एका तरुणाच्या अस्थिविकाराचे निरात्म निवेदन
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राजशेखर शिंदे
  • लेखक उमेश शिंदे आणि त्यांचं आत्मकथन
  • Sat , 22 October 2016
  • राजशेखर शिंदे Rajshekhar Shinde पोखरलेले झाड उमेश शिंदे Umesh Shinde

‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ हा डॉ. अभय बंग यांचा लेख (साप्ताहिक सकाळ, दिवाळी १९९४) प्रकाशित झाला आणि एका नव्याच लेखनप्रकाराचा शोध लागावा असं काहीसं झालं. त्यापूर्वीही शारीरव्याधींवर लिहिलं गेलं आहे, नाही असं नाही, पण ते लेखन स्वतंत्र चिंतनाच्या आणि लालित्याच्या अंगानं नसून कमीपणा लेखून जाता जाता चरित्रात किंवा अन्यत्र कोठेतरी लिहिलेलं आहे. डॉ. बंगांनी याहीबाबत चांगलंच रोगनिदान केलं आहे. त्यांनी आपल्याच हृदयरोगावर लिहून जागल्याचं काम केलं आणि तत्सम लेखन करू पाहणाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं अग्रत्व आपल्याकडे घेतलं. (१९९८मध्ये याच नावानं त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालं.) डॉ. बंग यांच्या मराठी बोलीचं चिरेबंदी रूप, कल्पकतेची आणि बुद्धिमत्तेची झेप आणि त्यांच्यामधील खिळाडू व संशोधक वृत्तीचं दर्शन त्यांच्या ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ या पुस्तकातून घडतं.

हे आठवण्याचं कारण म्हणजे ‘पोखरलेले झाड’ हे उमेश शिंदे यांचं आत्मकथन. एका चांगल्या गोष्टीमुळे दुसऱ्या एका चांगल्या गोष्टीची आठवण होणं स्वाभाविक आहे. बंग आणि शिंदे यांच्यातील सांधा जुळता नाही. बंग आणि शिंदे यांच्या पुस्तकात साम्य आहे ते शैलीत. सकारात्मक आणि सतत चढाईच्या दृष्टीनं बंग हृदयरोगातून बाहेर आले, तर शिंदे रोज येणाऱ्या पाठीच्या वेदनांनी मरममुख पाहतात. त्यांच्या वेदनाभोगाचा प्रवास अजून सुरूच आहे. महाराष्ट्राला आणि जगाला बंग यांची  ओळख होते, तेव्हा त्यांनी पस्तीशी ओलांडलेली होती, स्वातंत्र्यसेनानी असलेल्या वडलांची मोठी परंपरा त्यांच्या मागे होती. त्यांना कोणती सांपत्तिक विवंचना नव्हती. थोडक्यात त्यांचं कर्तृत्व सिद्ध झालेलं होतं. शिंदे यांचं तसं नाही. अँक्लॉयझिंग स्पाँडिलायटीस हा दुर्धर आजार झाला, तेव्हा त्यांचं वय होतं अवघं १९ वर्षांचं.

‘पोखरलेले झाड’ हे पुस्तक आत्मकथन या रूढ संकल्पनेत बसत नाही. स्वत:च सांगितलेली स्वत:ची कथा म्हणजे आत्मकथन, हे शब्दश: योग्य असलं तरी ते लौकिक अर्थानं रूढ असलेलं आत्मकथन नव्हे. आत्मकथनात सामाजिक व्यवस्थेविरुद्ध द्रोह असतो, सामाजिक स्तरीकरण, जातिव्यवस्थेमधील अन्याय आणि त्याविरुद्ध तरुणमनाने पुकारलेलं बंड, असं आत्मकथनाचं रूप असतं. हे आत्मकथन असलं तरी त्यास सामाजिकतेपेक्षा व्यक्तिवाचित्वाचं रूप प्राप्त झालं आहे. लौकिक अर्थानं लाभलेलं शरीर हेच अलौकिकाचं साधनमाध्यम आहे. त्यामुळे सूक्ष्म विचार करता लेखकाची जगण्याची प्रबळ इच्छा म्हणजे लौकिक आणि अलौकिकातील दिठीमिठीचा संघर्ष आहे. आत्यंतिक प्रगत जगतामध्ये बाह्य भौतिक स्थितीवर मात करणं शक्य होत असताना आंतरिक सूक्ष्म देहात आपण बाह्यदृष्टीच्या कैफामुळे पराभूत होत जात आहोत. त्यामुळे आपल्याला केवळ संकल्पनेच्या पातळीवर विचार करावा लागत आहे.

हे आत्मकथन वाचतना पहिली प्रतिक्रिया उमटते ती साधेपणाची. लेखकाचं हे पहिलंच पुस्तक आहे. ही त्याच्या ब्रह्मचर्यावस्थेमधील कथा आहे. पौगंडावस्था संपते न संपते तो वेदनेचा काळसर्प त्याला लपेटून करकचून बांधत राहतो, थकल्यानंतर तोच सरगाठ थोडीशी ढिली करतो. या वृत्तीमुळे लेखक स्वत:विषयी सहानुभूती निर्माण करत नाहीत. काळाच्या कराल दाढेत जगत असूनही त्याचा कणा ताठ आहे. दुर्दैवानं त्याची व्याधीही कणा ताठ होण्याचीच आहे! शिकण्यासाठीची धडपड, पाठीच्या वेदनेचा सततचा हिंदोळा आणि महत्त्वाकांक्षा उदध्वस्त होणं, यांचं वर्णन करताना सरळ नागर बोलीचा उपयोग केला आहे. ही गद्य नागरबोली अनुभव प्रकट करताना प्रभावी झाली आहे. उपमा, प्रतिमा यांचा अजिबात सोस लेखकाला नाही. अनुभवाचा पसारा अंत:चक्षुपढे अंधूक होतो तेव्हा दमछाक होऊन अलंकाराची निर्मिती होते. लेखकाची स्व आणि ‘स्व’ची आंतरदृष्टी एक होते, तेव्हा उत्कट अनुभव गाळून येतात. तिथे भाषिक सौंदर्याचा फुलोरा बाजूला होतो. नि:संदिग्ध अनुभव निरात्म होऊन उभा राहतो. कोणत्याही स्वरूपाची रंगीबेरंगी कलाकुसर नसलेली एकरंगी वारली (रेखाकृती) अभिजात कला दिसते, तशी या पुस्तकाची शैली आहे.

चारचौघांच्या वाट्याला येऊ शकणारे अनुभव या पुस्तकात आहेत. ग्रामीण भागातील जन्म, समज-गैरसमज, तेरा-चौदा वय नसलेल्या भावाची गळफास घेऊन आत्महत्या, चुलतीचे शब्दशर, लेखकाचा शाळेतील उनाडपणा, नंतर अभ्यासाला लागणं, वयाच्या विशीतच वेदना घेऊन स्वत:च्या ऊस पिकाचे तंटेबखोड मिटवणं आणि एकोणिसाव्या वर्षी आपल्या दुर्धर आजारावर तिऱ्हाईताचा आजार असल्यासारखं डॉक्टरशी बोलणं, वडिलांविषयी भयंकर राग, चीड उत्पन्न होणं या गोष्टी अतिशय त्वेषानं, आवेशानं सांगितल्या जाण्यासारख्या आहेत, परंतु त्यातही लेखकाची तटस्थ, संथ आणि कमालीची सोशिकता प्रकट झाली आहे. त्यानं आपल्या वेदनेचं स्वरूप समजून घेतलं आहे. तो वयाच्या एकोणिसाव्या वर्षी एका दिवसाला औषधांच्या पंधरा-पंधरा गोळ्या खातो. अगदी किशोरवयातच त्याची एका भयानक वेदनादायी आजाराशी ओळख होते. त्यामुळे वाचायला सुरुवात केल्यावर पुस्तक बाजूला ठेवावंसं वाटत नाही. एका लहानग्याच्या वाट्याला आलेलं जीवन जाणून घ्यावंसं वाटतं. शिवाय लेखकानं हे पुस्तक लिहिलं आहे चोविसाव्या-पंचविसाव्या वर्षी. व्याधीनं शरीर पोखरून टाकलं तरी अशाही असाहाय्य अवस्थेत वडिलांच्या उठाठेवी मिटवत गावात लेखक कसा काय काम करतो, या विस्मयानं आपण स्तिमित झाल्याशिवाय राहत नाही.

हा लेखक वाचकाच्या मनात मित्रभावाची जागा निर्माण करतो. आपल्यासमोर बसून सांगतोय, आपल्या समस्या जाणून तो त्याच्या वेदना सांगून मन हलकं करतोय असं वाटतं. लेखनशैली लोभस म्हणावी अशी आहे.

हे आत्मकथन शालेय जीवनापासून सुरू होऊन तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नोकरीतील निराश अनुभवापर्यंत येऊन थांबतं. तिथून पुढचं जगणं सुरू असल्यानं ते येत नाही. त्यामुळे हे आत्मकथन फारच सीमित परिघाचं आहे. पण कौटुंबिक पातळीवरील आणि मित्रपरिवाराच्या पातळीवरील अनुभव सांगण्याची अत्यंत निरात्म, निर्मम, जगण्याविषयी अप्रूप न वाटणारी तटस्थ, समंजस पद्धत अवलंबली गेली आहे. त्यात भावूकता नाही. नवाढ तरुणांचा उतावीळपणा नाही, तर स्वत:ची भावना निरपून काढावी इतकी तटस्थ वृत्ती आहे.

लेखकाच्या प्रवृत्तीमध्ये एक प्रकारची अभिजातता आहे. अनुभवाच्या गाभ्यालाच भिडण्याची आणि तो अनुभव सांगण्याची रीत त्याची अभिजात वृत्ती दाखवते. वाढतं वय आणि आजूबाजूचा झगमगाट यानं विचलित न होता लेखक आपली विद्यार्थ्याची वाट तुडवत राहतो. कौटुंबिक वातावरण, गृहकलह या गोष्टीही त्याला जगापुढे मांडाव्याशा वाटत नाहीत. चुलते मिलिटरीतून निवृत्त होऊन बार्शीला घर करतात. दहावीनंतर बार्शीत त्यांच्याकडे सोय होईल म्हणून गेल्यानंतर ते त्याला रूमवर राहण्यासाठी निर्विकारपणे सांगतात. हातात येणाऱ्या एअरफोर्सची नोकरी बाजूला राहते आणि त्यामुळे केलेल्या शस्त्रक्रियेमुळे पदरात मात्र अँक्लोझिंग स्पाँडिलायटीससारखी दुर्धर व्याधी पडते. अगदी पदर फाटेपर्यंत हे सारं बालकांडच आहे.

जीवनाच्या प्रतिकूलतेत आणि अनुकूलतेत सांधे भरून काढणाऱ्या आजारानं त्रस्थ झालेल्या, स्वप्न भरलेल्या या तरुण लेखकामध्ये कमालीची निर्लेप, तटस्थ दृष्टी आहे. मनाची अस्वस्थता, शारीरिक अस्वस्थता आणि घरातील दारिद्रय, वडलांचं दारुडेपण व कर्ज काढून बेहिशोबी पैसे खर्च करण्याची प्रवृत्ती अशा सर्व प्रकारच्या आपत्तींमधून जीवनाविषयी या तरुण लेखकाला प्रचंड कुतूहल आहे. त्यामुळे मिळेल ते, प्रकृतीमुळे जमेल तसं वाचन करत राहतो.

या पुस्तकामुळे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही जीवनाशी कसा संघर्ष करावा, लोकांशी कसं जुळवून घ्या, हे समजून घ्यायला मदत होते. या पुस्तकामुळे उमेश शिंदेसारखा एक लेखक वाढण्याची, मोठा होण्याची संधी निर्माण झाली आहे. प्रसंग नाट्यपूर्ण ध्वनित करण्याचं अल्पाक्षरी कौशल्य या पुस्तकात आहे. भावूक होऊन अलंकारिक सोस धरून विसविशीत काहीतरी उभं करण्यापेक्षा रुक्ष, कोरड्या आणि अल्पाक्षरात धग निर्माण करता येत असेल ते स्वागतार्ह आहे. प्रदीर्घ गद्यलेखनाला असा शैलीची गरज असते. शिंदे यांच्या शैलीचं निश्चित अप्रूप वाटतं ते त्यामुळे.

पोखरलेले झाड – उमेश शिंदे, कोटी अँड बाबर पब्लिशर्स, सोलापूर, पाने – १४६, मूल्य – १५० रुपये.

 

लेखक दयानंद महाविद्यालय, सोलापूर इथं मराठी विभागाचे प्रमुख आहेत.

srajshekhar215@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......