‘नवा भारतीय’ अधिक मुक्त असावा; त्याची बौद्धिक, सांस्कृतिक आणि भौतिक उंचीही थोडी अधिक असावी!
ग्रंथनामा - झलक
बॅ. नाथ पै
  • ‘लोकशाहीची आराधना’ या पुस्तकाचे नवे आणि जुने मुखपृष्ठ
  • Thu , 07 February 2019
  • ग्रंथनामा झलक लोकशाहीची आराधना Lokshahichi Aradhana बॅ. नाथ पै Nath Pai

बॅ. नाथ पै यांच्या निवडक भाषणांच्या संग्रहाची म्हणजे ‘लोकशाहीची आराधना’ या पुस्तकाची नवी आवृत्ती नुकतीच साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. या पुस्तकातील हे एक भाषण. हे भाषण नाथ पै यांनी महाबळेश्वर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक या नात्याने केले होते. नुकत्याच यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटकाला भाषणच करू दिले नाही, त्या पार्श्वभूमीवर हे भाषण औचित्यपूर्ण ठरावं.

.............................................................................................................................................

संमेलनाचे अध्यक्ष कविवर्य बा.भ.बोरकर, स्वागताध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, मराठी शारदेचे इथे उपस्थित असलेले उपासक आणि रसिक मित्रहो... मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांच्या सर्वश्रेष्ठ आणि प्रातिनिधिक अशा या संमेलनाचं उद्घाटन करण्याचं हे मौलिक भाग्य दिलंत, त्याबद्दल परिषदेचा आणि आपणा सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. मी हा माझा अनन्यसाधारण गौरव मानतो. सामान्यतः हा मान ज्याने साहित्यामध्ये फार मोठा पराक्रम केलेला आहे किंवा जो जगन्मान्य असा विद्वान ठरलेला आहे, त्याला मिळाला पाहिजे; आणि हे दोन्हीही मिळू शकले नाहीत, तर मग शेवटी एखाद्या मंत्र्याला वेठीला धरलं पाहिजे, अशी परंपरा आहे. आता या तिन्हींपैकी कुठल्याही श्रेणीत माझी वर्णी लागू शकत नाही आणि असं असतानाही मी इथं आलेलो आहे. मी इथं येऊ नये, अशी शंभर कारणं मला आक्रंदून सांगत होती.

फक्त एक कारण इथं यावं असं सांगत होतं. साहस किंवा धाडस हा राजकारणाचा स्थायीभाव असतो. मी जर इथं आलो नाही, तर हे साहस सोडल्यासारखं होईल. म्हणजे जो धंदा किंवा धर्म पत्करलेला आहे, त्याच्याशी प्रतारणा होईल. म्हणून इथं आलेलो आहे. अन्यथा, मी इथं येणं टाळत होतो. सभांना सामान्यतः मी बुजत नाही किंवा घाबरत नाही, बिचकत नाही; परंतु या इथं येताना मात्र या सर्व भावनांचा अनुभव घ्यावा लागला. पुष्कळ आढेवेढे घेतले, परंतु तर्कतीर्थांच्या वेढ्यात सापडल्यामुळे शेवटी इथं येऊन पोचलेलो आहे. पांडित्यपूर्ण भाषण, मौलिक विश्लेषण किंवा स्फूर्तिदायक असे मार्गदर्शन, अशी आपण माझ्याकडून अपेक्षा करीत नाही, याची मला जाणीव आहे.

आजच्या अध्यक्षांबद्दल स्वागताध्यक्षांनी यथोचित अशा भाषेत वर्णन केलेलं आहे. मला जे सांगायचं आहे ते थोडं वेगळं आहे. मराठी काव्याकडे मी खेचलो गेलो तो अपघातानं. कारण प्रतिभाशाली लेखक व्हायला जर प्रतिभा प्रकर्षानं वास करायला हवी, तर चांगला रसिक व्हायला प्रतिभेचा कमीत कमी स्फुल्लिंग असावा लागतो. प्रकर्षानं प्रतिभा असली की, तुम्ही कलावंत होता, कवी होता, लेखक होता, नाटककार होता; परंतु या प्रतिभेचा स्फुल्लिंगच नसेल तर मग ‘ज्ञानेश्वरी’ असू द्या की ‘गीतांजली’ असू द्या, मग होमर असू द्या किंवा वाल्मीकी असू द्या- ते सारं डोक्यावरून जातं. म्हणून आस्वाद घ्यायलासुद्धा संपूर्ण का नसेना पण सरस्वतीचा वरदहस्त लागतो, असं मला वाटतं. मी बोरकरांच्या कवितेकडे आकृष्ट झालो विद्यार्थी म्हणून. बेळगावला वाङ्मय चर्चा मंडळ साहित्य सत्र चालतं, त्याला मी गेलेलो होतो आणि तिथं मी काव्यगायन ऐकलं होतं. मराठी शाळेत कविता सक्तीनं शिकत होतो. त्यामुळे तिच्याबद्दल वचक बसला होता. ‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’ ही कविता सकाळी उठून वेंगुर्ल्याला म्हणावी लागत असे. त्याचा बोध होत नसे वयाच्या सहाव्या वर्षी; परंतु ती पाठ येत असे - परंतु मग कवितेबद्दल तसा जो वचक बसला होता तो वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षांपर्यंत राहिला.

कविता पाठ पुष्कळ येत होत्या; परंतु त्यांच्याबद्दल जिव्हाळा असायला हवा, ओढ असावयाला हवी, आत्मीयता असायला हवी, प्रेम असायला हवं, त्यांच्याशी तद्रूपता अनुभवायला हवी. त्यांचा साक्षात्कार होत नव्हता, परंतु तो पहिल्यांदा आला बोरकरांचे काव्यगायन ऐकताना... मराठीमध्ये जे जे काही आहे- नादमाधुर्य आहे, कल्पनारम्यता आहे, भावनांची तरलता आहे- ते सारं बोरकरांच्या कवितेत आहे. नादमाधुर्याचं सर्वांत सुंदर चित्र बोरकरांच्या कवितेत आहे. इथं थोर कवी आहेत. या बाबतीत बोलण्याचा अधिकार शेणोलीकरांचा आहे, वाळिंब्यांचा आहे, निकुंबांचा आहे. अन्य जे या ठिकाणी विद्वान आणि साहित्यिक आहेत त्यांचा आहे; परंतु एक साधा वाचक म्हणून सांगतो की, हे जे गुण त्यांच्या ठिकाणी प्रकर्षानं दिसतात त्यामुळे मी प्रभावित झालो आणि मराठी काव्याची मला ओढ लागली. पुढं त्यांचं वेड लागलं. मी प्रथम त्यांच्या कविता गाताना ऐकल्या होत्या. पुढं मात्र - ‘ऐकाया कविता मुखीच कविच्या’ असं भाग्य लाभलं.

बोरकर बेळगावला वारंवार येत असत आणि त्यांच्या कविता ऐकायला मिळत. ज्यांनी या वयात अशी कविता लिहिली, जी बहुतेक मराठी रसिकांना मुखोद्गत असेल, कमीत कमी आपण त्या कवितेशी परिचित असाल,

‘या नदीच्या पार वेड्या

यौवनाचे झाड आहे!

अमृताचा चंद्र त्याच्या

पालवीच्या आड आहे!!’

या कवीला जीवनात सौंदर्य आढळलेलं आहे, माधुर्य आढळलेलं आहे. मला असं वाटतं, खऱ्या संन्याशाच्या तटस्थ वृत्तीने आणि अधिकाराने ते वेदान्ताबद्दल लिहितात, कवितेत लिहितात आणि दुष्यंताला लाजवील अशा शृंगारप्रीतीने सौंदर्याचा ठाव घेत असतात. हे त्यांचे दोन गुण विलोभनीय आहेत. म्हणून त्यांचं आधुनिक मराठी काव्यातील स्थान अद्वितीय आहे.

ज्या वेळी गोवा मुक्त झाला- त्यांचं ते एक मोठं वेड होतं, स्वप्न होतं, एक छंद होता, एक हट्ट होता, हव्यास होता- त्या वेळी मला त्यांची एक कविता आठवली. त्यांनी ती (१९४६ मध्ये) गोवा मुक्ती सत्याग्रह सुरू झाला होता लिहिली होती. गोवा मुक्तीचा मलाही नितांत आनंद होत होता. मी त्या आनंदाच्या भरात त्यांच्या कवितेची ओळ त्यांना तारेच्या स्वरूपाने पाठविली. ती ओळ -

‘त्रिवार मंगलवार आजला

त्रिवार मंगलवार’

दुसऱ्या दिवशी त्यांचं उत्तर आलं -

‘धन्य जाहलो मीही याचा

घेऊन साक्षात्कार’

कारण ही ओळसुद्धा या कवितेतच आहे. मला कल्पना नव्हती, या कवितेतील हीच ओळ उद्धृत करून ते त्यांचं उत्तर देतील. अशा कवीच्या अध्यक्षत्वाखाली मराठी साहित्याबद्दलच्या माझ्या अपेक्षा सांगण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे.

राजकारणात कोण जात असतो? त्याचं उत्तर आता सर्वांच्या ओठावर तयार आहे. हा काही यक्षप्रश्न नाही. ज्याला आमदार व्हायचं असतं, खासदार व्हायचं असतं, मंत्री व्हायचं असतं- मी प्रधानमंत्री म्हणालो नाही, कारण ती जागा हिंदुस्थानात रिझर्व्ह दिसते अलीकडे; परंतु अशी व्यक्ती राजकारणाकडे आकृष्ट होते, खेचली जाते, बांधली जाते- अशी अनुमानं तुमच्या मनात तुम्ही ठरविलेली आहेत. परंतु मी या बाबतीत जे सांगणार ते थोडंसं वेगळं आहे. मला वाटतं, कीट्सनी वर्णन केलेलं आहे आणि इथं साहित्यिक, कलावंत आणि चांगला राजकारणी यांचा एकच समान धर्म सुरू होत असतो, तो असा - Those who feel the joint agony of the world and toil like slaves to cure humanity for mortal good.

मानवतेबद्दलची ही कणव, ही वेदना, ही संवेदना, ही सहानुभूती ओथंबून ज्यांच्या अंतःकरणात असते, तो कधी स्वातंत्र्यसंग्रामाचा सेनानी म्हणून राजकारणात उतरतो, तर कधी देशातील गुलामगिरी पाहवत नाही म्हणून आत्मयज्ञासाठी तयार होतो. कधी अंदमानात जाऊन ‘ने मजसी ने’ म्हणून मातृभूमीला आळवत असतो, कधी स्वतःला गोळी लागल्यावर ‘यांना देवा क्षमा कर’ असं सांगून मानवतेला उजाळा देत असतो.

मला आपल्याला नम्रपणे असं सांगायचं आहे की, चांगला कलावंत- मग तो साहित्यिक असू द्या, नाटककार असू द्या, कवी असू द्या अथवा ध्येयवादी राजकारणी असू द्या- त्यांचं सर्वांचं ध्येय एकच असतं. एकच असू शकतं.

लुई पिरांदेलोंनी असं सांगितलं होतं – “The Eternal man is the first primary concern of the man of letters, of the writer, of the artist.” त्याचा अर्थ असा आहे - जो कलावंत असेल, साहित्यिक असेल, कवी असेल, प्रतिभाशाली असेल; त्याच्यासमोर एकच उद्दिष्ट सदैव असायला पाहिजे, मनुष्य-मानव! त्याची उंची कशी वाढवायची, त्याचं जीवन समृद्ध कसं करायचं, त्याच्या पाठीवरचं ओझं रत्तीभर का होईना कमी कसं करायचं, त्याच्या डोळ्यांतील अश्रू संपूर्ण पुसता आले नाहीत तरी एक आसू कसा पुसायचा- ही ज्याची वेदना असते, ही ज्याची तळमळ असते, ही ज्याची व्यथा असते; तो मनुष्य कधी शिल्पकार बनतो आणि मायकेल एंजलोच्या रूपानं पियेटा नावाचं अमर शिल्प त्या ठिकाणी उभं करतो, कधी बर्मिनीच्या रूपानं सौंदर्यांचा साक्षात्कार घडवतो. कधी तो वेरूळला येतो, कधी अजिंठ्याला जातो, कधी एलिफंटाला जातो.

त्यांचा वंश एक, त्यांची कुळी एक. त्यांचा रंग वेगळा होता, धर्म वेगळा होता. परंतु मला असं सांगायचं आहे की, त्यांचा पिंड एक होता. त्यांची स्फूर्ती एक होती. त्यांचं ध्येयमंदिर एक होतं. त्यांना मिळणारी ही जी प्रेरणा होती, ती एकच होती. ज्यानं वेरूळचं कैलास लेणं पाहिलेलं आहे आणि तो जाऊन जर्मनीच्या कॉलम्स पाहू लागला किंवा मायकेल एंजलोचं किंवा राफेलचं हे अमर कलावैभव पाहू लागला, तर ही एकाच आईची मुलं! आणि कुठली ही आई? एकाची आई कदाचित काशीबाई असेल, गंगूबाई असेल, त्याची बिचाऱ्याची मारिया, ख्रिस्तिनी असेल; परंतु मानवतेबद्दलची ही कणव, ही वेदना समान आहे आणि तिच्या उदरातून ही जन्माला आलेली मुलं असतात.

खऱ्या कलेला, खऱ्या साहित्याला काळाचं बंधन नसतं. जुनी कला, नवी कला ही भाषा अपुरी आहे, अधुरी आहे आणि उपरी पण आहे. काळाच्या सरळ, सलग, अखंड रेषेवर काल्पनिक छेद आम्ही मानव करत असतो, अन्यथा तिथं छेद नसतात. चांगल्या कलेला, चांगल्या साहित्याला कुठंही काळाचं असं ठिगळ लावता येत नाही. लेबल लावता येत नाही. त्याला बंधन नसतं आणि खऱ्या राजकारणाचंही तसंच असतं, हेच मला सांगायचं होतं. परंतु एक वेळ अशी होती की, मराठी साहित्यामध्ये हे सारं प्रतिबिंबित होत होतं. मला जाणीव आहे की, सह्याद्रीचं कळसूबाई हे आमचं सर्वांत अत्युच्च शिखर; परंतु आमच्या पराक्रमाचं आणि प्रतापाचं सर्वांत उच्च शिखर इथून अगदी जवळ आहे, दृष्टीच्या टप्प्यात आहे. त्याच्या परिसरात आम्ही बोलत आहोत.

आजच्या मराठी साहित्याबद्दल अपेक्षा सांगत असताना, केवळ क्षणाकरता मन मागं पाहतं. आम्ही जे किल्ले बांधले, ते अजिंक्य होते. आम्ही जी लेणी कोरली, ती अतुल्य होती आणि आम्ही जे ग्रंथ लिहिले, ते आता अशक्य झालेले आहेत. या तिन्ही क्षेत्रांत हिमालयाएवढा उंच पराक्रम सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून झाला. मराठी प्रवृत्तीचं दर्शन घ्यायचं असेल तर ते इथं, या तिन्हींत मिळतं. ही लेणी अशी आहेत की, त्यांची तुलना करता येणारी वास्तू किंवा शिल्प अन्यत्र मिळणं कठीण आहे. कोत्या देशाभिमानातून हे मी बोलत नाही आहे; परंतु पाहण्याची संधी जीवनात मिळाली म्हणून तुलना करण्याचं धाडस मी करत आहे. हीच गोष्ट या किल्ल्यांची. ते रांगडे होते, परंतु दुर्दम्य आशावादाचं प्रतीक होते. महाराष्ट्रात २३२ किल्ले आहेत. त्यांपैकी १२१ किल्ले कोकणात बांधले, याच भूभागात. त्याचं कारण वेगळं होतं. दगड चांगले, विटा स्वस्त आणि मजुरी स्वस्त म्हणून किल्ले इथे बांधले नाहीत; किल्ले उभारणाऱ्याला माहीत होतं की, किल्ल्यांचा बचाव होतो, किल्ला उभा राहतो तो दगडांनी, विटांनी, चुन्यानं नव्हे; तर त्याला रखवालदार म्हणून जो नेमायचा असतो, त्याचं मनगट आणि त्याचं मन हे किती बलशाली असतं, याच्यावर किल्ला उभा असतो.

किल्ल्याची राखण हे करीत असतात, दगडधोंडे करत नसतात, म्हणून किल्ले या परिसरात शिवाजींनी उभे केले होते. हे जाणण्याची किमया त्यांच्या ठायी होती म्हणूनच तो शककर्ता ठरला. हे किल्ल्यांचं झालं, लेण्यांचं झालं, हे ग्रंथांचं झालं आमच्या. गेल्या शंभर वर्षांमध्ये आचार्य अत्रेच फक्त म्हणू शकले असते की, जे वाङ्मय महाराष्ट्रात निर्माण झालं ते नरांपेक्षा वानरांच्या करता योग्य होतं. तो त्यांचा अधिकार होता. परंतु मी असं म्हणेन की, अनेक दृष्टीनं आमचं वाङ्मय समृद्ध झालं, विपुल झालं, विशाल झालं. विशेषतः १९४५ नंतर मराठी वाङ्मयाच्या काव्य, लघुकथा या शाखांतून नवता आहे. या नवतेमुळे मराठी वाङ्मयामध्ये स्थित्यंतरं घडली. नवी सूक्ष्मता आली. नवी सखोलता आली, परंतु त्याचबरोबर एक वैफल्य ठिकठिकाणी डोकावून पाहत आहे. जीवनाचा मीपणा, उणेपणा, करंटेपणा, विफलता. म्हणून एक प्रकारचा आततायीपणा या वाङ्मयात प्रतिबिंबित झालेला दिसतो.

आणि हे पाहिल्यावर इथं थांबावं लागतं आणि आमच्या अपेक्षा सांगाव्या लागतात.

आरंभ मी असा करीन, ‘निराशेच्या गामी कधि नच महाराष्ट्र बुडवी।’ हे निराशेचे सूर. कुणी म्हणेल, कवीनं कृत्रिमपणानं आशावादाचा ध्वज धरला पाहिजे का? असा आग्रह मी धरणार नाही. परंतु व्यक्तित्व ज्या वेळी या विश्व-अनुभवाशी समरस होतं; त्या वेळी महान कलाकृती साकार होत असते, जन्म घेत असते, उदयाला येत असते.

हे लक्षात घेतल्यानंतर स्वतःच्या या मनोऱ्यात किती काळ कोंडून घ्यायचं? या वेळी भोवतालची व्यथा, दुःख आणि जखम केवढी मोठी आहे, हा प्रश्न कलावंतांनी आणि साहित्यिकांनी स्वतःला विचारला पाहिजे. आधुनिक मराठीमध्ये हे फार तेजस्वी उद्गार असे मला वाटतात.

‘जे दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे

बुद्ध्याचि वाण धरिले करिं हे सतीचे’

त्यानंतर राजकारण तेजस्वी झालं आणि साहित्यही तेजस्वी झालं होतं. आज ही कविता किंचित बदललेली दिसते, म्हणून राजकारण कसं आहे, ते तुम्ही पाहता. त्याचं वर्णन करण्याचं धारिष्ट्य माझंसुद्धा होत नाही. परंतु ते कसं झालं- ‘की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने’ याच्या शेवटच्या दोन ओळी, ‘जे दिव्य दाहक म्हणुनि असावयाचे’ याच्यात थोडा बदल झालेला दिसतो. साहित्यिकाच्या मनात आणि राजकारणात ‘जे धुंद मादक म्हणूनि असावयाचे’, ‘बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे’ याच्या ऐवजी ‘बुद्ध्याचि वाण धरिले करि हे परीचे!’ असा बदल दिसू लागला आहे.

हा आशय राजकारणाला आणि साहित्याला लागू झाला आहे. आज देशामध्ये ध्येयहीनता आहे, सारी श्रद्धास्थानं आज कोलमडू लागली आहेत. आज जनतेचा तेजोभंग होऊ लागलेला आहे, कारण यांचं तेज आज हरपू लागलं आहे. असं होत असताना साहित्यिकांनी काय करावं? आमचे प्रमाद आणि आमच्या चुका मी सांगितल्या; परंतु तेजस्वी नेतृत्व आणि प्रतिभाशाली चारित्र्य ही एकाच जीवनाची दोन अंगं असतात. साहित्य दुबळं झालं, निश्चल झालं, रडकं झालं; तर नेतृत्व तेजस्वी, पराक्रमशाली, आकाशाला गवसणी घालणारं नसतं.

आजच्या हिंदुस्थानात वाङ्मयाला आवाहन करणारं, आव्हान देणारं काही नाही आणि कार्ल्याला, अजिंठ्याच्या, वेरूळच्या लेण्याला शोभणारी वाङ्मयीन लेणी निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत; पण त्यांचे पडसाद मराठी वाङ्मयात निघाले नाहीत, उठले नाहीतही माझी वेदना आहे. हे माझं दुःख आहे. ही माझी व्यथा आपल्याला मी सांगू इच्छितो. बारा लक्ष भारतीय फाळणीच्या वेळी मारले गेले आणि त्याहून जास्त भारतीयांच्या जीवनाचा सर्वनाश झाला. विटंबना झाली.

याचं दुःख असलेली कविता मी वाचलेली नाही. याची वेदना असलेली, याची चीड असलेली कविता, याचा त्वेष असलेला ग्रंथ, लघुकथा, कादंबरी पाहायला मिळाली नाही. हे झालं फाळणीचं. त्यानंतर दोन गोष्टी घडल्या. एका ठिकाणी आमची विटंबना झाली. दुसर्‍या ठिकाणी आमच्या पराक्रमाची ध्वजा फडकली. नेफामध्ये मानखंडना झाली. त्याचं शल्य एका शीख मुलीनं ‘नामकाचू’ नावाच्या कवितेत लिहून दिले. फार सुंदर आहे ती कविता, इंग्रजी होती. ती अशा पिढीची प्रतिनिधी होती की, ज्यांना ना पंजाबी, ना हिंदी, ना भारतीय भाषा; परंतु कवितेमध्ये तिथे पतन पावलेल्या वीरांचं जे काही दुःख असेल, ते व्यक्त झालं होतं. त्यात शब्द असे होते - We cry mother, not because we die, We cry because we had no opportunity To serve you, to fight for you, We died like rush in a track. (“आम्हाला लढता आलं नाही. आम्हाला तुझ्याकरता धारातीर्थी पतन पावता आलं नाही. पिंजर्‍यात अडकलेल्या उंदरा-मांजरासारखी आमची कत्तल झाली- हे आई, ही आमची वेदना आहे. जीवनाचा निरोप घेताना शल्य बोचतं ते हे!”) या कवितेमध्ये आमच्या नतद्रष्ट नेतृत्वानं आमच्या मातृभूमीचा जो दारुण अपमान केला होता, त्याची दखल घेतलेली आहे.

मला माझ्या मराठी कवितेमध्ये हे ऐकायला पाहिजे होतं. कवितेला माध्यमाचं बंधन असता कामा नये, हे मला मान्य आहे; परंतु असं का झालं नाही? त्यानंतर अमृतसरच्या परिसरामध्ये जो पराक्रम झाला, त्याचं वर्णन करायचं हे स्थळ नाही; तो अनन्यसाधारण होता. एकवीस वर्षांचा चटर्जींचा मुलगा- जे आमच्याबरोबर लोकसभेत बसत होते- त्याच्या पराक्रमामुळे आम्हाला कारगिल मिळालेलं होतं, तो त्या संगरात धारातीर्थी पडला. मला वाटलं होतं की, फक्त हरी नारायण आपट्यांच्या कादंबरीत, ती पराक्रमी वीराची गरोदर असलेली, उद्याचा भारत घेऊन असलेली तरुणी असते; परंतु मी पाहिलं, कारण चटर्जी आम्हाला घरी घेऊन गेले आणि ती तरुणी उभी होती. ‘What is there to cry? He will be reborn.’

मला हे शब्द कधी स्वतःच्या कानांनी ऐकायला मिळतील, असं वाटलं नव्हतं... आणि हे केवढं काव्य आहे! केवढं महाकाव्य आहे! तिचा नवरा तिथं धारातीर्थी पडला म्हणून तुम्हाला कारगिल मिळालेलं होतं. आणि तो गेला कसा? कारण तो सरपटत गेलेला होता. कारगिलचा पराक्रम हा केवळ थर्मापिलीच्या, पावनखिंडीच्या तोडीचा पराक्रम आहे. मग पावनखिंडीचा वारस कोण? बाजी प्रभूचा

वारसदार कोण? ज्यानं पावनखिंड लढवली, त्याचा वारसदार हा चटर्जींचा मुलगा होता. आणि त्याच्या पराक्रमाबद्दल कोणाच्या बाहूंना स्फुरण यायला हवं होतं? कोणाच्या लेखणीला स्फुरण यायला हवं होतं? मराठी कवींच्याही लेखणीला हे स्फुरण यायला पाहिजे होतं. बंगालींच्या आलं की नाही, मला माहीत नाही. हे का असं होत नाही?

मिश्या वर ठेवल्या म्हणून हरिजनाच्या मुलाला गोळ्या घालून ठार करतात, तर या घटनेबद्दलचा त्वेष आणि त्याचे आव्हान देणारी कविता, लघुकथा का लिहीत नाही? नव्या लघुकथेमध्ये, नव्या मराठी वाङ्मयामध्ये पुष्कळ चांगलं आहे. पुष्कळ जतन करण्याजोगं आहे, पुष्कळ श्रेष्ठ आहे. परंतु आता एक नवा भारत घडत आहे. त्यामध्ये नवा भारतीय हवा, नवा महाराष्ट्रीय हवा, कारण नवा मानव हवा. Man is the measure of all the things. हेच साहित्याचं, हेच राजकारणाचं.

तुम्ही तुमच्या हस्तिदंती मनोऱ्यात राहिलात आणि आम्ही आमच्या सत्तेच्या कैफात राहिलो, तर कसं होईल? कारण तुमची जी साधनं आहेत, तुमची जी माध्यमं आहेत; ती आमच्या माध्यमांपेक्षा फार श्रेष्ठ आहेत. म्हणून मी हे तुम्हाला सांगू इच्छितो. जे कालातीत आहे, त्याचा वेध घेण्याची किमया साहित्यिकांमध्ये असते. तात्कालिकांत जे गुरफटलेलं असतं, त्याला चिरंतन करण्याची जादू आणि सामर्थ्य तुमच्याकडे असतं. जे सामान्यतः बुद्धीच्या आणि तर्काच्या पलीकडे कुठं तरी तरंगत असतं; त्याचं आकलन करणं, त्याला मूर्तिमान करणं, त्याला अर्थपूर्ण करणं हे कवीचं, साहित्यिकाचं काम असतं. आमचं साधन असतं ते तुटपुंजं असतं. ते हातात आधी येत नाही- ते म्हणजे सत्ता. त्याच्यासाठी केवढी यातायात! आणि ती मिळाली तर, सत्तेची छिन्नी हातात घेऊन राजकारणी आपल्या स्वप्नातील समाजपुरुषाची मूर्ती बनविण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु सत्तेचं हे असं दुर्दैव असतं की, तत्कालीन म्हणजे हातात असताना तिच्याइतकं प्रभावी काही नाही; आणि ती हातातून गेली की तिच्याइतकं दुबळं, कुचकामी काही नसतं. सत्तेची ही दुर्बलता असते. परंतु तुमच्या हातातील जी साधनं आहेत, जी माध्यमं आहेत, ती मात्र चिरंजीव असतात.

मी एक भाषण वाचलं होतं. ते भाषण कसं करू नये हे होतं, कारण करावं कसं हे मी खूप जणांना विचारलं; कुणी मार्गदर्शन करेना. मग मी ‘नेति नेति’ या न्यायानं सुरू केलं. आणि मग असं आढळून आलं- काय करू नये हे गवसू लागलं, दिसू लागलं, जाणवू लागलं. एकदा मी राजकारण बोलायचं नाही असं ठरवलं आणि मी बोललो नाही, असा माझा अंदाज आहे.

यासंबंधी बोलताना मला आठवलं- १९४१ मध्ये सोलापूरला साहित्य संमेलन होतं, तिथं एक ठराव आला होता. तो राजकीय स्वरूपाचा होता. महाराष्ट्रातील एका प्रथितयश संपादकांनी- त्या वेळी ते तरुण होते- मांडलेला होता. मोठं वादंग माजून राहिलं होतं. वामनराव जोशी पुढं आले आणि ते प्रकरण मग निकालात काढलं. त्यांनी सांगितलं, “राजकारणावरचा ठराव एक जरी आला, तर साहित्य संमेलनाचं रूपांतर राजकीय आखाड्यात होईल आणि असे आखाडे महाराष्ट्रात भरपूर आहेत. निदान पुण्यात तरी आणखी एक आखाडा नको.” मलाही हे पथ्य पाळायचं आहे.

दुसरं असं की, १९५९ च्या मिरजेच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भाऊसाहेब खांडेकर होते. त्यांचं भाषण मी वाचलं. फार सुंदर आहे. परंतु टीका अशी झाली की भाषण सुंदर होतं, परंतु फार लांबलं. म्हणजे भाषण लांबता कामा नये, हे दुसरं पथ्य. या दोन मर्यादा- शक्यतो राजकारण बोलायचं नाही आणि शक्यतो लांब भाषण करायचं नाही- घालून मी बसलो होतो आणि म्हणून आता या ठिकाणी माझ्या भाषणाचा शेवट करू इच्छितो.

तुमच्याकडून माझी अपेक्षा कुठली? आज हिंदुस्थानामध्ये अनेक गोष्टींची कसोटी होत आहे. अनेक गोष्टी टिकणार की नाहीत, अनेक मूल्यं आमच्याकडे राहणार की नाहीत, जे जिवाचं मोल देऊन मिळालं होतं तेही राहणार की नाही? आता कसोटीच्या काळातून हे राष्ट्र, महाराष्ट्र, भारत- दोन्ही जात आहेत. आणि हे जर टिकवायचं असेल; तर हिंदुस्तान एक दुय्यम दर्जाचं, इतरांच्या कृपेवर आणि भिकेवर जगणारं राष्ट्र हेच त्याचं स्थान राहता कामा नये. भाऊसाहेब खांडेकरांनी त्यांच्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात असं सांगितलं होतं, “मराठी भाषेला नोबेल प्राइझ लवकर मिळण्याचं भाग्य लाभो आणि तेही याचि देही याचि डोळा मला बघायला मिळो.”

मी असं म्हणणार नाही. मी अशी प्रार्थना करू इच्छित नाही. अनेक नोबेल प्राइझेस अनेकदा ओवाळून टाकावीत इतकं साहित्य, इतकं साहित्यभांडार मराठीचं आहे, महाराष्ट्राचं आहे असं मी मानतो. एकच नोबेल प्राइझ काय? फार मोठं साहित्य आहे. आधुनिक नसलं तर जुनं आहे. आधुनिक मराठीत तसे ग्रंथ तयार व्हावेत, तशी लेणी घडावीत. फार मोठी ग्रंथरचना व्हावी, ही तुमच्यापाशी माझी प्रार्थना असेल.

परंतु माझी जी अपेक्षा आहे, ती वेगळी आहे. आता भारतभर जी एक धडपड चाललेली आहे, ती एक महाराष्ट्रातच आहे असं नाही. नवा भारतीय हा अधिक मुक्त असावा, अज्ञानापासून अधिक मुक्त असावा. त्याची बौद्धिक, सांस्कृतिक आणि शक्य असेल तर त्याची भौतिक उंचीही थोडी अधिक असावी. यासाठी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत एक धडपड चालू आहे. एक हव्यास चालू आहे. महाराष्ट्र यामध्ये काय करणार आहे? मला वाटतं, सर्वांत जास्त दंगे झालेले राज्य हाच महाराष्ट्राचा लौकिक राहणार की धडपडीतील अग्रेसर म्हणून आम्ही मान्य होणार? जुन्याचा हव्यास धरणारा, जुन्यात जे चांगलं आहे ते प्राणपणानं जपणारा, परंतु विज्ञानानं उजळलेली नवी क्षितिजं काबीज करू पाहणारा, जन्मावर आधारलेला अन्याय आणि अज्ञानावर आधारलेल्या रूढी यांच्याविरुद्ध तुतारी फुंकणारा, आततायी व राष्ट्रविघातक अशा प्रवृत्तीचा संहारक कर्दनकाळ, भारतीयत्वाचा जागता पहारेकरी आणि इतक्या प्रयत्नांनी हळूहळू अंकुर फुटलेल्या या राष्ट्रीयत्वाच्या वृक्षाचा हा पुजारी- असा महाराष्ट्र व्हायला हवा! ही प्रेरणा तुम्ही देऊ शकाल, ही स्फूर्ती तुमच्याकडून मिळू शकेल. असं मराठी साहित्य हवं. हे झालं नाही, तर जी-जी आम्हाला दैवतं वाटत आहेत, ती कोसळू लागतील, ती कोलमडू लागतील. हिंदुस्थानचं स्वातंत्र्य, हिंदुस्थानचं अखंडत्व जे काही शिल्लक असेल त्याचं अखंडत्व, हिंदुस्थानचं सार्वभौमत्व आणि हिंदुस्थानची लोकशाही ही सारीच कसोटीतून जात आहेत. त्यांच्या आव्हानांचा पडसाद मराठी साहित्यात हवा. त्यांच्या संरक्षणाची प्रेरणा मिळेल असं साहित्य इथं व्हावं. ही प्रेरणा तुम्ही द्यावी आणि त्याचे नम्र सेवक म्हणून काम करण्याची सुबुद्धी आम्हाला लाभावी, अशी प्रार्थना करून मी आपली रजा घेतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

.............................................................................................................................................

'लोकशाहीची आराधना' या पुस्तकाची ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/4719/Lokshahichi-Aradhana

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......