मी काय बोलणार? तिचा प्रश्न खरा होता. काटेरी होता. जणू सूळकाटाच.
ग्रंथनामा - झलक
ल.सि. जाधव 
  • ‘सूळकाटा’चं मुखपृष्ठ
  • Fri , 15 February 2019
  • ग्रंथनामा झलक सूळकाटा Sulkata ल. सि. जाधव L. S. Jadhav

प्रसिद्ध लेखक ल. सि. जाधव यांच्या ‘होरपळ’ या गाजलेल्या आत्मकथनाचा हा दुसरा भाग. हे आत्मकथन एकाच वेळी वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवरचं दु:ख व्यक्त करतं. आणि त्याकडे उदार दृष्टीनं पाहण्याचाही प्रयत्न करतं. हा ‘सूळकाटा’च, सलत राहणारा, सलता सलता अंतर्मुख करणारा आणि जीवनविषयक अंतर्दृष्टी देणाराही. हे आत्मकथन नुकतंच रोहन प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे. त्यातील हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

काही लोक माझ्याकडे संशयाने बघू लागले. एका झाडुवालीशी असं विनंती आर्जव करून काय बोलतोय हा टापटीप गृहस्थ, असं वाटून काहीजण माझ्या रोखाने बघू लागले. सुधाला मी म्हटलं, ‘‘सुधा, लोक बघताहेत. चल आत. तिथं बसू. खूप बोलायचंय. तुझ्या भेटीसाठी मी मुद्दाम आलोय. प्लीज चल.’’

कशीबशी ती तयार झाली. हॉटेलचा एक कोपरा बघून आम्ही बसलो. मी पुन्हा अदबीने बोलू लागलो, ‘‘सुधा, कशी आहेस?’’ 

ती तिरकसपणे बोलू लागली, ‘‘पर माजी येवडी इचारपूस कशापायी वो? आम्ही मेलो का जित्तं हाव ते बघाय आलावा का? हेची चवकशी कराया आलावा का? कशापायी आता खपली काडाया लागलाव....’’

सुधाचे डोळे टचकन् भरूनच आले. मीही भावुक झालो. काय बोलू, कसं सांत्वन करावं? खूप अवघड होतं. आभाळ तर काळंकुट्टं भरून दाटून आलंय, पण एक थेंबही पडत नव्हता. नुसती घालमेल, घुसमट चाललेली. सुधा खाली पायाकडे बघत होती. गळ्यात मंगळसूत्र होतं. काळ्या मण्यात दोन मणी व डोरलं. कपाळावर तेच भरगच्च गोल गरगरीत कुंकू. मी बघतोय टक लावून ते सुधाच्या ध्यानात आलं. पुन्हा सुधाच बोलू लागली, ‘‘सांगा लवकर काय काम ते, मला झाडायला जायाचं हाय. मुकादम वरडत्याती.’’

‘‘सुधा, तुला भेटायला आलोय. कशी आहेस विचारायला. आता काम काय आहे म्हणून सांगू?’’

ती गप्प... पुन्हा मीच– ‘‘कशी आहेस?’’

‘‘बरी हाय. बगताव की कशी हाय ती.’’

समोरून मी उठून तिच्या शेजारी बसायला गेलो तशी झिडकारत म्हणाली. ‘‘हितं जवळ नाय, समूरच बसा, लांबनंच बोला. दासरापना करायचं काम न्हाय.’’

ती आक्रमक होऊन बोलू लागली. पुन्हा वेटर आला, “साब, बोलो ना, क्या चाहिए?’' मी “अरे बाबा थोडं थांब ना. मी बोलावतो,” म्हणून त्याला दटावलंच. तो सुधाकडे संशयाने बघत गेला. मी सुधाजवळच बसलो. तिची अवस्था दयनीय होती. मळकट साडी, पायांत जुनी तुटत आलेली आणि टाचा झिजलेली चप्पल. ती खाली जमिनीकडे बघत नखाने फरशीवर उगाचच टोकरत होती. पायाच्या बोटात खूप झिजलेली, रुळलेली जोडवी होती. जुनी असावीत. आमच्या लग्नातली. काय बोलावं, काय विचारावं सुचत नव्हतं. बोलायचं खूप होतं, परंतु शब्दांचे बांध फुटत नव्हते... शब्द अडून होते व्यक्त व्हायला, सुधासारखेच.

‘‘जावू का, कामं तटलीत,’’ ती.

‘‘कुठं राहातेस? कोण कोण आहे घरी?’’

ती शांत होत आली होती.

‘‘समूर घंटाचाळीत. सवतीसंगट.’’

‘‘सवत? म्हणजे?’’

‘‘तुमच्यासारखं म्या थाटात लगीन न्हायी केलं. भैन रुकमिनीच्या नवऱ्यानं आसरा दिला. रहातेय त्याची रांड म्हणून....’’

‘‘आसं काय बोलतेस?’’

‘‘का झोंबलं काय माझं बोलनं. तुमी सुखात राहावं आन म्या?’’ तिचा आवाज थरथरत होता.

‘‘तुला मुलं?’’

नाकावर टिच्चून सांगावं तसं ती ठसक्यात ठणकावून सांगू लागली, ‘‘दोन झाली, सांगा तुमच्या आईला. म्हातारी मला उठल्याबसल्या वांझुटी म्हनायची, सासूने तर माझी जिंदगानी बरबाद केली आन तुमी नंदीबैलासारखं....’’ ती बोलायचं थांबली. तिचा राग, आवेश योग्यच होता. मी समजावू लागलो, ‘‘सुधा, सगळे नशिबाचे खेळ असतात बघ. जे झालं ते झालं. पण मी तुला अजून विसरलो नाही. खूप चौकशी करायचो. तरी तुला हुडकून काढलंच की न्हाय.’’

‘‘म्या बी न्हाय इसरले तुमच्या आईने माझा केलेला छळ. मी किती येळा तुम्हाला रडून रडून सांगायचे. आन् तुम्ही सासूसुनाच्या मदी म्या पडत न्हाय म्हनून उठून भाईर जायचं. हे बरुबर होतं का? म्या आडानी. तुमी तर शिकल्यासवरल्यालं व्हतात की वो.’’

तिचा सूर रडवेला होता. ‘‘माझं लय वाटुळं झालं वो. दादा, माय, भाव सगळं धास्तीनं एक एक मरून गेलं. दारांवर नांगुर फिरला आमच्या.’’

मी हलकेच तिचा हात हातात घेतला. तसा तिने पुन्हा झिडकारला. ‘‘हात लावायचं काम न्हाय.’’

बोलण्यातील तेगार तोच. मी पुन्हा तसाच बळंबळं घेतला. हात राकट, घट्टे पडलेले सहज जाणवत होते. ती काहीशी भावुक झाली. मीही. तब्बल ४८ वर्षांनंतर, सगळं तारुण्य गळून गेल्यावर आम्ही दोघंही म्हातारे इतक्या हळुवार प्रेमाने भारावलो होतो. कुणी बघेल याचं भय मनात यत्किंचितही नव्हतं. ती बरीच ओशाळली. रडू लागली. डोळ्याला पदर लावला. एकच म्हणाली, ‘‘असं का हो झालं? माझा तुमच्यावर लय जीव होता. मीबी न्हायी विसरले आजुक तुम्हास्नी.’’

मीही भावुक झालो. ‘‘हे बघ सुधा, जे झालं ते झालं. नशिबाचे खेळ हे. मला अलीकडे बी.पी.चा, शुगरचा त्रास आहे. खूप थकल्यासारखं वाटतंय. माझी सत्तरी आता ओलांडलीय. आयुष्याचा काय भरवसा? तुला भेटायचं हे अलीकडे खूप वाटत होतं. भेट झाली नाही अखेरपर्यंत ही सल मनात राहू नये म्हणून मी आलो. आता मन मोकळं वाटतंय.’’

मी वेटरला हाक मारली. ‘‘सुधा, आपण मिळून जेवू. राइसप्लेट मागवितो.’’

ती काही बोलली नाही. वेटरला दोन राइसप्लेटची ऑर्डर दिली. सुधा म्हणाली, ‘‘मी आले. तितं फडक्यात भाकर हाय. घेऊन येते.’’ तिने लगेच गडबडीने जाऊन आणलीही.

राइसप्लेट आली. तिने फडक्यातली दशमी सोडली. दोन जाड भाकऱ्या, दाळगा, शेंगाची चटणी होती. माझ्या ताटात तिने भाकर, दाळ, थोडी चटणी ठेवली. तिनेही घेतली. जेवू लागलो. मी भाकरीचा तुकडा हातात घेतला आणि तिला भरवू लागलो. तिने ‘‘आवं, हे काय? हे हॉटेलवाले  बगत्यात, मला वळकत्यात. नका करू तसं’’, असं म्हटलं. पण मी ‘‘एकतरी घास घे,’’ म्हणून आग्रह केला. मी भाबडा, वेडाच. 

आम्ही भुकलेले होतो, आमची भूक भेटीचीही होती. कसा योग असतो, आश्चर्यच!

मी माझ्या मुलांबद्दल, बायकोबद्दल जेवता जेवता माहिती दिली. आई गेल्याचं बोललो. एक भाऊ, भागवत तोही हार्टफेलने अचानक गेल्याचं सांगितलं. ‘रावसाब व्हय, आरं देवा,’ असं मात्र हळहळत म्हणाली.

जेवण झालं.

मी माझ्याजवळची काखेत अडकवलेली शबनम बॅग टेबलावर ठेवली. त्यातली प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक केलेली साडी बाहेर काढली. आणि दहा हजाराचं शंभर रुपयाच्या नोटांचं पाकीट काढलं. तिच्या हातात देऊ लागलो. तिने विरोध केला. ‘नको, नको’ म्हणू लागली. ‘कशापायी ही परतफेड’ असं बोलू लागली. पण मी ‘गप्प बस, राऊ दे’ म्हणत बळेबळे तिच्या हाती दिलेच. आणि ते माझ्या सुंदराआत्यासाठी घेतलेले पाच टरबुजी सोन्याचे मणी डबीसह तिच्या हवाली केले. तिने डबी उघडून पाहिलं. मणी हातात घेतले, तेवढ्यातही तिने प्रश्न केला, ‘‘डोरलं कुठाय?’’ 

मी काय बोलणार? तिचा प्रश्न खरा होता. काटेरी होता. जणू सूळकाटाच.

.............................................................................................................................................

'सूळकाटा' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/4774/Sulkata

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......