील व त्यांना पाहण्याचा चांगला योग आहे. पण अपेक्षेप्रमाणे जी.ए. काही आले नाहीत, पण त्यांची मावस बहीण नंदा पैठणकर यांनी येऊन ती ट्रॉफी स्वीकारली. असो. रानंतर मात्र हा उपक्रम आम्ही चालू ठेवू शकलो नाही.

१०.

‘बालसाहित्य जत्रा’ हा उपक्रम आम्ही १९६४ साली सुरू केला खरा; पण १९६९ पर्यंत त्या नावाचे मासिक सुरू केले नव्हते. हे मासिक सुरू करावे की नाही ह्याबद्दल बराच विचार केला. माझे बऱ्याच शाळांचे हेडमास्तर व प्रिन्सिपॉल यांच्याशी संबंध होते. त्यांच्याशी ह्या मासिकाच्या उपयुक्ततेबद्दल विचारविनिमय केला. त्यांचे मत घेतले; तसेच इतर साहित्यिक मित्रांबरोबरही चर्चा केली. सर्वांचेच हा नवीन उपक्रम- बालवाङ्मयाबद्दलच वाहून घेतलेले मासिक- सुरू करायला हरकत नाही, असे मत दिसले व त्याबद्दल कुतूहलही निर्माण झाले. ग्रंथपालांबरोबर ह्या मासिकाच्या उपयुक्ततेबद्दल चर्चा केल्यानंतरच ‘बालसाहित्य जत्रा’ हे मासिक प्रसिद्ध करण्यास मी उद्युक्त झालो. ह्या सर्व चर्चांमध्ये सदानंद भटकळ, रामदास व लैला भटकळ या सर्वांचे स‘े व त्यांचे साहाय्य अपेक्षित होते व ते त्यांनी ह्या नवीन उपक्रमाला देण्याचे कबूल केले. एवढेच नव्हे तर रामदासची पत्नी लैला भटकळ यांनी मासिकाच्या संपादनाची जबाबदारीही स्वीकारली. त्यांनी दुर्गाबाई भागवत, भा. रा. भागवत, शिरीष पै, शांताबाई शेळके, मंगेश पाडगांवकर वगैरे आमच्या ज्येष्ठ व श्रेष्ठ लेखकांना पाचारण करून त्यांच्याकडून ह्या मासिकाकरिता खास लेख लिहून घेतले. मासिकाचे नाव रजिस्टर करायला सहा महिने लागले. तोपर्यंत आम्ही सर्व तयारी केली.

‘एम.एच. १९१३’ असा रजिस्ट्रेशन नंबर आम्हाला मिळाला. आम्हाला पोस्टाची सवलत हवी होती. तीही लवकरच मिळाली व आम्ही पहिला अंक सप्टेंबर १९६९च्या १५ तारखेला प्रसिद्ध केला. आम्ही तो अंक प्रमुख शाळांना पाठवला. हे काम आम्ही सातत्याने सहा महिने केले. ऑक्टोबर ६९च्या अंकात प्रा. वा. ल. कुळकर्णी यांचा छान अभिप्राय प्रसिद्ध केला. त्या वेळी ते औरंगाबादला होते. ते म्हणतात ते बरोबर होते. बऱ्याच पालकांना असे वाटले की, हे मासिक लहान मुलांसाठी आहे. पण तसा आमचा उद्देश नव्हता. कशा तऱ्हेचे बालवाङमय मुलांच्या समोर ठेवावे हे पालकांना कळावे, तसेच चांगली पुस्तके निवडून त्यांची माहिती ह्या मासिकांत दिली तर पालक ती पुस्तके आपल्या मुलांना आणून देतील असा एक उद्देश होता. तसेच मुलांसाठी काही नवनवीन उपक्रम ह्या मासिकात देऊन ते लोकांपर्यंत पोहचवावेत अशा तऱ्हेने आमचा प्ररत्न होता.

बालसाहित्य प्रकाशित करणाऱ्या विविध प्रकाशकांसाठी जाहिरात करण्यासाठी ‘बालसाहित्य जत्रा’ हे एक योग्य माध्यम होते. एकूणच मराठी बालसाहित्याचा प्रसार केंद्रस्थानी ठेवून काढलेले हे ‘बालसाहित्य जत्रा’ हे बहुधा एकमेव मासिक असे मला वाटते.

‘बालसाहित्य जत्रा’ ह्या मासिकाच्या आम्ही ३००० प्रती छापत होतो. व सर्व प्रमुख शाळांना विनामूल्य पाठवत होतो. काही काळानंतर शाळांकडून तीन रुपयांची वार्षिक मनिऑर्डर येत असे. तीन वर्षांमध्ये ५००-६०० वर्गणीदार झाले. हजार तरी वर्गणीदार झाले असते तर ते पुढे चालणे जमले असते. ज्यांना व ज्या कारणासाठी मासिक सुरू केले तशानांच त्याची गरज वाटली नाही, तेव्हा हा उपक्रम तीन वर्षांनंतर आम्ही बंद केला.

११.

‘पुस्तक पंढरी’चा मासिक अंक आम्ही काढत असू हे मी वर सांगितले आहेच. ‘बॉम्बे बुक क्लब’च्या सभासदांना तो मोफत पाठवत असू. एखाददुसरा लेख, साहित्यविश्वात त्या त्या महिन्यातल्या काही घडामोडींची माहिती, ‘बॉम्बे बुक क्लब’च्या सभासदांसाठी खास निवडलेल्या पुस्तकांचा परिचय, तसेच वर्षभरात प्रसिद्ध झालेल्या सर्व मराठी ललित पुस्तकांची सूची, असा मजकूर त्यात असे. सुरुवातीची अनेक वर्षे ‘पुस्तक पंढरी’चे संपादनात्मक कार्य लैला भटकळ करीत असे. पुढे ती शैक्षणिक क्षेत्राकडे वळल्यावर मग ही जबाबदारी माझ्यावर पडली. अंकाची जुळवाजुळव करणे इथपासून ते निवडक पुस्तकांचे परिचयात्मक लेखन करणे इत्यादी मी करत असे. यांत कधी केशव मेश्राम, शुभांगी पांगे, श्रीदेवी देसाई तसेच माझा मुलगा आनंद यांनीही हातभार लावला. परंतु मी जवळजवळ निवृत्त होईपर्यंत संपादनाचे हे काम मी करत असे. सर्व प्रकाशकांची पुस्तके दुकानात येत व माझ्या नजरेखालून जात असत. मी ती घरी नेऊन हळूहळू वाचत असे. पुस्तक संपूर्ण वाचू शकलो नाही तरी कव्हरवरील ब्लर्ब, लेखकाचे मनोगत, अनुक्रमणिका वगैरे तरी वाचत असे. त्यातून मला प्रत्येक पुस्तकाची साधारण माहिती मिळत असे. निवडक पुस्तके जास्त खोलात जाऊन वाचत असे. अशा प्रकारे कानडीतून व इंग्रजीतून शिक्षण झालेला कारवारी माणूस मराठी वाचारचे व लिहारचे पहिले धडे शिकला!

पुस्तक पंढरी अर्थात स्वाक्षरी सप्ताह आम्ही १९८० पर्यंत राबवला, पण नंतर १९८१ मध्ये सदानंद भटकळ यांच्या मनात आणखी एक योजना सुचली ती म्हणजे ‘पुस्तक पंढरी’ मासिकाचा दिवाळी अंक काढणे. त्याचा सर्व आराखडा त्यांनी केला. जाहिरातीचे काम, प्रकाशकांना गाठणे व त्यांच्याकडून जाहिरात मिळविण्याचे काम माझ्याकडे सोपविले व दिवाळी अंकाच्या संपादनाचे पूर्ण काम त्यांनी सुधा कुलकर्णी ह्यांच्यावर सोपवण्याचे ठरविले. प्रिंटिंग व इतर कामे आपण पाहतो अशी त्यांनी कामाची वाटणी केली. ह्याविषयी आम्ही दोन-तीन महिने पूर्ण तयारी केली. पहिल्या वर्षी एकच विषय घ्यायचा व त्याविषयी सांगोपाग माहिती पुरविणे असे ठरले. ‘पारितोषिके’ हा विषय घेतला. त्याप्रमाणे सुधाताईंनी बरीच मेहनत घेऊन तो अंक आम्ही ‘दिवाळी अंक’ म्हणून प्रसिद्ध केला. दसऱ्याला तो येऊ शकला नाही म्हणून वितरणाला थोडा उशीर झाला. पण त्या वर्षीच्या अंकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पहिले पारितोषिक मिळाले.

१९८२ मध्ये ‘आपली संस्कृती साडेतीन टक्क्यांची आहे का?’ हा खळबळजनक विषय हाताळला. हा अंक आम्ही लवकर छापल्यामुळे व प्रती कमीच काढल्यामुळे शिल्लक राहिला नाही. प्रतिसादही चांगला मिळाला. वसुली मात्र मनासारखी झाली नाही. इतरांचाही अनुभव हाच असल्यामुळे आम्ही नाउमेद झालो नाही.

तिसऱ्या वर्षी बांधिलकी आणि तिच्या संदर्भात मराठी साहित्य व साहित्यिक ह्याचा विचार ह्या अंकात द्यायचे ठरविले. त्याप्रमाणे ह्या अंकांत दुर्गाताई भागवत, बाबा आमटे, यशवंतराव चव्हाण, वसंत पळशीकर, जयवंत दळवी, माधव गडकरी अशा मान्यवर साहित्रिकांचे लेख दिले. आणखी एक आकर्षण म्हणजे प्रसिद्ध लेखक विश्राम बेडेकर यांचे ‘सीलिसबर्गची पत्रे’ ही कादंबरी छापली. (काही काळाने ती कादंबरी पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली.) ह्यामुळे ह्या अंकाला चांगला प्रतिसाद मिळाला. ह्याच अंकांत कुमार केतकर यांचा चांगला लेख होता. तसेच अरुण कांबळे यांचाही लेख होता.

१९८४ सालचा दिवाळी अंक स्त्रीमुक्ती विशेषांक होता. १९८३ व ८४ ह्या दोन्ही अंकाची किंमत फक्त रु. १५/- ठेवली होती. त्यामुळे अंकाचा खप चांगला झाला. पिढ्यापिढ्यांतील नात्यांचा अनेक अंगी शोध १९८५ च्या दिवाळी अंकात घेतला होता. शेवटचा दिवाळी अंक आम्ही १९८६ साली प्रसिद्ध केला. त्यात ‘लग्न’ या संस्थेची सांगोपांग चर्चा घडवून आणली.

हा सर्व व्याप सांभाळताना मला भरपूर अनुभव मिळाला.

१२.

मराठी भाषिकही भारताबाहेर आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा पहिला प्रयत्न म्हणून लंडनला मराठी पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्याची कल्पना निघाली. महाराष्ट्रातील लहान गावात आणि महाराष्ट्राबाहेरील प्रमुख शहरांत पसरलेल्या मराठी वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न बॉम्बे बुक क्लब करत होता, त्याचेच हे पुढचे पाऊल.

ह्या प्रयत्नाला मराठी प्रकाशक परिषद आणि महाराष्ट्र शासन यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण पन्नास एक प्रकाशकांनी आपल्या निवडक पुस्तकांची एक एक प्रत विनामूल्य दिली आणि पाठवणावळ व promotional expense म्हणून रु. १०/- देण्याचेपण कबूल केले. ज्यांचा लंडनमधील मराठी समाजासाठी संबंध आलेला आहे अशा व्यक्तींच्या सहाय्याने ७६२ पुस्तकांची निवड करण्यात आली. यात सर्व प्रकारच्या पुस्तकांचा आणि शक्यतो प्रातिनिधिक लेखकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुस्तके घेऊन रामदास लंडनला गेले.

लंडनला मुख्य ‘पुस्तक पंढरी’चा कार्यक्रम इंडियन हायकमिशनमध्ये नोव्हेंबर २ आणि ३ ला भरवण्यात आला. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक आणि भारताचे लंडनमधील उच्चाधिकारी श्री. नानासाहेब गोरे यांनी केले.

ह्याखेरीज दोन ठिकाणी प्रदर्शने भरवण्याची संधी मिळाली. २८ व २९ ऑक्टोबरला लंडनच्या भारतीय विद्याभवनच्या सभागृहात पं. भीमसेन जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम होता. तेथेपण प्रदर्शन भरवले गेले. ह्या कार्यक्रमासाठी दोन्ही दिवस मिळून ६०० ते ७०० श्रोते उपस्थित होते. बहुतांशी मराठी माणसे त्यामुळे तेथे आलीच होती. अनेक रसिक मराठी वाचकांना पुस्तके पहाण्याची संधी मिळाली. ५ नाव्हेंबर १९७८ रोजी महाराष्ट्र मंडळातर्फे दिवाळीनिमित्त प्रदर्शन पुन्हा मांडण्यात आले. इथे २०० ते २५० मराठी मंडळी उपस्थित होती. सर्व उपस्थितांनी प्रदर्शनाचे कौतुक केले.

अशा प्रकारे लंडनच्या रसिकांपुढे मराठीतील विविध प्रकाशकांच्या पुस्तकांचे रामदासने प्रदर्शन भरवले. माझ्या माहितीप्रमाणे असे हे देशाबाहेरचे पहिलेच प्रदर्शन असावे.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......