अजूनकाही
गुंतवणूक कशी करावी, कधी करावी, गुंतवणूक करतान काय काळजी घ्यावी, अशा विविध प्रश्नांची उत्तरं संत कबीर आणि संत रहीम यांच्या विचारातून देत गुंतवणूकदारांसाठी चिरंतन कानमंत्र देणारं ‘दोहानॉमिक्स’ हे गुंतवणूक सल्लागार विनायक सप्रे यांचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. सीनएनबीसी टीव्ही 18 यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला लेखकानं लिहिलेल्या मनोगताचा हा सुधारित, संपादित अंश...
.............................................................................................................................................
भारतीय अर्थव्यवस्था खुली झाल्यावर आपल्या देशात अनेक बदल झाले. या २५-२७ वर्षांत समाजाच्या वर्तणुकीत डोंगराएवडे बदल जाणवले. त्यातील अनेक बदल नकळतपणे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले. ते अंतर्भूत झाल्याचे फारसे कोणाला कळले नाही. या काळात एका पिढीच्या विचारपद्धतीत झालेल्या आमूलाग्र बदलांमुळे येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या जीवनावर प्रभाव पडणार आहे.
सर्वांत मोठ्या बदलांमधील एक म्हणजे समाजाची खर्च करण्याची पद्धत. सण आणि लग्नसराई सोडल्यास भारतीय लोक हात राखूनच खर्च करतात, तसेच गुंतवणुकीचे प्रमाणही कमीच. मागील २७ वर्षांत आमूलाग्र बदल खर्च करण्याच्या पद्धतींमध्ये दिसून आले आहेत. ऐशोरामाच्या वस्तूंचे रातोरात गरजांमध्ये परिवर्तन झाले. पहिल्या १५-१६ वर्षांत भरपूर प्रमाणात पगारवाढ झाली. ज्यामुळे खर्च करण्याची ताकद वाढली. त्याच वेळी व्याजदर कमी झाले आणि गाड्या, घरांपासून प्रवासाच्या तिकिटांपर्यंत सर्व काही कर्जावर मिळायला लागले. आज कपडेही मासिक हप्त्यांवर मिळतात.
‘आज विकत घ्या, उद्या पैसे द्या’ ही विचारसरणी तरुण पिढीच्या मनात पटकन झिरपली. उच्च पगार आणि कमी व्याजदर यांनी आगीत इंधन ओतले. तथापि, हे सगळे घडत असताना, अजून एक मोठा बदल घडला. तो म्हणजे या झगमगाटीत त्या पिढीवरचे आप्तेष्टांकडून येणारे दबाव. प्रतेयक क्षेत्रात आव्हाने कैकपटीने वाढली. दिलेले कर्तव्य पूर्ण करा किंवा मरा हा मंत्र सर्वांच्या मुखी होता, ज्यामुळे तणाव वाढले. विभक्त कुटुंबातील आणि छंद जोपासण्यातील वेळेच्या अभावामुळे लोकांनी खरेदी हाच उपचार, याचा शोध लावला.
हे सर्व खर्चांच्या बाजूला बदल होत असताना गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेमध्ये फारसे बदल दिसत नव्हते. आर्थिक साक्षरतेबाबत कोणीच फारशी पावले उचलताना दिसले नाही. नियामक मंडळांच्या स्थापना झाल्या, पण वेगवेगळ्या उत्पादनांसाठी वेगवेगळे नियम असल्याकारणाने गुंतवणूकदार अधिक गोंधळून गेले.
म्युच्युअल फंड लोकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्दैवाने पहिल्या २० वर्षांत त्यापैकी बहुतेक त्यांची गुणवत्ता दाखवण्यात मग्न होते. ज्यामुळे उत्पादनाच्या खऱ्या लाभापेक्षा त्यातील लोभाची विक्री जास्त झाली. गेल्या पाच वर्षांत त्यांना हे जाणवले आहे की, बाजारात वेगळेपण सिद्ध करण्यासाठी म्युच्युअल फंड हे काहीतरी मिळवण्यासाठीचे उपाय असलेले उत्पादन आहे, असे सांगण्याची, पटवून देण्याची गरज आहे.
संकल्पना म्हणून म्युच्युअल फंडची जन्मभूमी ही सातासमुद्रापारची असल्याने त्यातील अनुभवाचे बोल हे वैश्विक स्वरूपाचे आहेत. म्हणजेच सर्व उदाहरणे, म्हणी या परदेशी आहेत. ज्या आपल्या देशातील गुंतवणूकदार आणि सल्लागार यांच्याशी फारशी काही आपुलकी बाळगत नाहीत. त्यामुळेच २७ वर्षांनंतरही म्युच्युअल फंडाकडे अनोखे उत्पादन म्हणून पाहिले जाते. अत्याधुनिक गुंतवणूकदारांसाठीचे वैश्विक स्वरूपाचे उत्पादन म्हणून त्याची ओळख केली जाते.
त्यामुळे मला या सगळ्याला भारतीय अवतार देण्याचे सुचले. म्युच्युअल फंडाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यातील संदर्भ आणि दळणवळण मातीशी जोडलेले असावे असे जाणवले. ज्या देशावर अनेक संत-महात्म्यांनी संस्कार केले, त्यात दोन संत हेरणे अवघड नव्हते, ज्यांना सर्व जाती-धर्म आणि विचारवंतांमध्ये मान असेल. हे दोन ज्ञानी म्हणजे संत कबीर आणि संत रहीम. दोघेही विशेषत: संत कबीर, उत्तम निरीक्षक होते. त्यांनी संपूर्ण उत्तर भारताचे भ्रमण केले. त्यांचे दोहे शिखांच्या आदी ‘ग्रंथसाहिब’मध्येही नमूद केलेले आहेत. हलाखीच्या दिवसात वाढलेले असतानाही संत कबीर यांना समाजाच्या विचारसरणींना आव्हान देता आले.
उत्पन्नावरील परताव्यांपेक्षा (रिटर्न्स), जे गुंतवणुकीच्या यशात मोठी कामगिरी बजावतात, गुंतवणूकदारांची पैशांच्या बाबतीतील वर्तणुकीमुळे कसे फरक पडतात हा संदेश मी देऊ इच्छितो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे जरी म्युच्युअल फंड नि उच्च परतावे दिले असतील तरी बोटांवर मोजता येतील एवढ्याच गुंतवणूकदारांनी अनुषंगिक पैसा कमवला. आणि हाच संदेश पोचवण्यासाठी संत कबीर आणि संत रहीम यांनी आपल्या जादूमय शैलीत दोहे लिहून माझे काम खूप सोपे केले.
.............................................................................................................................................
'दोहानॉमिक्स' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/4721/Dohanomics
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment