रा. ना. चव्हाणांचे प्रबोधन हे त्यांचे पसायदान आहे असे मला वाटते!
ग्रंथनामा - झलक
जर्नादन वाघमारे
  • ‘आधुनिक भारतातील प्रबोधन’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि रा. ना. चव्हाण
  • Fri , 29 March 2019
  • ग्रंथनामा झलक आधुनिक भारतातील प्रबोधन Aadhunik Bhartatil Prabodhan रा. ना. चव्हाण R. N. Chavhan

‘आधुनिक भारतातील प्रबोधन’ हे समाजसुधारक रा. ना. चव्हाण यांचे पुस्तक नुकतेच रा. ना. चव्हाण प्रतिष्ठन, वाईतर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला प्रा. जर्नादन वाघमारे यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

समाजसुधारणा भारतीय प्रबोधनाचे अविभाज्य अंग होते. वस्तुत: धर्मसुधारणा हा समाजसुधारणेचा भाग होता. व्यक्ती आणि समाजाचे संपूर्ण जीवन धर्माने व्यापलेले होते आणि म्हणून धर्मसुधारणा व समाजसुधारणा यात फरक करण्याचे काही कारण नव्हते.

रा. ना. चव्हाण हे आधुनिक प्रबोधनाचे एक चिकित्सक भाष्यकार होते. त्यावरचे त्यांचे लेखन चौफेर आहे. आपल्या मनात कुठलाही अभिनिवेश व पूर्वग्रह न बाळगता त्यांनी आयुष्यभर आपली लेखणी चालविली. प्रज्ञा, करुणा व शील हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणविशेष आहेत. त्यांची लेखणी सत्यनिष्ठ, मूल्यनिष्ठ, तत्त्वनिष्ठ व तपस्वी होती. त्यांच्या लेखनात कमालीचे ताटस्थ, ऋजुता व संतुलन आहे. त्यांचा आयुष्यक्रम लक्षात घेतल्याशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे रहस्य आपल्या लक्षात येणार नाही. त्यांची जडणघडण ज्या वातावरणात आणि ज्या विचारविश्‍वात झाली तीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे रहस्य दडलेले आहे. सनातन्यांचे प्रस्थ असलेल्या वाईत ते जन्मले व वाढले. त्यांचे वडील नारायणराव चव्हाण यांचे शिक्षण बडोदा येथे झाले होते. पुरोगामी विचारांचे सखोल संस्कार त्यांच्या मनावर झाले होते. वाचनाचा छंद त्यांनी जोपासला होता. घरात ग्रंथसंग्रह होता. रा. ना. चव्हाणांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण वाई येथेच झाले. आई-वडिलांचे सुसंस्कार तर त्यांच्यावर झालेले होतेच, पण वाचनाचा छंदही त्यांनी जोपासला. म. गांधी आणि म. फुले यांच्या जीवनचरित्रांनी त्यांच्या मनाची पकड घेतली.

महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्याला गेले. सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे त्यांना मध्येच शिक्षण सोडावे लागले. देशभक्तीने भारलेला हा काळ होता. गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यलढा चालू होता. अस्पृश्यता निवारणाचे कार्यही चालू होते. १९३३ साली ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या सहवासात आले. शिंद्यांच्या शिंद्यांच्या सहवासाचा त्यांच्या मनावर सखोल परिणाम झाला. त्यांच्या जीवनातला हा टर्निंग पॉइंट होता असे म्हटले पाहिजे.

रा. ना. चव्हाण यांनी त्या काळातल्या सामाजिक व राजकीय चळवळींचा अभ्यास केला. जोतीबा फुल्यांच्या विचारांनी त्यांच्या मनाचा ताबा घेतला. सत्यशोधक चळवळ बहुजनांच्या उन्नतीसाठी काम करीत होती. समता हे या चळवळीचे गंतव्य होते; आणि शिक्षण हे ते गंतव्य गाठण्यासाठीचे प्रभावी साधन होते. समाजपरिवर्तनाची ही चळवळ होती. समाजपरिवर्तनासाठी समाजप्रबोधनाची आवश्यकता असते. आधी विचार आणि मग त्या विचारानुसार कृती केली तरच समाजपरिवर्तन घडते.

प्रबोधक हा सत्यशोधक असतो. रा. ना. चव्हाण हे सत्यशोधक होते. सत्यशोधकाला धर्म, इतिहास, तत्त्वज्ञान आणि सामाजिक व राजकीय प्रश्नांची जाण व भान असावे लागते. ह्या तिन्हीचा त्रिवेणी संगम रा. ना. यांच्या साहित्यात आढळतो. खरेतर प्रबोधन हाच साहित्याचा धर्म असतो. प्रबोधन हाच साहित्याचा अंगभूत गुणधर्म असतो. ‘आधुनिक भारतातील प्रबोधन’ या ग्रंथातला ‘समता विचारांचे प्रबोधन : साहित्याचे उद्दिष्ट’ हा रा. नां. चा लेख अतिशय महत्त्वाचा आहे. हा लेख समजून घेतला तर त्यांच्या प्रबोधनाचे ‘सारतत्त्व’ आपल्या आकलनात येईल. समाजवाद आणि समाजवादी समाजरचना त्यांना हवी होती. ते या लेखात म्हणतात, “असा हा समाजवादी समाजरचनेचा आकृतिबंध साकार करण्यासाठी सर्वच भारतीयांनी लोकशाही हा मार्ग स्वीकारला आहे आणि जोपर्यंत आपण आपल्या घटनेचा ‘प्री-अ‍ॅम्बल’ प्रस्तावनेत स्वीकारलेला लोकशाही समाजवादी समाजरचनेचा हेतू हेच भारतीय समाजप्रबोधनाचे अंतिम उद्दिष्ट होऊ शकते. भारतीय घटनेने गेल्या शतकातील समाजप्रबोधनाला वैचारिक जय व यश मिळवून दिले आहे.” (पृ. ७५)

‘आधुनिक भारतातील प्रबोधन’ या पुस्तकात रा. ना. चव्हाणांचे नऊ लेख व आठ परिशिष्टे समाविष्ट आहेत. आधुनिक भारतातील प्रबोधनाविषयी लिहिण्यापूर्वी मागील समाजप्रबोधनाचे त्यांनी सिंहावलोकन केले आहे. मागच्या प्रबोधनातूनच पुढचे प्रबोधन उत्क्रांत होत जाते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. प्रबोधनांची देखील एक श्रृंखला निर्माण होते. त्यातून एक प्रकारची लय निर्माण होते. प्राचीनभारतातील प्रबोधन, मध्यकालीन प्रबोधन आणि आधुनिक काळातील प्रबोधन या तिन्ही प्रबोधनात एक लय आहे. आरंभीच्या प्रबोधनातील काही प्रश्न पुढच्या प्रबोधनातही आढळतात. धर्माच्या नावावर निर्माण झालेले किंवा केलेले प्रश्न आणि वर्णव्यवस्था आणि नंतर जातिव्यवस्था यातून निर्माण झालेले प्रश्न हे या तिन्ही काळातील प्रबोधनांचे प्रश्न आहेत. त्यामध्ये एक प्रकारची निरंतरता आढळून येते. न्या. महादेव गोविंद रानडे यांनी म्हटल्याप्रमाणे समाजसुधारणा ही अपूर्ण वाक्यासारखी असते. पुढच्या पिढीने ते वाक्य पूर्ण करायचे असते. समाजप्रबोधनाविषयीही हेच म्हणावे लागेल आणि म्हणून पुढे जात असताना मागे वळून पाहावेच लागते. समाजप्रबोधनाचा ताळेबंद मांडताना मागील जमाखर्च लक्षात घेऊनच पुढे जावे लागते. रा. ना. चव्हाणांनी हा ताळेबंद येथे मांडला आहे.

भारतात धर्म आणि समाज हे एकमेकांपासून विभक्त करता येत नाही. मुसलमानी आक्रमणानंतर संतांनी जी लोकजागृती केली ती मुख्यत: धार्मिक होती. धर्मांतरे ही त्यांच्या समोरची एक मोठी समस्या होती. हिंदूंचे मुस्लीम राजवटींमध्ये सक्तीने धर्मांतर केले जात होते. मुस्लिमांच्यानंतर ब्रिटिशांचे राज्य आले. त्यांच्या काळातही मिशनरी हे हिंदूंना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास बाध्य करत होते. संतांनी आध्यात्मिक समतेचा संदेश दिला, तर ब्रिटिश काळात राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, लोकहितवादी अशा समाजसुधारकांनी मूर्तिपूजा, जातिभेद आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रबोधनाचा उद्देश समाजसुधारणा हाच होता.

ज्या-ज्या वेळेस या देशात समतेचा विचार पुढे आला त्या-त्या वेळेस समाजाच्या सर्व स्तरातून लोक पुढे आले. संतांच्या आणि समाजसुधारकांच्या व्यापक अशा प्रबोधनाने धर्मांतरे रोखण्याचा प्रयत्न केला. स्वामी दयानंद सरस्वतींच्या आर्यसमाजाने तर शुद्धीची मोहिमच हाती घेतली. मुस्लीम झालेल्या हिंदूंना त्यांनी पुन्हा हिंदूधर्मात आणले. शिक्षणाचा प्रसार हा समाजसुधारकांच्या प्रबोधनाचा एक महत्त्वाचा भाग होता. संतांच्या प्रबोधनातून पुढे शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा विचार जसा पुढे आला तसाच स्वातंत्र्यलढ्याचा विचार समाजसुधारकांच्या प्रबोधनातून पुढे आला. इंग्रजांच्या राजवटीचा उपयोग सामाजिक स्वातंत्र्यासाठी झाला. पण इंग्रजांचे शोषणही लोकांच्या लक्षात येऊ लागले. त्यातून पुढे स्वातंत्र्यलढ्याला तोंड फुटले. स्वातंत्र्य हेच प्रबोधनाचे उद्दिष्ट बनले. राष्ट्रवाद हा स्वातंत्र्यलढ्यामागे उभा राहिला. सर्वधर्मसमभावाचा विचारही पुढे आला. साहित्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा आविष्कार होऊ लागला. निरनिराळे वाद आणि विचारधारा यांचेही मंथन सुरू झाले. निरनिराळ्या विचारसरणींची घुसळणही होऊ लागली.

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील प्रबोधनात अस्पृश्यता निर्मूलन, जातिभेद निर्मूलन, निरक्षरता निर्मूलन, दारिद्रय निर्मूलन, हुंडाबंदी, देवदासी बंदी, व्यसनबंदी आदी प्रश्नांचा खल होणे स्वाभाविक होते. रा. ना. चव्हाणांनी आधुनिक भारतातील सामाजिक व सांस्कृतिक जीवन, राष्ट्रीय ऐक्य व राष्ट्रीय एकात्मता या विषयांवरही भर दिलेला आहे. गतकाळातील प्रबोधनांची दखल घेत-घेत समकालीन प्रश्नांवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. अनेक महापुरुषांच्या विचार व कार्यावर त्यांनी भाष्य केले आहे. म. फुले, सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक, राजारामशास्त्री भागवत, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी वि. रा. शिंदे, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण आदींच्या विचार व कार्यावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. समाज कसा बदलत गेला, कुठे अडखळला आणि तो कशा प्रकारे विखुरला याचे विश्लेषण त्यांनी केले आहे. समाज पुढे यायचा असेल तर त्याच्या मार्गात धर्म हा अडथळा ठरता कामा नये हे त्यांनी असंदिग्ध शब्दात सांगितले आहे. ‘राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे माध्यम ‘धर्म’ हे होऊ शकत नाही. धर्म व तत्त्वज्ञाने ह्यांच्यावर सर्वांचे एकमत होऊ शकत नाही, असा गतेतिहासाने निर्वाळा दिला आहे.’ (पृ. १५)

भारतीय समाजाच्या प्रगतीच्या मार्गात ‘धर्म’ आणि ‘जात’ ह्या दोन्हीही गोष्टी आड येतात हा इतिहास आहे. ह्या गोष्टी राष्ट्रीय ऐक्याच्याच आड येतात हे वेगळे सांगण्याचे कारण नाही. ‘जातिधर्म राजनैतिक ऐक्याच्या आड वारंवार आले व येतही असतात.’ (पृ. १६) म. फुले, म. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिघांचेही हेच मत होते.

म. फुल्यांनी जातिभेदाविरुद्ध युद्ध पुकारले होते. त्यांनी इहवादावर भर दिला होता. हिंदूधर्माऐवजी सार्वजनिक सत्यधर्माची संकल्पना त्यांनी मांडली होती. म. गांधी हिंदू धर्माचे समर्थक असले, तरी सर्वधर्मसमभावावर त्यांचा भर होता. ईश्वर व अल्ला, राम व रहिम त्यांनी एकच मानले. त्यांची दैनंदिन प्रार्थना सर्वधर्मीय होती. राज्य हे धर्मनिरपेक्षच असले पाहिजे यावर ते ठाम होते. रा. ना. चव्हाणांनी गांधीजींचा हा विचार उद्धृत केला आहे. गांधीजी म्हणाले होते, "If I were a dictator, religion and state would be separate, I swear by my religion, I will die for it. But it is my personal affair, the state has nothing to do with it. The state would look after secular, welfare, health, communicaton, foreign relation, currency and so on, but not your or my religion, that is everybody's personal concern." (पृ. १७)

डॉ. आंबेडकरांना तर धर्माची पुनर्रचना स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांवर करायची होती. त्यांनी जी राज्यघटना बनवली ती धर्मनिरपेक्षता या तत्त्वावरआधारलेली आहे. भारतीय प्रबोधनाची परिणती धर्मनिरपेक्ष राज्यनिर्मितीत झाली असे म्हणावे लागेल. आपल्या प्रबोधनाची ही फार मोठी उपलब्धी आहे. राज्य सेक्युलर आहे, पण समाज? समाज ‘सेक्युलर’ नाही. तो असावा असे रा. ना. चव्हाणांनी सूचित केले आहे. समाजाने सर्वधर्मसमभाव स्वीकारला पाहिजे.

देश स्वतंत्र झाला. देशात लोकशाही राज्यपद्धती आली. आपले राज्य हे घटनेप्रमाणे ‘सेक्युलर’ आहे. आपल्या लोकशाही सेक्युलर राज्याने जातिभेद, वंशभेद, अस्पृश्यता, सामाजिक व आर्थिक विषमता या गोष्टी अमान्य केलेल्या आहेत. नवप्रबोधन याच दिशेत व्हायला हवे. साहित्यनिर्मितीदेखील हे उद्दिष्ट समोर ठेवून व्हायला हवी असे रा. ना. चव्हाणांना वाटत होते.

पण, आजच्या राजकारणात सामाजिक प्रबोधनाचा संकोच झालेला आहे हेही ते एका लेखात नमूद करतात. खरे तर स्वातंत्र्योत्तर काळात प्रबोधनाला खीळच बसली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात हळूहळू सत्तेच्या राजकारणाला सुरुवात झाली. जात्यंधता व धर्मांधता प्रचंड प्रमाणात बोकाळली. स्वातंत्र्योत्तर काळात उलट शिक्षणप्रसार मोठ्या प्रमाणात झाला. खेड्यापाड्यांत शाळा निघाल्या. ज्ञानगंगा घरोघरी पोचली. पण त्या शिक्षणाने लोकांमध्ये विवेक निर्माण केला नाही. विघटनाची प्रक्रियाच प्रबळ होत गेली. आज तर देशात जातीजातीच्या संघटना कार्यरत आहेत. सर्वच जाती आपले झेंडे खांद्यावर घेऊन चालू लागल्या आहेत. सामान्यांचे प्रश्न सारखेच आहेत. जातीय अस्मिता एवढ्या वाढल्या आहेत की समाजाचे प्रचंड प्रमाणात ध्रुवीकरण झालेले आहे. स्वराज्याचा आशय आणि अर्थच लोपलेला आहे. प्रबोधकांनी ज्याच्यासाठी एवढा अट्टाहास केला होता ते उद्दिष्टच दृष्टिआड झाले आहे. जातीजातींची महामंडळे, महासंघ आणि सेना आज उभ्या आहेत. अंधश्रद्धा कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. समाजप्रबोधनाची प्रक्रिया ब्राह्मोसमाज, आर्यसमाज, सत्यशोधकसमाज यांच्या माध्यमातून सुरू झाली होती. पण या संघटना आज निष्तेज व निष्प्रभ ठरलेल्या आहेत. मतांसाठी दाही दिशा अशी आजची अवस्था आहे. राज्यघटनेची मोडतोड करण्याचा प्रयत्न होतो आहे. थोडक्यात उलट्या दिशेत उलट्या पावलांनी आज आपला प्रवास चालू आहे.

देश एकसंध व्हावा म्हणून समान नागरी कायद्याचे कलम घटनेत समाविष्ट करण्यात आले. पण त्याला विरोध होतो आहे हे रा. ना. चव्हाणांनी अतिशय दु:खाने सांगितले आहे. देशाचे अध:पतन होत असल्याबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. ‘बुडती हे जन न देखवे डोळा’ या कळवळ्याने संतांनी आपल्या प्रबोधनाची सुरुवात केली. तोच कळवळा रा. ना. चव्हाणांच्या प्रबोधनात आहे. ‘खळांची व्यंकटी सांडावी आणि दुरिताचे तिमिर जावे’ हा त्यांच्या लेखनाचाउद्देश आहे. हा ‘तापहीन मार्तंड’ आयुष्यभर समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेत राहिला. सत्य-असत्याशी आपले मन ग्वाही करून, बहुमताची पर्वा न करता रा. ना. चव्हाणांनी आपली लेखणी झिजवली. संतांच्या आणि समाजसुधारकांच्या विचारांचा समन्वय त्यांच्या प्रबोधनपर लेखनात झाला आहे. संतांनी आध्यात्मिक समता स्थापण्याचा प्रयत्न केला, तर समाजसुधारकांशी सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक समता अद्याप निर्माण झाली नाही. त्यासाठी जातियता व धार्मिक उच्चनीचता संपवावी लागेल. रा. ना. चव्हाणांना सामाजिक समता व राष्ट्रीय एकात्मता अभिप्रेत होती.

महाराष्ट्रात आज दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. देशात महिलांची अब्रू सुरक्षित नाही. आज राजकारणाचे गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. देश भ्रष्टाचाराने पोखरला गेला आहे. दहशतवाद सगळ्या जगात पसरला आहे. आविष्कार स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. अशाही परिस्थितीत आपल्या लेखणीने समाजात आशावाद निर्माण केला पाहिजे हा रा. ना. चव्हाणांचा संदेश आहे.

चिंतनगर्भ परिवर्तनवादी वैचारिक साहित्य म्हणजेच समाजप्रबोधन अशी मी समाजप्रबोधनाची व्याख्या करतो. साहित्य हेच विचार व्यक्त करण्याचे एक प्रभावी साधन असते. लेखकाच्या चिंतनातून विचार निर्माण होत असतात. आपल्याकडे असणारे सगळेच विचार एकाच वेळी जन्मलेले नाहीत. भांडवलशाही, समाजवाद, मार्क्सवाद, गांधीवाद, आंबेडकरवाद हे विचार ठरावीक काळी त्या त्या टप्प्यावर जन्मलेले विचार आहेत. जे. एम. कीन्स या ख्यातकीर्त अर्थशास्त्रज्ञाने म्हटले आहे, ‘Nothing can stop an idea whose time has come‘. अशा निरनिराळ्या विचारांतून जे साहित्य निर्माण होते त्यातूनच प्रबोधनाचा प्रवाह सुरू होतो. अशा प्रबोधनाला निरंतरता मात्र लाभली पाहिजे.

रा. ना. चव्हाणांनी वेगवेगळ्या विचारसरणींवर व त्यांच्या समर्थकांवर वस्तुनिष्ठपणे विपुल असे लेखन केले आहे. त्यांचे सर्वच लेखन प्रबोधनाखाली मोडते. त्यांना सामाजिक एकात्मता आणि राष्ट्रीय ऐक्य हवे होते. राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. समाज जोडण्यासाठी त्यांनी आपल्या लेखणीचा उपयोग केला. देशाचे संविधान हाच शेवटी आजच्या प्रबोधनाचा स्त्रोत आहे. त्यांना हवे होते सामाजिक, आर्थिक व राजकीय स्वातंत्र्य. सर्व नागरिकांना समान प्रतिष्ठा व समान संधी मिळावी असे त्यांना उत्कटतेने वाटत होते. सर्वांनी बंधुत्वाचे मूल्य आत्मसात करावे असे आवाहन त्यांच्या लेखनात आहे. सामाजिक कलह संपावा, उच्चनीचता संपावी असे त्यांना वाटत होते. मानव हा इथून-तिथून एक व समान आहे यावर त्यांची श्रद्धा होती. सगळ्यांना समान हक्क मिळाले पाहिजेत. समाजात अस्पृश्यता नसावी, जातिभेद नसावा, धर्मांधता नसावी यासाठी त्यांनी आपल्या लेखणीचा निरंतर उपयोग केला. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्‍न चिघळला त्या काळात ते अतिशय अस्वस्थ होते. नामांतराचे त्यांनी समर्थन केले. धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर त्यांनी अतिशय तळमळीने लिहिले आहे. गांधीवादी विचार त्यांनी आत्मसात केला होता. तत्त्वहीन राजकारण, त्यागहीन उपासना, मूल्यहीन शिक्षण आणि मानवताहीन विज्ञान त्यांना मान्य नव्हते.

प्रबोधन हे खरे तर भविष्यलक्ष्यी असते. भूतकाळाचा शोध आणि भविष्यकाळाचा वेध प्रबोधकाला घ्यावा लागतो. वर्तमानकाळ तर त्याच्या पायाखालीच असतो. पण तो त्याला समाधान देत नाही. थोडक्यात प्रबोधनकार हा ‘युटोपियन’ असतो. वास्तवाच्या कातळावर उभे राहून तो क्षितिजाच्या पलीकडे दडलेल्या स्वप्नाला साकार करण्याचा संकल्प करीत असतो. रा. ना. चव्हाणांचे प्रबोधन हे त्यांचे पसायदान आहे असे मला वाटते.

रा. ना. चव्हाण आपल्यातून निघून गेल्यानंतरची सामाजिक परिस्थिती ही अधिक बिघडलेली आहे. गावोगावी जातीय संघर्ष विकोपाला पोचत चालला आहे. खेडी उद्ध्वस्त होत चालली आहेत आणि शहरे बकाल होत चालली आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. देशात भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. दहशतवाद प्रचंड प्रमाणात वाढला आहे. हवामान बदलाने मानवजातीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. जागतिकीकरणाने जग जवळ आणले आहे, पण माणसामाणसातील अंतर वाढविले आहे. माणूस ही जागतिक बाजारपेठेत ठेवलेली एक वस्तू आहे. पण या वस्तूला फारशी किंमत नाही. माणसाला योग्य असा भावच मिळत नाही. रा. ना. चव्हाण असते तर त्याविषयी त्यांनी अतिशय पोटतिडकीने लिहिले असते यात शंकाच नाही. त्यांची लेखणी अतिशय संवेदनशील होती.

हिंदुत्वाच्या नावाखाली देशात ध्रुवीकरण केले जात आहे. रा. ना. चव्हाणांनी अशा विनाशकारी शक्तींच्या विरोधात आपली लेखणी चालवली असती. हिंदू, हिंदुत्व आणि हिंदूसंघटना यावर त्यांनी लिहिलेले लेख वाचले तर त्यांच्या प्रबोधनाची दिशा आणि आशय आपल्या लक्षात येईल (हिंदू, हिंदुत्व आणि हिंदूसंघटन : एक प्रबोधनात्मक मंथन, २०१८). ते समन्वयवादी व सौम्य प्रकृतीचे होते. सत्य-असत्याशी आपले मन ग्वाही करून त्यांनी सत्य स्वीकारण्याची व असत्य नाकारण्याची हिंमत दाखविली. प्रसंगी ‘एकला चलो रे’ची भूमिका त्यांनी घेतली. धर्म ही राष्ट्राची आधारशीला बनू शकत नाही ही त्यांची धारणा होती. धर्मनिरपेक्षतेवर त्यांची नितांत श्रद्धा होती. या बहुधर्मिय, बहुजातीय, बहुसांस्कृतिक व बहुभाषिक देशात धर्मनिरपेक्षता नितांत आवश्यक आहे.

‘आधुनिक भारतातील प्रबोधन’ या ग्रंथातील ‘समाजप्रबोधनाचे नवे स्वरूप’, ‘प्रबोधन व परिवर्तन यांचे यशापयश’ आणि ‘नवसमाजप्रबोधन’ हे लेख अतिशय महत्त्वाचे आहेत. या ग्रंथाचे संपादन रमेश चव्हाण यांनी केले आहे. चव्हाण हे रा. ना. चव्हाणांचे सुपुत्र आहेत. रा. ना. चव्हाणांचे सर्व लेख एकत्रित करून त्यांनी आजपर्यंत ३८ ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत. त्यांचे हे कार्य ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय मोलाचे व महत्त्वाचे आहे. रा. ना. चव्हाणांचे सगळे आयुष्य म्हणजे पवित्र असा ज्ञानयज्ञ! त्यांचे लेखन हे महाराष्ट्राचे अक्षरधन आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. मराठी वाचक ‘आधुनिक भारतातील प्रबोधन’ या ग्रंथाचे स्वागत करतील यात शंका नाही.

.............................................................................................................................................

'आधुनिक भारतातील प्रबोधन' - हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा-
https://www.booksnama.com/book/4796/Adhunik-Bharatatil-Prabodhan

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 30 March 2019

धृ - धारयति तो धर्म जाणावा. म्हणजे धारणा करतो तो धर्म. त्यामुळे धर्म यत्र तत्र सर्वत्र आहे. धर्माला डावलून काहीच करता येणार नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्षता हा निरर्थक बकवास आहे. हा शब्द सेक्युलॅरिझम या संज्ञेने युरोपात ओळखला जातो. ही मुळातून ख्रिश्चन संज्ञा आहे. दोन पादरी एकमेकांशी चर्चा करीत असतांना चर्चबाह्य विषयांना सेक्युलर असं विशेषण लावीत. त्यातून पुढे सेक्युलॅरिझम हा शब्द जन्मला. याचा भारताशी काडीमात्र संबंध नाही. उगीच फालतू भंपक संज्ञा भारताच्या माथी मारणं थांबवायला हवं. त्याकरिता मेकॉलेछाप शिक्षणास तिलांजली द्यावी लागेल. नेमकं हेच हिंदू पुनरुत्थानातनं अपेक्षित आहे. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......